आणि माऊंट किनाबालू सर झाला...

By सोत्रि, 20 February, 2026

Comments

माउंट किनाबालू, ईस्ट मलेशिया ह्या बेटावरील (बोर्निओ आयलंड) साबा ह्या राज्यातला, मलेशियातील आणि साऊथ ईस्ट आशियातील सर्वात उंच पर्वत आहे. आणि, जगातील बेटांवर असलेल्या पर्वतांमध्ये जगात तिसऱ्या नंबरचा उंच पर्वत; ज्याची समुद्रसपाटीपासूनची उंची 4095 मीटर आहे. गिर्यारोहकांमध्ये चढाई करण्यासाठीचं एक मानाचं नाव आहे माउंट किनाबालू (स्थानिक भाषेत गुनुंग किनाबालू) .

ऑपरेशन ऍबोर्शन ह्या लेखात सांगितल्याप्रमाणे धावण्याबरोबरच हायकिंग सुरू करून कौलालम्पूरच्या आजूबाजूचे सगळे डोंगर आणि टेकड्या हळूहळू सर करून झाल्या होत्या. आता हा माउंट किनाबालू साद घालत होता, खुणावत होता. मलेशियात 10 वर्ष राहूनही समहाऊ ईस्ट मलेशियाला कधी जाणं झालं नव्हतं, माउंट किनाबालूच्या निमित्तानेच ते होण्याची शक्यता होती. पण माउंट किनाबालूवर चढाई खूप अवघड आहे असे ऐकून असल्याने धाडस होत नव्हते. पण आमच्या ऑफिसच्या ट्रेकिंग ग्रुपचे 2 गिर्यारोहक कार्यकर्ते, माऊंट किनाबालूवर यशस्वी चढाई करून आले. आणि, माझ्या बकेटलिस्टमधील एक आयटम टिक होण्याच्या शक्यतेला पालवी फुटली.

माउंट किनाबालू सर करताना बायकोही बरोबर असावी अशी इच्छा होती. ती कधीकधी जवळच्या टेकड्यांच्या हायकिंगला यायची, पण ती नियमित हायकिंग करत नव्हती, हौशी ह्या गटात मोडत होती. माउंट किनाबालू सर करणं हा हौशी मामाला नव्हता; त्यासाठी बरीच तयारी असणं आवश्यक होतं. पण बायकोनेही माउंट किनाबालू सर करण्याचा विडा उचलायचं ठरवलं. काही कारणाने परत मन बदलायच्या आत साबाट्रॅव्हेल्स.कॉम ह्या साईटवर जाऊन ‘3D2N Mount Kinabalu Climb & Kinabalu Park HQ Stay’ हे पॅकेज बुक करून टाकलं आणि लगेच विमानाची तिकिटही बुक करून टाकली. आता जायचं तर नक्की झालं, पण सुखरूप आणि धडधाकटपणे परत येणंही महत्त्वाचं होतं. त्यासाठी सराव महत्त्वाचा होता. हातात 3 आठवडे होते. आमच्या ऑफिसच्या ट्रेकिंग ग्रुपचा लीड, बिशाल पांडे, याने आमच्या प्रॅक्टिससाठी 2 अवघड ट्रेक प्लॅन केले. ते दोन ट्रेक केल्यावर बायकोचा, माउंट किनाबालू सर करणं आवाक्यात आहे, हा आत्मविश्वास दुणावला. आणि, त्यामुळे तिच्याबरोबर माझाही.

शारीरिक सरावाच्या तयारीबरोबरच त्या चढाईच्या प्लॅनिंगची आणि चढाईला लागणाऱ्या साहित्याची जुळवाजुळव करणंही सुरू झालं. माऊंट किनाबालू पायथा ते शिखर हे अंतर 9 किलोमीटर आहे, म्हणजे जाऊन-येऊन 18 किलोमीटर अंतर कापायचं आणि आणि 4095 मीटरची उंची गाठायची. माउंट किनाबालूची चढाई दोन टप्प्यांमध्ये आणि दोन दिवसांमध्ये विभागलेली असते.

पहिला टप्पा एक दिवसाचा, ह्यात पायथ्यापासून बेस कँपपर्यंतचा 6 किलोमीटरचा पल्ला पहिल्या दिवशी पार पाडायचा असतो. हे सहा किलोमीटर 1345 मीटर उंचीवर घेऊन जातात आणि जाताना वैविध्यपूर्ण terrain (भूप्रदेश) चढाई अवघड करतात. पहिला टप्पा, पहिल्या दिवशी बेस कँपला एक मुक्काम करून संपतो. ह्या टप्प्यावर तापमान आल्हाददायक असतं, 12-16 डिग्री सेल्सियस.

दुसरा टप्पा, दुसऱ्या दिवशी भल्या पहाटे 2:30 am ला सुरू होतो. ह्या टप्प्यात शिखरमाथ्यावर चढाई करायची असते. बेस कँप ते शिखर हे अंतर आहे 3 किलोमीटरचं. पूर्ण खडकाळ मार्ग, शारिरीक क्षमतेची कसोटी बघणारा. ह्या टप्प्यातलं तापमान अत्यंत थंड असतं, 0-3 डिग्री सेल्सियस. मेनलँड मलेशियात 30-32 डिग्री सेल्सियसमध्ये राहणाऱ्यास 0-3 डिग्री सेल्सियस तापमान, तेही 5-7 km/hr वेगाने वाहणाऱ्या वाऱ्याच्या साथीने, हे शारीरिक क्षमतेची कसोटी पाहणारं असतं. त्यासाठी दुसऱ्या टप्प्यात कपड्यांचे 3 थर आवश्यक असतात. आधी थर्मल्स त्यावर टीशर्ट आणि पफ जॅकेट आणि त्यावर वॉटरप्रूफ आणि विंडप्रूफ जॅकेट आणि कानटोपी. शिखर सर करून, 3 किलोमीटरचा खडकाळ मार्ग पार करून परत बेस कँपला यायचं आणि नाश्ता करून 6 किलोमीटरचा वैविध्यपूर्ण terrain पार करत पायथा गाठायचा. इथे दुसरा टप्पा पूर्ण होतो. पण ह्या असल्या गरम कपड्यांची गेल्या 10 वर्षांत कधी गरजच पडली नव्हती त्यामुळे तसले कपडे संग्रही असणं शक्यच नव्हतं. ही सगळी खरेदी करताना जीवावर आलं होतं कारण ते कपडे परत पुन्हा वापरायची काही गरज पडणार नव्हती. पण पर्याय नव्हता. तर, सगळी तयारी करून झाली आणि जायचा दिवस एकदाचा उजाडला.

सकाळी लवकर उठून विमानतळ गाठला आणि विमान पकडून कोटा किनाबालूला पोहोचलो. विमानतळावर टुर कंपनीची वॅन वाट बघत होती पिकअप साठी. ड्रायव्हरने मेसेज करून गाडीचा नंबर आणि पार्किंगच ठिकाण कळवलं. त्यानुसार आम्ही दोघे गाडीकडे पोहोचलो.

गाडीवान दादाने गाडी सुसाट सोडली आणि दोन तासात आमच्या टूर ऑपरेटरच्या ऑफिसात घेऊन आला. तिथे पासपोर्ट देऊन रजिस्ट्रेशनचे सगळे सोपस्कार पार पडले आणि पहिल्या रात्रीच्या मुक्कामाच्या घराचे चेक इन पण करून झाले. दुसऱ्या एका वॅनने पाच मिनिटांवर असलेल्या मुक्कामाच्या ठिकाणी पोहोचलो. प्रशस्त आणि सुंदर घर होते.

दुसऱ्या दिवशी सकाळी उठल्याबरोबर घराच्या बाल्कनीमधून माउंट किनाबालूचे दर्शन झाले. नाश्ता करून परत टूर ऑफिसला पोहोचलो. ऑफिसच्या समोरून पुन्हा माउंट किनाबालूचे दर्शन झाले, लगेच फोटो काढून घेतला आणि पायथ्याच्या प्रवेशद्वाराकडे कूच केले. तिथे पोहोचून तिथल्या चेकपॉईंटवर पुन्हा पासपोर्ट दाखवून चढाईचा श्रीगणेशा केला.

पहिल्या टप्प्यातला terrain (भूप्रदेश) वैविध्यपूर्ण होता. सगळा चढच चढ. जरा 200-300 मीटर सरळ चालून पायांना आराम मिळेल असं अजिबात नाही, सगळा पायऱ्या पायऱ्यांचा स्टीप चढ.

हा वैविध्यपूर्ण terrain (भूप्रदेश) पार करतानाचे काही क्षण:

https://youtube.com/embed/_F-zmrZtzSM?si=QZeKMUa_3P9yvvLY

https://youtube.com/embed/e0_KZghND8c?si=3h6qntTVBRqm-xbR

https://youtube.com/embed/I_l3st18raQ?si=DdCaNu5gAZJrUaw3

हार्ट रेट सेफ झोन (एरोबिक) मधे राहण्यासाठी एका तासाला एक किलोमीटर हा वेग ठरवून ठेवला होता. त्यात टॉयलेट ब्रेक, लंच ब्रेक हे सगळे पकडले होते. त्यानुसार सहा किलोमीटरचा पहिला टप्पा 6 तासांत पार करून बेस कॅम्पला पोहोचलो. पोहोचलो तेव्हा बेस कॅम्पवर ढग उतरले होते. वातावरण एकदम थंड होऊन तापामान 12 डिग्री सेल्सियस झालं होतं, एकदम गुलाबी माहौल!

बेसकॅम्पच्या रेस्तरॉमधे जाऊन, थंडीवर उतारा म्हणून गरम गरम टॉम-यॅम सुप घेतला. रिसेप्शनवर जाऊन डॉरमेटरीच्या रूमची चावी घेतली आणि रूम मधे जाऊन दुसऱ्या दिवशीच्या चढाईची तयारी करून ठेवली. फक्त पाणी असलेली एक बॅग एवढच वजन घेऊन जायचं ठरवलं कारण दुसरा टप्पा सगळा अवघड खडकाळ चढणीचा होता. दुसऱ्या दिवशी घालायचे कपडे घालूनच झोपलो. थकलेलं अंग लगेच झोपेच्या अधीन झाल. सकाळी 1:30 am चा लावलेला गजर झाला आणि उठलो. बाथारूममधे गेल्यावर कळलं गरम पाणी नाहीयेय. त्या बर्फाळ पाण्याने दात घासून आणि तोंड घुवून रेस्तरॉमधे जाऊन कार्बयुक्त नाश्ता घेतला. 2:30 am ला आमच्या गाईड बरोबर शिखरमाथा चढाईला सुरुवात केली.

https://youtube.com/embed/PmYJNAi3o88?si=pwezWUuJyoefraW4

https://youtube.com/embed/lCU6sEDLpyo?si=KKCUM5l69VGE8km5

शिखर माथ्यावरून ७:०० वाजता परत बेस कॅम्पकडे जाण्यास कूच केले आणि १०:३० वाजता बेस कॅम्पवर परत आलो. चेकआऊट करून, नाश्ता करून परतीचं ६ किलोमीटर्सचं अंतर तुडवून पायथ्याशी जायचं होतं. येताना १ किमी साठी एक तास ह्या वेगाने आलो होतो पण तेव्हा येताना फ्रेश होतो, आता शिखरमाथा सर करून आल्यामुळे आधीच ६ किलोमीटर्स तुडवून झाले होते. माझं परतीचं विमाना रात्री 10:00 pm वाजाताच होतं. म्हणजे मला विमानतळावर 8:00 pm वाजता पोहोचायला हव होतं. त्यासाठी पायथ्याशी काहीही करून 6:00 pm च्या आधि पोहोचणं गरजेचं होतं. म्हणजे काहीही करून 11:00 am वाजता खाली उतरायला सुरुवात करणं गरजेचं होतं. शिखर माथ्यावरून बायकोच्या आधी 10 मिनिटं खाली पोहोचून मी ह्या वेळेचंच गणित करत बसलो होतो तोच बायको खाली आली आणि म्हणाली, "मी एकदम ड्रेन झालेय, काही सुचत नाहीयेय!" माझ्या पोटात गोळाच आला. तिला प्रचंड भूक लागली होती. लगेच बेसकॅम्पच्या रेस्तरॉमधे जाऊन जेवणाची ऑर्डर दिली आणि जेवण यायची वाट बघत बसलो. एक डोळा घड्याळाकडे होताच. जेवण येऊन ते संपेपर्यंत 11:20 झाले. तोपर्यंत आमचा गाईड गायब झाला, त्याला शोधून आणेपर्यंत 11:30 झाले. जसा जसा वेळ जात होता तसा तसा माझा जीव वरखाली होत होता.

शेवटी 11:35 ला खाली उतरायला चालू केले आणि खाली उतरताना जीव मेटाकुटीला आला. पहिलं अर्ध किलोमीटर पार करायला 45 मिनिटं लागली. ह्या वेगाने खाली उतरलो तर विमान काही मिळणार नाही ह्याची भीती जोरात उसळी मारायला लागली. पण 2 किमी उतरून झाल्यावर बायकोने मनावर विजय मिळवला आणि निग्रहाने माझ्या वेगाने खाली उतरू लागली. शेवटच्या दोन किलोमीटरचा रस्ता बऱ्यापैकी सोपा असल्याने सुरुवातीला वाया गेलेला वेळ कव्हर करता आला आणि आम्ही दोघे 5:52 pm ला पायथ्याशी पोहोचलो, प्लॅन केल्याच्या तब्बल आठ मिनिटं आधि!

पायथ्याशी आमची गाडी आमचीच वाट बघत उभी होती. लागेच गाडीत बसलो आणि विमानतळाच्या रस्त्यावर असलेल्या टूर ऑफिसमध्ये ठेवलेलं सामान आणि क्लाइंबिंग सर्टीफिकेट घेतलं आणि ड्रायव्हरला गाडी विमानतळाकडे सुसाट घ्यायला लावली. चायनीज न्यू इयर मुळे बऱ्याच ठिकाणी ट्रॅफिक जॅम होतं पण ड्रायव्हर एक्सपर्ट होता त्याने वेळेत विमानतळावर पोहोचवलं. बोर्डीग पास घेऊन टॉयलेटमध्ये कपडे बदलले कारण अंगावर सकाळपासूनचे तेच घामट कपडे होते. कपडे बदलत असे पर्यंत आमच्या नावाच्या बोर्डिगसाठी अनाउंसमेंट्स सुरू झाल्या. धावत पळत गेट गाठलं आणि विमानात शिरणाऱ्या शेवटच्या पॅसिंजराचा मान मिळवत स्थानापन्न झालो...

आणि माऊंट किनाबालू सर झाला!!!

शिखरमाथ्यावरील काही आठवणी:

माऊंट किनाबालू चढायचा विहंगम मार्ग:

https://www.youtube.com/watch?v=5012l7SV41I

पहिल्या सहा किलोमीटर्स चा पायथ्यापासून ते बेस कॅम्प पर्यंतचा मार्ग

https://www.youtube.com/watch?v=JwtqNtGAz34

बेस कॅम्पपासून शिखरमाथ्यापर्यंतचा 3 किलोमीटर्सचा