याना _गोकर्ण _ मुर्डेश्वर सहलीतील तिसरा आणि अंतिम भाग
मागील लेख
१. उत्तर कर्नाटकातील याना शिखरे. | https://www.misalpav.com/node/53526
२. गोकर्ण भेट, उत्तर कर्नाटक | https://www.misalpav.com/node/53532
कालच्या गोकर्ण भेटीनंतर आजचा तिसरा दिवस हॉटेलमध्ये राहण्याची गरज नव्हती. रुम सकाळी लवकरच सोडून समोरच्या बस स्टँडवर आलो तेव्हा मुर्डेश्वरा _भटकळ _कुंदापुरा करत उडुपीपर्यंत जाणारी बस उभीच होती. नाश्ता तिकडे मुर्डेश्वरातच करायचे ठरलेले त्यामुळे कॉफी घेऊन बसमध्ये बसलो. बस डेपो स्वच्छ आहे. त्यातले कँटिनही स्वच्छच होते. वाटेत होन्नावरा ( होनावर) आणि शरावती नदीचा पूल लागला. याच शरावती नदीवर वरती घाटात प्रसिद्ध जोग धबधबा आहे. खाली जे पाणी जमा होते तिथे गेरसोप्पा जलाशय आहे. गेरसोप्पा आणि होन्नावराच्या (होनावराच्या) रूंद पात्रात बोटिंगची सोय आहे.
फोटो (१)
कुमटा ते मुर्डेश्वरा NH 66 महामार्गाने
फोटो (२)
होन्नावराचा स्वच्छ एसटी डेपो.
फोटो (३)
शरावती नदीच्या पुलावरून जाताना.
मुर्डेश्वरा हे महामार्गापासून दोन किमी आत आहे. ते एक किनाऱ्याशी जोडलेले छोटेसे बेटच आहे. हा सर्व भाग R.N. Shetty या उद्योजकाने विकसित केला आहे.
फोटो (४)
प्रवेशाअगोदर डावीकडे आंघोळीची आणि टॉइलेट्सची सोय आहे. काही जण अगोदर समुद्रावर आंघोळ करून येतात. त्यासाठी उत्तम.
फोटो (५)
प्रवेशद्वारापाशी.
फोटो (६)
प्रवेशद्वारातून आत गेल्यावर हे एकवीस मजली गोपूर समोरच येते.गोपुरातल्या सतराव्या आणि अठराव्या मजल्यावर जाण्यासाठी दोन लिफ्टस आहेत.
इथे आपल्या बॅगा ठेवायची सोय आहे. ते एक बरं झालं. मोकळे झालो. प्रथम समुद्रावरील 'नवीन' रेस्टॉरंटमध्ये नाश्ता कॉफी घेतली. राहाण्यासाठी हॉटेलही आहे. ऑनलाईन बुकिंग होते. नंतर प्रत्येकी वीस रुपयांचे तिकिट काढून वरती गेलो. चारी दिशांना खिडक्या आहेत. आता मुंबईतील, नवी मुंबईतील आणि इतर शहरांमध्ये पंचवीस किंवा चाळीस मजल्यांच्या इमारतीत राहाणाऱ्यांना यांचे अप्रूप वाटणार नाही हे मान्य आहे. पण इकडचे दृष्य पाहिल्यावर त्यांना नक्कीच आवडेल.
फोटो (७)
गोपुरावरून दिसणारं दृष्य, उत्तर भाग
फोटो (८)
गोपुरावरून दिसणारं दृष्य, पूर्व भाग
फोटो (९)
गोपुरावरून दिसणारं दृष्य, दक्षिण भाग
फोटो (१०)
गोपुरावरून दिसणारं दृष्य, पश्चिम भाग (१)
मुख्य देऊळ,शंकराचा मोठा पुतळा, त्याच्या उजवीकडे शनि मंदिर, सूर्यरथ हे गोपुरावरून छानच दिसते. नंतर आपण खाली जाऊन पाहणारही आहोत.
फोटो (११)
गोपुरावरून दिसणारं दृष्य, पश्चिम भाग (२)
फोटो (१२)
मुख्य देवळाचा थोडा भाग
फोटो (१३)
नंदी
फोटो (१४)
उत्तर किनाऱ्यावरून दृष्य
चित्रात सर्वात डाविकडे गोपूर, मध्ये शंकराच्या पुतळ्यापढे 'नवीन' उपहारगृह आणि उजवीकडे राहाण्याचे हॉटेल आहे. समुद्रात तरंगता पूल( दुसऱ्या फोटोत आहे), स्पीड बोट, साधी बोट, नेत्राणी आइलंडकडे जाणारी बोट या सोयी आहेत. या बाजूला कोळ्यांची वस्ती नाही. ती दक्षिण भागात आहे. हाइवेकडून देवळापर्यंत येणाऱ्या रस्त्यावर आणखी हॉटेल्स वाढली आहेत परंतू R.N.Shetty resort ची जागा फारच मोक्याची आहे.
या कर्नाटकच्या समुद्रकिनारी प्रदेशात ( आणि वरील सह्याद्रीच्या पश्चिम घाटात) अगणित जागा आहेत. स्वतः:चे वाहन असल्यास त्या पाहाणे सहज शक्य आहे. एक झलक म्हणजे Alemari Ganesha channel वरचा विडिओ गोकर्ण https://youtu.be/eSiKZnRVznk?si=6Oca0zY2p1fttPZL
मुर्डेश्वर पाहून झाल्यावर साधारण एक वाजता भटकळकडे जावं लागलं कारण मुर्डेश्वरहून मत्स्यगंधा गाडीचं तिकीट मिळालं नव्हतं. हाइवेला येऊन भटकळला बसने गेलो. वीस मिनिटे लागली. त्या भटकळ बसस्टँडला आजुबाजूला रेस्टॉरंट्स होती तिथे जेवण करून भटकळ रेल्वे स्टेशनला(३ किलोमिटर )गेलो. गाडी ( 12134)साडेचारला होती पण ती तीन तास उशिरा येणार होती ते अगोदरच कळलं होतं. बॅगा, सामान घेऊन आणखी कुठे भटकळमध्ये फिरण्याची इच्छा नव्हती. स्टेशनवरच वेळ काढला. गाडीने आणखी वेळ काढला आणि शेवटी आठ तास उशिरा ठाण्यात पोहोचलो. हा प्रवास कंटाळवाणा झाला. पण पर्याय नव्हता. सोमवार गुरुवार धावणाऱ्या तिरुवनंतपुरम _कुर्ला गाडीची(22114) तिकिटे काढली असती भटकळ(14:30) तर वेळेत आलो असतो. ही गाडी साधारणपणे वेळेतच येते. लांब पल्ल्याची असल्याने या गाडीला पुढे काढतात.
मुर्डेश्वराजवळचं आणखी एक ठिकाण :- नेत्राणी आइलंड नावाचं बेट मुर्डेश्वरापासून समुद्रात वीस किलोमीटर आत आहे. तिथे स्कुबा डाइविंग करवतात. साधारणपणे पाच हजार रुपये प्रति व्यक्ती खर्च येतो. केरळमध्ये पुवार येथेही ही सोय आहेच. अंदमान, लक्षद्विप येथेही आहे. प्रत्येक ठिकाणचा अनुभव वेगळा असेल.
हे थोडक्यात लिहिलेलं प्रवासवर्णन वाचायला आवडेल अशी आशा आहे. सूचना आणि दुरुस्त्यांचं स्वागत.
===========================
Comments