अभंग

By प्रा.डॉ.दिलीप बिरुटे, 15 February, 2026

Comments

संसदेत नाही । फिरकले पायी ।
महिलांच्या ठायी । धाक वाटे ।।१।।

जुने मढे सारे । काढिले बाहेरी ।
नाव नेहरूंचे । घेती सदा ।।२।।

एपस्टिन यादी । येईल बाहेरी ।
हीच भीती उरी । दाटलेली ।।३।।

शिक्षण, बेकारी । तशी महागाई ।
बोलणेच नाही । विषयांवर ।।४।।

आत्महत्या करी । राजा शेतकरी ।
जंगले व्यापारी । लुटविती ।।५।।

निवडणुकीवेळी । गोड गोड बोली ।
वचनांची झोळी । रिकामीच ।।६।।

सेवा तीर्थ नाव । ध्यानी नाही भाव ।
जनहिती ठाव । फेकीला हा ।।७।।

संसदेचा वेळ । वायाचि गेला हा ।
'दिलीप' म्हणे पाहा । कुणाकडे? ।।८।।