उत्तर कर्नाटकातील याना शिखरे.
फेब्रुवारी२०२६ दुसऱ्या आठवड्यात याना( कुमटा), गोकर्ण आणि मुर्डेश्वर ही उत्तर कर्नाटकातली सहल केली. इकडे शंकराची स्थाने असल्याने पंधरा फेब्रुवारीच्या महाशिवरात्रीअगोदर जाणे प्राप्त होते. गर्दी वाढते. गोकर्णला प्रसिद्ध महाबलेश्वर मंदिर, महागणपती मंदिर आणि पाच समुद्रकिनारे आहेत. मुर्डेश्वर येथे शंकराचे मंदिर आणि परिसर आर एन शेट्टी या उद्योजकाने विकसित केला आहे. सुंदर समुद्रकिनारा, रेस्टारंट आणि हॉटेल आहे. या तीन ठिकाणी वेळ मजेत जाईल. धार्मिक ठिकाणे आणि मनोरंजन अशी तीन दिवसांची छोटीशी सहल ठरू शकते. पुन्हा पुन्हा जावेसे वाटेल अशी फार दूर नसलेली जागा म्हणता येईल. हॉटेल्सचे एजंट्स टुअर्सचे एजंट यांचा त्रास अजिबात नाही. शांती.
जावे कसे
कोकण रेल्वे हा चांगला पर्याय आहे. कारवार, कुमटा,भटकळ येथे एक्स्प्रेस ट्रेन्स थांबतात. कुमटा रेल्वे स्टेशन आणि बस स्टँड जवळच आहेत. यानासाठी कुमटा येथे उतरणे सोयीचे. यानासाठी एक मार्ग शिरसीकडूनही आहे. परंतू आपण वाहनाने एका बाजूने गेल्यावर त्याच मार्गाने परत यावे लागते. भैरव शिखरावर जाण्यासाठी पायऱ्यांचा मार्ग हा देवळातून जातो आणि त्यासाठी चपला पादत्राणे काढून जावे लागते. ते जरा त्रासदायक आहे. आपल्याला अनवाणी जायची सवय नसते. वेळेअभावी आम्ही इकडे वर गेलो नाही. सकाळीच आल्यास इकडे जाता येईल. खूप छान मार्ग आणि गुंफा आहेत.
रस्त्याने गोव्यातील मडगावपासून कारवार ते उडुपी मंगळुरू असा छान प्रशस्त रस्ता आहे. किंवा पुण्याहून हुब्बळीपर्यंतत आल्यावर कारवार( दांडेली/ अन्शी )किंवा शिरसीमार्गे( सोंधा, सहस्रलिंग, बनवासी) कुमटा येथे येता येते.
याना पाहून गोकर्णला जाऊन तिथे राहता येईल.
यानासाठी तीन वेळा बस कुमठा बस स्टँडहून जातात. ऑटो मिळतात, जाऊन येऊन चार तासांचे ( ६० किलोमीटरस) पंधराशे रुपये घेतले.
राहावे कुठे
यानासाठी कुमटा बसस्टँडजवळ दोन चार हॉटेल्स आहेत.हॉटेल रेलोटेल( १५०० रुपये एसी,१०००रुपये नॉनएसी. चेकइन/चेकाऊट वेळ दुपारी दोन) ). त्यामुळे हॉटेल मंदारामध्ये राहिलो. गावात होम स्टे, रिझोर्ट आहेत.( नेटवर दिसतील).
काय पाहावे
याना अरण्य, वेगळ्याच प्रकारच्या खडकांतील दोन शिखरे. यूट्यूबवर काही विडिओंत ड्रोन शॉट्स आहेत ते अवश्य पाहा.
फोटो (१)
कुमटाहून यानाकडे जाताना. मुख्य शिरसी रस्ता
फोटो (२)
याना अरण्यातून जाताना. हा रस्ता लहान असला तरी चांगला आहे.
फोटो (३)
कुमटा बस स्टँड ते याना मार्ग. सहा किलोमीटरनंतर हा यानाचा फाटा डावीकडे आहे. वळणावळणाचा मार्ग असला तरी फार उंची न गाठता याना पार्किंगपर्यंत जातो.
फोटो (४)
याना पार्किंग.बरीच मोठी जागा आहे.
फोटो (५)
पार्किंग जागेतलं एक उंच झाड लक्ष वेधून घेतं.
प्रवेश विनामुल्य आहे आणि एक चहा कॉफी कोल्ड ड्रिंक्स रेस्टॉरंटही आहे. टॉयलेट्स आहेत.
फोटो (६)
पार्किंनंतर अशा रूंद मातीच्या वाटेने एक तासभर अरण्यातून जायचे आहे. आपण इतक्या जवळ आलो तरी यानाच्या दोन मोठ्या पर्वतांपैकी एकच ओझरता दिसतो.
वर चढताना दोन ठिकाणी विश्रांतीसाठी जागा आणि टॉयलेट्स आहेत. संपूर्ण रस्ता झाडांच्या सावलीतून जातो. दमायला होत नाही.
फोटो (७)
वाटेत एक झरा लागतो. पाणी वाहात होते आणि एक बांध घातलेला होता. फेब्रुवारीतही पाणी जोरात होते.
फोटो (८)
अर्धे अंतर पार केल्यावर हा एक खडक वाटेत लागतो.
फोटो (९)
हा आणखी एक खडक. हा वितळलेल्या लावारसाचा वाटतो. येथून भैरव शिखर दिसू लागते
फोटो (१०)
यानातील दोन शिखरांपैकी उजवीकडे भैरव शिखराचा खडक दिसतो.
फोटो (११)
भैरव शिखरापाशी एक शंकराचे देऊळ आहे. माहितीची पाटी. इथे देवळातर्फे श्रमपरिहार बेलफळाचे सरबत मोठे ग्लासभरून देत होते
फोटो (१२)
मोहिनी शिखराचा खडक.
शिखरावर जायचा पायऱ्यांचा मार्ग देवळातून आहे. पादत्राणे काढून जायचे असल्याने थोडा त्रास आहे पण अवश्य जावे.
फोटो (१३)
परत येताना दृष्य
फोटो १४)
बस डेपोसमोरील एका छोट्याशा दुकानात हे खारे काजू दोनशे दहा रुपये पाव किलो मिळाले. फेब्रुवारी ७ चं पॅकिंग होतं.काजू मस्तच निघाले.
काजूच्या तीन चार प्रती असतात. एका किलोमध्ये किती काजू बिया राहतात यावर क्रमांक पडतो. उदाहरणार्थ वेंगुर्ला ८०,१००,१२० वगैरे. १२० प्रतीचा काजू लहान असतो पण चवीष्ट असतो तर ८० प्रतीची बी मोठी टपोरी असते. पण चव कमी असते. चकणावाले हा घेतात. तसेच बिया कशा भाजल्या यावरही भाव चढतो. चांगल्या भाजलेला अखंड काजू महाग असतो. त्यानंतर हाच तुकडा पडलेला मिळतो. तर स्टीम बॉईल्ड हा स्वस्त असतो. कारण यात काजू टरफलाचे तेल वाया जात नाही आणि त्याला बोट उद्योगात खूप मागणी असते. याचा उपयोग स्वयंपाकात होतो. स्वस्त असतो. शिरा किंवा ग्रॅवीसाठी हा घ्यावा. कुडाळ किंवा सावंतवाडी येथे झांट्ये यांची फॅक्ट्री आहे, दुकाने आहेत ते चांगली माहिती देतात . इकडे कर्नाटकात किंवा तमिळनाडूत त्यांची काजू संशोधन केंद्रे आहेत. त्यांचे वेगळे वाण असणार. तरीही खाण्यासाठीचे चविष्ट काजू आणि दिखाऊ मोठे वेगवेगळे असतात. नवीन काजू फेब्रुवारीला बाजारात येतो. काजूवर एक पातळ तपकिरी वेष्टन असते. ते काजू वेष्टन न काढता बरेच महिने ठेवता येतात, पण वेष्टन काढलेले पांढरे काजू मात्र टिकत नाहीत. खवट होऊ लागतात. नोव्हेंबर - डिसेंबरमध्ये मिळणारे काजू हे मागच्या हंगामाचे असतात. ही थोडक्यात माहिती.