|| श्री गुरवे नम: ||
एक अपूर्ण, तरीही यशस्वी प्रयोग
सौर चूल
सूर्य... आपल्या ग्रहमालेचा स्वामी. पृथ्वीवरच्या सर्व जीवसृष्टीचा प्रमुख ऊर्जास्रोत. सूर्याच्या प्रकाश-ऊर्जेपासून वनस्पती अन्न तयार करतात. प्राण्यांमध्ये ती क्षमता नाही. मनुष्यप्राण्याने मात्र विज्ञानात प्रगती साधत सूर्यापासून मिळणाऱ्या ऊर्जेचा उपयोग करून घ्यायचं तंत्र साध्य केलंय.
सूर्याकडून दोन प्रकारे ऊर्जा मिळते – प्रकाश आणि उष्णता. आपण या दोन्हींचा वापर करू शकतो. सौर घट (फोटोव्होल्टेइक सेल) वापरून प्रकाशऊर्जेचं विद्युतऊर्जेमध्ये रूपांतर करून ती वीज वापरता येते. सध्यातरी हा खर्चीक पर्याय आहे, आणि स्वस्त सौर घट निर्मितीसाठी जगभर संशोधन चालू आहे.
सूर्यापासून मिळणाऱ्या उष्णतेचा मात्र आपण त्या मानाने सहज उपयोग करू शकतो. सौर चूल, सौर बंब असे अनेक पर्याय घरच्या घरीच स्वस्तात तयार करता येतात किंवा बाजारात उपलब्ध आहेत. मुंबईच्या मराठी विज्ञान परिषदेसारख्या अनेक संस्था यासाठी कार्यशाळाही आयोजित करत असतात. अशाच एका कार्यशाळेत मी सौर चूल बनवायचं प्रशिक्षण घेतलं आणि 'टाकाऊपासून टिकाऊ आणि उपयोगी', कमीत कमी सामान विकत आणावं लागेल अशी सौर चूल बनवायचा प्रयत्न केला, त्याचीच ही कहाणी.
घरात एकदा साफसफाई करताना एक जुनी ब्रीफकेस सापडली. अॅरिस्टोक्रॅट, व्हीआयपी वगैरे प्लास्टिकच्या आधुनिक बॅगांच्या जमान्यात ही कार्डबोर्डची बॅग टाकाऊ झाली होती. सौर चूल बनवायला ती वापरता येईल, असा विचार आला. ते दिवस उन्हाळ्याचे, आंब्यांचे होते. अनायासे आंब्याची लाकडी पेटी (सौर चुलीची चौकट म्हणून) आणि वाळलेलं गवत (उष्णतारोधक म्हणून) घरात आलीच होती, हे वापरायचं ठरवलं.
प्रथम बॅगेच्या आतल्या बाजूला लाकडी फळ्यांची उभी चौकट बसेल अशा आकारात पेटीच्या लाकडी फळ्या कापून घेतल्या. त्या एकमेकांना खिळ्यांनी जोडून उभी चौकट तयार केली. मग २२ गेजचा अॅल्युमिनियमचा पत्रा, काळा रंग (ब्लॅकबोर्ड रंग) आणि एमसील एवढ्याच गोष्टी विकत आणाव्या लागल्या. लाकडी चौकटीचं माप घेऊन, खालील रेखाचित्राप्रमाणे अॅल्युमिनियमचा पत्रा आरेखून घेतला. पत्र्याचे चारी कोपरे खालील रेखाचित्रात डाव्या बाजूच्या आरेखनात दाखवल्याप्रमाणे कापून घेतले आणि पत्रा वाकवून घेतला.
पत्र्याच्या कडा वाकवून, कापलेले कोपरे एकमेकांवर ठेवले. चौकोनाच्या प्रत्येक बाजूला असलेली एक वाढीव पट्टी लगतच्या बाजूच्या मागे नेऊन पुढच्या आणि मागच्या बाजू एकमेकांना एमसीलने चिकटवल्या. अशा प्रकारे तयार झालेलं अॅल्युमिनियमचं चौकोनी 'भांडं' लाकडी चौकटीवर खिळ्यांनी ठोकून घेतलं. पत्र्याच्या भांड्याला आतून काळा रंग लावला.

अॅल्युमिनियमचा पत्रा उन्हात तापतो, काळा रंग उष्णता शोषून घेतो. म्हणून अॅल्युमिनियम पत्र्याच्या भांड्याला आतून काळा रंग लावायचा. या जुळणीचा उभा छेद रेखाचित्रातील उजव्या बाजूच्या आरेखनासारखा दिसेल.
रेखाचित्रातील उजव्या बाजूच्या आरेखनात दिसत आहे त्यानुसार, तसंच ही लाकडी चौकट उलटी केली, तर असं लक्षात येईल की चौकटीच्या उंचीपेक्षा अॅल्युमिनियम भांड्याची उंची कमी आहे (अॅल्युमिनियम भांड्याचा तळ थोडा वर उचलल्यासारखा वाटतो) आणि दुसरं म्हणजे लाकडी चौकट आणि अॅल्युमिनियम भांडं यांच्यामध्ये जागा शिल्लक राहते.

उष्णतारोधक गोष्टींनी ही जागा भरायची. या जागेत वाळलेलं गवत भरलं आणि खोक्याचा एक पुठ्ठा लावून तळ बंद करून टाकला.

ही लाकडी चौकट बॅगेत फिट्ट बसली. सौर चूल आता आकार घ्यायला लागली.

आता पुढची पायरी म्हणजे, भांड्यात आलेली उष्णता साठवून ठेवायची, बाहेर जाऊ द्यायची नाही – अर्थात सौर चुलीला पारदर्शक झाकण हवं. झाकणासाठी काच, अॅक्रायलिक शीट वापरता येतं. एका ओरिगामी प्रदर्शनात वापरण्यासाठी काही अॅक्रायलिक शीट्स आणली होती, प्रदर्शन संपल्यावर त्यातलंच एक शीट घेऊन आलो. ते लाकडी चौकटीवर बसवताना छोट्या फटी राहतात. त्या बुजवण्यासाठी पॉलीयुरेथेन फोम, कापूस वापरायचं. आमच्या घराजवळच फॅन्सी पादत्राणं उत्पादन आणि होलसेल विक्री करणारी दुकानं आहेत, त्यांच्याकडून पॉलीयुरेथेन फोमचे तुकडे मिळवले.

आणि एवढं झाल्यावर, झाकण लावायचं हे पुढचं काम काही कारणांनी राहून गेलं….. हत्ती गेला, शेपूट राहिलं….. बॅग – म्हणजे सौर चूल माळ्यावर जाऊन पडली…….
दरम्यान पुलाखालून बरंच पाणी वाहून गेलं. मग मिपा श्रीगणेश लेखमालेसाठी 'DIY - डू इट युअरसेल्फ' हा विषय जाहीर झाला आणि अर्धवट राहिलेल्या या सौर चुलीची एकदम आठवण झाली. माळ्यावरून सौर चूल खाली काढली, तिच्यावरची धूळ झटकली आणि त्यावर ऍक्रायलिक शीट नुसतं ठेवून, ती पाऊस नसलेल्या दिवशी उन्हात ठेवून एक ट्रायल घेतली. हुर्रे! यशस्वी!

आता राहिलेलं काम म्हणजे चौकटीच्या मापाचे पॉलीयुरेथेन फोमचे तुकडे कापून चौकटीला चिकटवायचे आणि चौकटीच्या मापाचं अॅक्रायलिक शीट कापून बिजागऱ्यांनी ते चौकटीला जोडायचं, कुठे छोटीशी फट राहिली असेल, तर ती कापसाने बुजवायची की सौर चूल वापरायला तयार. पावसाळ्यानंतर ही सौर चूल वापरायला तयार होईल.
ही सौर चूल तयार करताना मी टाकाऊ सामान वापरलं. त्याऐवजी सगळं सामान विकत आणलं, तरी फार खर्च येणार नाही. आपल्याला सोईस्कर मापाच्या प्लायवूडच्या फळ्या, त्या मापानुसार २२ गेजचा अॅल्युमिनियम पत्रा, काच / अॅक्रायलिक शीट, पॉलीयुरेथेन फोम तुकडे / कापूस, एमसील, काळा रंग (ब्लॅकबोर्ड रंग) असं सामान वापरून कमी खर्चात ही सौर चूल बनवता येईल.
या सौर चुलीमध्ये भात, डाळ, भाज्या छान शिजतात. (बटाटे शिजवून पाहिले नाहीत अजून.) शेंगदाणे, रवा इ. मस्त भाजले जातात. पापड-कुरड्या इ. वाळवण, साठवणीसाठी काही गोष्टी मस्त ड्राय होतात. (मासे ड्राय केले नाहीयेत अजून.) शिजवताना अन्नातली पोषक तत्त्वं नष्ट होत नाहीत, जळायची भीती नाही. पुरेसं ऊन येतं अशा खिडकीतही ही चूल ठेवता येईल. हिच्या वापराने जवळजवळ ३०-३५% इंधन बचत होऊ शकते.
आपल्या देशातल्या बहुतेक भागात पावसाळ्याचे दिवस वगळता वर्षाचे आठ महिने दिवसाचे सात-आठ तास मुबलक सूर्यप्रकाश मिळतो, तोही अगदी फुकट. आता हळूहळू पारंपरिक ऊर्जास्रोत संपत चालले असताना आपण या फुकट मिळणाऱ्या ऊर्जेचा शक्य तितका वापर करून घ्यायला हवा. अन्न शिजवायला सौर चूल वापरली, त्याचप्रमाणे पाणी तापवायलाही सौर ऊर्जा वापरता येईल आणि बहुमोल विद्युतऊर्जेची मोठी बचत होऊ शकेल.
|| मित्ररवीसूर्यभानूखगपूष्णहिरण्यगर्भमरीचादित्यसवितृअर्कभास्करेभ्यो नमो नम: ||