संपादकीय

By पैसा, 20 October, 2014

नमस्कार मंडळी!

मिपाचा तिसरा दिवाळी अंक तुमच्या हातात देताना अर्थातच प्रचंड आनंद होतो आहे. गेल्या २ वर्षात चालू राहिलेली परंपरा अशीच पुढे चलू राहिली पाहिजे म्हणून या वर्षीही दिवाळी अंकाच्या कामाला सुरुवात केली, नेहमीपेक्षा जरा लौकरच! त्यातच छायाचित्रणकलेच्या १७५ वर्षाच्या वाढदिवसानिमित्त छायाचित्रांची स्पर्धा सुरू केली तिलाही उदंड प्रतिसाद मिळाला! आतापर्यंत ३ स्पर्धा यशस्वीरीत्या आयोजित केल्या त्यातल्या दुसर्‍या स्पर्धेतील विजेत्या चित्रांचा समावेश या दिवाळी अंकात केला आहे. तुम्हा सर्वांच्या सहभागातून या स्पर्धा यशस्वी होत आहेत, त्याबद्दल तुम्हा सर्वांना मनापासून धन्यवाद!

श्रीगणेश लेखमालेचेही यंदा तिसरे वर्ष. नेमके गणपतीच्या आधी स्पॅम हल्ल्यांमुळे मिपा बंद पडत होते, आणि मनात धाकधूक होती, पण तरीही अगदी थोड्या पूर्वसूचनेवरून सुरेख लेख देणार्‍या सर्वच लेखकांचे आभार!

या वर्षात आम्ही केलेला तिसरा उपक्रम म्हणजे अनाहिता या महिला विभागात सर्वांच्या सहभागाने कथालेखन. एक कथा गेल्या वर्षी अनाहिता विभाग सुरू केला तेव्हा सुरू केली होती. यशोधराने "कथा" या कथेला सुरुवात केली आणि मग इतरांनी त्यात भर घातली. अपर्णा अक्षय, जुइ, कोमल, आनन्दिता, इनिगोय, सानिकास्वप्नील, इशा१२३, मधुरा देशपांडे, मी आणि आणखीही काहीजणी. कथा जशी पुढे जाईल तशी जाऊ दिली. मात्र काही दिवसांनी ती कथा मागे पडली होती. दिवाळी अंक काढायचा म्हटल्यावर ती कथा पूर्ण केली तशीच आणखी एक कथाही अशाच प्रकारे लिहिली. ती म्हणजे "ऐलमा पैलमा". यावेळी मधुरा देशपांडेने पुढाकार घेऊन कथेची रूपरेषा तयार केली आणि मग इशा१२३, जुइ, आनंन्दिता, मी आणि लीमाउजेट यांनी प्रत्यक्ष लेखन केलं तर इतर सगळ्याचजणींनी बहुमोल सूचना केल्या.

या दोन्ही कथांना सगळ्याच अनाहितांचा या ना त्या स्वरूपात हातभार लागला आहे. आशा आहे की हा प्रयोग तुम्हाला आवडेल. पुढच्या वर्षात अनाहिताचा दिवाळी अंक निघेल इतकं साहित्य तयार झालं पाहिजे अशी महत्त्वाकांक्षा तर आहे, बघू!

गेल्या वर्षातल्या मराठी साहित्य विश्वाचा आणि आंतरजालाचा थोडक्यात आढावा घ्यायचा तर मराठी साहित्य संमेलन सासवडला झाले आणि त्याचे अध्यक्षपद फ.मु.शिंदे यांनी भूषवले. मराठी आंतरजालावर नव्याने सदस्य येत आहेत आणि लिहिण्याचा प्रयत्न करत आहेत. त्याचवेळी मराठी ब्लॉग्ज विश्व जरा मरगळल्याचेही ऐकू येत आहे. मात्र स्मार्टफोन्समुळे मराठी संस्थळे जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचत आहेत. मराठी चित्रपट क्षेत्रात काही चांगले चित्रपट गेल्या वर्षात आले आणि त्यापैकी बहुतेकांचे परीक्षण आणि त्या अनुषंगाने चर्चा मिपावर घडल्या. नवीन उत्तम दर्जाची नाटके मात्र त्या प्रमाणात येताना दिसत नाहीत.

गेल्या वर्षात काश्मीरमधल्या पुरांसारख्या काही दु:खद घटना घडल्या, तर काही मंगलयानाच्या यशस्वी उड्डाणासारख्या अभिमानास्पद घटनाही घडल्या. भारतीय राजकारणाचा चेहरा बदलला. महाराष्ट्रात निवडणुकी पार पडल्या. सगळीकडे बदलांची नांदी आहे. मिपावरही संपादकीय सदस्यांत काही बदल या वर्षात झाले. यशोधरा, या आता मिपा संपादक नाहीत आणि रेवती आता फक्त अनाहिता संपादिका आहेत, तर इस्पीकचा एक्का, अजया आणि स्नेहांकिता हे संपादक मंडळाचे नवे सदस्य आहेत. मितान अनाहिताच्या नव्या संपादिका आहेत. इथे यशोधरा, रेवती यांच्या संपादक म्हणून केलेल्या कामाबद्दल कृतज्ञता नोंदवते, आणि अनाहिता सुरू करताना तसेच नंतरही त्यांनी घेतलेल्या कष्टांचीही इथे नोंद करते. आताही त्या मिपाच्या सक्रीय सदस्या आहेतच! तरी धन्यवाद म्हणण्यापेक्षा मिपा नेहमीच त्यांच्या ऋणात राहील!

गेल्या वर्षात मिपावर अनेक चांगल्या दर्जेदार लेखमालिका वाचायला मिळाल्या. काही उत्तम दर्जाचे साहित्य वाचायला मिळाले, तर काही निखळ मनोरंजन करणारे. नेहमीप्रमाणेच दंगा धमाल चालू आहेच! मधे मधे काही ना काही अडचणींमुळे मिपा बंद पडत होते, पण मिपा दीर्घकाळ बंद राहिले असले तरी परत परत चिकाटीने रिफ्रेश मारणारे तुम्ही सदस्य मिपाची जान आहात. कितीही वेळ बंद असलेले मिपा पुन्हा सुरू होताच १० ते १५ मिनिटात ३०- ४० सदस्य लॉग इन केलेले दिसतात. हे तुमचं मिपावरचं प्रेम सदैव असंच राहू दे.

असंख्य अडचणी आणि कमी पडणारा वेळ यावर मात करून मिपा चालते ठेवल्याबद्दल नीलकांत आणि प्रशांत या दोघांना खास धन्यवाद! दिवाळी अंक इतक्या सुरेख रूपात तुमच्यासमोर आणण्यात सर्व संपादक आणि सल्लागार यांची खूप मदत झाली. त्यांच्या बहुमोल सूचनांचे दृश्य स्वरूप म्हणजे हा दिवाळी अंक! मुद्रितशोधन म्हणजे सुधांशु नूलकर असे समीकरणच गेल्या २ वर्षांत झाले आहे. या वर्षी आणखी काही मिपा सदस्यांनी नूलकरांना मुद्रितशोधनाला खूप मदत केली आहे. ते म्हणजे आदूबाळ, स्वॅप्स, अन्या दातार आणि लीमाउजेट. या सर्वाँनाच खूप खूप धन्यवाद! एकाहून एक सरस लेख, कथा, कविता, पाककृती देणार्‍या लेखकांनाही मनापासून धन्यवाद! आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे आपल्या रंगीत, चटपटीत प्रतिक्रियांनी दिवाळी अंक आणखीनच वाचनीय करणार आहात त्या तुम्हा वाचकांचे खूप आभार!

चला तर, दिवाळीच्या फराळासोबत मिपा दिवाळी अंकातील उत्तमोत्तम साहित्याचा आस्वाद घेऊया!

ही दिवाळी आणि येणारे नवीन विक्रम संवत् २०७०-७१ तुम्हा सर्व लेखक वाचकांना सहकुटुंब, सहपरिवार आनंद, यश, सुखसमृद्धी, धनधान्यसंपत्ती आणि आरोग्याने परिपूर्ण तसेच उत्तमोत्तम लेखन-वाचनानंदाचे जावो, हीच हार्दिक शुभेच्छा!

- पैसा -