एजबेस्टन कसोटीत भारताचा पराभव आता औपचारिकता राहिली आहे. प्रवीण कुमार ने प्रेक्षणीय खेळी केली तेवढीच भारताची जमेची बाजू. (मी आशावादी आहे पण म्हणून काय इशांत आणि श्रीशांत द्विशतके करतील? ).
मागच्या आठवड्यात मी ऑन लाईन तिकीट काढले तेव्हाच शेजारच्या डेस्क वरचा इंग्रज मला हसत होता. हाच मागे वल्ड कप च्या वेळी '' कसला वल्ड कप? ओहो ! क्रिकेटचा होय? '' म्हणाला होता, कारण इंग्लंड चे आव्हान तेव्हा संपले होते. त्याला वाटले मी बराच आशावादी आहे की भारतीय संघ किमान हरणार तरी नाही. मलाही ते पटत होते, पण मुख्य कारण होते लक्ष्मण, सचिन आणि द्रविड कदाचित इथे शेवटची मालिका खेळतायत. प्रत्यक्ष स्टेडीयम मध्ये जाऊन खेळ पहाण्याचा आनंद वेगळाच असतो. (पण कसले काय).
मागे एकदा जर्मनी मध्ये स्तुतत्गार्त आणि बायर्न मुनिक मधला फुटबॉल सामना पाहायचा योग आला होता आणि तो अविस्मरणीय अनुभव होता! म्युनिक कडे राष्ट्रीय संघातले बरेच खेळाडू होते. साहजिकच स्तुत्गार्त हरले आणि स्थानिक लोक त्यांच्या प्रशिक्षक आणि खेळाडूना शिव्या घालत होते.. '' एकेक मिलियन युरो घेतात आणि ...''
आता काळ बदलला, इथे लोक आय पी एल ला दोष देतात आणि '' सेकंदाला हजार पौंड घेऊन यांना आय पी एल खेळायला पाहिजे पण देशासाठी खेळायला नको '' असे म्हणतात. मला हा हजार पौंड चा हिशेब काही कळला नाही, असो.
लहानपणी बेदी आणि गावस्कर यांच्या संघाचे पाहिलेले अनेक पराभव विसरता येत नाहीत. पंचवीस वर्षे क्रिकेट पाहूनही प्रेक्षक म्हणून मला पराभव सहज पचत नाही. खेळाडूना असे होते का? तिकिट वाया गेले, ठीक आहे, कसोटीतला नंबर १ घालवल्याचे पण वाईट वाटले नाही. ज्या प्रकारे गेम सोडून दिला ते नक्कीच निषेधार्ह होते.
खेडूत