साठ- सत्तरच्या भारावलेल्या काळात शंकर गुहा नियोगींचे नाव आपण नेहमी ऐकत होतो. डाव्या चळवळीच्या ठिकठिकाणच्या कार्यकर्त्यांचा हा हिरो एकाएकी भांडवलदारांच्या खुनशीपणाचा बळी झाला. ही बातमी वाचल्यानंतर मनं सुन्न झाली. परंतु अशा प्रकारच्या लढ्यांचा व लढावूपणाचा शेवट असाच होणार हे गृहितच धरले होते. पुस्तकाचे शीर्षक, छत्तीसगड नियोगींचे आंदोलन आणि सद्यस्थिती, वाचून पुस्तक हातात घेत असताना या आठवणीं उफाळून आल्या. रंगनाथ पठारे स्वत: तेथे जावून लेखनाची जमवाजमव केली हे प्रस्तावनेत वाचल्यानंतर खरच काही तरी वैचारिक खाद्य मिळेल याची खात्री पटली व लेखकांनेसुद्धा निराश केले नाही, हे विशेष.
छत्तिसगड हे शंकर गुहा नियोगी यांचे कार्यक्षेत्र. त्याकाळी अजूनही त्याला स्वतंत्र राज्याचा दर्जा मिळाला नव्हता. वेगळे राज्य झाले नव्हते. नियोगी यासाठीसुद्धा लढत होते. आसाममधील एका कनिष्ट मध्यमवर्गीय कुटुंबात जन्मलेला हा तरुण रोजगाराच्या निमित्ताने बिहारच्या या भागातील भिलाईच्या पोलाद कारखान्यात काम करतो, कामगारांच्या दुखा:त सहभागी होतो, या वेगळ्या मुलुखातल्या लोकांमध्ये मिसळतो, तिथल्या लोकांची सुख - दु:ख, त्यांची संस्कृती, त्यांची अस्मिता, त्यांच्याशी इतका जोडून घेतो की तो त्या लोकांचाच होऊन जातो. (टिपिकल बंगाली वागणं, स्वत:ला झोकून घेणं...) सामान्य माणसांच्या दु:खाशी बांधिलकी, सत्यनिष्ठा, सचोटी, जीवनमूल्यांवर विश्वास, मनाचा समतोलपणा आणि अजोड निष्कलंक चारित्र्य यांच्या बळावर तीव्र इच्छाशक्तीचे आंतरिक सामर्थ्य वापरून एखादा माणूस असंघटित, दुर्लक्षित, पीडित, अशिक्षित माणसांची संघटना उभी करून किती अद्भुत कार्य करू शकतो, हे एक अपवादात्मक उदाहरण ठरेल.
रंगनाथ पठारे यांनी नियोगीच्या कार्याचे वस्तुनिष्ठ मूल्यमापन केले आहे, हे प्रत्येक पानापानातून जाणवते. शंकर गुहा नियोगी हेसुद्धा एके काळी रंगनाथ पठारे यांचे रोल मॉडेल असण्याची शक्यता नाकारता येत नाही. पंरंतु नियोगीच्या जीवनाचे, तत्वज्ञानाचे व कार्यस्वरूपाचे उदात्तीकरण न करता मिळालेल्या माहितीच्या आधारे हाडामासाचा, जमीनीतच पाय रोवलेल्या नियोगीचे व्यक्तित्व वाचकांसमोर उभे करण्यात लेखकद्वय यशस्वी झाले आहेत. नियोगीची प्रतिमा एक नक्षलवादी तरुण अशीच होती. खरे पाहता पारंपरिक अर्थाने नियोगी कधीच नक्षलवादी नव्हते. शस्त्र हाती घेऊन सरळ सत्ता ताब्यात घेण्यापेक्षा लोकांना बौद्धिक, भावनिक, व शारीरिकदृष्ट्या सक्षम करीत नेत त्यांचा लढा लढायचा व लढ्याच्या प्रत्येक टप्प्यावर मिळालेल बळ एकवटून आंदोलन पुढे न्यायचे व अंतिम ध्येय - अर्थातच जनसामान्यांच्या हाती सत्ता - गाठायच, हा त्याचा पवित्रा होता.
संपूर्ण पुस्तक वाचताना नियोगी केंद्रस्थानी असूनसुद्धा छत्तीसगडच्या भौगोलिक, राजकीय व आर्थिक परिस्थितीवरील लेखकाने केलेल्या विश्लेषणात्मक भाष्यामुळे हा संपूर्ण टापू आपल्या परिचयाचा वाटू लागतो. सर्वात महत्वाची उल्लेखनीय गोष्ट म्हणजे पठारे यांनी पारंपरिक पद्धतीने, सरधोपटपणे नियोगीचा जीवनपट आपल्यासमोर न उलगडता त्याच्या वैचारिक वाटचालीमधूनच आपल्याला नियोगींचे समग्र दर्शन घडवत जातात.
डाव्या चळवळीचे तात्विक अधिष्टान मान्य करूनही या चळवळीच्या बंदिस्त भिंतीमध्ये अडकून न पडता नियोगी जनआंदोलनाला फारच वेगळी दिशा देतात. कामगारांचे नेतृत्व करत असतानाच त्यांचे वेतन, बोनस, ग्रॅच्युइटी या आर्थिक जंजाळात फारसे अडकून न पडता, कामगारांनी त्यांच जीवनमान सुधाराव, कौशल्य प्राप्त करावीत, सक्षम व्हावे, त्यांची मुलं शिकून, शहाणी होऊन पुढे जावीत, यासाठी नियोगी लढत होते. याच उद्देशाने दल्ली शहादरा येथील युनियन काम करत होते. एका प्रकारचे ते कामगारांचे जीवन प्रशिक्षण केंद्र होते.
कामगारांचा उद्दिष्टपूर्तीसाठी लढणार्या नियोगी यांना अनेक वेळा तुरुंगात डांबून ठेवण्यात आले. स्वत: कित्येक वेळा भूमीगत झाले. पोलीसांकडून, भांडवलदारांनी पोसलेल्या भाडोत्री दलालांकढून सणकून मार खाल्ला व प्रत्येक वेळी पूर्ण सावध राहून लढ्याचे नेतृत्व केले. पोलीसांनी त्यांना प्रत्येक वेळी भरपूर मारहाण केली. त्यांचा अनन्वित छळ केला. कोलदांडा घालणे, उलटे टांगून मिरच्यांची धुरी देणे, बर्फाच्या लादीवर झोपविणे व शरीरात बर्फ घुसवणे, अशा ज्या काही पद्धती कबूलीजवाब मिळविण्यांसाठी पोलीस वापरतात, त्या सार्यांचा प्रयोग त्याच्यावर झाला होता. अधिकृत ट्रेड युनियनमधील घाणेरड्या राजकारणामुळे नियोगी यांना ’छत्तीसगड मुक्ती मोर्चा’ या नावाने वेगळे चूल मांडावे लागले. कारण ट्रेड युनियनच्या चौकटीत नियोगी यांचे कार्य बसत नव्हते. रंगनाथ पठारे यानी या विषयावर सखोल टिप्पणी केली असून नियोगींची वैचारिक भूमिका व मांडणी या लेखामधून नियोगींची वैचारिक वाटचालच नव्हे तर ट्रेड युनियनचा इतिहास, त्याच्या मर्यादा, त्यातील हेवेदावे, या गोष्टी आपल्याला स्पष्ट होत जातात. साम्यवादी चळवळीचा इतिहास, त्यातील लेनिन - मार्क्स यांचे द्रष्टेपण, भारतीय कम्युनिझमची आंतरराष्ट्रीय चळवळीशी झालेली जवळीक, मास्को येथील बदलत गेलेल्या भूमिका, चीनमधील माओवाद, भारतातील कम्युनिस्टांची वाटचाल, कॉंग्रेस व इतर भांडवलधार्जिण्या पक्षांचा झालेला विरोध, कम्युनिस्टामधील दुफळी, नक्षलवाद्यांचा वाढता प्रभाव इ.इ. अनेक गोष्टींच्यावर लेखकद्वय साधार टीका - टिप्पणी करतात. हे सर्व मुळातूनच वाचायला हवे.
नक्षलवाद हा भारतातील माओवाद म्हणून सामान्यपणे ओळखला जातो. नियोगी यांची वैचारिक वाटचाल मार्क्सवाद, लेनिनवाद व कट्टर माओवाद अशी झाली. पण प्रत्यक्ष लढ्यात ते माओवादापासूनही दूर गेले. नियोगी यांचे मार्क्सवादाचे आकलनही अत्यंत वेगळ्या स्वरूपाचे होते. नियोगी यांच्या या आगळ्या-वेगळ्या आकलनामुळे इतर पोथीनिष्ठ कम्युनिस्टसुद्धा त्यांचे विरोधक झाले. ट्रेड युनियनच्या दिवाळखोरीमुळेच भिलाई परिसरातील लाखो कामगार नियोगीच्या नेतृत्वाला मान्यता देऊ लागले. त्यामुळे प्रस्थापित युनियनचे चिडलेले नेते, वाटेतील अडसर दूर करण्यासाठी, नियोगीची हत्या घडवून आणले, असा अनेकांचा कयास आहे.
नियोगी हे केवळ कामगारांची संघटना बांधली नाही. तर ज्या खेडेगांवामधून कामगार येत होते तेथील कष्टकर्यांचीसुद्धा संघटना बांधली. भिलाई पोलाद कारखान्यातील व्यवस्थापन नेहमीप्रमाणे कामगारांमध्ये फूट पाडण्याच्या प्रयत्नात होते. अधिकृत युनियनच्याच मागण्या मान्य करत होते. त्यामुळे कंत्राटी कामगारांना मोठ्या प्रमाणात अन्याय सहन करावा लागत होता. नियोगी यांना हे बघवत नव्हते. त्यांनी कंत्राटी कामगारांची संघटना बांधून त्यांच्या मागण्यांसाठी अभूतपूर्व संप घडवून आणला. संप चिरडण्यासाठी गोळीबार करण्यात आला. अनेक जण मेले, कित्येक गंभीर जखमी झाले. त्यामुळे नियोगी यांचा धडाडीचा नेता म्हणून नावलौकिक झाले. अगदी शेवटच्या क्षणापर्यंत त्यानीं कामगारांशी, कामगारांच्या हिताशी गद्दारी केली नाही. म्हणूनच कदाचित त्यांना जीव गमवावा लागला. एवढी जबरदस्त किंमत मोजावी लागली. पठारे यानी अशा प्रकारचे अनेक तपशील घातलेले असून सामाजिक कार्यात झोकून घेणार्यासांठी हे पुस्तक नक्कीच वस्तुपाठ ठरू शकेल.
नियोगींच्या मृत्युनंतर ही चळवळ यशस्वी का होऊ शकली नाही याबद्दलही पठारे यानी लिहिले आहे. त्यामुळे एकूणच सर्व परिस्थितीचा अंदाज, नेत्यांची हेवेदावे, नियोगी कुटुंबियांचे औदासिन्य, नियोगीनंतरच्या नेत्यांच्या फळीतील कमकुवतपणा या जास्त प्रकर्षाने जाणवतात. लेखकानीच एका ठिकाणी म्हटल्याप्रमाणे 'देशात अनेक ठिकाणी अनेक बारके बारके गट लोकसंघटन, संघर्ष यात कार्यरत आहेत. अशा गटांना नियोगींच्या कामापासून खूप काही शिकता येण्याजोगे आहे. भक्कम दार्षनिक पाया, आर्थिक, सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक प्रश्नामधल्या परस्परावलंबित्वाचे भान, चळवळीतली शांततामय संघर्षाची रीत व प्रसंगी टोकाला जाण्याचा पर्याय खुला ठेवणे या प्रकारची शोषितांची लढण्याची नीती आधुनिक भारतात इतक्या शिस्तबद्धपणे आणखी कुणी राबविल्याचे नमुनेदार उदाहरण नाही. आणि हे सारे पुन:सुधारणेला खुले आहे हेही त्यांच्या वैज्ञानिक दृष्टीमुळे!'
छत्तीसगड नियोगींचे आंदोलन आणि सद्यस्थिती
रंगनाथ पठारे, सुमती लांडे
मॅजेस्टिक प्रकाशन, पुणे
पृ.सं २३५+
कम्युनिझमच्या
कम्युनिझमच्या अभ्यासकांनी आवर्जुन वाचावे असे पुस्तक दिसतेय.नेहमीप्रमाणेच उत्तम परिचय, सोमवार कारणी लागला.
In reply to कम्युनिझमच्या by आनंदयात्री
+१ असेच म्हणतो
नेहमीप्रमाणेच सुरेख परिचय :)