सुहृद - १

पुस्तकाचे नाव

नव्वदच्या दशकाचा सुरवातीचा काळ. धुळ्यात होतो. गाव छोटेखानी. तीन लाखाची वस्ती. चार-पाच महाविद्यालयं. गरूड लायब्ररी हे मोठे ग्रंथालय. राजवाडे संशोधन मंदिर ही संस्था अशी की जिच्याविषयी काही बोलण्याची गरज पडू नये. त्यावेळी गावातूनच निघणारी काही (संख्या मुद्दाम देत नाही) प्रमुख दैनिकं, सायंदैनिकं. साप्ताहिकं वगैरेंचा हिशेब करत नाही. एक नाट्यगृह - सटीसामाशीच तिथं काही व्हायचं. चित्रपटगृहे होती, पण माझा त्यांच्याशी तसा दूरचाच संबंध. पक्षीनिरिक्षण वगैरे करणारा एक गट होता. गाण्याच्या क्षेत्रात काही मंडळी होती (अलीकडेच त्यातले एक अशोक कुलकर्णी गेले). महाविद्यालयांपैकी एक चित्रकला महाविद्यालय. एकूण एव्हाना अंदाज यायला हरकत नाही की, गावातील सांस्कृतीक जीवन तसं आटोपशीरच. त्यामुळं पुस्तकविश्व मर्यादितच. म्हणजे, सहजी उठलं, गेलं आणि पुस्तकांची खरेदी केली हा प्रकार दुर्मीळ. पुरेसा स्रोत असेल अशी मंडळी खुश्शाल मुंबई-पुण्याहून पुस्तकं आणायची. त्या काळात मला तिथं न. नि. पटेल भेटले. पटेलांचा पुस्तकांचा संग्रह केवळ तोंडात बोटं घालायला लावणारा. तेव्हाच्या काळात त्यांच्याकडच्या पुस्तकांची संख्या इंग्रजीत ज्याला 'हंड्रेड्स' म्हणतात तशी होती (बदलीनंतर या गृहस्थाला एक मिनिट्रक पुस्तकांसाठी लागायचा आणि तो स्वतंत्र जायचा, ही त्यांची ख्याती), त्यांच्याकडून पुस्तकाची भेट मिळण्याचं माझं 'भाग्य' होतं; पण ते पुस्तक पुढं इतर अनेक पुस्तकांसारखंच कुठं गेलं याचा पत्ता लागला नाही. (पुस्तक पीटर ड्रकर यांचं होतं इतकंच आता आठवतंय). आता पुस्तकं अशी खरेदी करण्याची माझी कुवतच नव्हती. त्यामुळं कधीतरी होणारं पुस्तकांचं प्रदर्शन अधिक विक्री हीच संधी. अशाच एका प्रदर्शनात पुस्तकांवर नजर भिरभिरत होती. पुस्तक उचलायचं, आधी आतलं डावीकडचं पान पहायचं. तिथं प्रकाशकाचं नाव असतंच, पण किंमतही असते. मग ठरायचं पुस्तक खरेदी करायचं की नाही हे. पहिल्या अर्ध्याएक तासातच पाच-सहा पुस्तकं निवडली होती. आणि अर्थातच 'बजेट' संपलं होतं. तरीही, प्रदर्शनातील पुस्तकं पहाण्याचं/चाळण्याचं सुख वेगळंच असतं आणि ते मी पुरेपूर घेत होतो. भिरभिरणारी नजर स्थिरावली - स्वच्छ मुखपृष्ठावर. शीर्षक होतं - रारंग ढांग. लक्ष वेधलं होतं ते त्यावरच्या रंगसंगतीनं. काळा, निळसर झाक, अगदी अगदी फिकट सेपिया अशी काहीशी रंगसंगती. काही कळलं नाही. म्हणून पुस्तक हाती घेतलं. किंमत पाहिली. आवाक्यातली होती (एका 'सिटिंग'चा बळी देणं मुश्कील नव्हतं). चाळता-चाळता प्रभाकर पेंढारकरांनी प्रस्तावनेतच अडकवून टाकलं. मी बाहेर पडलो तेव्हा पुस्तक खरेदी झालं होतं. रारंग ढांग, मौज प्रकाशन, आवृत्ती चौथी. अकरा-साडेअकरा फॉर्म. रारंगढांग (या पुस्तकाचं नाव एकदा असं लिहायचं आहे म्हणून लिहितो. कारण हा उच्चार मी नेहमी एकाच शब्दानं करत आलोय). हे पुस्तक दोन कारणांसाठी माझ्या नात्याचं झालं आहे. पुस्तकाच्या प्रस्तावनेत आलेली एक सूक्ष्म बाब हे पहिलं कारण आहे. दुसरं कारण अर्थातच कादंबरीतील कथानक, त्यात असलेली ताकद, ते कथानक कादंबरीच्या स्वरूपात गुंफून समोर ठेवताना लेखक म्हणून दिसणारी पेंढारकरांची कल्पकता या बाबींमध्ये दडलं आहे. "श्री. श्री. पु. भागवतांनी माझे हस्तलिखित वाचून एख सूचना सहज शब्दांत केली: 'आत्मनिवेदनाऐवजी त्रयस्थाच्या दृष्टिकोनातून ही कादंबरी लिहिली तर...' कादंबरीत 'मी'च्या जागी 'तो' असा सोपा वाटणारा बदल करताना पात्रे बदलली, प्रसंग बदलले आणि संपूर्ण कादंबरी नव्याने लिहून झाली. कादंबरीच्या आत्ताच्या स्वरूपाचे श्रेय सर्वस्वी त्यांचेच!" प्रभाकर पेंढारकर प्रस्तावनेत लिहितात. श्री.पुं.मधला समर्थ संपादक याहून कमी शब्दांत कोणी मांडून ठेवला आहे? माझ्या वाचनात नाही. संपादन हा विषय चर्चेला असला की पुढं मी केव्हाही या पुस्तकाचा उल्लेख करत गेलो आणि या कारणास्तव 'रारंग ढांग'शी माझं नातं जुळत गेलं. ते नातं दृढ झालं ते आणखी एका वैयक्तिक अनुभवातून. माझ्या कादंबरीचं लेखन सुरू होतं तेव्हा मी नेमका याच अनुभवातून गेलो. आधी लेखन सुरू केलं तेव्हा ते आत्मनिवेदनात्मक होतं. नंतर बदललं. कथावस्तू तीच राहिली तरीही कादंबरीच बदलून गेली. थेट संबंध नसतानाही, दुरून का होईना, श्री.पुं.च्या संपादकीय सामर्थ्याला सलाम ठोकावासा वाटला तो तेव्हा. आजही कुठल्याही संपादनाचा विषय आला की 'रारंग ढांग' त्या चर्चेत येतेच (थोडं अवांतर: काल परवाच चर्चा सुरू होती. 'आत्ता' आणि 'आता' या दोन शब्दांवरून संपादनाविषयी एक रास्त तक्रार ऐकत होतो. त्यावेळी संपादक म्हणजे कोण आणि त्यानं काय करायचं हे सांगताना पेंढारकरांची ही वाक्यं आठवलीच, ज्यांच्याशी बोलत होतो त्यांनाही ती पटली. गंमत म्हणजे आत्ता (आला पुन्हा हा शब्द) वाचताना पेंढारकरांनीही प्रस्तावनेतील या परिच्छेदात हा शब्द 'आत्ता'(च्या) असाच लिहिला आहे हे दिसून आलं). ही कादंबरी कादंबरी म्हणून नेमकी आहे. कुठं अतिरिक्त काही नाही, कुठं कशाची कसर नाही, संदर्भ पक्के. आशय तर भक्कमच. रेखीव इमारत, पण पूर्वीच्या काळातील वाड्यांसारखी. आजच्या, मजल्यावर चार फ्लॅट या मालिकेतील नव्हे. म्हणूनच या वाड्यातील प्रत्येकाशी वाचकाचं नातं निर्माण होतंच होतं (न होणार्‍यांचं उद्या होईल अशा, एऱवी माझ्यात कधीही नसणार्‍या आशेवर मी थांबतो). कादंबरीशी नातं जुळण्याचं दुसरं कारण म्हणजे कादंबरीचा आशय, मांडणी वगैरे. ब्लर्बचा आधार घेतो. कारण इतक्या नेमक्या शब्दांत मलाही मांडता येणार नाही. "एका बाजूला हिमालय आणि लहरी निसर्ग आणि दुसर्‍या बाजूला वेगवेगळी स्वभाववैशिष्ट्ये असलेली अनेक माणसे. मात्र ही सारी माणसे एकाच जिद्दीची. निसर्गात आणि माणसांत रस्सीखेच आणि संघर्ष सातत्याने चालूच असतो. ह्या कादंबरीत या अशाच माणसांची कथा गुंफली आहे." 'बलवंत'मध्ये आलेल्या परीक्षणातील हा मजकूर आहे. माझ्या या लेखाचं शीर्षक या मजकुरातून आलं आहे. आधी म्हटलं तसं ही कादंबरी म्हणजे जुन्या वाड्यासारखी वाचकाला गुंतवून ठेवते. यातल्या प्रत्येक प्रकरणाशी वाचकाचं नातं जुळत जातंच. प्रत्येक व्यक्तिरेखेमध्ये वाचक गुंततो. अगदी कादंबरीत काहीशी पार्श्वभूमीवरच असणारी उमाही घर करते मनात. विश्वनाथ करतोच, पण उमाही करते हे महत्त्वाचं. विश्वनाथचे वडील तर उमाइतकेही कादंबरीत पुढे येत नाहीत, पण त्यांची व्यक्तिरेखा समोर आली की सत्तर-नव्वद या काळातील एखादा शिक्षक आठवलाच पाहिजे. मिनू, बंबा, नायर आहेतच. पण कादंबरीत केवळ कोर्ट मार्शलसाठी येऊन जाणारे, पण जाता-जाता व्यवस्थेत राहूनही थोडा बाहेरचा विचार करून दाखवणारे कर्नल बादलही लक्षात राहतात. जिमी राईट आहेत. ते वादलांच्या विपरित कारणासाठी लक्षात राहतात. कारण किती नाही म्हटलं तरी ते, आणि बंबा, व्यवस्थेचा भाग म्हणूनच समोर येतात. तर निसर्ग आणि माणूस यांच्यातील चिरंतन संघर्षाची ही एक कहाणी त्याचवेळी व्यवस्था विरुद्ध माणूस यांच्यातील संघर्षाचीही कहाणी आहे. विश्वनाथनं व्यवस्थेच्या विरुद्ध उभा केलेला संघर्ष. लष्करी शिस्त मोठी की त्याचं विज्ञान, हा तो संघर्ष. आणि मग हे पुस्तक त्यातल्या या कथेत गुंतवत जातं तेव्हा ते एका बैठकीचं होतं आणि अशा बैठकी रंगत जातात. एखाद्या वळणावर मृत्यू तुमची वाट पाहत उभा असेल, असं वाक्य पेंढारकर लिहून जातात. आपण वाचतो. पुढे सरकतो. रस्ता वळणांचा आहे हे पेंढारकर सांगतात आणि न-कळत अंगावर बारीक काटा येतोच. कर्नल राईट आणि बादल यांच्यातील कोर्ट मार्शलच्या परिस्थितीतील संवाद असाच. बुद्धिबळाचा डाव तिथं पेंढारकर आधाराला घेतात. बादलांच्या टोकदार टिपण्या, त्यापुढं राईट यांची होत जाणारी पंचाईत, कोर्टमार्शलचा निकाल काय लागेल याचं त्यातून होणारं सूचन आणि त्याचवेळी खाली समोरच्या पटावर राईट यांचा उंट मरणं... खल्लास! मला बुद्धीबळातील उंटाचं महत्त्व इतकंच कळलं - त्याची चाल तिरपी (पण सरळ; नागमोडी नव्हे) असते आणि तो शिपाईगडी नाही. कादंबरीच्या कथेशी त्याचं नातं जोडायचं असेल तर ती कादंबरी वाचलीच पाहिजे. पुन्हा वाचली पाहिजे. मी मुद्दाम हिमालय, विश्वनाथ हे संदर्भ अधिक लिहित नाही. ते अनुभवण्याजोगे आहेत. व्यवस्था नेहमीच 'जबाबदारी आपली आहे' असं म्हणत असते. त्यावर 'ही जबाबदारी घेतली म्हणजे काय केलं?' असा प्रश्न करीत विश्वनाथ बचावार्थ केलेल्या निवेदनामध्ये म्हणतो आहे, "माणसाच्या कृतीचं मूल्यमापन त्या कृतीपेक्षा बर्‍याचदा आजूबाजूच्या परिस्थितीवर अवलंबून असतं. आणि त्या कृतीचा अर्थ कधीकधी न्यायदानाला बसलेल्या वरिष्ठांच्या धैर्यावर लावला जातो." परिचित वाटतंय हे? तुमच्या-आमच्या रोजच्या जगण्याशी जडलेलं सत्यच? पुस्तकाशी नातं जोडण्यासाठी मला मिळालेला सर्वाधिक बळकट दुवा हा. अशा अनेक विश्वनाथांना वेळीच ओळखण्यासाठी आवश्यक वृत्ती दिली ती या पुस्तकानं. ती दृष्टीही मिळण्यासाठी पुन्हा हे पुस्तक वाचतोच आहे!

मी असे म्हणेन की पुस्तकाबद्दल या लेखनप्रकारात काय लेखन यावे याचे समर्थ उदाहरण म्हणजे हा लेख. रारंगढांगशी तुमचे असलेले नाते, त्या कथावस्तूवर असलेलं तुमचे असलेले प्रेम पोचते. कादंबरी नुसतीच मौजेखातर न वाचता त्यातून घेतलेली शिकवण, ती शिकवण इथे पोचवण्याचा प्रयत्न, हे सगळेच भारावून टाकणारे, रारंगढांग अजून वाचली नाही याच्या करंटेपणाची जाणीव करून देणारे. >>ही कादंबरी कादंबरी म्हणून नेमकी आहे. कुठं अतिरिक्त काही नाही, कुठं कशाची कसर नाही, संदर्भ पक्के. आशय तर भक्कमच. रेखीव इमारत, >>कादंबरीशी नातं जुळण्याचं दुसरं कारण म्हणजे कादंबरीचा आशय >>धी म्हटलं तसं ही कादंबरी म्हणजे जुन्या वाड्यासारखी वाचकाला गुंतवून ठेवते. यातल्या प्रत्येक प्रकरणाशी वाचकाचं नातं जुळत जातंच ही तुमची रारंगढांग वरचे प्रेम दाखवणारी वाक्यं. धन्यवाद मोडक. बाकी तुमच्या सुहृद या लेखमालेला शुभेच्छा. नाव मोठे समर्पक आहे. यातुन तुमच्या अनुभवविश्वाचे पदर उलगडत जातील आणी माझ्यासारखा वाचक अजून शिकत जाईल. लिखाण समर्थपणे ललिताच्या अंगाने जाणारे असल्याने अगदी आनंददायक अशी ही शिकवण आहे.

उत्कृष्ट लेख... पुस्तक्/चित्रपटविषयक लेख वाचताना त्याला परिचय म्हणायचे की परिक्षण हा प्रश्न मल नेहमी पडतो नि पटकन श्रामो आठवतात... आणि मी घाबरून दोन्ही शब्द वापरत नाही.. सरळ लेख म्हणून टाकते झालं!!! रारंगढांग बद्दल खूपसे ऐकून आहे.. पण हा दृष्टीकोन अगदी वेगळा.. एका लेखकाच्या नजरेतून लिहिलेला.. त्यामुळे पुस्तक वाचण्याची आधीची उत्सुकता अधिकच वाढलीय.. :) अवांतरः खूप वाचायचंय.. कितीही वाचले तरी कमीच वाटते.. असे सारखे वाटायचे.. आता इथे पुविवर तर ती टोचणी आणखी जास्त टोचणार!!! :(

रारंगढांग म्हणजे मनात खोल रुतून बसलेली एक गोष्ट... कधीही न विसरणारी. हे पुस्तक संग्रही असलेच पाहिजे. अवांतरः श्रावण, दोन परिच्छेदात एक मोकळी ओळ सोडली तर छान होईल.

In reply to by बिपिन कार्यकर्ते

अवांतरः श्रावण, दोन परिच्छेदात एक मोकळी ओळ सोडली तर छान होईल. +१ सहमत बाकी रारंग ढांग बद्दल काय बोलणार... बिका म्हणतात तसे हे पुस्तक संग्रही असलेच पाहिजे. आणि पुस्तकाबद्दल आपले नाते सांगणारा एक उत्तम लेख.

ह्याबद्दल काय लिहावं? मलाही अतिशय आवडणारी कादंबरी. मुळात पेंढारकर सिनेमावाले...त्यामुळे ही कादंबरी एखाद्या पटकथेसारखी चित्रदर्शी आणि रोचक. श्रामो म्हणतात त्याप्रमाणे ऊंट मरणे वगैरे प्रसंग एकदम दिग्दर्शकाने घेतल्यासारखे सूचक. अशीच गुंतवून ठेवणारी शैली त्यांच्या "अरे संसार, संसार.." आणि "चक्रीवादळ" ह्या कादंबार्‍यातही दिसते. पण 'रारंग ढांग' ते रारंग ढांगच!!! ह्या इतक्या सुंदर कथेवर चित्रपट का नाही बनला हे खूप बर्षे माझ्यासाठी कोडेच होते. सुमित्रा भावे आणी सुनील सुकथनकर ह्यांच्याबरोबर एका "स्क्रिप्ट रायटींग' च्या कर्यशाळेत ह्याच्यावर उत्तर सापडले. सेन्सॉरने म्हणे परवानगी नाकारली कारण पुस्तकामुळे संरक्षण दलांबद्दल फारच निगेटीव्ह प्रतिमा होते. मी कॉलेजात ११-१२ वीत असतांना आमच्या मित्रांपैकी कित्येकांना डिफेन्स मधे जायचे भूत होते.... पण NCC तील seniors चे बेताल आणि मुजोर वागणे, त्यातल्या अधिकार्‍यांचे असंवेदनशील वर्तन ह्याबरोबरच 'रारंग ढांग' हे मला NDA पासून दूर ठेवण्याचे एक प्रबळ कारण होते. मला मानव आणि निसर्गापेक्षाही हा माणूस आणि व्यवस्था ह्यांच्यातला संघर्ष वाटतो. शेवटी विश्वनाथला विचारलेला प्रश्न "तुला अपेक्षित्/अभिप्रेत असलेले स्वातंत्र्य तुला ह्या बाहेरच्या जगात तरी मिळेल का?" ह्या प्रश्नाने पुस्तकाच्या बाहेर अयुष्यातही खूप वेळा छळले आहे. मुळातील मनस्वी, स्वच्छंद स्वभावामुळे, "तुला जे मनापासून करायचे आहे, ते खरच करता येईल का?" हा प्रशन वेगवेगळ्या रुपात भेटतच राहतो! हिमालयातील उंचावरचे रस्ते बघतांना कुठेतरी 'रारंग ढांग' मनात घुटमळता राहिले... इथेच कुठेतरी विश्वनाथने 'ते' स्मारक बांधले असेल का असा वेडा विचारही मनात येऊन गेला! :) नंतर मग कधीतरी, कुठल्या ना कुठल्या कारणाने रारंग ढांग मधले मला भावलेले, कुठेतरी आत रुजलेल/रुतलेले प्रसंग मनात कळत-नकळत उमटत राहतात...कधी बोलतांना संदर्भ म्हणून (आणी समोरच्याने ते पुस्तकच वाचले नसेल तर मग एक अशक्य तगमग होते...) तर कधी एखाद्या ब्लॉग-पोस्टमधे माझीच अस्वस्थता व्यक्त करतांना. 'रारंग ढांग' मला आवडते ते मुलतः त्यातील विश्वनाथच्या अंतर्गत संघर्षामुळे...आणि कित्येक वेळा आयुष्यात प्रसंग/डिटेल्स वेगळे असले तरी प्रश्नांचा पॅटर्न बराचसा सारखा असतो असे वाटते. वेळ आल्यास, स्वतःला खरच योग्य वाटणार्‍या निर्णयामागे खंबीरपणे उभे रहाण्याची आंतरीक शक्ति मिळावी, किंबहुना ती मिळवावी अशी तीव्र इच्छा प्रत्येकवेळेस हे पुस्तक वाचतांना होते. तशी आंतरीक शक्ति माझ्याकडे आहे का? प्रामाणिकपणे सांगायचे तर ह्या प्रश्नाचे होकारार्थी उत्तर आजतरी माझ्याकडे नाही, पण ते तसे असावे ह्याची प्रेरणा देणार्‍या पुस्तकांत 'रारंग ढांग' चे स्थान खूपच वर आहे! धन्यवाद श्रामो एका आवडत्या पुस्तकाची इतकी सुंदर ओळख करून दिल्याबद्दल! :)

दहावीच्या का बारावी नंतरच्या सुट्ट्यातली दिवस असाच मित्रा कडे गेलो असताना एक पुस्तक दिसले. मित्राचे आणि माझे पुस्तक देवाण घेवाण चालु असायचेच त्यात सुट्ट्याचे दिवस आणि नुकताच निकाल लागुन गेलेला. तर मित्राकडे सहज ते पुस्तक हातात घेतले.. पुस्तकाचे नाव वाचुन पुस्तकाकडे आकर्षित झालोच.. त्यात पहील्या पानावर हाताने लिहीलेला मजकुर वाचला आणि उत्सुकता अधिकच वाढली. मित्राकडे चौकशी केली असता कळले शाळेतल्या जोशीबाईंनी त्याला मेरीट मधे आला म्हणुन हे पुस्तक बक्षिस दिलेले होते. मित्राचे आणि ईंडायरेक्टली बाईंचे रेकमेंडेशन घेउन त्याच दिवशी पुस्तक वाचायला घेतले पुस्तक संपुर्ण वाचल्याशीवाय खालीच ठेवु शकलो नाही.. आजही विश्वनाथचे कॅरेक्टर डोक्यात परफेक्ट बसलेले आहे...वर मनिष म्हणाल्या प्रमाणे विश्वनाथच्या मनातल्या अंतर्गत संघर्ष त्या प्रमाणे त्याचा मनातले प्रश्न कुठे ना कुठे आयुष्याशी नक्कीच समोर उभे राहातात... ह्या पुस्तकावर चित्रपट तयार होणार असे मी पण वाचले होतेच पण पुढे काय झाले असावे हे मनिष च्या प्रतिसादातुन लक्षात येतेच. आता पुस्तक संग्रही नाहीए पण लवकरच घेउन वाचावे लागेल. आता असते तर लगेच वाचायला बसलो असतो. :-)

विलक्षण आवडलेल्या आणि मनात घर केलेल्या पुस्तकावरचा लेख अतिशय सुरेख झाला आहे. हा लेख वाचताना लक्षात आलं, की पुस्तकातले अनेक संदर्भ विस्मृतीत गेले आहेत. आता हे पुस्तकपएन्हा एकदा वाचावंच लागेल. धन्यवाद श्रावणराव! --अदिती

रारंगढांग.. हो, मी हे नांव नेहमी असेच घेते.. अक्षरशः एका बैठकीत अधाशासारखी वाचून काढली.. श्रामो आणि मनीषने आधीच इतके लिहून ठेवलेय की अधिक काय लिहावे? प्रत्येक व्यक्तीरेखा तिचे स्वतंत्र अस्तित्व जाणवून देत राहाते.. मग तो बहादूर असो वा ट्रक ड्रायव्हर ग्यानचंद.. मोडक म्हणतात तशी उमा, विश्वनाथाचे बाबा प्रत्यक्ष समोर येत नसले तरी त्यांनाही महत्व आहेच.. आर्मी विरूद्ध सिव्हिलियन की निसर्ग विरूद्ध माणूस??? संघर्ष दोन्ही ठिकाणी आहे.. आणि या सगळ्यात स्वतःच्या मतांशी ठाम असणारा, प्रसंगी वरिष्ठांचा रोष पत्करणारा पण तत्त्वांना मुरड न घालणारा विश्वनाथ!!! प्रतिकूल परिस्थितीतही डोके शांत ठेवून वातावरण हलकंफुलकं बनवणारा मिनू खंबाटा.. आणि मृत्यूची साक्ष देणारे पांढरे दगड!!!! पुस्तक संपले तरी घटना नि पात्रे मनात फेर धरून आहेत.. एकदा वाचून मन भरलं नाहीए.. अजून बरीच पारायणे होतील पुस्तकाची.. :)
वेळ आल्यास, स्वतःला खरच योग्य वाटणार्‍या निर्णयामागे खंबीरपणे उभे रहाण्याची आंतरीक शक्ति मिळावी, किंबहुना ती मिळवावी अशी तीव्र इच्छा प्रत्येकवेळेस हे पुस्तक वाचतांना होते. तशी आंतरीक शक्ति माझ्याकडे आहे का? प्रामाणिकपणे सांगायचे तर ह्या प्रश्नाचे होकारार्थी उत्तर आजतरी माझ्याकडे नाही, पण ते तसे असावे ह्याची प्रेरणा देणार्‍या पुस्तकांत 'रारंग ढांग' चे स्थान खूपच वर आहे!
मला माझ्या भावना व्यक्त करायला याहून योग्य शब्द सुचत नाहीत!!