शतकातील २० सर्वोत्कृष्ट मराठी पुस्तके....एक अवलोकन !!

काल रात्री मिपावरील एक ज्येष्ठ सदस्य श्री.मुक्तसुनीत यांची एका कवितेसंदर्भातील विनंती पु.वि.वर वाचावयास मिळाली. त्याचवेळी हेही आठवले की, श्री.मुक्तसुनीत याच धर्तीच्या एका इंग्रजी संस्थाळावरील नामवंत सदस्य आहेत आणि तेथील भारतातील विविध प्रांतातील, विविध भाषिक सदस्यांसमवेत संवाद साधताना ते मराठी साहित्याविषयी भरभरून लिहित. योगायोगाने आज 'पुस्तकविश्व' चा अतिशय देखणा असा पहिला अंक प्रकाशित झाल्यावर 'पुस्तकाविषयी' सदस्यांमध्ये किती प्रेमाची भावना निर्माण करता येऊ शकते याचे प्रत्यंतर आले. श्री.मुक्तसुनीत यांनीही एकदा त्या इंग्रजी संस्थळावर 'अंतर्नाद' या दिवाळी अंकात आलेल्या "शतकातील -१९०० ते २००० - सर्वोत्कृष्ट २० पुस्तके' हा विषय छेडला होता आणि त्या धाग्यावर मराठी तसेच अमराठी सदस्यांत झालेल्या एका छान चर्चेची आठवण झाली. सुदैवाने मी ती पुस्तके एका फाईलमध्य नोंद करून ठेवली असल्याने जरी "अंतर्नाद" तो (२००७ की २००८?) अंक माझ्याजवळ नसला तरी ती पुस्तकाची लिस्ट आहेच. आज सहज दिवाळी अंकानिमित्ताने मी त्या यादीकडे नजर टाकल्यावर असे दिसून आले की, २००० नंतर एक दशक झाले आहे....मग त्या यादीत बदल करावा असे आजच्या वाचकाला वाटेल्/वाटते का? २००० ते २०१० या दशकात कितीतरी (नव्या पिढीतील लेखकाची विविध ललित पुस्तके) प्रकाशित झाली आहेत. त्यातील एखादे-दुसरे निवडून तसेच शतकातील २० पैकी काही पुस्तके काढून टाकण्यास आजचा वाचक धजेल काय? विशेष म्हणजे "अंतर्नाद" च्या २० सर्वोत्कृष्ट पुस्तकाच्यावेळी जरी वाचकांना १९०० ते २००० अशी १०० वर्षे दिली होती तरीही ज्या हजार-बाराशे वाचकांनी त्यावेळी आपली मते नोंदविली होती, त्यांनी १९८० नंतर प्रकाशित झालेले १ च पुस्तक निवडले होते. याचा अर्थ असा घ्यायचा काय...की १९८० नंतर 'सकस आणि काळाच्या छाननीवर' उतरणारे टिकावू लेखन होऊच शकलेले नाही? अनेक प्रश्न या संदर्भात उभे राहू शकतात. त्यानुसार इथल्या पुस्तकप्रेमी सदस्यांनी चर्चा करून ही यादी अद्ययावत तर करावीच, पण त्यापेक्षा एखाद्याला आपली "स्वतःची" अशी २० पुस्तकांची यादी स्वतंत्ररित्या इथे द्यावीशी वाटली तर तिचेही आपण इथे स्वागत करू या...जेणेकरून आपला वैयक्तिक ग्रंथसंग्रह समृद्ध करण्यास सहकार्य लाभेल. "अंतर्नाद" ची शतकातील २० सर्वोत्कृष्ट मराठी पुस्तकाची यादी : १. शामची आई : साने गुरूजी ~ आत्मचरित्रात्मक कादंबरी २. रणांगण : विश्राम बेडेकर ~ कादंबरी ३. बनगरवाडी : व्यंकटेश माडगुळकर ~ कादंबरी ४. ययाति : वि.स.खांडेकर ~ कादंबरी ५. कोसला : भालचंद्र नेमाडॅ ~ कादंबरी ६. चिमणरावांचे चऱ्हाट : चिं.वि.जोशी ~ विनोद ७. कळ्यांचे नि:श्वास : मालती बेडेकर ~ स्त्रीव्यथेवरील लघुकथा ८. तलावातले चांदणे : गंगाधर गाडगिळ ~ लघुकथा ९. काजळमाया : जी.ए.कुलकर्णी ~ लघुकथा १०. सखाराम बाईंडर : विजय तेंडुलकर ~ नाटक ११. संपूर्ण केशवसुत : केशवसुत ~ काव्य १२. विशाखा: कुसुमाग्रज ~ काव्य १३. मर्ढेकरांची कविता : बा.सी.मर्ढेकर ~ काव्य १४. मृदगंध : विंदा करंदीकर ~ काव्य १५. युगांत : इरावती कर्वे ~ महाभारतावर टीकात्मक लेखन १६. स्मृति-चित्रे : लक्ष्मीबाई टिळक ~ आत्मचरित्र १७. बलुतं : दया पवार : आत्मचरित्र १८. आहे मनोहर तरी... सुनीता देशपांडे ~ आत्मचरित्र १९. व्यक्ती आणि वल्ली : पु.ल.देशपांडे ~ व्यक्तिचित्रे २०. माणसं! : अनिल अवचट : सामाजिक शोध एक निरिक्षण >> १. वीस पुस्तकात कादंबरी प्रकाराला ५ जागा २. कथासंग्रहाला ३ ३. आत्मचरित्राला ३ ४. काव्य ४ ५. लेख १ ६. व्यक्तिचित्रे १ ७. समाजचित्रण १ ८. विनोद १ ९. नाटक १ ~ विशेष म्हणजे १०००+ रसिक वाचकांनी मराठी साहित्यात खपाच्या दृष्टीने विक्रमी ठरलेल्या "स्वामी", "मृत्युंजय", "श्रीमान योगी", "झुंज", "बिढार" यांना जसे स्थान दिलेले दिसत नाही, तसेच कादंबरीकार म्हणून महाराष्ट्राला सुपरिचित असलेले सर्वश्री ना.सी.फडके, श्री.ना.पेंडसे, गो.नि.दांडेकर, जयवंत दळवी, आनंद यादव या सारख्या दिग्गजांचा, तसेच आपल्या खास लिखाणाच्या धाटणीने कमालीले लोकप्रिय असलेले व.पु.काळे, शंकर पाटील, रत्नाकर मतकरी, श्री.दा.पानवलकर या लेखकांचाही विचार केलेला दिसत नाही. कवितेत बालकवी, ग्रेस, इंदिरा संत, शांता शेळके यांची अनुपस्थिती जशी जाणवते तशीच दलित लेखनात आपल्या वैशिष्ठ्यामुळे परिचित असलेले बाबुराव बागुल, सुर्वे, ढसाळ यांचीही गैरहजेरी जाणवण्यासारखी आहे. अर्थात २० चीच मर्यादा असल्याने वाचकांनाही निवडीत जादाचा वाव नव्हताच. १९८० नंतरच्या पिढीतील भारत सासणे, विश्वास पाटील यांच्यासारख्या नव्या दमाच्या लेखकांनी मात्र या दशकात नक्कीच स्थान असेल. यंदाच्या दीपावलीच्या आनंद द्विगुणित करण्यासाठी इथल्या सदस्यांकडून त्यांच्या निवडीच्या अशा २० पुस्तकांची यादी यावी; ही अपेक्षा. इन्द्रा (संपादक मंडळास नम्र विनंती >> पुस्तकविश्वच्या सुरूवातीच्या काळात याच विषयावर चर्चा झाली असल्यास हा लेख काढून टाकण्यास हरकत नाही.....इन्द्रा)

बिल्कुल नाही....हा तर एक "आठवणींचा, आवडीचा खेळ" असे समजून यादी तयार करायची आहे. समजा तुम्हाला गेल्या पाचसहा वर्षातीलच २० पुस्तके निवडायची असतील तर तसेही करण्यास काहीही आडकाठी नाही. वरील यादी ही केवळ एक दिशादिग्दर्शक म्हणून पाहावी. तुम्ही जी २० निवडाल ती जर माझ्याकडे नसतील तर मी तुम्हाला त्यातील एखाद्यादुसर्‍या पुस्तकाबद्दल आवर्जुन विचारू शकतो ना.... सदस्यांची वाचनाची आवड कळावी यासाठीच हा प्रयत्न. इन्द्रा

इंद्रराज यांनी लावलेले निकष मी लावू शकलेलो नाही त्याबद्दल क्षमस्व. पण माझा जो वाचनाचा मर्यादित आवाका आहे त्यातूनमाझी आवडती २० पुस्तके निवडताना मला सर्वात जवळची कोणती पुस्तके आहेत हा निकष लावलेला आहे. यातील पर्व सोडले तर बहुतेक सगळीच मी माझ्या बालपणापासून वाचत असल्यामुळे असेल कदाचित, पण ही पुस्तके वाचताना मी अगदी गुंग होऊन जातो. त्यामुळे जवळची पुस्तके हाच निकष लावला आहे मी. :) सर्वकालीन श्रेष्ठ २० पुस्तके तसे निवडणे कठीणच काम आहे. पण तसे करण्यासाठी इंद्रराज यांनी दिलेले निकष नक्कीच योग्य आहेत, त्यामुळे प्रत्येक कलाकृतीला योग्य तो न्याय मिळतो. असो.. माझी यादी: १. कोसला - भालचंद्र नेमाडे २. युगान्त - इरावती कर्वे ३. वीरधवल - नाथमाधव ४. अवकाशाशी जडले नाते - जयंत नारळीकर ( चुकुन हे पुस्तक वगळले गेले होते. मी १९ नावेच दिली होती) ५. वज्राघात - हरि नारायण आपटे ६. शकुंतला - आनंद साधले ७. पार्टनर - व.पु. काळे ८. सात सक्कं त्रेचाळीस - किरण नगरकर ९. पानिपत - विश्वास पाटील १०. ययाति - वि.स.खांडेकर ११. अधःपात - गो.ना. दातारशास्त्री १२. प्रेषित - जयंत नारळीकर १३. नक्षत्रलोक - पं.महादेवशास्त्री जोशी १४. मर्मभेद - शशी भागवत १५. नाझी भस्मासुराचा उदयास्त - वि.ग.कानिटकर १६. छत्रपति शिवाजी महाराज - कृ.अ.केळुस्कर १७. श्यामची आई - साने गुरुजी १८. साद देती हिमशिखरे - गो.खं.प्रधान - अनु: रामचंद्र जोशी १९. पर्व - एस.एल.भैरप्पा - अनु: उमा कुलकर्णी २०. झुंज - ना.सं. इनामदार अधिक वाढवता येतील अशीही कित्येक पुस्तके आहेत. नाहीतर रारंगढांग, रमलखुणा(इस्किलारमुळे), बनगरवाडी, पु.लंची, अशी कित्येक पुस्तके यात जोडता आली असती. ही यादी मी कॉलेजमध्ये शिकत असतानाच केलेली होती. दोन-तीन पुस्तके सोडली तर यादी जवळपास तशीच राहिली आहे माझी :)

१) सात सक्कं त्रेचाळीस - किरण नगरकर २) माचीवरला बूधा गो नी दांडेकर ३) झूल भालचंद्र नेमाडे ४) जैत रे जैत गो नी दांडेकर ५) रारंगढांग प्रभाकर पेंढारकर ६)माणसे अरभाट आणि चिल्लर जी.ए.कुलकर्णी ७) बिढार भालचंद्र नेमाडे ८) जरीला भालचंद्र नेमाडे ९) एक झाड दोन पक्षी विश्राम बेडेकर १०) कृष्णा नारायण धारप ११) सोनेरी टोळी नाथ माधव १२) एम.टी. आयवा मारू अनंत सामंत. १३) डोंबाय्राचा खेळ. भाउ पाध्ये १४) सोलेदाद विलास सारंग १५) कोवळे दिवस व्यंकटेश माडगुळकर

In reply to by निवांत पोपट

निपो, नेमाडे प्रेमी दिसताय असे दिसते आहे एकंदरीत यादीवरुन. या यादीत नेमाड्यांची ३ पुस्तके आहेत पण कोसला नाही याचे आश्चर्य वाटले. चुकुन राहिले की कोसला पेक्षा वरील ३ पुस्तके जास्त आवडली? झूल आणि बिढार मस्तच आहेत. जरिला नाही वाचले. वाचायचे राहिले आहे

In reply to by सागर

खरं सांगायचं तर का कॊणास ठाऊक पण कोसला आवडली नाही.झूल मात्र ग्रेट आहे.ह्या यादीत आणखी एक पुस्तक टाकता येईल.शांता गोखले ह्यांचे “रीटा वेलिणकर” .

ही माझी यादी. पण ही उद्यासुद्धा बदलू शकते :) ह्यात मुद्दामहून केवळ फिक्शनचाच विचार केला आहे. १. एम टी आयवा मारु - अनंत सामंत २. गंधर्व - बाळकृष्ण प्रभुदेसाई ३. बनगरवाडी - माडगूळकर ४. रथचक्र - श्री ना पेंडसे ५. वेडगळ - जयवंत दळवी ६. सारे प्रवासी घडीचे - जयवंत दळवी ७. तुंबाडचे खोत - श्री ना पेंडसे ८. बलुतं - दया पवार ९. पिंगळावेळ, रमलखुणा, निळासावळा, पारवा, हिरवे रावे, काजळमाया - जी ए कुलकर्णी १०. माणसे अरभाट आणि चिल्लर - जी ए कुलकर्णी ११. कोसला - भालचंद्र नेमाडे १२. बिढार, हूल, जरीला, झूल - चांगदेव चतुष्टय - भालचंद्र नेमाडे १३. सूर्य - श्री दा पानवलकर १४. टारफुला - शंकर पाटील १५. डोह - श्रिनिवास कुलकर्णी १६. कडू आणि गोड - गंगाधर गाडगीळ १७. रणांगण - विश्राम बेडेकर १८. लव्हाळी - श्री ना पेंडसे १९. बारोमास - सदानंद देशमुख २०. निशाणी डावा अंगठा - रमेश इंगळे

लोकमान्यतेचा निकष बाजूला ठेवला, सर्वसमावेशकता सोडून दिली, कथा-कादंबर्‍यांचाच विचार केला आणि 'मराठी साहित्याच्या इतिहासात नवं काही घडवणारे कोण?' असा प्रश्न विचारला, तर मला पटकन आठवणारे साहित्यिक असे निघाले (कोणताही विशेष क्रम नाही). चिं. वि. जोशी ह. ना. आपटे साने गुरुजी विश्राम बेडेकर (विशेषतः रणांगण) मालती बेडेकर / विभावरी शिरूरकर दि. बा. मोकाशी व्यंकटेश माडगूळकर शंकर पाटील (किंवा द. मा. मिरासदार) जी.ए. कुलकर्णी चिं.त्र्यं. खानोलकर श्री. ना. पेंडसे आनंद साधले (विशेषतः आनंदध्वजाच्या कथा) शंकरराव खरात भालचंद्र नेमाडे विलास सारंग भाऊ पाध्ये शांता गोखले (विशेषतः रिटा वेलिणकर) पुरुषोत्तम बोरकर (विशेषतः मेड इन इंडिया) श्याम मनोहर मकरंद साठे (विशेषतः अच्युत आठवले आणि आठवण)

अरे हो, माझ्या यादीत श्याम मनोहर राहिलेच. तसेच अनेक पुस्तके अशी आहेत की जी मी, मी म्हणुन नाचताहेत.. असो.. २०-२५ ची यादी बनवणे अवघडच..

कोणताही क्रम नाही आणि यादी २० ची विचारली आहे म्हणून २० वर थांबवली आहे इतकेच. ही पुस्तके माझी आवडती तर आहेत. त्या त्या लेखनप्रकारात उत्तम, काही प्रसंगी समाजात/लेखनात मैलाचा दगड ठरलेली आहेत. मात्र ती सर्वोत्तम आहेत की नाहि हे सांगण्याइतके माझे वाचन नाही. यादी सतत बदलत असते.

 • अपूर्वाई, पूर्वरंग, जावे त्यांच्या देशा
 • रारंगढांग
 • समिधा - साधना आमटे
 • स्मृतीचित्रे
 • माझे सत्याचे प्रयोग (अनुवादीत)
 • सहा सोनेरी पाने
 • कार्यरत
 • तोत्तोचान (अनुवादीत)
 • पाडस (अनुवादीत)
 • सत्तर दिवस (अनुवादीत)
 • क्रौंचवध
 • आकाशाशी जडले नाते
 • भारतीय विवाहसंस्थेचा इतिहास
 • रुचिरा
 • विशाखा
 • दक्षिणरंग
 • युगान्त
 • वनवास (प्रकाश नारायण संत)
 • एका तेलियाने

ही माझ्या आवडीची सर्वोत्तम २०- १. पानिपत - विश्वास पाटील २. झाडाझडती - विश्वास पाटील ३. तुंबाडचे खोत - श्री. ना. पेंडसे ४. हद्दपार - श्री. ना. पेंडसे ५. पडघवली - गो. नी. दांडेकर ६. दुर्गभ्रमणगाथा - गो. नी. दांडेकर ७. दुनियादारी - सुहास शिरव़ळकर ८. कोसला - भालचंद्र नेमाडे ९. मुखवटा - अरूण साधू १०. माहीमची खाडी - मधु मंगेश कर्णिक ११. सांगाती सह्याद्रीचा - यंग झिगारो ट्रेकर्स क्लब द्वारा संकलीत १२. चक्र - जयवंत दळवी १३. मास्टर ऑफ द गेम - सिडने शेल्डन - अनु. विजय देवधर १४. गॉडफादर - मारिओ पुझो - अनु. रविंद्र गुर्जर १५. ओसाडवाडीचे देव - चिं. वि. जोशी १६. मृत्युंजय - शिवाजी सावंत १७. गहिरे पाणी - रत्नाकर मतकरी १८. वाघरू/त्या तिथे रूखातळी - गो. नी. दांडेकर १९. वाल्मिकीरामायण - विदर्भ मराठवाडा बुक कंपनी -सर्व ४ खंड आणि शेवटी सर्वांच्या कडे हवाच असा महान ग्रंथ २०. महाभारत - विदर्भ मराठवाडा बुक कंपनी - सर्व ११ खंड अर्थातच ऋषिकेशने म्हटल्याप्रमाणे कुठलाही क्रम नाहीच. यादीतील कुठलेही पुस्तक उघडा, वाचनानंदच मिळेल.

२०ची यादी करणे जुलूम आहे.. आता अरुण साधूंचे नाव वाचून लक्षात आले की सिंहासन/मुंबई दिनांक ह्या दोन महत्वाच्या राजकीय कादंबर्‍या राहिल्याच माझ्या यादीत.. :(

माझी यादी: ०१) एकेक पान गळावया - गौरी देशपांडे ०२) हंस अकेला - मेघना पेठे ०३) मृद्गंध - विंदा करंदीकर ०४) कोसला - भालचंद्र नेमाडे ०५) रणांगण - विश्राम बेडेकर ०६) लव्हाळी - श्री. ना. पेंडसे ०७) नक्षत्रांचे देणे - चिं. त्र्यं. खानोलकर ०८) चिरदाह - भारत सासणे ०९) रथचक्र - श्री. ना. पेंडसे १०) आंधळ्याच्या गाई - मेघना पेठे ११) तुंबाडचे खोत - श्री. ना. पेंडसे १२) काजळमाया - जी. ए. कुलकर्णी १३) माणसं अरभाट आणि चिल्लर - जी. ए. कुलकर्णी १४) वनवास - प्रकाश संत १५) जी. एं.ची निवडक पत्रे - जी. ए. कुलकर्णी १६) कुण्या एकाची भ्रमणगाथा - गो. नी. दांडेकर १७) नाटक एक पडदा तीन घंटा - राजीव नाईक १८) त्या वर्षी - शांता गोखले १९) आहे मनोहर तरी - सुनीता देशपांडे २०) व्यासपर्व - दुर्गा भागवत (यादी कालानुक्रमाला धरून नसेल कदाचित. शिवाय कवितांचं प्रतिनिधित्व मर्यादित आहे, कारण माझं कवितावाचन मर्यादित आहे.)

दिवाळीच्या धामधुमीत या धाग्याला लाभलेल्या प्रतिसादांवर भाष्य करायचे काहीसे लांबले होते, त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो आणि आता याच विषयावर सविस्तर लिहितो : सर्वप्रथम सर्वश्री सागर, निवांत पोपट, टण्या, चिंतातुर जंतू, ऋषिकेश, वल्ली, मेघना.....या सर्वांचे मनःपूर्वक आभार. मी रोचीनच्या प्रतिसादाची वाट पाहात होतो, पण असे दिसते की त्यादेखील दिवाळीच्या गडबडीत असल्याने काही काळ गैरहजर आहेत. "२०" हा आकडा खर्‍या वाचनप्रेमीच्या नजरेत काहीसा अन्यायाचा असणार याची खात्री म.टा., आकाशवाणी मुंबई आणि अंतर्नाद यानाही होतीच. पण असे असले तरी कुठेतरी मर्यादा ही हवीच हवी, त्याशिवाय आपण स्वतःदेखील आपल्या निवडीचे योग्य रितीने समर्थन नाही करू शकत. सर्वांच्या पुस्तकावर एक नजर टाकल्यावर मला एक जाणीव झाली की, आपण तयार केलेली यादी ही 'वाचकाची प्रातिनिधिक' यादी होऊ शकतो, कारण आपण इथे सातत्याने पुस्तकविश्वाचा धांडोळा घेत असतो, साहित्यातील कल जाणून घेत असतो, चर्चा करीत असतो...करीत राहू. त्यामुळे एखादा प्रकाशनगृहाच्या प्रतिनिधीने मनोज्ञ नजरेने या धाग्यावरील पुस्तकांच्या यादीचे परिशीलन केले तर त्यालाही आजच्या वाचकाला कोणत्या प्रकारचे साहित्य वाचण्यास भावते हे समजून चुकेल. सात प्रतिसादांच्या पाहणीनंतर मी काढलेले काही निष्कर्श ~ १. कितीही लोकप्रियता मिळाली असली तरी 'आपल्या' सदस्याना "रणजित देसाई' वीसमध्ये घ्यावेसे वाटलेले नाही, हे म्हटले तर आश्चर्य, म्हटले तर चिंतनीय. तसेच 'मंत्रावेगळा, महानायक, छावा...' यासारख्या विक्रीचे उच्चांक निर्माण करणार्‍या कादंबर्‍यांनाही सातही प्रतिसादकांच्या यादीत स्थान नाही यावरून 'लोकप्रियता' आणि छिद्रान्वेषी आवडनिवड या सर्वस्वी भिन्न भूमिका असतात हेच सिद्ध होते. २. भालचंद्र नेमाडे यांच्या लेखनशैलीवर जितके प्रेम केले जाते तितकेच त्यांचे वाङ्मय हे साहित्य होऊच शकत नाही अशा प्रकारच्या तिखट प्रतिक्रिया वारंवार ठिकठिकाणाहून निघत असतात. विविध नावाचे मराठी संकेतस्थळावर नेहमीच श्री.नेमाडे या नावाचे 'डिसेक्शन' चालूच असते....त्यावर भवती न भवती चर्चाही होत असते. 'कोसला' ला डोक्यावर घेणारे सांप्रत महाराष्ट्र देशी जितके वाचक आहेत तितकेच ती पायाने ठोकरून द्यावी असे म्हणणारेही त्याच बाकावर दाटीवाटीने हाती कोयते घेऊन बसले आहेत....असे असूनही ६ प्रतिसादकर्त्यानी रा.रा.भालचंद्र नेमाडे याना उदाहरणार्थ वगैरे आपल्या २० च्या यादीत स्थान दिले आहे, ही 'नेमाडे' नावाची उदाहरणार्थ महतीच मानली पाहिजे. (श्री.ऋषिकेश यांच्या यादीत नेमाडे नाहीत...पण ते म्हणतात तसे त्यांची 'यादी सतत बदलत असते' त्यानुसार कदाचित उद्या ते नेमाडेना बदलेलेल्या यादीत स्थान देतीलही. [श्री.नेमाडे आमच्या घरी वर्षातून एकदा तरी येतात...जर तसे ते आले तर वेळातवेळ काढून मी जरूर त्यांना या धाग्याकडे घेऊन येईन आणि त्यांच्यावर प्रेम करणार्‍यांची ओळख करून देईन.] ३. मेघना वगळता सर्वांच्या यादीत पु.ल.देशपांडे असणे ही एक महाराष्ट्रप्रेमींची न विसरता येण्याजोगी खूण मानली पाहिजे, इतके ते नाव समृध्दतेने भरलेले आणि भारलेले आहे. मेघनाच्या वाचनाचा आवाका पाहाता त्यांच्या कपाटात समग्र पुलं असणार याबद्दल खात्री आहेच, फक्त २० मध्ये त्यानी पु.लं.च्या ऐवजी सुनीताबाईना जागा दिली इतपतच. ४. तीच गोष्ट जी.ए.कुलकर्णी या जादुगाराची. केवळ 'कथा' हा वाङमयप्रकार हाताळणार्‍या या लेखकाचे गारुड मराठी मनावर असे काही ठसले आहे की त्यांच्या उल्लेखाशिवाय 'द बेस्ट' तयार होऊच शकत नाही अशी मनमोहक परिस्थिती आहे. ५. मला आनंद होतो तो आणखीन एका कुतहूलमिश्रीत आनंदाचा....तो म्हणजे श्री.ना.पेंडसे या ज्येष्ठ, श्रेष्ठ कादंबरीकाराला आपण विसरू शकत नाही. आजच्या पिढीतील विश्वास पाटील, अनंत सामंत, सुहास शिरवळकर याना जसे २० च्या यादीत स्थान आहे तसेच साठसत्तर वर्षापूर्वी ज्यांच्या लेखणीने मराठी वाचकाला कोकणात खेचून नेले होते त्या पेंडश्यांना आजही तितकेच मानाचे स्थान आहे.....हे स्थान ना.सी.फडके टिकवू शकले नाहीत....काही प्रमाणात वि.स.खांडेकर, साने गुरुजी, गो.नि.दांडेकर, जयवंत दळवी, मधु मंगेश कर्णिक यानी प्राप्त केले आहे. यांचा आपण आदर करतो, पण आपण त्यांच्यासाठी 'पागल' होऊ शकत नाही, हेही तितकेच खरे. ६. 'अंतर्नाद' च्या यादीत चक्क ४ कवितासंग्रहांना स्थान मिळाले हे जसे विलोभनीय आहे तद्वतच आपल्या सातही प्रतिसादकांनी एकाही काव्यसंग्रहाचा वा कविचा आपल्या यादीत समावेश केलेला नाही, ही बाब मला काहीशी चिंतेची वाटली. नाटकाच्याबाबतीतही तसेच म्हणावे लागेल [अर्थात माझ्या व्यक्तिगत निवडीतही नाटकाला स्थान नाहीच.]. 'कविता' हा मराठीमनाचा एक ओलावा आहे आणि आपले साहित्य या प्रकाराने सोन्याने भरलेले असतानादेखील वीसच्या यादीत त्या खजिन्यातील एकाही अलंकाराला स्थान मिळत नाही ही बाब 'कादंबरी' प्रकाराने काव्यावर केलेली मात हेच दर्शविते. ७. बदलत्या प्रवाहाचे प्रतिनिधित्व करणार्‍या पिढीतील किरण नगरकर, श्याम मनोहर आणि प्र.ना.संत याना इथे स्थान मिळाले याचा एक वाचक म्हणून मला झालेला आनंद अवर्णनीय असाच आहे. किरणने तर एकच मराठी पुस्तक लिहिले आणि असे असूनही टॉप २० मध्ये सातत्याने येते याचा त्यानाही आनंद होत असेलच. [व्यक्तिगत पातळीवर मला श्री.ह.मो.मराठे यांचा कुणीच उल्लेख केला नाही, याबद्दल नाही म्हटले तरी थोडे वाईट वाटले. पण असो.] ८. 'विनोद' प्रांतात पु.लं.चे स्थान तर ध्रुवासारखे अढळ आहे हे आपण पाहिले आहेच, असे असूनही आजचा वाचक चिं.वि.जोशी आणि द.मा.मिरासदार याना विसरू शकत नाही ही बाब लक्षणीय आहे. कारण 'अंतर्नाद' च्या यादीत विनोदात फक्त पु.लं. या नावालाच स्थान मिळाले होते. ९. 'आत्मचरित्रा' बाबत नोंद करण्यासारखी गोष्ट म्हणजे 'एक झाड दोन पक्षी', 'स्मृतीचित्रे', 'आहे मनोहर तरी...', 'कुण्या एकाची भ्रमणगाथा' याना स्थान मिळाले आहे, हे विशेष आहे. माझ्या यादीत मी श्री.ना.पेंडसे यांच्या 'लेखक आणि माणूस' घेणार असल्याने एकूण ५ आत्मचरित्रांनी वाचकांच्या (प्रातिनिधिक) यादीत स्थान मिळाले असे होईल, हे नोंदविण्यासारखे आहे. शेवटी १०. माझी २० ची यादी....जी दाखविलेल्या क्रमाच्या पसंतीनेच आहे असे नाही. (क्रमांक १ चा अपवाद वगळता....) १) काजळमाया ~ जी.ए.कुलकर्णी २) मर्ढेकरांची कविता ~ बा.सी.मर्ढेकर ३) लेखक आणि माणूस ~ श्री.ना.पेंडसे ४) निष्पर्ण वृक्षावर भर दुपारी ~ ह.मो.मराठे ५) ऋतुचक्र ~ दुर्गा भागवत ६) सहा सोनेरी पाने ~ वि.दा.सावरकर ७) कार्यरत ~ अनिल अवचट ८) जास्वंद ~ माधव आचवल ९) माणदेशी माणसं ~ व्यंकटेश माडगूळकर १०) आहे मनोहर तरी ~ सुनीता देशपांडे ११) कोसला ~ भालचंद्र नेमाडॅ १२) बलुतं ~ दया पवार १३) लमाण ~ श्रीराम लागू १४) सात सक्कं त्रेचाळीस ~ किरण नगरकर १५) जांभूळ ~ श्री.दा.पानवलकर १६) शोध मर्ढेकरांचा ~ विजया राजाध्यक्ष १७) चंद्रमाधवीचे प्रदेश ~ ग्रेस १८) गोतावळा ~ आनंद यादव १९) क्लोरोफॉर्म ~ अरूण लिमये २०) बॅरिस्टरचं कार्टं ~ डॉ.हिम्मतराव बावस्कर ~ वेळातवेळ काढून या धाग्याला दिलेल्या प्रतिसादाबद्दल प्रतिसादकांचे तसेच अनामी वाचकवर्गाचे पुनश्च एकदा आभार. इन्द्रा

In reply to by इंद्रराज पवार

इंद्रराज, हे खरे आहे की कविता हा देखील मराठी साहित्याचा एक आत्मा आहे मी पुस्तके निवडताना अगदी हृदयाच्या जवळची निवडली असली तरी, कवितांना मी विसरलो हे प्रामाणिकपणे कबूल करतो. कवितासंग्रह अनेक आहेत जे अत्युत्कृष्ट आहेत. जसे केशवसुत...कुसुमाग्रज....बोरकर.... मर्ढेकर.... सुर्वे....इंदिरा संत...शांता शेळके... माई कुळकर्णी...बहिणाबाई चौधरी... अलिकडचे चारोळी फेम चंद्रशेखर गोखले... गजलसम्राट सुरेश भट....चित्रलिपी कार वसंत आबाजी डहाके आणि कित्येक मोठे कवी. पण कवितासंग्रह सगळ्यात जास्त मला आवडला तो सुरेश भट यांचा 'एल्गार' या कवितासंगहाने मला माझ्या कॉलेज जीवनापासून ते आजपर्यंत जी मोहीनी घातली आहे ती अजून सुटत नाहिये. यातील सर्व कविता (खरंतर गजला) वाचायला सुरुवात करताच मनावर एका नशेसारख्या पसरत जातात. या वर्षी कित्येक पुतकांचा अभ्यास होणार आहे. अजून एक दोन वर्षांनी माझी यादी अधिक प्रगल्भ होईल असे वाटते :)

In reply to by इंद्रराज पवार

वाचकांच्या यादीच्या अतिशय यथायोग्य व मुद्देसूद मूल्यमापनाबद्दल इंद्राचे अभिनंदन व आभार. पुविचे सदस्य विविध विषयांवरील पुस्तके वाचणारे असल्याने तसेच प्रत्येकाची आवडनिवड निराळी असल्याने ही यादी नक्कीच प्रातिनिधिक होउ शकते. अवांतरः श्री. दा. पानवलकरांबद्दल अधिक माहिती हवी आहे. त्यांची पुस्तके, त्यांची शैली ई. त्यांच्याबाबतीत पूर्णपणे अनभिज्ञ आहे.

In reply to by वल्ली

".....श्री. दा. पानवलकरांबद्दल अधिक माहिती हवी आहे. त्यांची पुस्तके, त्यांची शैली ई. त्यांच्याबाबतीत पूर्णपणे अनभिज्ञ आहे..... ~ हे काम मी करेन. मला खूप आनंद होईल या एका मस्त कलंदराविषयी चार ओळी लिहिताना. Give me couple of days, please. इन्द्रा

In reply to by इंद्रराज पवार

ही एक अजब वल्ली होती.. झळाळतं चित्रण हे ह्यांच्या लिखाणाचे वैशिष्ट्य.. इंद्रराज पवारांकडून पानवलकरांबद्दल वाचायला खरेच आवडेल. एक स्वतंत्र लेखच लिहा त्यांच्या लिखाणावर. तेंडुलकरांनी 'हे सर्व कोठून येते'मध्ये पानवलकरांवर एक फार सुरेख व्यक्तिचित्रणात्मक लेख लिहिलेला आहे.

मेघना वगळता सर्वांच्या यादीत पु.ल.देशपांडे असणे ही एक महाराष्ट्रप्रेमींची न विसरता येण्याजोगी खूण मानली पाहिजे, इतके ते नाव समृध्दतेने भरलेले आणि भारलेले आहे. मेघनाच्या वाचनाचा आवाका पाहाता त्यांच्या कपाटात समग्र पुलं असणार याबद्दल खात्री आहेच, फक्त २० मध्ये त्यानी पु.लं.च्या ऐवजी सुनीताबाईना जागा दिली इतपतच. माफ करा इंद्रराज, पण मला पु.ल.देशपांडे फक्त ऋषिकेश यांच्या यादीत दिसले.

In reply to by निवांत पोपट

श्री.निवांत यांचे निरिक्षण योग्य आहे. मला वाटते ऋषिकेश यांच्याशिवाय फक्त श्री.सागर यानीच पु.लं.चा उल्लेख केला आहे (जरी २० मध्ये नसला तरी). असे असले तरी माझी अन्यत्रची पाहणी असे सांगते की, प्रत्येक वाचनप्रेमी मराठी माणसाच्या हृदयात पु.ल.देशपांडे यांच्या किमान एका पुस्तकासाठी तरी जागा ही असतेच (किंबहुना तोच विचार माझ्या मनात इथे रुंजी घालत असावा आणि त्यामुळेच जवळपास सर्वानीच त्या नावाला आपल्या आवडीत स्थान दिले असाचे अशी मी समजूत करून घेतली) मग भले ते पुस्तक त्या त्या वाचकाच्या सर्वोत्कृष्टच्या यादीत असो वा नसो. असे भाग्य फार क्वचितच एखाद्या लेखकाला लाभले असावे. इन्द्रा

In reply to by इंद्रराज पवार

माझ्या यादीत पु.लंचे एकही पुस्तक न घेतल्याची खंत खरे तर अगदी मनापासून आहे. पण जसे मी वर म्हटले आहे की टॉप २० निवडताना मी माझ्या मनाच्या जवळच्या पुस्तकांना झुकते माप दिले होते. तसे पाहिले तर समग्र पु.लं. हा सलग वाचनाचाच विषय आहे. मी आधी पुलंची पुस्तके सलगपणे वाचली आहेत ...

मला पु.लं.विषयी एक व्यक्ती म्हणून अतिशय आदर आहे. त्यांचं काही लिखाण (विशेषतः व्यक्तिचित्रणं) आवडतंही. त्यांचं बरंचसं (विशेषतः विनोदी) लिखाण हे शाळेत वाचलं तेव्हा आवडलं पण नंतर (जशी समज वाढत गेली) तशी ती आवड टिकली नाही. त्यांना लोकमान्यता आहे हे विवादास्पद नाहीच. माझ्या यादीत मी मुख्यतः मराठी साहित्यात नवीन काहीतरी करणारे असे लोक निवडले आणि कथा-कादंबर्‍यांपुरतीच यादी बनवली; शिवाय लोकमान्यता अजिबात विचारात घेतली नाही. त्या निकषांवर पु.ल. टिकत नाहीत असं माझं प्रांजळ मत आहे.

In reply to by चिंतातुर जंतू

"....शिवाय लोकमान्यता अजिबात विचारात घेतली नाही..." ~ श्री.चि.जं. च्या या मताचा आदर केलाच पाहिजे. प्रवाहाच्याविरुद्ध जाऊन निर्भिडपणे मते मांडणे हे साहित्याच्याबाबतीतही केव्हाही चांगलेच. "लोकप्रियता" हेच जर मीटर लावायचे म्हटले तर मग बाबा कदम, चंद्रकांत काकोडकर, गुरुनाथ नाईक इतकेच काय मग बाबुराव अर्नाळकरदेखील टॉप २० मध्ये सहज जागा घेऊ शकतात. माझे निरिक्षण अवलंबून आहे ते मुख्यत्वेकरून या ना त्या निमित्ताने झालेल्या (महाराष्ट्र राज्य सोडून मराठी लिहिल्या/बोलल्या/समजल्या जाणार्‍या) जवळजवळ चार राज्यातील प्रवासावर. तिथल्या मराठी साहित्य वाचनप्रेमीशी वेळोवेळी झालेल्या चर्चेतून वा वैचारिक देवाणघेवाणीतून प्रकर्षाने जाणवलेली बाब म्हणजे आज २०१० सालीदेखील ते लोक पु.ल.देशपांडे, व.पु.काळे, रणजीत देसाई, शिवाजी सावंत, सुहास शिरवळकर, बाबा कदम, देवदत्त पाटील ही नावे विसरायला बिलकुल तयार नाहीत. इथे 'लोकप्रियता' निकष लागो वा ना लागो, पण ही नावे अगत्याने आपल्या मुलांना (जी परप्रांतात वाढत आहेत....) माहिती होणे गरजेचे आहे असेच ते मानतात....आणि मला त्यांच्या या भूमिकेत काही गैर आहे असे वाटण्याचे कारण नाही. त्या हायस्कूल पातळीवर शिक्षण घेत असलेल्या परराज्यातील मराठी मुलामुलीना मी 'नेमाडे, कोलटकर, नगरकर, मर्ढेकर, भाऊ पाध्ये, दि.पु.चित्रे...वाचा रे...." असे कदापिही सांगू शकणार नाही. ~ हां.... पुढेमागे त्यांच्यातीलच एखादा प्रगल्भ होऊन साहित्याच्या नवनवीन वाटा धुंडाळू लागला तर त्याला आपली मराठी भाषा साहित्याच्या दृष्टीतून किती पुष्ट आहे हे नक्कीच उमजेल. हा विचार आपल्या मनी ठेवला तर पु.लं.चे मराठी शारदेच्या प्रांतातील स्थान फार महत्वाचे आहे, असे आपण म्हणू या. इन्द्रा

खरं तर हा इंटरेस्टिंग विषय आहे.धाग्याचे शीर्षक आहे, ‘शतकातील २० सर्वोत्कृष्ट मराठी पुस्तके’.पण धाग्यावरील भाष्य ‘शतकातील २० सर्वोत्कृष्ट मराठी पुस्तके लिहिणारे लेखक’ ह्या कलाने वळलेले आहे.धाग्यातील याद्या पाहिल्या तर बनवणाय्रा लोकांनी पुष्कळ वाचलं आहे असं दिसून येतं. त्यात बाबा कदम, चंद्रकांत काकोडकर, गुरुनाथ नाईक ह्यांचा समावेश नाही. तरी सुध्दा मग असे का झाले असावे? धागा 'शतकातील २० सर्वोत्कृष्ट मराठी पुस्तके' ह्या ऎवजी 'शतकातील २० सर्वोत्कृष्ट मराठी लेखक' असा असता तर ,अगदी वीस ऎवजी पाच असा असता तरी त्यात पु.ल. यांचे नाव आले असते ह्यात माझ्या मनात शंका नाही. मग ह्या दोन्ही वेगवेगळ्या निवडीत नक्की कोणता फ़िल्टर काम करतो हे शोधायला पाहिजे.. मला असे वाटते की वाचन एका विशिष्ट पातळीवर आले की वाचक वाचनातून रंजनापेक्षा आणखी काहीतरी जास्त शोधतो. चांगली कल्पनाशक्ती,शैली ह्या गोष्टी गृहीत धरून पुस्तकाकडून आणखी खोल आत्मानुभवाची अपेक्षा करतो .उत्कृष्ट कल्पनाशक्तीची चमक दाखवणारा,शैलीदारपणे सांगितला गेलेला,चांगले रंजनमूल्य असलेला विनोद स्वत: प्रगल्भ असू शकतॊ.पण तो वाचणाय्राला आणखी जास्त प्रगल्भ बनवत नाही हे सत्य आहे. सोप्या भाषेत सांगायचे तर उत्कृष्ट विनोद सुध्दा रंजनापलीकडे जास्त काही देऊ शकत नाही. ही विनोदाची मर्यादाच कदचित वाचकाच्या मनात फ़िल्टरचे काम करत असावी असे मला वाटते.

In reply to by निवांत पोपट

>सोप्या भाषेत सांगायचे तर उत्कृष्ट विनोद सुध्दा रंजनापलीकडे जास्त काही देऊ शकत नाही. ही विनोदाची मर्यादाच कदचित वाचकाच्या मनात फ़िल्टरचे काम करत असावी असे मला वाटते. मला हे फारसं मान्य नाही. जागतिक साहित्यात विनोदामार्फत गहन/सामाजिक/वैचारिक मांडणीची समृध्द परंपरा आहे. एकटा वोल्तेअर किंवा सर्वांतेस सुध्दा हा मुद्दा सिध्द करण्यासाठी पुरेसे आहेत. गोगोल तर कहरच आहे. जॉईसच्या विनोदाची वेगळीच मजा आहे. आणि मार्क ट्वेनचं काय सांगावं? बोहुमिल राबाल (चेक) हा पूर्व युरोपातल्या परंपरेचा पाईक आहे तर मिलन कुंदेरा ती वेगळ्या उंचीवर नेतो आणि खूप गंभीर बनवतो. सॅम्युएल बेकेट आणि रेमाँ कनो (फ्रेंच) शब्दांशी खेळत गंभीर होतात. ग्रॅहॅम ग्रीनचा 'अवर मॅन इन हवाना'ही गंमतीतून गंभीर होत जातो. मार्टिन अ‍ॅमिस, ज्यूलिअन बार्न्स किंवा मुराकामीसारखी नवी पिढी ही परंपरा पुढे नेते. असा विनोद मराठीमध्ये क्वचितच आढळतो. मराठीपुरता विचार केला तर चिं.वि.जोशी/गडकरी आणि मिरासदार/शंकर पाटील मला पु.लं.पेक्षा अधिक प्रतिभावान वाटतात. पुलं हे चिं.वि. आणि गडकर्‍यांच्या परंपरेतले आहेत, पण त्यांहून अधिक उंची गाठतात असं वाटत नाही. एकंदरीत आपण कमीच पडतो असं वाटतं. संपादित प्रतिसाद (भर घातलेला): त्यामुळे माझ्या यादीत चिं.वि. जोशी आणि मिरासदार/पाटील आले (गडकरी कथा-कादंबर्‍यांत बसत नव्हते म्हणून आले नाहीत). जागतिक साहित्यात एक महत्त्वाचा उल्लेख राहिला - शेक्स्पीअर, बोकाशिओचं डेकॅमेरॉन, चॉसरचं कँटरबरी टेल्स आणि अरेबिअन नाईट्स यांनी जपलेला चावट विनोदाचा धागाही मला महत्त्वाचा वाटतो. तसा मराठीत आणणारे एकमेव साहित्यिक म्हणून मी माझ्या यादीत आनंद साधलेही घातलेले आहेत. त्यामुळे पु.लं. वगळणं हा माझ्या बाबतीत तरी रंजक विनोदाचं वावडं असल्यामुळे आहे असं म्हणता येणार नाही.

In reply to by चिंतातुर जंतू

जागतिक साहित्यात एक महत्त्वाचा उल्लेख राहिला - शेक्स्पीअर, बोकाशिओचं डेकॅमेरॉन, चॉसरचं कँटरबरी टेल्स आणि अरेबिअन नाईट्स यांनी जपलेला चावट विनोदाचा धागाही मला महत्त्वाचा वाटतो. तसा मराठीत आणणारे एकमेव साहित्यिक म्हणून मी माझ्या यादीत आनंद साधलेही घातलेले आहेत. मी वैयक्तीकरित्या या विधानाशी असहमत आहे. आनंद साधले यांचे लेखनकौशल्य मला खरे जाणवले ते संस्कॄत साहित्य विश्वातील मेरुमणी मराठीत कादंबरी रुपाने आणले त्यामुळे. संस्कृत साहित्यातील तोच रस तितक्याच सुंदर भावविश्वाची निर्मिती करुन आणि पुन्हा गोष्टी रुपाने सादर करुन सर्व सामान्य वाचकाला संस्कृत साहित्याचा तोच अवीट रस चाखवून देण्याचे काम मला जास्त जिकरीचे वाटते. आनंदध्वजापेक्षा ही मला आनंद साधलेंनी "सोनेरी पान मालिका" च्या रुपाने आपल्यापुढे आणलेल्या संस्कृत कलाकृती जास्त आवडल्या म्हणूनच शकुंतला माझ्या टॉप २० मध्ये आले आहेच. आनंद साधलेंची सोनेरी पान मालिका क्र. मराठी नाव - मूळ संस्कॄत रचयिता - मूळ संस्कृत नाव १. शकुंतला - कालिदास - अभिज्ञान शाकुंतल २. मालविका - कालिदास - मालविकाग्निमित्रम् ३. उर्वशी - कालिदास - विक्रमोर्वशीय ४. कुमारसंभव - कालिदास - कुमारसंभव ५. वासवदत्ता - भास - स्वप्नवासवदत्तम् ६. वसंतसेना - शूद्रक - मृच्छकटिकम् ७. चाणक्य - विशाखादत्त - मुद्राराक्षसम् ८. वैदेही ( बहुतेक भवभूतिच्या उत्तररामचरितम् वर आधारीत आहे ) अर्थात हे माझे वैयक्तीक मत आहे हे स्पष्टपणे नमूद करु इच्छितो. आनंद साधले यांच्या वरीलपैकी कलाकृती तुम्ही वाचल्या आहेत की नाही हे माहिती नाही. पण वाचल्या असतील तरी संस्कृत साहित्यात जर तुम्हाला रस नसेल तर तुमच्या आवडी-निवडी प्रमाणे त्या आवडतीलच असे नाही सांगता येणार. तेव्हा जरी हे माझे वैयक्तीक मत असले तरी आवडत्या लेखकाच्या श्रेष्ठ कलाकृतीबद्दल उल्लेख आला म्हणून राहवले नाही आणि हा प्रतिसाद टंकला. तेव्हा गैरसमज होऊ नये एवढीच विनंती.

In reply to by सागर

याला उत्तर द्यायचं राहून गेलं होतं. साधले ग्रेटच आहेत. सहसा संस्कृतातल्या कलाकृतींचे अनुवादक फारच भोट असतात म्हणून मला त्या मराठीत वाचायला आवडत नाहीत. साधले तसे नाहीत याविषयी खात्री आहे, म्हणून मला त्यांची ही पुस्तकं वाचायची आहेत; पण अजून मिळालेली नाहीत. अवांतर - निरंजन घाट्यांनी काही तुकड्यांचं निरुपण केलेलं वाचलं होतं. ते चांगलं होतं. घाटे भोट नाहीत, पण साधल्यांएवढे ग्रेटही वाटले नाहीत. असो.

In reply to by चिंतातुर जंतू

साधले ग्रेटच आहेत. वरील पुस्तके तुम्ही पुण्यात असाल तर नगर वाचन मंदीरात अथवा पुणे मराठी ग्रंथालयात नक्की मिळतील ही पुस्तके वाचा मग सांगा आनंदध्वजाचा नंबर कितवा ते ;) विशेषतः शकुंतला, मालविका आणि वासवदत्ता तर सुरेख आहेत.

In reply to by सागर

वरील 'सोनेरी पान मालिके'तील श्री.आनंद साधले यांची 'वसंतसेना' आणि 'चाणक्य' ही दोनच पुस्तके मी वाचली आहेत (किंवा असे म्हणतो की, अपघाताने वाचायला मिळाली....दुर्दैवाने जितक्या गांभीर्याने ही दोन्ही पुस्तके वाचली पाहिजे होती तशी माझ्याकडून वाचली गेली नाही हेही इथे कबूल करतो. अर्थात त्याला कारण म्हणजे त्या दोन्ही व्यक्तिरेखेविषयी यापूर्वीच झालेले भरपूर वाचन..!). मात्र अजून यातील एकही संग्रही नाही, तसेच त्यांच्या 'आनंदध्वजाच्या कथा' या पुस्तकाविषयीही तेच. पण आता श्री.सागर यांची ही शिफारस वाचल्यानंतर काहीतरी नक्कीच हरवल्यासारखे वाटू लागले आहे. इन्द्रा

In reply to by इंद्रराज पवार

सोनेरी पान मालिकेत आनंद साधलेंनी संस्कृत साहित्याचे कादंबरी रुपात नुसते रुपांतर नाही केले तर मुख्य म्हणजे संस्कृत साहित्यातील गोडवाही या कादंबर्‍यांतून उतरवला आहे. आणि मला वाटते हेच या सोनेरी पान मालिकेचे बलस्थान आहे. पूर्णपणे समरस होऊन वाचले तर निर्भेळ आनंदाची खात्रीच आहे. :) मिळत असेल तर नक्की वाचा इंद्रराज

In reply to by चिंतातुर जंतू

आपल्या वरील प्रतिसादामध्ये नेमके पी. जी.वूडहाउस यांचे नाव नाही.ते नसण्याचे कारण कळाले तर मला माझे म्हणणे जास्त स्पष्ट करता येईल.बाकी सर्व मतांशी सहमत आहे.तसेच तुमची यादी लेखकांची आहे.आपण नक्की कोणती वीस पुस्तके निवडली असती ह्या बद्दल उत्सुकता आहे.विशेष करून चिं.वि.जोशी यांचे पुस्तक आपल्या यादीत असेल का नसेल ह्या विषयी!

In reply to by चिंतातुर जंतू

आपल्या वरील प्रतिसादामध्ये नेमके पी. जी.वूडहाउस यांचे नाव नाही.ते नसण्याचे कारण कळाले तर मला माझे म्हणणे जास्त स्पष्ट करता येईल.बाकी सर्व मतांशी सहमत आहे.तसेच तुमची यादी लेखकांची आहे.आपण नक्की कोणती वीस पुस्तके निवडली असती ह्या बद्दल उत्सुकता आहे.विशेष करून चिं.वि.जोशी यांचे पुस्तक आपल्या यादीत असेल का नसेल ह्या विषयी!

चांगला धागा. चांगले प्रतिसाद. चांगली चर्चा. प­ण यातील ­एकाही यादीत 'बाराला दहा कमी' किंवा त्यासार­खे वै­ज्ञानिक प्रगतीचा ­इतिहास सांग­णारे पुस्तक का नसावे हे क­ळले नाही. या पुस्तकाला साहित्यीक मूल्य नाही ­असे म्ह­णावे? किंवा ­अ­शा स्वरूपातील वृत्तांकन म्ह­णता ये­ईल ­असे ले­खन या यादीत ­असू ­शकत नाही ­असे म्ह­णावे?

In reply to by श्रावण मोडक

इंद्रा, नुसत्या याद्या मागवणं बर्‍याच वेळा होतं. पण त्याचं इतकं मुद्देसूद मूल्यमापन विरळाच. खरंच आभार. पुलं आवडतात. त्यांचं स्थान वादातीत आहे. पण त्यांची पुस्तकं कालातीत थोर आहेत असं नाही वाटत आता. किंवा माझी निवड बदलत गेली असेल कदाचित. आणि आत्ताची निवडही कायम नाहीच. ती बदलत राहीलच. श्रामो, विज्ञान जरी नाही, तरी माझ्या यादीत साहित्येतर असं 'नाटक एक पडदा तीन घंटा' आहे!

In reply to by श्रावण मोडक

टाकायला बराच उशीर झाला आहे. काही कारणांमुळे खुपच व्यस्त होते त्यामूळे जमलं नाही!!आणि आता चर्चेचा रोख पहाता वेळ निघुन गेली असे दिसते आहे पण 'बाराला दहा कमी' हे पुस्तक माझ्या यादित होतं! रेडिओवर त्याचं वाचन चालू होतं तेव्हाच घेतलं होतं मी!! वैज्ञानिक प्रगतीचा ­इतिहास सांग­णारे हे एकमेव पुस्तक मला आवडले आहे. वाचतांना कुठेही कंटाळवाणे होत नाहि. रंजक आहे पण शेवटाला अंतर्मूख होऊन विचार करायला लावते मात्र्!!!डोक्यातुन कित्येक दिवस गेले नव्हते माझ्या!!

पु.लं. देशपांडे यांचे स्थान माझ्यासाठी जितके वाचले आहे त्यानंतरही सर्वोत्तम आहेच आहे. मला दररोज रोजच्या आयुष्यात जवळजवळ ३/४ वेळा पु.लं भेटतात हे माझ्यापुरतं तरी सत्य आहे. त्यांची व्यक्तीच्या स्वभावाची निरिक्षणे, टिप्पण्या इतक्या वर्षांनीही जशाच्या तशा लागु पडाव्यात ह्यातच सारे काहि आले. अजूनही "रात्र कशाला केली हो फादर" वगैरे तत्सम म्हणारे चिमुरडे दर नाटकाला भेटतात, डुकरीण व तीची पिल्ले अजूनही बघितली की "ती शॉपिंगला निघाली असावी" हेच डोक्यात चमकून जाते, प्रश्नचिन्ह बघितले की त्याचे उत्तर त्या विरामचिन्हातच- त्या खालच्या शुन्यात - दडलेले आहे हेही आठवतं, यस्टीत आपण झागे असताना लोकांना "होय होय होय - नाही नाही नाही" करताना बघून अजूनही खुदकन हसू येतं, "रस्त्यावरची चालतीबोलती प्रेक्षणीय स्थळे" बघण्यात तर उभं नवनारुण्य गेलं आणि कोणतेही रंग, वास नसलेल्या इनर्ट ग्याससारखी चौकोनी कुटुंबे तर आता गल्लीबोळात सापडू लागलेली आहेत. तात्पर्य, काही सवयी,स्थळ,काळ यांच्या संदर्भात बदल जाणवतात पण मागे एकदा नंदन म्हणाला होता तसे "नारायण" दिसो न दिसो एखाद्या बाळमुठीतील काळ्या झालेल्या लाडवाची प्रचीती आजही येते.

माझ्या यादीत मी नाटक, कविता आणि नॉन-फिक्शन लिखाण गाळलं याचं कारण सांगायचं राहून गेलं. नाटक - एकांकिका आणि नाटकांच्या बाबतीत मराठी इतर भारतीय भाषांच्या मानानं खूप अधिक समृध्द आहे असं मला वाटतं. एकट्या गडकर्‍यांच्या नाटकांत एकीकडे हलक्याफुलक्या (पण पुलंच्या आधी) थक्क करून टाकणार्‍या शब्दकळा आणि व्यक्तिवैविध्य तर दुसरीकडे 'एकच प्याला'सारखी गंभीर निर्मिती दिसते. दिवाकरांच्या नाट्यछटा उत्कृष्ट लघुकथांच्या तोडीस तोड आहेत. नंतरच्या तेंडुलकर-एलकुंचवार-आळेकर या दादालोकांना तर डावलताच येत नाही, पण खानोलकरांनीही उत्तम नाटकं लिहून आपली चतुरस्र प्रतिभा दाखवली. शिवाय अच्युत वझे, चं.प्र.देशपांडे, शफाअत खान, मकरंद साठे असे आधुनिकोत्तर लेखकही नाट्यपरंपरा समृध्द करत गेले आणि आताच्या तरुण पिढीतल्या मनस्विनी लता रवींद्रही ते करत आहेत. अशा परिस्थितीत एकाच यादीत नाटक आणि इतर साहित्यप्रकार घेणं म्हणजे कुणाचीतरी गळचेपी होणं स्वाभाविक होतं. कविता - कवितांच्या बाबतीतही मराठीतली समृध्दी थक्क करणारी आहे. गडकरी, केशवसुत, मर्ढेकरांपासून ते पु. शि. रेगे, विंदा, आरती प्रभू, ग्रेस, सदानंद रेगे असं करत करत आपण कोलटकरांपर्यंत पोहोचतो तोवर दमून जातो. शिवाय ढसाळ, सुर्वे आहेतच आणि नव्या पिढीचेही ग्रामीण-नागरी आहेत. म्हणजे पुन्हा एकाच यादीत सगळे माववणं म्हणजे खात्रीशीर अन्याय होणार. ललित आणि इतर नॉन-फिक्शन - यातही विषयांचं वैविध्य आणि आवाका थक्क करून टाकतो. गोडसे भटजींचं 'माझा प्रवास', ताराबाई शिंद्यांचं 'स्त्री-पुरुष तुलना' किंवा लक्ष्मीबाई टिळकांचं 'स्मृतीचित्रे' यांनी जो पाया भरलेला होता, त्यातली व्यक्तिगत अनुभवांची सामाजिक जाणीवांशी घातलेली सांगड नंतर एकीकडे इरावती कर्वे/दुर्गाबाई तर दुसरीकडे दलित लेखकांनी वेगवेगळ्या पध्दतींनी विकसित केली. लक्ष्मणशास्त्री जोशी आणि मे. पुं. रेग्यांनी इतिहासाचार्य राजवाड्यांची वैचारिक परंपरा एका दिशेनं तेवत ठेवली, तर रा.चिं.ढेर्‍यांनी तिला वेगळीच परिमाणं दिली. एकट्या तेंडुलकरांचं स्फुट लेखनही विषयांतल्या वैविध्यानं अचंबित करतं. शिवाय म.वा. धोंडांची समीक्षा, माधव आचवल आणि द. ग. गोडसेंपासून ते प्रभाकर बरवेंपर्यंत विकसित झालेला कलाविचार असे अनेक प्रकार यात येतात. म्हणजे पुन्हा एकदा कथा-कादंबर्‍यांच्या लोकप्रियतेपुढे यांच्यातल्या काहींवर अन्याय होणारच. म्हणून मी तेही विचारातून काढून टाकले. त्यामुळे अशा याद्यांचा कदाचित स्वतंत्र विचार करता येईल. मला स्वतःला तर वरच्या साहित्यप्रकारांतलं मराठीतलं साहित्य हे मराठी कथा-कादंबर्‍यांहून वरचढ ठरेल असं वाटलं! त्यामुळे प्रतिभावान कुटुंबातल्या थोड्या कमजोर माणसाचं कौतुक समंजसपणानं थोडं आधी करावं म्हणून मी फक्त कथा-कादंबर्‍यांचाच विचार वरच्या यादीत केला असंही म्हणता येईल ;-)

पश्चात प्रतिक्रियेवर काहीसे व्यक्तिगत स्वरूपाचे भाष्य ~~~ १. श्री.निवांत पोपट -- ‘शतकातील २० सर्वोत्कृष्ट मराठी पुस्तके’ - खरंय, जरी धाग्याचा हेतू असा असला तरी त्या निमित्ताने का होईना आपल्या चर्चेला 'लेखक' वाटेचे वळण मिळाले. तुम्ही म्हणता तसे आपल्या सदस्यांचे वाचन विपुल तर आहेच पण मी असे निरिक्षण केले की ते समृध्दतेने भरलेले आहे, विविधतेने नटलेले आहे. श्री.सागर सारख्यांनी परप्रांती राहून पुस्तकविश्वात रमणार्‍या सदस्याने 'नाथ माधव, दातारशास्त्री, शशी भागवत' अशा सध्या काहीसे विस्मृतीत गेलेल्या लेखकांना आपल्या यादीत स्थान देणे जितके विलोभनीय वाटते तितकेच मेघना यांच्या यादीतील 'प्रकाश संत, राजीव नाईक आणि मेघना पेठे' ही नव्या दमातील नावे वाचून आपल्या सदस्यांच्या वाचनाचा पल्ला किती विलक्षण असा आहे हे स्पष्ट होते. हे घडले ते लेखकांच्या शैलीचा पाठपुरावा करण्याच्या भूमिकेतून. कुसुमाग्रज, खांडेकर, पु.ल., जी.ए., नेमाडे, पेंडसे, व.पु., दळवी, माडगुळकर, मतकरी, शिरवळकर, विश्वास पाटील आदी तत्सम नावे ही निर्णायक आणि वादातीत असल्याने या नावांचा समावेश ९०% वाचकांच्या यादीत येणारच यांची बालंबाल खात्री असते, जरी यातील एखादेदुसरे नाव हुकले तरी त्या लेखकाला त्या वाचकाच्या कपाटात स्थान नाही असे अजिबात असत नाही. वर खुद्द मेघना यानीच कबुली दिली आहे की, जरी त्यानी वीसच्या यादीत पु.ल.देशपांडे यांचे नाव घेतलेले नसले तरी ते त्यांना निश्चितच आवडतात आणि मला खात्रीही आहेच की पु.ल.पुस्तकांनी त्यांचे घर भरलेले असेलच. तिच गोष्ट रणजित देसाई या नावाची. 'स्वामी ही कादंबरी तुम्ही वाचली आहे का?' या सरळसोट प्रश्नाला १०० पैकी ९९ वाचक डोळे झाकून आपण हात वर करू शकतील, इतकी त्या कलाकृतीची लोकप्रियता आणि महानता आहे. असे असूनही तिला आपल्याच नव्हे तर राज्य पातळीवर घेतलेल्या सर्वेक्षणात स्थान मिळालेले नाही. का व्हावे असे? "अतिपरिचयाते अवज्ञा"? 'मृत्युंजय' देखील त्याच पंक्तीतील. 'फिल्टर' चा उल्लेख श्री.निपो यानी केला ते छान झाले. जसजसे वाचनाचे क्षितिज रुंदावते तसतसे असा फिल्टर नैसर्गिकरित्या आपल्या चवीरवीत प्रकटतो. उदा.जी.ए.कुलकर्णी. एकदा का या लेखकाच्या कथेच्या डोहकाळीम्यात आपण उतरलो की तिथून [सहीसलामत] बाहेर पडणे केवळ अशक्य, इतकी त्याच्या लेखणीची करामत आहे. त्यांच्या कथाविश्वातील प्रत्येक व्यक्तीशी आपले अगदी अपरिहार्यरित्या नाते जुळत जाते....आणि यातील एकही पारंपारिक अर्थाने सुखी पात्र नाही....आहेत ते सर्व दु:खाच्या कड्यांनी गच्च बांधलेली तरीही जीवनाचा मोह न सुटणारी....हतबलतेने गिचमिड का होईना आयुष्य जगणारी, थकलेली, कुजलेली, किडलेली....त्यांच्या कर्माच्या आणि नियतीच्या दाहकतेने वाचकही शिणून जातो, म्हणून तो त्यांना सोडूनही जावू शकत नाही. ही नेणिवेची पातळी आपल्यात निर्माण करणारा जी.ए. हा लेखक एकदा का आपला झाला (आणि तो होतोच होतो...) की आपल्या मनातील 'फिल्टर' काम करायला सुरू करतो मग नकळत अन्य कथाकाराच्या सामर्थ्याशी फिल्टरिंग सुरू होते...हा म्हटले तर बाकीच्या दमदार कसाच्या कथाकारांवर एक प्रकारे अन्यायच. [मी ही चूक केली होती....विशेषतः आनंद विनायक जातेगावकर, ए.वि.जोशी, भारत सासणे आणि गौरी देशपांडे यांच्या क्षमतेबाबत....जी नंतर सुधारून घेतली.] 'रंजन' मुद्दाही श्री.निपो यानी उचलला आहे. फडके, बाबा कदम, कर्णिक, मंत्री, व.पु., काकोडकर, देवदत्त पाटील, बोधे, बुवा, सावकार, मिरासदार, या आणि या पठडीतील लेखकांनी तोच हेतू मनी ठेवून लेखन केले असल्याने वाचकांनी त्याना स्वीकारले हे तर त्यांच्या अगणित पुस्तकांच्या यादीवरून स्पष्टच आहे (अधिक दिवाळी अंकात हुकमी रतीब टाकणारे तर आहेतच). पण दर्दी वाचकाला पुढेपुढे 'रंजना' च्या पातळीवरून पुढे सरकायचे असते आणि त्याने ती दिशा पकडणे ही त्याच्या प्रगल्भतेची खूणच मानली पाहिजे. सामाजिक आणि तात्विक जाणीवेतून निर्माण होणारी मानसिक गरज केवळ "त्याने तिला पाहिले, ती मोहरली, लाजली, गालावर रक्तीमा पसरला...प्रेम जुळले...मध्ये एक काकोबा नावाचा खलनायक आला...नदी थोडी थांबली...पण प्रेमाने त्यानी दुसरा किनारा गाठला...इती साठा उत्तराची कहाणी सफल झाली...." इ. इ. ~ या पट्टीतील वाचनाचे एक वय असते....तो टप्पा प्रत्येकाच्या आयुष्यात येतोच येतो, पण तिथेच अडकून राहणे म्हणजे आपल्यातील वाचकाला मारण्यासारखे आहे. जाणीवेची जबरदस्त मूलगामी शक्ती वाचकाला 'आणखीन काय? आणखीन काय?" ही टोचणी लावत असते...आणि तीतूनच फुलते एक असे व्यासपीठ की जिथे त्याला 'आता मी काय आणि किती वाचू?' असा लोभस प्रश्न पडतो. त्यासाठी 'पुस्तकविश्व' सारख्या ठिकाणी सदस्या एखाद्या लेखकावर विस्ताराने चर्चा करीत आहेत असे दिसले तर ते पान तो वाचक एक दिशादिग्दर्शक म्हणून उपयोगात आणेल हे नक्की. २. श्री.सागर -- एखाद्या काव्यसंग्रहाचा तुमच्या यादीत समावेश नसणे म्हणजे तुम्हाला साहित्यातील तो प्रकार आवडत नाही असे बिलकुल होत नाही (मराठी नाटकाचा उल्लेख झालेला नाही....याचा अर्थ मराठी वाचकाला नाट्यप्रकार पुस्तकरुपापेक्षा मंच स्वरूपात जास्त आवडतो असाही होऊ शकतो). उपप्रतिसादात तुम्ही सुरेश भटांचा उल्लेख केलेला आहेच. मला मर्ढेकरांची आणि ग्रेस यांची जबरदस्त मोहिनी आहे....तितकीच इंदिरा संत, कोलटकर आणि ढसाळ यांचीही आहेच आहे, पण स्थानभयास्तव एकाच साहित्य प्रकाराची आपण सर्वोत्कृष्ट मध्ये उल्लेख करू शकत नाहे, इतपतच. ३. श्री.श्रावण मोडक -- छानच आहे तुमचे निरिक्षण आणि तीवरील टिपणी. मनोरंजन आणि माहिती या दोन्ही दृष्टीने इंग्लिश वाङ्मयात विज्ञान विषय अतिशय समर्थपणे हाताळल्याचे आणि तेथील वाचकाने भरभरून त्याचे स्वागत केल्याचे तिथला इतिहास सांगतो, तितका तो प्रकार आपल्याकडे रूळला नसल्याचे (ललित नजरेने) कबूल करावे लागेल. जयंत नारळीकरांच्या 'यक्षाची देणगी' चे कितीही स्वागत झाले तरी त्याची ११०० ची आवृत्ती संपायला सोळा वर्षे लागतात हे उदासिनतेचे लक्षण आहे. नारायण धारपानी गूढकथेला विज्ञानाची रोचक दृष्टी देवून 'टेलीपथी, टेलीकायनेसीस, टेलीकम्युनिकेशन' आदी वैज्ञानिक संकल्पनांचे विश्लेषण करून त्या कथास्वरूपात गुंतवून वाचकाला जरी खिळवून ठेवले तरी प्रत्याक्षात १० पैकी ९ वाचकांनी धारपाना "गूढकथाकार' म्हणूनच स्वीकारले. 'ऐसी रत्ने मिळवीन...' ही तर पूर्ण आकाराची एक खास नारायण धारप कादंबरी, जिचे पान अन् पान स्टीव्हन स्पिएलबर्गच्या विज्ञान विषयावरील चित्रपटांची आठवण करून देते इतकी ती वैज्ञानिक कल्पनेने भरली आणि भारलेली आहे. पण त्यात 'अशोक समर्थ' हा धारप-नायक नसल्याने इतकी सुंदर कादंबरी इथे तग धरू शकली नाही. ही एक प्रकारे विज्ञानकथांची वंचनाच आहे. तरीही तुम्ही म्हणता तसे साहित्य फुटकळ स्वरूपात का होईना प्रकाशित होत असते ही त्यातल्या त्यात समाधानाची बाब. ४. श्रीमती मेघना भुस्कुटॅ -- तुमच्या यादीतील साहित्येतर असं 'नाटक एक पडदा तीन घंटा' याबद्दल मला आता नक्कीच उत्सुकता निर्माण झाली आहे, कारण हे नाव मी प्रथमच वाचले. तुम्ही इथे वा स्वतंत्रपणे यावर काही लिहिले असेल तर जरूर कळवा. मी अवश्य वाचून तीवर प्रतिक्रिया देतो. "पुलं आवडतात. त्यांचं स्थान वादातीत आहे. पण त्यांची पुस्तकं कालातीत थोर आहेत असं नाही वाटत आता...." अशी ही तुमची कबुली हेच दर्शविते की पुस्तके कालातीत नसतीलही (जे आपण डोस्टोव्हस्की, जॉईस, हेमिंग्वे, फॉकनर, स्टाईनबेक, काफ्का आदी पाश्चात कलाकृतीबद्दल तसेच कालिदास, भवभूती, तुकाराम, प्रेमचंद, रविन्द्रनाथ टागोर, मैथिलीशरण, अमृता प्रितम, भैराप्पा, शंकर, केशवसूत, मर्ढेकर आदी प्राचीन व अर्वाचिन भारतीय साहित्यिकांच्या कलाकृतीबद्दल निर्विवादपणे म्हणू शकतो) पण म्हणून त्या नावाला आपल्या हृदयात स्थान नाही असे कदापिही होणार नाही, इतके प्रेम महाराष्ट्राने त्या व्यक्तिमत्वावर केले आहे आणि करीत राहिल. ५. श्री.ऋषिकेश -- तुमचे पु.लं.वरील सुंदर भाष्य तर हजारो मराठी मनाचा आरसाच आहे. यातील शब्दनशब्द माझ्याच बोटातून इथे उतरला आहे की काय अशी खुद्द मलाच शंका आली, ही बाब त्यांच्यावरील प्रेमाचे प्रतीक मानावी लागेल. "मला पु.ल. आवडत नाहीत...' असे म्हणणार्‍या व्यक्तीनेदेखील पु.ल. वाचलेले असतातच. हे भाग्य कित्येक लेखकांना लाभलेले नाही. ना.सी.फ़डके, खांडेकर, कर्णिक, गाडगीळ, नेमाडे न वाचतादेखील 'ते आम्हाला आवडत नाहीत' असे बिनदिक्कत म्हणणार्‍याची संख्याही काही कमी नाही. आचार्य अत्रे यांच्या साहित्यावर प्रेम करणारे जितके आहेत तितकेच त्यांच्या राजकारणावर शिव्यांची लाखोली वाहणारेही होतेच. पण पु,लं.च्या बाबतीत फक्त प्रेम आणि प्रेमच करणारे आपल्याला भेटत राहतील. तो 'बाळमुठीतील काळा पडलेला लाडू' हेच दर्शवितो की प्रत्येक कुटुंबाला वाटत असते की आपल्याही मुलीच्या लग्नात असा एक 'नारायण' मांडवात असावा. ~ वेल, आनंद वाटत आहे मला हे सर्व लिहिताना....याला कारण म्हणजे इथल्या सदस्यांच्या पुस्तकांच्याबाबतीतील आविष्कारांत अनेक गोष्टींना वाव आहे आणि तरीही त्या आवडीनिवडीतील काव्यात्मतेबद्दल जेव्हा आपण खुलेपणाने चर्चा करत असतो तेव्हा जाणवते की साहित्य हाच खरा आपल्या संस्कृतीचा गाभा होऊ शकतो....ज्याबद्दल लिहिताना मनाला जो कल्पनातीत आणि विशुद्ध आनंद मिळत राहतो त्याची तुलना झर्‍याच्या मुखाशी असणार्‍या निर्मळ पाण्याशीच होऊ शकते. धन्यवाद !! इन्द्रा

In reply to by इंद्रराज पवार

पण स्थानभयास्तव एकाच साहित्य प्रकाराची आपण सर्वोत्कृष्ट मध्ये उल्लेख करू शकत नाहे, इतपतच. असेच म्हणतो इंद्रराज. नाटक प्रकाराबद्दलही असेच म्हणतो. तसा मला नाटक हा प्रकार वाचायला जास्त आवडत नाही. पण बघायला आवडते. कविता मात्र नक्की वाचतो. कविता थोडीफार कळते पण. त्यामुळे जास्त मजा येते. सुरेश भटांच्या कविता आवडण्याचे कारण त्यांच्या कवितांतून वेदना स्पष्टपणे तर जाणवतेच पण हृदयातही घर करते. यामुळे कविता वाचक अंतर्मुख होऊन विचार करतोच करतो. असे लेखन बाकी कवी करत नाहीत असे म्हणण्याचे धाडस मी करणार नाही. पण प्रत्येकाची कवितेकडे पाहण्याची दॄष्टी वेगळीच असते. मला ज्या अर्थाने कविता कळाली त्याच अर्थाने ती कविता दुसर्‍याला कळेल असे होत नाही. याला वैयक्तीक अनुभव पण काही प्रमाणात जबाबदार असतात. कारण कवितेचे नाते जास्त भावनिक असते. रहस्यकथांमधला थरार कवितेत अनुभवता नाही येत. ती नशाच वेगळी असते. मला बोरकर, मर्ढेकर आणि कुसुमाग्रज जास्त भावतात. पण अलिकडे बोरकर सोडले तर यांच्या कवितांचे वाचन जवळजवळ नाहीच. :( जरी आज कविता हा कथा-कादंबरी-चरित्रे यांच्या तुलनेत जरा दुर्लक्षित प्रकार असला तरी रसमाधुर्याच्या दॄष्टीकोनातून कविता जास्त मनाला भावते. एखादी आवडीची कविता मुखोद्गत होते. अर्थात हे सर्व साहित्यप्रकार आहेत. ज्याला ज्या साहित्यप्रकारांत गोडी असते त्यात त्याचे वाचनविश्व समृद्ध होत असते. :)

[श्री.चिंतातुर जंतू यांचा वरील एक प्रदीर्घ प्रतिसाद इथे प्रकट होत असताना मी स्वतः पाच सदस्यांच्या विविध रंगी मतांचे विश्लेषण करीत असल्याने पाच-सात मिनिटांच्या अंतराने आलेल्या चिंजं यांच्या प्रतिसादाचा त्याचवेळी विचार करू शकलो नव्हतो. ते काम आता करीत आहे.] जसे आपण वारंवार म्हणत आलो आहोत की, कोणत्याही कलाकृतीचे शतकी अवलोकन करत असताना संख्यबाबत एक निश्चित अशी (जी अन्यायकारक असू शकते...) एक मर्यादा घालून घेणे क्रमप्राप्त असते. त्याशिवाय जसे यादीतील निवडीचे निकष (स्वतःला आणि दुसर्‍यालाही) तपासता येत नाही, तद्वतच एखाद्या प्रसंगी एका साहित्यप्रकाराकडे दुर्लक्ष होऊ शकते...नव्हे होतेच. नाटकाप्रमाणेच मला टीकात्मक लेखनाकडेही आपले लक्ष गेले नाही हे जाणवले. रा.भा.पाटणकरांचे "सौंदर्यमीमांसा" असो वा नरहर कुरुंदकरांचे "धार आणि काठ" असो, या प्रांतातील हे गजराज आहेत. तरीदेखील ते वीसच्याच काय पण शंभरच्या यादीत येत नाहीत. त्याला कारण म्हणजे अशा पुस्तकांचे रंजनमूल्य कमी असते (जी सर्वसामान्य वाचकासाठी प्राथमिक गरज असते) तसेच केवळ 'अभ्यासकां'साठी त्यांची निर्मिती असेच सादरीकरण असल्याने मोठी शहरे वगळता अशा पुस्तकांना छोटी शहरे आणि तालुका पातळीवरील दुकानात जवळपास स्थान नसतेही. शिवाय प्रकाशकदेखील धंद्याची बाब प्राधान्याने पाहात असल्याने दुसरी आवृत्ती निघणेही दुरापास्त. आज या घडीलाही अगदी पुण्यात अमुक एका दुकानात 'सौंदर्यमीमांसा', 'धार आणि काठ' उपलब्ध आहेत असे कुणी सांगितले तर माझा चटकन विश्वास बसणार नाही. मराठी नाटक+एकांकिकेच्या समृध्दीबद्दल श्री.चिंजं म्हणतात त्यातील अक्षरनंअक्षर खरे आहे, इतक्या विविधतेने मराठी नाटकाचा संसार वैभवी थाटाने दुमदुमला आहे. गडकर्‍यांच्याबद्दल तर त्यानी लिहिले आहेच पण आचार्य अत्रे यानी प्रेक्षकाला तसेच वाचकाला पौराणिक, ऐतिहासिक, बालगंधर्व युग आणि देवल, खाडीलकर, कोल्हटकर आदीच्या पाचपाच सहासहा ताशी नाटविश्वातून बाहेर काढून अडीचतीन तासात नाट्यसंसाराची जी धमाल मांडणी करून, केवळ भाषेच्या जोरावर नाटकासाठी प्रेक्षकांना नाट्यगृहाकडे खेचण्याचे जे अजोड काम केले ते अगदी ऐतिहासिकच मानावे लागेल. ''अत्रे नाट्यसंसार' पुस्तकांच्या जोरावर एक प्रकाशन संस्था समर्थपणे चालते हे नाही म्हटले तरी आजही आश्चर्याची बाब मानली पाहिजे. अत्र्यांच्यानंतर आलेल्या शिरवाडकर, कानेटकर, दळवी, नवरे, मतकरी, तेंडुलकर, आळेकर, एलकुंचवार, खरे यांचे योगदानही तितकेच महत्वाचे, आणि त्यामुळेच पुस्तकरुपात आलेले हे साहित्य जरी आपल्या घर ग्रंथालयात जागा करू शकले नसले तरी आपण त्याना बाजूला करूच शकत नाही. पण होते असे की, आवड नावाचा घटक आपल्याला सर्वप्रथम कादंबरी, कथालेखन, कविता इकडे घेऊन जातो व तेच प्रकार सर्व जागा खात असल्याने अन्य घटकांवर कळतनकळत अन्याय होत जातो. कथालेखनातही नवकथाकारांच्या मैफिलीत मानाचे ताट ज्यांच्याकडे जाते ते गंगाधर गाडगीळ, अरविंद गोखले, पु.भा.भावे, शांताराम, दि.बा.मोकाशी, कमल देसाई, विजया राजाध्यक्ष ही नावे हुकतातच. आपणही इथे प्रतिसादात तुरळक अपवाद वगळता 'जी.ए.कुलकर्णी' याच नावाला 'कथा' वाङ्मय प्रकारात स्थान देतो. काल रात्री श्री.दा.पानवलकर यांच्यावर इथे एक स्वतंत्र लेख लिहिण्याच्या निमित्ताने त्यांच्या काही कथा (नव्याने) वाचत असताना अंग थरारून उठले होते. किती जबरदस्त ताकदीचा हा लेखक ! 'जांभूळ' सारखी एक कविताच जणू अशी कथा लिहिणारे श्री.दा. 'कमाई' सारखी विलक्षण ताकदीची, झोपडपट्टी जीवनातील एका प्रसंगाची कथा लिहितात ज्यातील अनुभवाचा अस्सल पोत वाचकाला केवळ असह्य होतो.....तीच गोष्ट ह.मो.मराठे यांच्या 'पक्षिणी' कथेची तर तसेच विजयाताईंच्या 'कमळ' बद्दल. किती लिहावे, आणि काय लिहावे यावर वाचक सुन्न होऊन जातो....पण परत तोच प्रश्न....निवडीचा संकोच ! समीक्षा असो, सामाजिक जाणीवांच्या लेखनाची कुळी असो, प्रवासवर्णन असो वा आत्मचरित्रे...या अनेकविध कंगोर्‍यानी मराठी शारदेचे प्रांगण फुललेले आहे. मराठी साहित्याचे हे जग विस्मयीन भरलेले आहे आणि इलेक्ट्रॉनिक मिडियाच्या हल्ल्यापूर्वी हरदिनी ते वाचकाल मोहित करत होते. अनेकविध संस्कारातून 'नेमके काय उचलावे' या लाडीक संभ्रमात आपला वाचक पडला होता. आज जरी असे धार्ष्ट्याने म्हणता येणार नसले (कारण इडियट बॉक्सने घेतलेली रंजनाची जागा...) तरीदेखील अशा चर्चेच्या माध्यमातून आपण, प्रसंगी वादविवादाने का होईना, वाचनाची ही निर्मळ ज्योत तेवत ठेवत आहोत, हेही नसे थोडके ! इन्द्रा

In reply to by मेघना भुस्कुटे

मेघना इंद्रराज लिहितीलच त्यांचा दृष्टीकोन. पण इंद्रराज यांच्या यादीतले हे स्वातंत्र्यवीर सावरकरांचे नितांत सुंदर पुस्तक आहे येथून संपूर्ण पुस्तक उतरवून घेता येईल

In reply to by मेघना भुस्कुटे

"...तत्काळ उतरवून घेतले..." ग्रेट ! सावरकरांच्या भाषेची किरणे इतकी लखलखीत आहेत की ती पेलताना संवेदना थिजते....न्हावूणच निघतो त्या विलक्षण अशा शब्दभांडारात. कधीतरी समग्र 'कवि' सावरकरही पठण करा...!! काय बिजलीसम प्रतिभा देवाने या व्यक्तीच्या नसानसात रुजविली होती....केवळ दैवी चमत्कार होता सावरकरांच्या भाषेचे वैभव. त्यातील अगदी एक टक्का जरी आपल्या बोटात उतरले तरी भाषा-जीवन सफल झाले असे मी म्हणेन. इन्द्रा

In reply to by इंद्रराज पवार

कवने रचण्यात सावरकर अगदी पारंगत होते. मुख्य म्हणजे मोठमोठी कवने रचूनही ती त्यांना मुखोद्गत होती. भगूर हे सावरकरांचे जन्मगाव. येथील बालपणापासूनच सावरकरांनी ओव्या, कवने रचायला सुरुवात केली. ते पुढे त्यात सावरकरांनी प्रचंड निर्मिती केली होती... सावरकर कविता विचारांनी प्रेरीत करणार्‍या आहेत. काव्य प्रकारात गती असेल तर नक्की वाचले पाहिजे असे आहे. :)

उपक्रम आणि चर्चा. माझ्या दृष्टीने सर्वोत्कृष्ट वीस पुस्तकांची यादी काही फार निराळी नाही. फक्त मर्ढेकरांच्या कविता,समग्र बोरकर, विशाखा यांचा यात समावेश करेन. बाकी अशा यादीत नॉन फिक्शन पुस्तकांची संख्या वाढावी, असं मनापासून वाटतं. जॅरेड डायमंड, डॉकिन्स, फ्रीडमन यांच्यासारखे वेगवेगळ्या क्षेत्रांतले लोक सोप्या, रंजक भाषेत लिहू लागले (किमानपक्षी अनुवाद होऊन ते वाचले गेले), तर फारच उत्तम. किमया, वर श्रामोंनी म्हटल्याप्रमाणे 'बाराला दहा कमी' किंवा कमीअधिक फरकाने युनिक फीचर्सची 'अर्धी मुंबई'सारखी पुस्तकं, टिकेकरांचं स्थलकाल, लोकमान्य ते महात्मा ही काही ठळक उदाहरणं.

श्री.नंदन यानी या निमित्ताने Non-fiction चा महत्वाचा मुद्दा छेडला ते चांगले झाले. होते असे की, ज्यावेळी सार्वजनिक पातळीवर एखादी संस्था [उदा.आकाशवाणी], एखादे प्रकाशनगृह [उदा.टाईम्स ग्रुप] वा आपल्यासारखे कोणत्याही भाषेतील संस्थळ 'सर्वोत्कृष्ट' चा विषय पटलावर मांडते त्यावेळी तो तो वाचकवर्ग प्रथम फिक्शनकडेच वळतो. याला त्याची मानसिकता जितकी कारणीभूत आहे तितकीच अशाप्रकारचे सर्वेक्षण करणारी संघटनादेखील. कारण कुठेही "केवळ कथा कादंबर्‍यांचा विचार करू नये...' अशा स्वरूपाचे निशाण त्यांच्या आवाहनात नसतेच. फक्त '२०, ५०, १०० पुस्तके निवडा.." बस्स. कदाचित मराठीप्रेमींचेही नॉन-फिक्शनकडे जितके जायला पाहिजे तितके लक्ष जात नसेल, हादेखील एक विचार करण्यासारखा मुद्दा होऊ शकतो, अशा सर्वेक्षणाच्याबाबतीत. 'बीबीसी' वेळोवेळी असे प्रयोग राबविते आणि त्यामुळेच मला कळाले की, गेल्या शतकातील सर्वोत्कृष्ट 'नॉन-फिक्शन' मध्ये जॉर्ज ऑर्वेलच्या Collected Essays चा समावेश आहे आणि त्यातील भाषेचे बहुविधी रंग पाहून ऑर्वेलला इंग्लिशभाषिक एका कादंबरीकारापेक्षा निबंधकार म्हणून डोक्यावर का घेतो. तिच गोष्ट स्टॅलिन राजवटीचे कंगोरे सटिक उलगडून दाखविणारे रॉबर्ट कॉन्क्वेस्टचे 'द ग्रेट टेरर'. थरारक कादंबरीच वाचत आहोत की काय असा भास होतो. विसाव्या शतकातील इंग्लिश कवितेची वाटचाल दर्शविणारी आणि तीवर अचूक भाष्य करणारी रॅन्डॉल जॅरेलची 'पोएट्री अँड एज' ची सफरही अशीच वेड लावणारी. माझ्या अभ्यासाचा विषय म्हणून मला हे पुस्तक आवडले तर त्यात नवल नाही, पण ज्यावेळी विज्ञान शाखेत आणि वैद्यकिय शाखेत पदव्युत्तर शिक्षण घेतलेले लोक या पुस्तकावर भरभरून बोलताना, लिहिताना, मते मांडताना, मांडलेल्या मतांना स्वीकारतना वा त्याचे खंडन करताना मी पाहिले त्यावेळी कळून चुकले की 'साहित्य' ही एका विशिष्ट शाखेची कदापिही मक्तेदारी होऊ शकत नाही....कविता तर नाहीच नाही. नॉन-फिक्शनचे मोल आहे ते या मुळेच. एरवी विन्स्टन चर्चिल त्यांच्या जगप्रसिद्ध 'भारतविरोधी' भूमिकेमुळे इथे कितीही अप्रिय असले तरीही पॅनेलने त्यांच्या The Second World War या ६ भागातील ग्रंथराजाला प्रथम क्रमांकाने गौरविले होते ते सार्थच होते याबद्द्ल दुमत होऊ शकत नाही. यातील Closing the Ring हा एकमेव व्हॉल्यूम जेएनयू दिल्ली इथे हाताळायला मिळाला होता [वाचायला नव्हे....] तो हाती घेतल्यानंतरच लक्षात आले की भाषेचे मैदान जबरदस्त आहे. केवळ वेळ आणि स्वास्थ्यच हवे त्याची सफर करायला. मराठीतही, नंदन यानी उल्लेख केल्यानुसार, कथा कादंबरींचा प्रांत सोडून अन्य वीस पुस्तके काढ्ण्याची कल्पना राबविल्यास मी तीत बाबा आमटे, अनिल अवचट यांची जवळपास सर्वच पुस्तके, रा.भा.पाटणकरांचे 'सौंदर्यमीमांसा", आढावांचे 'एक गाव एक पाणवठा', आचार्य अत्रे यांचे 'मी कसा झालो' अशी आणि या पठडीतील कैक पुस्तकांचा त्यांच्या त्या त्या क्षेत्रातील महतेमुळे समावेश करेन. शेवटी, विविधतमुळे साहित्याचे 'रंजनमूल्या'हून अधिक उपयोग आहेत हे सत्य नाकारता येणार नाही. इन्द्रा