Submitted by प्रभाकर नानावटी on
सागर

प्रभाकरजी,

आज तर तुम्ही ज्या व्यक्तीच्या पुस्तकाची ओळख करुन दिली ती व्यक्ती विज्ञान आणि खगोलशास्त्र विषयांतील केवळ तज्ञ शास्त्रज्ञच नव्हे तर समस्त मराठी लोकांना अभिमान वाटावा अशीच आदरणीय आणि गुरुतुल्य व्यक्ती आहे.
माझ्या संग्रहात नारळीकरांची बहुतेक सर्व पुस्तके आहेत.

याला जीवन ऐसे नाव हे पुस्तक वाचताना हेच नाव किती समर्पक आहे याची प्रचिती येते. नारळीकरांची ही अजून एक खासियत आहे की त्यांच्या प्रत्येक लेखनाला अगदी योग्य आणि समर्पक नाव ते देतात. मग ती छोटीशी कथा असो, कथासंग्रह असो, वैज्ञानिक माहितीपर लेख असो, त्यावरिल पुस्तक असो वा मग ती कादंबरीतील प्रत्येक प्रकरण असो. नारळीकरांच्या प्रत्येक लेखनातून त्यांची विद्वत्ता नुसतीच झळकते. एवढेच नाही तर एवढी बुद्धीमान व्यक्ती अतिशय विनम्र आणि आयुष्यात विनोदाचे महत्त्व जाणणारी देखील आहे हेही समजून येते.

समस्त विज्ञान जगतास आदरणीय असणार्‍या डॉ. जयंत नारळीकर यांच्या या नितांत सुंदर पुस्तकाचा तितकाच नितांत सुंदर परिचय करुन दिल्याबद्दल धन्यवाद :)

Mon, 29/11/2010 - 11:38 Permalink
सागर

नानावटींच्या सोमवारच्या पुस्तक परिचयाला यावेळी प्रतिसाद दिसले नाही याचे आश्चर्य वाटले आहे.
खाली राहिल्यामुळे कदाचित हा धागा नजरचुकीने सुटला असावा या अपेक्षेने पुन्हा हा वर आणत आहे :)

जयंत नारळीकरांचे हे सुंदर पुस्तक नक्की वाचावे असेच आहे

Tue, 30/11/2010 - 19:22 Permalink
मेघना भुस्कुटे

पाश्चात्य देशातील समृद्धीसाठी आधुनिक विज्ञान व तंत्रज्ञानाचा फार मोठा हातभार लागला आहे. त्या देशातील समाजाला वैज्ञानिक विषयांची आवड निर्माण करण्यात वैज्ञानिक विषयावरील पुस्तकांचा फार मोठा सहभाग आहे. परंतु आपल्या देशात मात्र अशा पुस्तकांची उणीव भासत आहे. आपल्या संशोधनातून वेळात वेळ काढून मराठी वाचकांसाठी नारळीकर जाणीवपूर्वक प्रयत्न करत असतात. त्यांच्या या प्रयत्नांना प्रतिसाद देणे गरजेचे आहे.
खरंय.
ते कितीतरी काळ एकटेच किल्ला लढवताहेत.

Tue, 30/11/2010 - 19:34 Permalink
सागर

In reply to by मेघना भुस्कुटे

काही नावे नक्की घेता येतील ज्यांनी विज्ञानाची जनसामान्यांना पुस्तक रुपाने छान ओळख करुन दिली आहे.
पण नारळीकर या सर्वांचे अध्वर्यू आहेत हे वादातीत.

जसे अलिकडच्या काळातील ,
प्रा. मोहन आपटे
निरंजन घाटे
सुधाकर भालेराव
बाळ फोंडके
हेमंत मोने
अच्युत गोडबोले
जगदीश काबरे
लक्ष्मण लोंढे
माधुरी शानबाग

थोड्या जुन्या काळातील
शं.बा. दिक्षित - ज्योतिर्विलास ग्रंथाचे कर्ते
बाळशास्त्री जांभेकर (यांनी अनेक विदेशी तार्‍यांना भारतीय नावे दिली)
महादेवशास्त्री जोशी - नक्षत्रलोक पुस्तकाचे लेखक

विदेशी लेखकांच्या तुलनेत ही संख्या नक्कीच खूप कमी आहे. पण सुरुवात आहे

आणि अलिकडेच जयंत नारळीकर यांनी त्यांच्या पत्नी सौ. मंगला नारळीकर यांच्याबरोबरच एका नवीन नावाबरोबर 'अजित केंभावी' यांच्याबरोबर "नभात हसरे तारे" हे सुंदर पुस्तक लिहिले आहे. या पुस्तकावरुन नारळीकर त्यांचा वारसा पुढच्या पिढीकडे सोपवत आहेत असेही दिसते आहे.

जयंत नारळीकरांना प्रतिसाद देणे अतिशय आवश्यक आहे या मताशी अगदी सहमत :)

Tue, 30/11/2010 - 20:05 Permalink
सागर

In reply to by मेघना भुस्कुटे

सुबोध जावडेकर राहिलेत माझ्या यादीत. अर्थात अजूनही असू शकतील. मला जशी आठवली तशी लिहिली होती.

खरेतर भा.रा. भागवत हे बाल-कुमार वाङ्मयाचे लेखक, पण त्यांनी देखील ज्यूल्स व्हर्न ची संपूर्ण वैज्ञानिक कथांची पुस्तक मालिका मराठीत आणून विज्ञानसाहित्याची एक प्रकारची सेवाच केली आहे असे म्हणता येईल.
जवळपास २० पुस्तके आहेत त्या संचात

तसे अलिकडचे उर्जेच्या शोधात - प्रियदर्शनी कर्वे आणि नांगरल्याविण भूई - नंदा खरे या दोन पुस्तकांच्या लेखिका आहेतच पण जास्त ग्रंथसंपदा निर्माण करणारे वैज्ञानिक लेखक सध्या तरी कमीच आहेत असे चित्र आहे खरे.

या दुव्यावरून मराठीतील वैज्ञानिक पुस्तकांची पीडीएफ स्वरुपातील यादी उतरवून घेता येईल

Wed, 01/12/2010 - 14:38 Permalink
रैना

सागर- एक छोटीशी दुरुस्ती
नंदा खरे या दोन पुस्तकांच्या लेखिका आहेतच .>> ते लेखक आहेत. :-)
त्यांची काही पुस्तके:
कहाणी मानवप्राण्याची
नांगरल्यावीण भुई
दगडावर दगड वीटेवर वीट
जीवोत्पत्ती आणि नंतर
अंताजीची बखर.

प्रभाकरजी,
धन्यवाद. परिचय आवडला.

Wed, 01/12/2010 - 17:34 Permalink
सागर

In reply to by रैना

नंदा खरे यांचे नांगरल्याविण भुई नानावटींमुळेच घेतले आहे.
पण अजून वाचले नाहीये त्यामुळे लेखकाच्या नावावरुन तर्क लावला की स्त्री लेखिका असावी. :)
चुकीच्या दुरुस्तीबद्दल धन्यवाद रैना.

नांगरल्याविण भुई वाचून झाले की तुम्ही दिलेली बाकीची पुस्तके देखील निशाण्यावर येतीलच माझ्या ;)

तूर्तास थांकू थांकू

Thu, 02/12/2010 - 15:19 Permalink

चित्रपट वा वैज्ञानिक कादंबर्‍यांमध्ये चित्रित केल्याप्रमाणे वैज्ञानिक म्हणजे अगदीच जगावेगळा, विक्षिप्त , चक्रम, माणूसघाणा, मनुष्यप्राणी आहे, असे (उगीचच!) आपल्याला वाटत असते. तोसुद्धा तुमच्या आमच्यासारखा हाडा-मांसाचा, दैनंदिन व्यवहारात चटके खाणारा, मुला-बाळात रमणारा असतो, हे शपथेपूर्वक सांगितले तरी अनेकांचा विश्वास बसणार नाही. तरीही तो स्वत: निवडलेल्या विषयाचा सखोल चिंतन, मनन, प्रयोग करणारा असतो. आपल्या सुख सोईत, आपल्यासारख्यांच्या ज्ञानात भर घालत असतो व आपल्या तंद्रीत जगत असतो. (येथे सोईसाठी म्हणून पुल्लिंगी शब्दप्रयोग केला असून स्त्रीवैज्ञानिकांच्या बाबतीतही या गोष्टी तितक्याच खरे आहेत.) या सर्व गोष्टींची प्रचीती जयंत नारळीकर यांनी लिहिलेल्या याला जीवन ऐसे नाव हे पुस्तक वाचताना येते. पुस्तक वाचताना निर्मळ प्रवृत्तीचे, संपूर्ण जीवनाकडे त्रयस्थ दृष्टीने बघणारे, छोट्या छोट्या गोष्टींतसुद्धा विनोदाचा शोध घेणारे, आपल्या अनुभवातून सतत काही ना काही शिकणारे, त्याप्रमाणे आपली मानसिकता बदलणारे, असे नारळीकरांचे चित्र आपल्यासमोर उभे राहते. या पुस्तकात जयंत नारळीकरांनी वेळोवेळी लिहिलेल्या काही निवडक लेखांचा संग्रह आहे.

शाळेत शिकत असताना आलेल्या मजेदार अनुभवांचे वर्णन थोडक्यात परंतु अगदी खुसखुशीतपणे शब्दबद्ध केलेले आहे. उन्हाळ्याच्या सुट्टीतील कोल्हापूरच्या आठवणी, एका सहलीच्या वेळी गाडीच्या चारी चाकांचे पंक्चर झाल्यामुळे झालेली फजीती, एका पार्टीच्या वेळी वेळकाढूपणाचा व भोंदूपणाचा नारळीकर दंपतींना आलेला कटू अनुभव, केंब्रिजमध्ये शिकत असताना, ते ज्यांच्या संपर्कात आले त्या ई.एम फॉर्स्टर, फ्रेड् हॉयल, मार्टिन राइल इत्यादी थोर व्यक्तींचे मजेदार किस्से, मुंबई ते पुणे दरम्यान वेळ वाचवण्यासाठी केलेली (केविलवाणी!) धडपड, इत्यादीबद्दल वाचताना लेखक एक वैज्ञानिक असूनसुद्धा आपल्या सारखाच चारचौघात वाढलेला कुटुंबवत्सल माणूस आहे याचे प्रत्यंतर येते. त्यांच्यातील वैज्ञानिक घडवण्यात आई - वडिल, वडिलांचे मित्र, लेखकाचे मामा इत्यादींचा वाटा होता, याचा नारळीकर आवर्जून उल्लेख करतात. आई - वडिलांनी त्यांच्यावर केलेल्या संस्कारातून वैज्ञानिक (व लेखकही!) घडत होता, हेही आपल्या लक्षात येते. बनारस हिंदू विश्वविद्यालयाचे रम्य वातावरण, तेथील शाळेतील शिक्षक, त्यांच्या घरी येणारे पाहुणे, इत्यादींचा पण त्याना घडवण्यात वाटा होता. लेखकाचे मामा प्रो. हुजुरबाजार यांनी आपल्या भाच्यात गणित विषयात आवड निर्माण करण्यासाठी वापरलेली जगावेगळी रीत, पं. नारायण व्यास या गायकाने दिलेले स्वावलंबनाचे धडे लेखक आयुष्यभर विसरू शकत नाहीत.

नारळीकरांचे व्यक्तिमत्व घडण्यात ग्रंथवाचनाच्या आवडीलाही महत्वाचे स्थान आहे. त्यांच्या वडिलांना पुस्तकं वाचण्याचा आणि पुस्तकं विकत घेऊन संग्रही ठेवण्याचा छंद होता. त्यामुळे अगदी लहानपणापासूनच त्यांना पुस्तकं वाचण्याची आवड निर्माण झाली. पुस्तकवाचनाला घरात अग्रक्रम असल्यामुळे लेखक आपोआपच पुस्तकविश्वात रमले. यांच्या वाचनात मागच्या पिढीला सुपरिचित असलेल्या चंदू, गोट्या, चिमणराव इत्यादींच्या करामतीच्या गोष्टी होत्या. तसेच पी.जी. वुडहाउस या इंग्रजी साहित्यातील लोकप्रिय लेखकाचा समावेश होता.

या संग्रहातील दोन लेख गणित या विषयावर आहेत. मार्टिन गार्डनर, न्यूमन, ई.टी. बेल सारख्या गणित विषयाची आवड निर्माण करणार्‍या लेखकांच्याबद्दल फार आपुलकीने नारळीकरांनी लिहिले आहे. गणित हा विषय आपण समजतो तेवढा रुक्ष नसून गणितातील शाखा-उपशाखांचा इतिहास मनोरंजक असतो, याचा अनुभव हे लेख वाचत असताना येतो. या संग्रहात नारळीकरांनी महाराष्ट्र गणित अध्यापक महामंडळाच्या वार्षिक अधिवेशनात दिलेल्या भास्कराचार्य स्मृती व्याख्यानावर आधारित असे हे गणित व असे हे गणिती या लेखाचा समावेश केला आहे. हा लेख म्हणजे गणितशास्त्राचा धावता आढावा आहे, असे म्हणता येईल. भास्कराचार्य, श्रीनिवास रामानुजन या भारतीय गणीतींनी केलेल्या योगदानाची माहिती त्यात आहे. युक्लिड, पायथॉगोरस, आर्किमिडिस, प्लेटो, रेने देकार्ते, न्यूटन, लायब्निझ, बेर्नोली इत्यादी पाश्चात्य शास्त्रज्ञांनी गणिताच्या विकासासाठी घेतलेल्या परिश्रमाचे थोडक्यात वर्णन केलेले आहे. हा लेख वाचताना नारळीकरांनी या विषयावर अधिक विस्तृतपणे लिहायला हवे होते, असे वाटते. विश्वविद्यालयातील (गैर) कारभाराच्या नमुन्याचे वर्णन लेखक दोनेक लेखात करतात. स्वत: भास्कराचार्यांनी जरी गणिताच्या प्राध्यापकाच्या जागेसाठी अर्ज केला तरी विश्वविद्यालयाच्या दुरवस्थेमुळे त्यंची निवड होणे कसे शक्य नाही याचे रसभरित वर्णन लेखकाने केले आहे. दुसर्‍या एका लेखात खर्‍या विद्वानाची किंमत शून्य आहे याची जाणीव नारळीकर करुन देतात.

ग्रहणकाळात अवैज्ञानिकपणे वागणार्‍या मुंबईतील रहिवाश्याना उद्देशून लिहिलेले पत्र आपल्या समाजाच्या अंधरूढीवर प्रकाश टाकणारे आहे. भारतीय विज्ञान परंपरेचा खोटा अभिमान बाळगणारे व त्याचा येता जाता ’उदो उदो ’ करणारे अनेक महाभाग विविध माध्यमांतून अंधरूढींच्या समर्थनार्थ सतत काहीबाही सांगत सुटत असतात.. लेखकाने त्यांच्या स्वभावानुसार नेहमीप्रमाणे सौम्य शब्दात अशांची कानउघाडणी केली आहे. पुराणातील अगदी त्रोटकपणे उल्लेख केलेल्या संकल्पनांना कितपत महत्व द्यावे याचा पुनर्विचार करण्याची गरज आहे, हे लेखकाचे म्हणणे सहजपणे पटते. ऊठसूट आपल्या पूर्वजांनी विमान, अणुबॉंब, रेडिओ, टीव्ही इत्यादी अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा शोध लावला होता, असे म्हणण्यात अर्थ नाही. सापेक्षतावाद, अणुरचना, गणितातील पाय् (Л) इत्यादी प्रगत संकल्पना आपल्या पूर्वजांना परिचित होत्या यालाही काही ठोस पुरावा नाही. केवळ एखादा शब्द वा वाक्य यांचा संदर्भ असणे वेगळे व या विषयाबद्दल संपूर्ण माहिती असणे वेगळे. जिज्ञासा - प्रयोग - निरीक्षण - कारणमीमांसा - भाकित या कड्यांच्या साखळीतून विज्ञानाची वाटचाल चालू असते. परंतु हे निकष लावल्यास भारतीय विज्ञानातील अनेक संकल्पना टिकत नाहीत. (मुळात विज्ञानात भारतीय, पौर्वात्य, पाश्चिमात्य असे काही नसते.) शिवाय या विज्ञान संकल्पनांचे संदर्भ देणारे सर्व ग्रंथ संस्कृतमध्ये आहेत, असे सांगितले जाते. संस्कृत भाषेतील (अती) लवचिकपणामुळे वाचकांना हवा तसा अर्थ काढता येतो. मूळ श्लोकात केव्हा तरी, काळाच्या ओघात, भर घालून फसवाफसवी करता येते. वकीली कौशल्याने कदाचित या संकल्पना अस्सल भारतीय आहेत, असा जावईशोध लावत समोरच्याचे तोंड बंद करता येईल. परंतु या संकल्पना पुराव्यानिशी सिद्ध करणे शक्य होणार नाही, असे लेखकाला वाटते.

पाश्चात्य देशातील समृद्धीसाठी आधुनिक विज्ञान व तंत्रज्ञानाचा फार मोठा हातभार लागला आहे. त्या देशातील समाजाला वैज्ञानिक विषयांची आवड निर्माण करण्यात वैज्ञानिक विषयावरील पुस्तकांचा फार मोठा सहभाग आहे. परंतु आपल्या देशात मात्र अशा पुस्तकांची उणीव भासत आहे. आपल्या संशोधनातून वेळात वेळ काढून मराठी वाचकांसाठी नारळीकर जाणीवपूर्वक प्रयत्न करत असतात. त्यांच्या या प्रयत्नांना प्रतिसाद देणे गरजेचे आहे.

याला जीवन ऐसे नाव
जयंत नारळीकर,
श्रीविद्या प्रकाशन, पुणे (1998),
किं 120 रु