गार्गी अजून जिवंत आहे

पुस्तक परिचय

आज अचानक मंगला आठलेकर यांचं "गार्गी अजून जिवंत आहे" हे पुस्तक हातात पडलं. जन्मतारीख वगैरे नसणार्‍या काळात साधारण १९१४-१५ च्या सुमारास उत्तरप्रदेशात इलाहाबादला जन्मलेल्या गुलाबबाईची ही कहाणी. सातव्या वर्षी लग्न होऊन दहाव्या वर्षी मुलाला जन्म दिलेल्या ह्या गुलाबबाईने इतक्या जुन्या काळात इलाहाबाद-प्रयागसारख्या कट्टर धार्मिक परंपरा असलेल्या शहरात अंत्यसंस्काराच्या कामाला वयाच्या अकराव्या वर्षी सुरवात करून तिने "स्त्रियांनी स्मशानपौरोहित्य का करू नये?" असा प्रश्न तत्कालीन धर्ममार्तंडांना केला होता. ह्या स्त्रीबाबत लेखिका एक दोन पानी लेख वाचते आणि त्या स्त्रीला भेटायचंच या विचाराने तिचा शोध घेते. तिला शोधल्यावर तिच्या कडून, इतरांकडून ऐकलेल्या गुलाबबाई उर्फ अम्मा हे चरित्र - कहाणी व त्यावरील लेखिकेचे ससंदर्भ भाष्य म्हणजे हे पुस्तक "गार्गी अजून जिवंत आहे". पुस्तक सुरवातीपासूनच पकड घेतं आणि आपल्याला आताही असलेल्या कर्मठ हिंदू समाजाचं दर्शन होऊ लागतं. गुलाबबाईला शोधत असताना लेखिका आधी वाराणसीला जाते. तिथे अशी स्त्री आहे हेच मान्य करणं सोडा, स्त्री ह्या कामात असु शकते ही शक्यताच धुडकावली जाते, तेही आजच्या काळात तेव्हाच लेखिका जेव्हा गुलाबबाईला भेटेल तेव्हा तिची कहाणी कशी असेल याचा अंदाज येऊ लागतो. अत्यंत गरीब घरात जन्मलेल्या गुलाबबाईची ही कथा, तिच्या शेजारच्या घरात तिने पाहिलेल्या स्त्रीभृणहत्येवरून सुरू होते. मुलगी झाली की तिला माठात लिंपून कोंडून मारून टाकायचे ही त्या काळचा समाजमान्य रीत. त्या मुलीच्या आईच्या इच्छेचा प्रश्नच नसायचा . अशात पहिली मुलगी असूनही बापाने जिवंत ठेवायला परवानगी दिलेली ही मुलगी. बाकी घरात तिच्या पाठीमागचे आठ भाऊ. वडील दारागंज घाटावर "महापात्र" म्हणजेच अंत्यविधी करणार्‍या पंड्यांचे प्रमुख होते. त्याच्याबरोबर जाणार्‍या चिमुकल्या गुलाबचेही मंत्र तोंडपाठ होते. पुढे सातव्या वर्षी लग्न झाले व दहाव्या वर्षी मूल. सासरी सतत जाच. त्यामुळे गुलाब एका खोलीत कोंडून घेऊन व्यायाम करीत असे व तिने चक्क शरीर कमावले होते. तिला पुढे मुलगा झाल्याने त्याला मारण्याचा प्रश्न नव्हता मात्र तेव्हाच गुलाबचे वडील वारले. आता तिच्या माहेरी फक्त गरिबी होती. अश्या वेळी माहेर व सासरची गरिबी व नाकर्त्या नवर्‍याकडे पाहून तिने एक निर्णय घेतला तो अंत्यविधी करून माहेरच्यांचे व घरच्यांचेही पोट भरण्याचा. या कामाला सुरवात करताना तिला सामना कराव्या लागलेल्या प्रश्नांना लेखिकेने चित्रदर्शी शैलीत मांडले आहे. गुलाबला सासरीच काय पण माहेरीही प्रचंड विरोध झाला. ह्या आयुष्यभर झगडण्यात घालवणार्‍या स्त्रीने जेव्हा आपली शेती आपल्याच नोकराकडून मिळवण्याचे ठरविले तो प्रसंग मांडताना लेखिका गुलाबच्या भूमिकेत शिरून लिहिते "मी शेतावर पोचले तेव्हा बैलांच्या साहाय्यानं नांगरणी चालू होती. मी जाऊन सरळ उभी राहिले ती बैलांच्या समोर. दोन्ही हातांनी तो नांगर रेटून धरला. बैल थांबले. त्या नोकराला काय करावं ते कळेना. बाईसमोर हार कशी पत्करणार म्हणून तो चेवाने बैलांवर आसूड उगारणार इतक्यात मी आसूड मधेच अडवला व खेचून घेतला. आणि त्याच्याच पाठीवर तोच आसूड सपासप चालवू लागले" हे पुस्तक ह्या असामान्य स्त्रीच्या कथेबरोबरचे ऋग्वेदाकालीन स्त्रीचं स्थान कसं होतं याचाही शोध घ्यायचा प्रयत्न करते. आणि दाखवून देतं की विविध ऋचा, श्लोक हेच दाखवतात की स्त्रियांना मानाचं स्थान तर होतंच पण अगदी अंत्यविधीमध्येही स्त्रियांचा विधीवत् सहभाग असे. इतकंच काय विधवा पुनर्विवाहास देखील मान्यता होती हे. पुढे मनुस्मृतीत मात्र स्त्रियांकडून हे सारं हिरावलेलं दिसतं. एक काळ तो होता जेव्हा स्त्रियांना समान वागणूक हाच धर्म होता व आता एक काळ असा आहे की स्त्री घरातून बाहेर पडण्यासाठी-स्वातंत्र्यासाठी पुरुषाच्या मर्जीवर अवलंबून आहे हा सामाजिक र्‍हास लेखिका ठळकपणे अधोरेखित करण्यात यशस्वी झाली आहे.याशिवाय लेखिका एकदा दारागंज घाटावर जाते जिथे अम्माचे वडील महापात्र होते. तिथे अजूनही स्त्रियांनी हे विधी करणे निषिद्धच मानले जाते. तिथे तेथील पंड्यांची मते वाचून मती कुंठित होते. मला ह्या पुस्तकातील सर्वात काही आवडलं असेल तर गुलाबबाईचं स्वातंत्र्याचं तत्त्वज्ञान. तुम्ही इतर स्त्रियांना बळ देण्यासाठी काय करता ह्या प्रश्नांवर गुलाबबाईचं उत्तर मार्मिक तर आहेच पण अतिशय चिंतनीय आहे. ती लेखिकेलाच प्रतिप्रश्न विचारते "आजूबाजूच्या स्त्रियांसाठी मी काय करायला हवं होतं असं तुला वाटतं? माझ्यासाठी कुणी काय केलं? मला वडिलांनी स्वातंत्र्य दिलं म्हणशील तर ते माझ्या बहिणींनाही होतंच की! त्यांनी काय केलं त्या स्वातंत्र्याचं? तेव्हा मुळात असं कुणासाठी काही करून कुणी स्वतंत्र होत नसतो. आणि झालाच स्वतंत्र तरी ते स्वातंत्र्य त्याला वापरता येत नाही. कारण बेड्या गळून पडल्या तरी त्या हातापायांचं काय करायचं हेच त्यांना ठाऊक नसतं. मला काय हवंय, आयुष्यात काय करायचंय हे निश्चित झालं की ते मिळविण्यासाठी त्याची आतूनच एक जबरदस्त आस निर्माण होते. हेच स्वातंत्र्य! ते स्वतःलाच मिळवता येतं" एकही इयत्ता न शिकलेल्या ह्या स्त्रीचं हे तत्त्वज्ञान वाचून लेखिकेइतकेच आपणही विस्मयचकित आणि निरुत्तर होतो हेच खरं. सार्‍या ब्रह्मवृंदासमोर याज्ञवल्कल्याच्या बुद्धिमत्तेला आव्हान देणारी गार्गी आता नसली तरी तिथे इलाहाबादच्या मुख्य घाटांवर काम करताना अगदी जिवावर उठलेल्या पंड्यांविरूद्ध दंड थोपटून स्वतःचा घाट बांधणार्‍या ह्या अम्माची कहाणी वाचली की वाचकाला लेखिकेइतकीच "गार्गी अजून जिवंत आहे" ची खात्री पटते. थोडक्यात काय तर गुलाबबाई आपले प्रश्न कसे सोडवले हे मांडताना लेखिका नकळत आपल्या मनात त्याहून बरेच मोठे आणि अस्वस्थ करणारे प्रश्न निर्माण करण्यात यश मिळवते. स्वतःला हे न पडणारे प्रश्न पाडून घेण्यासाठी तरी हे पुस्तक मिळताच वाचा अशी शिफारस!

परीचय आवडला....आणि मनात ठाम रहिलय ते हे वाक्य -


"आजूबाजूच्या स्त्रियांसाठी मी काय करायला हवं होतं असं तुला वाटतं? माझ्यासाठी कुणी काय केलं? मला वडिलांनी स्वातंत्र्य दिलं म्हणशील तर ते माझ्या बहिणींनाही होतंच की! त्यांनी काय केलं त्या स्वातंत्र्याचं? तेव्हा मुळात असं कुणासाठी काही करून कुणी स्वतंत्र होत नसतो. आणि झालाच स्वतंत्र तरी ते स्वातंत्र्य त्याला वापरता येत नाही. कारण बेड्या गळून पडल्या तरी त्या हातापायांचं काय करायचं हेच त्यांना ठाऊक नसतं. मला काय हवंय, आयुष्यात काय करायचंय हे निश्चित झालं की ते मिळविण्यासाठी त्याची आतूनच एक जबरदस्त आस निर्माण होते. हेच स्वातंत्र्य! ते स्वतःलाच मिळवता येतं"

(blockquote काम करयला लागलं! :)

पुस्तकाविषयी खूप ऐकलं होतं..हा परिचय वाचून उत्सुकता वाढलीये.. नक्की वाचेन आता. पुस्तक परिचय छान उतरलाय..