लेखक, प्र ब कुळकर्णी हे आजचा सुधारक या पुरोगामी मासिकाचे एके काळचे संपादक होते. त्यांनी गेल्या 35 - 40 वर्षे वाचलेल्या पुस्तकापैकी काही निवडक मराठी पुस्तकांचे काही 'ग्रंथगत' व काही 'व्यक्तिगत' विचारसरणींचा परिचय करून देणारे लेख विवेकीजनीं ह्या मज जागवीले या पुस्तकात आहेत. मुळातच पुस्तकाचे शीर्षक थोडेसे दुर्बोध वाटल्यामुळे वाचण्याचे धाडस झाले नाही. परंतु पुस्तक वाचत गेल्यानंतर जुन्या आठवणी ताज्या होऊ लागल्या. यातील अनेक पुस्तकं मुळातच वाचलेली असल्यामुळे लेखक नवीन काय सांगतात याबद्दल उत्सुकता होती. लेखकाने या बाबतीत मात्र अजिबात निराश केली नाही. एका चिंतनशील अभ्यासकाकडून, चिकित्सकाकडून हीच अपेक्षा होती.
पुस्तक परीक्षणावरील लेखांची यादी थक्क करणारी आहे. इतर काही लेखाबरोबर सुमारे मराठीतील 27 पुस्तकांच्याबद्दल माहितीवजा परीक्षणांचा हा एक उत्कृष्ट संग्रह आहे. गीता साने यांचे भारतीय स्त्री जीवन, ज्ञानपीठ पारितोषक विजेते कन्नड लेखक शिवराम कारंत यांचे अळिद मेले, वि रा लिमये यांचे सन्मानाने मरण्याचा हक्क, ग वि अकोलकर यांचे गत जन्म शोधताना, लीला पटेल यांचे रक्त पहाट, तस्लिमा नासरीन यांचे शोध , नंदा खरे यांची अंताजीची बखर.... अशा अनेक गाजलेल्या पुस्तकाविषयी अत्यंत मार्मिकपणे त्यांनी लिहिले आहे. पद्मजा पाठक यांच्या हसरी किडनी या पुस्तकावरील लेख मनाला चटका लावणारी आहे. आगरकर, र. धों. कर्वे, डॉ. आनंदी जोशी, कमल सोहनी, बाबा आमटे इत्यादी उत्तुंग व्यक्तींच्याबद्दलच्या पुस्तकाबद्दल वाचताना आपण एका वेगळ्या जगात वावरत आहोत की काय असे वाटू लागते.
समाजस्वास्थ्यकार र. धों. कर्वे यांच्याबद्दलच्या मधुसूदन गोखले यांचे उपेक्षित योगी व मंगला आठलेकर यांचे महर्षी ते गौरी या दोन पुस्तकांचे परीक्षण लेखकाने केले आहे. सरधोपटपणे लिहिलेल्या या पुस्तकातील अनेक ढोबळ चुका त्यांनी दाखवून दिल्या आहेत. र. धों. चे आठलेकरांना झालेले आकलन आणि त्यांनी केलेले विश्लेषण कच्चे, अपुरे आहे आणि अनेकदा चूक आहे, असे लेखकाचे स्पष्ट मत आहे. लेखकाने उपेक्षित योगी या पुस्तकातील र.धों. च्या व्यक्तिमत्वाची तुलना दिवाकर बापट यांचे उपेक्षित द्रष्टा (1971) व य दि फडके यांचे र.धों. कर्वे (1981) या पुस्तकांतील र.धों च्या व्यक्तिमत्वाशी करताना पुस्तकाचे लेखक मधुसूदन गोखले यांच्या चुका उठून दिसू लागतात. पुस्तकाच्या लेखकाला र.धों. कळलेच नाहीत की काय असे वाटू लागते. डॉ. कुळकर्णी यांच्या मते अणुसंशोधनाचा इतिहास उभा करणारा बाराला दहा कमी हा पद्मजा फाटक व माधव नेरूरकर यानी लिहिलेला ग्रंथ अभ्यासपूर्ण आहे.
मागच्या पिढीतील मे पुं रेगे या तत्वज्ञाविषयीच्या दोन लेखातून लेखकाने तत्वज्ञ जगाकडे कसा पाहतो, समाजाबद्दल, मानवी जीवनाबद्दल त्याची दृष्टी कशी असते याचे एक छान चित्रण वाचकासमोर उभे केले आहे. गांधीजींचा अंत्योदय हाच आपला समाजवाद असे मानणार्या रेगे यांना इतकी माणसं हालअपेष्टांचं दयनीय जीवन जगत असताना आपण सुख-स्वास्थ्याचं जीवन जगतो याची नेहमीच खंत वाटत होती. जुन्या पिढीतील सेतु माधवराव पगडी यांचे भारतीय मुसलमान शोध आणि बोध या पुस्तकाचे परीक्षण करताना भारतीय मुसलमान हा भारतासमोरील अनेक प्रश्नापैकी एक प्रश्न आहे. तो सोडवण्यासाठी आधी नीट समजून घेणे जरूर आहे. आम्ही वेगळे आहेत, आमचे प्रश्न वेगळे आहेत, तुम्ही आमच्याकडे लक्ष देत नाही, या मुस्लिम नेतृत्वाच्या भूमिकेचा नीटसा अर्थ लागत नाही म्हणून लेखकाना खंत वाटते. साधना आमटे यांच्या समीधा या आत्मकथेतील लेखिकेचे हळूवारपणे उभी केलेली आमटे दांपत्याची वादळी पण उन्मादक सहजीवनाची कहाणी लेखकाला फार भावली आहे. वसुमती धुरु यानी शब्दबद्ध केलेल्या कमल सोहोनी याच्या आठवणीचे विज्ञान विशारदा या पुस्तकाबद्दल लिहिताना स्त्री- पुरुष समानतेच्या प्रत्येक पुरस्कर्त्याने वाचलेच पाहिजे, शक्य तर संग्रही ठेवले पाहिजे, असे हे पुस्तक आहे, अशी शिफारस लेखक करतात.
आगरकरावरील पुस्तकाची चिकित्सा करताना त्यांनी पुस्तकाचे लेखक य दि फडके याना पण सोडले नाही हे विशेष. केवळ नावाजलेले लेखक आहेत म्हणून छान छान म्हणण्याची, पाठ थोपटण्याची वृत्ती काही समीक्षकांकडे असते. परंतु प्र ब नी तसे न करता प्रांजळपणे कुठे काय चुकले आहे, कुठे कितपत बरोबर आहे हे सर्व सांगितले आहे. डॉ. अनिल अवचट लेखकांचे आयडॉल आहेत की काय असे यांच्या अमेरिका या पुस्तकाबद्दल व एका दिवाळी अंकातील त्यांच्या लेखाबद्दल वाचताना वाटॄ लागते.
विवेकीजनीं ह्या मज जागवीले
लेखक प्र ब कुळकर्णी
प्रकाशक - ग्रंथाली, मुंबई,
पृ.सं - 225, किं - 200 रु