Submitted by प्रभाकर नानावटी on
वल्ली

अतिशय सुरेख परिचय करून दिलात तुम्ही प्रभाकरपंत.
खरेच संपूर्ण महाभारत वाचतांना अनेकदा व्यासांची शैली व सौती, वैशंपायन व इतरही प्रक्षिप्तकारांची शैली ओळखता येते. व्यासांच्या मूळ कथेत श्रीकृष्णाला मानवी स्वरूपच दिलेले आहे. श्रीकृष्णाला दैवी स्वरूप मात्र बौद्ध, जैन धर्मप्रसारानंतर र्‍हास झालेल्या हिंदू धर्माचे पुनरुथ्थान करण्यासाठी प्राप्त झाले असावे.

Mon, 27/12/2010 - 10:57 Permalink
ऋषिकेश

सुरेख परिचय!
महाभारतावर इतक्यांनी लिहुनही प्रत्येकाचे लिखाण नवे तरीही (पुढच्या लेखकाला व पुढचे पुस्तक वाचल्यावर वाचकालाही) अपूर्ण वाटावे यातच त्या महाकाव्याचे महानत्त्व अधोरेखित व्हावे.

अश्याच वेगवेगळ्या पुस्तकांच्या ओळखीसाठीच तर सोमवार वाट पाह्त असतो :)

Mon, 27/12/2010 - 12:02 Permalink

इरावती कर्वे यांनी युगांत या पुस्तकात उल्लेख केल्याप्रमाणे मानवी प्रयत्न निष्फळ असतात, मानवी जीवन हे विफलच असायचे, हा धडा मनावर बिंबवण्यासाठी तर महाभारत रचलेले नाही ना असे सारा वेळ वाटते. मानवांचे प्रयत्न, आकांक्षा, वैर, मैत्री - सगळीच उन्हाळ्याच्या वावटळीने उडवलेल्या पाचोळ्यासारखी क्षुद्र, फोलकट भासतात; पण त्याचबरोबर ज्या व्यक्तींनी ते प्रयत्न केले, आकांक्षा बाळगल्या, त्या व्यक्ती अविस्मरणीय ठरतात. हृदयाला कायमचा चटका लावतात. प्रत्येक व्यक्ती एका विशिष्ट परिपाकाकडे अटळपणे जात असते. आपल्याला त्रयस्थ वाचक म्हणून तो परिपाक दिसत असतो. त्या व्यक्तीलाही तो जाणवत असला पाहिजे. हे महाभारत वाचताना इतक्या तीव्रतेने जाणवते की त्या व्यक्तीची व्यथा आपली स्वत:ची व्यथा होते. त्या व्यक्तीच्या द्वारे संबंध मानवतेचे दु:ख आपल्याला खुपत राहते.

आनंद विनायक जातेगावकर यांचा व्यासांचा वारसा हे पुस्तक वाचत असताना आपणही मानवतेच्या अतीव दु:खाची आठवण करून देणार्‍या त्या होलोकास्टचे कळत न कळत साक्षीदार होतो. त्याचवेळी हा एवढा मोठा भव्यपट व्यासाने कसा काय उभा केला असेल याचे आश्चर्य वाटू लागते.या पुस्तकाला प्रदीर्घ प्रस्तावना लिहिणारे डॉ. मंगला आठलेकर यांच्या मते व्यासांच्या या कलाकृतीच आव्हान कधीही न संपणारं आहे. म्हणूनच प्रत्येक पिढीतील सर्जनशील लेखक या ग्रंथाचा आपापल्या परीने अर्थ काढण्याच्या प्रयत्नात असतो. त्याला भावलेल्या प्रसंगांचे, वा व्यक्तींचे चित्र - स्वत:च्या interpretation सहित - उभे करून वाचकासमोर ठेवत असतो. महाभारताचा अन्वय लावण्याचा, त्यातील माणसा-माणसामधील नातेसंबंध तपासण्याचा व प्रमुख पात्रांच्या प्रकृती, विकृती व प्रवृत्ती यांचा अर्थ काढण्याचा प्रयत्न यापूर्वीही अनेकानी केला आहे व यानंतरही कुणी ना कुणी तरी करत राहणार. कारण प्रत्येक पिढीला त्यातून सर्वस्वी वेगळा अर्थबोध होत असतो. हेच तर या महाभारताचे वैशिष्ट्य आहे.

श्रेष्ठ लघुकथाकार जातेगावकर यांनी मात्र व्यासांच्या या कलाकृतीतील पात्रयोजना, पात्ररचना, climax - anticlimax प्रसंग, प्रसंगांच्या तिढ्यातून बाहेर पडण्यासाठी वापरलेल्या क्लृप्त्या, चमत्कारांची रेलचेल, शाप-उशा:पांची उधळण, शत्रूला नामोहरम करण्यासाठी पात्रांच्या तोंडी घातलेले संवाद इत्यादींचे कठोर विश्लेषण करण्याचा प्रयत्न या पुस्तकात करतात. विश्लेषण करत असताना व्यास हे लेखक, कलावंत म्हणून किती मोठे होते याची प्रचीती वाचकांना देतात. लेखकाच्या मते महाभारतातील 'माणसांना' पूर्णपणे माणसासारखे वर्तन करण्यास भाग पाडायला व्यास कारणीभूत आहेत. व्यासांच्या कल्पनेतील या व्यक्तिरेखांचे पुनर्चित्रण करताना जातेगावकर आदर्श, परंपरा, दैवत्व, संस्कृती इत्यादींच्या जोखडातून मुक्त होत त्या सर्वांना चारचौघासारखे आपल्यासमोर उभे करून आपल्याला एका वेगळ्या जगात नेऊन सोडतात. पूर्ण पुस्तक वाचताना आपण एक ललित अनुभव घेत आहोत असे वाटू लागते.

पुस्तक वाचत असताना द्रौपदी, गांधारी, कुंती इत्यादी महाभारतकालीन स्त्रिया आता केवळ प्रात:स्मरणीय अशा स्त्रिया न राहता 'अस्तित्वाची लढाई लढणारी माणसं' होतात. भीष्म, द्रोण, कर्ण, युधिष्टिर, भीम, अर्जुन, दुर्योधन, शकुनी, शिशुपाल, दु:ष्यासन, विदुर, कृष्ण, बलराम, अश्वत्थामा यासारख्या अतिरथी महारथी व्यक्तींच्या बद्दलच्या आपल्या मनातल्या प्रतिमेला लेखक धक्का देतात. यांच्यातील तथाकथित दैवीशक्तीला वगळल्यास या सर्वांचे पाय मातीतच आहेत याची आठवण जातेगावकर करून देतात व ते आपल्याला पटत जाते. या व्यक्तिरेखेचे वर्णन करताना विशेष आत्मीयता वा विशेष तिरस्कार, किंवा हा दुष्ट वा हा सुष्ट असे लेबल ते लावत नाहीत व आपल्यालाही लावू देत नाहीत. पुस्तक वाचून झाल्यानंतर कृष्ण हा 'भगवान कृष्ण' म्हणून आपल्या स्मरणात राहणार नाही. तत्वज्ञान, नीती, तर्क, व जबदस्त उपयुक्ततावाद यांचा चलाखीने वापर करत माहाभारतातील प्रत्येक महत्वाच्या प्रसंगी कृष्ण उभा आहे व एवढा मोठा नरसंहार घडत असताना कर्माची गती गहन आहे यावर भर देणार्‍या कृष्णाला व्यासानीसुद्धा 'देवपण' बहाल केले नव्हते हे विशेष! आपणच नियम करायचे व आपणच ते नियम मोडीत काढायचे हा खेळ अनेक वेळा झालेले वाचत असताना मन उद्विग्न होते. परंतु मानवी समाज हा असाच होता, असाच आहे व असाच राहणार, हे आपल्या लक्षात जातेगावकर आणून देतात.

संपूर्ण पुस्तक वाचत असताना लेखकानी काढलेल्या कॅरॅक्टर इज द डेस्टिनी हा निष्कर्ष आपण विसरू शकत नाही. चारित्र्य व नियती यांची अन्योन्यता सतत जाणवते. महाभारताच्या कथानकाचा हाच गाभा आहे की काय असे वाटू लागते. महाभारताचे रचनाकार व्यास स्वत: या कथानकातील महत्वाचे पात्र आहेत. लेखक म्हणून ते स्वत: एखाद्या टीव्ही कॅमेर्‍याप्रमाणे सर्व घटितांचे साक्षीदार असून अलिप्तपणे सर्व गोष्टींकडे बघत असतात. जिथे फोकस करावे व जिथे आउट ऑफ फोकस करावे याची जाण व्यासांना आहे. ते कुठेही टीका टिप्पणी करत नाहीत. उपदेशाचे डोज पाजत नाहीत. जातेगावकर मात्र या आउट ऑफ फोकसच्या गोष्टींचासुद्धा विश्लेषण करत असल्यामुळे महाभारतातील या व्यक्तीरेखा व त्यांचे रचनाकार वेगळी उंची गाठतात. महाभारतात अनेक वेळा अनेक ठिकाणी दैवी चमत्कारांची वर्णनं आहेत. परंतु व्यास या चमत्कारांना जास्त महत्व न देता इतर मानवी व्यवहारांभोवतीच कथानक गुंफत जातात, हे जातेगावकर आपल्या लक्षात आणून देतात. त्यामुळेच महाभारत ही पुराणकथा झाली नाही व रामायणाप्रमाणे एका विशिष्ट व्यक्तीचे गुणगान करणारा गौरव ग्रंथ झाला नाही. लेखकाच्या मते मूळ महाभारतात नंतरच्या काळात विनाकारण भरपूर गोष्टी घुसडलेले आहेत. पूर्ण कथानकात शंका घेण्यासारख्या अनेक गोष्टी आहेत. कदाचित हे व्यासांचे लेखनतंत्रही असू शकेल. महाभारताचा हा अवकाश मोकळा ढाकळा, विशाल आणि उदार. त्यामुळे शंकेचे बोट धरून आपण इतस्तत: भटकू लागतो.

व्यासांच्या महाभारतानी आपल्या संस्कृतीला दिलेली सर्वात महत्वाची भेट म्हणजे कृष्णानी युद्धभूमीवर सांगितलेली गीता असे आपल्यातील अनेकांना अजूनही वाटते. (परंतु ही गीता आता नाटक व चित्रपटात दाखवत असल्याप्रमाणे न्यायालयात शपथ घेण्यासाठी वापरात असलेला ठोकळा या पातळीवर येऊन पोचलेले आहे.) व्यासांनी मात्र याला जास्त महत्व न देता कथेच्या ओघाने आलेले निवेदन या स्वरूपात याची मांडणी केली आहे. गीतेत सांगितलेली जीवनदृष्टीच आपल्या संस्कृतीची जीवनदृष्टी असती तर या मातीत करुणेचा पाठपुरावा करणार्‍या बुद्धाचा जन्म झाला नसता, या लेखकाच्या निरीक्षणाला दाद द्यावीशी वाटते. त्यामुळे महाभारतातील सर्व व्यक्तिरेखांचे विश्लेषण करताना जातेगावकर यांना सापडलेला अमोघ ठेवा म्हणजे आपल्या संस्कृतीत प्रकर्षाने जाणवणारी सहिष्णुता. हीच सहिष्णुता अजूनही जनसामाऩ्यांना आधार देत आहे. गीतेत करुणा नाही तशी सहिष्णुता नाही. बौद्धवाङ्मयात करुणेला स्थान आहे परंतु सहिष्णुतेला मध्यवर्ती स्थान नाही. त्यामुळे व्यासांची सर्वसमावेशक दृष्टी आठवताना सहिष्णुतेला त्यानी स्थान दिले आहे, हे लक्षात राहते.

व्यासरचित महाभारतातील अशाप्रकारचे वास्तव व बारकावे समजून घेण्यासाठी जातेगावकरांचे हे पुस्तक वाचायलाच हवे.

व्यासांचा वारसा
आनंद विनायक जातेगावकर,
शब्द पब्लिकेशन, (2009)
मूल्य 260 रु, पृ.सं 272