Submitted by टण्या on

एकच पुस्तक शीर्षकात जोडता येत असल्याने केवळ बिढार जोडले आहे. पण हा लेख बिढार, हूल, जरीला आणि झूल अश्या चार कादंबर्‍यांवर आहे.

Sun, 12/12/2010 - 23:09 Permalink

मी वाटेला गेले नव्हते चतुष्टयाच्या. पण आता वाचावंसं वाटतंय. हे निर्विवाद तुझ्या टिपणाचं यश.
(बाकी मी लगेच चतुष्टय आणायला गेले. पण बिढार मिळत नाहीये. म्हंजे निदान ठाण्यातल्या मॅजेस्टिकात तरी नाहीये. आता सास.मधे घेईन.)

Mon, 13/12/2010 - 09:28 Permalink

".....पण बिढार मिळत नाहीये..."

~ अजून नेमाडे वाचायचे राहून गेल्ये म्हणतेस? नेमाड्यांना कळाले तर चक्करच येईल त्यांना !!

ओके....बिढार मिळत नाहीये असे म्हणत्येस....पण या चतुष्ट्याचे दुखणे असे आहे की, प्रथम 'बिढार' वाचल्याखेरीज तुला पुढे जाताच येणार नाही....जावूही नकोस.

"किताब कॉर्नेर" च्या वा "अक्षरधारा" च्या प्रदर्शनात ही पुस्तके हमखास असतातच.... ट्राय इट.

इन्द्रा

Mon, 13/12/2010 - 09:46 Permalink

अक्षरधारा आत्ताच ठाण्यात येऊन गेलं. :(
पण आता साहित्य संमेलनात हमखास मिळेल. :)
बाकी - हे आमंत्रण सगळ्यांनाच. ठाण्यात साहित्य संमेलनाला जरी नाही, तरी त्यानिमित्तानं पुस्तकखरेदीला तरी यालच ना? आपण एक टवाळ सा.स. उर्फ गॉसिप कट्टा करू या का?

Mon, 13/12/2010 - 12:07 Permalink

श्री.टण्या....निव्वळ "अप्रतिम" असं लिहून थांबणे हे तुमच्यावरच नव्हे तर एक वाचक आणि नेमाडेप्रेमी (चारही कादंबर्‍यांतील ओळन्ओळ मला पाठ आहे असे म्हटले तरी - गायकवाडांच्या भाषेत - वावगे ठरणार नाही) म्हणून खुद्द माझ्यावर अन्यायकारक होणार आहे. त्यामुळे आणखीन् एकदा तुमच्या या लेखाचे वाचन करून नंतर सविस्तरपणे इथे लिहिणार आहे.

या विषयावर व एकूणच 'मराठी कादंबरीचा आवाका' या विषयावर दस्तुरखुद्द रा.रा. भालचंद्र नेमाडे यांच्याशी मी प्रत्यक्ष समोरासमोर बसून ऐसपैस गप्पा मारल्या आहेत....(इथे "मी' म्हणजे केवळ इन्द्रराज पवार नव्हे तर...आम्ही तीन-चार समवयस्क मित्रांनी....अन् तेही आमच्याच कोल्हापुरातील घरात), त्यामुळे त्यांच्याशी झालेली चर्चा + या लेखातील तुमची त्यांच्याविषयीची निरिक्षणे + चतुष्ट्य या सर्वांचा पाठपुरावा करून प्रतिक्रिया देतो.

चालेल ना?

इन्द्रा

Mon, 13/12/2010 - 09:41 Permalink

इंद्रा, तुमच्या नेमाड्यांबरोबरच्या चर्चांबद्दल येथे नक्कीच लिहा. लेखकाचे एखाद्या समारंभातील वा कार्यक्रमातील विचार व एखाद्या खासगी भेटीतील गप्पागोष्टी यांत पुष्कळच फरक असतो कारण त्यांना इतर मुलामा नसतो. त्या असतात निखळ गप्पा. तेव्हा वाचायला उत्सुक.

Mon, 13/12/2010 - 10:15 Permalink

लिहा की नक्कीच.

मराठी कादंबरी व तिची वाटचाल ह्यावर नेमाड्यांचा एक अतिशय अभ्यासपूर्ण व वाचनीय टिकालेख आहे. मी नाव विसरलो त्या लेखाचे पण तो टिकास्वयंवरमध्ये आहे. तसेच साहित्य अकादमीने प्रकाशित केलेल्या म.द.हातकणंगलेकर (व अजून एक जण) यांनी संपादित केलेल्या मराठी टिकालेखांच्या एका संग्रहातदेखील आहे. नक्कीच वाचावा असा.

Mon, 13/12/2010 - 12:34 Permalink

टण्याराव, अतिशय सुरेख परीक्षण दिलेत. चांगदेव चतुष्टयात नेमके कशावर आधारीत आहे हे माहीत नव्हते. तुमच्या परीक्षणामुळे माझ्या ग्रंथसंग्रहात चतुष्टयाची भर पडणार हे नक्कीच.

Mon, 13/12/2010 - 10:10 Permalink

ही हल्ली "चांगदेव चतुष्टय" म्हणण्याची फ्याशन आली आहे त्याचे कधीकधी हसू येते, कारण ते तीन कादंबर्‍यांचे बळजबरीने बनवलेले "चतुष्टय" आहे असा माझा निष्कर्ष बनला आहे.
आणि एरवी नेमाड्यांचे लिखाण कितीही आवडत असले तरी मनात आलेली ही एक गोष्ट सांगितल्याशिवाय राहवत नाही म्हणून लिहितो.

ही पुस्तके जशी जशी आली तसतशी मी रीयल-टाइम मध्ये वाचत गेलो आहे (७५-७६-७८ इ). माझ्या आठवणीप्रमाणे पहिल्या प्रस्तावात हे चतुष्टय बिढार-जरीला-झूल-हिन्दु असे होते.
आणि हे लेखक-प्रकाशकाचे जणू आश्वासन मनात धरून आम्ही वाचक (भक्त म्हणा वाटल्यास) पुस्तकांना फॉलो करत होतो.
हे झूल पर्यंत जमले, नंतर हिन्दू कितीही वाट पाहिली तरी यायचे चिन्ह दिसेना. कंटाळलो नि शेवटी वाट पहाणे सोडून दिले.

आणि आता पाहतो तर काय? "हूल" नावाचे एक नवीनच पुस्तक समाविष्ट करून बनले की हो तथाकथित "चांगदेव चतुष्टय"!
चुकचुकल्यासारखे झाले - अरेरे, हे एक पुस्तक केव्हा आले व कसे बरे वाचायचे राहून गेले. प्रकाशनकाल १९७५ - म्हणजे बिढारचाच.

चौकशीअंती एका मित्राने सांगितले की अरे, काही नाही, बिढारचेच विभाजन करून एक (नवे) "बिढार" व एक "हूल" असे केले आहे, जुने चतुष्टय अपूर्ण राहून हे नवेच (हिन्दू) चतुष्टय कसे सुरू करायचे यावर चेहरा-बचावू उपाय म्हणून.

आम्हाला काही आतल्या बातम्या माहीत नाहीत, त्या इन्द्रराजच सांगू शकतील.
आम्ही आपले, "असो, मोठ्यांच्या मोठ्या गोष्टी!" असे म्हणून सोडून देतो व गप्प बसतो बुवा.
(वाचायचे राहून नाही गेले हेच सुख मानायचे)

- दिगम्भा

Tue, 14/12/2010 - 13:44 Permalink

दिगम्भा, तुम्ही जे म्हणत आहात ते बरोबर आहे. मीदेखील बिढार पहिल्यांदा वाचली तेव्हा ती आजची बिढार + हूल अशीच होती. गेल्या काही वर्षातल्या आवृत्त्या बिढार व हूल अशा स्वतंत्र छापलेल्या आहेत. ७० ते ९० च्या दशकातल्या अनेक लेखात हिंदू ही चांगदेव सिरीजमधलीच कादंबरी असणार आहे असे उल्लेख आहेत. बिढारचे बिढार + हूल कधी झाले व हिंदू ही चतुष्टयातून बाहेर जाउन वेगळी कादंबरी कधी झाली ह्याबाबत मलादेखील माहिती नाही.

चांगदेव चतुष्टय हा शब्द बहुतेक स्वतः नेमाड्यांनीच वापरलेला आहे. सद्यस्थितीत चार कादंबर्‍या असल्याने मीदेखील चतुष्टय हाच शब्द वापरला आहे. मला वाटते चतुष्टय म्हटल्याने वा त्रिष्टय (वा जे काही असेल ते) म्हटल्याने फारसा फरक पडणार नाही. मी (बिढार + हूल) ही केवळ बिढार अशीच वाचल्याने माझ्या डोक्यात ती बिढार अशीच आहे. आणि म्हणुनच माझ्या लेखात हूलचा स्वतंत्र उल्लेख नाही.

Tue, 14/12/2010 - 14:45 Permalink

टण्याभाऊ,

फरक काहीसुद्धा पडत नाही हे पूर्णपणे मान्य.

सगळे लिहिताना तुमच्या लेखाचे कौतुक करायला हवे होते ते राहिले, आता करतो - लेख अत्यंत आवडला.
आणि सर्वात "जरीला" श्रेष्ठ हेही एकदम +१.

फक्त "चांगदेव चतुष्टय" असे नामकरण हे हल्लीचे मार्केटिंग गिमिक आहे एवढेच अधोरेखित करायचे होते.

- दिगम्भा

Tue, 14/12/2010 - 15:41 Permalink

श्री.टण्या आणि श्री.आनंदयात्री याना सांगितल्यानुसार 'चांगदेव' विषयसंदर्भात श्री.भालचंद्र नेमाडे यांच्यासमवेत झालेल्या - अनौपचारिक - गप्पावर बेतलेला प्रतिसाद देत आहे...इथे माझी स्वत:चीही मते गुंफली असल्याने या प्रतिसादातील चतुष्ट्य आणि मराठी कादंबरी ही निखळ नेमाडे यांची मते मानू नयेत. किंबहुना ज्यावेळी लेखकासमवेत झालेल्या बोलण्याला गप्पांचे स्वरूप असते त्यावेळी साहित्य सोडून अन्य विषयही चघळले जातात, त्यांचे प्रयोजन इथे घेत नाही.

~ त्याही अगोदर श्री.दिगम्भा यानी 'चतुष्ट्या' संदर्भात मांडलेला मुद्दा मान्य करताना मी असे म्हणतो की, जणू काही त्यानी माझे (आणि अन्य कित्यकांचे) सत्य मत मांडले आहे. त्या चतुष्ट्याचा चकवा हा प्रकाशकाच्या धंदेवाईकपणाचे मासलेदार उदाहरण आहे. आमच्या घरी बिढारची जी पहिली आवृत्ती आहे (तित 'हूल' चा पूर्ण भाग आहेच). त्यानंतर 'जरीला' आणि 'झूल' चे आगमन झाले.

१९७९ मध्ये 'झूल' बाजारात आली त्यावेळी पॉप्युलरने ब्लर्बवर थेट प्रकाशित केले आहे ते असे : "भालचंद्र नेमाडे यांच्या कादंबरी-चतुष्ट्यातील बिढार आणि जरीला नंतरची ही कादंबरी - झूल. या नंतरच्या हिंदू या कादंबरीने हे चतुष्ट्य पूर्ण होते." ~ इतकेच नव्हे तर श्री.भालचंद्र नेमाडे यानी स्वत:च (१९८१-८२) मध्ये शिवाजी विद्यापीठातील एका व्याख्यानात (ज्याचा इतिवृत्तांत त्यावेळचे मराठी विभाग प्रमुख व खुद्द नेमाडे यांचे घनिष्ठ मित्र डॉ.गो.मा.पवार यांच्याकडे आहे) म्हटले होते की; "सध्या हिंदूवर लक्ष केंद्रित आहे. या कादंबरीचा कॅनव्हास मोठा तर आहेच, पण मागील तीन कादंबर्‍याप्रमाणे नायक 'चांगदेव पाटील' नसून 'नामदेव भोळे' असू शकतो."

अर्थात...त्यानंतर त्यानी जी अंधारभावीत उडी मारली ती मारलीच व तब्बल ३० वर्षानंतरचे ते बाहेर येऊ शकले. पण तोपर्यंत तापी-नर्मदेतून भरपूर पाणी वाहुन गेले असल्याने चांगदेवच काय नामदेवपण नायक राहिला नाही तर तिसराच कुणी खंडेराव सामने आला. म्हणजेच श्री.दिगम्भा म्हणतात त्याप्रमाणे खर्‍या अर्थाने 'बिढार, जरीला, झूल' अशा तिकडीवरच सी.ए.पाटील याला पाहणे गरजेचे आहे....

पण, असे असले तरी सी.ए. बाबत चर्चा करायची झाल्यास त्याच्यावर 'हिंदू' ची नसली तरी 'कोसला' ची सावली येणारच. कारण एम.ए.साठी चांगदेव मुंबईत आला; पण 'पांडुरंग' बी.ए. पुण्यातून झाल्याने त्याच्यावरील तेथील संस्काराच्या सावल्या मुंबईतदेखील सी.ए.च्या साथीला होत्याच. विशेषतः लिटल मॅगेझिन चळवळ असो, 'कामिनी' असो (मूळ 'रहस्यरंजन'), प्रि.महाजन यांच्या अन्य विद्यार्थ्यांसमवेतच्या इंग्रती कादंबर्‍यावरील चर्चा असो....यांचे केन्द्र पुण्यातील त्याची कमाई होती. शंकर, सारंग, श्रॉफ, नाम्या, नारायण, भय्या आदी साहित्यप्रेमी मित्र ही चांगदेवाची जरी मुंबईतील कमाई असली, तरी प्रत्यक्षात मित्रांनी 'पांडू'चे जग समृद्ध केले होते ते पुण्यातील सुरेश बापट, मधुमिलिंद इचलकरंजीकर, नोबेल प्राईझ मिळविण्याचे स्वप्न असणारा तांबे, रॅगिंगचे ठरलेले हॉस्टेलवरील बकरे प्रधान, मेसच्या घोटाळ्यातील वैद्य....या मंडळीनी. यानीच खरेतर खेड्यातून आलेल्या पांडुरंगला विविध अनुभवातून असे सक्षम केले की, तो तरारुन उठला व मुंबईत आता नवीन नाव घेऊन डेरेदाखल झाला आणि त्यापुढील तीन कादंबर्‍यांतून मराठी साहित्याला त्याने भरघोस आठवणी दिल्या, ज्या आज ३५ वर्षानंतरही आपणास ताज्या वाटतात....त्या चतुष्ट्यावर कौतुकाचा वर्षाव होवो वा टीकेचे धोंडे पडोत, एक गोष्ट नक्की की बिढार आणि को. हे मराठी साहित्याच्य इतिहासातील मैलाचे दगड ठरलेले आहेत.

श्री.भालचंद्र नेमाडे यांच्यासमवेत अनेकविध विषयावर चर्चा करताना हे लक्षात येत होते की त्यांना मुलाखतीसम प्रश्नोत्तरापेक्षा गप्पातून उलगडत जाणारे विश्व फार भावते. उदा. आम्हा चार-पाच मित्रांना त्यानी अजिबात जाणवून दिले नाही की ते एक प्रथितयश कादंबरीकार आणि इंग्रजीचे नावाजलेले प्रोफेसर आहेत. शिवाजी विद्यापीठात ते पीएच.डी. उमेदवारांची व्हायवा तसेच दुसर्‍याच दिवशी करवीर नगर वाचन मंदिर येथे व्याख्यान आणि वाचक-सभासद अशा कार्यक्रमासाठी येणार असल्याने त्या दोन्ही दरम्यान आमच्यासाठी म्हणून एखादा तास मिळवावा असे आम्ही ठरविले. यासाठी त्यांना माझ्या मामांच्यातर्फे (जे नेमाडे यांचे अगदी अरेतुरेचे मित्रच आहेत) ज्यावेळी अशा अनौपचारिक चर्चेबद्दल त्यांची अनुमती मागितली त्यावेळीच त्यानी "चर्चा म्हणू नकोस, गप्पा म्हण...आणि प्रश्नही लिखित नकोत. सहज एकमेकासमोर बोलणे केल्यासारखे स्वरूप ठेव...." बैठक अर्थातच विद्यापीठ परिसरात नसल्याने, घरातील वातावरणात ते रमत असल्याने जितका वेळ त्यानी आम्हास दिला तो दिलखुलासपणाचाच होता. इथे हेही सांगणे आवश्यक आहे की, आता इथे त्या मुलाखतीचा (यालाही आता सात-आठ वर्षे होऊन गेली असल्याने) वृत्तांत देताना त्यावेळी काढलेली त्रोटक स्वरुपातील टिपणे आणि स्मरण यांच्या भरवशावर देत आहे....त्यामुळे तीत तपशिलाचा थोडा ढिसाळपणा तर जाणवेलच पण अमुक एक मत हे नेमाडे यांचेच आहे की नाही यावरही माझाच गोंधळ होण्याची शक्यता आहेच आहे.

इतरांच्यासमवेत एकदोन वाक्यात ओळख वगैरे सोपस्कार झाल्यानंतर लागलीच (वेळही एक तासच ठरला होता) मित्राने त्याना विचारले की, "आम्हाला चारी कादंबर्‍या वाचल्यानंतर सारखे जाणवते की तुमचा पांडुरंग सांगवीकर हा मुळातील भालचंद्र नेमाडेच आहे का?" याला हसून ते उत्तरले, "असे विचारणारे तुम्ही पहिलेच नसल्याने यावर माझे उत्तर आता अगदी तयार झाले आहे आणि ते असे की, वाचकाने कोणतेही कादंबरी हे त्या लेखकाचे आत्मचरित्र आहे असे समजून बिलकूल वाचू नये. म्हटलं तर लेखक जो लिहितो त्यातील बराचसा भाग हा त्याच्या अनुभवाचाही असतोच शिवाय खेड्यातून शहरात येणारा मुलगा बदललेल्या त्या नव्या जगाची काही टिपणे करतच असतो. प्रचंड मोठ्या शहरात आल्यामुळे नव्या मित्रांसमवेत त्याचे बुजरणे, साहित्याची आवड असल्यास त्या शहरातील साहित्याच्या परंपरेचा त्याच्या रूचीवर होणारा परिणाम टिपणे, शहरातील मुलींची खेड्यातील मुलींबरोबर त्याने तुलना करणे, स्वतःला त्या प्रवाहात झोकून देण्यासाठी काय काय नव्या गोष्टी शिकायला पाहिजेत, ही सारी गिमिक्स तो आत्मसात करण्याच्या नादाला लागतोच. त्यामुळे मी असे म्हणेन की पांडुरंग सांगवीकर हा एकट्यादुकट्याचे प्रतिनिधित्व करत नसून अशा नव्या जगात आलेल्या प्रत्येक पात्राची कहाणी सांगत आहे. आत्मचरित्राला एकप्रकारे ऐतिहासकतेचा वास असतो तो खरे तर कादंबरीत येऊ नये. त्यामुळे तुमच्यासारखे वाचक जेव्हा तो प्रश्न विचारतात त्याला माझे उत्तर आहे ही अन् नाही ही."

पुढच्याने विचारलेल्या "कोसलाच्या प्रवासास आता (सन २००२-०३) जवळपास ४० वर्षे होत आली आणि या दरम्यान चांगदेव तीन कादंबर्‍यांतून वाचकांसमोर आला तरी पांडुरंगची आठवण जाणे शक्य नाही असे आम्हाला वाटते. त्यामुळे आजही नेमाडे इज इक्वल टु कोसला असे म्हणावे का?" या प्रश्नाला मात्र नेमाड्यांनी गंभीरतेने घेतल्याचे आम्हाला जाणवले कारण मला आठवते उत्तरापूर्वी ते दोन मिनिटे शांतही होते. "पाचसहा वर्षापूर्वी एका दिवाळी अंकात याबद्दल मी लिहिले होते [त्या अंकाचे नाव त्यानी सांगितले होते, पण मला आता हा प्रतिसाद देताना स्मरत नाही...इंद्रा] तो शक्य झाल्यास मिळवा पण थोडक्यात सांगायचे झाल्यास ४० वर्षानंतरही जर मला कोसलाचाच लेखक म्हणून तुम्ही ओळखणार असाल तर याचा अर्थ मराठी वाचकाची रूचीच बदलली नाही. खरं तर ही कादंबरी वाचकाच्या मनातून पुसून टाकण्यासाठी नव्या पिढीतील कुणीतरी पुढे येणे गरजेचे होते; अजूनही येईल असा माझा विश्वास आहे. कादंबरी या साहित्य प्रकार त्यासाठीच असतो. कथेमुळे हे होत नाही [कथा या साहित्यप्रकाराविषयीची त्यांची मते टोकाची आणि जगजाहीर असल्याने आम्ही मित्रांनी 'कथा' हा विषयच काढला नव्हता...त्याला दुसरेही कारण असे की आम्हाला जितके नेमाडे प्रिय तितकेच जी.ए. आणि जर का जी.ए.बद्दल त्यानी अनुद्गार काढले असते तर त्या गप्पाचा नूरच बदलला असता...इंद्रा]. वाचकासाठी जर लेखक तयार होणार असेल तर ते साहित्याचे दुर्दैव आहे (याचा नेमका पंच मला त्यावेळी कळाला नव्हता...आजही नाहीच...इंद्रा) त्यामुळे मला असे वाटते की आपल्या वाचक समाजाची मनोवृत्ती इतक्या काळानंतरही बदलली आणि अजून कोसला आवडते वा नावडते यावर चर्चा चालू असेल हे काही एक लेखक म्हणून चांगलं लक्षण आहे असे मला वाटत नाही."

इथे थोडे थांबून ते असेही म्हटल्याचे आठवते की, "मी स्वतः असे मानतो की, बिढार आणि त्यापुढील दोन्ही कादंबर्‍या ह्या कोसलाच्या पुढच्याच एकदोन पायर्‍या आहेत...." [नेमके हेच शब्द नसतील मात्र त्यांच्या बोलण्याचा भाव नक्की असाच होता की ते 'बिढार, जरीला, झूल" आणि 'कोसला' यांचा एकमेकाशी संबंध आहेच आहे असे नेमाड मानतातच, त्यामुळे श्री.टण्या यांच्या लेखातील "....चांगदेव पाटलाचा उल्लेख आला की हमखास पांडुरंग सांगवीकरशी गल्लत होते. अनेकांना चांगदेव हा 'कोसला'तील पांडुरंगचाच पुढला प्रवास वाटतो. पण या दोन व्यक्तिरेखा एकमेकांपासून सहस्र योजने दूर आहेत...." या विधानाला आम्ही घेतलेल्या श्री.नेमाडे यांच्या मुलाखतीने छेद जातो, कारण खुद्द पांडुरंग आणि चांगदेव यांचा जनकच जर त्या दोघांचा प्रवास एकत्रच सर्व कादंबर्‍यातून आला आहे असे म्हणत असेल तर तर्काचा प्रश्नच उदभवत नाही.

वेल ~ प्रतिसाद फार मोठा होत आहे असे वाटू लागल्याने थांबतो. ~ जर आवडला तर झालेल्या चर्चेचा आणखीन काही भाग नंतर देता येईल.

इन्द्रा

Wed, 15/12/2010 - 09:16 Permalink

धन्यवाद :)
आधी विनंती केल्याप्रमाणे "लेखकाबद्दल" या सदराखाली हे लिखाण आल्यास जास्त लवकर नजरेत येउ शकेल असे वाटते, या चर्चेचा संदर्भ तिथे देता येईलच. तसे करायचे असल्यास मदतनीसाला हाक मारावी.

Sun, 19/12/2010 - 22:51 Permalink

धन्यवाद वल्ली....मला भीती वाटत होती की अस्ताव्यस्त लांबीचा प्रतिसाद वाचायला सदस्य कंटाळा करतील की काय. पण सुदैवाने तुम्हाला आवडला त्यामुळे थोडेसे बरे वाटले. इतरांचेही असेच मत झाले तर पुढील भाग जरूर देतो.

इन्द्रा

Wed, 15/12/2010 - 10:55 Permalink

मनातले सगळे लिहा.
मोठी मेजवानी वाटते आहे

सुटीवरुन आलोय त्यामुळे हळूहळू स्थिरावतोय ;)

लक्ष आहे माझे सर्व धाग्यांकडे

Wed, 15/12/2010 - 12:53 Permalink

वाचकासाठी जर लेखक तयार होणार असेल तर ते साहित्याचे दुर्दैव आहे (याचा नेमका पंच मला त्यावेळी कळाला नव्हता...आजही नाहीच...इंद्रा)

लेखकांनी (विशेषतः नवनव्या उन्मेषांच्या आणि नवनव्या जाणीवा अभिव्यक्तीत आणणार्‍या लेखकांनी) वाचकांची अभिरुची ही हळूहळू घडवली पाहिजे असं काहीसं त्यांना म्हणायचं असेल असं वाटतं. म्हणजे कोसलानंतरच्या चांगदेवाच्या कादंबर्‍यांत त्यांनी ते करून इतकी वर्षं होऊनही वाचक केवळ कोसलाच उचलून धरत असतील तर त्यांच्या दृष्टीनं ते वाचक अडकून पडल्याचं लक्षण आहे. अशा अडकलेल्या वाचकाला पुढे नेण्यापेक्षा, त्याला नवीन काहीतरी दाखवण्यापेक्षा त्याला काय प्रिय होईल याचा विचार करूनच जर पुष्कळसे लेखक लिहीत असले तर ते मराठी वाङ्मयाच्या एकंदर प्रगतीसाठी दुर्दैवी आहे असं त्यांना म्हणायचं असावं.

अवांतरः मला स्वतःला किरण नगरकरांची 'सात सक्कं त्रेचाळीस' ही कादंबरी 'कोसला'च्या जाणिवेशी नातं सांगणारी पण पुढल्या पिढीची प्रातिनिधिक वाटते. तिला कोसलाएवढी लोकप्रियता न मिळणं हे मराठी वाङ्मयसृष्टीचं अडकणं सूचित करतं असंही वाटतं.

Wed, 15/12/2010 - 14:57 Permalink

"....इतकी वर्षं होऊनही वाचक केवळ कोसलाच उचलून धरत असतील तर त्यांच्या दृष्टीनं ते वाचक अडकून पडल्याचं लक्षण आहे...."

~ खरंय चिं.जं.; आणि वाचकानं असं हे एकाच कादंबरीत वर्षानुवर्षे गुंतून पडणे खुद्द नेमाडे यांनाही साफ नामंजूर आहे. विविध ठिकाणी दिलेल्या व्याख्यानात (आज २०१० सालीही त्यांनी अगदी मिसळपावला मुलाखत देऊ केली, तर मुलाखत घेणारी व्यक्ती हमखास 'कोसला' बद्दल त्याना प्रश्न विचारणार हे सर्वानी गृहीत धरलेले असतेच असते) या इतिहास घडविणार्‍या कादंबरीविषयी प्रश्न विचारतातच. ही बाब नेमाड्यांना मराठी कादंबरीच्या विकासाच्या दृष्टीने दुर्दैवाची वाटते (हा 'दुर्दैवी वाटते' उल्लेख माझा नसून दस्तुरखुद्द नेमाडे यांचाच आहे). त्यांची अशीही अपेक्षा होती की, मराठी भाषेतून इतके विपुल लेखन करणार्‍या स्त्री लेखिका आहेत तर या मुलींच्यातून कोणीतरी एक पांडुरंग सांगवीकरासारखी एक स्त्रीलिंगी आवृत्ती निर्माण करायला हवी होती. पण ते आजही होईल असे दिसून येत नाही.

(माझ्या दृष्टीने आपल्या आत्ताच्या कविता महाजन आणि थोड्या सीनिअर गौरी देशपांडे वा सानिया यांच्याकडे ते 'जर्म्स' आहेत. मनात आणले तर कविता महाजन नेमाड्यांचे अपील स्वीकारतील असे वाटते. ~~ कविताताईंनी यासाठी तरी किमान हा प्रतिसाद वाचावा.)

इन्द्रा

(अवांतर : "सात सक्कं त्रेचाळीस" बाबतचे तुमचे आणि माझे मत काही वेगळे नाहीच. पण "मौज" च्या उदासपणामुळे ती कादंबरी जितकी समोर येणे गरजेचे होते तितकी आलीच नाही. शिवाय नगरकरांनीच नंतर मराठीकडे कायमची पाठ फिरविल्याने दोन्ही पक्षाला त्याची आवश्यकताही वाटली नाही.....हे मराठी कादंबरीच्या वाटचालीचे दुर्दैवच !)

Wed, 15/12/2010 - 23:31 Permalink

अवांतरः इंद्रा, तू लिही ना 'सात सक्कं त्रेचाळीस'वर. मी पुस्तक आणून ठेवलंय घरात. वाचायच्या आधी काही पार्श्वभूमी मिळाली तर मजा येईल वाचायला.

Thu, 16/12/2010 - 10:32 Permalink

मेघना...तुझ्या वाचनाची व्याप्ती मला इथे आल्यानंतर कळाली आहेच, असे असूनही तू मला 'सात...." वर लिही म्हणत्येस म्हणजे माझा एकप्रकारे तू गौरवच करीत आहेस.

लिहिण्याचा जरूर विचार करतो...पोस्ट करतो, पण वाचल्यानंतर, "कुठून दुर्बुद्धी सुचली आणि या इंद्राला लिहायला सांगितले...." असे किंचाळू नकोस म्हणजे झालं...!

इन्द्रा

Thu, 16/12/2010 - 11:22 Permalink

लिही की आता. अजून पुस्तक वाचायला घेतलं नाही मी, थांबलेय.

अवांतरः व्याप्ती काय, गौरव काय! नीट नाक्यावर उभा राहून चेष्टामस्करी केल्यासारखं नॉर्मल बोलशील का?!

Fri, 24/12/2010 - 13:11 Permalink

लेख. दिवाळी अंकात इतर लेखांच्या भाऊगर्दीत वाचायचा राहून गेला होता, तो आज निवांत वाचून काढला. इंद्राच्या पुढच्या प्रतिसादाची वाट पाहतो आहे.

Thu, 30/12/2010 - 04:14 Permalink

नंदन म्हणतो तसेच अगदी मी ही म्हणतो इंद्रराज
वाट बघतो आहे
लवकर लिहा :)

अवांतरः
तुमच्या अर्ध्या प्रतिसादामुळे आणि टण्याने लिहिलेल्या या सुंदर लेखामुळे चांगदेव चतुष्टय ची आजच ऑर्डर दिली. सुदैवाने सगळी पुस्तके मिळालीत (रसिक साहित्यकडे) उगवत्या नवीन वर्षाच्या प्रभाती हाती चांगदेव चतुष्टय येणार हे नक्की :)

Thu, 30/12/2010 - 19:59 Permalink

सी. ए. पाटील. चांगदेव पाटील. खेड्यात, भल्या मोठ्या वाड्यात, खंडीभर माणसांच्या कुटुंबात, अर्धवट लुच्च्या पण कष्टाळू आणि धूर्त-व्यवहारी पण पोकळ प्रतिष्ठेच्या मागे असणार्‍या बापाचा, मुंबईत जाऊन विदेशी - म्हणजे खरंतर पाश्चिमात्य व्यक्तिवादी - मूल्यांच्या आधारे इंग्रजीत एम.ए. केलेला मुलगा. एम.ए.ची मुंबईतली दोन वर्षे व त्यानंतर नोकरीची - तीन वेगवेगळ्या गावी घालवलेली - तीन वर्षे, असा पाच वर्षांचा एकूण प्रवास म्हणजे चांगदेव चतुष्टय. मुळे घट्टपणे शेतीत, खेड्यात, प्रचंड अडगळीच्या वस्तूंनी भरलेल्या संस्कृतीत रुतलेली तर पौगंडावस्थेपासून अतिशय संवेदनशील मनावर विविध कलाविष्कारांच्या, विशेषतः साहित्याच्या, माध्यमातून ओळख झालेल्या विविध संस्कृती, त्यांतील विचारधारा, त्यांतली मूल्ये यांचा झालेला संकर, यांनी चांगदेवला हलवून-भेलकांडून सोडलेला. त्यातच स्वातंत्र्य फोल ठरवत, जातींची गुंतवळ घट्ट करत जाणारी राजकारणाची दिशा, समाजात पडणारे तिचे प्रतिबिंब, अव्यावहारिक शिक्षण देणारी धंद्यासाठी काढलेली खंडीभर कॉलेजं आणि असली कॉलेजं चालवायला लागणारे खंडीभर मास्तर पैदा करणार्‍या यंत्रणेत पहिल्यांदा विद्यार्थी म्हणून आणि नंतर मास्तर म्हणून चांगदेव आपल्याला बिढार-हूल-जरीला-झूल ह्या चार कादंबर्‍यांतून भिडत जातो.

चांगदेव पाटलाचा उल्लेख आला की हमखास पांडुरंग सांगवीकरशी गल्लत होते. अनेकांना चांगदेव हा 'कोसला'तील पांडुरंगचाच पुढला प्रवास वाटतो. याचे प्रमुख कारण म्हणजे नेमाडे आणि 'कोसला' हे समीकरण अतिशय घट्टपणे डोक्यात बसलेले असणे आणि दुय्यम कारण म्हणजे पांडुरंग आणि चांगदेव ही खणखणीत मातीच्या रंगाची नावे असलेले नायक. पण या दोन व्यक्तिरेखा एकमेकांपासून सहस्र योजने दूर आहेत. पांडुरंग ही 'एका विशीतल्या, खेड्यातून शहरात येऊन शिकतानाच्या झंझावातात आयुष्याचा अर्थ शोधत निराशेच्या गर्तेत सापडलेल्या व पराभूत होऊन आत ओढल्या गेलेल्याची' गोष्ट आहे. ती अत्यंत स्वकेंद्रीत, केवळ पांडुरंगाच्या मनोव्यापाराचा शोध घेत व आजूबाजूच्या घटनांचा, स्थळकाळाचा केवळ तदनुषंगाने (incidental) आधार घेत पुढे गेलेली कहाणी आहे. चांगदेव याविरुद्ध जगाला भिडत, झगडत, आयुष्य स्वत:च्या निकषांवर तपासत, तत्त्वांवर तोलत जगण्याचा प्रयत्न करतो. अर्थात त्याच्याच अर्धवट संस्कृती-संयोगातून वाढलेल्या मूल्यव्यवस्थेत तो भरडला जातो. 'जरीला'मध्ये येणारा त्याचा मुलगी बघायला जाण्याचा प्रसंग हा या सगळ्याचा परिपाक आहे. तिशी जवळ आलेल्या त्याच्या शरीराला सहन होत नसलेली स्त्रीसुख-स्त्रीसहवासाची अनुपलब्धता, कुटुंबव्यवस्थेच्या, लग्नसंस्थेच्या पायावर घट्ट उभ्या असलेल्या समाजव्यवस्थेमधले त्याचे कारेपण हे त्याच्या मनाला लग्नासाठी तयार करत जाते. पण मुलगी बघायला गेलेला असताना त्याच्या आत्याच्या नवर्‍याचे फुकट एका रात्रीचा मुक्काम उपटण्यासाठी बकाल ठिकाणी राहणे, घाणेरडे-अस्वच्छ गाव, त्यात राहणार्‍या लोकांना त्याचे काहीच वाटत नसणे याची त्याला चीड येऊ लागते. आणि शेवटी 'एकदा बघून, केवळ सुंदर आहे म्हणून, झोपायला हक्काची व बरोबर कुणी हवे म्हणून करुन घ्यायची बायको' या दाबून ठेवलेल्या विचारांनी उसळी मारता तो हादरून जातो. आपल्या अवताराकडे मुद्दाम दुर्लक्ष करत, ढगळ मनिला आणि चुरगळलेली पँट घालून तो ती मुलगी पहायला जातो व स्वत:चे हसू करून घेतो. आता हा मनिलासुद्धा त्याने चांगले कापड विकत घेऊन मुद्दामहून बाजारातल्या एका साध्या शिंप्याकडून, ज्याच्याकडे पायजमे-सदरे शिवणे व चोळ्यांना दंड लावून देणे यापलीकडे इतर काही काम होत नाही, तो शिंपी नाही-नाही म्हणत असताना शिवून घेतलेला. त्या शिवून घेण्यामागे चांगदेवला असलेला मोठ्या चकचकीत दुकानांचा राग, त्या शिंप्याचे रस्त्यावरून उंच आत दिसणार्‍या सोप्यावरचे मशीन, त्या मशीनच्या सभोवताली असलेले त्याचे कुटुंब आणि त्यातला रोमँटिकपणाच जास्त कारणीभूत आहे. खेड्यातली साधी राहणी त्याला रोमँटिक वाटत राहते तर तिथल्याच जातीपातींनी बरबटलेल्या समाजजीवनाचा तो मनापासून तिरस्कार करत राहतो. अशा अनेक अंतर्गत विरोधाभासांनी तो पार वैतागून, झिजून जातो.

चतुष्टय लिहिले गेले सत्तरच्या दशकात. लक्षात घ्या की, तेव्हा मंडलचा उगम व्हायचा होता, मराठा-दलित अशी ब्राह्मणविरोधी युती करण्याचे प्रयत्न उघडपणे सुरू व्हायचे होते. पण या दिशेने होणारा प्रवास, त्यामागची विविध जातींतील, थरांतील लोकांची भूमिका नेमाड्यांनी फार बारकाईने आणि मुख्य म्हणजे अचूकतेने मांडली आहे. नेमाडे एक लेखक म्हणून कुठेही प्रचारकी भूमिका घेत नाहीत, तर केवळ एक प्रेक्षक बनून ते सर्व मते वेगवेगळ्या पात्रांमार्फत पुढे ठेवत जातात. अर्थात हे मांडताना कुठेही 'बघा मी कशी सर्व मते निष्पक्षपातीपणे मांडतोय' असाही अभिनिवेश नाही की चतुष्टयाचा त्यापायी माहितीपटही होत नाही. इथे नेमाड्यांनी घेतलेली शैलीवरची (craft) मेहनत दिसून येते. संपूर्ण कादंबरीत वर्णने, संवाद कुठेही अडखळत नाहीत, अवघडत नाहीत. त्यांचा प्रवाह अगदी नेमका आहे. एवढ्या मोठ्या कॅनव्हासवर केवळ एका मध्यवर्ती पात्राच्या दृष्टिकोनातून चार कादंबर्‍या उभ्या करणे हे सोपे नाही. महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या भागांतले लोक, त्यांचे बोलीभाषेतले हेल, खास शब्द, प्रत्येकाची जातीनुसार, शिक्षणानुसार बदलणारी भाषा या बारीकसारीक गोष्टी एकूण कलाकृतीला समृद्ध करतात. बोडसाचे उलट क्रमाने अक्षरे लावत बोलणे, गायकवाडचे 'असं बोललं तर वावगं ठरणार नाही', पाटील बहुसंख्य असलेल्या कॉलेजातले 'ओ सी.ए., तुम्हाला एस.जीं.नी बोलावलंय असा पीपींनी निरोप द्यायला सांगितलाय' छापाचे संवाद, मिश्रा-अगरवाल-भल्लासारख्या बाहेरच्या प्रदेशांतून महाराष्ट्रात आलेल्या लोकांची बोली असे अनेक बारकावे चतुष्टयात जाणवत राहतात.

समीक्षक नेमाडे लेखक नेमाड्यांवर कुरघोडी करत नाहीत, हे या चतुष्टयाचे फार मोठे यश आहे. भले भले लेखक स्वत:च्या साहित्यविषयक-जीवनविषयक भूमिकांचे जाणतेअजाणतेपणी प्रचारक होतात. मग अ‍ॅन रँडसारखी बाई पानेच्या पाने प्रचारकी थाटात लिहिते, तर अल्बेर कामीसारखा लेखक अप्रत्यक्षरीत्या का होईना पण आपल्या पात्रांमार्फत आपले तत्त्वज्ञान पुढे रेटतो. समीक्षक नेमाडे आपला देशीवाद, विध्वंसक टीकाकारगिरी यांचा प्रभाव चांगदेवच्या व्यक्तिमत्त्वावर टाकत नाहीत. ते चांगदेव जसा असेल तसा त्याला वाढू देतात. त्याच्यावर झालेल्या विदेशी मूल्यांच्या संस्कारांमुळे त्याला हिणकस ठरवत नाहीत. त्याची असलेली साध्या राहणीची/खेड्यांबाबतची आवड ही त्यामागील 'रोमँटिकपणा' अधोरेखित करून आपल्यासमोर ठेवतात.

मुंबईत बी.ए.ची पहिली काही वर्षे चांगल्या मार्कांनी पास होत, आईवडिलांना अभिमान, आशा वाटायला लावत शिकत निघालेला चांगदेव तिसर्‍या वर्षी नापास होत बिढारला सुरुवात होते. लघुनियतकालिकांची चळवळ, मुंबईतल्या कार्‍या, काहीतरी महान लिहिण्याची आशा बाळगत (आणि थोडीफार कुवतदेखील बाळगत) जगणार्‍या, एकप्रकारे आपल्याच विश्वात रममाण असलेल्या तरुणांचं चित्र नेमाडे ह्यात उभे करतात. अर्थात 'बिढार'मधली काही पात्रे फार साचेबद्ध वाटतात. कुळकर्णी प्रकाशक, सारंग - शंकर - कुळकर्णी प्रकाशक यांच्यातले संबंध, रामराव व त्यांची प्रेस, नारायणचे कम्युनिस्ट कार्यकर्ता असणे व एकदम व्यावसायिक जगात यशस्वी होणे आणि त्याच जगातली एक बायको करणे वगैरे फार नाटकी होते. पण त्याच जोडीने चांगदेवचा कुष्ठरोगसदृश आजार आणि त्या आजाराचे कुठेही सहानुभूती निर्माण करणारे व भयाण वर्णन करणारे प्रसंग न आणता केवळ चांगदेवची त्यात होणारी घुसमट, चांगदेव व त्याच्या वडिलांमधील तणाव, त्याची कौटुंबिक पार्श्वभूमी इत्यादी गोष्टी 'बिढार'मध्ये फार ठामपणे उभ्या राहतात. चांगदेवचा father-complex त्याच्या संपूर्ण जडणघडणीत फार प्रभाव टाकतो. नेणिवेच्या पातळीवर, अगदी लहानपणापासून 'वडील' आदर्श असणे, मोठे होत गेल्यावर त्यांचा आत्यंतिक स्वार्थीपणा पण घरासाठी उपसलेले कष्ट, बहिणी-पुतण्यांची लग्ने जुळवताना खाल्लेल्या खस्ता, पण एका बाजूला भावांना शिक्षणासाठी पण पैसे न देणे, आणि या सगळ्या आर्थिक विवंचनांतून चांगदेवला शिकण्यासाठी मुंबईला पाठवणे, त्याच्यावर इतरांच्या हिश्शातला खर्च करणे, या सगळ्याचे एक प्रचंड पश्चात्तापदग्ध 'बिढार' चांगदेव पाठीवर बाळगत राहतो. 'बिढार'चा अर्थ त्याच्या शेवटी असा संपूर्णपणे उलगडतो.

केवळ आला मनात विचार, उतरवली कादंबरी आणि मग तिला उत्स्फूर्त वगैरे लेबल लावून समर्थन केले असा प्रकार नेमाडे करत नाहीत. बिढार, जरीला आणि झूल. शीर्षकेसुद्धा किती विचारपूर्वक आणि समर्पक निवडली आहेत. चांगदेवच्या लहानपणी एक मांग चांगदेवच्या घरातल्या जरीला नावाच्या एका धष्टपुष्ट बैलाच्या अंडांना लोणी चोळतो व मग जरीलाला आडवे पाडून त्याची आंडे दगडावर दगडाने ठेचून फोडतो. पुढे हा जरीला बैल मरेपर्यंत शेतावर राबराब राबतो. हा प्रसंग खरेतर येतो 'बिढार'मध्ये. संपूर्ण 'जरीला' कादंबरीत कुठेही याचा उल्लेखसुद्धा येत नाही. पण जेव्हा 'जरीला' वाचून होते आणि हा संदर्भ लक्षात येतो तेव्हाची वाचकाची अनुभूती केवळ अवर्णनीय असते.

'जरीला' हे माझ्या मते चतुष्टयातले सर्वांत उंचीवर पोचलेले पुस्तक. यात चांगदेव सर्वांत जास्त झटून शिकवतो, मुख्य प्रवाहात, समाजाच्या जंजाळात येण्याचा जीव तोडून प्रयत्न करतो आणि स्वतःशीच झगडत अधिकाधिक उघडानागडा होतो. शैलीच्या व भाषेच्या दृष्टीनेसुद्धा 'जरीला' काही अंगुळे वरती आहे. त्याचा 'कोळी' मित्र, जत्रेतला पोपटांचा खेळ, जनरेटर उडाल्याने सहा महिने गावात वीज नसणे, तो राहत असलेल्या इमारतीत खालच्या मजल्यावरचे नुकतेच लग्न झालेले जोडपे, चौधरी व त्यांचे एकारलेपण असे एकसे एक प्रसंग, पात्रे 'जरीला'त येतात. 'कोसला'मध्ये जसे मनीच्या मृत्यूनंतरचे 'अजंठा' प्रकरण एका वेगळ्या उंचीवर जाते त्याप्रमाणे धाकटा काका कामाला असलेल्या साखरकारखान्याच्या आवारातल्या सी-क्लास क्वार्टर्समधल्या त्याच्या एका खोलीच्या संसारात जेव्हा तो आठवड्याभरासाठी सुट्टीत जातो, तेव्हा त्याला जाणवलेली 'ओल' यावर जे भाष्य येते ते केवळ अप्रतिम.

'आलीया भोगासी' वृत्तीकडे सरकत अंगावर झूल पांघरून चांगदेव तिसर्‍या नोकरीत तिसर्‍या गावी धडकतो. पुन्हा एकदा कॉलेजातले राजकारण - ख्रिश्चन कॉलेज झाले, मराठा कॉलेज झाले - आता ब्राह्मण कॉलेज आणि चांगदेवचे नव्या गावी उत्साहाने जाणे व फुग्यातली हवा निघून जावी तसा त्याचा उत्साह कमी कमी होत जाणे, हेच पुन्हा की काय असा प्रश्न 'झूल'च्या सुरुवातीला पडतो. पण 'झूल'मध्ये नेमाडे शहरातले जातीय राजकारण, खेड्यातल्या लोकांचे शहराकडे स्थलांतर, त्यात पुन्हा पददलितांची त्यातली भूमिका इत्यादी गोष्टी चांगदेवला प्रेक्षकाच्या भूमिकेत बसवून भोळेप्रभृती पात्रांकरवी मांडतात. महाराष्ट्राच्या राजकारणाचा सत्तर ते आजवरचा कॉंग्रेस-शिवसेना-शिवधर्म-मनसे असा वळणावळणांनी झालेला प्रवास बघताना त्याची मुळे किती नेमकी एका ललित (फिक्शन) कलाकृतीत आलेली आहेत हे दिसून येते.

चतुष्टयात जशी विविध पुरुषपात्रे ठळकपणे उभी राहतात तसे कुठलेच स्त्रीपात्र येत नाही. अर्थात स्त्री-पुरुष संबंधच जिथे झाकून होतात तिथे चांगदेवला मुद्दाम एक मैत्रीण देणे थोडेसे कृत्रिम वाटले असते. 'झूल'मधली टुरिझम डिपार्टमेंटमधली 'राजेश्वरी' अशी थोडीशी ओढूनताणून आणल्यासारखी वाटते. त्यातल्या त्यात सविस्तरपणे येते ती पारू सावनूर. चांगदेवचा एकूण बाज बघता पारूचे ख्रिश्चन असणे, ख्रिश्चन असली तरी इथल्याच मातीत रुतलेली मुळे आणि परधर्म यांमुळे पारुला आलेले एक विचित्र उपरेपण आणि ते उपरेपण समजण्याची कुवत, तिची रोमँटिक उदासी, एक प्रकारचे प्रौढत्व हे सगळे खरेतर चांगदेवला अगदी साजेसे. तोदेखील ते उमजून एकदम चांगल्या शहरातल्या कॉलेजात नोकरीसाठी अर्ज टाकायला लागतो. आंतरराष्ट्रीय नियतकालिकात टीकालेख पाठवतो. त्या मुलीसाठी आहे त्या सिस्टीममध्ये तडजोड करुन जगण्यासाठी तो तयार होतो. पण पारूचे आणि चांगदेवचे अलग होणे फार कमकुवतपणे येते - फार अ-चांगदेवी वाटते. हा एक कच्चा दुवा या चतुष्टयात राहून गेलाय असे वाटते. पवारांची आई, धाकट्या काकाची बायको आणि तिची गुजराती शेजारीण, बोडसांची बायको व तिची दूध आणि अंडी माठात ठेवण्याची युक्ती वगैरे प्रसंगांतून इतर स्त्रिया मात्र फार सहजतेने नेमाडे रंगवून जातात.

ज्याप्रमाणे दलित लेखकांनी त्यांच्या आत्मचरित्रात्मक पुस्तकांनी मराठी साहित्य समृद्ध केले त्याचप्रमाणे सत्तरच्या दशकातले बदलते राजकारण, समाजव्यवस्था, मूल्यव्यवस्था व तिचा एका संवेदनशील - स्वत:च्या मूल्यांबाबत, विचारांबाबत जागृत आणि विश्लेषकी असणार्‍या कार्‍या तरुण शिक्षकाच्या आयुष्यावर होत गेलेला परिणाम, हा जो एक मोठा पट चतुष्टयात मांडला गेलेला आहे तो केवळ एक रंजक ललित कलाकृती नसून मराठी साहित्यातला एक महत्त्वाचा ठेवा आहे.

-------------------
(हा लेख 'मायबोली.कॉम'च्या २०१० दिवाळी अंकात प्रसिद्ध झाला आहे. ह्या लेखाचे मुद्रणशोध, इतर संस्कार दिवाळी अंकाच्या संपादक मंडळाने केले असून त्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो.
पुस्तकविश्ववर सगळेच वाचक असल्याने ह्या लेखावर इथे चर्चा होइल व ज्ञानात भर पडेल ह्या अपेक्षेने तो इथे देत आहे.)