Submitted by प्रभाकर नानावटी on
आनंदयात्री

छान. लेख आवडला.
छापिल पुस्तके खरेच कालबाह्य होतील की काय असा प्रश्न पडला !

Fri, 10/12/2010 - 08:30 Permalink
अभिजितमोहोळकर

कालबाह्य होतील असे वाटत नाही, कारण कुठेही वाचू शकण्याची सोय छापील पुस्तकाचे बलस्थान आहे. मात्र जर ऑडिओ-बुक्स सहज आणि प्रवडेल अशा किमतीत उपलब्ध झाली तर कदाचित फरक पडू शकेल. स्टीफन फ्राय ह्या नटाने हॅरी पॉटरच केलेले वाचन उपलब्ध आहे. पण ह्यात वाचनाच्या दर्जा अनन्यसाधारण महत्त्वाचा ठरेल.

Fri, 10/12/2010 - 10:19 Permalink
अभिजितमोहोळकर

माधव मोहोळकरांनी आपल्या गीतयात्री या पुस्तकात हिंदी चित्रपटातील गाण्यांविषयीच्या लिखाणाला एका वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवल आहे. हिंदी चित्रपटसंगीत ह्या विषयावर एव्हढ दर्जेदार लिखाण होऊ शकत हे त्यांनी दाखवून दिल. मोहोळकरांचे मित्र, गीतकार शैलेंद्र ह्यांच्या निधनानंतर, एकदा त्यांचे शैलेंद्रवरचे बोलणे ऐकून राम पटवर्धनांनी त्यांना मौज मासिकासाठी लिहायला सांगितल.

Fri, 10/12/2010 - 12:28 Permalink
यशोधरा

कितीही डीजिटल सुधारणा आल्या तरी एखादे नवे पुस्तक विकत घेऊन, ते उघडून, त्या नवीन पानांचा गंध मनसोक्त घेऊन ते वाचायला सुरुवात करायची मजा औरच आहे! डीजीटल सुधारणांमुळे वाचकाचा फायदा आहे हे खरंच, पण तरीही छापिल पुस्तक खरेदी हा फार स्वांत सुखाय असा अनुभव आहे आणि तो सोडायची माझी तरी तयारी नाहीये! :)

Fri, 10/12/2010 - 14:16 Permalink
मृदुला

>>त्या नवीन पानांचा गंध मनसोक्त घेऊन
मला वाटते पुढच्या इ पुस्तकवाचकात गंध तयार करणारे यंत्रही असेल. (विजेटला मराठीत काय म्हणावे?)

पुस्तके तयार करणे येत्या १०० वर्षात थांबेल असे मला वाटते.

Sun, 12/12/2010 - 07:05 Permalink

माधव मोहोळकरांनी आपल्या गीतयात्री या पुस्तकात हिंदी चित्रपटातील गाण्यांना एका वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवणार्‍या गायक-गायिकांच्या, गीतकारांच्या शैलीविषयीच्या शीर्षकांसाठी त्यांच्या गाण्यातील ओळी निवडल्या आहेत. ती गाणी ऐकत ऐकत लेख वाचत गेल्यास आणखी मजा आली असती असे राहून राहून वाटू लागते. अशीच प्रतिक्रिया जी.एंची इस्किलार कथा वाचताना वा दुर्गा भगवत यांचे ऋतुचक्र वाचतानाही थोड्याफार प्रमाणात वाटते.

कलामाध्यमांचा रसास्वाद
जेव्हा आपण अशा प्रकारची वेगवेगळ्या कलामाध्यमाविषयी लिहिलेली पुस्तकं वाचण्यास घेत असतो तेव्हा प्रत्यक्ष पुस्तक वाचताना त्यात नमूद केलेली गाणी, वास्तुशिल्प, प्रवासस्थळ, प्रसंगांचे दृश्य चित्रण, पेंटिंग्स इत्यादींचाही आस्वाद घेणे शक्य झाल्यास आपल्या रसिकतेत, रसग्रहणात नक्कीच आणखी भर पडली असती. परंतु त्या काळी तशी सोय नव्हती. सर्व काही वाचकांच्या कल्पनेच्या भरारीवर सोडून दिले होते. त्यामुळे आपण फक्त कल्पना करू शकतो.

आज जर अशा प्रकारचे आशय रसिकापर्यंत पोचवायचे असल्यास सर्जनशील कलावंत अंकीकरण (डिजिटाइज्ड) स्वरूपात त्यातील संदर्भांना इंटरलिंक देत पेश केला असता. कृती वाचता वाचता संदर्भांचे तपशील ऐकवण्याची - बघण्याची सोय उपलब्ध करून दिली असती. लेखकाच्या अशा प्रयत्नांना वाचकांकडून भरभरून प्रतिसाद मिळाला असता.

अमरत्वाची आस
माहिती तंत्रज्ञानातील अभूतपूर्व प्रगती व त्यातील घटकांची पुनर्बांधणी व लघुरूपीकरण यामुळे आजच्या सर्जनशील साहित्यिकाला अंकीय अमरत्वाची (डिजिटली इमॉर्टल) ओढ लागली आहे असे म्हणण्यास वाव आहे. यापूर्वीच्या आपल्या आवडत्या साहित्य कृतीचे अंकीकरण करून संगणकात उतरवून घेण्यासाठी व संगणकाच्या पडद्यावर बघण्यासाठी, त्यांचे चाहते जिवाचे रान करत आहेत. शेकड्यांनी नव्हे तर हजारोंनी पुस्तकं डिजिटाइज्ड होत आहेत. स्कॅनरच्या साहाय्याने ओसीआर वापरून यापूर्वी प्रकाशित झालेल्या (दुर्मिळ!) साहित्यकृतींची इ-आवृत्ती इंटरनेटवर उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. (भारतीय भाषेसाठी ओसीआरची सोय कुणीतरी करत असेलच!) प्रकाशक, लेखक, नियतकालिकांचे संपादक, केवळ मुद्रित साहित्य निर्मितीत समाधानी नाहीत. स्वत:च्या किंवा कुठल्यातरी संकेतस्थळावर आपल्या साहित्यकृतीची माहितीवजा जाहिरात असावी असे वाटत आहे. डिजिटाइज्ड स्वरूपात संपूर्ण कृती उपलब्ध करून देण्याचीसुद्धा त्यांची तयारी आहे. जास्तीत जास्त प्रसिद्धी (व त्यातून पैसा!) यासाठी इंटरनेट व अंकीकरणाला पर्याय नाही अशी स्थिती आज आहे. प्रकाशक, लेखक वा नियतकालिके यांच्या संकेतस्थळांची माहिती मुद्रित साहित्याच्या दर्शनी भागावर मुद्दामहून दिली जाते. त्यांची संपूर्ण साहित्यसूची, अनुकूल परीक्षण, वाचकांची स्तुतीसुमने, छोट्या-मोठ्या समारंभांची बातमी, शक्य असल्यास अंकीकरण केलेली आवृत्ती इत्यादींनी संकेतस्थळावरील वेबची पानं भरल्या जातात. कदाचित यानंतरच्या आधुनिक, कमावत्या पिढीला आपापल्या कृतींचा परिचय करून देणारा हाच एकमेव मार्ग आहे असे गृहित धरले जात असावे.

पुस्तकांचे अंकीकरण
सर्च इंजिनची मक्तेदारी असलेल्या गूगलसारख्या कंपन्या आजपर्यंत किती पुस्तकांचे अंकीकरण झाले आहे याचा निश्चित आकडा सांगायला तयार नाहीत. तरीसुद्दा या संबंधात काही अंदाज करता येईल. उदाहरणार्थ गूगल कंपनीने बर्कले विद्यापीठाबरोबर अंकीकरणासंबंधी करार केला आहे. त्यानुसार रोज तीन हजार पुस्तकांचे अंकीकरण होत असावे. अशा प्रकारचे करार गूगलनी बारा विद्यापीठांशी केला असून अंकीकरण करण्यात येणाऱ्या पुस्तकांच्या प्रकाशकांची संख्या कित्येक हजाराच्या घरात असेल. हे आकडे बरोबर आहेत असे गृहित धरल्यास गूगल दर वर्षी किमान दहा लाख पुस्तकांचे अंकीकरण करत असेल. एका ढोबळ अंदाजानुसार ही कंपनी 2008 पर्यंत सुमारे सत्तर लाख पुस्तकांचे अंकीकरण केली आहे.

अशा प्रकारच्या अंकीकरण प्रकल्पात केवळ गूगल ही एकमेव कंपनी नसून इतरही अनेक कंपऩ्या वेगवेगळे प्रकल्प राबवित आहेत. इंटरनेट अर्काइव्ह ही कंपनी अलेक्झांड्रिया विद्यापीठाच्या ग्रंथालयाचे आधुनिकीकरण करत असून अंकीकरण केलेल्या मुद्रित साहित्य कृतींना व दृक्-श्राव्य स्वरूपातील डीव्हीडींना सार्वजनिक वितरणासाठी उपलब्ध करून देण्याचा मानस आहे. मायक्रोसॉफ्ट, अमेझॉन, व याहू या कंपन्यासुद्धा अंकीकरणाच्या क्षेत्रात मागे नाहीत. या कंपन्या वेबसर्च व वैयक्तिक ग्रंथसंग्रहांचे अंकीकरण करत असून गूगलचे कट्टर प्रतिस्पर्धी असे मानल्या जातात. अनेक नामवंत प्रकाशन कंपन्या या स्पर्धेत उतरल्या आहेत. परंतु गूगलच्या तुलनेत या कंपन्या फार कमी पडतात.

अंकीकरणाने उपस्थित केलेले प्रश्न
अंकीकरणाचे लोण असेच वाढत गेल्यास या संबंधातील अनेक प्रश्नांची उत्तर शोधावी लागतील. यानंतरच्या काळात मुद्रित पुस्तकं कुणी वाचतील की नाही? हा त्यापैकी एक महत्वाचा प्रश्न आहे. गाण्यांच्या आल्बममधून गाण्यांना मुक्त केल्याप्रमाणे आधुनिक तंत्रज्ञान पुस्तकातील पानांना मुखपृष्ठ - मलपृष्ठांच्या जाचक बांधणीतून मुक्त करत आहे की काय? ज्या तर्‍हेने संगीत उद्योगाने गाण्यांच्या तबकड्या, टेप्स, कॅसेट्स्, सीडी, डीव्हीडी यांची क्रमेण हकालपट्टी करत करत आंगठ्याएवढ्या आय-पॉड्समधून एमपी 3-4-5 द्वारे हजारो गाणी संग्रहित करून देण्याची सोय करून दिली, त्याला तोड नाही. तसेच पुस्तकांच्या संदर्भातसुद्धा काही तरी अभूतपूर्व घडू शकेल का? पुस्तकांचे इंटरलिंकिंग केल्यास नेमके काय होईल? शेवटी पुस्तक म्हणजे नेमके काय?

आधुनिक माहिती तंत्रज्ञानातील घोडदौडीचा अंदाज घेतल्यास मुद्रित पुस्तकांच्या आताच्या स्वरूपापेक्षा वेगळे काही येण्याची वा फार मोठा बदल होण्याची शक्यता फारच कमी आहे. युरोप - अमेरिकेत आजसुद्धा इ - पुस्तकं आहेतच. कारमध्ये ड्रायव्हिंग करते वेळी पुस्तकं ऐकण्याची सोनी, अमेझॉन, नोबल बार्नेस रीडरसारखी साधने उपलब्ध आहेत. त्या रीडर्सचा आकार व लुक् नेहमीच्या पुस्तकासारखाच आहे. सोनी व अमेझॉन कंपन्या आपल्या ग्राहकांसाठी 15-20 हजार पुस्तकं डाउनलोड करण्याची सोयही करतात. परंतु या कपंन्यासुद्धा पुस्तकांना पर्याय म्हणून रीडरकडे बघत नसावेत व कंपन्यांचा उद्धेशही तसा नसावा.

Appleच्या आय-पॉडने सीडी व कॅसेट प्लेयर्सना ज्या प्रकारे बाजारपेठेतून हुसकावून लावले त्या प्रकारे इ-पुस्तकं (व त्यांचे रीडर्स) पारंपरिक मुद्रित पुस्तकांची जागा घेणार नाहीत ना अशी भीती व्यक्त केली जात आहे. परंतु आताच्या स्थितीतील इ-पुस्तकं असे काही तरी करू शकतील याची शक्यता फार धूसर आहे. सीडी - इंटरनेट -संगणक इत्यादीमधून आय-पॉडमध्ये गाणी डाउनलोड करणे व मुद्रित पुस्तक प्रतींना इलेक्ट्रानिक रीडरमध्ये बदलणे यामध्ये फार मोठी दरी आहे. त्यांची मुळात एकमेकाशी तुलनाच होऊ शकत नाही. इ-रीडर्सचे तंत्रज्ञानही अजून प्राथमिक स्वरूपात आहे.

हे खरे असल्यास गूगलने अंकीकरण केलेल्या पुस्तकांचा वाचक (ग्राहक) कोण? काही जण पाम टॉप, नोटबुक पीसी, पीडीए वा संगणक पडद्यावर असली काही पुस्तकं वाचतीलही. परंतु बहुतेक जण पडद्यावरील पुस्तकांचा आशय समजून घेऊन मुद्रित प्रतीसाठी पुस्तकांच्या दुकानाची वाट पकडतील किंवा वाचनालयातून पुस्तक आणून वाचतील. गूगलची पुस्तकं फार फार तर उभ्या उभ्या चाळण्यासाठी, नेमक्या संदर्भासाठी वा त्यातील काही पानं प्रिंट करण्यासाठी नक्कीच उपयोगी ठरतील.

अपूर्ण...