Submitted by मेघना भुस्कुटे on

हा काहीसा कटू आणि स्वतःला अचानकच हळवा करणारा अनुभव मी घेतला आहे. ज्या दिवाळी अंकांसाठी महिना-महिना आगावू पैसे भरून वाट पाहायची आणि ते आले, वाचून झाले, सर्क्युलेट झाले, परत आले....(कित्येक वेळा शोचनीय अवस्थेत) की, त्या ढिगाकडे हताश होऊन पाहायचे. एकत्र कुटुंब व जुन्या पद्धतीचे घर असल्याने मुळात चालत्याबोलत्या माणसांना कशीबशी जागा आहे, आमच्याकडे....त्यात हा "अतीशहाणा इन्द्रा विकतची रद्दी घरात आणून कचरा वाढवतोय.." या ज्येष्ठांच्या (त्यातही महिला वर्ग प्राधान्याने) टोमण्यांना सामोरे जायचे....हे असह्य झाले म्हणून या वर्षी एकही (होय एकही...अगदी ललित, दीपावली, मौज, चिन्ह, अंतर्नाद, म.टा. ही नेहमीचे अंकही) घरी आणले नाही.

जुने अंक शेकड्यात होते... ते मात्र सरळ रद्दीत न घालता ग्रामीण भागातील दोनतीन छोट्यामोठ्या ग्रंथालयांना (काही जुनी पुस्तकेही) देवून टाकली.... ती त्यांनी स्वखर्चाने नेली, हा एक त्यातल्या त्यात समाधानाचा कोपरा.

"...दिवाळी अंकातले लेख फाडून वगैरे ठेवणं मी करून पाहिलंय. पण तो प्रयोग अयशस्वी होतो....."
~ हे मी करून पाहिले, पण यातही अडचण अशी की अशा फाडलेल्या लेखांच्या पानांचे स्वतंत्र असे पुस्तक तयार होऊच शकत नाही...कारण अगणित आकारांची पाने आणि त्यांची दिवसामाजी होत जाणारी जीर्णावस्था.

डॉक्युमेंटेशनचा विचार चांगला आहे. पण होते असे की, ज्या कथा, लेख आपल्याला चांगले वाटतात, त्याच कथा पुढे पुस्तकरूपात एखाद्या प्रकाशनगृहाने प्रकाशित केल्या तर आपल्याकडील अंकांचे महत्वच संपुष्टात येते. 'कविता' तर अल्पायुषीच ठरतात.

थोडक्यात ~ निव्वळ जागाअडचणीमुळे मी दिवाळी अंकांची भूक नगर वाचनमंदिरात जाऊन भागवतो....निदान नवीन घर होईतोपर्यंत.

इन्द्रा

Thu, 11/11/2010 - 14:52 Permalink

ही माझ्याकडच्या अंकांची यादी. यात यंदाचे अंक नाहीत. शिवाय ठळक अक्षरातले अंक द्यायचे नाहीत (!), वाचायला हवे असतील तर न्या आणि परत करा.
१) षट्कार - १९९१, १९९३, १९९६, १९९९, २०००, २००२ (६)
२) अंतर्नाद - १९९९, २०००, २००२, २००३, २००४, २००८, २००९ (७)
३) हंस - १९९९, २०००, २००१, २००२, २००३, २००४, २००५ (७)
४) लोकसत्ता - १९९३, १९९८, २०००, २००१, २००३, २००४, २००५, २००६, २००७, २००९ (१०)
५) साधना - १९८०, १९८१, १९८७ (साधे - ३) १९९७, १९९९, २०००, २००१, २००२, २००३, २००४, २००६, २००७, २००८, २००९ (११)
६) पद्मगंधा - २००३, २००६, २००८, २००९ (४)
७) दीपावली - १९९६, १९९७, १९९८, १९९९, २०००, २००१, २००२, २००३, २००४, २००५, २००६, २००७ (१२)
८) महाराष्ट्र टाईम्स - १९९१, १९९७, १९९८, १९९९, २०००, २००६, २००७, २००८ (८)
९) कालनिर्णय - १९९६, २००६ (२)
१०) मिळून सार्‍याजणी - १९९८, १९९९, २०००, २००१, २००२, २००३ (गौरी विशेष - १), २००३, २००४, २००५, २००६ (९)
११) चिन्ह - १९८८, २००३, २००४, २००७ (४)
१२) ऋतुरंग - १९९७, १९९९, २०००, २००१, २००२, २००३, २००४, २००८ (८)
१३) कदंब - २००२, २००३, २००४, २००५ (४)
१४) साप्ताहिक सकाळ - १९९६, १९९७, १९९८, १९९९, २०००, २००१, २००२, २००३, २००४, २००५, २००६, २००७, २००८, २००९ (१४)
१५) शब्द - २००६, २००७, २००८, २००९ (४)
१६) अक्षर - १९८२, १९८७, १९९३, १९९६, १९९७, १९९९, २०००, २००१, २००२, २००३, २००४, २००५, २००६, २००७, २००८, २००९ (१६)
१७) आजचा चार्वाक - १९८९, १९९१, १९९३, १९९५, १९९६ (५)

१८) अनुभव - १९९९, २००१, २००२, २००४, २००५, २००६, २००८ (६)
१९) मौज - १९८८, १९९०, १९९६, १९९७, १९९९, २००१, २००२, २००३, २००४, २००५, २००६, २००७, २००८, २००९ (१३)
२०) ललित - १९९७, २००२, २००३, २००४, २००५, २००६, २००८ (७)
२१) अबकडई - १९९१ (१)
२२) यक्ष - २००३ (१)
२३) युगांतर - २००३ (१)
२४) पुरुष स्पंदन - २००४ (१)
२५) वसा - २००३ (१)

Thu, 11/11/2010 - 22:46 Permalink

संग्रह छानच आहे मेघना.
मी पण अचंभित झालोय की यावर नक्की योग्य सोल्युशन कोणते असेल त्याबद्दल?
इंद्रराज म्हणतात तसे एखाद्या वाचनालयात जास्त सुरक्षित राहतील.
पण जागेची अडचण असेल तर मग काय करावे हे मलाही सुचत नाही.
एखाद्या विश्वासू मित्र वा मैत्रिणीच्या घरात जागा असेल आणि त्यांची काही हरकत नसेल तर त्यांच्याकडे ठेवता येतील. एकंदरीत मला स्वतःलाही याबद्दल हळहळ वाटतच आहे. :(

Thu, 11/11/2010 - 23:33 Permalink

हे अंक स्कॅन करून ते डिजिटल रूपात जपून ठेवणे शक्य आहे का? हा सर्वोत्तम पर्याय नाही, शिवाय वेळ घेणारा आहे हे मान्य; पण एकंदरीत जवळजवळ कायमस्वरूपी आहे.

प्रकाशकाका मागे पुण्यातल्या अशा एका संस्थेबद्दल म्हणाले होते. त्यांची प्रतिक्रिया वाचायला आवडेल.

Fri, 12/11/2010 - 01:53 Permalink

नंदनशी सहमत आहे. जसजसे लोक हाताळतील तसतसे कितीही नीट हाताळले तरी जुने अंक न खराब होता टिकवणे हे आव्हान होत जाईल. त्यांना डिजीटल रुपात साठवणे हाच सगळ्या दृष्टीने योग्य पर्याय वाटतो. प्रत्येकाने एकेक अंक जरी स्क्यान केला तरी २-३ महिन्यात सगळे अंक जालावर आणता यावेत.

जालावर अथात पुस्तकविश्ववर जर हे उपलब्ध झाले तर क्या बात है!

एक शंका: यात प्रताधिकार आड येऊ शकेल का? (बहुदा नाही कारण अंक जुने आहेत.. तरीही एक शंका)

Fri, 12/11/2010 - 10:12 Permalink

मंडळी, तुमच्या भरघोस प्रतिसादाबद्दल आभार.
कुणालाही काही कबूल करायच्या आधी -
मला अंक विकण्यापेक्षा किंवा घरातून घालवण्यापेक्षा त्याचं एखादं सुरक्षित संग्रहालय करण्यात जास्त रस आहे. जिथे ते एकत्र (माझ्या यादीतले, शिवाय इतरही कुणी देऊ करेल ते) राहतील आणि सगळ्यांनाच उपलब्ध असतील.
त्याकरता तुमच्याकडे काही कल्पना, पर्याय आहे का?
असा पर्याय निघाला नाही, तर मग ते कुणाला हवेत तसतसे देऊ़न टाकीनच. विकायचे नाहीयेत

Fri, 12/11/2010 - 07:43 Permalink

कुणी ठेवण्यासाठी जागा देणार असेल तर पुविवर आपण त्याची इन्वेंटरी मॅनेज करू शकतो थोडक्यात लायब्ररी मॅनेजमेंट पुविवर करता येईल. पण मग तो प्रकल्प फक्त या दिवाळी अंकापुरताच न मर्यादित राहता ते पुस्तकविश्वचे स्वतःचे ग्रंथालय म्हणून पुढे जोपासले जावे असे वाटते. ज्यात आपण सदस्यच पुढे पुस्तकांची भर घालत राहूत.

सुरुवात म्हणून मी माझ्या घरातली जागा काही महिन्यांसाठी नक्कीच उपलब्ध करून देउ शकतो.

Fri, 12/11/2010 - 08:22 Permalink

माझ्याकडे ८८ वगैरेपासूनचे बरेच दिवाळी अंक आहेत. कोरे, रद्दीतून उचललेले, वाचनालयाच्या जुन्या विभागातून काढलेले. त्यांत मटा, लोकसत्ता, रसिक, साहित्य, मौज, साप्ताहिक सकाळ, मिळून सार्‍याजणी, दीपावली, चिन्ह, पद्मगंधा, आजचा चार्वाक, साधना, कालनिर्णय, अक्षर... असे अनेक अंक आहेत.

मला ते टाकणं जिवावर येतं आहे आणि ठेवायला जागेची कमतरता दिवसेंदिवस जाणवतेय. दिवाळी अंकातले लेख फाडून वगैरे ठेवणं मी करून पाहिलंय. पण तो प्रयोग अयशस्वी होतो. दिवाळी अंकाचं स्वतःचं स्वतंत्र व्यक्तिमत्त्व त्यात हरवून जातं आणि ती गबाळी फाडलेली पानंही उघडून वाचवत नाहीत ती नाहीतच.

दिवाळी अंकांची महाराष्ट्रातली परंपरा वगैरे लांबण मी लावत बसत नाही आता. कारण ते सर्वश्रुत आणि सर्वमान्य आहे. पण माझ्या माहितीतल्या कुठल्याच वाचनालयात हे सगळे दिवाळी अंक संदर्भासाठी / वाचनासाठी ठेवून दिल्याचं माझ्या ऐकिवात नाही. ते सरळ रद्दीत काढून टाकले जातात (त्यामुळे माझ्यासारख्या लोकांचं फावतं / फावलं म्हणा! पण ते एक असो!) ते संदर्भासाठी / संग्रहासाठी ठेवले जावेत, असं माझं प्रामाणिक मत आहे. कारण एक चांगला दिवाळी अंक एखाद्या उत्तम पुस्तकाइतकाच स्वतंत्रपणे चांगला आणि संग्राह्य असतो असं मला वाटतं.

तुमचं काय मत? असा एखादा संग्रह करायचा झाला, तर कुणाला त्यात रस आहे का? थोडंफार डॉक्युमेंटेशन आणि बरीचशी जागा त्याकरता लागेल.

(शिवाय मी माझ्याकडच्या अंकांची एक यादी येत्या एखाददोन दिवसांत इथे टाकते. कुणाला वाचायचे असतील तर न्या आणि नीट परत करा.)