Submitted by मेघना भुस्कुटे on

इट्स नॉट अबाउट बाइक माझ्याकडे इंग्रजीत आहे. अप्रतिम पुस्तक आहे.
बाकी सध्या खूप काम असल्याने रोज वृत्तपत्राशिवाय काहिहि वाचणं चालु नाहि :(

Thu, 14/10/2010 - 13:25 Permalink

ईट्स नॉट अबाउट बाईक हे ईंग्रजीतुन माझ्याकडे पण आहे. सुंदर पुस्तक आहे.
त्याबद्दल कधीतरी लिहायचे मनात आहे. पाहुयात कधी वेळ मिळतो.

Thu, 14/10/2010 - 14:06 Permalink

सुलिमानचा खजिना - मालतीबाई दांडेकर

किंग्स सॉलोमन्स माईन्स या गाजलेल्या पुस्तकाचा अनुवाद. याच नावाचा चित्रपटही आहे.

कुमारांसाठी लिहिलेली कथा आहे. छोटेसेच पण मस्त आहे.

Thu, 14/10/2010 - 13:28 Permalink

सध्या नेमाड्यांची 'हिंदू-जगण्याची समृद्ध अडगळ' वाचतोय. पहिला भाग वाचून झाला. पुस्तक असंबद्धच वाटत आहे.

Thu, 14/10/2010 - 14:16 Permalink

अलिकडेच कविता महाजनांची 'ब्र' वाचली. अतिशय उत्तम आणि अभ्यासपूर्ण ... (कादंबरी म्हणवत नाही.) अभ्यासपूर्ण लिखाण ज्याला थोडंफार गोष्टीचं पॅकेजिंग केलेलं आहे. गोष्टीचे फारसे संदर्भ न येता आदिवासी, तळागाळातल्या लोकांच्या अडचणी, कहाण्यांमधून होणारा प्रवास उत्तम प्रकारे मांडला आहे. गोष्ट ज्या प्रकारे इव्हॉल्व्ह होत जाते ते फार आवडलं. फक्त थोडं अधिक संपादन असतं तर कदाचित आणखी प्रभावी लिखाण झालं असतं हे माझं मत!

'सात सक्कं त्रेचाळीस'ची तीस पानं (कशीबशी) वाचली. काहीच कळत नव्हतं, म्हणजे शब्द समजतात पण अर्थबोध होत नाही असं काही gibberish (मराठी शब्द?) वाटलं. ॥नातिचरामि॥ चीही तीस पानं (कशीबशी) वाचली; रडगाणं किंवा मानसिक रूग्णाचं मनोगत वाटलं म्हणून सोडून दिलं.

'लोकमान्य ते महात्मा'चा पहिला भाग वाचून झाल्यावर उघडल्यामुळे असेल 'व्हाईट मुघल्स' आवडलं नाही. सुधा नरवणे(?) यांनी भाषांतर केलं आहे; बर्‍यापैकी चुका राहिल्या आहेत. छापील पुस्तकांत एवढ्या चुका बघवत नाहीत. आणखी असंच (भाषांतरातले दातात येणारे खडे) उदाहरण म्हणजे 'साम्राज्य बुरख्याआडचे' (Behind the veiled kingdom चं भाषांतर).

'लोकमान्य ते महात्मा'चा पहिलाच खंड वाचला. तत्कालिन सामाजिक, राजकीय परिस्थिती, मराठी रंगभूमीचं राजकारणातलं स्थान, इ. विषयांवर अभ्यासपूर्ण लिखाण आहे. वाचताना कधीकधी खूप जास्त लिहील्यासारखं वाटलं, पण तो सर्वस्वी माझ्या आळसाचा दोष! स्वतःचं घर विकत घेतल्यावर काही पुस्तकं विकत घेईन त्यात या दोन्ही खंडांचाही समावेश आहे.

चारच दिवसांपूर्वी गिरीश कुबेरांचं 'अधर्मयुद्ध' वाचलं. Another masterpiece by Girish Kuber.

Thu, 14/10/2010 - 15:29 Permalink

फक्त थोडं अधिक संपादन असतं तर कदाचित आणखी प्रभावी लिखाण झालं असतं हे माझं मत!

हाहाहाहा... म्हणजे त्यात आधी संपादन झालंय असा दावा करतीयेस की काय तू?

Thu, 14/10/2010 - 16:28 Permalink

"....'सात सक्कं त्रेचाळीस'ची तीस पानं (कशीबशी) वाचली. काहीच कळत नव्हतं, म्हणजे शब्द समजतात पण अर्थबोध होत नाही ....."

~~ ते कळण्यासाठी स्कल नावाच्या देहातील तिजोरीत ब्रेन नावाचा रुपया असावा लागतो. आता देव तरी काहीवेळा असेच वागतो की तो तिजोरी तर देतोच पण रिकामी....त्याला त्या त्या व्यक्तीचा नाईलाज असतो.

ज्याला किंवा जिला जी.ए., मर्ढेकर, नगरकर, नेमाडे, कोलटकर कळत नाहीत, भावत नाहीत, त्यांनी ओशो आश्रमात जाऊन ध्यानधारणा करावी. [ हे तुला उद्देश्यून नाही बर का...पाटलीणबाई !!]

इन्द्रा

Thu, 14/10/2010 - 21:29 Permalink

ज्याला किंवा जिला जी.ए., मर्ढेकर, नगरकर, नेमाडे, कोलटकर कळत नाहीत, भावत नाहीत, त्यांनी ओशो आश्रमात जाऊन ध्यानधारणा करावी.

हे चुक आहे.. आधी हे न आवडणार्‍यांची शिक्षा समग्र नेमाडे वाचणे ही होती.. आता शिक्षा बदलल्याबद्दल निषेध! ;)

Fri, 15/10/2010 - 11:54 Permalink

तेव्हा मी जीए आवडत नाहित म्हणालो तेव्हा त्यांनी समग्र जीए. वाचायची शिक्षा दिली. मग नेमाडे न आवडणार्‍यांना समग्र नेमाडे नकोत का वाचायला?

बाकी समग्र नेमाडे असं काहि अस्तित्त्वात नाहि हे प्रतिसादानंतर लक्षात आलं होतं.. :P

Fri, 15/10/2010 - 13:14 Permalink

शनिवारी बसल्या बैठकीत 'बनगरवाडी' संपवली. कथानक ज्या वाडीवर बेतलेले आहे, त्या गावाच्या बर्‍याच जवळ असणार्‍या एका गावी लहानपणी का होईना, तीन वर्षे राहिलेय. त्यामुळे प्रत्येक गोष्ट वाचताना उदा. 'मेंढरे जुळवणे' तिकडच्या आठवणीच आठवत राहिल्या. आणि सगळी पात्रे माझ्यासाठी जणू जिवंत झाली!!!! माडगूळ गावातून बसमधून कित्येकदा गेले असेन, पण कधी उतरून तिथे माडगूळकरांचे घर, किंवा शेटफळे इथले त्यांचे आजोळ का पाहिले नाही याची चूटपूट लागून राहिलीय. (तसेही जरी उतरले असते तरी जास्त काही अकलेचे तारे तोडले नसते, कारण तेव्हाचे माझे वय फक्त ८-१० वर्षे होते!!!!) पण तिथपर्यंत जाऊनही संधी हुकली गेल्याचे वाईट वाटतंय. आणि आता कधी तिकडे जाणं होणार नाही हे महित आहे.

बनगरवाडीनंतर 'सर आणि मी' वाचायला घेतली. माझ्यात एक दोष आहे, पुस्तक वाचताना मेंदू बंद करून वाचता येत नाही. त्यामुळे जसे 'राजा रविवर्मा' वाचताना नाच गं घुमा सतत आठवत होती, तसेच काहीसं सर आणि मी वाचताना झाले होते. पहिल्या दिवसांत ज्योत्स्ना बाई त्या त्यांच्या सरांच्या प्रेमात कशा पडत गेल्या याचे वर्णन करतात तेव्हा मला कथनापेक्षा 'जस्टीफिकेशन' जास्त वाटले. त्यांची भावनिक गुंतागुंत असेलही, पण ती माझ्या मना-डोक्यापर्यंत पोचली नाही हे ही खरे. आणि तिथूनच पुस्तक मनात गेलेच नाही. त्यानंतर मध्येच मुद्दाम घुसडल्यासारखे आलेले अलंकारिक आणि अध्यात्मिक शब्द जाम खटकत होते. नंतरचे सरांनी लेखिकेची न्यूडस रेखाटतानाचे वर्णन वाचताना तर त्या शब्दांचा कळस होऊन मला हसायलाच येत होते. मी माझ्या मैत्रिणीला पुस्तकाबद्दल, ते वाचताना आलेल्या माझ्या मनातल्या विचारांबद्दल आणि पुस्तक इतरांनी रेकमेंड केले आहे, इतक्या माहितीसह वाचायला दिले होते. तिला पुस्तक आवडले, आणि ती उद्या मला पुस्तक वाचताना मी कुठे आणि काय चुका केल्या आहेत ते सांगणार आहे. त्यानंतर जर माझे मत बदलले तर पाहू. :)

सध्या 'कोसला' वाचयला घेतलीय. 'बाकी शून्य' ला कोसला-२ म्हटले जाते म्हणजे कोसला कसे असे आधी वाटले होते. पण पुस्तक पुष्कळ चांगले वाटले. एका मुलाच्या आयुष्यात कोलेजजीवनात घडू शकणार्‍या घटनांचे त्याच्या दृष्टीकोनातूनचे वर्णन अगदी पटते. त्यात बाकी.. सारखी कुठेही अतिशयोक्ती वाटत नाही. आज रात्री तेही संपेलच.

Thu, 14/10/2010 - 22:21 Permalink

त्या त्यांच्या सरांच्या प्रेमात कशा पडत गेल्या याचे वर्णन करतात तेव्हा मला कथनापेक्षा 'जस्टीफिकेशन' जास्त वाटले.
अगदी अगदी! म्हणजे हो बाबा, तुम्हांला एकमेकांना तुम्ही आवडलात. मग वयात अंतर किती का असेना. आवडलात, शारीरिक आकर्षणपण वाटलं, मग लग्नपण केलंत, मूलपण झालं. आता या सगळ्याला 'पुरुष आणि प्रकृतीचं मीलन' म्हणून भंपकपणे गौरवायला कशाला पाहिजे? दर खेपेला आपलं 'म्हंजे ओढ वाटत होती, पण ती साधीसुधी ओढ नव्हती, ज्ञानाची / अध्यात्माची / निसर्गाची ओढ होती' छापाचं काहीतरी स्पष्टीकरण आहेच. कशाला? तुम्हांला कुणी जाब विचारतंय का, की असं का म्हणून केलंत?
हा सूर नसता तर पुस्तक खूपच चांगलं होऊ शकलं असतं.

Fri, 15/10/2010 - 18:03 Permalink

मला वाटलं की सगळ्यांना पुस्तक चांगलं वाटतंय आणि मलाच एकटीला का त्यात दोष दिसत आहेत??
जाऊ दे, आता माझ्याकडे पुस्तक नाही, मैत्रिणीनेही कॉलेजला दांडी मारलीय नाहीतर त्यातली गंमतीची काव्येच इथे टंकली असती!!!

Fri, 15/10/2010 - 18:25 Permalink

ज्योत्स्ना संभाजी कदम.
त्यांचेच आत्मचरित्र त्यांनी त्यांचे पती व जे.जे. स्कूल ऑफ आर्टस चे डीन श्री. संभाजी कदम यांचा मृत्यू झाल्यावर लिहिले आहे.

Sat, 16/10/2010 - 19:37 Permalink

"....पण पुस्तक पुष्कळ चांगले वाटले."

~~ या वाक्यासाठी म.की.ला केव्हातरी कॉफी देणार हे नक्की. काही दिवसापूर्वीच मिपाच्या एका धाग्यावर 'कोसला' ची जी लक्तरे काढली गेली ते पाहुन तीव्र वेदना झाल्या होत्या. काहीवेळा वाटले होते की आपण त्या धाग्यात भाग घेऊन या गेली जवळपास ५० वर्षे मराठी शारदेच्या प्रांगणात मानाचे पान घेऊन बसलेल्या कादंबरीबद्दलची लेखकाची भूमिका किमानपक्षी काही प्रतिसादात द्यावी. पण पुढे पुढे त्या धाग्याला बालिश रूप आले आणि हिच्यावर टीका करणार्‍यांची भाषा पाहिल्यावर वाटले की आपला तांदूळ या बाजारात आणायला नको.

पण आता इथे वर अधोरेखीत केलेले वाक्य वाचल्यावर खरोखरी मन सुखद हवेची अनुभूती घेऊ लागले आहे असे वाटले. हे खरे आहे की, कुठल्याही लेखकाच्या एखाद्या बहुचर्चित कलाकृतीचे आपणास नि:संदर्भ मूल्यमापन करता येत नाही. प्रत्येक लेखक हा एका विशिष्ट अशा स्थानिक परंपरेशी, तेथील वातावरणाशी, समाजजीवनाशी, त्या जीवनातील चढउताराशी, धर्मसंकटाशी, इच्छा असो वा नसो, साम्यधर्माने बांधलेला असतो आणि पुढे त्याच्या शिक्षणाने त्यात जर काही बदल होत असेल तर ती परंपरा सुसंगतीने एका पटलावर तो मांडण्याचा प्रयत्न करीत असतो. हा साम्यवैधर्म्यभाव ही एक सौंदर्यशास्त्रीय प्रणाली असते. म्हणूनच 'कोसला' चे मूल्यमापन १९६३ मध्ये ज्या उत्साहाने, वेगाने झाले, ते २०१० या काळातील घटनानिकषावर करता येणार नाही. 'कोसला' च्या पांडुरंगाने खांडेकरांच्या ध्येयवादी नायकांपासून तसेच फडक्यांच्या रंगेल, स्वप्नाळू कॉलेजकुमार नायकापासून अशी काही फारकत घेतली की, त्यावेळच्या वाचकांवर याने भडाभडा गार पाणीच ओतले आणि त्यांना एका झटक्यात जमिनीवर आणले.

"शंभरातील नव्व्याण्णवास..." ही अर्पणपत्रिकाचा पुरेशी बोलकी आहे कारण नेमाडे जाणतात की ९९ तरूणांचे पाय तसे पाहिले तर जमिनीवरच असतात आणि त्यांचीच कहाणी पांडुरंगाच्या चित्रातून ते कागदावर रेखाटतात. माध्यम, मनोविकार आणि परंपरा यांच्या परस्परप्रक्रियेतून 'कोसला' खुलत जाते; तिथे नेमाडेंचे मन आणि व्यक्तीत्व केवळ पांडबाला परिस्थितीत कसे तग धरून राहायचे हेच शिकविते (हॉस्टेल मेसमधील हिशोबाचा फटका, हे एक चपखल उदाहरण आहे...)

खूप काही लिहिता येईल, पण लेट मकी फिनिशेस द नॉव्हेल इन फर्स्ट प्लेस.

२. संभाजी कदमांसाठी 'सर आणि मी' हे पुस्तक, खरेदीसाठी हाती घेतले होते, पण ब्लर्बवरच अकारण 'दोघांत २५ वर्षांचे अंतर...." असली Cheap वाटणारी जाहिरातसदृश्य मांडणी फार खटकली. त्याची काही आवश्यकता नव्हती. पण पुढे हे पुस्तक जरूर वाचणार आहे.

इन्द्रा

Thu, 14/10/2010 - 23:49 Permalink

इंद्रा
कोसला बद्दल असं वेगवेगळ्या प्रतिसादातुन लिहितोस ते चांगलच आहे पण जर एक सविस्तर "कोसला माझ्या नजरेतुन"
असा लेख लिहिलास तर मजा येईल रे,

Fri, 15/10/2010 - 12:16 Permalink

अगदी, मलाही हेच म्हणावेसे वाटले होते.
त्यापेक्षा तू असे का करत नाहीस? प्रत्येक प्रतिसाद देताना तो एखाद्या लेखकाबद्दल किंवा पुस्तकाबद्दल असेल, तर त्यालाच तू सरळ लेख म्हणून टाक. हवे तर पुस्तक्/लेखक जोडण्याचे काम आम्ही करू!!! ;)

आणि हो, कॉफी नक्की!!!!

Fri, 15/10/2010 - 12:38 Permalink

"....प्रत्येक प्रतिसाद देताना तो एखाद्या लेखकाबद्दल किंवा पुस्तकाबद्दल असेल, तर त्यालाच तू सरळ लेख म्हणून टाक.."

अगं खरं...तसं केलं तर इथली संपादकांची त्रिमूर्ती माझ्यावर डोळे वटारेल ना? त्यांना जर टेट्राबाईटी लेख हवा असेल अन् मी मेगा देतो म्हटलं तर...ते स्वीकारतील का?

एनी वे....श्री.निखिलचा 'कोसला' चा प्रस्ताव मी मान्य करतो. पण हा विषय दिवाळी अंकानंतर घेऊ या. आता मला वाटते इथे संपादकानी सुचविल्याप्रमाणे सर्वच 'पुस्तकविश्व' च्या दिवाळी अंकासाठी लेखन करीत असतील (२५ डेडलाईन आहे ना?) आणि मीही आहेच ~ कोसला नव्हे, दुसरा विषय आहे.... ~ त्यामुळेच पुढे पांडबा आणि बुंदीसमवेत दंगा घालू या....ती अदिती आली तर तिलाही मकी घेईलच (कळू दे अगर ना कळू दे....पार्टीचा खर्च तर ती करेलच.... लई पैका हाया तिच्या पर्समदी...!)

इन्द्रा

Fri, 15/10/2010 - 15:16 Permalink

काही दिवसापूर्वीच मिपाच्या एका धाग्यावर 'कोसला' ची जी लक्तरे काढली गेली ते पाहुन तीव्र वेदना झाल्या होत्या. काहीवेळा वाटले होते की आपण त्या धाग्यात भाग घेऊन या गेली जवळपास ५० वर्षे मराठी शारदेच्या प्रांगणात मानाचे पान घेऊन बसलेल्या कादंबरीबद्दलची लेखकाची भूमिका किमानपक्षी काही प्रतिसादात द्यावी. पण पुढे पुढे त्या धाग्याला बालिश रूप आले आणि हिच्यावर टीका करणार्‍यांची भाषा पाहिल्यावर वाटले की आपला तांदूळ या बाजारात आणायला नको.

इंद्राशी (कधी नव्हे ते!) सहमत. 'बाकी शून्य'ला कोसला भाग-२ म्हणणे हा मला कोसलाचा अपमान वाटतो हे ही नमूद करतो.
जाताजाता: समग्र नेमाडे वाचणं ही फार कठोर शिक्षा आहे असंही नमूद करतो ;-)

Fri, 15/10/2010 - 15:13 Permalink

'बाकी शून्य'ला कोसला भाग-२ म्हणणे हा मला कोसलाचा अपमान वाटतो हे ही नमूद करतो.

+१ सहमत.
काल रात्री पुस्तक वाचून संपले तेव्हा कुठल्या शहाण्याने असे वक्तव्य केले असेल, असेच मनात आले!!!!

Fri, 15/10/2010 - 15:34 Permalink

इंद्राशी (कधी नव्हे ते!) सहमत.
~~ चला...खंडेरावांच्या साटप्यात चिं.जं. येणार नसले तरी पांडबासमवेत खारे शेंगदाणे खायाला येतील हेही नसे थोडके !

'बाकी शून्य'ला कोसला भाग-२ म्हणणे हा मला कोसलाचा अपमान वाटतो हे ही नमूद करतो.
~~ नक्कीच. साहित्यात एका कलाकृतीचा दुसार्‍याशी बादरायण संबंध जुळवायचा हे खूळ फार जुनेच आहे. तुलना अटळच असेल तर निदान ती कुठेतरी समान पातळीवर असावी. उगाच एखाद्या लठ्ठ बेडकाला उचलायचे आणि हत्तीच्या पंगतीला बसवायचे असला प्रकार नको.

जाताजाता: समग्र नेमाडे वाचणं ही फार कठोर शिक्षा आहे असंही नमूद करतो.
~~ असहमत्त्त्त्त्त्त्त्त्त्त्त्त्त्त्त्त्त्त्त्त !! बघा किती 'त' टंकले ! तुम्ही फक्त कादंबर्‍यातील रा.रा.भालचंद्रपंत नेमाडे पाहू नका. शक्य झाल्यास 'टीकास्वयंवर' वाचा (म्हणजे वाचले नसल्यास....), 'मेलडी' काव्यसंग्रह पाहा....मग ते वाचणे कठोर होईल का त्यावर चर्चा करू.

इन्द्रा

Fri, 15/10/2010 - 19:13 Permalink

सध्या चांगली पुस्तकं वाचण्याचा कुंडलीत योग दिसतो आहे. टण्याने सुचवलेलं बाळकृष्ण प्रभुदेसाईंचं 'गंधर्व' वाचतो आहे. जवळजवळ बावनकशी म्हणता येईल असा कथासंग्रह. फार दिवसांनी असं काही वाचायला मिळालं. तळकोकणाच्या पार्श्वभूमीवर घडणारं लेखन जवळजवळ अतिपरिचयादवज्ञेला येऊन ठेपलं असलं, तरी या पुस्तकातली वर्णनं आणि सांस्कृतिक संदर्भ इतक्या नेमकेपणे येतात की क्षणभर दळवी/गोनिदा/श्रीना यांच्याहून काकणभर सरस दर्जा देण्याचा (निदान या एका बाबतीत तरी) मोह व्हावा. याच्याच सोबतीला 'पावसाआधीचा पाऊस' वाचून काढलं. स्तंभलेखांचा संग्रह असल्यामुळे त्याच्या अंगभूत मर्यादा असल्या तरी शांताबाईंच्या संदर्भसंपन्न पण अनाग्रही (शब्दांचा खेळच करायचा झाला तर विदग्ध पण विश्रब्ध शैलीतलं) लेखनामुळे वाचनीय झालेलं.

इंग्रजीत 'बिग बर्न' नावाचं नॉन-फिक्शन पुस्तक नुकतंच वाचलं. आपल्या देशातील नैसर्गिक साधनसंपत्तीची काळजी घेणं हा गुण समाजात रुजवताना होणारा संघर्ष, जंगलात आर्थिक हितसंबंध गुंतलेल्या धनाढ्य उद्योगपतींनी मग याला दिलेला अभिजन वि. बहुजन किंवा हस्तिदंती मनोर्‍यातले, हवेत मनोरे बांधणारे विचारवंत असा रंग देण्याचा केलेला प्रयत्न, राजकारणाच्या पटावरचे मग ओघाने येणारे शह-काटशह आणि या सार्‍या चक्रात भरडला गेलेला, गेली कैक शतकं जंगलाच्या साहचर्याने जगूनही विस्थापित झालेला स्थानिक आदिवासी (इथे नेटिव्ह अमेरिकन) समाज हे परिचित नाट्य शंभर वर्षांपूर्वी अमेरिकेच्या एका दुर्गम भागातही याच क्रमाने घडले. मात्र ध्येयाने झपाटलेल्या काही व्यक्ती आणि तीन राज्यांत सुमारे तीस लाख एकर जंगल भस्मसात करणार्‍या, अनेक लोकांचे प्राण घेणार्‍या प्रचंड मोठ्या वणव्याला इष्टापत्ती समजून या प्रयत्नांना वेगळे वळण देणारे काही द्रष्टे नेते (अध्यक्ष टेडी रूझवेल्ट, वनाधिकारी गिल्बर्ट पिन्चॉ) यांच्यामुळे बंद होऊ घातलेलं जंगल खातं कसं तगलं आणि फोफावलं; त्याचं वर्णन हे जवळजवळ 'युद्धस्य कथा रम्या'सारखंच खिळवून ठेवणारं आणि अजूनही वेगळ्या संदर्भांत थोड्याफार फरकाने हीच लढाई कशी सुरु आहे याची जाणीव करून देणारं, हे पुस्तक. योगायोगाने त्याच भागात गेल्या महिन्यात भटकून आल्यामुळे गावांची नावं, जंगलांची वर्णनं इ. भाग अधिक ओळखीचा वाटणारा.

बाकी सध्या धाडसाने इलिझाबेथन इंग्रजीतलं 'हॅम्लेट' वाचतो आहे. वाचून झालं आणि पेललं तर त्याबद्दल लिहीनच. अजून पहिलाच अंक वाचून झाला आहे, पण त्यातच tender या एका शब्दाचे तीन वाक्यांत सहा वेगवेगळ्या तर्‍हेने केलेले उपयोग असे शब्दांचे खेळ आणि अधनंमधनं येणारी, आता रूढ झालेली चमकदार सुभाषितवजा वाक्यं (ब्रेविटी इज द सोल ऑफ विट, समथिंग इज रॉटन इन द स्टेट ऑफ डेन्मार्क, द टाईम इज आऊट ऑफ जॉईंट, फ्रेल्टी दाय नेम इज वूमन) इ. वैशिष्ट्यं आहेतच. अर्थात पुढचा 'टू बी ऑर नॉट टू बी'चा भाग महत्त्वाचा. वीकांत त्यात सत्कारणी लागावा :)

Fri, 15/10/2010 - 18:59 Permalink

बरे झाले ही इतकी मोठी प्रतिक्रिया लिहिलीस ते. नाहीतर वरचे प्रतिसाद वाचून, "मेल्या, स्वत: काहीतरी लिही की रे" असेच म्हणणार होते. आता जरा लेखणी/कीबोर्डावरची धूळ झटक आणि येऊदेत काहीतरी ’मराठी साहित्यविषयक अनुदिनी’ मध्ये!!!

प्रति़क्षेत,
मक

Fri, 15/10/2010 - 19:43 Permalink

कावेरीकाठची यक्षनगरी अर्थात तंजावरचे मराठे
लेखकःसेतु माधवराव पगडी.

पाहुया, आजच हातात पडलंय. तुर्त तरी प्रस्तावना चाळण्याइतपतच मजल गेलीये. शांतपणा मिळाला म्हणजे एकदम तबीयतमध्ये वाचुन काढायचा विचार आहे. :)

Fri, 15/10/2010 - 19:45 Permalink

अरे वा नंदन. गंधर्व आवडलं तुला हे वाचून बरं वाटलं. मी गंधर्व सुचवलेल्या बर्‍याच जणांना ते आवडले नाही फारसे.

बाकी शून्य आणि कोसला, दोन्ही पूर्ण वेगळी पुस्तके आहेत. कोसला त्यात नक्कीच उजवं आहे. शैली, क्राफ्ट, तरलता, बांधेसूदपणा इत्यादी अनेक निकषांवर कोसला सरस ठरते. अर्थात 'बाकी शून्य' देखील दखलपात्र आहेच व बजबज-गोड तुपातल्या नाहीतर सवंग तत्वज्ञानपर चुरचुरीत आयुष्यावर वाक्ये पेरणार्‍या शेकडो पुस्तकांपेक्षा कैक पटीने चांगली आहे.

नुकतेच, द ट्रान्स्लेटर - दाउद हरी आणि Krakauer चे Where Men Win Glory वाचले. दोन्ही पुस्तके वाचनीय. पण where men win glory मध्ये क्रॉकरने पाने भरणे कार्यक्रम बराच केला आहे असे वाटले. Into the wild मध्ये क्रिस मॅकँडल्सच्य आयुष्यासोबत तो जे इतर अश्या ट्रँप्स/एकाकी/भटक्यांचे संदर्भ आणतो ते एकजीव वाटतात. where men win gloryमध्ये अफगाणिस्तान/इराक युद्धांची पार्श्वभुमी, अमेरिकेचे ८५ पासून पुढचे परराष्ट्रधोरण व त्यानुसार कृती वगैरेच फार येते असे वाटते. अर्थात सामान्य वाचकांना डोळ्यासमोर ठेवून लिहिली असल्याने कदाचित त्याला हे सर्व संदर्भ तपशिलाने देणे गरजेचे वाटले असेल. पण आता गुलबुद्दीन हेकमत्यार, लादेन, मसूद, नजीबुद्दौला, आय.एस.आय.-सी.आय.ए.चे मुजाहिदीन-सोविएट युद्धातले साटेलोटे वगैरेंबद्दल इतके वाचनात येउन गेले आहे की कंटाळा आला परत तेच वाचताना.

हिंदू अजुनही पूर्ण होत नाहिये.

Sat, 16/10/2010 - 03:43 Permalink

वि. ग. कानिटकरांचं नाझी भस्मासुराचा उदयास्त चालु आहे.

अनिल अवचटांचं कार्यरत आणलं आहे परंतु वेळ (म्हणजेच मुड) नसल्याने अद्याप उघडलेलं नाहीये! :)

Sun, 17/10/2010 - 19:26 Permalink

Memories of Geisha चा मराठी अनुवाद "मी सायूरी" घेतला आहे वाचायला

मूळ लेखक : आर्थर गोल्डन
अनुवादिका : सुनंदा अमरापूरकर
प्रकाशक : मेहता पब्लिशिंग हाऊस.

Wed, 20/10/2010 - 19:14 Permalink

गेल्या आठवड्यात खालील पुस्तकांची खरेदी झाली, ती यादी देतो :

१. The Non-Fiction Collection : Volume 1, 2, 3 ~ 20 Years of Penguin India > फार चांगले आणि वैविध्यपूर्ण असे हे तीन संग्रह आहेत.
२. The Fictional World of Manohar Malgonkar ~ A Padmanabhan
3. A Bend In The Ganges : Manohar Malgonkar ~ या कादंबरीची पहिली प्रत माझ्याकडे (म्हणजे आमच्या घरी, पूर्वी मामांनी घेतलेली) आहे, पण ती आता जीर्ण झाली व रोली, नवी दिल्लीने नवी आवृत्ती प्रकाशित केल्याचे कळविल्याने बूक केली होती...ती आली....नव्या आवृत्तीत टाईपही खूप छान वापरला आहे.
४. Not A Nice Man To Know : Khushwant Singh ~ खुशवंतसिंग यांच्याबाबत इतरांची कितीही आणि कसलीही बरीवाईट मते असोत...पण मी यांच्या इंग्रजी लिखाणावर फिदा आहे....हमेशा वाटते की सहजगत्या बोलावे, गप्पा मारत लिहिल्यासारखे इंग्रजी लिहावे तर यांच्यासारखे.....[आपल्याकडे अनिल अवचट यानी मराठीत अशा पद्धतीच्या लिखाणात यश मिळविले आहे.]
५. Absolute Khushwant : Humra Quraishi
६. Romancing With The Life : Autobiography of Dev Anand ~ हे पुस्तक Penguin/Viking यानी खूप म्हणजे खूप देखणे काढले आहे. खरं तर मी ज्याना मानतो अशा ओळखीच्या आणि सीनिअर असूनही आमच्या ग्रुपमध्ये सातत्याने गप्पागोष्टीत भाग घेणार्‍या एका स्थानिक कारखानदाराना (जे देव आनंद आणि एस.डी.बर्मन प्रेमी आहेत...) त्यांच्या ६१ व्या वाढदिवसानिमित्त देण्यासाठी खरेदी केले आहे....पण आता असे वाटू लागले आहे की प्रथम याचे वाचन करावे अन् मगच द्यावे. ~ देव आनंदच्या सुरुवातीच्या काळातील दुर्मिळ फोटो तर आहेतच, पण सादरीकरण अतिशय प्रभावी वाटत आहे. ५५०/- रुपये किंमत काहीच नाही असे वाटत राहते....शिवाय देवच्या गाजलेल्या गाण्यांची एक सीडीही आहे, मोफत.
७. पुन्हा मर्ढेकर ~ विजया राजाध्यक्ष ~ मौज [खास विजयाबाईंच्या भाषेचा डौल अनुभवण्यासाठी घेतले आहे. काय लिहितात बाई !!]
८. जास्वंद ~ माधव आचवल ~ मौज : खास जी.ए. आणि इंदिरा संतावरील लेख परत वाचण्यासाठी. पुस्तक दुर्मिळ आहे असे म्हणतात, म्हणून अक्षरधाराच्या येथील प्रदर्शनात दिसले व लागलीच घेतले.
९. नॉट गॉन विथ द विंड ~ विश्वास पाटील ~ हॉलीवूडकडील काही गाजलेल्या 'क्लासिक' चित्रपटांची ओळख ~ मेहताने फार देखणी निर्मिती केली आहे या पुस्तकाची. संग्राह्य आहे.
१०. लमाण ~ डॉ.श्रीराम लागू ~ हे घेतले नाही....तर दोन मित्रांनी मिळून प्रेझेंट दिले आहे. पूर्वी वाचले होतेच...पण आता परत नव्याने कधीतरी वाचेन.

-- अजून आहेत, पण पुढे पाहु.

इन्द्रा

Wed, 27/10/2010 - 16:57 Permalink

इंद्रराज,

थोडे सविस्तर लिहिल्यामुळे प्रत्येक पुस्तकाचा आवाका लक्षात आला.
त्याबद्द्दल धन्यवाद.
लमाण सोडले तर माझ्या परिचयाचे एकही नाहीये. लक्ष ठेवीनच या सर्व पुस्तकांवर. हातातली पुस्तके संपली की वाचायच्या यादीत नोंद करुन ठेवतोच आहे या पुस्तकांची :)

Wed, 27/10/2010 - 17:35 Permalink

मनोहर माळगावकर... हे नाव समोर येऊ नये, म्हणून करत असलेल्या सर्व प्रार्थना वाया गेल्या राव. खऱ्याची दुनिया नाही ही... :)
इंद्रा, यांच्या पुस्तकांची एक यादी दे राव इथं. या भल्या माणसाचं एकच पुस्तक खूप पूर्वी हाती पडलं होतं, पण वाचलंच नाही. तेव्हापासून स्वतःला घालत असलेल्या शिव्या अजून थांबल्या नाहीत. हे नाव समोर आलं की, शिवी येतेच येते. ही पुस्तकं सहजी कुठं मिळतील पुण्यात (विकत नव्हे, सध्या क्षमता नाही) हेही माहिती असल्यास सांग, कृपा करून.

Wed, 27/10/2010 - 17:41 Permalink

"....इंद्रा, यांच्या पुस्तकांची एक यादी दे राव इथं. ..."

~~ श्रा.मो. मी तर म्हणेन जरूर जरूर वाचा संपूर्ण माळगावकर....एकापाठोपाठ एक. मी इथे त्यांच्या लिखाणाविषयी (आणि खुद्द त्यांच्याविषयीही...) खूप काही माहिती देत राहीन. "ब्रिटिश इंडिया" त्यांनी राजघराण्यातील एक व्यक्ती तसेच दुसर्‍या महायुद्धात प्रत्यक्ष भाग घेतलेला एक अधिकारी..या दोन्ही रुपात पाहिला असल्याने व तसेच स्वतः इतिहासकार असल्याने त्यांच्या लिखाणाला जे एक विशेष अधिकरी रूप आले आहे ते तुम्हाला एक लेखक आणि वाचक या दोन्ही नात्याने फार भावेल.

कोल्हापूरच्या छत्रपती शहाजींचे (दोघेही एकाच रेजिमेंटचे अधिकारी) ते फार जवळचे मित्र होते.

इन्द्रा

Wed, 27/10/2010 - 18:27 Permalink

मनोहर माळगांवकरांच्या काही पुस्तकांची यादी http://www.flipkart.com/author/manohar-malgonkar/ इथेच पुस्तके ऑनलाइन ऑर्डर करता येतील.
पण ही संपूर्ण यादी नव्हे. कान्होजी आंग्र्यांवरच्या ह्यांच्या पुस्तकाचे पुलंनी मराठीत भाषांतर केले आहे.
A bend in the ganges चे 'इथे थबकली गंगामाई' नावाने भाषांतर आहे.
माळगांवकरांची सर्वच पुस्तके वाचनीय आहेत. अवली व्यक्तिमत्व होते.
माळगांवकर गेल्यानंतर त्यांच्यावर हा एक वाचनीय मृत्युलेख आला होता: http://www.indianexpress.com/news/Story-and-history/635364

इंद्रा, ते पद्मनाभनांचे पुस्तक वाचून झाले की कसे वाटले ते लिही.

मी नुकतेच भगतसिंगांचा 'मै नास्तिक क्यों हूं' नावाचा एक दीर्घलेख वाचला. अफलातून! निव्वळ अफलातून! मराठीत भाषांतर करायला घेतला आहे. आणि रोमिला थापर-बिपिन चंद्रा-हरबन्स मुखर्जी लिखीत Communalism and the writing of Indian history हे निबंधांचे पुस्तक वाचले. आत्ता 'दुसर्‍या पिढीचे आत्मवृत्त' आणि मद हातकणंगलेकरांनी संपादन केलेले 'मराठी समिक्षालेख' वाचतोय.

Thu, 28/10/2010 - 14:28 Permalink

अनुवाद जरुर करा.
पण हा लेख पुस्तक रुपाने मराठीत २/३ वेगवेगळ्या प्रकाशकांनी प्र्काशीत केला आहे.
भगतसींग यांची ही एक बाजू कायमच दुर्लक्शीत राहीली.

Fri, 29/10/2010 - 23:49 Permalink

"....पद्मनाभनांचे पुस्तक वाचून झाले की कसे वाटले ते लिही...."

~ जरूर.
तुम्ही Flipkart चा उल्लेख केला आहे....तर मी नेहमी तिथूनच ऑनलाईन खरेदी करतोय. माळगावकरांची पुस्तके तिथूनच घेतली आहेत....इतकेच नव्हे तर Flipkart कडे Bend in the Ganges नव्हते तर त्यांनी दिल्लीच्या रोलीशी थेट संपर्क साधून त्यांच्याकडून ते पुस्तक उपलब्ध करून दिले.

श्री.मोडक याना उत्तर देतानाच, मी इथे माळगावकरांच्या सर्वच पुस्तकांबद्दल लिहिणार होतोच...पण "पु.वि." च्या कार्यकारी संपादकांना माहित असेल की, मी तसे का केलेले नाही.

(जाताजाता : भगतसिंगांचा "तो" लेख तुम्ही 'पु.वि.' च्या दिवाळी अंकासाठी का देत नाही?)

इन्द्रा

Thu, 28/10/2010 - 14:55 Permalink

इंद्रा, मी आईशी काल बोलत असताना ती म्हणाली की भगतसिंगांचा 'मै नास्तिक क्यूं हूं' हा लेख मराठीत भाषांतरीत झालेला आहे. तिने तो अनेक वर्षांपुर्वी कॉलेजमध्ये असताना वाचलेला. मी स्वांतसुखाय तो लेख भाषांतरीत करुन इथेच प्रकाशित करेन. दिवाळी अंकासाठी साहित्य देण्याची मुदत तशीही संपली आहे.

Thu, 28/10/2010 - 20:37 Permalink

आजकाल पाने पटापट खायला वेळ नाही म्हणून थोडी खट्टू आहे. गेल्या शनिवारी सहजच एक पुस्तक दिसले, डॉ. रखमाबाई:एक आर्त. लेखिका: मोहिनी वर्दे.
डॉ. रखमाबाई या आनंदीबाई जोशींच्या समकालीन. आनंदीबाई भारतातल्या पहिल्या स्त्री डॉक्टर, पण त्यांनी वैद्यकिय व्यवसायास सुरूवात करण्या आधीच त्यांना मृत्यूने गाठले. रखमाबाई या पहिल्या वैद्यकिय व्यवसाय करू शकलेल्या पहिल्या भारतीय डॉक्टर आणि लेखिका मोहिनी वर्देंच्या सावत्र आत्या. घरच्यांच्या आठवणीतून साकार झालेल्या, काही ठिकाणी टाईम्स ऑफ इंडिया आणि इतर देशी-परदेशी वृत्तपत्रांच्या संदर्भातून लेखिका या वेगळ्याच आणि क्रांतीकारी आत्याची कहाणी समोर मांडतात.
तो काळ इंग्रजी राजवटीचा. एतद्देशीयांना तेव्हा नुकतंच शिक्षणाचं महत्व समजू लागलं होतं. तेव्हा जे शिकले, त्यांनी आपली आर्थिक, सामाजिक, बैद्धिक प्रगती पुष्कळच करून घेतली. त्यामुळे या शिकलेल्यांमध्ये आणि न शिकलेल्यांमध्ये दरी निर्माण झाली नाही तरच नवल. रखमाबाईंचे आजोबा रायबहादूर. घरी सुसंस्कृत वातावरण. पण जातीतल्याच एका स्त्रीने तुझ्या घरातली एक मुलगी मला सून म्हणून दे, या वचनात ते अडकले आणि त्यांनी रखमाबाईंचा विवाह दादाजी भिकाजी यांच्याशी करून दिला. त्यानंतर मुलीला वैधव्य आले म्हणून रखमाबाईंची आई जयंतीबाईचे लग्न सखाराम अर्जुन यांच्याशी करून दिले. ते ही बौद्धिक, सामाजिक आणि आर्थिक दृष्ट्या तोलामोलाचेच होते. जाण आल्यावर नवरा सासरी न्यायला आल्यावर या रखमाबाईंनी अशिक्षित, गरीब व दुसर्‍याच्या (मामाच्या) घरी राहणार्‍या नवर्‍यासोबत जाणार नाही असे निक्षून सांगितले. परिणामी दादाजी भिकाजींनी त्यांच्यावर दावा गुदरला. हा काळ साधारण १८८४ चा. त्याकाळी एका स्त्रीने असे करणे म्हणजे सनातन्यांनाच काय पण जनसामान्यांना देखिल मोठा धक्काच होता. या खटल्यात त्यांचे सावत्र वडील व त्यांच्यानंतर त्यांची आईही रखमाबाईंच्या पाठी उभ्या राहिल्या. हे १०० वर्षांनंतरही आज असे इतक्या सहजपणे होईल का हा प्रश्नच आहे. या

खटल्यात तेव्हाच्या वेगवेगळ्या न्यायाधिशांनी काय काय निकाल दिले? हे वाचण्यासारखे आहे. तेव्हाचे रखमाबाईंचे टोपणनावाने टाईम्स ऑफ इंडियात बालविवाह व विधवाविवाह यांच्या विरोधात लिहिणे हेही विलक्षणच. त्यांच्या मते हे लग्न लागताना त्या अल्पवयीन (११ व.) होत्या व तेव्हा कुणी त्यांना मतही विचारले नव्हते. जर का हाच विवाह जाणतेपणी व्हायचा, तर तो झालाच नसता. तेव्हा सगळ्या गोष्टींचे मूळ बालविवाह होते. आतापर्यंत इतकाच भाग वाचून झालाय, आणि एकंदर माहिती खूपच रोचक आहे.

पुस्तक छोटेखानी असले तरी त्यात बरेच संदर्भ येत आहेत. एकंदर एका आत्मविश्वासपूर्ण, क्रांतिकारी आणि त्याचवेळी अतिशय शांत अशा रखमाबाईंची कहाणी मला तरी आवडतेय. (पुस्तक वाचायला तितकीशी मजा मात्र येत नाहीय. लेखिकेने मध्ये मध्ये थोडे संदर्भ दिले आहेत पण खूप सारी माहिती एकदम अंगावर आल्यासारखी वाटतेय.)

जाताजाता, थोडंसं लिहायला म्हणून आले आणि छोटेखानी परिचयच लिहिला गेलाय. असूंदेत. पुढे मागे पुस्तक परिचय लिहिताना चोप्य पस्ते करायला सोपं पडेल!!! :-)

Sat, 30/10/2010 - 21:28 Permalink

१९०० च्या पूर्वीच्या काळात, जेव्हा स्त्रियांच्या शिक्षणाबद्दल कोणीही फारसं गंभीर नव्हतं, सावित्रीबाई फुल्यांची शाळा आणि छळ सुरू होऊन फार दिवस झाले नव्हते असा तो काळ. तेव्हा डॉक्टर होणं किती कठीण असावं, आपण कल्पनाच करू शकत नाही.

आनंदीबाईंसारखी प्रकांड बुद्धिमती अकाली हे जग सोडून गेली तर रखमाबाईंचं आयुष्य अद्भुत आणि चमत्कारिक या सदरात जमा होणारं. आईचा पुनर्विवाह, स्वतःचा बालविवाह, नंतरचे खटले वगैरे हे आताच्या काळात सुद्धा निभावून नेणं कठीण आहे. पैसे असले तरी या सगळ्यातून पार पडण्यासाठी मानसिक बळ त्याना कुठून आलं असेल, विचार करून मति चालेनाशी होते.

रखमाबाईंबद्दल वाचलंय. पण हे पुस्तक वाचावंस वाटतंय नक्की!

Mon, 01/11/2010 - 22:25 Permalink

सुरेख परिचय करून दिला आहे या पुस्तकाचा मस्त कलंदर यानी.

डॉ. रखमाबाई आणि आनंदीबाई जोशीं या दोन कमालीच्या कर्तृत्ववान महिला....ज्यांच्या आयुष्यातून पिडा नावाची बला कधीच गेली नाही, त्यांच्याविषयी जितके वाचावे तितके कमीच आहे असे म्हणावे लागेल. मोहिनी वर्दे यांच्या पुस्तकात कायद्याच्या झगड्याची कथा वाचताना जाणवते ते हे की आज २१ व्या शतकातसुद्धा एकट्यादुकट्या महिलेला कोर्टकचेर्‍यांना तोंड देता देता नाकीनऊ येते, तर सव्वाशे वर्षापूर्वी बाणेदारपणा दाखविणार्‍या रखमाबाईकडे कोर्टच काय पण आजुबाजूच्या नातेसंबंधाने कोणत्या नजरेने पाहिले असेल, याचा विचारही सुन्न करणारा आहे.

त्यातल्यात्यात आनंदीबाई काहीशा नशीबवान म्हटल्या पाहिजेत....तेही एवढ्यासाठी की किमान नवरा तरी भक्कमपणे त्यांच्या पाठीशी उभा होता....जरी प्रकृतीने आनंदीबाईना साथ दिली नसली तरी त्यांनी त्यांच्या पुढच्या पिढीसाठी एक आदर्श घालून दिला. [मला वाटते अरूणा ढेरे यांच्या एका पुस्तकात या दोन्ही कर्तृत्ववान स्त्रीयांवर दीर्घ लेख आहेत].

दोघीही वैद्यकिय क्षेत्रातील.....तशाच ताराबाई मोडक शिक्षणक्षेत्रीतील एक तेजस्वी नाव....कधीतरी यांच्यावरही म.क. ने लिहावे.

इन्द्रा

Sun, 31/10/2010 - 11:09 Permalink

>>>डॉ. रखमाबाई आणि आनंदीबाई जोशीं या दोन कमालीच्या कर्तृत्ववान महिला....ज्यांच्या आयुष्यातून पिडा नावाची बला कधीच गेली नाही,
जरी रखमाबाईंवरचे पुस्तक अजून वाचून झाले नाही, तरी आतापर्यंतचे वाचन पाहता याला माझाही मनोमन दुजोरा आहेच.

>>>त्यातल्यात्यात आनंदीबाई काहीशा नशीबवान म्हटल्या पाहिजेत....तेही एवढ्यासाठी की किमान नवरा तरी भक्कमपणे त्यांच्या पाठीशी उभा होता.
या विधानाशी मात्र १००% असहमत आहे. नवरा त्यांच्यासोबत होता, ते फक्त त्या अमेरिकेला जाईपर्यंत. त्यानंतर सगळ्यात जास्त मनस्ताप त्यानेच दिला. आणि देशात असताना प्रत्येक सनातनी, घरचे, दारचे, मानलेले, आई सगळेच त्यांच्या शिक्षणाच्या विरोधात होते. त्यांना त्या परदेशात जाऊन काय करतील याचे जाहिर स्पष्टीकरण द्यावे लागले. इतके करूनही त्यांना आदल्या दिवशी भाऊ मरणाच्या दारात आहे, तेव्हा माहेरी ये असे मुद्दाम पत्र पाठवले गेले होते. त्या परदेशात असतानादेखिल भारतातून कुठल्याही सोम्यागोम्याची ती कशी चुकीची आहे याची पत्रे जायची. त्यांच्याहून आठ-दहा वर्षांनी लहान असलेल्या भावानेसुद्धा एकदा असलेच अगोचरपणा करणारे दुखावणारे पत्र लिहिले होते.

उलट मुख्य म्हणजे ज्यासाठी रखमाबाईच्या नवर्‍याच्या मामांनी त्यांच्या विरूद्ध दादाजींना चिथावले, ते कारण : रखमाबाईंच्या सख्या बाबांची आईने दुसरे लग्न केल्याने रखमाबाईंच्या नावे झालेली इस्टेट(पैसा) हा आनंदीबाईंकडे नव्हता. शिक्षणाचा तर प्रश्नच नाही. आजोबा रायबहादूर+जस्टिस ऑफ पीस होते. घरचे वातावरण इंग्रजी+उच्चभ्रू होते. जयंतीबाईंनी सून घरी आल्यावर मुलीसोबत तिलाही रमाबाईंच्या शाळेत पाठवले. आनंदीबाईंचे शिक्षण घरीच झाले होते, आणि त्या शाळेत जात म्हणून त्यांना जसे दगड मारले होते, ते रखमाबाईंना मारल्याचे माझ्या वाचनात आले नाही. रखमाबाईंची इंग्रजांच्यात उठबस होती. एक मड्डम त्यांना घरी येण्यासाठी घरची बग्गी पाठवे आणि संध्याकाळी पतीला कोर्टातून आणण्यासाठी जाताना त्यांना घरी सोडून जाई. त्या इंग्रजांच्यासोबत राहून त्यांची आदब, शिष्टाचार आणि बर्‍याच गोष्टी शिकल्या, म्हणजेच त्यांचा कधीही इंग्रज(परदेशस्थांकडून) अपमान झाला नाही. तर गोपाळराव काहीतरी मदत होईल म्हणून गावोगाव बदली करून घेत भटकले, बर्‍याचशा मिशनर्‍यांना भेटले. मात्र त्या मिशनर्‍यांसाठी ते ख्रिस्ती होऊ शकणारे संभाव्य बकरेच होते. खुद्द आनंदीबाईंचा भारतात असताना व बोट प्रवासात युरोपीयांकदून असा पुष्कळच अपमान झाला. अजूनही बरेच मुद्दे आहेत आणि रखमाबाईंचे चरित्र वाचल्यावर त्यात भर पडण्याची शक्यता आहेच. त्यामुळे संघर्ष पाहायचा म्हटला तर मला आनंदीबाईंचे आयुष्य जास्त खडतर वाटते.
ओव्हर टू यू..... :-)

Mon, 01/11/2010 - 00:02 Permalink

'नवीन काय वाचताय?' बराच लांबलाय, तो वाचायला त्रास होतोय, म्हणून हा नवा धागा.

सध्या मी वाचतेय -

स्थलकाल - अरुण टिकेकर
जुन्या मुंबई इलाख्यातल्या निरनिराळ्या स्थळांच्या भूतकाळाचा - नेपथ्य आणि संस्कृती यांचा - मागोवा. फार सुंदर फोटो आणि एकुणात देखणं पुस्तक.

इट्स नॉट अबाउट बाइक - लान्स आर्मस्ट्राँग
अनुवाद कुणी केलाय आठवत नाहीये. पण चांगला केलाय. लान्स आर्मस्ट्रॉंग या जागतिक दर्ज्याच्या सायकलपटूचं आत्मचरित्रात्मक पुस्तक. तो गरिबीशी झगडून वयाच्या पंचविशीत खेळाडू म्हणून एका स्थानावर पोचला आणि नेमकी तेव्हाच त्याला वृषणाचा कॅन्सर झाल्याची (तोही तिसर्‍या टप्प्यापर्यंत, म्हणजे फुफ्फुसांपर्यंत पोचलेला) वाईट बातमी त्याला मिळाली. मग त्यातून बरा होऊन 'तूर दे फ्रान्स' जिंकण्यापर्यंतचा त्याचा प्रवास या पुस्तकात आहे. एकदा वाचलंच पाहिजे.