'बोलती पुस्तके' हा मराठीतला पहिला वाहिला free Audio Books प्रकल्प. याबद्दल अधिक जाणुन घ्या इथे.
हिंदू : जगण्याची समृद्ध अडगळ
मुखपृष्ठ
|

कोण आहे मी?
मी मी आहे, खंडेराव.
ह्यावर स्तब्धता. मग मी विचारतो, तू कोण?
मी तू आहेस, खंडेराव.
अंमळ चुळबुळत्साता मी म्हणतो, म्हणजे? तुलाच मी मी कोण असं विचारलं? म्हणजे स्वत:लाच मी कोण आहे, असं? मग तो कोण? मीच?
आत्ता बरोबर. तरच आपल्याला काहीतरी सांगता येईल, खंडेराव. मी तू तो एकच.
ह्यावर सामसूम. किती एक शतकांची. नि:शब्द.
आणि खंडेराव, फक्त गोष्टच सांगत जा राव.
अशी हिंदूची सुरुवात आहे. एका भयंकर, जगड्व्याळ रोलरकोस्टरवर घेऊन जाणारी महाकादंबरी. बरीच वर्षं येणार म्हणून गाजलेली. पण आल्यावर, वाचल्यावर एवढा वेळ लागला तो साहजिकच आहे असं मान्य करायला लावणारी.

एका भल्या मोठ्या पृष्ठभागावरचा एक अतिविशाल देखावा. तो कधीच एका नजरेत येत नाही. तुकड्यातुकड्याने पहावा लागतो. त्यात काय नाही? हा खंडेराव आहे, खंडेराव विठ्ठल मोरगावकर! त्याचं खानदेशातलं मोरगाव, या गावाचा खंडेरावाच्या मागच्या सातव्या पूर्वजापासूनचा नागोजीरावपासूनचा इतिहास, या गावामागची सातपुड्याची डोंगररांग, तिथले आदिवासी, भलामोठा खटलं असणारं त्याचं कुणबी कुटुंब, लाख केळी असलेला त्याचा कर्तृत्त्ववान बाप, शेकडो एकरांची शेती, त्यातले सालदार, मजूर, गावातले बारा बलुतेदार, परत अगणित नातेवाईक, घरातल्या म्हातार्यार, त्यांचा भूतकाळ, नवरा मेल्यावर परत आलेल्या स्त्रिया. अजून काय सांगितलं म्हणजे कल्पना येईल? आणि खरंच कल्पना येईल? खरंच?
हा खंडेराव पुरातत्ववेत्ता आहे. उत्खनन करतो, युनेस्को-मोहनजो-दडो १९६३ या प्रकल्पात सध्या त्याचं काम चालू आहे. मडकी जोडतो. मडकं सापडलं तिथे सांगाडा असलाच पाहिजे. दुसर्या दिवशी खोदायला घ्यायचा आयत नीट आखायला दोरी लागते. त्यांचा भलामोठ्या भेंडोळ्याचा गुंता सोडवायला हा रात्रभर जागतो. जाणिवांना पुरातत्त्वात स्थान का असू नये म्हणून सांखळिया सरांशी वाद घालतो. ह्याच्या बोलण्यातून मोरगावच्या वंशपरंपरागत गणिकांचे उल्लेख ऐकून कुतूहल चाळवलेल्या स्कॉटिश मंडीला हा मोरगावला काही महिने राहायलाच पाठवून देतो.
उत्खननाबरोबरच याच्या डोक्याचंही उत्खनन चालूच आहे. पार सिंधू नदीच्या तीरावरच्या आर्यांपासून ते मोरगावातल्या लभान्यांच्या गणिका, त्यांची वंशज असलेली सध्याची झेंडी इथपर्यंतचे गुंते या खंडेरावाच्या डोक्यात भरलेले आहेत. पाकिस्तानात आलेली त्याची महानुभावांची तिरोनी आत्या, तिला शोधायला हा खटपट करतो आहे. "संपूर्ण डोक्यावरुन रजई पांघरुन आत तयार झालेल्या उबदार अंधारात गर्भाशयातल्यासारखं डोक्याकडे गुडघे घेऊन सुषुप्तीच्या अबोध अवकाशात तरंगणारा" हा असा खंडेराव आहे.

संपूर्ण कादंबरीभर पसरलेले अगणित लोकजीवनाचे संदर्भ, महानुभावांचे संदर्भ, परत लोकगीतं, लोककथा, म्हातार्याकोतार्यांच्या आठवणी, तुकाराम, पाकिस्तानात असताना वेड लावलेल्या गझला, गाणी, शेकडो शेर, गांधींच्या सर्वभक्षक हिंदुत्वाला घाबरुन मुसलमानांनी मागितलेला पाकिस्तान, मग फाळणी, फाळणीनंतर आपल्याच देशात परदेशी झालेले लोक, परत मोरगावचे ऐतिहासिक संदर्भ असा सगळाच हा पसारा आहे. आणि शिवाय स्वत:च्या नजरेतून या सगळ्याकडे बघणारा खंडेराव. आता अजून काय काय लिहू? आणि हे एवढं लिहून नेमाड्यांकडे तरी लिहायला आता शिल्लक काही राहिलं आहे का? असा प्रश्न पडायला लावणारी ही अडगळच आहे खरी. हिला काय नावं द्यायचं? समृद्ध? नाव बरोबर आहे मग.
कोसलाशी हिची तुलना करायचं कारण नाही. पण दोन्हींमध्ये थोडी साम्यं आहेत. ती लगेच जाणवण्यासारखी आहेत. (हिंदूबद्दल लिहायचं काय हा अवाढव्य प्रश्न सोडवण्याकरिता ही तुलनेची पळवाट मी काढली आहे असं म्हणू फारतर.) कोसलातला पांडुरंग सांगवीकर एकुलता एक वंशाचा दिवा आहे. खंडेरावाचं तसं नाही. याला भाऊ आहेत, बहिणी आहेत. पण पांडुरंग सांगवीकरासारखाच हाही घरापासून तसा अलिप्तच आहे. कापडचोपड खरेदी करणारे हरामखोर लोक यालाही आवडत नाहीत असं म्हणता येईल. कोसलातला नायक घरी परत येतोच शेवटी. पण खंडेराव काय करणार आहे? मधुमेह झाल्यावर औषधपाणी करायलाही सवड मिळत नाही इतका भलामोठा शेतीचा पसारा त्याचा बाप घालून बसला आहे. घरातल्यांचं करता करता झिजून चाललेल्या वहिनीची बाजू घेऊन बोलताच याला टांगायला निघालेल्या लोकांकडून, बाप मेल्यादिवशीच घरातल्या सोन्याची वाटणी पोटच्या पोरींमध्ये करुन टाकणार्या आईपासून हा लांब जाणार यात नवल काय? तशी मग पांडुरंगाची आणि खंडेरावाची विचारपद्धती सारखीच आहे.

सुरुवातीला पाकिस्तानातल्या उत्खननाच्या साईटवरुन सुरु झालेली कादंबरी खंडेरावाच्या वडिलांच्या मृत्यूशय्येवर असल्याच्या तारेनंतर खंडेराव मोरगावला निघतो तेव्हा फ्लॅशबॅकमध्ये शिरते आणि मधल्या रोलरकोस्टर राईडनंतर खंडेराव गावात आल्यावर त्याचे वडील जेव्हा त्याच्या मांडीवर प्राण सोडतात तिथे येऊन संपते. आता या पुढे या खंडेरावाचं काय होणार आहे? तो काय करणार आहे? हे सगळं तो मागे सोडून जाणार आहे? गेलाच तर मग या सगळ्याकडे कोण बघणार आहे? या प्रश्नांची उत्तरं पुढच्या भागातच आता मिळणार. चांगदेव चतुष्टयासारखे याचेही पुढचे भाग येणार असल्याचा उल्लेख मलपृष्ठावर आहेच. ते तरी लवकर यावेत अशी नेमाड्यांना विनंती करता येईल.
तर शेवटी माझ्या कुवतीनुसार मला हे एवढंच लिहिता येईल असं वाटत होतं आणि तेवढंच लिहिलेलं आहे. तात्पर्य विचाराल तर ही कादंबरी वाचणं हा एक अनुभव होता. अनुभवाच्या आधी कोणतं विशेषण लावावं हे मात्र कळत नाही. गेल्या वीसपंचवीस वर्षात वाचून मिळालं नसेल इतकं या कादंबरीनं मला (माझ्याबद्दल बोलतो आहे मी) वाचतानाच्या चार दिवसात दिलं असं म्हणता येईल. त्यामुळे तरी वाचलीच पाहिजे अशी माझ्यामते ही कादंबरी आहे. मलपृष्ठावर म्हटल्याप्रमाणे जीवनाची व्यापकता, व्यामिश्रता यांचे दर्शन घडवणे जसे महाकाव्याकडून अपेक्षित असते तसेच ते कादंबरीकडूनही असते आणि हिंदू त्यात यशस्वी झाली आहे. या वाक्याची खातरजमा कादंबरी वाचल्यावर तुम्हाला करता येईल.
मी वाचायला सुरूवात केली होती...
पण म्हणावी तशी पकड घेतली नाही कादंबरीने. कदाचित आणखी काही पाने वाचल्यावर रंग भरला असता. सुरूवात म्हणजे उत्खननाची वर्णने, काही पाकिस्तानातले प्रसंग आणि आणि काही मोरगांवातले प्रसंग इतकंच वाचून झालेय. अणि तो महानुभाव पंथात शिरलेल्या त्याच्या आत्याचा शोध घेतोय इथपर्यंतच पोचलेय.
माझ्या मते, खंडेरावाला बहिणी होत्या, भाऊ मात्र एकच, भावड्या. तोदेखील कशाने तरी वारल्याची घटना याच पहिल्या काही पानांत आहे. पुस्तक वाचून पूर्ण झाले की आणखी लिहितेच.
अरे वा नेमाड्यांचा सहीचा फोटो
अरे वा नेमाड्यांचा सहीचा फोटो चांगलाच वाटतो..
बाकी तुम्ही उत्तमच लिहिले आहे असे म्हणावेस वाटते..
माझ्या कडे पण अशीच लेखकाने सही केलेली प्रत येउन पडली आहे पण काही कारणास्तव पुर्ण करण्यास्तव वेळ मिळत नाहीए...
तुम्ही म्हणत्या त्या रोलरकोस्टर राइडची सुरवात झालेली आहेच
आज हा परिचय वाचुन आता परत पुस्तक हातात घेण्याची इच्छा निर्माण झालीए..
तुमचा परिचय आवडला..
लवकरच कादंबरी पुर्ण करतो आणि सविस्तर खरडतो.
निखिल देशपांडे
वा...
या कादंबरीचा पहिला परिचय वाचला मी आज. 
कादंबरीची प्रत मुंबईत येऊन पडली आहे. आणण्यासाठी आता शनिवारी जातोय. त्यानंतर वाचन. 
आभार
इथे परिक्षण टाकल्याबद्दल आभार! 
उपक्रमावर म्हटल्याप्रमाणे मस्त लिहिलं आहेस! अगदी पुस्तक विकत घ्याव असं वाटायला लावणारा परिचय
-ऋ
----------------------
"चला, मी माझा एकमेव जुनाट कोट घालून एक नवं पुस्तक घेऊन येतो"
धन्यवाद...
प्रतिसादाबद्दल सर्वांचे आभार.
सागर, हो ती तुलना करायचे खरेतर काहीच कारण नाही. पण हिंदूबद्दल काय लिहायचे हा प्रश्न सोडवण्यासाठी ती काढलेली पळवाट आहे असे मी लेखात लिहिले आहेच. 
मस्त कलंदर, कादंबरी पूर्ण वाचून पहा. तुम्हाला आवडेल. खंडेरावाला एकच भाऊ होता हे खरे. ती एक चूक झालेली आहे. मी मकडू या पात्राला देखील खंडेरावाचा भाऊ समजून चाललो होतो. मात्र तसे नाही. भावडू हा एकच भाऊ आणि तो देखील मरण पावतो.
निखिल देशपांडे, लवकर कादंबरी पूर्ण करा आणि सविस्तर खरडाही त्यानंतर. जमलंच तर एखादं परीक्षणही लिहायला हरकत नाही. 
श्रावण मोडक, ऋषिकेश प्रतिसादाबद्दल पुन्हा एकदा आभार.
-सौरभ.
छान
छान परिचय. या कादंबरीत काय असणार याची फार उत्सुकता लागुन राहिली होती.
कोसलात पार कंटाळलो होतो, ही त्या मानाने इंटरेस्टिंग आहे का ?
काय?
कोसलाला तुम्ही कंटाळला होता? 
मग खेदाने असे म्हणावे लागते की तुम्ही हिंदू वाचू नये. कारण ती कोसलापेक्षा खूपच मोठी आहे. खरेतर कोसला आणि हिंदू या दोन्हींचे विषय पूर्ण वेगळे आहेत. त्यामुळे रोचकतेचा निकष लावून दोन्हीत तुलना करता येणार नाही. पण करायचीच झाली तर हिंदू कोसलाएवढी रोचक नाही. तिची धाटणी वेगळी आहे.
-सौरभ.
उत्तम परिचय
हेच म्हणतो, कोसलात पार कंटाळलो होतो.........
बाकी उत्तम परिचय
वाचनानंतर
या कादंबरीचा पहिला परिचय वाचला मी आज.
कादंबरीची प्रत मुंबईत येऊन पडली आहे. आणण्यासाठी आता शनिवारी जातोय. त्यानंतर वाचन.
२ ऑगस्ट रोजी वरच्या दोन ओळी लिहिल्या होत्या. त्यानंतर कादंबरी आली. वाचून काढली.
कादंबरीचा हा पहिला खंड आहे. पहिल्या भागासाठी साडेपाचशेच्या घरात पाने आहेत. कशासाठी इतकी पाने, असा प्रश्न सगळी कादंबरी वाचून झाल्यानंतर स्वाभाविक उमटला. या पहिल्या खंडातील पहिला भाग थोडी पकड घेतो. उत्कंठा निर्माण करतो. भाग दोन, तीन, चार तद्दन वाया गेले आहेत. त्यानंतर जे सांगितले जाते त्यात पुन्हा थोडी तर्कसलगता आहे. बाकी मधले लेखन म्हणजे तारेतले लेखन वाटते. कोण कोणाशी काय बोलतो आहे, कोण कोणाला काय सांगतो आहे हेच कळून घेण्यासाठी कष्ट करावे लागतात. आता अशा कष्टसाध्य आकलनालायक लेखनालाच भारी लेखन म्हणायचे असेल, त्यातील अकारण असलेल्या दुर्बोधतेला भारी लेखन म्हणायचे असेल तर म्हणा बुवा. पण त्यानंतरही कादंबरी फसली आहे हे वास्तव शिल्लक राहते.
'हिंदू - जगण्याची समृद्ध अडगळ' हे कादंबरीचे आकर्षक शीर्षक आहे. या शीर्षकातील हिंदू आणि अडगळ या शब्दांवरून माझा विचारधारेतून येणारा काहीही आक्षेप नाही. माझा आक्षेप वेगळा आहे. हिंदू आणि अडगळ या दोन्हीचे नाते नेमाडे या खंडात तरी मांडू शकलेले नाहीत. ज्या गोष्टी त्यांच्या दृष्टीकोनातून अडगळ ठरणार असतील त्या अडगळीचा इथल्या या "हिंदू" समाजाने जगण्याचा एक साधा-सरळ मामला असा स्वीकार केला आहे. ते आकलन बदलून टाकावे आणि या अडगळीचा धिक्कार करून तिला जगण्यातून बाहेर काढावे यासाठी नेमाडे यांनी काही मूल्यात्मक भर टाकलेली या पहिल्या खंडातून तरी दिसत नाही.
या कादंबरीतून शेतकर्यांचे जगणे कळते वगैरे बोलले जाते. तसेही नाही. कारण ते जगणेही एकसंघपणे समजत नाहीच. एक ना धड भाराभार चिंध्या अशी स्थिती होते या वाचनानंतर.
कादंबरीच्या पुढच्या खंडांच्या केवळ कल्पनेनेच मी हबकून गेलो आहे. काय लिहिणार आहेत नेमाडे त्यात? न लिहिलेले उत्तम.
या पलीकडे याविषयी सविस्तर लिहिणे हाही अपव्ययच असू शकेल असे आत्ताचे तरी माझे मत आहे. ते बदलले तर इथे लिहिनच.
कोसला वाचली आहेस का
मी अजून हिंदू वाचलेली नाही, पण श्रामो तू कोसला वाचली आहेस का नेमाड्यांची?
वाचली असशील तर कोसला मुळे अपेक्षा उंचावणे साहजिक आहे. त्या अनुषंगाने हिंदू नक्कीच रटाळ वाटण्याचा संभव आहे असे मलाही दोघांनी सांगितले आहे.
कोसला वाचली नसशील तर ती वाच आणि मग नेमाड्यांच्या दोन कादंबरींतील दर्जा ठरवणे तुला अगदी सोपे पडावे.
कोसलातील बाज हिंदूमध्ये उतरला नसावा अशी शंका हिंदू ची जाहिरात मोठ्या प्रमाणावर सुरु झाली तेव्हापासूनच वाटत होते. तुझ्या प्रतिसादाने भर पडली. पण तरीही मी हिंदू नक्की वाचणार आहे. अर्थात अजून ६-१० महिन्यांनंतर अजून ४० च्या वर पुस्तके पडली आहेत ज्याला हात लावायचा आहे 
मी एक पुस्तकवेडा
http://pustakveda.blogspot.com/
हो
'कोसला' वाचली आहे. 'कोसला'च्या प्रभावाखाली 'हिंदू'चा विचार केलेला नाही. कारण 'कोसला' मी वाचली तीच मुळी तिच्या प्रभावाचे वातावरण संपल्यानंतर. त्यामुळं ती वाचतानाही मी 'कोसला'-'कोसला'-'कोसला' अशा मनस्थितीत नव्हतो. मी हिंदूचा विचार प्रामुख्यानं 'अडगळ' या शब्दाच्या संदर्भात अधिक करतोय. त्यामुळं मी भाषा वगैरेवर काहीही लिहिलेलं नाही. आर्किऑलॉजी हा विषय आणि हिंदू - अडगळ ही शब्दरचना पुरेशी बोलकी आहे. त्या दृष्टीनं थोडी अँथ्रॉपॉलॉजीच्या अंगानंही मी तिचा विचार करतो. त्या सगळ्या दृष्टीतून ही कादंबरी फसतेय. अर्थात, तू वाचच. कदाचित तुझे मत वेगळे असू शकेल. तसे झाले तर त्या चर्चेतून मलाही नवे काही मिळू शकेल.
मग ठीक आहे
तसे असेल तर ठीक आहे. वेगळाच दृष्टीकोन मिळाला मलाही वाचायचा 
मी देखील सर्व अंगानी वाचणार आहे हिंदू. तेव्हाच बोलू शकेन. वाचून झाले की त्यावेळी बोलनच तुझ्याशी
मी एक पुस्तकवेडा
http://pustakveda.blogspot.com/
अशातच हिंदु वाचुन संपवली.
अशातच हिंदु वाचुन संपवली. अक्षरशः संपवलीच म्हणावी लागेल.
पुस्तकाचे नाव आणि त्यासोबत नेमाड्यांनी मुलाखतीत केलेली फटकेबाजी पाहता पुस्तकाकडुन काही अपेक्षा निर्माण झाल्या होत्याच. कदाचीत इथेच पुस्तकाबद्दलचे गणित चुकले. कारण पुस्तकाचे नाव हिंदु एक समृद्ध अडगळ आणि मुलाखतीत दिलेले हिंदु धर्म/संस्कृती बद्दलचे विधान यांचा फारसा पुस्तकाशी कुठेच संबंध जाणवला नाही. आता हा कादंबरीच्या विषयाबद्दल बरेचसे लिहिलेले आहेच त्यामुळे त्याबद्दल फारसे काही लिहावेसे वाटत नाही. एकुणच कादंबरी खुप मोठी आणि रटाळ आहे. श्रामोंनी वर मांडल्या प्रमाणे पुस्तकाचे भाग दोन तीन चार खरोखर वाया गेलेलेच आहेत. कितीतरी वेळा तुम्हाला एका परिच्छेदाचा दुसर्याशी संबंध काय हे शोधावेसे लागते. असो कदाचित यालाच लेखकाची स्टाईल म्हणायचे का काय ते काही मला कळत नाही.
नेमाड्यांनी या कादंबरी साठी बराच काळ अभ्यास करुन कादंबरी लिहिली आहे असे कुठेसे वाचले होते. आता या कादंबरीच्या पहिल्या खंडातुन मला तरी हे फारसे जाणवलेले नाही. कारण कादंबरीचा बराचसा भाग हा सधन शेतकर्याचे एकत्र बारदान आणि त्यांची जीवनशैली समजवण्यात गेला आहे. आता या भागात रिसर्च पेक्षा लेखकाचा अनुभव जास्त जमेचा असावा असे वाटते. पुढच्या भागात आलेले मराठवाडा विद्यापिठातले राजकारण किंवा चांगदेव चतुष्टया मधले शिक्षण संस्थेतले वातावरण हे लेखकाने अनुभवलेले असावे त्यासाठी काही खास अभ्यास करायची गरज पडली असेल असे मला तरी वाटत नाही. एखाद्या लेखकाने अभ्यासपुर्व लिहिलेल्या कादंबर्या म्हणुन मला डॅन ब्राउन च्या कादंबर्याचे उदाहरण पटते, डॅन चा प्रत्येक कादंबरीत त्याचा विषयाशी निगडीत केलेला रिसर्च जाणवतो. इतिहासाची कल्पने सोबत घातलेली सांगड उत्तम असते. हिंदु च्या बाबतईत अभ्यास फारसा जाणवत नाहीच.
एकुणच या कादंबरी नंतर पुढच्या भागात आता नेमाडे काय लिहिणार आहेत ते फक्त तेच जाणो. त्यांनी एवढे वर्ष मेहनत घेतलेली त्यांचा पुस्तकातून जाणवली तर उत्तमच.
निखिल देशपांडे
उत्पल चंदावार यांची कविता
हिंदू वाचल्यानंतर... अर्थात एक होती कोसला
उत्पल चंदावार- मिळून सार्याजणी जानेवारी २०११
एक होती कोसला, सांगे पांडुरंगाचे आर्त
बेफिकीर वयामधले विविध रंग उदाहरणार्थ
पुण्यामध्ये उणे होते, शब्दांचे मोहक दर्शन होते
सांगवीतल्या बांधवांचे भयचकित जगणे होते
भावनांचा ओघ होता, अलम दुनियेचा शोक होता
कॉलेज, कट्टा,हॉस्टेल, मद्रास सर्वत्र साल्या जगण्याचा
मुळारंभ जोक होता
पांडुरंगाच्या लीळा होत्या, रमीचे हुरहुरते चरित्र होते
'आपण घर करुया' हे वाचल्यावर
आमच्याही मनात गलबलले एक चित्र होते
भाषेचे वैभव अफाट होते, शैलीचा मानदंड होता
भकास, भंकस जाणिवांचा, आम्ही वेचला आनंद होता
मनूचा मृत्यू भिडला होता, बधिर होऊन रडला होता
आयुष्याच्या भयाण पसार्याकडे हताशपणे बघत बसलाही होता
कोसला म्हणजे जरा फारच, कोसला म्हणजे अगदी अशक्यच,
कोसला म्हणजे व्याख्येतून मुक्त, कोसला म्हणजे हे मुक्त, ते मुक्त
कोसला म्हणजे आभाळाकडे डोळे लावून एकट्याने म्हणायचे
एकट्याचे सूक्त
मग आम्ही हिंदू वाचली
आणि मग आम्ही टरकलो.
येणार येणार म्हण्न गाजत होती, आमची उत्कंठा वाढवत होती
प्रकाशनपूर्व कीर्ती गगनांतरी पोचली होती
अगोदरच राखून ठेवलेली प्रत बरीच वाट बघितल्यावर हाती आली
सहाशे पानांची सुबक बांधणी बघून वाटलं, चला प्रतीक्षा सार्थ झाली
मात्र कथा पकड घेईना, तपशिलातून बाहेर येईना
तपशिलाचे कौतुक वाटे, पण 'कादंबरी' चे रुप थिटे
कालखंडाची गडबड आहे, गोष्टीतल्या धाग्यांचा गुंता आहे
मध्येच काही प्रसंग विलक्षण, पण एकुणात जरा चिंताच आहे
खंडेराव खूप काही बघत आहे, आम्हीही बापडे बघतो आहोत
पण सुसूत्रतेचे काय झाले, याचे उत्तर शोधतो आहोत
तपशिलाचा प्रश्नच नाही, मोठाच पट उभा राही
पण तपशील म्हणजे शेवटी मालगाडीचे डबे.. वाहतूक होई
पण घाटाची मजा घ्यायला कुणी नाही
अशा वेळी आठवे कोसला अन ती झपाटलेली भाषा
लहानशाच आयूष्याच्या प्रचंड अनूभूतीची नशा
हिंदूरावांचे नाव मोठे, म्हणून त्यांना साकडे
इथून पुढल्या खंडांना, द्या कादंबरीचे रुपडे
मायमराठीत कादंबरीच नाही अशी म्हणे हिंदुरावांना बोच
असं काय करता मालक, वाचा की एकदा तुंबाडचे खोत !
लेखक बोलतो
मी नेमाडेंचे फक्त कोसला वाचले आहे. ते ही मला फारकाही आवडले नाही. हिंदु विकत घेणारच होतो पण आधी चाळून बघु म्हटल आणि मग ते ठेऊनच दिल. मला जाणवलेली गोष्ट म्हणजे कधीकधी मला अस वाटल कि हा नायक नसून लेखकच बोलतोय, आणि मग त्याला फारसे महत्त्व उरल नाही.
लोकप्रभा
हिंदूचे आणखी एक परिक्षण.
--
Behind every great man there is a woman... rolling her eyes. ~ Jim Carrey
अनुदिनी : http://rbk137.blogspot.com/






सुंदर परिक्षण
सौरभदा,
छान परिक्षण लिहिले आहे. लेखात दिलेली छायाचित्रे परिक्षणाला उठाव तर आणतातच पण भालचंद्र नेमाडे यांच्या स्वाक्षरीने अजून भारदस्त पणा आला आहे.
दोन कादंबर्यांची तुलना शक्यतो करणे योग्य नाहियेच. तेव्हा हिंदू कादंबरी वाचताना एक संपूर्णपणे नवीन अनुभव घेऊन वाचली जावी असे माझेही मत आहे. तुलना करुन वाचन केले तर कादंबरीतील सौंदर्यस्थळे दूषित होतात असे मला वाटते.
मी अजून वाचली नाहिये ही कादंबरी. किंबहुना वाचेल असेही वाटत नव्हते. पण या परिक्षणामुळे ही कादंबरी मी तरी नक्की वाचणार आहे.
धन्यवाद,
सागर
मी एक पुस्तकवेडा
http://pustakveda.blogspot.com/