||दिवाळी २०१०||

'साभार परती'चा शिक्का 
प्रभाकर नानावटी

काही वर्षांपूर्वी होतकरू (ललित!) लेखक वा कवी भरपूर कष्ट घेऊन लिहिलेली एखादी साहित्यकृती संपादक वा प्रकाशकाकडे प्रसिद्ध करण्यासाठी पोस्टाने पाठवत असत. काही (साहित्यबाह्य!) कारणामुळे, ती कृती पसंत न पडल्यास संपादक व प्रकाशक ती पोचल्या-पोचल्या उलटटपाली त्या प्रतीवर 'साभार परत' हा शिक्का उमटवून साहित्यिकाकडे मूळ प्रत पाठवून देत असत. त्याकाळच्या कित्येक लेखकांना असा शिक्का पाहिल्यानंतर रडूही कोसळत असेल. परंतु ह्या अवघड जागेच्या दुखण्याची जास्त वाच्यताही करता येत नव्हती. परत आलेले गठ्ठेच्या गठ्ठे पाहून, मनातल्या मनात संपादकांना वा प्रकाशकांना शिव्याही या उपेक्षित साहित्यिकांनी दिल्या असतील. आजकाल मात्र या साभार परतीची 'भेट' विस्मरणात गेली असावी, असे वाटते. कारण ही मंडळी साभार परत म्हणून लेख परत पाठविण्याचे सौजन्यही दाखवत नाहीत. (मुळात ते कुठल्याही अनाहूत कृतीकडे बघण्याच्या मनस्थितीत नसतात.) नवोदित लेखक हा त्यांच्या दृष्टीने कचर्‍यासमान असल्यामुळे त्याच्यासाठी कसलीही तसदी वा कष्ट घेण्यास ते तयार होत नाहीत. तुम्ही तुमची एक स्थळप्रत जपून ठेवा. काही दिवस वाट पहा. न छापल्यास कृती स्वीकृत झाली नाही, (वा छापण्यायोग्य नाही!) असे समजा हा त्यांचा बाणा असतो. काही अभ्यासू संपादक-प्रकाशक लेखकाला त्याच्या उणीवा लक्षात आणून देऊन, त्या साहित्यिकाला अक्षरश: घडवत असतात. परंतु ही जात नामशेष होत आहे. परंतु 'साभार परती'च्या गोष्टी फक्त तुमच्या आमच्यासारख्या सामान्यांच्या बाबतीतच घडतात असे नाही. हा प्रकार मोठमोठ्या, अत्यंत नावाजलेल्या साहित्यिकांच्या बाबतीतही घडलेला आहे. मराठी साहित्यिक अशा गोष्टी चारचौघांत सांगत नाहीत म्हणून कदाचित आपल्याला त्याबद्दल कळत नसावे, परंतु इंग्रजी साहित्यवर्तुळात या गोष्टी राजरोसपणे चर्चिल्या जातात व त्यावर लेखही छापून येत असतात. दुसर्‍या एखाद्या संपादक-प्रकाशकाने तीच कृती प्रसिद्ध करून तो पैसे कमवू लागल्यानंतर मात्र कृती अस्वीकृत करणार्‍या अगोदरच्या संपादक-प्रकाशकांचे पितळ उघडे पडते.

१९५०च्या सुमारास पाठवलेल्या एका हस्तप्रतीवर, ती स्वीकार न केलेल्या संपादकाने 'कंटाळवाणे' असा शेरा मारला. दुसर्‍याने 'कौटुंबिक रडकथा, पौगंडावस्थेतील भावनिक उद्वेग' असे खरडले. आणखी एकाने 'दुसर्‍या युद्धाच्या धुमश्चक्रीच्या काळात छापले गेले असते, तरी पुस्तक खपण्याची शक्यता कमी' अशी शेरेबाजी केली. या पुस्तकाचे नाव 'डायरी ऑफ ए यंग गर्ल' व पुस्तकाची लेखिका ऍन फ्रँक. पुढे ते पुस्तक एका प्रकाशकाने छापल्यानंतर त्याच्या ३ कोटी प्रती खपल्या व अजूनही हे पुस्तक प्रचंड खपाच्या यादीत चमकत असते. जॉर्ज ऑर्वेल या लेखकाच्या 'ऍनिमल फार्म'च्या हस्तप्रतीवर 'प्राण्यांविषयीची पुस्तकं अमेरिकेत खपत नाहीत' असे लिहून त्याची बोळवण केली होती. १९४५मध्ये प्रकाशित झालेल्या या पुस्तकाच्या पुढील ४ वर्षांत ६ लाख प्रती खपल्या. शिंडलर्स लिस्ट या गाजलेल्या पुस्तकाचे लेखक थॉमस केनेअली याना एका संपादकाने सुरुवातीला "पुन्हा एकदा पोलंड व पुन्हा एकदा ज्यू समाज!" असे लिहून मूळ प्रत परत पाठवले होते. अमेरिकेतील मूळ रहिवासी असलेल्या रेड इंडियन्सच्या नावाहो जमातीच्या संस्कृतीच्या आधारे दि ब्लेसिंग वे, 'डान्स हॉल ऑफ दि डेड'सारख्या हेरकथा लिहिणार्‍या टोनी हिलरमनच्या हस्तप्रतीवर 'याच्या पुस्तकातील रेड इंडियन्सचे सर्व संदर्भ गाळायला हवेत' असे एका प्रकाशकाने लिहिले होते. प्रसिद्ध ब्रिटिश कादंबरीकार टेड ह्युजेस यांची अमेरिकन पत्नी सिल्विया प्लाथ कवयित्री होती. तिचे एरियल, दि बेल जार कविता संग्रह गाजलेले होते. परंतु एका संपादक महाशयाने मात्र "हिच्याकडे तिळभरसुद्धा शहाणपणा आहे असे अजिबात जाणवत नाही" असे प्रत वाचताना लिहिले होते. रुडयार्ड किपलिंग या लेखकाला "माफ करा, परंतु तुम्हांला इंग्रजीचा वापर कसा करावा याचे अजिबात ज्ञान नाही", असे सुनावले गेले होते.

काही पुस्तकांना एक-दोनदा नव्हे तर अनेकवेळा साभार परतीच्या प्रक्रियेला सामोरे जावे लागले. या साभार परतीच्या शिक्षेतून प्रसिद्ध कादंबरीकार जॉन ग्रिशम व हॅरी पॉटरमुळे प्रसिद्धीच्या झोतात असलेली लेखिका जे. के. रोलिंग यांचीही सुटका झाली नाही. जॉन ग्रिशमची 'अ टाइम टू किल' ही गाजलेली कादंबरी २६ वेळा परत आली होती. त्याच्याच 'दि फर्म' या कादंबरीच्या हस्तलिखिताची पायरेटेड प्रत हॉलिवूडमध्ये फिरत असताना, एका निर्मात्याने चित्रपटहक्क विकत घेतल्यानंतर प्रकाशकाच्या डोक्यात ट्यूब पेटली. 'ऍंड टू थिंक दॅट आय सॉ इट ऑन मलबेरी स्ट्रीट' या बालसाहित्याचे लेखक, डॉ. सुस यांना हे पुस्तक छापण्यापूर्वी २७वेळा साभार परतीची चिठ्ठी वाचावी लागली. जे. के. रोलिंगला आपली कृती प्रकाशकाच्या गळी उतरवण्यास ९ प्रकाशकांच्या पायर्‍या झिजवाव्या लागल्या. जॉन ग्रिशम वा जे. के. रोलिंग आपल्याप्रमाणे पहिलीच अस्वीकृत चिठ्ठी वाचून नाउमेद होत, लिहिण्याच्या फंदात पडले नसते तर आज आपण लाखो वाचकांना मंत्रमुग्ध करणार्‍या साहित्यकृतींपासून वंचित राहिलो असतो. जॉन केनेडी टूल या लेखकाला जेव्हा पाचव्यांदा आपली कृती अस्वीकृत झाली हे कळले, तेव्हा त्याने आत्महत्या केली. त्याच्या आईने त्याच्या मरणोत्तर ती स्थळप्रत दुसर्‍या एका प्रकाशकाकडे पाठवून दिली व 'अ कॉन्फिडरसी ऑफ डन्सेस' या कादंबरीला पुलिट्झर पारितोषिक मिळाले. या कादंबरीच्या २० लाख प्रती विकल्या गेल्या. स्टिफन किंग या लेखकाची कॅरी ही कादंबरी प्रसिद्ध होण्यापूर्वी ३० वेळा परत आली होती. रिचर्ड बाख या लेखकाचे 'जोनाथन लिव्हिंगस्टन सीगल' हे गाजलेले पुस्तक १४० वेळा परत आले होते. प्रसिद्धीनंतर त्याच्या ७२ लाख प्रती विकल्या गेल्या. गुप्तहेरकथेची ५८४ पुस्तकं प्रसिद्ध झालेल्या जॉन क्रीसी या लेखकाला ७४३ वेळा अस्वीकृतीच्या चिठ्ठ्या आल्या होत्या. व्हॅन गॉ च्या जीवनावरील कादंबरी - 'लस्ट फॉर लाइफ'च्या हस्तप्रतीला एका प्रकाशकाने 'कलाकारावरील अत्यंत कंटाळवाणी कादंबरी' म्हणून परत पाठवले होते. ही कादंबरीसुद्धा १६ वेळा परत आली, परंतु प्रसिद्ध झाल्यानंतर तिच्या २.८ कोटी प्रती विकल्या गेल्या.

आपण लिहिलेल्या प्रेम, युद्ध वा हवामानबदल या प्रकारच्या विषयांवरील पुस्तकाला ४-५ प्रकाशकांकडून नकार आल्यास, आपण तेवढे चांगले लिहू शकत नाही अशी समजूत करून घेऊन

आपण गप्प बसतो. 'झाली तेवढी शोभा पुरे' म्हणत नंतर लिहिण्याच्या फंदात पडत नाही, कारण आपल्या दृष्टीने हे प्रकाशक पुस्तकाच्या आशयाविषयी, खपाविषयी, वाचकांच्या आवडी-निवडींविषयी तज्ञ, जाणकार असतात. परंतु आपला हा कयास चुकीचा असतो का? खरोखरच आपण लिहिलेली कृती न खपणारी, टाकाऊ असते का? एखादं नाणं उडवून छाप-काटा करताना सतत ५-६ वेळा काटाच पडला, याचा अर्थ छाप कधीच पडणार नाही का? पुढच्या वेळी (वा पुढच्या अनेक वेळा) तो काटाच असेल असे आपण गृहित का धरतो? किंवा चित्रपटविश्वाप्रमाणे प्रकाशनविश्वसुद्धा खरोखरच अनिश्चिततेने ग्रस्त आहे का? कुठली कृती बेस्टसेलर होईल व कुठली होणार नाही, याचे काही निकष ठरले आहेत का? एखादा सिनेमा एवढी गर्दी का खेचतो, गल्लाभरू कसा होतो, याची कल्पना चित्रपट प्रसिद्ध होण्यापूर्वी कोणी करू शकत नाही. गाणी, दिग्दर्शन, संगीत, संभाषण, पटकथा, हीरो-हिरॉईन, काही (उत्तान!) दृष्ये, जाहिरात, प्रेक्षकांची बदलती अभिरुची असे कुठलेही कारण गल्ला भरण्यासाठी वा न भरण्यासाठी पुरेसे ठरू शकते. तसे काही प्रकाशनाविषयी म्हणता येईल का?

माहितीतंत्रज्ञानातील सोयीसुविधांमुळे आता मात्र आपल्याला प्रकाशकांचे उंबरे झिजवण्याचे कारण नाही. इंटरनेट व ब्लॉगसारख्या सुविधांमुळे आपण आपली कृती इ-पुस्तकाच्या स्वरूपात प्रसिद्ध करून वाचकापर्यंत पोचू शकतो. आपल्या मित्रमंडळींना आनंद देऊ शकतो. (फक्त तुमच्या कृतीविषयी इ-वाचकांनी केलेली टीकाटिप्पणी सहन करण्याएवढी सहनशीलता तुमच्यात हवी!) मुद्रित पुस्तकासारखा कदाचित यातून पैसा मिळतही नसेल; परंतु आपले लेखन हे आपल्या समाधानासाठी असते व सर्जनशीलतेचा आनंद पैशात मोजता येत नाही!

अनुक्रमणिका

अनुभव

कवितासंग्रहाचे परिचय

लेखकांचे परिचय

मुलाखत

पुस्तक परिचय

प्रतिक्रियां

छान ...

मला वि. स. खांडेकरांचें एक वाक्य आठवलें. निद्रा ही प्रीती आणि कीर्तीची सख्खी बहीण आहे, तिची जों जों आराधना करावी तों तों ती आपल्यापासून दूर पळते आणि जरा तिच्यापासून दूर जाण्याचा प्रयत्न करावा ताँ ती आपल्याला वश होते. खरेंच, कीर्तीची ही लालसा बर्‍याच जणांची झोंप उडवते हें खरें. पण लेखकानें स्वानंदासाठीं लिहावें आणि आपल्या मस्तींत जगावें हेंच खरें. साभार परतीमुळें येणारें नैराश्य हें अनाकलनीय आहे.

>>आपले लेखन हे आपल्या समाधानासाठी असते व सर्जनशीलतेचा आनंद पैशात मोजता येत नाही! >>

या मताशीं सहमत.

सुधीर कांदळकर

सुधीर कांदळकर

अच्छा

मजेदार माहिती आहे.

>>आपले लेखन हे आपल्या

>>आपले लेखन हे आपल्या समाधानासाठी असते व सर्जनशीलतेचा आनंद पैशात मोजता येत नाही! >>

सोला आने सच! Smile

प्रतिसाद

रोचक माहिती.

एक छोटीशी सुधारणा :
"मायकेलेंजेलोच्या जीवनावरील कादंबरी - 'लस्ट फॉर लाइफ'च्या हस्तप्रतीला एका प्रकाशकाने 'कलाकारावरील अत्यंत कंटाळवाणी कादंबरी' म्हणून परत पाठवले होते. ही कादंबरीसुद्धा १६ वेळा परत आली, परंतु प्रसिद्ध झाल्यानंतर तिच्या २.८ कोटी प्रती विकल्या गेल्या."

लस्ट फॉर लाईफ = व्हॅन गॉ च्या आयुष्यावर आधारित कादंबरी.
द अ‍ॅगनी अँड द एक्स्टसी = मायकेलेंजेलो च्या आयुष्यावर आधारित कादंबरी.
(दोन्ही कादंबर्‍या आयर्व्हिंग स्टोन यांच्या)

माहिती बरोबर

मायकेलेंजेलो ऐवजी व्हॅन गॉ पाहिजे होते. जमल्यास संपादकानी ही चूक दुरुस्त करावी. Sorry!

प्रतिसाद द्या

प्रतिक्रिया प्रकाशित करण्यासाठी येण्याची नोंद करा अथवा सदस्य व्हा.