खूप लहानपणी आम्हाला एक कविता होती. सारखा सारखा वाहून वाऱ्याचे पाय दुखत कसे नाहीत? सारखी सारखी वाहून नदी थकत कशी नाही? सारखी सारखी कामं करून आई दमत कशी नाही? अशी काहीशी ही कविता होती. ती आम्हांला सगळ्यांना खूप आवडायची. पण ही कविता शिकवताना, बाई आम्हाला म्हणाल्या, “सारखं सारखं बोलून तुमचं तोंड दुखत कसं नाही?” आणि हे ऐकताना आम्हाला सगळ्यांना एकदम खुद्कन हसूच फुटलं. आम्ही सगळ्या मुली खूप बडबड्या होतो. त्यात मी नेहमी आघाडीवर. माझा छंद काय? असं विचारल्यावर मी कधीकधी ’गप्पा मारणे’ असं उत्तर आजही देते. माझ्या मते, प्रत्येक माणसाला माझ्याइतकं तीव्रतेने नसेल कदाचित, दुसऱ्याशी बोलावंसं वाटतच असतं. पण नीट विचार केला, तर असं वाटतं की हे बोलणं म्हणजे नुसतीच बडबड नव्हे. नुसते स्वगत नव्हे आणि एखाद्याला ’पिळणे’ तर नव्हेच नव्हे. हे बोलणं म्हणजे जिवाभावाच्या सुहृदांना काहीतरी सांगणं असतं. काही गोष्टी त्यांच्याकडून ऐकणं असतं. सुखदुःखं वाटून घेणं असतं. पुलंनी वटवट या नाटकामधे,
ही केशवसुतांची ओळ उद्धृत करून म्हटलंय, की जीवनाचा सारा गोडवा या गोड वटवटीतच सामावलेला आहे.
मानवी समाजाचं निरीक्षण केलं, तर ही गोष्ट किती खरी आहे हे जाणवतं. वक्ते का बोलतात? कीर्तनकार कीर्तन करताना कथा रंगवून घोळवून का सांगतात? गायक का गातात? लेखक, कवी का लिहितात?; तर आपल्या मनातलं काही इतरांना सांगण्यासाठी. जरी त्यामधे अन्यायाला वाचा फोडण्यापासून ते चार घटकांची करमणूक करणे इथपर्यंत सगळे उद्देश अंतर्भूत असले तरीही; या सगळ्याच्या मुळाशी जी एक प्रेरणा आपल्याही नकळत असते, ती म्हणजे कुणालातरी आपलं मनोगत सांगणं. आणि जेव्हा लेखन ’सांगावेसे वाटले म्हणून...’ इतक्या निर्मळ उद्देशाने केलेलं असतं, तेव्हा ते केवळ पुस्तक रहात नाही. ती होते प्रसन्न मैफल. गप्पांची मैफल. मोकळेपणाने, कसलंही दडपण न घेता आणि ऐकणाऱ्याला न घेऊ देता, गुजगोष्टी सांगण्याची, मन मोकळं करण्याची एक अतिशय रंजक अशी सोय.
शांताबाईंच्या ’सांगावेसे वाटले म्हणून’ या पुस्तकात याचा प्रत्यय जागोजागी येतो. मेहता प्रकाशनाने छापलेल्या या छोटेखानी पुस्तकात शांताबाईंच्या ललितलेखांचा संग्रह आहे. एकूण २९ लेख यात आहेत. या सगळ्या लेखांमागचं सूत्र हेच आहे. आपल्या मनातलं गूज सांगावंसं वाटलं म्हणून हे सगळे लेख लिहिलेले आहेत. आणि एखाद्या जवळच्या मित्राशी गप्पा माराव्या इतका निर्व्याज मनमोकळेपणा हे या लेखांचे प्रमुख वैशिष्ठ्य आहे. आनंद वाटून घेतल्याने द्बिगुणित होतो म्हणतात. तसाच आनंद वाटून घेणारे हे लेखन म्हणजे आनंदाचा सतत झुळझुळ वाहणारा एक झराच आहे. शिवाय हे ललित लेखन शांताबाईंसारख्या शारदेच्या उपासिनीने केलेलं असल्यामुळे ते अतिशय नेमकं आणि थेट मनाला भिडणारं झालं आहे, कारण त्यांच्या अनुभवांशी आपण चटकन तादात्म्य पावतो. प्रत्येक माणूस इतरांपेक्षा वेगळा असतो हे जरी खरं असलं, तरी प्रत्येक माणूस कुठेतरी सारखाही असतो. या सारखेपणामुळे शांताबाईंच्या लेखनात आपण आपले विचार, आपले अनुभव जास्त तरलपणे, जास्त थेटपणे अनुभवत असतो. थोरांची अभिव्यक्ती व्यक्तिगत असूनही अतिशय व्यापक असं रूप धारण करते तेव्हा त्या साहित्यगंगेत मनमुराद अवगाहन केल्याचा आनंद आपल्या गांजलेल्या मनाला मिळत असतो. नकळत आपल्या वेदना कमी झालेल्या जाणवतात. आयुष्यातल्या अनेक तापांमुळे वैतागलेल्या मनाने हे पुस्तक वाचायला घ्यावे आणि काही मिनिटातच सारा अस्वस्थपणा, तगमग, त्रास, चिडचिड, वैताग सारे विसरून आपण या लेखातल्या निर्मळ आनंदाशी तद्रूप होऊन जावे हा अनुभव मी स्वतः अनेकवेळा घेतला आहे. एके काळी तर, हे पुस्तक आपण भराभर वाचून संपवून टाकू या भीतीने मी रोज एकच पान वाचण्याचे रेशनिंगही स्वतःवर लादले होते. अपूर्णतेच्या गोडीपेक्षाही, हे पुस्तक संपल्यावर इतक्या जिव्हाळ्याचं असं काय वाचायला मिळणार याची भ्रांत त्याच्या पाठीमागे होती; आणि आजही काही अंशी ती टिकून आहे.
काही लेखकांच्या पुस्तकांवर माझं इतर पुस्तकांपेक्षा जरा जास्तच प्रेम आहे; आणि ही पुस्तके वाचताना, त्या लेखकाची / लेखिकेची एक आकृती माझ्या मनःचक्षूंपुढे उभी राहते. सगळ्यांच्याच राहत असणार. कधीकधी लेखकाचं प्रत्यक्ष दर्शन या प्रतिमेशी तंतोतंत जुळत नाही, तेव्हा जराशी चुटपुट लागते. माणसाचा चेहरा नेहमीच त्याच्या अंतरंगाचा आरसा असत नाही हे खरं आहे. पण माणसाचे डोळे बरेचदा त्याच्या मनाचं प्रतिबिंब अतिशय नेमकेपणाने दाखवतात. जेव्हा एखाद्या माणसाची आपल्या मनातली प्रतिमा आणि त्या माणसाच्या डोळ्यातलं हे प्रतिबिंब एकमेकांशी जुळतं तेव्हा रेझोनन्समुळे तंबोऱ्याची षड्जाची तार वाजवल्यावर तिच्या शेजारची तार आपोआप झंकारून उठावी, तसं काहीसं मला होत असतं. भा. रा. भागवत आणि किशोर कादंबरीकार सुधाकर प्रभू या दोन साहित्यिकांना प्रत्यक्षात भेटायचं भाग्य मला लाभलं. भागवत आजोबांचे डोळे त्यांच्या लेखनासारखेच खट्याळ आणि बोलके होते. सुधाकर प्रभूंचे डोळे शांत होते. संयमी माणसासारखे. पुलं माझे आराध्यदैवत असले तरी त्यांना ’प्रतेक्ष’ पाहण्याचं भाग्य कधीच लाभलं नाही. पण पुलंच्या मुद्रेवर भरून राहणारा अतिशय खोडकर भाव आणि त्यांच्या डोळ्यांमधे असणारी ती थोडीशी व्रात्य, थोडीशी समोरच्याची ’कशी गंमत केली’ अशी चमक त्यांच्या फोटोमधूनही जाणवते. पी जी वुडहाउसचा फोटो विकीपीडियावर पाहिल्यावर मला सगळ्यात आधी जर काही जाणवलं असेल तर त्याचे डोळे. अशाच एका निर्मळ पण खोडकर आनंदाने चमकणारे त्याचे डोळे आणि त्या डोळ्यांमधली ती तेजस्वी चमक. आजही वुडहाउस म्हटलं की मला त्याचे ते तेजस्वी आणि आनंदाने लुकलुकणारे डोळेच आठवतात फक्त. शांताबाईंचे डोळे मात्र, त्यांच्या नावाप्रमाणे अतिशय शांत वाटतात. अनुभवाने आलेलं एक पोक्तपण आणि तरीही निष्कपट सुसंस्कृत मनाचं प्रतिबिंब त्यांच्या डोळ्यात तेवताना दिसतं आणि त्यांच्याकडे बघतच रहावंसं वाटतं.
शांताबाईंचं हे सुसंस्कृतपण त्यांना देवानेच दिलं असावं. कारण त्यांच्या लेखनात ते अगदी सहजपणाने जाणवतं. तसा सुसंस्कृतपणा हा प्रसिद्ध लेखनाचा एक आवश्यक गुण आहे. तो सभ्यपणापेक्षा वेगळा असतो. सभ्यपणा हा ज्या समाजात आपण वावरतो, त्याचे शिष्टाचार एकदा अंगी बाणवले की बऱ्याच अंशी जमून जातो; पण सुसंस्कृतपणाला सभ्यपणापेक्षाही व्यापक असा एक रंग आहे. या रंगाबरोबरच शांताबाईंच्या सगळ्या व्यक्तिमत्त्वातच एक सौम्य आणि घरंदाज अशी मर्यादशीलता भरून राहिलेली आहे. रघुवंशामधे कालिदासाने दिलीप राजाचं वर्णन करताना तो
म्हणजे कितीही मोठी भरती आली तरी समुद्र जशी आपली मर्यादा ओलांडत नाही तसा होता, असं म्हटलंय. असंच काहीसं मला शांताबाईंबद्दल विचार करताना वाटतं. ज्या काळात शांताबाई तरुण होत्या, त्या काळात स्त्रिया शिकू लागल्या असल्या तरी त्या शिक्षणाचा अधिकार अजून प्रस्थापित व्हायचा होता. उलट मुलींना शिक्षण मिळतं आहे याबद्दल थोडी कृतज्ञतेचीच, थोडी उपकृत झाल्याची किंवा थोडीशी ’हे आपलं भाग्यच आहे’ अशी भावना त्याकाळच्या स्त्रियांच्या मनात असावी. लहान वयात कर्तृत्ववान वडिलांचं छत्र गमावलेल्या शांताबाईंच्या मनात शिक्षणाबद्दलच्या या भावनेबरोबरच एक सोशिक समजूतदारपणाची, परिस्थितीमुळे आपल्या मानीपणाला मुरड घालावी लागल्याची भावना असावी. अर्थात यापैकी कुठल्याही गोष्टीचा तरंगही त्यांनी आपल्या लिखाणावर उमटू दिला नाही हे खरं. पण तो आपला आब राखून वगण्याचा, टोकाला न जाताही आपल्याला पटतील त्याच गोष्टी करण्याचा आणि थोडासा जननिंदेची पर्वा करण्याचा त्यांचा स्वभाव त्यांच्या या आणि इतर पुस्तकांमधल्या लेखनातून कळेल न कळेलसा जाणवतो. एकूणातच ’मधुराधिपतेरखिलं मधुरम्’ असं म्हणतात, तसंच शांताबाईंचं सगळंच शांत, स्निग्ध आणि स्थिर वाटतं. अस्वस्थ, चळवळा किंवा अहंमन्य असा एकही शब्द त्यांच्या लेखनातून उमटत नाही. मला हे सगळं फार अपूर्वाईचं वाटतं. नाकाच्या शेंड्यावर राग घेऊन जन्माला आलेली आणि उठता बसता पापड मोडणारी मी अतिशय उतावळी आहे. अशा शांत व्यक्तिमत्त्वांपुढे मला नेहमीच नतमस्तक व्हावंसं वाटतं.
शांताबाईंच्या जन्मजात सुसंस्कृत व्यक्तिमत्त्वातलं हे मार्दव त्यांच्या कवितांमधून तर ठायी ठायी प्रकट होतंच होतं. अतिशय तरल असा त्यांचा काव्याविष्कार मनोरम असतोच; पण त्यांच्या गद्य लेखनातही एक प्रकारचा सौम्यपणा आहे, प्रसन्नपणा आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आजूबाजूच्या समाजाबद्दल एक जिवंत कुतूहल त्यांच्या सगळ्या लेखनामधे भरून राहिलेलं आहे. हे कुतूहल म्हणजे भोचकपणा नव्हे. दुसऱ्यांच्या भानगडींमधे नाक खुपसण्याचा आगाऊपणाही नव्हे. एखाद्या लहान मुलाला आपल्यासमोर येणाऱ्या प्रत्येक घटनेबद्दल जे उत्सुकतामिश्रित कुतूहल वाटत असतं, जी अपूर्वाई वाटत असते तेच कुतूहल शांताबाईंच्या लेखनातही जाणवतं. या सगळ्याला त्यांच्या अनुभवाचीही जोड मिळालेली आहे. लेखनातल्या उल्लेखांवरून हे लेखन त्यांच्या निवृत्तीच्या काळात केलेलं आहे. हे पुस्तक १९९३ - ९४ च्या सुमाराला पहिल्यांदा प्रकाशित झालं. त्यावरून त्याच काळात मागे कधीतरी हे लेखन केलेलं आहे हे नक्की. कदाचित त्यामुळेच एका सुजाण वार्धक्याचा एक तृप्त आविष्कार त्यात आहे.
शांताबाईंच्या वाचनाचा आवाका अतिशय मोठा. आणि संस्कृत-मराठी साहित्याचा व्यासंगही सखोल. शिवाय वेळोवेळी पाहिलेले अनेक उत्तम चित्रपटही त्यांना नेमके आठवतात. यावरून आठवलं, ’पश्चिमरंग’ नावाच्या एका पुस्तकामधे बाईंनी त्यांच्या अनेक वर्षे स्मरणात राहिलेल्या काही इंग्रजी चित्रपटांच्या कथा सांगितलेल्या आहेत. त्यांच्या गोष्ट सांगण्याच्या हातोटीमुळे ते पुस्तक वाचकाला अगदी खिळवून ठेवते. या सर्व गोष्टी अनुभवताना, त्यांच्याबद्दल केलेलं सखोल चिंतन आणि अंगात मुरलेली रसग्राही आस्वादकाची वृत्ती यांच्यामुळे बाईंच्या चिंतनाचा परीघ अतिशय विस्तृत झाला आहे. आणि अगदी लहानपणी पाळलेल्या बोक्यापासून , शाळेतल्या सहलीपासून ते पार सेवानिवृत्त झाल्यानंतरच्या निवांतपणे केलेल्या पुस्तकवाचनापर्यंत अनेक लहानमोठ्या गोष्टीतून आपल्याला त्यांचं हे चिंतनशील मन जाणवत राहतं. या चिंतनाचे काही अमूल्य थेंब आपल्यालाही मिळतात. हातचं काहीही न राखता कमालीच्या सहजतेने त्या त्यांचं अनुभवविश्व आपल्यासमोर खुलं करतात आणि त्या विश्वातल्या अनेक रंजक गोष्टींचा खजिना पाहून मला दर वेळी थक्क व्हायला होतं. हे पुस्तक मला भेट देणाऱ्या मित्राच्या भाषेत सांगायचं तर एखाद्या मैत्रिणीसारख्या आजीशी किंवा आजीच्या मैत्रिणीशी गप्पा मारल्यासारखंच वाटत राहतं पुस्तक वाचताना.
या पुस्तकातले अनेक लेख पुन्हा पुन्हा वाचावेत असेच आहेत. उदाहरणच द्यायचं झालं तर ’जेथे जातो तेथे’, ’पोरकी पुस्तके’, ’मानवी प्राणांचे मोल’, ’फसवी दारे’, ’हेमाला मुलगी झाली’, अशी काही नावे घेता येतील. मला यात सगळ्यात जास्त आवडलेला लेख म्हणजे ’ आही चुकी’. कधी समाजापेक्षा वेगळं वागणाऱ्या तर कधी इतर माणसांपेक्षा कमकुवत तर कधी काहीतरी व्यंग असलेल्या माणसांच्या बाबतीत समाज जो ’आता आलाच आहे नशिबी तर नेऊ ओढत’ असा भाव घेऊन वागतो, त्या भावाचं जे दर्शन त्या घडवतात ते अतिशय मार्मिक आणि डोळे उघडायला लावणारं आहे. साध्या साध्या गोष्टी, आजूबाजूला घडणारे साधेच प्रसंग, पण त्यांची सांगड घालून बाई जो कॅलिडोस्कोप आपल्या समोर उभा करतात तो केवळ बघतच रहावा असा असतो. आणि आही चुकी हा त्या कॅलिडोस्कोपमधला एरवी दुर्लक्षिलेला, बेरंगपणामुळे टाळला गेलेला पण तितकाच खरा आणि काहीसा अपरिहार्यपणे जाणवणारा आविष्कार आहे. आही चुकी पहिल्यांदा वाचल्यावर माझ्या अंगावर सरसरून आलेला काटा अजून आठवतो आहे मला. तसेच मानवी प्राणांचे मोल वाचताना अंगावर उभे राहिलेले रोमांचही कधी न विसरता येण्याजोगेच आहेत.
’क्लिफ्टन वेब’ या अमेरिकन विनोदी अभिनेत्याने स्वतःबद्दल काढलेले ’wherever I go, I go too and spoil all the fun’ हे उद्गार घेऊन सुरू झालेला ’जेथे जातो तेथे’ हा लेखही असाच पटून जातो. वास्तविक तुकोबांनी विठ्ठलाला म्हटले होते, की मी जिथे जातो तिथे तू माझ्या सोबतीला असतोसच. पण या लेखात मात्र, जिथे जाऊ तिथे आपली सुख दुःख , काळज्या, विषाद बरोबर घेऊन जाण्याच्या आणि त्यामुळे पुड्यातला प्रसंग पूर्णपणे पाहूच न शकणाऱ्या सर्वसामान्य माणसांच्या सवयीवर त्यांनी अगदी मार्मिकपणे बोट ठेवले आहे. सामान्य माणसे त्यांच्या या ’इनर्शिया’ मुळे आयुष्यातल्या साध्यासुध्या आनंदांनाही कशी पारखी होत असतात हे वाचताना, 'अरे ही तर आपलीच गोष्ट आहे!', असं म्हणून टाळी वाजवावीशी वाटायला लागते; आणि स्वतःचीच ही नवी ओळख लक्षात आल्यावर एकीकडे स्वतःचं हसूही येत असतं.
’पोरकी पुस्तके’ हाही एक असाच अस्वस्थ करून जाणारा लेख आहे. आधी आपल्यासारख्या वाचनवेड्यांसाठी पुस्तके ही मर्मबंधातली ठेव असते. आणि एखाद्या पुस्तकाच्या वाईट स्थितीबद्दल वाचलं तरी मनावर ओरखडा उमटतो. शांताबाईंनी यात दुर्दैवाचे दशावतार पाहिलेल्या आणि काळाच्या सर्वशक्तिमान पंजात सापडून नष्टप्राय झालेल्या काही पुस्तकांबद्दल लिहिले आहे. आपण जिवंत असताना आपला पुस्तकसंग्रह अपण अगदी जिवाभावाने जपत असतो. पण अशा पुस्तकांचा मालक अनंताच्या यात्रेला निघून गेल्यानंतर पुस्तकांची आबाळ होते. किडे, वाळवी आणि मग जुन्या बाजारात विक्री असे भोग त्यांच्या नशिबी येतात. या भोगांची कथा शांताबाई यात सांगतात. जुन्या बाजारात विकत घेतलेल्या पुस्तकांच्या पहिल्या पानावर असलेल्या सह्या, देणाऱ्याची / घेणाऱ्याची नावे, या देवघेवीला निमित्त्त ठरलेले प्रसंग यांचीही एक किनार या लेखाला आहे. तरीपण हा लेख अस्वस्थ करून जातो. खूप वाईट वाटते. काही महिन्यांपूर्वी माझ्या आजोबांचे निधन झाले. त्यांनाही अशी पुस्तके जमवायचा छंद होता. परवा त्यांची काही जुनी पुस्तके घर आवरताना अचानक सापडली. पुस्तकांच्या पहिल्याच पानावर त्यांच्या हस्ताक्षरातले त्यांचे नाव वाचले आणि मला या लेखाची आठवण झाली एकदम. पोरक्या पुस्तकांबद्दलचा हा लेख आता मला जास्तच जिव्हाळ्याचा वाटतो.
'सांगावेसे वाटले म्हणून' या पुस्तकातल्या प्रत्येक लेखाबद्दलच असं कायकाय लिहिता येईल. अर्थात पदार्थाची चव, सुराची आस आणि एखाद्या दृश्याची परिणामकारकता यांच्याबद्दल वर्णन करून कितीही सांगितलं तरी त्याचा फार उपयोग होत नाही. तहानलेल्या माणसाला पाण्याचं वर्णन ऐकवून त्याची तहान भागते थोडीच! मॅट्रिक्स चित्रपटात म्हटल्याप्रमाणे ’there is a difference between knowing the path and walking the path’ त्यामुळे, हे पुस्तक प्रत्यक्ष स्वतःच वाचून त्याचा आस्वाद घेणे हेच सगळ्यात उत्तम आहे असे मला वाटते. या पुस्तकातला प्रत्येक लेख नवा आहे. एका नव्या, संपूर्ण नवीन विचाराला चालना देणारा आहे. प्रत्येक लेखाचं स्वतंत्र वैशिष्ठ्य आहे. वाचणाऱ्याच्या मनात कुठल्या लेखाने कुठले तरंग उमटतील हे वाचकावर अवलंबून असलं तरी एकदातरी हे पुस्तक वाचावंच असं निश्चित आहे. संस्कृत नाटककार भवभूति म्हणाला होता की मला जे कोणालातरी सांगावंसं वाटतं आहे ते मी लिहिलं आहे. कुठेतरी कधी तरी असा वाचक जन्माला येईल, ज्याला माझं सांगणं समजेल. इसवी सनाच्या सहाव्या शतकात होऊन गेलेला भवभूति काय, केशवसुत काय किंवा शांताबाई काय, या लोकांनी आपल्यासाठी केवढं काही सांगून ठेवलं आहे. ते वाचणं आपल्या हातात आहे.
या पुस्तकाने मला अमाप आनंद दिला. खूपसं सत्त्व दिलं. हा परिचय वाचून इतर कोणाला आनंद मिळाला, तर ते या टंकलेखनचं फलित असं मी समजते.
अधिक काय लिहिणे?
राजते लेखनावधिः॥
अनुक्रमणिका
अनुभव
- ग्रंथालयात भटकंती - जाँ-पॉल सार्त्र
- वैज्ञानिक व पुस्तकांचे जग!
- 'साभार परती'चा शिक्का
- बौद्धांचे आणि जैनांचे संस्कृत साहित्यातले योगदान - एक आढावा
- सांगावेसे वाटले म्हणून.....
- डाऊन द मेमरी लेन
- कृतज्ञ!
- पुनर्वाचनाय च

प्रतिक्रियां
लई भन्नाट
'सांगावेसे वाटले म्हणून' च्या तोडीचा म्हणालो तरी अतिशयोक्ती होणार नाही असा लई भन्नाट लेख!.. खूपच आवडला
-ऋ
----------------------
"चला, मी माझा एकमेव जुनाट कोट घालून एक नवं पुस्तक घेऊन येतो"
खूप सुरेख पुस्तक परिचय! "अरे
खूप सुरेख पुस्तक परिचय!
"अरे मला असंच म्हणायचं होतं" असं वाटायला लावणारं ओळखीचं पुस्तक!
एखाद्या खोल विहिरीत कुतुहलाने डोकवून पहावं आणि तिथे आपल्याला आपलंच प्रतिबिंब दिसावं तसं वाटलं मला "सांगावंसं वाटलं म्हणून..." वाचून.
अप्रतिम
फार सुरेख पुस्तकपरिचय. 'सांगावेसे वाटले...'ची अनाग्रही शैली पुस्तक वाचून अनुभवावी अशीच. बोरकरांच्या शब्दांत सांगायचं झालं तर 'पण असा अकस्मात आपलाच आपणां लागता तळ' सारखी किमया त्यांना साध्य झाली आहे, असं सतत वाटत राहतं.
सुरेख ....
शांताबाईंबद्दल माझ्याहि मनांत अस्सेच भाव आहेत. पण ते शब्दांत सांगणें कठीण आहे. आपली प्रवाही, अर्थवाही, सौंदर्यपूर्ण वगैरे विशेषणांनीं युक्त अशी शब्दयोजना लाजबाब आहे. वाटले माझ्या मनांतलेंच पण मला शब्दांत सांगतां येणार नाहीं असें सुंदर कांहींतरी वाचलें. भावना शब्दांत अचूक पकडण्याची आपली हातोटी विलक्षणच आहे. धन्यवाद.
आजोबांचीं पुस्तकें चटका लावून गेलीं. माझ्या आजोबां कडे दोनतीन कपाटें भरून पुस्तकें होतीं. त्यांत शब्दकोषहि होता. केळकर कीं केतकर नक्की कोणाचा तें आठवत नाहीं. पण वाचतां यायला लागल्यावर आम्हीं हाताला लागेल तें पुस्तक घेऊन कळलें नाहीं तरी वाचत होतों आणि वाटेल ते प्रश्न विचारून त्यांना हैराण करीत होतों.
सुधीर कांदळकर
असेच
'सांगावेसे वाटले म्हणून' असे वाटत राहो तुला सारखे सारखे, असे म्हणावेसे वाटले असा लेख झाला आहे.
मनापासून लिहिलं आहेस, खूप
मनापासून लिहिलं आहेस, खूप आवडलं.
>>काही लेखकांच्या पुस्तकांवर माझं इतर पुस्तकांपेक्षा जरा जास्तच प्रेम आहे >> डिट्टो