'बोलती पुस्तके' हा मराठीतला पहिला वाहिला free Audio Books प्रकल्प. याबद्दल अधिक जाणुन घ्या इथे.
सवलतीत पुस्तके कुठे कुठे मिळू शकतात
धागा काढण्याचा उद्धेश म्हणजे सध्या आपल्यासारख्या व्यकीगत ग्रंथसंग्रह करणार्यांची वाढती संख्या तसेच पुस्तकांचीही वाढती किंमत यांचा कुठेतरी मेळ घालणे जेणेकरून आपल्याला जिथे सवलतीत पुस्तके मिळतील अशी ठिकाणे शोधणे.
तर जाणकार वाचकांनी अशी सवलतीत पुस्तके मिळणारी काही ठिकाणे येथे द्यावीत.
काही ठिकाणे मी सुचवतो.
१. मेहता पब्लिशिंग हाउस-
१९४१, सदाशिव पेठ, माडीवाले कॉलनी,
बाजीराव रोड, टेलीफोन भवन समोर, पुणे
फोन: ०२०-२४४७६९२४, ०२०-२४४७५४६२
येथे तुम्हाला टी-बुक क्लब चे मेंबर झालात तर टी-बुक क्लबची अनुवादित पुस्तके ५०% सवलतीत मिळू शकतील तसेच इतर पुस्तके (फक्त मेह्ताचीच) सुमारे २०% सवलतीत मिळतील.
तसेच 'मेह्ता मराठी ग्रंथजगत' च्या वर्गणीदारांसाठीही योजना आहेत.
२. श्रीराम बुक एजन्सी -
शॉप नं -२, गणाधिपती अपार्टमेंट,
बॅ. गाडगीळ स्ट्रीट, सदाशिव पेठ, नागनाथ पाराजवळ,
येथे तुम्हाला त्यांच्या प्रकाशनाची कुठलीही पुस्तके २५% सवलतीत मिळतील. यांत अनेक उत्तमोत्तम अनुवाद आहेत. जसे गॉडफादर, पॅपिलॉन, सिडने शेल्डन यांची जवळजवळ सर्व अनुवादित पुस्तके.
३. पाटील बुक एजन्सी -
सिद्धार्थ चेंबर्स, अप्पा बळवंत चौक, पुणे
०२० -२४४८७६२९
येथे रू. १००० वरील सर्व पुस्तके २०% सवलतीत मिळतात. पुस्तकांचे एक मोठे दालन.





रसिक राहिले
खरे आहे वल्ली,
रसिक राहिले तुमच्या यादीत.
मला खूप सुंदर अनुभव आहे. इकडे बंगळुरात पुस्तकांची डिलिव्हरी मोजून २ दिवसांत मिळते मला आणि पुस्तके मिळवून देण्याचे त्यांचे प्रयत्न कौतुकास्पद आहेत.
२० % ते ३० % डिस्काऊंट पण मिळतो. तुम्ही नियमित कस्टमर असाल तर रसिक मधून डिस्काऊंट मागायची वेळ येत नाही. स्वतःहून व्यवस्थित सवलत देतात.
मी नियमित ग्राहक आहे रसिक चा. खरेदीचा नक्की आनंद देणारा अनुभव आहे.
मी एक पुस्तकवेडा
http://pustakveda.blogspot.com/
सवलतीबद्दल सांगायचे तर...
सवलतीबद्दल सांगायचे तर माझे मत असे व्हायला लागले आहे की पुस्तक सहजी उपलब्ध असल्यास ते सरळ प्रकाशकाकडून घेतल्यास त्यातल्या त्यात भक्कम सवलतीत मिळू शकते. मेहतामध्ये मी ५ वर्षांची वर्गणी भरलेली असल्याने ३०% सवलत मिळते, जी परवडते असे वाटते. काही दिवसांपुर्वी पद्मगंधा प्रकाशनाच्या ऑफिसमधून अॅगाथा ख्रिस्तीच्या पुस्तकांचे अनुवाद घेतले तर तेही मला खूप स्वस्त मिळाले. काही प्रकाशने डिस्ट्रीब्यूटरला ४०-४५% सवलत देतात त्यामुळे डिस्ट्रीब्यूटरने आपल्याला अगदी ३०% सवलत दिली तरीही त्याला ते सहजी परवडते पण काही प्रकाशने मात्र डिस्ट्रीब्यूटरला २५-३०% सवलत देतात त्यामुळे मग आपल्याला विकताना २०% सवलत देणेही त्यांच्या जीवावर येते. त्यामुळे अगदी दिलदार डिस्ट्रीब्यूटरदेखील प्रकाशनानुरूप २०%-२५%-३०% अशाच भाजणीत सवलत देताना आढळून येतात आणि प्रदर्शनवाले त्यांच्या अधिक खर्चाच्या बोजामुळे सरसकट १०%-१५%-२०% सवलत देताना दिसतात. अजिबात सवलत न देणारे किती पैसे कमवत असतील याची आपण केवळ गणितेच करत बसावे झाले! हेच गणित बदलू शकते जर मधला हा डिस्ट्रीब्यूटरच आपल्याला वगळता आला तर. अर्थात ते नेहमीच शक्य होईल असे नाही आणि जी सवलत प्रकाशक डिस्ट्रीब्यूटरला देतो, ती तो आपल्यालाही देईलच याचीही गॅरंटी नाही (खरेतर नाहीच!) त्यामुळे जिथे जसे जमेल तसे गणित जुळवायचे आणि खरेदी करायची असे वाटते.
परवा यादी केली पुस्तकांची छापील किंमत आणि पानांची संख्या देखील नमूद करत करत तेव्हा लक्षात आले की साधारण २० वर्षांपुर्वी १ रुपयात ५ ते ७ पाने यायची आणि आता साधारण १ रुपयाला १ पान मिळाले तरी नशीब म्हणायचे!
२५-३५ पट!!
म्हणजे रुपयाची घसरलेली किंमत (रुपया आधीच्या (२० एक वर्षापूर्वी) रुपयाच्या तुलनेत साधारण १:५ प्रमाणात घसरला आहे) बघता पुस्तके अधिकच महाग झाली आहेत जवळ जवळ ५ ते ७ गुणिले ५ म्हंणजे २५-३५ पट!!
-ऋ
----------------------
"चला, मी माझा एकमेव जुनाट कोट घालून एक नवं पुस्तक घेऊन येतो"
अनमोल आनंद.......
अलिकडे मी पुण्याला मनोविकास प्रकाशनमधून काही खरेदी केली. खरेदीच्या रकमेनुसार सवलत ते देतात. माझी आणि मैत्रीणीची मिळून रु.२००० च्या खरेदीवर ३५% सवलत मिळाली.
वार्षिक वर्गणी रु.१५०/- भरून राजहंस बुक क्लब (राजहंस प्रकाशन)चे सभासद झालेल्यांना २५% सूट मिळते.
ग्रंथाली कडून थेट अथवा त्यांच्या शाखेकडून घेतलेल्या पुस्तकांवर ४०% सवलत मिळते.
मॅजेस्टिक प्रकाशन च्या ठाण्याच्या दुकानात रु.७५० भरून तहहयात सर्व प्रकाशकांच्या पुस्तकांवर १५ % व त्यांच्या स्वतःच्या प्रकाशित पुस्तकांवर २०% सवलत देण्यात येते. (माझे रु.७५०/- केव्हाच वस्सूल झाले आहेत........)
वेदश्रीचे म्हणणे खरे आहे. हल्ली पानागणिक रु.१/- असा खर्च आहे.
आणि -----
पुस्तके वाचून झालेला आनंद अनमोल आहे
सवलत
मित्रा,
एक चांगल्या विशयास हात घातला.
अभिनंदन!
माझे अनुभव फार वेगळॅ आहेत.
यवतमाळ हे पुण्यापासुन ८०० कि.मि.दुर आहे.
त्यामुळे सगळी खरेदि ही औन्लाईन किंवा नोन्दवुन करावि लागते.
अजुनही सवलत तर दुर्,पुस्तक देतोय म्हण्जे फार काम करतोय्,असा काहि प्रकाशक/विक्रेते
ह्यन्चा आविर्भाव असतो.
धनादेश चालत नाही.व्हि.पी.पी नाही.टपाल खर्च तुमचाच!
काय करावे?
तरीही पुस्तक सुह्रुद आहे मी!
सवलती पेक्शा दुर्मिळ पुस्तके मिळ्णारी दुकाने सांगु शकाल का?
-देवेन्द्र प्रभुणॅ,यवतमाळ.
erasik.com आहे छान पण सवलत नाही.
चांगला पर्याय आहे
देवेन्द्र,
बुकगंगा हा पर्याय आहे पण ते एम.आर.पी. वर विकतात. रुपये २५० पेक्षा जास्त घ्यायची असतील तरच ते फ्री शिपिंग देतात. आजकाल ऑनलाईन खरेदीत फ्री शिपिंग सगळेच देऊ लागले आहेत. तरी डिस्काऊंट पण महत्त्वाचा आहे.
अलिकडेच http://shop.mimarathi.net/ या संकेतस्थळावर मराठी व इंग्रजी पुस्तकांची विक्री सुरु झाली आहे. माझा अनुभव छान आहे.

१. फ्री शिपिंग
२. २० - ३० % सवलत
अजून काय पाहिजे ????
२ दिवसांत मी मागवलेली पुस्तके मिळाली. पैसे ऑनलाईन बँकेतून ट्रान्सफर करायचे एवढेच. येथील ट्रॅन्झॅक्शन सुरक्षित आहे हे मात्र आवर्जून सांगतो तुम्हाला. पैसे ट्रान्सफर केल्यावर मी फक्त डिटेल्स कळवले. २ दिवसांत पुस्तक हातात.
बघा एक प्रयत्न करुन आणि सांगा तुमचा अनुभव.
मी एक पुस्तकवेडा
http://pustakveda.blogspot.com/
काँटीनेंटलवाले रडतखडत १०% ची
काँटीनेंटलवाले रडतखडत १०% ची सूट देतात आणि १०००/- च्यावर खरेदी केली तर १५%

काही खूप सुरेख पुस्तके आहेत काँटीनेंटलची, पण दर वेळेस परवडतातच असे नाही. मात्र त्यांच्या ऑफिसमध्ये हवी तितकी पुस्तके पाहू, हाताळू आणि बैठक मारुन वाचायला देतात!
शुभम
अप्पा बळवंत चौकात लोखंडे तालीमजवळ 'शुभम साहित्य' आहे. तिथे १०० च्या वर सरसकट २० % सवलत मिळते. 'साहित्यदर्शन' चे प्रदर्शन बरेच वेळा आचार्य अत्रे सभागृहामध्ये असते जे 'शुभम' तर्फेच आयोजीत केले जाते. तिथेही २०% सवलत मिळतेच.
मुद्दा वेगळाच
मित्रांनो,
माझा मुद्दा वेगळाच होता.
पुण्यात असतो तर वेगळी बात होती.दररोज दुकाने फिरलो असतो.
दूरस्थ वाचकाला काहीच नाही.
सवलत हा विशय नाही.एकंदरीत वाचकाला फारसा मान नाही,गड्या!
निव्वळ खरेदी करीता येणॅ ही परवडत नाही.
छोट्या शहरात एकच तोटा,लहानशीही वस्तु मिळवताना,खूप श्रम पडतात.
दुर्मिळ पुस्तके उपल्बध असलेले एखादे दालन आहे का?
-देवेन्द्र प्रभुणॅ,यवतमाळ.
मित्रा
दुर्मिळ पुस्तक मिळण्याचे असे एखादे ठराविक ठिकाण सांगता नाही येणार. कारण एखादे पुस्तक दुर्मिळ असते म्हणूनच तर ते कुठेही मिळत नाही सहजगत्या. आपण मात्र शोध चालू ठेवायलाच लागतो. एखादे दुर्मिळ पुस्तक अवचित एखाद्या पुस्तकांच्या दुकानातच, तर कधी प्रकाशकाकडे तर कधी कुणा व्यक्तीकडे आढळते. एवढेच नाही तर अवचित एखाद्या रद्दीवाल्याकडेही मिळून जाते. मला गोनीदांची तांबडफुटी, लक्ष्मीसेतू/गडदेचा बहिरी आणि श्री.ना. पेंडश्यांचे कलंदर अशीच पुण्याच्या मॅजेस्टीक बुक स्टॉल येथे जीर्णशीर्ण अवस्थेत मिळाले होते. माझ्यासाठी ही पुस्तके अनमोलच.
आता तुमच्या प्रश्नाविषयी
तर असे दालन माझ्या माहितीत तरी उपलब्ध नाही. पण एखाद्या किमान २५/३० वर्षांपासून सुरु असलेल्या सार्वजनिक वा खाजगी वाचनालयात मात्र काही दुमिळ पुस्तके निश्चितच उपलब्ध होउ शकतील.
अवचितची जादू....!!
"...एवढेच नाही तर अवचित एखाद्या रद्दीवाल्याकडेही मिळून जाते...."
~ वल्ली.....तुमच्या वरील वाक्यातील "अवचित" या शब्दाला असा काही हवाहवासा वाटणारा मोगर्याचा सुगंध आहे की बस्स पुछो मत | अवचितपणे अशी ती 'दुर्मिळ' ठरलेली पुस्तके हातात आल्यावर होणारा आनंद व्यावहारिकरितीने जोखता आला तरच तुलना शक्य आहे...!
मी फार फार आनंद लुटला आहे अशा अवचित भेटणार्या आनंदाचा. जुनी दिल्ली येथील 'दरिया गंज' हा भाग दुर्मिळ समजल्या गेलेल्या पुस्तकांच्या बाजाराचा खजिना आहे. तुम्ही कधी दिल्लीला गेला तर जरूर या भागाला भेट देऊन या (गोलचा टॉकिज परिसरात आहे....पण रिक्षावाल्याला 'ओल्ड किताब बझार' असे सांगितले तरी तो तुम्हाला लागलीच तेथे नेईल....). पुण्यातील म.फुले मंडईतील भाजीपाला आणि फळांच्या दुकानांची कशी रांग आहे, तशी जवळपास दोन किलोमीटर दूर पसरलेली अशा जुन्या पुस्तकांची (आपल्याकडे 'रद्दी' नाव प्राप्त झालेली) शेकडो....होय शेकडो....दुकाने आहेत....आणि सकाळी ९ ते रात्री १० पर्यंत अव्याहतपणे इथे 'घेणे आणि देणे' चालू असते. रविवारी तर जत्राच असते. किती बघू आणि कुठली घेऊ, कुठे ठेवू, आणखीन किती घेता आली असती...हे ठेवून ते घेऊ का....किती पैसे शिल्लक आहेत अजून....मित्राकडून घ्यावेत का... अरेच्या या फेरीत चक्क १२ दुर्मिळ मिळाली |....व्वॉव...पैसे असते तर १६ नंबरच्या टपरीच्या बशीरमियॉंकडील आर्थर हर्मनचे The Idea of Decline in Western History हे गबदुल पुस्तक ५० रुपयाला मिळाले असते....मग आत्ताच घेतलेले ३० रुपयाचे मायकेल ओकशॉटचे Rationalism in Politics देऊन टाकू या का? पण बशीरमियॉचा जावई रेहमान मला चांगला ओळखतो, तो सासर्याला माझी खात्री देईल....देतोही...आणि वेस्टर्न हिस्ट्री माझ्या मूळातच वाहुन चाललेल्या पिशवीत येते. दिल्लीतील आमच्या मित्रांत तीन रूमच्या त्या फ्लॅटमध्ये ही पुस्तके ठेवायची तरी कुठे यावर डोकी फिरून जातील अशा वादावादी झडायच्या....पुढच्या टर्मला 'इंदर पुत्तर को यहाँसे हम निकाल देंगे, ये पक्का |" असा ठराव बाकीच्या चौघात व्हायचा...आणि परत पुढच्या रविवारी यातीलच रवि गर्ग आणि दीपक मल्होत्रा माझ्यासमवेत परत दरिया गंज आणि चांदणी चौकात......जादूचे दिवस होते ते सगळे....!!
फार मोह आहे...दर्या गंजची खरेदी म्हणजे....श्री.देवेन्द्र, तुम्ही असे शोध घेत राहा...यवतमाळला राहता म्हणजे नागपूर त्यातल्या त्यात तुम्हाला जवळ असेल....राज्याच्या उपराजधानीत अशी दुर्मिळ पुस्तके मिळण्याचे अड्डे असणारच, योग असेल तर यातूनच जीवाभावाचे मित्रही भेटून जातात.....(अनुभवाने सांगत आहे.)
इन्द्रा
जायलाच पाहिजे
आतापर्यंत २ वेळा दिल्लीला जाणे झाले आहे पण दरिया गंज जवळच्या पुस्तकांच्या बाजाराची माहितीच नव्हती. जवळजवळ २ किमी लांब म्हणजे अफाटच म्हणावा लागेल हा बाजार. आता दिल्लीला पुन्हा गेल्यावर तिकडे जाणे होईलच. दिल्लीवरून परत येतांना मात्र ब्यागेत इतर काही नसून फक्त पुस्तकेच असतील.
इंद्रराज, माझ्यासाठी सध्यातरी
इंद्रराज,
माझ्यासाठी सध्यातरी `दिल्ली तो बहुत दूर है!!!!!' त्याला कारणे तीन--
एक म्हणजे मी फिरतीवर नसते आणि
दोन - सध्या खिसा एकदम थंडगार आहे आणि
तीन - मर्यादित वाचन.
वाचनाचा आवाका जसजसा वाढेल, नवनवीन लेखक-पुस्तके माहिती होतील तेव्हा दिल्लीला जवळ करणे इष्ट ठरावे.
तोपर्य्ंत आहेतच आपली नेहमीची....
शिवाय www.flipkart.com शीदेखील नव्याने परिचय झाला आहे. त्यांची सेवा छान आहे.
आता राहिला विषय खिसा गरम करण्याचा......
फ्लिपकार्ट
flipkart ही भारतातले सर्वोत्कृष्ट आंतरजाल-पुस्तक-दुकान आहे.. इथे मराठी पुस्तके मिळतात का नाही माहिती नाही पण इंग्रजी पुस्तकांसाठी मजबूत सवलत आणि फुकट-पोच सेवा..
मराठी पुस्तके...
टण्या,
भारतीय भाषांतील पुस्तकेदेखील flipkart वर उपलब्ध आहेत. मी नुकतीच मागवलेली अमृता प्रीतम ह्यांची हिंदी भाषेतील दोन पुस्तके घरपोच मिळाली. बरीच मराठी पुस्तके देखील आहेत. पण त्यावर सवलत नाही.....
माझा अनुभव..
पुण्यात 'भारत बुक हाऊस' इथे चांगली सवलत मिळते. सु.शि. आणि दळवींच्या पुस्तकांवर विशेष सवलत (५०%
) आहे. (सु.शि. आणि दळवींच्या पुस्तकांचे हे वितरकही आहेत असे कळते.) इतर पुस्तकांवर साधारण २५-३०% सवलत मिळते.
ह्या ठिकाणी मौज, रसिक, मेहता इ.इ. प्रकाशकांची पुस्तके मिळत नाहीत.
देवेंद्र,
तुम्हाला कोणती पुस्तकं हवी आहेत त्याची एखादी यादी पाठवू शकाल काय? मी जमेल तसं भारत बुक च्या देशपांड्यांशी बोलुन पाहतो की बाहेरगावी पुस्तकं पाठवण्याची काही सोय करतील काय ते.
आयला
आयला, हे तर लई भारी.
त्याचा पत्ता दे ना. कुठे आहे दुकान ते.
सदाशिव पेठ.
देशमुखवाडीत आहे.
स.प.महाविद्यालयाकडून खजिना विहीर चौकाकडं यायचं, तिथून पुणे विद्यार्थी गृहानंतर जो रस्ता एका छोट्या गल्लीकडं वळतो ते पहिलंच वळण...त्या गल्लीत शिरलं की लग्गेच उजव्या हाताला तळमजल्यावर आहे हे भारत बुक हाऊस.