• '

सध्या काय वाचताय? (भाग ६)

भाग ५ दुसर्‍या पानावर गेल्यामुळे हा नवीन धागा सुरू करत आहे.
आजच साठे फायकस - नारायण धारप (भाग १ ते ३) वाचुन संपवली. खरं तर संपूच नये असे वाटत होते पण संपली Sad
'अवतार' वगैरे पाश्चात्य कथांच्या रांगेत बसणारी तितकीच ताकदीची, चित्रदर्शी, अद्भुत, रंजक आणि अविश्वनीय परिस्थिती निर्माण करूनही वाचकाला गुंतवून ठेवणारी ही कादंबरी आहे. म्हटलं तर गुढकथा, म्हटलंतर साहस कथा, काहिजण यास विज्ञान-परीकथाही म्हणतील

खरंतर 'साठे/फायकस' आणि धारप म्हटल्यावर अजुन काहि लिहायला नकोच!

बाकी नवीन काही वाचले तर इथे लिहीनच. तुम्ही काय वाचताय? नुसती नावे लिहिण्यापेक्षा थोडा वेळ काढून तुम्हाला पुस्तक कसे वाटले, एखादे वैषिष्ट्य वगैरे दोनेक ओळी लिहिल्यात तर अधिक छान

रस्किन बाँडचे Rain in the

रस्किन बाँडचे Rain in the mountains - notes from Himalayas.

जेम्स हॅडली चेस

सध्या मी जेम्स हॅडली चेस चे 'गोल्डफिश हॅव नो हायडिंग प्लेस' ही थरारक कादंबरी वाचतो आहे.
सुरुवात थरारक आहेच. पण वाचून पूर्ण झाल्यावर मत देतो. पण एकंदरीत जेम्स हॅडली चेस माझ्या प्रचंड आवडीचा असल्याने त्यांचे कोणतेही पुस्तक माझ्यासाठी मेजवानीच Wink

मी एक पुस्तकवेडा
http://pustakveda.blogspot.com/

अनुवादित आहे का रे?

अनुवादित आहे का रे?

नाही इंग्रजीतून आहे

वल्ली मित्रा,

इंग्रजीतून वाचतोय रे Smile
या कादंबरीचा मराठी अनुवाद बहुतेक नसावा / किंवा असेल तर माहिती नाही.

पण इंग्रजीतून वाचताना थरार मस्त जाणवतोय. आजच मी कामाच्या व्यापातून थोडा मोकळा झालोय. तेव्हा उद्यापासून घेतोय परत वाचायला Smile

मी एक पुस्तकवेडा
http://pustakveda.blogspot.com/

रोझलिंड फ्रँकलीन ...

चरित्रात्मक लेखनात मोठा धोका असतो तो अनावश्यक उदातीकरण. चरित्रातील व्यक्तीचे तसेच त्या व्यक्तीच्या तत्वज्ञानाचे देखील. या दोष या पुस्तकात औषधालाही सापडत नाही. चित्रदर्शित्व हा शब्द इथे पार थिटा पडतो. एखादा कुशल छायाचित्रकार एखाद्या व्यक्तीचे विविध कोनातून सौंदर्य टिपतो तसे रोझलिंड फ्रॅंकलीनच्या व्यक्तीमत्वाचे सौंदर्य लेखिकेने टिपले आहे. मुखपृष्ठावर तिचे चित्र आहेच. पण पुस्तक वाचतांना तिच्या लकबींसकट ती जिवंत होते आणि एखादा त्रिमिती चित्रपटच पाहिल्यासारखे वाटते. ‘ती स्वतःचे नाव नेहमी रॉस-लिंड (Ros-Lind) असं ठसक्यात खटक्यात उच्चारी.’ इथपासून रोझलींड आपला जो कबजा घेते तो सुटत नाही. तिच्या स्वभावातले गुणदोष विशेष भाष्य न करता विविध प्रसंगातून, त्या प्रसंगातल्या तिच्या प्रतिक्रियेतून कलात्मकतेने उलगडत जातात.

मनोगतात लेखिका म्हणते ‘नेहमीप्रमाणे याहीवेळी मला अज्ञात असलेल्या, अजिबात पूर्वाभ्यास नसलेल्या विषयात घुसखोरी केलेली आहे.’ पण तसे पुस्तकात कोठेही जाणवले नाही. उलट डीएनए च्या शोधात गुंतलेल्या विविध शास्त्रज्ञांच्या कामाचे नेमके तांत्रिक तपशील अचूकतेने दिलेले आहेत. ते चुकले असते तर गडबड झाली असती. भरपूर खोलात जाऊन विषयाचा अभ्यास केलेला दिसतो आहे. आवश्यक तिथे चित्रे, छायाचित्रे दिलेली आहेत.

विविध प्रसंग त्यातल्या पात्रांच्या वैशिष्ट्यांसकट उभे करून एखादी कादंबरी पुढे सरकावे तसे पण कठीण विषय समजायला जेवढा वेळ हवा तेवढा वाचकाला देत कथानक छान मर्यादित वेगाने पुढे सरकते. कोठेही अभिनिवेश नसलेली, कोठेही अतिशयोक्ती नसलेली उत्कटता मात्र वाचकाच्या मनावर गारुड करते. लिखाणातल्या, संपादनातल्या, सफाईबद्दल म्या पामराने काय वर्णावे? टोचणारे कंगोरे कोठेही नाहीत. मुकुल शिवपुत्रसारख्या एखाद्या पट्टीच्या गायकाने किंचित द्रुत मध्यलयीत बडा ख्याल तासदीडतास रंगवावा असे वाटले. नाहीतर एखादा भव्य, कलात्मक, प्रभावी, चित्रपट मनावर छाप पाडून जावा असे काहीसे वाटले. ‘लिझ मेईटनर’ मध्ये लेखिकेने निर्माण केलेल्या अपेक्षा नक्कीच पूर्ण होतात.

रोझलिंड फ्रॅंकलीन
ले.: वीणा गवाणकर
प्रकाशक दिलीप माजगावकर,
राजहंस प्रकाशन,
१०२५,सदाशिव पेठ,
पुणे ४११०३०
टे.: ०२०-२४४७ ३४५९, फॅक्स: २४४३ ३७१९.
rajhans1@pn2vsnl.net.in
पहिली आवृत्ती: २० जुलै २००९.
पृष्ठे : १४४ किंमत रु. १३०/-

सुधीर कांदळकर

वीणा गवाणकरांची सगळीच

वीणा गवाणकरांची सगळीच व्यक्तीचरित्रे उत्तम उतरली आहे. हे देखील वाचायला हवे.

-ऋ
----------------------
"चला, मी माझा एकमेव जुनाट कोट घालून एक नवं पुस्तक घेऊन येतो"

+१

असेच म्हणतो.

मिहिर

पुस्तकविश्वच्या मोजक्या

पुस्तकविश्वच्या मोजक्या लेखक-सभासदांपैकी एक कविता महाजन यांने 'ग्राफिटी वॉल' वाचतोय. अर्धे होत आलंय.. विविध विषयांना स्पर्शुन जाणारे लेखन आहे. एकेक लेख स्वतंत्र म्हणून उत्तम आहे.. विचार करायला लावणारे अनेक लेख आहेत. (सारे लेख एकामागून एक वाचताना मात्र द्विरुक्ती जाणवते)
बाकी पुर्ण वाचल्यावर अभिप्राय लिहितो

-ऋ
----------------------
"चला, मी माझा एकमेव जुनाट कोट घालून एक नवं पुस्तक घेऊन येतो"

अजूनही युगंधरच वाचतोय.

अजूनही युगंधरच वाचतोय. कादंबरी मनावर अजिबात ठसत नाही. मृत्युंजयच्या तुलनेत तर खुजीच वाटते. श्रीकृष्णाचे देवतास्वरूप झटकून लिहिण्याचा प्रयत्न करत असताना शिवाजी सावंत मात्र त्याच्या खूपच आहारी गेलेले वाटत आहेत. महाभारतातील तसेच कृष्णचरित्रातील इतरही सर्व पात्रे कृष्णाच्या तुलनेत येथे खूपच खुजी ठरवली गेली आहेत.

कादंबरी पूर्ण वाचून झाल्यावरच सविस्तर परिचय करून देईन म्हणतोय.

नक्की लिहि मित्रा

युगंधर मधे श्रीकृष्णाला उत्तुंगता देण्याच्या भरात इतर व्यक्तीमत्त्वे खुजी झाली आहेत असे असले तरी खुद्द महाभारतातच श्रीकॄष्णाची कृत्ये सर्वश्रेष्ठ दाखविली आहेत, लेखकाच्या कादंबरीचा विषयच कृष्ण असल्यावर मूळ महाभारतातील उच्च स्थानावर लेखक स्वतःच्या कल्पनाशक्तीने अधिक उत्तुंग करणारच की रे मित्रा Smile

असो, वाचून झाले की नक्की परिचय लिहि. मी पण युगंधर वाचून अनेक वर्षे झाली आहेत. तेव्हा तुझ्या परिचयाची उत्सुकतेने वाट पाहीन.

माझी कालच जेम्स हॅडली चेसच्या 'गोल्डफिश हॅव्ह नो हायडिंग प्लेस' ची ६० पाने वाचून पूर्ण झाली आहेत. कथानक वेग घेते आहे तसतशी उत्कंठा देखील वाढते आहे. Smile

मी एक पुस्तकवेडा
http://pustakveda.blogspot.com/

अंशतः सहमत

महाभारतात श्रीकृष्ण जरी सर्वश्रेष्ठ दाखवला असला तरी त्याचा बराचसा भाग हा प्रक्षिप्त आहे. व्यासांच्या मूळ लिखाणात कृष्णाला मनुष्यरूपातच दाखवले आहे. येथे शिवाजी सांवतांनी कादंबरीस्वातंत्र्य घेऊन मूळ महाभारताशी प्रतारणा केलीय असे खेदाने म्हणावेसे वाटते. कदाचित माझ्या मनावरचा मूळ महाभारताचा पगडा अजूनही जात नसल्यानेही असेल कदाचित.
मृत्युंजयची रसाळ, प्रासादिक शैली यात अभावानेच आढळते.

बाकी जेम्स हॅडली चेस म्हणजे भारीच रे. एकदम थरारक कादंबर्या असतात.

+१ सहमत आहे

मृत्युंजयची रसाळ, प्रासादिक शैली यात अभावानेच आढळते.

व्यासांच्या मूळ 'जय' ग्रंथाचा आधार घेऊन सावंतांनी युगंधर लिहिले की सौति ने ग्लॅमरस केलेल्या 'महाभारता'वरुन लिहिले आहे हे त्यांनाच ठाऊक. पण जर सावंतांनी सौतिच्या महाभारताचा आधार घेऊन युगंधर लिहिले असेल तर त्यावर त्यांनी फक्त मुलामा दिला असे म्हणता येईल.

आता मलाही तुझ्या अपेक्षाभंगामुळे युगंधर परत वाचावेसे वाटू लागले आहे Smile

बाकी जेम्स हॅडली चेस भन्नाटच आहे. कोणतेही पुस्तक उचलावे आणि निखळ आनंदात डुंबावे Smile

मी एक पुस्तकवेडा
http://pustakveda.blogspot.com/

कादंबरी गणित

वल्ली आणि सागर ~

तुम्ही दोघांनीही "युगंधर" वाचली आहे आणि 'मृत्युंजय' च्या तुलनेत ती फिकी वाटणे साहजिकच असले तरी मुळात त्या कादंबरीत वाचकाला खेचून घेणारे असे कोणतेही घटक नाहीत (Expressing Elements). होते असे की, 'राम', 'कृष्ण', 'शिवाजी', 'विवेकानंद', "गांधीजी" अशी "वन इन मिलियन ईयर्स" म्हटल्या व्यक्तीविषयी आपण अगदी शाळेच्या दिवसापासून सातत्याने वाचत आलेलो असतो - एकतर अभ्यासक्रमाचा भाग म्हणून, आणि नंतर त्यापैकी एखाद्या व्यक्तिरेखेविषयी प्रेम+आदर निर्माण झाला की त्याच अवस्थेपासून आपण त्याविषयी मिळेल तेवढे 'रिटन मटेरियल' गोळा करीत असतो आणि अगदी महाकाव्यासम कलाकृती समोर येईपर्यंत त्याच्याविषयी सफिशिअंट म्हणावा असा डेटा आपल्या मेंदुवर कोरला गेलेला असतो. त्यामुळे 'तुलना' अपरिहार्य होतेच होते.

प्रश्न असा की मग "कर्ण", 'ययाति', "त्रिंबकजी डेंगळे", "यशवंतराव होळकर", 'संभाजी' अशा व्यक्तिरेखांवर लिहिलेल्या कादंबर्‍या विलक्षण लोकप्रिय का होतात ? त्याला उत्तरही असेच की या सार्‍या व्यक्तिरेखा इतिहासकारांनी एकतर 'धूसर' अशा रेखाटल्या आहेत वा त्यांच्याविषयी समाजात दोन प्रवाह आढळतात. एक ते 'व्हिलनिश' प्रवृत्तीचे वा प्रकृतीचे आहेत वा दोन "त्यामुळे ते अ‍ॅन्टी हीरो आहेत'. या दुसर्‍या प्रकारातील त्यांचे चित्रण वाचकाच्या मनाला विलक्षण भावते. शिवाय लेखकाने त्याच्या दृष्टीने फार अभ्यास करून 'मूळ नायक अर्जुनाने या दुसर्‍या नायकावर - कर्णावर - सतत अन्याय करतो' असे ठसविले तर वाचकही स्वतःला कर्णाच्या जागी पाहतो आणि मग ते चित्रण त्याला भावतेच भावते आणि त्या मोहाच्या डोहाकडे तो आपसुकच खेचला जातो.

त्यातही 'द्रौपदी' ही कर्णावर 'खुष' होती, कर्ण गंगास्नानावरून वाड्याकडे परततेवेळी नगरकन्यका त्याच्या पिळदार शरीराकडे पडद्याआडून पाहात असतात असे अश्वत्थाम्याने त्याला सांगणे, एकदा कर्ण दुर्योधनाकडे गेला असताना त्याची वाट पाहत असताना इकडेतिकडे पाहताना वरील सज्जातून त्याच्याकडे कुणीतरी पडद्यामागून रोखून पाहते असा त्याला भास होतो, तो वळून पाहतो तर झटदिशी राजकन्या दु:शला बाजूला होते - या आणि अशा अनेक लुभावणार्‍या काल्पनिक सफरी त्या दुर्लक्षित नायकाच्या बाबतीत घडत गेल्याचे सावंतांनी लिहिले की ते स्वतःला त्या नायकाच्या जागी कल्पना करणार्‍या वाचकाला "लई बरं" वाटते. गुदगुल्याही होतात, हा एका विशिष्ट वयाचा परिणामही असतो.

आता "युगंधर" बद्दल कल्पनेचे कितीही पतंग उडविले तरी वाचकाला मुळातच कृष्ण या व्यक्तिरेखेविषयी इतकी माहिती असते की मग साहजिकच त्याच्या मनी प्रश्न येतो की, यात सावंतांनी वेगळे काय सांगितले आहे ? अगदी पुतनामावशीचे ती मरेपर्यंत दूध पिणे, कालियामर्दन, कंस वध नंतर मग महाभारत युद्धातील त्याचा निर्णायक सहभाग या बाबीत नाट्य आणायचे तर ते किती यालाहा मर्यादा पडतात. राहता राहिला कृष्णा अ‍ॅज रोमॅन्टिक हीरो. इथेही राधा, रुक्मिणी, सत्यभामा आदी ललना कुणाला माहीत नसतात ? यांच्याविषयी लेखणी कितीही चालविली तरी या स्त्रियांचे कृष्णाप्रती डिव्होशन हे मिथक बनले असल्याने वाचकाची त्याविषयीची तहान आधीच भागलेली असते.

आता प्रकाशकाचा 'धंदेवाईक' भाग पाहू या. 'मृत्युंजय' गाजली, अगदी नेत्रदीपक असे यश शिवाजी सावंत याना लाभले. आता ते यश 'एनकॅश' करून जर घेतले नाही तर मग प्रकाशनाच्या धंद्यात पडण्याचे काय कारण ? असेच गणित मांडले जाते, मग "शिवाजीराव बसा कंबर कसून लिहायला. तुम्ही ज्यावर लिहाल ते खपविण्यास आम्ही समर्थ आहे" असे भरघोस आश्वासन दिले की मग शिवाजीरावच काय अगदी बाबा कदम, देवदत्त पाटील आणि बोधेही ठाण मारून बसलेले दिसतात. आपल्या लेखणीतून काय प्रसृत होते याची पर्वा करण्याची तमा क्वचितच एखादा लेखक करू शकत असेल [हा विषय सर्वस्वी वेगळाच आहे.]

'युगंधर' लिहिली, फसली. मग 'छावा' आला. आता छाव्यानंतर परत मराठीत 'संभाजी' वर विश्वासरावांची आणखीन् एक गलेलठ्ठ कादंबरी हवी होती का ? तुम्हाआम्हाला नको असेल, पण प्रकाशकाला हवी होती. कारण ? लेखकाच्या नावाला सांप्रत महाराष्ट्रदेशी आलेले वजन.

असो.

अशोक पाटील

डोळे उघडणारा प्रतिसाद

अशोक काका,

अगदी नेमक्या मर्मावर तुम्ही बोट ठेवले आहे
श्रीकॄष्ण ही व्यक्तीरेखा अपरिचित वाटतच नाही इतकी ती माहिती आहे.
अर्जुनाच्या जीवनावरची धनंजय ही कादंबरी पण अशीच उपेक्षित म्हणता येईल.

मी युगंधर वाचली तेव्हा ती आवडली होती. आता परत वाचून काढायला हवी, कारण युगंधर वाचली तो काळ आणि आजचा काळ यात माझ्या आयुष्यांत अनेक स्थित्यंतरे झाली आहेत.

मुख्य म्हणजे भैरप्पांचे पर्व , इरावतीबाईंचे युगान्त , दुर्गा भागवतांचे व्यासपर्व, महाश्वेतादेवींचे कुरुक्षेत्रानंतर, इ.. ग्रंथांचे संस्कार मनावर झालेले आहेत. तेव्हा आता युगंधर पुन्हा वाचले तर त्याचे अधिक मूल्यमापन करता येईल.

तुमच्या प्रतिसादातली शोकांतिका हेलावून सोडते Sad

"शिवाजीराव बसा कंबर कसून लिहायला. तुम्ही ज्यावर लिहाल ते खपविण्यास आम्ही समर्थ आहे"

तुम्हाआम्हाला नको असेल, पण प्रकाशकाला हवी होती. कारण ? लेखकाच्या नावाला सांप्रत महाराष्ट्रदेशी आलेले वजन.

नि:शब्द झालो. कारण असला बाजारुपणा साहित्याच्या दर्जासाठी अत्यंत हानीकारक आहे. पण अशाच वस्तुस्थितीत आज आपण आहोत हे नाकारुन चालणार नाही.

मी एक पुस्तकवेडा
http://pustakveda.blogspot.com/

+१

अतिशय उत्तम प्रतिसाद अशोककाका.
ऐतिहासिक कादंबर्‍यांपे़क्षाही पौराणिक त्यातही महाभारतावर आधारीत कादंबर्‍या जास्त फसलेल्या आहेत. मुख्य कारण म्हणजे मूळात महाभारतच इतके सर्वश्रेष्ठ आहे की त्या तुलनेत इतरांनी त्यावर आधारलेल्या कादंबर्‍या खुजाच वाटतात.
त्यामानाने ऐतिहासिक कादंबर्‍या बर्‍याच चांगल्या उतरलेल्या आढळून येतात.
प्रकाशकांचे गल्लेभरू धोरण तर आहेच, पण त्यानिमित्ताने का होईना पण वाचकाला चांगल्या कादंबर्‍यांचा आनंद घेता येतोच. सावंतांची छावा सुद्धा फसलेली वाटत होती पण विश्वास पाटलांची 'संभाजी' सुरेखच उतरलीय. कदाचित पाटलांनी संभाजीला घरातून रणातच उतरवलेले असल्यानेही.

+१

अतिशय उत्तम प्रतिसाद अशोककाका.

+१

-ऋ
----------------------
"चला, मी माझा एकमेव जुनाट कोट घालून एक नवं पुस्तक घेऊन येतो"

लेखक आणि प्रकाशक ~ यश अपयश धंदा

वल्ली, सागर, ऋषिकेश ~

तिघांच्या प्रतिक्रियांना उद्देश्यून ~
मला छावा वा संभाजीच्या यशापयाशाबद्दल तसेच गुणवत्तेबद्दल काही म्हणायचे नसून प्रामुख्याने यशापाठोपाठ येणार्‍या धुंदीमुळे लेखकाचा हळुहळू "लेखकराव" कसा बनत जातो आणि त्यातून प्रकाशक त्याचा रोबो कसा बनवितो यावर प्रतिसादाचे लक्ष केन्द्रीत केल्यास माझा मुद्दा जास्त स्पष्ट होईल.

ऐतिहासिक नाटके, चित्रपट यांच्याप्रमाणेच ऐतिहासिक कादंबर्‍या हादेखील समाजाची वाचनभूक पूर्ण करण्याचा एक लोकप्रिय असा प्रकार असल्याने लेखणीवर पकड असलेल्या लेखकाकडून अगदी दिवाळी अंकातदेखील अशा घटनावर रतीब घालणे भाग पाडणारे धंदेवाईक प्रकाशक आणि मग त्या छोट्या झर्‍याचे नंतर प्रवाहात रूपांतर करायला लावणारे प्रकाशकही तितक्याच संख्येत असतात. मनाला येईल तसे लिहिण्यापेक्षा लोकांना आवडेल तसं देत राहणं यातून प्रकाशक आणि काही अंशी आगावू आलेल्या धनादेशावरील आकड्याला भाळून गब्बर होऊ घातलेले लेखक आणि नाटककार सांप्रत या देशी होते/आहेत यात आश्चर्य वाटण्यासारखे काही नाही. कारण शेवटी लेखकाला 'पैसा' हा लागणारच. प्रश्न असतो तो नीतिमत्तेचा. ती किती पाळतात वा दोन्ही पक्षी पाळली जाते यावरही खल होऊ शकतो. म्हणजे ज्या प्रकाशकांने 'मी कुणीही नव्हतो अशावेळी माझे बाड जसेच्यातसे स्वीकारले आणि मला नावारूपाला आणले. पण नंतर दुसर्‍या ब प्रकाशकाने माझ्या ताज्याताज्या लोकप्रियतेचा फायदा उठविण्यासाठी गलेलठ्ठ चेक आधीच हाती ठेवला तर मी पहिल्या प्रकाशकाने तितकी रक्कम देण्यास असमर्थता दर्शिवली म्हणून तो तंबू झटदिशी सोडून देऊन दुसरीकडील गाद्यागिरद्यावर पहुडावे का ?" हा प्रश्न कधी एखादा एका रात्रीत प्रसिद्धी पावलेला लेखक स्वतःला विचारीत असेल का ?

त्यामुळे होते असे की पहिल्या लेखनात असलेली तीव्रतेची धार हळुहळू बोथट होत गेल्याचे दिसते. हे साहित्याच्या दृष्टीने वाईट. गेल्या शंभर वर्षाचा जर मराठी साहित्याचा मागोवा घेत गेलो तर 'ग्रामीण कादंबरी' हा प्रकार इथल्या मातीत का रुजला नसावा ? हा प्रश्न पडतो. आजही माडगुळकरांची "बनगरवाडी", शंकर पाटलांची 'टारफुला' आणि आनंद यादवांची 'गोतावळा' या तीन (तीनच) कादंबर्‍यांपुढे राज्यातील कोणत्याही विद्यापीठात बी.ओ.एस.वर काम करणार्‍यांची नजर का जात नाही ? दोष त्यांचा नाही, आहे तो प्रकाशकांच्या अमुक एका साहित्याचा पुरवठा करणार्‍या मातब्बरपणाचा.

अर्थात साहित्यातून पैसा मिळविणे हे दुय्यम मानू नये हे जितके खरे तितकेच 'पैशासाठी (च) लिहिणे' हेही घातकच...लेखक आणि वाचक - दोघांच्याही दृष्टीने.

तुमच्या संग्रहात "श्रीमान योगी" आहे. असल्यास, त्या कादंबरीला लाभलेली श्री.नरहर कुरुंदकर यांची प्रदीर्घ अशी प्रस्तावना वाचा. ती प्रस्तावना म्हणजे स्वतंत्र प्रज्ञेचा एक अत्यंत अभ्यासपूर्ण असा लेख असून त्यात 'यशापाठोपाठ येऊ घातलेल्या साहित्यातील परंपरेविषयी' श्री.कुरुंदकर काय म्हणतात ते तुम्ही मुद्दाम वाचावे अशी शिफारस करीत आहे.

अशोक पाटील

प्रतिसाद आवडला. श्रीमान

प्रतिसाद आवडला.
श्रीमान योगीची कुरुंदकरांची प्रदिर्घ आणि मुद्देसूद प्रस्तावना फार आवडली होती. पण आता परत एकदा पुस्तक कुठून तरी मिळवून वाचावी लागेल.

लेखक आणि प्रकाशकांच्या संदर्भात मटामध्ये उद्बोधक लेख आले होते.

लेखकाच्या पळवापळवीबद्दल मुकुंद कुळेंचा लेख येथे पहा.
http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/8727270.cms

त्याला विश्वास पाटलांनी दिलेले उत्तर येथे पहा.
http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/8818374.cms

दोन्ही लेख वाचनीय आहेतच.

+१ असेच म्हणतो

अशोक काकांचा प्रतिसाद म्हणजे एकदम वास्तवाची जाणीव करुन देणारा असतो Smile

श्रीमान योगीची कुरुंदकरांची प्रदिर्घ आणि मुद्देसूद प्रस्तावना फार आवडली होती. पण आता परत एकदा पुस्तक कुठून तरी मिळवून वाचावी लागेल.

वल्ली मित्रा, मी थोडा नशीबवान आहे .... माझ्याकडे आत्ता याक्षणी श्रीमानयोगी आहे... Smile
ऑफिसच्या ड्रॉवरमध्येच श्रीमानयोगी ठेवली आहे. आज संध्याकाळी घरी घेऊन जाईन व कुरुंदकरांची ही प्रस्तावना वाचेन. तसेही कुरुंदकरांच्या पुढील पुस्तकाच्या वाचनासाठी ती प्रस्तावना उपयोगी पडणार आहे. Smile

अशोक काकांनी उपस्थित केलेले प्रश्न लेखक वा प्रकाशक खरोखर स्वतःला विचारतात का? हा खरा प्रश्न आहेच पण त्यातून त्यांना उपरती होते का? हाही एक कळीचा मुद्दा आहे. असो, लवकरच मराठी साहित्याला सुगीचे दिवस येतील अशी अपेक्षा करतो...

मी एक पुस्तकवेडा
http://pustakveda.blogspot.com/

Walt Whitman...

Walt Whitman ... Leaves of Grass ह्या पहिल्याच काव्यसंग्रहाने अमेरिकन काव्यप्रांतात नव्या जाणीवा निर्माण करणारा कवी! त्याचे हे पुस्तक British Council च्या library तून घेतले.

Poetry for young people: Walt Whitman...

लहान मुलांसाठी लिहिलेले, त्यांना चांगल्या काव्याची, चांगल्या कवितेची ओळख होण्याच्या हेतूने लिहिलेले हे पुस्तक. निवडक २५ कविता त्यातील कठीण शब्दांचे अर्थ आणि सुयोग्य चित्रे ...

Jonathan Levin चे संपादन आणि Jim Burke ची चित्रे.

कवीची माहिती देताना Jonathan Levin ने लिहिले आहे --
“For Walt Whitman, poetry was no schoolroom or parlor exercise. It wasn’t an `indoor’ activity at all. Instead, poetry had to breathe the open air. It had to start in the earth, just as a tree sets its roots deep in the soil, and then take flight, just as the tree shoots its branches into the sky.”

संपादकीयाच्या पानावर कवीचा फोटो प्रेक्षणीय आणि त्यातून कवीचे प्रतीत होणारे व्यक्तिमत्त्व वाचनीय!
"The picture depicts Whitman as the working class man that he took such pride in being, dressed in a work shirt with the collar open, the tilt of his hat indicating this casual and even slightly mischievous air."

वाचनीय पुस्तक!

मराठीत असे पुस्तक आहे का?

किमया

माधव आचवलांचे 'किमया' वाचतोय.
प्राइड आणि प्रेजुडाइज पण सुरू आहे. एकच घोट घेऊन झालाय त्याचा. Wink

मिहिर

वा! दोन्ही पुस्तके दमादमाने

वा! दोन्ही पुस्तके दमादमाने संपवायची आहेत.. दोन्ही बद्दल आता अधिक बोलत नाही.. वाच आणि तुच सांग

-ऋ
----------------------
"चला, मी माझा एकमेव जुनाट कोट घालून एक नवं पुस्तक घेऊन येतो"

माणसांच्या गोष्टी

अघाताबाईंचं 'अपॉईंटमेन्ट विथ डेथ' वाचलं.. आवडलं
काल मतकरींचं 'माणसांच्या गोष्टी' वाचायला घेतल्यात. छोट्या छोट्या, साध्या परंतू प्रभावी गोष्टी आहेत.

-ऋ
----------------------
"चला, मी माझा एकमेव जुनाट कोट घालून एक नवं पुस्तक घेऊन येतो"