• '

सध्या काय वाचताय? (भाग ५)

सध्या काय वाचताय? (भाग ४)

भाग ४ दुसर्‍या पानावर गेल्यामुळे हा नवीन धागा सुरू करत आहे. सुदैवाने गेल्या १-२ महिन्यात (माझ्या मानाने, सागरच्या तुलनेत नाही) बरेच वाचून झाले. थोडक्यात लिहायचा प्रयत्न करतो -

(१) तें नावाचे बाबा (सुषमा तेंडुलकर) - तेंडुलकरांविषयी त्यांच्या मोठ्या मुलीने, सुषमाने लिहिलेले पुस्तक. त्याच ओघात प्रिया विषयी तिची मते, तिचे स्थान हेही पुस्तकात येते. "तें" माणूस म्हणूनही एवढे ग्रेट का ह्याचा अजून एक पैलू दिसतो. जर 'तें दिवस' आवडले असेल, तर अवश्य वाचून पहा.

(२)लॉरी बेकर (अतुल देऊळगावकर) - असा एक अवलिया आर्किटेक्ट भारतात होता हे आपले भाग्य. माझ्या माहितीप्रमाणे मराठीत लॉरी बेकर ह्यांच्यावर दुसरे पुस्तक नाही. खुपच सुंदर पुस्तक आहे. त्याच्या शेवटी त्यांचे आराखडे, पत्र-व्यवहार ह्याची पण माहिती आहे. लातुरच्य वेळेस भ्रष्ट शासनाने/नोकरशाहीने त्यांच्या अतिशय सुरेख आराखाड्याची अक्षरशः माती केली हे वाचून चिडचिड होते.

त्यांच्या बायकोचे "The other side of Laurie baker" हे अजून एक पुस्तक मिळवलय, पण ते अजून वाचले नाही. वाचल्यावर त्यावर नक्की लिहीन.

(३)झपाटलेपण ते जाणतेपण (साधना प्रकाशन) - वेगवेगळ्या क्षेत्रातील १२ व्यक्तिंंनी लिहीलेल्या त्यांच्या जडणघडणीच्या कथा. प्रतिक्षा लोणकर पासून अच्युत गोडबोलेंपर्यंत. माझ्यासाठी रझिया पटेल अनोळखी होत्या, पण ह्या पुस्तकात त्यांच्याबद्द्ल वाचल्यावर अजून वाचायची इच्छा आहे. नक्कीच वाचनीय्/संग्रहणीय पुस्तक.

(४) I have a dream (Rashmi Bansal) - एक "टिपीकल" रश्मी बन्सल पुस्तक. ह्यातली थीम आहे - 'सोशल आंत्रप्रेनर'. सगळे वाचून झाले नाही, पण बहुतांश आवडले. 'सुलभ' वाले बिंदेश्वर पाठक खासच. मला त्रिलोचन शास्त्रींविषयी पहिल्यंदाच कळले. Recommended.

(५) Man's search for meaning (Viktor Frankl) - Viktor Frankl हे २९ honorary डॉक्टरेट मिळवलेले अतिशय विद्वान डॉक्टर. लोगोथेरपी जे जनक. खूप वर्षापुर्वी हे पुस्तक घेतले होते, पण अर्धवट वाचून ठेवले होते. ह्या वेळेस पुर्ण वाचले. concentration camp वरचे त्यांचे एक सामान्य कैदी म्हणुन आलेले अनुभव आणि ३ वर्षांनी झालेली सुटका हे वाचूनही थरकप होतो. त्यांचे पहिल्या पुस्तकाचे हस्तलिखीत कैदेत घेतांना नष्ट केले, आणि त्यांनी त्या कैदेत जमेल त्या कपट्यावर त्यांच्या नोट्स लिहिल्या त्या फक्त सुटका झाली तर पुस्तक लिहिता येईल म्हणून. तिथून सुटका झाल्यावर ते अतिशय कार्यमग्न आयुष्य जगले. ह्या मूळ जर्मन पुस्तकाचा जगातील कित्येक भाषांमधे अनुवाद झाला आहे, आणी माझ्या माहितीप्रमाणे मराठीतही अनुवाद असावा (मेहता?). नक्कीच वाचनीय/संग्रहणीय पुस्तक!!

बाकी नवीन काही वाचले तर इथे लिहीनच. तुम्ही काय वाचताय?

उत्तम निवड मनिष

लॉरी बेकर यांच्यावर लोक्सत्तात हा एक लेख मिळाला. (गुगलबाबाची कृपा दुसरे काय? )
या लेखामुळे वाचकांना किमान कल्पना तरी येईन की लॅरी बेकर हा भारतातील अवलिया आर्किटेक्ट का होता?

कमी जागेत आणि स्वस्तात उत्कृष्ट घरे कशी बांधावीत हे लॅरी बेकर यांनी शिकवले.
वर दुवा दिला आहे तो लेख वाचकांनी अवश्य वाचावा.

बाकी लॅरी बेकर तुम्ही वाचला की अवश्य लिहा कसे वाटले ते.

आता माझ्या यादीकडे वळतो
सध्या जेम्स हॅडली चेस चे विजय देवधरांनी अनुवादित केलेले नॉक नॉक हू इज देअर ही कादंबरी वाचतोय... भन्नाट आहे. Smile

आज ती संपेन. मग उद्यापासून बहुतेक संपूर्ण शेरलॉक होम्स वाचायला घेईन

त्यानंतर पुढील पुस्तके रांगेत आहेत
- कोवळे दिवस - व्यंकटेश माडगूळकर
- श्रीमानयोगी - रणजित देसाई
- डेझर्टर - विजय देवधर

मी एक पुस्तकवेडा
http://pustakveda.blogspot.com/

तुझं वाचन बघूनच कॉम्प्लेक्स

तुझं वाचन बघूनच कॉम्प्लेक्स येतोय! Sad

असा कॉम्प्लेक्स येणे योग्य नव्हे

फक्त यादी पाहून असा कॉम्प्लेक्स येणे योग्य नव्हे Wink
फक्त यादी आहे ती.
अजून वाचन पूर्ण करायचे आहे.
माझ्याकडे जेवढी पुस्तके आहेत त्याच्या ६० ते ७० % पुस्तके अजून वाचून व्हायची आहेत. हे आता तुम्हाला कळाल्यावर कॉम्प्लेक्स जसा आला तसा गेला असेल Smile

मी एक पुस्तकवेडा
http://pustakveda.blogspot.com/

तुम्ही नको रे, तूच ठीक आहे.

Smile
तुम्ही नको रे, तूच ठीक आहे.

ओक्के मित्रा

हे चांगले असते.
तुझ्याबद्दल फारसे माहिती नाही त्यामुळे अहो जाहोची भाषा Wink
आता एकदम मोकळं मोकळं वाटलं मनिष मित्रा Smile

मी एक पुस्तकवेडा
http://pustakveda.blogspot.com/

लॉरी बेकर चे हे पुस्तक मी

लॉरी बेकर चे हे पुस्तक मी पुर्ण वाचलय. मला खूपच आवडलय. बाकी लॉरी बेकर विषयी बर्‍याच नियतकालिकात वाचलय, पण मला वातते पुस्तक हे एकच आहे.

नगरकर एके नगरकर

सात सक्कं त्रेचाळीस-किरण नगरकर
पुस्तकाच्या प्रस्तावनेत लिहील्याप्रमाणे या कादंबरीत लोकविलक्षण तंत्राचा वापर केला गेला आहे असे म्हटले आहे, तसा वापर करुन लिहीली गेलेली ही मराठीतील पहिली कादंबरी आहे असंही म्हटलं गेलेलं आहे. ही कादंबरी एका दमात माझ्याच्याने संपवली गेली नाही आणि ते बरंच झालं म्हणायचं कारण नंतर मधून मधून फाटकन तोडून इतस्ततः भिरकावलेले तपशील (हेच मी मघाशी म्हटलेले तंत्र) संगतवार जुळवता आले. वाचायची असेलच तर सुंदर भाषेकरता आणि वाक्यरचनांकरता वाचा, थेट आत जाऊन कच्चकन रुतून बसणरया संवादांकरता वाचा. संपूर्ण वाचलीत की त्यावर केतकरांनी केलेली घणाघाती टिका मिळवून वाचा, त्यावरचं शांता गोखलेंनी केलेलं समर्थनही वाचा. मला वाटतं या कादंबरीच्या वाचनानंतर आपल्याला 'काय आवडत नाही?' पेक्षा 'काय आवडतं?' ही कॅट्यागिरी जास्तच रिफाईन्ड होते.
पहिल्या पाच पानांमध्ये चक्करल्यासारखे होते (तसे होणे अपेक्षित आहे) पण मी नेट लावून वाचली आणि आता त्या कादंबरीच्या प्रेमात आहे. पहिल्या पानावरचा नगरकरांचा फोटो सरप्राईज एलिमेंट आहे. फार्फार देखणा मनुष्य. Smile

किरण नगरकरांची 'ककल्ड' मी मराठी आणि इंग्रजी अशा दोन्ही भाषांमधून वाचलेली. नगरकरांचे 'ट्रिओ'वाचून व्हायला आता एकच कादंबरीची कमी होती ती म्हणजे 'रावण अँड एडी'

रावण अँड एडी- किरण नगरकर
रावण आणि एडी नावाच्या मुलांच्या समांतर प्रवास, एडी आणि रावण यांना जोडणारा एडीच्या वडीलांच्या मृत्यूची घटना, एडीच्या आईने खतपाणी घालून एडीच्या मनात फोफावत ठेवलेली रावणविषयीची घृणा, यावर कळत्या वयात येईपर्यंत अनभिज्ञ असलेला रावण, मुंबईतले राजकीय प्रवाह आणि त्यानिशी एडी आणि रावण यांच्या आयुष्यांनी घेतलेली अनपेक्षित वळणं, एडीच्या असण्यात रावणचं सततचं असणं आणि रावणच्या असण्यात एडीचं-अशा सगळ्या असण्याचं गंमतीशीर नॅरेशन म्हणजे 'रावण अँड एडी'
ही कादंबरी 'अक्षर प्रकाशन'ने मराठीत 'रावण आणि एडी' नावाने प्रकाशित केली. ती किरण नगरकरांनीच लिहीली/अनुवादीत केली आहे.

माझी ही अत्यंत आवडती कादंबरी

माझी ही अत्यंत आवडती कादंबरी आहे.माझा पुस्तक कोड्यासाठीचा पहिला वेचा मी ह्या कादंबरीतलाच निवडला होता.मला आठवते त्याप्रमाणे माझी आणि सागर ह्यांची पण ह्या कादंबरी वर काही चर्चा झाली होती.ह्या कादंबरीवर प्रेम करणारे इंद्रराज पवार ह्यांनी मिसळपाववर किरण नगरकर ह्यांच्यावर सुरेख लेख लिहिला आहे.मनिकर्णिकाजी तुम्ही पण लिहा काहीतरी!

+१ सहमत आहे

अफलातून कादंबरी आहे.
निपो यांनी क्र. ५५ चा वेचा दिला होता या पुस्तकावर

निपो म्हणतात ते अगदी खरे आहे.
कादंबरी वाचून होते तेव्हा वाचक प्रगल्भ होतो हे नक्की Smile

मी एक पुस्तकवेडा
http://pustakveda.blogspot.com/

प्रतिस्पर्धी

किरण नगरकरांच्या 'प्रतिस्पर्धी' बद्दल काही माहित आहे का? मध्ययुगीन कालखंडावर ही कादंबरी आधारीत आहे असे ऐकले होते.

होय बरोबर आहे.

निपो यावर अधिकाराने सांगू शकतील.
माझ्याकडे प्रतिस्पर्धी आहे त्यामुळे मी थोडा प्रयत्न करतो.

यात तीन मुख्य व्यक्तीरेखा आहेत. एक मेरठची राजकुमारी आणि मेरठची भावी महाराणी
दोन - तिचा पती - हा मेवाडचा युवराज
आणि
तीन प्रत्यक्ष भगवान श्रीकृष्ण

या तिघांमधील परस्पर संबंधांचा सुरेखपणे नगरकरांनी घेतलेला वेध आणि त्या पार्श्वभूमिवरील राजकारण, युद्धे, घरातल्या व बाहेरच्या शत्रूंशी संघर्ष हे सगळे अप्रतिमपणे चित्रित केले आहे.
मुख्य म्हणजे इतिहासात या युवराजाचे जे चित्र आहे त्याला पूर्ण फाटा देणारे असे वेगळेच व्यक्तीमत्त्व नगरकरांनी बहाल केले आहे.

किरण नगरकरांची पुस्तके म्हणजे नक्कीच मेजवानी आहे मित्रा.
तुला सात सक्कं पचनी पडले असेल (ते प्रतिस्पर्धीच्या तुलनेत छोटे आहे म्हणून) तर ही पण कादंबरी संग्रहात असावी अशीच आहे Smile

मी एक पुस्तकवेडा
http://pustakveda.blogspot.com/

वाचले नाही

'सात सक्कं' वाचलेले नाही रे अजून. पुस्तक शोधायचा प्रयत्न केला होता पण मिळाले नाही अजून. Sad

उपलब्ध असावे

हे पुस्तक नक्की मिळेल मित्रा तुला.
बरेच गाजलेले आहे आणि सगळीकडे उपलब्ध पण होते.
अप्पा बळवंत चौकात शोधावे लागेल. रसिक कडे नक्की मिळेल

मी एक पुस्तकवेडा
http://pustakveda.blogspot.com/

प्रतिमा प्रकाशन

श्री.अरुण पारगांवकरांचा तुम्हाला पत्ता देतो. त्यांच्या 'प्रतिमा प्रकाशन' ने सात सक्कं त्रेचाळीसची दुसरी आवृत्ती प्रकाशित केली आहे. त्याना पत्र वा फोन केल्यास ते घरच्या पत्त्यावर आवृत्ती पाठवतात. पेमेन्टबद्दल फोनवर माहीती देतीलच.

श्री.अरुण पारगांवकर
प्रतिमा प्रकाशन
१३६२ सदाशिव पेठे, औदुंबर अपार्टमेन्ट्स
नवा विष्णू मंदिर चौक, पुणे.
फोन : २४४७७९०८ / २४४७८४४४

धन्यवाद

धन्यवाद अशोककाका,
आता हे पुस्तक नक्कीच मिळवू शकेन.

व्यासपर्व

परवाच विकत घेतलेले व्यासपर्व घरी आले. वाचायला सुरूवात केली आहे. अगदी चवीचवीने वाचत आहे.
अनेकांप्रमाणे मलाही ते फारच आवडते आहे

-ऋ
----------------------
"चला, मी माझा एकमेव जुनाट कोट घालून एक नवं पुस्तक घेऊन येतो"

संपूर्ण शेरलॉक होम्स

नुकतेच जेम्स हॅडली चेस चे विजय देवधरांनी अनुवादित केलेले नॉक नॉक हू इज देअर संपवले.
चांगली कादंबरी वाटली. पण शेवट अपेक्षित असल्याप्रमाणेच होता. शेवटी शेवटी अनुवादकाची पकड सुटलेली जाणवली ही कादंबरी वाचताता. विजय देवधरांच्या कादंबर्‍या वाचताना सहसा असे होत नाही. पण बहुतेक मूळ कथेत तसा दम नसावा. आडात नाही तर पोहर्‍यात कुठून येणार अशी शक्यता असावी. पण जेम्स हॅडली चेस चे थ्रिल ही कादंबरी वाचताना नक्की मिळते.

संपूर्ण शेरलॉक होम्स वाचायला घेतला आहे. पहिल्या २ कथा झाल्या आहेत वाचून. आज रात्री लाल केसांचं मंडळ ही कथा वाचेन Smile

मी एक पुस्तकवेडा
http://pustakveda.blogspot.com/

अतिशय सुंदर अनुवाद

नुकतेच भगिरथ म्हणून एक ओके ओके पुस्तक संपवले
त्यानंतर व्यासपर्वात डूंबून झाले.
आता एक अतिशय प्रसिद्ध लेखकाने केलेला अतिशय सुंदर अनुवाद वाचतोय Smile
जरा अशोककाकांचा वेचा येऊदे नेमके तेच पुस्तक निघायला नको म्हणून नाव घोषित करत नाहीत Smile

जोडीला मधेमधे चवीपुरते रश्मि बंसल यांचे 'connect the dots' वाचायला घेतले आहे

-ऋ
----------------------
"चला, मी माझा एकमेव जुनाट कोट घालून एक नवं पुस्तक घेऊन येतो"

धन्यु ऋ

नुकतेच भगिरथ म्हणून एक ओके ओके पुस्तक संपवले

याबद्दल धन्यवाद ऋ. नावावरुन मी देखील या पुस्तकाच्या मोहात पडलो होतो. माझे या पुस्तकाच्या मागे लागण्याचे कष्ट वाचवल्याबद्दल धन्यु. Smile

मी सध्या शेरलॉक होम्सचा मोठ्ठा ठोकळा वाचतोय. त्यातील ५ कथा वाचून झाल्या आहेत. पण शतकमहोत्सवी वेचा सप्ताहात सध्या अक्षरशः न्हातो आहे, त्यामुळे वाचनात मन लागत नाहिये. वेचा सप्ताह संपला की मग मी कवितांमध्ये कदाचित डुंबेन. Wink

मी एक पुस्तकवेडा
http://pustakveda.blogspot.com/

धागा वर आणण्यासाठी हा प्रतिसाद

धागा वर आणण्यासाठी हा प्रतिसाद

मी एक पुस्तकवेडा
http://pustakveda.blogspot.com/

म्या हे वाचतोय

१.महाराष्ट्र संस्कृती - पु.ग.सहस्त्रबुद्धे
२.अर्थात - अच्युत गोडबोले
३.सात मजले हास्याचे - सं-सुधा जोशी - गंगाधर गाडगीळांचे निवडक विनोदी साहित्य
४.आपल्या पूर्वजांचे तंत्रज्ञान - निरंजन घाटे
५.लमाण - डॉ.लागू
६.इंडिया अ हिस्टरी - जॉन के
७.अ रिलक्टंट हिरो - मायकल डॉब्ज

भिन्न, गाव -- अपेक्षाभंग

भिन्न वाचले.
त्या आधी जी एं.चा अनुवाद असलेले 'गाव' वाचले.
दोन्ही पुस्तकांनी अपेक्षाभंग झाला Sad

गाव आहे छान मात्र मुळ पुस्तकातील हलक्याशा कुचकटपणाने जी खुमारी येते ती या भाषांतरात तश्या प्रकारे न आल्याने तेवढी मजा आली नाही. बाकी भिन्न मधील भिन्न विषय सोडल्यास एक कादंबरी म्हणून ओके ओके (खरंतर तेच तेच) वाटले. शिवाय कादंबरीच्या (बर्‍याच जास्त) लांबीमुळे विषय खूपच डायल्युट झाला आहे असे वाटते.

आता आणखी एक पुस्तक वाचतोय, ते मात्र आवडले आहे. त्याचा १०० वा वेचा संपला की वेचा देणार आहे तेव्हा नाव सांगत नाही.

-ऋ
----------------------
"चला, मी माझा एकमेव जुनाट कोट घालून एक नवं पुस्तक घेऊन येतो"

गियानाहून पलायन

विजय देवधरांनी 'गियानाहून पलायन' या पुस्तकात पलायनकथा अनुवादीत केल्या आहेत.
भारत बुक हाऊस ने त्याची स्वस्त आवृत्ती काढली आहे (फक्त ६० रु.)
या कथासंग्रहात ४ पलायनकथा आहेत. (कथांची नावे थोडीफार चुकलेली असू शकतील, कारण आठवून लिहितो आहे Wink )
१. दोन मित्र - पहिल्या महायुद्धाच्या काळात सुरु होऊन नंतरच्या काळातील ही एका पायलटची आणि एका कुत्र्र्याच्या जीवश्च कंठश्च मैत्रीची कहाणी आहे.
२. गियानाहून पलायन - फ्रेंच गियानातील यातनामय तुरुंगातून एका कैद्याने केलेल्या पलायनाची चित्तथरारक कथा
३. बर्लिनच्या भिंतीवरुन पलायन - नावावरुनच एक अत्भुत कल्पना वापरुन पूर्व मधून पश्चिम बर्लिन मधे एका कुटुंबाने पलायन केले त्याची कथा आहे
४. भुयारातून पलायन - अजून वाचायची आहे पण ही पण पूर्व मधून पश्चिम बर्लिन ला पलायन केले त्याची कथा आहे

एकूणच २ दिवस वाचनात थरार होता , शेवटची कथा छोटी आहे ती आज संपेल Smile
अनेकदा वाचून थरार अनुभवता येण्यासारखे पुस्तक केवळ ६० रुपयांना आहे, त्यामुळे थरारकथा आवडणार्‍यांना हे पुस्तक म्हणजे पर्वणीच आहे Smile

मी एक पुस्तकवेडा
http://pustakveda.blogspot.com/

शांतवन - अंबिका

शांतवन - अंबिका सरकार
अभिनयाचे प्राथमिक सहा पाठ - सदाशिव अमरापूरकर + आनंद विनायक जातेगावकर
डार्विन आणि जीवसृष्टीचे रहस्य - सं. रवीन्द्र रुक्मिणी पंढरीनाथ + नंदा खरे
वाचू आनंदे - माधुरी पुरंदरे
तत्पुरुष - कविता महाजन

- मेघना भुस्कुटे

'इस्रोतले माझे ते दिवस' --

'इस्रोतले माझे ते दिवस' -- लेखक: प्रकाश मुजुमदार. राजहंस प्रकाशन.
नुकतेच लायब्ररीतून आणले आहे.

ओमेर्ता

ओमेर्ता चे भाषांतर वाचत आहे

-ऋ
----------------------
"चला, मी माझा एकमेव जुनाट कोट घालून एक नवं पुस्तक घेऊन येतो"

अजूनही

अजूनही शांतारामचा ठोकळा वाचणेच चालू आहे.

ब्रश माइलेज

"ब्रश माइलेज" सुप्रसिद्ध चित्रपकार रवी परांजपे यांची तितकीच चित्रमय आत्मकथा. खरेतर हे पुस्तक आणले होते एका चित्रकार मित्राला प्रेझेन्ट देण्यासाठी पण त्याचा वाढदिवस अजून एक आठवडा लांब आहे हे माहीत असल्याने दरम्यानच्या काळात पुस्तकातील एकदोन लेख वाचावेत आणि चित्रांचाही आनंद घ्यावा म्हणून उघडलं, अन् त्यात हरवूनच बसलो आहे.

[आता तर पूर्ण वाचल्याशिवाय ते द्यावे असेही वाटनासे झाले आहे.]

सध्या

मी अलिकडे काहीच वाचलेले नाहिये

काल पासून संजय सोनवणींचे मुंबई २६/११ : आधी आणि नंतर हे पुस्तक वाचतो आहे.

मुंबई बॉम्बस्फोटाचा परामर्श घेताना संजय सोनवणी यांनी दहशतवादाच्या निर्मितीवरही त्यांनी लिहिले आहे.

त्यांच्या एलटीटीई वर आधारीत एका कादंबरीवर अमेरिकन रेडीओ वर मुलाखत झाली होती तेव्हा 'जगातला सर्वात मोठा दहशतवादी देश अमेरिका आहे' हे अमेरिकेत जाऊन सांगणारे एकमेव भारतीय असावेत. पण अमेरिका हा विचार स्वातंत्र्यास मानणारा देश असल्यामुळे काही अपाय न होता परत आले Smile - ही माहिती प्रकाशकांनी या पुस्तकाच्या सुरुवातीला छापली आहे.

एकंदरीत पुस्तक छान वाटते आहे. भारत बुक हाऊसने प्रकाशित केलेले अवघे ६० रुपयांचे पुस्तक आहे हे.

मी एक पुस्तकवेडा
http://pustakveda.blogspot.com/

नुकतीच २ चांगली पुस्तकं

नुकतीच २ चांगली पुस्तकं वाचली.

  1. हेडहंटर - सुमेध वडावाला (रिसबूड) ह्यांनी लिहिलेले गिरीश टिळक ह्यांच्यावरचे हे पुस्तक मला आवडले. हेडहंटर म्हणून गिरीश टिळक यांनी वर्णन केलेले किस्से आणि इनसाईटस मस्तच आहेत.
  2. आणि चिनार लाल झाला - प्रभाकर पेंढारकर ह्याची १९७१ च्या युध्दाच्या पार्श्वभुमीवरची छोटीशी कादंबरी. सहसा कादंबर्‍यांंच्या वाटेला ना जाणारा मी पण 'प्रभाकर पेंढारकर' नाव वाचून घेतली आणि निराशा नाही झाली. महत्वाची गोष्ट म्हणजे ह्याचा नायक हा पाकिस्ताची वैमानिक 'युसूफ' आहे. नक्कीच वाचनीय.

चिनार बद्दल

मनिष मित्रा,

सुंदर निवड.

आणि चिनार लाल झाला हे पुस्तक मी कित्येक वर्षांपूर्वी वाचले होते. मला वाटते प्रभाकर पेंढारकरांचे पहिले पुस्तक मी हेच वाचले होते. नंतर रारंगढांग वाचले.

पुस्तकाबद्दल तू थोडक्यात लिहिले आहेसच. पण एवढ्या छोट्याशा कादंबरीतून मोठा आशय देणारी कादंबरी म्हणून मला "आणि चिनार लाल झाला" लक्षात राहिली आहे.

माझ्या विस्मृतीत गेलेल्या कादंबरीची आठवण करुन दिल्याबद्दल मनापासून धन्यवाद मित्रा. Smile
हे पण पुस्तक उपलब्ध असेन तर माझ्या संग्रहात येईन लवकरच Wink

बाकी हेडहंटर बद्दल अधिक वाचायला आवडेल.

मी एक पुस्तकवेडा
http://pustakveda.blogspot.com/

यादी

दरम्यानच्या काळात जे काहि थोडेफार वाचले ते असे:
-- Pride and Prejudice (क्ष व्यांदा वाचले Wink )(टॉप क्लास)
-- १९८४ (लय भारी)
-- ओमेर्ता (अनुवाद)(ठीक ठीक आवडले)
-- नथिंग लास्ट्स फॉरेव्हर (अनुवाद) (आवडले--एकदा वाचायला छान)
-- मनातले अवकाश (आवडले)
-- अधर्मयुद्ध (फार आवडले)
-- वनवास (क्ष व्यांदा वाचले.. अर्थात टॉप क्लास)
-- सध्या वाचतोय 'फ्रॉम रशिया विथ लव्ह' (००७ जेम्स बाँड कथा -- अनुवाद) (अनुवाद अत्यंत ढीसाळ आहे.. पुस्तक कसेबसे वाचतो आहे)

दिवाळी अंक
-- लोकप्रभा
-- गृहशोभिका
-- जत्रा
-- हंस
-- ठकठक
-- लोकसत्ता
(यातील लोकसत्ता सोडल्यास बाकी कोणताही आवडला नाही. लोकसत्तातील काहि लेख आवडले. बाकीच्यातील एखाद दुसरा लेख बराय. बाकी जाहिरातींचा बुजबुजाट आहे फक्त)

-ऋ
----------------------
"चला, मी माझा एकमेव जुनाट कोट घालून एक नवं पुस्तक घेऊन येतो"

पैसे वाचवलेस

धन्स ऋ,

- सध्या वाचतोय 'फ्रॉम रशिया विथ लव्ह' (००७ जेम्स बाँड कथा -- अनुवाद) (अनुवाद अत्यंत ढीसाळ आहे.. पुस्तक कसेबसे वाचतो आहे)

हे पुस्तक माझ्या निशाण्यावर होते ते केवळ विजय देवधर अनुवादक आहेत म्हणून. पण प्रतिसाद वाचून हे पुस्तक विकत नक्कीच घेणार नाहिये. Smile

माझे पैसे वाचवल्याबद्दल धन्यु Smile

मी एक पुस्तकवेडा
http://pustakveda.blogspot.com/

अनुवाद मला तरी चांगलाच वाटला

अनुवाद मला तरी चांगलाच वाटला होता, पण मूळ पुस्तकातच फारसा दम नाहीये पण त्यावरील चित्रपट मात्र आजवरचा सर्वोत्तम बाँडपट म्हणावा.

सर्वोत्तम बाँडपट

हे खरे आहे मित्रा,

इयान फ्लेमिंगच्या पुस्तकापेक्षा त्यावर आधारीत चित्रपटांमधूनच जास्त दम दिसतो... अपवाद काही कादंबर्‍यांचा. पण तो अगदी थोडा आहे.
मला सर्वोत्कॄष्ट बाँडपट पिअर्स ब्रॉसननचा गोल्डनआय (का डाय अनादर डे?) Wink वाटतो. अर्थात कॉनेरी आणि ब्रॉसनन हे दोघे आपापल्या परीने साजेसे बाँड होते.

मी एक पुस्तकवेडा
http://pustakveda.blogspot.com/

पाडस

'पाडस' वाचले बर्‍याच दिवसांपूर्वी.
सध्या अधूनमधून प्लेटोच्या 'रिपब्लिक' ग्रंथाचा 'आदर्श राज्य' हा अनुवाद वाचतोय. शाळेत असताना दोन-तीनदा सुरुवात केलेली, पण डोके जड झाले म्हणून सोडून दिले होते. आता किती वाचतो ते बघुया!

मिहिर

पाडस .. अहाहाहा...

क्या बात है मिहिर.. पाडसचा प्रत्येक अनुभव सुंदरच असतो

प्लेटोचे मी एकही पुस्तक शैक्षणिक जीवनात पुन्हा कधी न घेण्याची प्रतिज्ञा केली होती आणि ती कॉलेज जीवन संपेपर्यंत पाळली देखील Smile
चुकून सातवीत असताना प्लेटोचे एक छोटे पुस्तक मिळाले होते. असले बोजड वाटले की तेव्हाच वरील प्रतिज्ञा केली होती. या प्रतिज्ञेत सॉक्रेटिस, अरिस्टॉटल् वगैरे मंडळी पण भरडली गेली होती.

मी एक पुस्तकवेडा
http://pustakveda.blogspot.com/

काऊंट ऑफ माँटे क्रिस्टो

वरच्या यादीनंतर रणांगण वाचले
कहै दिवाळी अंकही वाचले
सध्या "काऊंट ऑफ माँटे क्रिस्टो"चे भाषांतर (परांजपे) वाचत आहे

-ऋ
----------------------
"चला, मी माझा एकमेव जुनाट कोट घालून एक नवं पुस्तक घेऊन येतो"

इंग्रजी वाचतोय

जेम्स हॅडली चेस चे "गोल्डफिश हॅव्ह नो हिडन प्लेस" हे पुस्तक वाचतोय

भन्नाट आहे Smile

त्याच्याच जोडीला याच महिन्यात प्रकाशित झालेले
संजय सोनवणी यांचे "भारतीय स्वातंत्र्याचे प्रणेते ||महाराजा यशवंतराव होळकर||" हेही पुस्तक वाचतो आहे.

मी एक पुस्तकवेडा
http://pustakveda.blogspot.com/

'शुअरली यू आर जोकींग मिस्टर

'शुअरली यू आर जोकींग मिस्टर फेनमन' हे पुस्तक वाचतोय सध्या इंग्रजीत.

मिहिर

अलिस्टर मॅक्लिनचे 'द सटन बग'

अलिस्टर मॅक्लिनचे 'द सटन बग' वाचतोय. अनु. अशोक पाध्ये.
संथ सुरुवातीनंतर मॅक्लिनचा थरार. पुस्तक मस्तच आहे.

'द सटन बग' वाचून झाले. आता

'द सटन बग' वाचून झाले.
आता प्रतिभा रानड्यांनी लिहिलेलं 'ऐसपैस गप्पा दुर्गाबाईंशी' हे पुस्तक वाचायला सुरुवात केलीय.

आवडले नाही का सटन बग

'द सटन बग' वाचून झाले.

यावरुन असे दिसते की ते फारसे दर्जेदार नसावे. तुला पुस्तक आवडले तर तू तसे नेहमी लिहितोस.

मी सध्या जेम्स हॅडली चेस व यशवंतराव होळकर यांच्यामध्येच आहे. फारसा वेळ वाचनासाठी मिळत नसल्यामुळे कासवगतीने माझे वाचन सुरु आहे Smile

मी एक पुस्तकवेडा
http://pustakveda.blogspot.com/

पुस्तक चांगले आहे तसे. पण

पुस्तक चांगले आहे तसे. पण मॅक्लिनच्या इतर पुस्तकांच्या तुलनेत थोडे कमीच पडते. मॅक्लिनच्या युद्धकथा, जहाजांवरील थरारकथा एकदम बेस्ट.

होय खरे आहे

मॅक्लीनचे साऊथ बाय जावा हेड वाचले आहे मी. भन्नाट आहे ते Smile

मी एक पुस्तकवेडा
http://pustakveda.blogspot.com/

सध्या वजन कमी करायचे असल्याने

सध्या वजन कमी करायचे असल्याने ऋजुता दिवेकरांचे 'डोंट लूज युअर माईंड, लूज युअर वेट' वाचतोय.
काही काही फंडे एकदम अफलातून आहेत. बारीक सदस्यांनीही वाचण्यासारखे आहे. Wink

वा मस्तच

तुझे वजन कमी करण्याची मोहीम यशस्वी होवो या शुभेच्छा मित्रा Smile

मी बारीकच आहे फक्त पोट या अवयवाने थोडा असहकार पुकारला आहे, तेव्हा ते कमी होण्यासाठी तुझ्याकडून थोडे धडे मी ही घेईन म्हणतो Wink

मी एक पुस्तकवेडा
http://pustakveda.blogspot.com/

शापित यक्ष, डिसेप्शन पॉइंट, 'अक्षर' दिवाळी अंक

शापित यक्ष वाचायला घेतले आहे.. धन्य तो बर्टन! असेच म्हणायला भाग पडते आहे.. यावर विस्ताराने नंतर लिहिन.
बाकी बसमधे काहितरी टाईमपास म्हणून डॅन ब्राऊनच डिसेप्शन पॉइंट वाचतो आहे. बाकी काल 'अक्षर' एकदाचा हाती लागला. तेव्हा त्यावर आक्रमण करेनच!

-ऋ
----------------------
"चला, मी माझा एकमेव जुनाट कोट घालून एक नवं पुस्तक घेऊन येतो"

सध्या शिवाजी सावंतांचे

सध्या शिवाजी सावंतांचे 'युगंधर' वाचायला सुरुवात केलीय.

वाचले की नक्की सांग

युगंधर श्रीकॄष्णाच्या जीवनावरची एक छान कादंबरी आहे.
सर्व गोष्टी पटल्या नाहीत तरी कलाकृती उत्कृष्टच आहे.
वाचून झाले की नक्की सांग कशी वाटली ते मित्रा Smile

मी एक पुस्तकवेडा
http://pustakveda.blogspot.com/