नमस्कार,
'पुस्तकविश्व'चा दिवाळी अंक आज आपल्या हाती देताना मला अत्यंत आनंद होत आहे. 'पुस्तकविश्व'ची सुरुवात होऊन अजून उणेपुरे वर्षही झाले नाही. या एवढ्याश्या कालखंडात त्याने छान बाळसे धरले आहे. तुम्हां सर्व पुस्तकवेड्या रसिक वाचकांमुळेच हा पल्ला आपण गाठला आहे, ही जाणीव मनी ठेवून मी आपल्या सर्वांप्रती कृतज्ञता व्यक्त करतो.
मागचे दशक मराठी माणसाच्या आंतरजालावरच्या वावराला नवे परिमाण देणारे दशक होते. या दशकात मराठी आंतरजालाचा उदय झाला. अनेक वृत्तपत्रे, महाराष्ट्र शासनाची संकेतस्थळे तसेच मिसळपाव-मनोगत-उपक्रम यासारख्या कम्युनिटी साईट्स सुरू झाल्या, मोठ्या झाल्या. युनिकोडआधारित झाल्याने जागतिक प्रमाणांच्या कसास उतरल्या. मराठी माणूस हळूहळू मराठी आंतरजालाला रुळला. पुस्तकवेड्यांना, वाचनवेड्यांनातर हे नवे जग जास्तच जवळचे वाटले आणि यातूनच खास पुस्तकांसाठी असलेल्या संकेतस्थळाची गरज निर्माण झाली. खास पुस्तकांसाठीचे एक संस्थळ असावे जिथे पुस्तके, लेखक, प्रकाशक यांचे सुसूत्र विदागार असावे; पुस्तकांना जोडलेले त्यांचे परिचय/परीक्षणे असावीत; त्यासंबंधीच्या चर्चा असाव्यात आणि पुस्तकवेड्यांचे एक सोशल नेटवर्क असावे या विचाराने लोकविकास मित्रमंडळाने 'पुस्तकविश्व'ची निर्मीती केली. येणारे दशक मराठी आंतरजालाच्या परिपक्वतेची गरज घेऊन येत आहे. या अनुषंगाने येणार्या वर्षात 'पुस्तकविश्व'ची वाटचाल एका कम्युनिटी साईटबरोबरच पुस्तकवेड्यांच्या सोशल नेटवर्ककडे व्हावी, असा प्रयत्न असेल. यासाठी लागणार्या तांत्रिक सुधारणा करण्यावर लोकविकास मित्रमंडळाचा भर असेल.
आपल्या सगळ्यांच्या उत्स्फूर्त योगदानामुळे आज 'पुस्तकविश्व'वर उत्तमोत्तम परिचय/परीक्षणे येत आहेत. मराठीमध्ये अभूतपूर्व अशी सुसूत्र माहिती उपलब्ध होत आहे. परिपक्वतेची अपेक्षा असणार्या कालखंडात लेखक, प्रकाशक यांचाही अस्तित्वात असलेला विदा आपण उत्स्फूर्तपणे अद्ययावत करत रहावा, तसेच नवीन विदाही जोडत रहावा, असे आवाहन मी या निमित्ताने करू इच्छितो.
या निमित्ताने 'पुस्तकविश्व'ला मूर्त रूप देण्यात उत्स्फूर्त योगदान देणार्या श्रावण मोडक आणि निखिल देशपांडे यांचे मी आभार मानतो, तसेच सातत्याने उत्तमोत्तम लिखाणासाठी प्रभाकर नानावटींचे मी विशेष आभार प्रदर्शित करू इच्छितो. याचबरोबर पुस्तकविश्वच्या सर्व सदस्यांचे, त्यांच्या सूचनांसाठी तसेच सर्वच प्रकारच्या योगदानासाठी आभार मानतो.
संपादक
अनुक्रमणिका
अनुभव
- ग्रंथालयात भटकंती - जाँ-पॉल सार्त्र
- वैज्ञानिक व पुस्तकांचे जग!
- 'साभार परती'चा शिक्का
- बौद्धांचे आणि जैनांचे संस्कृत साहित्यातले योगदान - एक आढावा
- सांगावेसे वाटले म्हणून.....
- डाऊन द मेमरी लेन
- कृतज्ञ!
- पुनर्वाचनाय च

प्रतिसाद द्या