'बोलती पुस्तके' हा मराठीतला पहिला वाहिला free Audio Books प्रकल्प. याबद्दल अधिक जाणुन घ्या इथे.
शाळेची इमारतसुद्धा शैक्षणिक साधन होऊ शकते!
मुखपृष्ठ
पुस्तक जोडलेले नाही
पुस्तक
पुस्तक जोडलेले नाही
![]() |
शाळा म्हणजे काही फक्त इमारत नाही किंवा शिक्षक व मुलांनी एकत्र येण्याची फक्त जागा नाही. मुलांच्याशिक्षणासाठी व विकासासाठी ती एक वैशिष्ट्यपूर्ण जागा आहे. मुलांच्या विचारांना आकार देणारी, ज्ञानाला साकार स्वरूप देणारी ती जागा आहे. जी त्यांचे कुतूहल जागे करून त्यांना सक्रिय बनवते. ती त्यांच्या मनात प्रश्न निर्माण करते व उत्तर शोधायला उद्युक्त करते. शाळा मुलांना वातावरणाशी समरस होत भविष्य घडवायला मदत करते. या मध्यवर्ती कल्पनेचा मागोवा घेत शाळेच्या इमारतीलाच शैक्षणिक साधन म्हणून उपक्रम राबवणार्या नव्यापिढीतील वास्तुविशारद कबीर वाजपेयी यांच्या संकल्पनांचा वेध घेणारे एका समृद्ध शाळेचा प्रवास हे पुस्तक आहे. त्यांच्या संकल्पनांचा मराठी भाषिकापर्यंत पोचविणार्या विनीता गणबोटे यांना धन्यवाद द्यायला हवे.
प्रस्तावनेत उल्लेख केल्याप्रमाणे व्यक्तीच्या विकासात, सामाजिक अस्तित्व व सहभागात तसेच ज्ञानार्जनाद्वारे वैश्विक नागरिक तयार करण्यात (प्राथमिक) शाळांचा वाटा बहुमोल आहे. मानवी जीवनातील अतीसंवेदनशील अशा विद्यार्थीदशेच्या प्रारंभीच्या टप्प्याच्याबद्दल आपल्याकडून होत असलेली हेळसांड मनाला चीड आणणारी आहे. शाळा म्हणजे चार भिंतीचा कोंडवाडा असे नसून त्याचा वापर मुलांना प्रेरणादायी ठरू शकतो, हे पुस्तक वाचताना जाणवू लागते व आपण आश्चर्यचकित होतो.
कबीर वाजपेयी यांची Building As a Learning Aid (BALA - 'बाला') ही संस्था याविषयी कार्यरत आहे. कल्पना, धोरण, पद्धती, डिझाइन, व त्यांची आखणी या सर्व गोष्टीत संस्थेचा सहभाग असून चर्चेच्या माध्यमातून जनजागृती करत सोप्या मार्गाने ही संकल्पना राबवण्यासाठी संस्था व खुद्द संकल्पक प्रयत्नशील आहेत.
शाळेचा भौतिक परिसर व खुद्द शाळा शिक्षण प्रक्रियेत महत्वाचे घटक ठरू शकतात, या मध्यवर्ती कल्पनेभोवती नेमके काय काय करता येईल याचे विस्तृत वर्णन या पुस्तकात आहे. भिंती, फरशा, खांब, दारे - खिडक्या, छत, पंखा, पाने-फुले, बिया झाड, अगदी ऊन-पाऊससुद्धा, 'बाला'च्या कक्षेत येत असल्यामुळे शिक्षण हे मुलांसाठी आनंददायी होऊ शकते, याबद्दल दुमत नसावे. अशा परिसरामुळे मुलांमध्ये स्वयंअध्ययनाची सवय आपोआप वाढू लागते.
'बाला'ला नवीन बांधकामच हवे किंवा आहे ते सर्व पाडून नवीनच करायला हवे हा आग्रह अजिबात नाही. नवीन बांधकामाचे नियोजन, वा शाळेच्या दुरुस्तीचा आराखडा या टप्प्यावर किंवा उपलब्ध असलेल्या पैशात भरपूर काही करता येते याबद्दल त्यांचा आत्मविश्वास आहे. त्यांच्या कल्पनेत लवचिकता असल्यामुळे आर्थिक परिस्थितीनुसार, संसाधनांच्या उपलब्धतेनुसार व गरजेनुसार त्यात बदल घडविता येते व टप्प्या-टप्प्याने आपले ईप्सित पूर्ण करता येते. मूळ खर्चात थोडीशी वाढ करून शाळेच्या वास्तूच्या मूल्यात कित्येक पटीने वाढ होऊ शकते, हा 'बाला'चा दावा आहे. महत्वाचे म्हणजे ही संकल्पना कुठल्याही शाळेत - मग ती खेड्यातली असो, गावातली असो, वा शहरातली असो - लोकांचा सहभाग घेत राबवता येते.
मुळात शाळेची इमारत बांधताना शासन, शैक्षणिक संस्था, आर्किटेक्ट, इंजिनियर, गवंडी, मजूर, इत्यादी यंत्रणा व व्यक्ती स्वतंत्रपणे काम करू लागतात. बांधकाम दिलेल्या मुदतीत व मंजूर केलेल्या पैशात बांधून द्यावयाची असल्यामुळे विद्यार्थ्याच्या दृष्टीने इमारतीत व भोवतालच्या मोकळ्या जागेत काय हवे व काय नको याचा अजिबात विचार केला जात नाही. त्यामुळे मुलांसाठी आवश्यक असलेल्या गोष्टी त्यात अंतर्भूत होत नाहीत. कालांतराने काही गोष्टींची त्यात भर पडत असली तरी त्यात नियोजन नसते व केवळ योगायोगामुळे त्या घडत जातात. त्यामुळे शिक्षणातील सुखद अनुभवांना मुलं पारखी होतात. लेखक याच कमतरतेवर बोट ठेऊन उपाय सुचवतात. हे गुणदोष दूर करून या सर्व यंत्रणा व संबंधित व्यक्तीत समन्वय असल्यास ती कशी फलद्रूप होऊ शकते याचे वर्णन येथे आहे. पुस्तकात कित्येक योजनांचा उल्लेख आहे. सर्व योजनांचा तपशीलही आहे. मात्र सर्वच्या सर्व योजना प्रत्येक शाळेत राबवायलाच हवेत असा दुराग्रह नाही. आपापल्या कुवतीनुसार व प्राप्त परिस्थितीनुसार जितके जमेल तेवढे केले तरी सद्यस्थितीतील शाळांची दुरवस्था दूर होऊ शकेल असा विश्वास लेखकाला वाटतो.
'बाला'च्या 'डिझाइन आयडिया'मध्ये वास्तूतील मूलभूत घटकांना व साधनांच्या उपयोजितेला धक्का न लावता त्यांचे शैक्षणिक साधनांत कशा प्रकारे परिवर्तन करता येते याचे एक स्थूल चित्र उभे केले आहे. खिडकीने खिडकीचे काम केले पाहिजे; व्हरांडा, कुंपण, भिंती, दरवाजे, कपाटं इत्यादी केवळ शोपीस म्हणून राहू नये किंवा केवळ मुलांच्या मजेखातर नसावेत. त्यांच्या मूलभूत वापराबरोबरच शैक्षणिक साधनं म्हणून विचार करू लागल्यास अनेक कल्पना सुचतील. यापूर्वी त्या केवळ त्रिमितीय घटक म्हणून उभ्या होत्या. त्यांचा अन्य काही उपयोग होऊ शकतो, यात थोडासा बदल करून शिकण्यातील आनंद द्विगुणीत करता येते, यावर 'बाला'चा भर आहे.
शाळेच्या बाह्यपरिसराबद्दल मुलांच्या दृष्टीने विचार केल्यास अनेक कल्पनांची सरमिसळ त्यात आढळते. धावपळ, खांबाभोवती फिरणे, उड्या मारणे, नाचगाणे, जमीन वा भिंतीवर रेघोट्या, भातुकली, भोवरा, गोट्या, विटीदांडू, झोके घेणे, गट पाडून खोखो, कबड्डीसारखे खेळ, गोल बसून गप्पा मारणे, एकटे लपण्याची जागा, अशा अनेक गोष्टींचा अंतर्भाव परिसरात असतो व त्यासाठी थोडेसे प्रयत्न केल्यास विद्यार्थ्यांच्या या अपेक्षा सहजपणे पूर्ण करता येते. झाडं नसल्यास खांबाची गोलाई मुलांना नक्कीच आनंद देऊ शकेल. शाळेच्या आवारातील 'गंमती जंमती भिंत' लपंडावासाठी योग्य ठरेल. फर्निचरवर वजन नमूद केल्यास फर्निचर हलवताना, ढकलताना, ओढताना आपण नेमके किती वजनाशी दंगामस्ती करत आहोत याचा मुलांना अंदाज येईल. अशा गोष्टीतून वस्तुभार, ऊर्जा, बळ, शक्ती, घर्षण, इत्यादी संकल्पना स्पष्ट करता येतील. शाळेच्या भिंतीवर उंची मोजण्यासाठीची रेषा कायमची कोरलेली असेल तर मुलांसाठी आपापली उंची मोजण्याचाच खेळ होऊ शकेल. कडी-कोयंडे, बिजागरी, कपाटं, कप्पे, खडू-फळा, इत्यादी साहित्य वापराच्या दृष्टीने सुरक्षित, टोकरहित असल्यास मुलांना 'हे सर्व मी स्वतंत्रपणे हाताळू शकतो' याची खात्री होईल. काही साधनं मुलांच्या उंचीच्या आवाक्यात असल्यास मुलं स्वत:च्या मनाप्रमाणे शरीराला व्यायाम देवू शकणारे पळणे, उड्या मारणे, चढणे इ व्यायाम प्रकार मुक्तपणे करू शकतील.
सामान्यपणे आपल्या शाळेतील खोल्यामधील फळा फक्त शिक्षकांनाच वापरता येतील या उंचीवर टांगलेल्या असतात. जर हाच फळा मुलं व शिक्षक या दोघांच्याही आवाक्यात येत असल्यास मुलंसुद्धा फळ्यावर लिहित शिकू शकतात. शाळेच्या भिंती तुरुंग वा दवाखान्यासारखे चकचकित असले पाहिजे असा दंडक नाही. त्यावर, अक्षरलिपी, शब्द, वाक्य (वाक्य म्हणजे सुभाषितवजा सुविचार नव्हे!) या गोष्टी असल्यास मुलं ते बघत बघत काढू शकतील. फक्त त्यासाठी जागा व साधनं उपलब्ध करून द्यायला हवी. शाळेच्या आवारात कठड्या असल्यास कठड्यांच्या नळीचा मुलं फोन म्हणून खेळतील. दरवाज्याच्या खालच्या जमीनीवर कोन रंगवल्यास दरवाजा किती अंशाने उघडला, कोन म्हणजे काय, अंश म्हणजे काय इत्यादी माहितीचे प्रात्यक्षिक करून दाखवता येईल. भिंतीवरील किंवा जमिनीवरील टाइल्स, खिडक्याचा जाळीचा भाग, जमिनीवरील गोलाकाराचा भाग यावर त्या त्या आकाराच्या फरशीचे तुकडे बसवून अपूर्णांकांचा प्रत्यक्ष अनुभव घेता येईल. टॅन्ग्रामच्या वैविध्यपूर्ण रचनेसाठी टाइल्सचे सात तुकडे करून खेळायला दिल्यास मुलं मनसोक्त खेळत राहतील. वेळेची संकल्पना समजावण्यासाठी उघड्या जागेत सौरघड्याळाची रचना करता येईल. जमिनीवर ग्रहांच्या भ्रमणकक्षा आखता येतील. मोकळ्या जागेत विटांच्या रचनेतून नकाशाबद्दलची माहिती देता येईल. बोटांच्या व मनगटांच्या हालचालीच्या सरावासाठी खिडक्यांच्या सुरक्षा जाळीचा वापर करता येईल. पाणी वाचवा, पाणी जिरवा, पावसाचे पाणी साठवा यासाठीसुद्धा काही उपाय मुलं शोधू शकतील. सांडपाण्याचा वापर करून छोटी बाग करता येईल. परिसरातील झाडांच्यावर तक्ता टांगून झाडाचे नाव, कुठले पक्षी- कीटकं आकर्षित होतात, कशामुळे आकर्षित होतात इत्यादी माहिती देता येईल. व्हरांड्यातील जमिनीवर पटांचे व बैठ्या खेळांचे पट रंगविल्यास शाळा सुटल्यानंतरसुद्धा मुलं शाळेत येऊ शकतील. जाळीदार भिंतीतून सूर्यप्रकाशाचा खेश दाखवता येईल.
एक ना दोन, अशा अनेक प्रकारच्या 'डिझाइन आयडियां'चा खजिनाच या पुस्तकात आहे. या गोष्टींचा फक्त उल्लेख नसून त्यांच्या अंमलबजावणीसाठी नेमके काय करायला हवे, कुणाशी संपर्क साधायला हवे इत्यादी सर्व आवश्यक माहिती परिशिष्ट म्हणून जोडलेली आहे. राष्ट्र व राज्य पातळीवरील शासकीय योजनांची यादी यात आहे. कबीर वाजपेयींची 'बाला' ही संस्था याविषयी मदतीचा हात पुढे करत आहे.
एक माहितीपर उत्कृष्ट पुस्तक!
एका समृद्ध शाळेचा प्रवास
संकल्पना: कबीर वाजपेयी, अनुवाद: विनीता गनबोटे
मनोविकास प्रकाशन, पुणे (2011)
पृ.सं.: 96, मूल्य: 400 रु
पुस्तकाची किंमत?
<<<९६ पृष्ठे व ४० रु. अशी किंमत आहे की ९६० पृष्ठे व ४०० रु. किंमत आहे?>>>
९६ पृष्ठे व ४०० रु. अशीच आहे.
पुस्तकातील सर्व पानांची छपाई बहुरंगी (4 colur) केल्यामुळे व पानं A4 साइझ असल्यामुळे कदाचित किंमत जास्त ठेवली असेल.
मग नक्की संग्राह्य पुस्तक असावे
कारण प्रत्येक पानांतून दर्जा ओतलेला असणार.
तरी हे पुस्तक बहुदा २० ते ३० % सवलतीत मिळावे.
मी एक पुस्तकवेडा
http://pustakveda.blogspot.com/






शाळेचा प्रवास आवडला..... पण
पृ.सं.: 96, मूल्य: 400 रु
४०० रुपये जास्तच महाग वाटत आहेत पृष्ठसंख्येच्या मानाने
९६ पृष्ठे व ४० रु. अशी किंमत आहे की ९६० पृष्ठे व ४०० रु. किंमत आहे?
बाकी परिचय नेहमीप्रमाणेच सुंदर आहे व आवडला.
शाळेचा प्रवास हे तसेही एक आव्हानच असते लेखनाच्या दृष्टीकोनातून. वाचायला आवडेल हे पुस्तक
मी एक पुस्तकवेडा
http://pustakveda.blogspot.com/