||दिवाळी २०१०||

वैज्ञानिक व पुस्तकांचे जग!
प्रभाकर नानावटी

टीव्ही, केबल टीव्ही, वेब टीव्ही, व्हिडिओ, संगणक, इंटरनेट, सीडी-रॉम, मोबाइल फोन, या माहिती तंत्रज्ञानाच्या अद्ययावत साधनांच्या वापरांचा परमोच्च बिंदू गाठणार्‍या ह्या माहितीयुगात कुणीतरी 'अमुक अमुक पुस्तक वाचलंत का?' असा (बावळट!) प्रश्न विचारल्यास प्रश्न विचारणार्‍याला पहिल्यांदा मूर्खात काढतील. 'तुमच्या करिअरवर प्रभाव पाडलेल्या पुस्तकाचे नाव' असे विचारण्याचा प्रयत्न केल्यास प्रश्नकर्त्याला ताबडतोब कुठल्यातरी मनोरुग्णालयात पोचवण्याची तयारी करतील. पुस्तकं आपल्या सर्जनशीलतेवर, कार्यक्षमतेवर वा जीवनपद्धतीवर परिणाम करू शकतात यावर विश्वास ठेवणे जवळजवळ अशक्य आहे, असे आता बहुसंख्य शिक्षितांना वाटत आहे. कदाचित सामान्य लोकांचा पाठ्यपुस्तकाव्यतिरिक्त पुस्तकांशी संबंध येतही नसेल. परंतु विज्ञान-तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात आघाडीवरील संशोधकांना व प्रस्थापित वैज्ञानिकांना असे प्रश्न विचारल्यानंतर मिळालेले उत्तर ऐकल्यास आपल्याला नक्कीच आश्चर्याचा धक्का बसेल. असा एक प्रयत्न 'न्यू सायंटिस्ट' या इंग्रजीतील विज्ञानविषयक साप्ताहिकाच्या डेबोरा मॅकेंझी या स्तंभलेखिकेने केला असून तिने संग्रहित केलेली माहिती नक्कीच मनोरंजक ठरेल.

प्रकाशित होणार्‍या पुस्तकांची संख्या कमी होती म्हणून पूर्वीच्या काळातल्या अनेक वैज्ञानिकांवर पुस्तकांचा प्रभाव होता, हे मात्र नाकारता येणार नाही. रूढ कल्पनांना धक्का देणारे नवीन विचार; कल्पना, माहिती वा पूर्वानुभव यांचे दाखले मिळण्याचा मुख्य स्रोत ग्रंथालयातच असे. म्हणूनच अनेक वैज्ञानिक आपल्या शोधनिबंधपर ग्रंथात पुस्तकं उपलब्ध करून देणार्‍या ग्रंथपालाबद्दल कृतज्ञता व्यक्त करत होते; आवर्जून उल्लेख करत होते. आजकाल मात्र नेमके जे हवे ते, तत्परतेने, आवर्जून, कुठल्याही प्रकारच्या नियमावर बोट न ठेवता, त्रासिक चेहरा न करता (व झाकता!), आढेवेढे न घेता, संशोधकांना मदत करणार्‍या ग्रंथपालांचा वा त्यांच्या सहकार्‍याचा शोध हाही प्रगत संशोधनाचा विषय होऊ शकेल. माहिती विस्फोटापूर्वीच्या काळी समृद्ध वाचनालय व व्यक्तिगत ग्रंथसंग्रहालयातील पुस्तकं, विशिष्ट विषयाला वाहून घेतलेली नियतकालिकं, विशेषज्ञाबरोबर केलेले पत्रव्यवहार, वैज्ञानिकांचे वार्षिक - द्वैवार्षिक मेळावे, एकमेकांच्या भेटीगाठी, यातूनच नवीन माहिती, स्पष्टीकरण, संशोधनाची नवी दिशा मिळत होत्या. आता मात्र परिस्थिती झपाट्याने बदलत आहे. ढीगाने पुस्तकं प्रसिद्ध होतात. नव्या-जुन्या पुस्तकांची माहिती घरबसल्या काही तासांत (मिनिटांत!) वाचकापर्यंत पोचते. माहिती विस्फोट नव्हे तर माहितीच्या प्रचंड ओझ्याखाली दबून जाण्याचा हा काळ आहे, असे म्हटल्यास अतिशयोक्ती होणार नाही. या प्रचंड ढिगार्‍यामधून आपल्याला नेमकी हवी ती माहिती मिळवणे, त्याची सुसंगती लावणे, त्याचे विश्लेषण करणे व त्यातून निघालेले निष्कर्ष सादर करणे दिवसेंदिवस कठीण होत आहे. उद्दिष्ट साध्य करण्यासाठी वेळेची कमतरता, जीवघेणी स्पर्धा व सर्व मानवी संबंधाना व व्यवहारांना आर्थिक नफा-नुकसानीतच मोजण्याची मानसिकता इत्यादींमुळे पुस्तकांचे वाचन, मनन कालबाह्य ठरत चालले आहे की काय, असे वाटू लागले आहे.

प्रसिद्ध जीवशास्त्रज्ञ व डार्विनच्या उत्क्रांतीवादाचा खंदा पुरस्कर्ता रिचर्ड डॉकिन्सने डार्विनचे 'ऑन दि ओरिजिन ऑफ स्पीसीज' हे मूळ पुस्तक आयुष्याच्या बर्‍याच उशीरा वाचले, अशी कबुली दिली. टिम बर्नार्ड ली हा इंटरनेटवरील वर्ल्ड वाइड वेब (www) या संकल्पनेचा जनक. मुद्रणयंत्राचा शोध लावलेल्या गुटेनबर्गनंतर माहिती तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात याचा क्रमांक लागतो. त्याच्या मते आपल्यातील सर्जनशीलतेला कारणीभूत ठरणारे घटक पुस्तकासारख्या एकाच स्रोतातून मिळत नसून ते चहूबाजूने वेगवेगळ्या पद्धतींनी आपल्याकडे येत राहतात.

' मी विज्ञानाकडे माझ्या अनुभवातून वळलो. कुठलेही पुस्तक वाचून नाही.', हे १९७५ साली इंद्रियविज्ञानशास्त्रात नोबेल पारितोषक मिळवणार्‍या डेव्हिड बाल्टिमोरचे विधान आहे. 'माँट्रिअल न्युरॉलॉजिकल इन्स्टिट्यूट'ची ब्रेंडा मिलनर बाल्टिमोरच्या मताशी सहमत आहे. " मी बर्‍यापैकी वाचन करणार्‍यापैकी एक आहे, परंतु पुस्तकाचा प्रभाव आपल्या जीवनावर पडू शकतो यावर माझा विश्वास नाही. परंतु आपल्या संपर्कात आलेली माणसं व अनुभव भरपूर काही शिकवू शकतात", असा तिचा प्रांजळ अभिप्राय आहे. मार्टिन रीस या ब्रिटनमधील 'रॉयल सोसायटी ऑफ ऍस्ट्रॉनॉमी'च्या वैज्ञानिकाला पुस्तकांची गरज कधीच भासली नाही.

याउलट त्यांच्या जीवनात पुस्तकांचे योगदान बहुमोलाचे आहे असे काही वैज्ञानिकांचे स्पष्ट मत आहे. त्यांच्या क्षेत्रातील महत्त्वाच्या ग्रंथाव्यतिरिक्त इतर पुस्तकांनासुद्धा त्यांच्या जीवनात महत्त्वाचे स्थान आहे, असा ते आवर्जून उल्लेख करतात. स्टीव्ह जोन्स हा डार्विनच्या 'ऑन दि ओरिजिन ऑफ स्पीसीज' या पुस्तकाचे पुनर्लेखन केलेल्या 'आल्मोस्ट लाइक ए व्हेल' ह्या सुप्रसिद्ध ग्रंथाचा लेखक. त्याच्या मते सामान्य वाटणारे पुस्तकसुद्धा जीवनाला कलाटणी देऊ शकते. 'ग्रेट नॉर्दर्न?' या लहानमुलांसाठी लिहिलेल्या ऑर्थर रॅन्सम या पक्षीनिरीक्षकाच्या पुस्तकाचा त्याच्यावर फार मोठा प्रभाव आहे. 'वर्ल्ड वॉच इन्स्टिट्यूट'चे लेस्टर ब्राउन वयाच्या आठव्या वर्षी 'स्विस फॅमिली रॉबिन्सन' हे पुस्तक वाचून प्रभावित झाले होते. आज ते कृषिक्षेत्राच्या मर्यादा या विषयाचा अभ्यास करत आहेत. इंग्रजी भाषेचा अभ्यास करण्याची तीव्र इच्छा असलेल्या ऍन मॅक्लरिन या ऑक्सफर्ड विद्यापीठातील जीवविकासशास्त्रज्ञाला इंग्रजी भाषेच्या अभ्यासाविषयीची माहितीपुस्तिका वाचल्यानंतर भाषाशास्त्र जमणार नाही, असे वाटले. तुलनेने जीवशास्त्र हा अगदी सोपा विषय वाटला. ती पुस्तिकाच तिच्या संशोधनजीवनाला कलाटणी(!) देऊ शकली.

अनेक जण लहानपणी फार चित्रविचित्र पुस्तकं वाचतात. गिया या पर्यावरणविषयक संकल्पनेचे जनक जेम्स लव्हलॉक हे वयाच्या आठव्या वर्षी सेंद्रिय रसायनशास्त्राची पाठ्यपुस्तकं वाचत असत. त्यांना ती पुस्तकं कवितेच्या पुस्तकासारखी वाटत. जोसेफ रॉटब्लॉट या नोबेल पारितोषिक विजेत्या भौतिकशास्त्रज्ञाला लहानपणी ज्यूल व्हर्नच्या वैज्ञानिक कादंबर्‍या आवडत होत्या. जिनिव्हा येथील CERN या आण्विकसंशोधकविषयक संस्थेचे प्रमुख लुसियानी मयानी यांना लहानपणापासून क्वांटम मेकॅनिक्स, ब्लॅक बॉडी रेडिएशन यासारख्या भौतिकशास्त्रातील अत्यंत जटील समजल्या जाणार्‍या संकल्पनांवरील पुस्तकं वाचण्याचा नाद होता. फ्रीमन डायसन या गणितज्ञाला त्याच्या तेराव्या वर्षी निबंधस्पर्धेतील पारितोषिक म्हणून ई. टी. बेलचे 'मेन ऑफ मॅथेमॅटिक्स' हे पुस्तक मिळाले होते. हे पुस्तक वाचल्यानंतर डायसन गणित विषयाच्या प्रेमात पडला. ६०-६५ वर्षांनंतर अजूनही हे पुस्तक फार मोलाचे आहे असे ते मानतात.

बालपण हा स्वप्नरंजनाचा काळ असतो म्हणून या प्रकारच्या अभिप्रायाकडे कदाचित दुर्लक्ष करावेसे वाटेल, परंतु काही वैज्ञानिकांनी आपल्या तारुण्यावस्थेत वाचलेली पुस्तकं जीवनाला वेगळी दिशा देऊन गेली, अशी कबुली दिली आहे. आयुष्याचे रूळ बदलण्यास वयाचे बंधन नसते हेच यावरून जाणवते. 'इंपिरियल कॅन्सर रिसर्च फंड' या संस्थेचे निवृत्त निर्देशक वॉल्टर बॉड्नर हे मुळात संख्याशास्त्राचे विद्यार्थी होते. परंतु आर. ए. फिशर यांचे 'जनरल थिअरी ऑफ नॅचरल सिलेक्शन' हे पुस्तक वाचल्यानंतर त्यांनी आपल्या संशोधनाचा विषयच बदलून टाकला. ब्रिटिश शासनाचे मुख्य वैज्ञानिक सल्लागार रॉबर्ट मे हे मुळात भौतिकशास्त्रज्ञ होते. १९७०च्या सुमारास पर्यावरणविषयक अभ्यासास त्यांनी सुरुवात केली. पर्यावरणशास्त्रातील काही संकल्पनांची गणिताच्या सूत्ररूपात त्यांनी मांडणी केली आहे, म्हणून त्यांना आता पर्यावरणविषयक विशेषज्ञ म्हणून मान्यता मिळाली आहे. नॉर्मन म्येर हे निसर्गविषयक छायाचित्रकार होते. आल्डो लिओपाल्ड या लेखकाचे 'सँड कौंटी अल्मनॅक' हे पुस्तक वाचल्यानंतर वयाच्या ३५व्या वर्षी त्यांनी पर्यावरण या विषयात संशोधन केले व आज ते पर्यावरणविषयक अर्थशास्त्रज्ञ म्हणून ओळखले जातात.

काही वैज्ञानिकांचं आयुष्य पुस्तकं वाचून बदललं नसेलही, परंतु अवांतर वाचनाने काही वैज्ञानिक आपापल्या क्षेत्रात जास्त प्रगती साधू शकले हेही तितकेच खरं. रिचर्ड पेटो हे रोगपरिस्थितीविज्ञान विषयाचे अभ्यासक आहेत. ज्युलिया वॉल्श व केन वारेन यांनी लिहिलेले 'गुड हेल्थ ऍट लो कॉस्ट' हे पुस्तक वाचून रोगनियंत्रणावरील संशोधनासाठीच त्यांनी आपले जीवन वाहून घेतले. जगभर प्रवास करत या विषयावर ठिकठिकाणी ते भाषणं देत असतात. एखाद्या बहुमूल्य अलंकारांप्रमाणे या पुस्तकातील आकृत्यांची व नकाशांची ते जपणूक करतात. जॅरेड डायमंड हे पर्यावरणशास्त्रज्ञ, इंद्रियविज्ञानशास्त्रज्ञ व विज्ञानविषयक लेखक आहेत. हेन्री डेव्हिड थोरो या लेखकाचे 'वाल्डेन' हे पुस्तक वाचून ते प्रभावित झाले. 'माझे उद्दिष्ट समाजाला पटो वा न पटो, मी मात्र वाल्डेनच्या मार्गानेच जाणार आहे', हा त्यांचा दृढसंकल्प आहे. जॉन कास्टी हे भविष्यवेध घेणारे 'सँटा फे इन्स्टिट्यूट'मधील प्रख्यात वैज्ञानिक आहेत. डग्लस हॉफ्स्टॅडर या लेखकाचे 'गोडेल, आयशर, बाख' हे पुस्तक वाचून प्रभावित झालेल्यांपैकी ते आहेत. या पुस्तकाच्या अभ्यासानंतर कृत्रिम बुद्धिमत्ता व मेंदू यांच्या विश्लेषणावर ते संशोधन करू लागले. यासाठी त्यांनी हे पुस्तक शेकडो वेळा वाचून काढले आहे. वातावरणीय रसायनशास्त्राचा अभ्यास करणार्‍या सुझन सॉलोमनला पीटर मेडावार या जनुकशास्त्रज्ञाचे 'ऍड्व्हाइस टू यंग सायंटिस्ट' हे पुस्तक अतिशय आवडलेले दिसते. संशोधन कसे व का करावे यासाठी हे पुस्तक वस्तुपाठ आहे, असे या पुस्तकाबद्दलचे तिचे प्रांजळ मत आहे.

वरील विवेचनावरून वैज्ञानिकांच्या संशोधनकार्यात प्रत्यक्ष वा अप्रत्यक्षपणे पुस्तकं प्रभाव पाडू शकतात, यात शंका नाही. अनेक वैज्ञानिकांनी पुस्तकाच्या संदर्भातील प्रश्नांचा गंभीरपणे विचार करून उत्तर देण्याचा प्रयत्न केला आहे. क्रिक्, वॅट्सन, स्टीफन हॉकिंगसारख्या काही वैज्ञानिकांना असल्या प्रश्नांची दखल घ्यावीशी वाटली नसेल, किंवा ते सर्व आपापल्या संशोधनकार्यात मग्न असल्यामुळे कदाचित प्रतिक्रिया कळवली नसेल. संगणकक्षेत्रातील सर्वेसर्वा बिल गेट्स यांना हे प्रश्न विचारल्यानंतर त्यांच्या ऑफिसमधून सॅलिंगर या लेखकाचे 'दि कॅचर इन दि राय' व अर्नेस्ट हेमिंग्वे यांचे गाजलेले पुस्तक 'ओल्ड मॅन अँड द सी' ही दोन नावं आली. हीच पुस्तकं का आवडली हे मात्र कार्यालयातील लोकांना सांगता आले नाही.

या पुढील पिढ्यातील संशोधकांना काय आवडेल किंवा काय आवडणार नाही याचा अंदाज घेणे शक्य नसेल. मात्र गरज पडल्यास पुस्तकांचा संग्रह आपल्याजवळ असणे अत्यंत आवश्यक आहे, हे मात्र नक्की. कदाचित बिल गेट्स, रिचर्ड डॉकिन्स, स्टीफन हॉकिंग यांच्यापेक्षा जास्त बुद्धिमान असलेले व या जगाचा चेहरा मोहरा बदलू शकणारे या पृथ्वीतलावर कुठे ना कुठे तरी वाढत असतील व त्यांच्यांसाठी ही पुस्तकं लागतील!

अनुक्रमणिका

अनुभव

कवितासंग्रहाचे परिचय

लेखकांचे परिचय

मुलाखत

पुस्तक परिचय

प्रतिक्रियां

हीही

हीही माहिती गंमतीदार! आवडली.
अशा स्वरूपाच्या माहितीच्या लेखांची मालिका सुरू करा आता पुविवर.

लेख आवडला.

लेख आवडला.

रोचक

लेख माहितीपूर्ण आहे आणि रंजकही. कॅचर इन द राय हे बिल गेट्सच्या आवडीच्या पुस्तकात बघून प्रचंड धक्का बसला. जवळपास सर्वच अत्यंत यशस्वी लोक डार्क साहित्याकडे टोकाच्या तिरस्काराने बघतात. डॉकिन्सने एव्होल्युशन इतक्या उशीरा वाचला असेल हे वाचून पण खूपच आश्चर्य वाटले. डॉकिन्सने संपादित केलेले 'The Oxford Book Of Modern Science Writing' (http://www.flipkart.com/oxford-book-modern-science-writing-book-0199216819) हे पुस्तक नक्कीच वाचनीय आहे. विविध क्षेत्रातील संशोधकांची भुमिका व त्यांनी वाचलेली पुस्तके वगैरेंचे बरेच संदर्भ मिळतील.

ह्या लेखात थोडे संदर्भ (लिंक, पुस्तकांची नावे वगैरे) तसेच सुची वगैरे दिली पाहिजे होती असे वाटून गेले. ज्यांना ह्याबाबत अधिक वाचायचे असेल ते हे संदर्भ घेउन पुढे जाउ शकतात.

छान ...

लेख आवडला. डॉकिन्सबद्दल गंमत वाटली. बिल गेट्सला ओल्ड मॅन अँड द सी सारखें खिळवून ठेवणारें पुस्तक आवडलें हें वाचून बरें वाटलें.

जगांत सर्वांत जास्त विकल्या जाणार्‍या पुस्तकाचा - बायबलचा - बर्‍याच थोरांवर परिणाम झाला असेलच. आपल्या रामायण, महाभारत, भगवद्गीता इ. ग्रंथांचा अनेक भारतीय विद्वानांवर अर्थात चांगलाच प्रभाव पडलेला आहेच.

सुधीर कांदळकर

सुधीर कांदळकर

प्रतिसाद

लेख रोचक वाटला. या लेखात संग्राहित झालेली माहिती एकत्रित स्वरूपात उपलब्ध आहे ?

प्रतिसाद द्या

प्रतिक्रिया प्रकाशित करण्यासाठी येण्याची नोंद करा अथवा सदस्य व्हा.