||दिवाळी २०१०||

वेगळ्या वाटेवरची लेखिका - कविता महाजन
मस्त कलंदर

 कविता महाजन. 'ब्र' या पहिल्याच कादंबरीमुळे एकदम प्रकाशझोतात आलेलं नाव. पुढे 'भिन्न' आली. मराठी पुस्तकांच्या विश्वातील एक वेगळा प्रयोग म्हणून तिच्याकडे पाहिलं गेलं. दोन वेगळीच विश्वं - जी वास्तवात अस्तित्वात होती, पण मराठी वाचकाच्या जीवनवर्तुळाच्या परिघावर किंवा त्याबाहेर असावीत - ती एकदम सामाजिक घुसळणीच्या मध्यभागी आली. जगण्याचे अनुभव ललित पण वास्तववादी लेखनाच्या स्वरूपात मांडत नेण्याचा हा प्रवास समृद्ध करणारा आणि पुढच्या सृजनासाठी अस्वस्थही करणारा. कसा आहे हा प्रवास? कशी आहेत त्यातील वळणं आणि चढउतार?  या प्रवासासाठी लागणारी शक्ती कशी मिळते?  समंजस वाचकांच्या मनांत - मग त्यात कविता महाजनांचे चाहतेही आले आणि टीकाकारही आले - कायमच वास्तव्य करून असणारे हे प्रश्न. याच प्रश्नांचा धांडोळा घेण्यासाठी 'पुस्तकविश्व'च्या दिवाळी अंकासाठी त्यांची मुलाखत घ्यायची ठरवलं खरं, पण या उपक्रमाला मुलाखतीचं स्वरूप येणार नाही हे आधीच जाणवलं होतं. प्रत्यक्ष गप्पा-चर्चेमध्ये तेच झालं. लेखनाची प्रक्रिया, जगण्यातील अनुभवांची त्यात होणारी गुंफण, आसपासच्या प्रश्नांची मांडणी आणि त्यावर तोडगे शोधताना असणारी सृजनशील क्रियांची भूमिका किंवा स्थान असे एकेक मुद्दे खुलत गेले. ९० मिनिटांहून थोडा अधिक काळ चाललेल्या या चर्चेतून कविता महाजन उलगडल्या; कादंबरीकार-लेखक कविता महाजन उलगडल्या; सामाजिक प्रश्नांकडे जाणत्या नजरेनं पाहणार्‍या कार्यकर्त्याही उलगडत गेल्या.

कादंबरी किंवा तत्सम कृती, त्याला मिळणारा प्रतिसाद आणि त्यातून होणारी आपली जडणघडण याविषयी बोलताना कविता महाजनांनी आरंभीच सांगून टाकलं की 'ब्र'ला सहा महिन्यांनी भरपूर प्रतिसाद मिळायला सुरूवात झाली आणि त्यांचं वैयक्तिक विश्वही बदलून गेलं. मोठ्या वाचकवर्गापर्यंत पोचल्याचा अनुभव आल्याचं त्या आवर्जून सांगत गेल्या. मग विषय आपसूक 'ब्र'ला धरून झालेल्या वादाकडंही वळलाच. सुरूवातीला हिला कादंबरी म्हणायचे की नाही, इथूनच वाद सुरू झाले. माझा मुद्दा असा होता की आपल्याकडे वेगवेगळ्या रूपात कादंबर्‍या येतात. पत्ररूपात, इमेलरूपात. डायरीरूपात, कवितारूपात कादंबर्‍यार आहेत. म्हणजे अनेक फॉर्म्स वापरले गेले आहेत. तर माझा मुद्दा असा होता की ही रिपोर्ताजचे स्वरूप असलेली कादंबरी आहे. काही ठिकाणी प्रसंगातली नावे वगैरे बदललेली असू शकतात, पण बाकीचे सगळे खरेखुरे असते. त्यामुळे त्याला एक अधिकृतपणा येतो. त्यामुळे ते खरे आहे, वास्तव आहे, अनुभवातून लिहिलेले आहे असे त्याच्या बाबतीत म्हटले जाते”, कविता सांगत असतात.

व्यक्तिरेखाटनाची प्रक्रिया मात्र सरळ नसतेच नसते. तीही एक गुंतागुंत असते. पुस्तकातील व्यक्तिरेखा प्रत्यक्षात शोधण्याचा एक प्रयत्न वाचक करत असतोच. त्याविषयी त्यांना काय वाटतं? त्या सांगतात,इथे गंमत अशी होती की हे सगळे जे काही लेखन आहे, ते अनुभव माझे स्वत:चे होते. काही माझ्यासोबतच्या कार्यकर्त्यांचे होते. त्या वेगवेगळ्या लोकांचे अनुभव तिथे मिसळलेले होते. मला वाचकांची पत्रे किंवा फोन यायचे की आम्हाला त्या डॉ. दयाळांचा पत्ता सांगा. त्यावेळेस मला त्यांना सांगावे लागे की हे दयाळांचे पात्र मी किमान बारा लोकांवरून घेतलेले आहे. त्यात फक्त पुरूषच नाहीत तर बायकादेखील आहेत. म्हणजे ती एक वृत्ती असते. त्या वृत्तीवरून ती जी काही आहेत ती पात्रे बनत जातात. वडगाव नावांची गावे कितीतरी आहेत. ब्रमधलं वडगाव तुम्हांला कुठेच सापडणार नाही; अथवा ते सगळीकडेच दिसेल. हा जो भाग आहे की सगळी सरमिसळ, यांना एकत्रित ठेवून नवीन रूप बनवून देणं, हे जे कादंबरीकार करतो तेच इथे केले आहे. फक्त यासाठी रिपोर्ताजचा फॉर्म वापरल्याने लोकांना ते सगळे इतके खरे, जिवंत वाटलं आहे. लोक त्याला रिपोर्ताज म्हणतात किंवा तुमचे आत्मचरित्र आहे का म्हणतात, ही मला पोचपावती वाटते. कारण लोकांना ते तितके वास्तववादी, रिऍलिस्टिक वाटते आहे. त्यामुळे त्या संघर्षात मी फारशी पडले नाही. समीक्षकांनी त्यावर भरपूर टीका केली. त्यानंतर मात्र महत्त्वाचे असे बारा पुरस्कार ब्रला मिळाले. त्यानंतर अमाप वाचकप्रियता मिळाली आणि नंतर हे टीकेचे मुद्दे अक्षरश: अगदी वाहून गेले.

ब्रआणि भिन्नयांच्यावरील प्रतिसादांत एक वेगळेपण आहे. ते सांगताना कविता महाजन म्हणाल्या, “‘भिन्नच्या बाबतीत सुरूवातीचा काही काळ खूप टीकेत गेला. कारण ब्रच्या इंप्रेशनने लोक भिन्नकडे वळले होते. ब्रची भाषा वेगळी. मूस वेगळी. भिन्नची गरजच पूर्णपणे वेगळी होती. त्यामुळे भिन्नमधली भाषा आणि ब्रमधली भाषा अगदी वेगळी आहे. दोन्ही पुस्तके दोन हातांनी लिहिली असावीत इतके त्यात कॉण्ट्रास्ट आहे. साम्यस्थळेही आहेत, परंतु भाषेच्या बाबतीत म्हणा किंवा इतरही बाबतीत म्हणा, फरक आहेच. विषयच एड्स असल्याने त्यात सेक्स-बेस्ड वर्णने आली, त्यामुळे ते वादग्रस्त ठरले. पंढरपूरच्या रेड लाईट एरियाच्या उल्लेखामुळे सुरूवातीला बरीचशी वादळं उठली. म्हणजे लोकांना धक्का बसला. त्यांना वाटायचे की हे आहे पण हे आमच्या दारापर्यंत नाही. आणि नंतर असाही सूर होता की हे आहे, परंतु मग हे लिहिलेच पाहिजे का? मग लिहिले तर ठीक आहे पण मग ते याच भाषेत लिहिले पाहिजे का? हे दोन मुद्दे भिन्नच्या बाबतीत खूप मोठ्या प्रमाणात आले. आणि पुरूष लेखकांनी त्यातल्या काही गोष्टी यापूर्वी लिहिल्या होत्या (उदा. पुरूषवेश्या). परंतु ते गंमतीने, चवीने, बघा बायकापण काय मजा करतात; या टोनमध्ये होतं. पण एखादी बाई जेव्हा असा पुरूष वापरते तेव्हा तिच्या काय घालमेली असतात, तिच्या काय गरजा असतात, तिची मानसिकता काय असू शकते हे बाईच्या ऍंगलने कुणी लिहिले नाहीय. आणि मग ते अनेकांना धक्कादायक वाटले. म्हणजे काही गोष्टी धडधडीतपणे समोर असतात, त्याकडे पूर्णपणे पाहण्याची तुमची हिंमत नसते. किंवा बघितल्या तरी त्या इतरांपुरत्या आहेत, त्यांचा आमच्याशी काही संबंध नाही, अशी भूमिका असते. हे जे काय प्रकार आहेत त्यामुळे लोकांच्या अनेक समजांना धक्के बसत गेले. त्यामुळे भिन्नचाही सुरूवातीचा काळ खूप टीकेचा गेला. ब्रमुळे तयार झालेल्या प्रतिमेला त्याने तडा गेला होता. पण नंतर जे ब्रच्या बाबतीत झाले, तेच भिन्नच्या बाबतीत झाले. चार-सहा महिन्यांत चित्र बदलले. त्यालाही पुरस्कार मिळाले, त्या पुरस्कारांच्या निमित्ताने पुन्हा एकदा प्रतिसाद लाभले. मला भिन्नचे पुरस्कार जास्त महत्त्वाचे वाटतात, कारण भिन्नवर चांगली समीक्षा झाली. भिन्नला पुरस्कार देणारी जी समिती होती, त्यांनी चांगली समीक्षा केली.

ब्रआणि भिन्न’! दोन्हींची मूस वेगळी, जातकुळी वेगळी. स्वाभाविकच वाचकाला येणारे अनुभवही भिन्न. लिहितानाचे काय? त्यातही दृष्टिकोनांची भिन्नता असणारच. त्या म्हणतात: या दोन्ही कादंबर्‍यांमध्ये मी वेगळे विश्व मांडले. ही दोन्ही भिन्न स्वरूपाची विश्वं लोकांच्या सरसकट जवळपास होतीच असे नाही. अनुभवांच्या कक्षेत होतीच असे नाही. आदिवासी माहीत असतात किंवा रेडलाईट एरियाज माहीत असतात. कधीतरी तिकडून गेलेलो असतो; पण प्रत्यक्षात तिथे काय चालते, तिथे ती माणसं कशी येतात, त्यांचे काय व्यवहार चालतात, त्यांच्या अडचणी काय असतात, किंवा त्यांच्या आनंदाच्या जागा काय असतात; ही जी काही सुखदु:खे असतील, त्या जगातल्या काय घडामोडी असतील, त्या सगळ्या समोर येणं आणि तेही एका बाईच्या नजरेतून समोर येणं असे यात अनेक भाग आहेत. समाजात एक प्रकारचा विरोधाभास आहे किंवा दुटप्पीपणा आहे.  समाज नावाची एकच गोष्ट नाहीय किंवा संस्कृती नावाची एकच गोष्ट नाही. जेव्हा आपण कुठल्याही वर्तुळाच्या आत शिरतो, तेव्हा त्याच्यात आत असंख्य कप्पे पडलेले आपल्याला दिसतात. मग ते आर्थिक, सामाजिक, धार्मिक, लिंगभेद अशा कुठल्याही मुद्यांवर आधारित असू शकतात. दोन्ही कादंबर्‍यांततून ती अशी वेगळी जगं मांडलेली होती.

लेखन परिपक्व असावे की थोडेसं ओबडधोबड? कधी कधी ते ओबडधोबड लेखन वाचकांना आवडतं तर कधी प्रगल्भ, मुरलेल्या लेखनाला वाचकांची पसंती असते. पण कविता महाजनांच्या लेखी हे दोन्ही प्रकार आपापल्या ठिकाणी श्रेष्ठ. खुद्द त्यांचा स्वतःचाच दोन्ही कादंबऱ्यांच्या संदर्भातील अनुभव तोच आहे. ब्रलिहिताना आपण कादंबरी लिहितो आहे हेच आपल्याला ठाऊक नव्हते, हे त्या सांगतात आणि पुढे पुस्तीही जोडतात की भिन्नच्या वेळी मात्र मी कादंबरीच लिहित होते. त्या म्हणतात,एखादी गोष्ट जी आपण वास्तवात करू शकत नाही ती स्वप्नात करतो. पण स्वप्नातल्या वागण्यातही मर्यादा असतात आणि त्या मर्यादेपलीकडे काही घडण्याआधी आपण जागे होतो. ही जी आपल्या अंतर्मनात दडपणे असतात, सेन्सॉरशिप्स असतात, त्या असतातच. आणि एखाद्या विशिष्ट वयामध्ये, जोपर्यंत त्या विशिष्ट अशा सेन्सॉरशिपची सुरूवातच झालेली नसते, तेव्हा ते सगळे अस्सल, स्वतंत्र असते. नारायण सुर्व्यांची कविता वेगळी राहिली कारण त्यांनी शिक्षणच घेतले नव्हते. त्यामुळे शिक्षणात जी काही दहा-पंधरा वर्षांत विचार तयार होण्याची प्रक्रिया होते ती त्यांच्याबाबतीत झाली नाही. इतर लेखकांचे जे काही लिखाण आपण वाचतो, त्यातूनही संस्कार होतात. हे सगळे संस्कार त्यांच्यावर झालेलेच नव्हते. त्यांच्यावर जे संस्कार होते ते सगळे शेरोशायरीचे, आजूबाजूच्या वातावरणाचे, चळवळीच्या गाण्यांचे संस्कार होते. त्याच्यामुळे सुर्वेंची कविता एकदम वेगळी बनून गेली. तर हा जो भाग आहे की लेखक किती रॉ आहे, तो इथे महत्त्वाचा ठरतो. माझ्याच बाबतीत बोलायचे झाले तर मलाच स्वत:ला ब्रच्या वेळी माहीत नव्हते की मी कादंबरी लिहितेय. मी सुरूवात केली आणि नंतर जाणवले की हे काहीतरी वेगळं आणि मोठं होतंय. मी दोनेकशे पानांनतर थांबले आणि माझे एक कादंबरीकार मित्र आहेत त्यांना ते दाखवले. आणि ते म्हणाले की ही कादंबरी आहे, आणि ती व्यवस्थित पूर्णपणे लिही. हा अनुभव पहिलटकरणीसारखा असतो. दुसर्‍या वेळेस नीट होत जातं. तसंच काहीसं माझ्याबाबतीत झालं. भिन्नच्या वेळी मला माहीत होते की मी कादंबरी लिहितेय. ब्रच्या वेळी मला हे काहीही माहीत नव्हते, त्यामुळे जे मनात आले ते सगळे मी उतरवत गेले. या लेखन रॉ असण्याचे फायदे आणि तोटे दोन्ही असतात. लेखकाच्या लेखन फिनिश्ड असणं, फाईन असणं; म्हणजे एखादे कोरीव काम आपण पाहतो तेव्हा ते ओबडधोबड असणं हे देखील एखाद्या शिल्पाचे वैशिष्ट्य असू शकते. आणि दुसर्‍या  एखाद्या संगमरवरी मूर्तीचा अगदी कण न् कण कोरून आखीवरेखीव असू शकतो. दोन्हीही शिल्पेच. त्यामुळे ते रॉ आहे की कोरीव आहे यावर तुम्ही त्याचे सौंदर्यमापन करूच शकत नाही. ते वाचकाच्या पसंतीवर अवलंबून आहे की त्यांना कशा प्रकारचे लेखन आवडेल.

कविता यांचे लेखन वास्तववादी म्हणता येईल असे. जगण्याच्या अनुभवांतून आलेले. या दोन्हींमध्ये किती फारकत असते? जगतानाच्या सर्वच गोष्टी लेखनात येत नाहीत, किंवा कधी कधी त्या वेगळ्या वेष्टनात मांडल्या जातात. या सर्वांचा लेखनाच्या श्रेणीशी, दर्जाशी काही संबंध असतो का? स्वाभाविकच येणारे हे प्रश्न. कविता म्हणतात,एखाद्या विशिष्ट वयात मनात प्रेमभावना जागृत होतात पण प्रत्येकाचा कुणी प्रियकर-प्रेयसी असेलच असे नाही. तेव्हा अनुभव नसताना लिहिले जाते. साहजिकच लेखनातल्या प्रतिमा उसन्या असतात, उगीच एक कृत्रिमपणा येतो. सुरूवातीच्या माझ्या कवितांच्या वरती सगळा उर्दूचा प्रभाव होता. आणि तो मराठवाड्यातल्या बहुतेक लोकांच्या लेखनावर असतो. तेव्हा त्या सगळ्या अतिशयोक्त प्रतिमा घेऊन गझल लिहून बघ, आणि काहीतरी लिहून बघ, असे उद्योग तेव्हा चालायचे; कारण लेखन हा तेव्हा एक गमतीचा भाग होता. त्यात शब्दांशी खेळणं एवढंच असायचं. आणि मग हळूहळू त्यातली गंमत लक्षात यायला लागली. शंकर वैद्यांशी माझी साधारण अकरावी-बारावीमध्ये भेट झाली. आम्ही कुठेतरी कडुनिंबाच्या झाडाखाली उभे होतो. ते हिवाळ्याचे दिवस होते. ते म्हणाले, “ते बघ कडुनिंबाचे झाड. पाने बघ कशी कातरलेली आहेत. हिवाळयात ना अशी धूळ असते पानांवर.आणि असेच बरेच काही. ते लागोपाठ अशी काही वर्णने सांगत गेले. त्याच्यातून त्या झाडांकडे, पानांकडे, ऋतुंकडे पाहण्याची एक वेगळी नजर खाडकन आल्यासारखे झाले. आणि मग मला जाणवले की हे जे सगळे आहे, ते आपण बघतच नाही. आपल्याला ते फक्त दिसते पण आपण ते बघत नाही. आणि ते बघत नाही म्हणून ते जगण्याचा भाग बनत नाही.  म्हणून ते आपल्या लिहिण्याचाही भाग बनत नाही. मग कुठेतरी  लोहाराचा हातोडा वाचलेला असतो आणि आपण म्हणतो की व्वा, काय मस्त प्रतिमा आहे.ही सूक्ष्म निरीक्षणं  जेव्हा आपल्या लक्षात येतात, तेव्हा त्या लेखनात फरक पडतो. मला खूप चांगली पुस्तके वाचायला मिळाली. खूप चांगले लोक ऐकायला किंवा संवाद साधायला मिळाले. त्यातूनही माझ्या लेखनात खूप चांगले बदल होत गेले.

पण असं असलं तरी, सगळंच लिहिलं जाऊ नये हे त्यांचं मत आहे. जगण्यातल्या प्रत्येक गोष्टीची कविता, लेख, कादंबरी होईलच असे नाही. कारण जगणं खूप मोठं आहे.  त्या सगळ्या कच्च्या मालाचे, त्या सामुग्रीचे एखाद्या कलाकृतीत रूपांतर होण्यासाठी त्याच्यात काहीतरी जोरकसपणा असावा लागतो. माझ्या मते, माणसानं जगावं. सगळ्याच गोष्टी लिहायच्या, सगळ्यातूनच कलाकृती निर्माण करावी असे म्हणून कुणी पाहायला लागले की त्या माणसाला जगता येणारच नाही. तुमची जी सुखदु:खे, भले-बुरे अनुभव जे काही असतील; त्यांना जितक्या संवेदनशीलतेने सामोरे जाल, तितकेच एक लेखक म्हणून त्या गोष्टी छान मांडाल. एक माणूस म्हणून तुमचं जगणं समृद्ध झाल्याशिवाय एक लेखक म्हणून तुमचे लेखन समृद्ध नाही होऊ शकणार. म्हणून सगळंच लिहू नये या मताची मी आहे.

स्वत: लेखक, वाचक, व्यवस्था किंवा व्यवस्थेतील यंत्रणा असे तीन कोन नेहमीच समोर येत असतात. वास्तविक अनुभवांतून लेखन, त्याला वाचकांचा प्रतिसाद, त्यातून व्यवस्था किंवा यंत्रणा यांचा प्रतिसाद अशी एक प्रक्रिया सुप्तपणे होत असते. या सूत्रात चौथा एक कोन सुप्तच राहत असतो बहुधा अनेकदा. तो चौथा कोन असतो प्रत्यक्ष बाधित घटकाचा. या चौथ्या कोनाला जीवनाच्या अनुभवातून साकारल्या जाणार्‍या कलेमार्फत खरंच काही लाभ होतो का? तो घटक त्यात तितका सहभागी असतो का? कविता महाजन लेखिका, त्याच जोडीने कार्यकर्त्याही. त्यांचा अनुभव काय सांगतो? “‘ब्रच्या वेळेस बाधित लोकांचा प्रश्न मला खूप सतावायचा. मी खूप फिरले, खूप लोकांना भेटले. त्या क्षेत्रात काम करणार्‍या अनेक कार्यकर्त्यांना भेटले. त्यात मी कुठे काय करतेय असा काही भाग नव्हता. परंतु भिन्नची सुरूवात मी लिहिली आणि मग मला एका टप्प्यावर कळले की तो सारा प्रवास एड्सकडे जाणारा आहे. मग मी मुद्दाममहून एड्स या विषयाचा अभ्यास केला. वैद्यकीय पुस्तके आणून वाचली. एका बाजूने टेबलवर्क आणि दुसर्‍या बाजूने फिल्डवर्क चालूच होते. फिल्डवर्क म्हणजे मी लोकांशी बोलले, त्यांची परिस्थिती पाहिली. पण ते कागदावर कधीच लिहिले नाही. तिथल्या तिथेही नाही आणि नंतर घरी येऊनही नाही.  मी तिथे त्या लोकांना भेटत होते, बोलत होते, त्यांचं काय जगणं आहे, काय अडचणी आहेत, संस्था काय कामं करत आहेत हे सगळं समजून घेत होते. आणि माझी पद्धत अशी आहे की काही अनुभव तुम्हांला येतात तर काही अनुभवांपर्यंत तुम्ही स्वत: जाता. आजच पाहिलेय आणि लगेच लिहिलेय असे करण्याला काही अर्थ नाही. जे पाहता ते तुम्ही तुमच्या विचारांमध्ये, तुमचे आजवरचे जे काही अनुभव असतात त्यांच्या बॉक्समध्ये मुरवत ठेवा. आणि जेव्हा लेखन करावेसे वाटेल तेव्हा आपसूक त्यातला एखादा अनुभव, एखादा विचार आपसूक वरती येईल. म्हणजे भिन्नच्या बाबतीत तर असे झाले आहे की मी फक्त दहा टक्के लिहिले. जे बघितले ते सगळेच लिहिले असते तर वाचकांनाही ते पेलवले नसते. जे लिहिले आहे तेवढेच पेलवत नाहीय. तिथे मला सतत जाणवायचे की काहीतरी आपल्याला लिहायचे आहे म्हणून लोकांशी बोलायला, त्यांना समजून घ्यायला मी इथे येतेय याची मला एक सतत टोचणी असायची आणि मग ती माझ्या परीने घालवायचा प्रयत्न केला.

हे झाले या चौथ्या कोनाच्या सहभागाचे. पण त्याच्या गार्‍हाण्याच्या निराकरणाचे काय?जी काही छोटी मोठी कामे करणे शक्य असेल, ते मी जिथे जिथे गेले, तिथे एक व्यक्ती म्हणून मी केलं. पण ते अर्थातच अपुरं होतं. लेखनाचे महत्त्व मला कुठल्या टप्प्यावरती लक्षात आले ते म्हणजे ब्रच्या बाबतीत अनेक लोकांनी मदतीचे हात पुढे केले. नंतर नंतर त्याचे प्रमाण खूप वाढले. म्हणजे अगदी आतासुद्धा गेल्याच महिन्यात मुंबईतल्या एका मोठ्या हॉस्पिटलला त्यांचे सगळे जुने फर्निचर काढून नवे घ्यायचे होते. त्यांच्या ट्रस्टींपैकी एक माझ्या पुस्तकांचे वाचक. म्हणजे काही विशेष ओळखही नव्हती. तर त्यांनी मला त्यांचे टीव्ही, संगणक, ट्रॉलीज, बेड्स अशांसारख्या वस्तू आम्हाला द्यायच्या आहेत, त्या कुठे द्याव्यात असे विचारले. मी त्यांना काही संस्था सुचवल्या. जिथे ती मुले जमिनीवर सतरंज्या घालून झोपत, तिथे त्यांना ट्रॉलीज आणि कपाटासह बेड मिळणं, हे भरपूरच मोठं होतं. असे कितीतरी अनुभव या पुस्तकांनंतर मला आले. व्यक्तिगत मदतीपासून म्हणजे अगदी माझ्याकडे किलोभर तूप साठलेलं आहे. ते मी त्या मुलांच्यासाठी देऊ का? अशा छोट्या मदतींपासून ते अंथरूणं-पांघरूणं, वस्तूरूपातली देणगी, मुलांसोबत वेळ घालवणं, त्यांना गोष्टी वाचून दाखवणं, हस्तकला शिकवणं असे प्रत्यक्ष कार्य, अशा अनेक पद्धतींनी लोकांनी प्रतिसाद दिला. प्रत्यक्ष कृतिशील होणं ही खूप पुढची वाट आहे. 

सगळ्यांनाच कृती करणं शक्य नाही. विचारांत बदल घडून येणं हेदेखील खूप महत्त्वाचे आहे आणि तितकेच अवघडही. पण या पुस्तकाने हा बदलही काही प्रमाणात साधलाय. त्याबद्दल त्या सांगतात,अनेक लोकांची अशीही मधली वाट तयार झाली की, मानसिकता बदलल्या. हे यश मला खूप मोठे वाटते. वाचक सांगतात, वेश्येकडे पाहताना आम्हांला घृणा वाटायची, त्या बायकांना काम करता येत नाही का? त्या कशाला असले काम करतात? इतर लोकांसारखे मजुरी , घरकाम न करता त्या हाच धंदा का करतात, असे प्रश्न असायचे. हिजड्याकडे पाहतानाही तेच व्हायचे. घृणा वाटायची आणि वर भीतीपण वाटायची. आता त्याबद्दलचे त्यांचे विचार बदलल्याचे वाचकांनी आवर्जून सांगितले. त्या कोण आहेत, काय आहेत, का तिथे आलेल्या आहेत, कशा आणल्या गेल्या आहेत, कशा जगत आहेत, हे सगळे बघितल्यानंतर आमचा दृष्टिकोन बदलला. हे  एखाद्या पोलिस अधिकार्‍यापासून ते गृहिणी, सरकारी नोकर किंवा अगदी जेलमध्ये काम करणारी मंडळी - की ज्यांची मी वाचक म्हणून कधी कल्पनाही केली नव्हती - अशा अनेक क्षेत्रांमधली मंडळी मला भेटली. त्यांनी सांगितले की अशा प्रश्नांकडे पाहण्याची, निदान आमची नजर बदलली. आधी अशा स्त्रिया दिसल्या की आम्ही रस्ता बदलून जायचो. किंवा एखादा हिजडा आत येऊन बाकावर बसला की किळस वाटायची. पण आता 'तोही माणूसच आहे. जसे आपल्याला बसावंसं वाटतं तसे त्यालाही वाटत असेल आणि त्याला तो हक्क आहे' असं आता लक्षात येतं.

मानसिकतेतील हे बदल सामाजिक संदर्भात झाले. वैयक्तिक स्तरावरही असे बदल होतातच होतात. वाचक बोलत जातात. सांगतात, की आम्ही आमच्या डिप्रेशनमधून बाहेर आलोत. अगदी आत्महत्येचा विचार मनी आला होता पण आता तसे वाटत नाही.’ ‘मला चांगले जगायचेय.वगैरे. म्हणजे हे अनुभव फक्त एड्स झालेल्यांचेच नाहीत, तर इतरही स्तरांतले असे अनुभव आहेत. विशेषत: बायकांचे. अशांकडे एक जो सकारात्मक दृष्टिकोन आहे की अनेक घटनांमधून, वाईट परिस्थितीला सामोरं जाऊनसुद्धा माणसं कशी नेटानं, चिकाटीने उभी राहतात; जगतात; त्याच्यातून बाहेर पडतात आणि पुन्हा एक वेगळं आयुष्य जगू शकतात. याची जी सगळी चित्रं पुस्तकांमध्ये आली आहेत; त्या चित्रांचा, त्या फिलॉसॉफीचा खूप लोकांना चांगला उपयोग झाला आहे. मी ग्राफिटी वॉलमध्ये शेतकर्‍यांच्या आत्महत्यांविषयी एक लेख लिहिला होता. त्याच्यातल्या एका छोट्या मुलाचे मनोगत मी तिथे लिहिले होते. पोलिस अधिकारी बनायचे असे त्याचे मोठेपणीचे स्वप्न होते. आज तो मामासोबत पेप्सी वगैरे किरकोळ वस्तू विकायला जातो. उद्या तो त्याच्यासोबत चोर्‍यामार्‍या करायला लागेल आणि नंतर कधीतरी त्याची शाळा सुटून तो एक अट्टल चोर बनेल. तेव्हा पोलिसांचा मार खाताना त्याला आठवणारदेखील नाही की कधी काळी त्याचेही पोलिस बनण्याचे स्वप्न होते. त्यानंतर ते वाचून एका पोलिस अधिकार्‍याने त्याची सगळी जबाबदारी उचलली. त्याच्या आईला त्याने काहीतरी काम मिळवून दिले आणि त्या मुलाच्या शिक्षणाचा सगळा खर्च आणि जबाबदारी त्या अधिकार्‍याने उचलली. हे एक झाले असेल, पण निदान एकतरी झालं. लेखन म्हणजे काही जादूची कांडी नाही की सगळी दुनिया एकदम छान बदलून जाईल. असे जर असते तर लोकांनी छान छान लिहिलेच असते. हा कृतिशील प्रतिसाद महत्त्वाचा आहे. अनेक चांगल्या संस्थांना अर्थसहाय्य देणं, वेळ देणं इथपासून ते व्यक्तिगत पातळीवर तुम्हांला ज्या ज्या गोष्टी करता येणं शक्य आहे त्या त्या करणं हेच खरं. आपण आपापल्या आयुष्यातसुद्धा आपल्यापुरतं का होईना, कृतिशील बनणं किंवा निर्णयक्षम बनणं हेही आहेच. अनेक बायकांनी यातून सकारात्मक गोष्टी घेतल्या. ती बाई करू शकते तर मी का नाही करू शकत? स्वनिर्णयसिद्ध होणं, हेही खूप जणींच्या बाबतीत झाले."

चौथ्या कोनाच्या संदर्भात व्यवस्था किंवा यंत्रणेचा प्रतिसाद काय असतो? या प्रश्नावर कविता म्हणाल्या,काही फारसा नाही. एक अनुभव मात्र असा होता की विधानसभेमध्ये एका प्रश्नावरती काहीतरी चर्चा चालली होती. आणि त्यावेळेस दोन-तीन आमदारांनी ब्रमधल्या महिला सरपंचांच्या ज्या केसेस होत्या, त्यांचा संदर्भ घेऊन काही प्रश्नांची मांडणी केली. कादंबरीतल्या सरपंचाच्या केसची अशी अशी अडचण होती, आणि या बाईच्या बाबतीतसुद्धा असेच होऊ शकते अशा अर्थाचे ते काहीसे होते. तो अगदी तांत्रिक मुद्दा होता. हे कादंबरीत झालेले आहे, ते इथेही होऊ शकतं आणि त्याच्यामुळे हे बदलले जावे असे त्यांचे म्हणणे होते. प्रत्येकवेळी असे होईलच असे नाही, पण तीही एक  शक्यता आहे. त्यामुळे एका महिन्याच्या आत त्याचे निकाल लावले जावेत. आणि मग त्याचा तसा जी. आर. निघाला. म्हणजे मुळात त्या राजकारणी लोकांनी हे पुस्तक वाचलेले असणं, नेमक्या वेळी नेमके संदर्भ आठवणं आणि त्यांनी तो मुद्दा तिथे मांडणं, ही सुरूवात समजायला हरकत नाही. हा छोटासा निर्णय असेल; परंतु एक निर्णय, तो राजकीय-सरकारी पातळीवरती त्या एका कादंबरीच्या निमित्ताने बदलला गेला; हेही नसे थोडके.

कविता महाजन हे नाव आता प्रस्थापितांमध्ये मोडते. कादंबरीच्या आधी त्यांचा कवयित्री म्हणून काव्याच्या वर्तुळात परिचय होताच. प्रस्थापित होण्याकडचा हा प्रवास नेहमीच्याच अनुभवांतून गेला आहे, हे सांगताना त्या म्हणाल्या, “अगदी सुरूवातीला शाळकरी वयात केलेल्या कविता परत आल्या होत्या. त्या परत येण्याच्याच लायकीच्या होत्या. तेव्हा एक उत्साह असतो. पुढे पुढे मी काही लिहिले की सहाएक महिने माझ्याजवळ ठेवायची. नंतर आपले आपल्यालाच वाचून कळते की त्यात काय कमी आहे. मी ते अंगी बाणवले. एकदा 'अनुष्टुभ' या दिवाळी अंकासाठी त्यांना माझी कविता हवी होती. मी कविता पाठवल्यानंतर मात्र म.सु. पाटलांचे पत्र आले की मला ही कविता नाही आवडली. दुसरी कविता पाठवली, तीही  नाही आवडली. त्या काळातल्या माझ्या सगळ्या कविता एकाच पॅटर्नच्या होत्या. ते म्हणाले, या कविता तुझ्या आधीच्या कवितांसारख्या बिलकुल नाहीत. मी म्हटले की दरवर्षीच छापले पाहिजे असे काही नाही, आणि आताच्या या सगळ्याच कवितांची धाटणीच बदलून गेलीय आणि वेगळ्या अनुभवांचे जग या कवितांत आहे. खरं तर तुम्ही आता नाही म्हणालात ते एका प्रकारे बरं वाटतंय, कारण याचा अर्थ असा होतोय की मी वेगळे काहीतरी लिहितेय. चांगले आहे की नाही, हा नंतरचा भाग झाला; पण मी वेगळे काहीतरी करतेय हेही झालेच. ते म्हणाले की मला तुमचा सकारात्मक दृष्टिकोन आवडला. गंमत पुढे अशी झाली की याच कवितांच्या तत्पुरूषनावाच्या कवितासंग्रहाला अनुष्टुभचा पुरस्कार मिळाला. असे अनुभव सगळ्यांनाच येतात. फक्त त्यांच्याकडे निरोगी आणि सकारात्मक दृष्टीने पाहायला हवे.

हाच प्रवास पुढे कसा झाला हे त्या सांगतात, “मी आताच लहान मुलांच्या गोष्टींची पाच पुस्तके लिहिली. राजहंसकडे मी ती पाठवली. त्यांचे मत होते की मी गोष्टी लिहाव्यात आणि माझे मत होते की गोष्ट लिहिणे आणि सांगणे, ह्या दोन्ही गोष्टी वेगळया आहेत. सांगताना आपण गंमती-जमती करत सांगतो. समोरच्याचा प्रतिसाद बघून ती अधिक खुलते. तरी त्यांच्या आग्रहाखातर मी ते लिहिले. तेव्हाही तुम्ही छापलेच पाहिजे असे माझे म्हणणे नाही, हे मी त्यांना सांगितले. तुम्हांला आवडलेय की नाही, ते तुम्ही मोकळेपणाने सांगा. माझा लिहिलेला प्रत्येक शब्द छापलाच जावा असा माझा अट्टाहास नाही. माझ्याकडे बरेच काही पडून आहे जे मी कधीच छापले नाही. कदाचित छापणारही नाही. खरे तर यात दोन गोष्टी असतात. एकतर टाळ्यांचा मोह असतो आणि दुसरे म्हणजे तुमच्या वर्तुळातल्या लोकांचे उदा. मित्र, प्रकाशक, पत्रकार, वाचक यांचे आग्रह असतात; ते मोडावे कसे असे काही वेळेस होते. कधी कधी संबंध चांगले ठेवायचे म्हणूनही लिहावे लागते. ही दडपणं मी घेतली नाहीत. जेव्हा असा आग्रह होतो, तेव्हा मी सरळ म्हणते, की माझे काही तयार लेखन आहे, ते हवे तर तुम्ही तुमच्या दिवाळी अंकात छापा. पण आता त्यासाठी मला नवीन वेगळे काही लिहायला जमणार नाही. लेखन ही माझ्यासाठी येताजाता करण्यासारखी गोष्ट नाही. माझ्या हातातले हे माझे अवजार मला कुठेही कसेही वापरून बोथट गुळगुळीत करायचे नाहीय. कधी कधी पैशांचे मुद्देही असतात. बर्‍याच जणांना असे वाटते की आम्ही तुम्हांला चांगले पैसे देतो. म्हणजे एका कादंबरीला जितके पैसे मिळतात तितक्या मानधनाची मला एका दिवाळी अंकाची ऑफर होती. एका लघुकादंबरीसाठी आम्ही तुम्हांला २५,००० देतो. ब्रकिंवा भिन्न  यासारख्या पुस्तकांची ती एका आवृत्तीची रॉयल्टी झाली. आता जवळपास त्याच्या एक तृतीयांश आकाराच्या लेखनासाठी मला जवळजवळ तितके मानधन मिळत होते. पण अशा ठरवून कादंबर्‍या लिहिणे मला पसंत नाही म्हणून मी नकार कळवला.

लेखनाबरोबरच कवितांचे इतरही अनेक प्रकल्प सध्या एकाच वेळी सुरू आहेत. लहान मुलांसाठीची पुस्तके हा त्यातील एक. त्याविषयी त्या भरभरून बोलतात. “'जोयानाच्या गोष्टी' अशा शीर्षकाखाली ही छान, छोटी, रंगीत चित्रांची पुस्तके आहेत. एका पुस्तकामध्ये मोठ्या टाईपात एक गोष्ट असे तिचे स्वरूप आहे. जोयाना ही माझ्या शेजारची एक छोटी मुलगी. तिच्यावरून हे नाव घेतलेय. या गोष्टी आई-बाबांनी मुलांना वाचून दाखवायच्या आहेत. त्यानंतर सात ते नऊ वयोगट आणि दहा ते तेरा वयोगटासाठीच्या गोष्टी अजून लिहायच्या आहेत. त्या वयोगटांमध्ये थोड्या गमती करायचा मानस आहे. आपल्याकडे माहितीपर, आर्ट ऍंड क्राफ्ट, गोष्टींची अशी सगळी पुस्तके वेगवेगळी असतात. तर यांचे कॉंबिनेशन करून काय करता येईल, असा थोडासा विचार आहे. मला असे वाटते की मी मोठ्यांसाठी जे लिहिले आहे त्यात पुन्हा मी एक वेगळं वास्तवच रचलं आहे. आणि पुन्हा ज्या जगात वाचक जगत असतात त्याच जगात पुन्हा त्यांना हे लेखन घेउन जातं आहे. आणि मुलांसाठी लिहायचे म्हणजे पुन्हा ते राक्षस, पर्‍या वगैरे नाही. आजच्या मुलांचा कल खूप रिऍलिस्टिक आहे, त्यामुळे ती लगेच आपली अक्कल काढतात. त्यामुळे त्या त्यांच्या जगाला अनुकूल अशी समकालीन पुस्तके त्यांना दिली तर मुले वाचनाकडे वळतील. नाहीतर त्यांना इतर प्रलोभने पुष्कळ आहेत. आता मुलांसाठीच काही लिहायचे असे मत आहे.  

त्यांचे एकाच वेळी अनेक प्रकल्प समांतर चालूच आहेत. त्यातले कुहूव्यतिरिक्त दोन मोठे प्रकल्प म्हणजे आदिवासी ज्ञानकोशआणि भारतीय लेखिकाही अनुवादित पुस्तकांची मालिका. त्याबद्दल कविताताईंच्याच शब्दांत सांगायचे तर,"आदिवासी ज्ञानकोशाचेही समांतर काम चालूच आहे. एक आदिवासी बोलीतला शब्दकोश मी करते आहे. वारली भाषेतले जवळजवळ सात हजार शब्द त्यात आले आहेत. पण तो कोश फक्त वारली-मराठी न करता वारली-मराठी-इंग्रजी असा करत आहे. भारतीय लेखिका ही चाळीस पुस्तकांची मालिका आहे, ती पुस्तके संपादित करत आहे. पुस्तकाच्या विषयांच्या अनुषंगाने त्या पुस्तकांना प्रस्तावनाही लिहायच्या आहेत. यात एका लेखिकेचे एक पुस्तक असणार आहे. त्यात तिने लिहिलेले वेगवेगळे लेख अनुवादित स्वरूपात असतील. त्यामुळे एका पुस्तकातून एक लेखिकेची नीट ओळख होईल. एखादा लेख, निवडक कथांचा संग्रह किंवा एक कादंबरी, आत्मचरित्र असे त्या पुस्तकाचे स्वरूप असेल. आतापर्यंत तीन कथासंग्रह आलेले आहेत. आता कादंबर्‍या, आत्मचरित्र , निबंध, लेखसंग्रह अशी वेगळ्या पद्धतीची दहा पुस्तके पुढच्या दोन महिन्यांत येतील. याचे बरेचसे काम पूर्ण झाले आहे. अजूनही वेगवेगळ्या लेखिका शोधणं,अनुवादक शोधणं, हे काम चालूच आहे. 

पण वाचकांचे सर्वाधिक लक्ष असेल ते त्यांच्या स्वतःच्या पुढच्या पुस्तकाकडं. हा प्रश्न येतोच येतो. माझी नवीन कादंबरी आधीच्या कादंबर्‍यांच्या तुलनेत खूपच वेगळी आहे. एकतर ती मल्टीमीडिया कादंबरी आहे. भिन्ननंतर माझा कल थोडा दृश्य गोष्टींकडे वाढू लागला होता. कॅलिग्राफीचा थोडाफार उपयोग भिन्नमध्ये केला होताच. ब्रमध्ये सुरूवातीला थोडीशी रेखाटने होती. भिन्नमध्ये कॅलिग्राफी आली. ग्राफिटी वॉलच्या मुखपृष्ठाचे आर्टवर्क सगळं मीच केलं होतं. त्यामध्ये पूर्ण पुस्तकात फोटोग्राफ्जचा वापर केला. या प्रयोगांमुळे मूळ विषयाचं गांभीर्य, सौंदर्य वाढायला मदत होते असे मला वाटायला लागलं. शब्दांसोबत पुस्तकात असे काही समांतर मिसळत जावे, असा कल वाढत होता. सतरा-अठरा वर्षांच्या गॅपनंतर मी पुन्हा पेंटिंग्ज चालू केली,  आणि त्याच्यातून एक कल्पना सुचली. मग असे लक्षात आले की ते छापील पुस्तक या दृष्टीने त्यात खूपच  मर्यादा येणार होत्या. एका पुस्तकात काय काय छापले जाणार? रंगीत चित्रे छापायची तर त्याची किंमत वाढते. अनेक शंका मनात होत्या. म्हणजे भिन्नलिहित असतानाच याचा ड्राफ्ट तयार होता. आणि याचे नक्की काय करायचे हे ठरत नव्हते. गेली दोन-तीन वर्षे त्याच्यावरती मी बरेच प्रयोग केले. त्याच्यातून ही आताची कल्पना विकसित झाली की हे डीव्हीडीवरचे पुस्तक असेल.

डीव्हीडीवरचं पुस्तक? म्हणजे नक्की कसे? चित्रपटासारखे की ऑडिओ बुकसारखे? आणि ते डीव्हीडीवरती कसे असेल? एकामागून एक येणार्‍या प्रश्नांना उत्तर देताना त्या म्हणाल्या,इ-बुक्स किंवा ऑडिओ बुक्स यांनाही काही मर्यादा आहेत. ती लोकांना फारशी आवडत नाहीत. तितकीशी पॉप्युलरही होत नाहीत. मग यावर नुसतीच टीका करण्यापेक्षा ती का इतकी आवडत नाहीत याची कारणं, मर्यादा यांचा शोध घ्यावा आणि त्या मोडून काढाव्यात, असा विचार केला असता असे लक्षात आले की त्याच्यात एकसुरीपणा येतो. स्क्रीनवर आपण फार काळ वाचू शकत नाही. पण त्याच स्क्रीनवर आपण चौदा तास काम करतो, सात-आठ तास चॅटिंग करतो; तेव्हा आपल्याला स्क्रीनचा, फॉन्ट्साईझचा प्रॉब्लेम नसतो. मग वाचतानाच का होतो? जेव्हा आपण फोनवरती बोलतो, तेव्हा आपण तासन् तास बोलतो, पण ऑडिओ बुक इतका वेळ ऐकले जात नाही. कितीही उत्तम व्याख्यान, कथा, कादंबरी हे सगळे एक-दीड तासांहून जास्त वेळ ऐकले जात नाही. एका टप्प्यानंतर आपले लक्ष दुसरीकडे वळायला लागतं. मग म्हटले प्रॉब्लेम काय आहे? स्क्रीन आणि आवाज हा काही प्रॉब्लेम नाही. कारण हे आहे की माणसाला अनेक कारणांनी एक ब्रेक हवा असतो. तर हे जे आहे की, जर तुम्हांला प्रेक्षकाला खिळवून ठेवायचे असेल, तर त्याच्यात इतर गोष्टींमधून असा ब्रेक देणारा बदल घडवून आणायला हवा. मग पुस्तकात अशा ब्रेक देणार्‍या गोष्टी कुठल्या? मग मोनोटोनी मोडून काढण्यासाठी चित्रे, रंग, आवाज, संगीत वापरता येतील;  अशा अनेक कल्पना मला सुचायला लागल्या. मग मी वेगवेगळ्या क्षेत्रांमधल्या मित्र-मैत्रिणींशी चर्चा करत हळूहळू ते सगळे डेव्हलप झाले. ते अवघड आहे, त्याचवेळी एक आव्हान आहे.

मग पुस्तकात नक्की असेल काय? आणि ते दिसेल नक्की कसे? याला उत्तर म्हणून त्यांनी पुस्तकाची संकल्पनाच समजावून सांगितली. एकाच डीव्हीडीवरती तुम्हांला ऍनिमेशन, व्हिडिओ, फोटोग्राफ, पेंटिंग, कॅलिग्राफी असे दृश्य माध्यमामधले पाच प्रकार दिसणार आहेत. त्या सगळ्यांच्या रेंजेस वेगवेगळ्या असणार आहेत. त्याच्यातली कुठलीही एकच फ्रेम खूप सुंदर दिसता कामा नये आणि इतर फ्रेम्स तिच्याखाली दबून जाता कामा नयेत, आणि या प्रत्येक माध्यमाची क्षमता वेगळी आहे. तर ही प्रत्येक माध्यमाची गंमत अनुभवताना, सामर्थ्याचा आस्वाद घेताना तांत्रिक दृष्ट्यातर ते एका रेंजमध्ये आणलेच पाहिजे; खेरीज विषयगाभा म्हणून कुठले एक माध्यम अधिक वरचढ झालेय, असेही होता कामा नये. थोडेफार होईल, पण फारच तुटकपणा येईल असे करता कामा नये. मग त्याच्यात गाणार्‍या पक्ष्यांची गोष्ट आहे. मग त्यात गीते आली. ती पक्ष्याची गीते म्हणून अगदी कमी शब्दांची, दोन-चार ओळींची लहान लहान गीते आहेत. त्यात भारतीय संगीताचा पूर्ण बाज आहे. शास्त्रीय संगीत अथवा कच्छी बंदिश वाटावी अशी ती गीते आहेत. आरती अंकलीकर-टिकेकर यांनी ती संगीतबद्ध केली आहेत. पक्ष्यांची म्हणून अगदी छोट्या मुलांकडून ती गाऊन घेतली आहेत.हे सगळे ऐकताना त्यांना कलेची किती जाण आहे हे समजून येत होतं आणि लवकरच त्याची प्रचीती आली.

'अच्छा, म्हणजे हे पुस्तक छोट्या मुलांसाठी आहे की काय?', ह्या ऐकणार्‍याच्या पुढच्या शंकेचंही त्या निवारण करतात. पूर्ण पुस्तक छोट्या मुलांसाठी नाही. ते खरे तर मोठ्यांच्याच साठी आहे. मोठ्यांनाही फॅंटसी, मनोरंजन हवे असते. त्यांच्यासाठी नेहमीच माणसांचेच जग समोर मांडावे असे काही नाही.  असे नाही की मोठ्यांना मुलांसारखे वागायला आवडत नाही. त्यांच्यातही लहान मूल दडलेले असतेच. फक्त त्या जगात जायला लोक आक्रसलेले असतात, संकोचलेले असतात. वय वाढेल तसा आपला मोकळेपणा आपण गमावून बसतो. तो मोकळेपणा तद्दन परिकथांच्या पॅटर्नमधून येणार नाही, कारण आपले विश्व आता खूप बदलले आहे. असेही आहे की काही वास्तवे जशी खूप कुरूप असतात तशी काही खुप सुंदरही असतात. मग त्या सुंदर वास्तवांकडे पाहताना असं लक्षात येतं की 'वास्तव हे कल्पनेहून अधिक अद्भुत असतं'. ही वास्तवं खूप सुंदर आहेत, खूप कुतूहल वाढवणारी आहेत. एखादा रंगीत पक्षी पाहिला की त्याच्या रंगांची तीव्रता, सरमिसळ, रंगसंगती सुंदरच दिसते. कोणत्याही पक्ष्याच्या रंगांतले तीन रंग घे. त्यात चित्र रंगव, ड्रेस घे; ते हमखास सुंदरच दिसते. ही निसर्गनिर्मित रंगसंगती वर्णनातीत आहे. ही निसर्गातली सौंदर्यस्थळे, कुतुहले अद्भुत आहेत. आता ऍनिमल प्लॅनेट पाहून अथवा नॅशनल जिओग्राफी पाहून त्या पक्ष्यांचे, प्राण्याचे जीवनमान यावरचे आधुनिक संशोधन आपल्याला दिसते आणि काही प्रमाणात ते कुतूहल शमते. ही सगळी वास्तवे मी गोष्टींतून मांडली आहेत; म्हणजे ही सगळी फॅंटसी असली तरी ती रिऍलिटी-बेस्ड आहे.

ही खरे तर एकाच वेळी हलकी-फुलकी, मनोरंजक आणि त्याचवेळी जीवनाचे छानसे तत्त्वज्ञान सांगणारी गोष्ट आहे. ती कशी, हे सांगताना त्या म्हणतात,ही एक रूपककथा आहे. मग ते रूपक कशाचे असू शकते, हा विचार वाचकाने करावा अथवा त्याने शोधावे. प्रज्ञावंत आणि बाकीचे जग, आदिवासी आणि इतर जग असे काहीही असू शकेल. त्यातून अनेक शक्यता दिसतील. त्यातून एक वेगळी फिलॉसॉफी मांडली आहे की ती गंभीर प्रवृत्तीच्या वाचकांनाही भावेल आणि त्यांना वेगळा विचार करायला लावेल. हे सगळे झाल्यावर एक गोष्ट जाणवली की त्यात कथाही आहे. मग आम्ही ती गोष्ट बाजूला काढली आणि तिची बालावृत्ती तयार केली. त्यातलं खोल तत्त्वज्ञान, मृत्युसारखे विचार असे सगळे बाजूला काढले. बालकवींची एक कविता जी आपण चौथीत वाचतो, दहावीत वाचतो, नंतर एम. ए. करताना वाचतो; ती प्रत्येक टप्प्यावर वेगळ्या रूपात आपल्याला भेटते. प्रत्येक अनुभूती वेगळी, वेगळा विचार देणारी असते. त्यामुळे मुलांच्या वयाचा, त्यांच्या कुवतीचा विचार करून त्यांना थोडे वेगळे काहीतरी द्यायला हवे. परदेशात खास स्टुडंट एडिशन असते. मग असे का नाही आपणही आपल्या मुलांना उपलब्ध करून द्यायचे?, हा एक विचार त्यामागे होता. हा जंगल, पर्यावरण हा सगळ्याशी संबंधित असलेला विषय आहे. हे सगळे एका गोष्टीच्या माध्यमातून सांगितले तर ते अधिक प्रभावी होईल असा मानस आहे. जंगलाचे आणि माणसाचे नाते हा त्या कादंबरीचा विषय आहे. या प्रकल्पात मलाही बर्‍याच नवीन गोष्टी शिकायला मिळाल्या, अक्कलखाती जमा झाल्या. पैसे, वेळ, स्किल्स बरेच पणाला लागले. खूप गोष्टी करून पाहिल्या. अनेक क्षेत्रांमधले मला भरपूर शिकायला मिळाले. अनेक क्षेत्रांमधल्या लोकांशी ओळखी झाल्या. लोकांनी मला प्रचंड सहकार्य केलं. किती तर्‍हेने लोकांनी मदत केली हे मी सांगूच शकत नाही. तो तर सगळे सविस्तर आणि वेगळाच बोलण्याचा मोठा विषय आहे.

वैयक्तिक आयुष्यातही कविता महाजन या व्यक्तिमत्वाचे अनेक पैलू आहेत. एकाचवेळी जागे असणारे. त्या पूर्वी सतार शिकायच्या, चित्रं काढायच्या. वाचन-लेखन आहेच. प्रत्यक्ष सामाजिक कार्यात सहभाग आहे. त्या सांगत जातात,कॉलेजात असताना सोळा-सतराचे जे काही वय असते, तेव्हा खूप उर्जा असते. बरेच काही करावेसे वाटत असते. तेव्हा मी बरेच काही करायचे. सतार शिकायचे, चित्रे काढायचे, वाचन करायचे. मध्येच समाजात आजूबाजूला जे काही चालले आहे, ते पाहून राग यायचा. त्यातून मग आमची काही संघर्षात्मक कामे सुरू झाली होती. मग काही विधायक काम करणार्‍या  संस्था होत्या; उदा. नांदेडला एक कुष्ठधाम होते, तिथे जाऊन आम्ही श्रमदान शिबिरे घ्यायचो. सुदैवाने मला प्राध्यापक, लायब्ररियन खूप चांगले मिळाले. ते लोक उत्तमोत्तम पुस्तके माझ्या हातात देत होते. मी आधी आर्ट स्कूलमध्ये जायचे, पण बी. ए. ला असताना चित्रकलेशी संबंध पूर्ण तुटला होता. पण डोक्यातून गेला नव्हता. त्यामुळे बी. ए. नंतर पुन्हा मी बी. एफ. ए करायचे ठरवले. ते शिकताना समांतर एम. ए.(मराठी साहित्य) ची परीक्षा दिली. तेव्हा मग सामाजिक कार्याशी संबंध राहिला नव्हता. म्हणजे थोडेफार काम करायचे, पण स्वत:हून त्यात उतरले नव्हते. आर्ट स्कूलमधल्या राजकारणामुळे ते शिक्षण मी अर्धवट सोडलं. नाहीतरी त्या क्षेत्रात नोकरी करायची नाही हे आधीच ठरवले होते. त्यामुळे मूलभूत ज्ञान मिळाले आहे, आपण आपले आपले काम करू शकू हे माहीत होते. मग काही दिवस प्राध्यापक म्हणून काम केलं. लग्नानंतर मुंबईला आले. मग वेगवेगळ्या नोकर्‍या, फ्री-लान्स कामे असे सगळे सुरू झाले. त्या काळात इतरांनी आपले निर्णय घेणं किंवा कौटुंबिक तडजोडी हे सगळंच त्या काळात पुष्कळ घडलं.

पण तरी लग्नानंतर चूल आणि मूल यांत त्या अडकून पडल्या नाहीत. मुंबईला आल्यानंतर इथल्या सामाजिक कार्याबद्दलचा त्यांचा अनुभव तितकासा चांगला नव्हता. तो कालखंड कसा होता हेही त्यांनी सांगितले. दोन-तीन वर्षांनंतर मी इथल्या एनजीओंच्या संपर्कात आले आणि आदिवासी भागात तीन-चार वर्षे काम केले. ते करत असताना तिथले गैरव्यवहार आणि बर्‍याच गोष्टी दिसल्या. माझी मुलगी तेव्हा खूप छोटी होती. तिला पाळणाघरात ठेवून मी धडपडत ही सगळी कामे करायला जायचे.तेव्हा लक्षात आलं की यातून काहीच निष्पन्न होत नाहीय. घर-कुटुंब तर चालत नाहीय आणि दुसर्‍या बाजूने मुलीच्या दुधाचे पैसेही आपण नीट कमवू शकत नाही; आणि एवढे सगळे होऊन आपण ज्यासाठी एवढी मरमर करत आहोत, ते काम तर होतच नाही. ही वस्तुस्थिती लक्षात आल्यानंतर मी ते काम सोडलं.

ते एक काम सोडलं म्हणून थंड बसणं त्यांच्या रक्तातच नव्हतं. त्यांच्यातला लेखक जागा झाला. त्या लेखकाला पैलू ज्यांच्यामुळे पडले, त्यांचा उल्लेख करायला त्या विसरत नाहीत. त्या प्रवासाची हकीगत सांगताना त्या म्हणतात,एनजीओमधल्या अनुभवानंतर मी राज्य मराठी विकास संस्थेमध्ये जाऊ लागले. डॉ. सरोजिनी वैद्यांच्या हाताखाली मी खूपच शिकले. पुस्तकांचे संपादन कसे करावे, वाचन कसे करावे, लेखनाकडे कसे पाहावे; हे सगळे मी तिथेच शिकले. ही माझी कोशांची कामे करायला मला आवडतेय ते त्याचमुळे. लेखनाशी भावनिक, संवेदनशील  नाती असतात. आपण विचार करतो पण त्यालाही भावनेचा स्पर्श असतो. ही नाती निव्वळ मेंदूची कामे जिथे करायची  असतात - उदा. कोशांची कामे - तिथे तुमचा तोल राखतात. मी कादंबर्‍या लिहिल्या; पण त्या लिहिताना जी चिकाटी असते, ती मी त्यांच्याकडून शिकले असे म्हणायला हरकत नाही. एखादे काम सतत दोन-तीन वर्षे करत रहायचे. ते कधी पूर्ण होईल, कसे होईल, ते छापले जाईल की नाही; असे काहीही माहीत नसताना ते करत राहायचे, यासाठी खूपच चिकाटी लागते. एका ठिकाणी बैठक मारून बसणे; तिथे अभ्यासाला वेळ लागतो, विचारांना वेळ द्यावा लागतो, चिंतन करावे लागते आणि त्याचवेळेस तुमची काय विधाने आहेत, तुम्हांला काय सांगायचेय; याचा एक पाया पक्का करणे हे खूप अवघड होतं. मुळात माझी स्वतंत्रपणे विचार करण्याची सवयच मोडली होती लग्नानंतर. मला त्यात रूळायला वेळ लागला. मला काय वाटतं, मला काय म्हणायचंय, या टप्प्यावर स्वत:ला आणून उभं करणं अवघड गेलं.

चिकाटी हा महत्त्वाचा गुण. बहुदा तोच त्यांना कार्यरत ठेवत असावा. खरे तर ही त्यांच्याशी झालेली दुसरी भेट. पहिल्यांदा गेले तेव्हा एवढ्या मोठ्या लेखिकेला भेटणार म्हणून आलेलं दडपण डू डिस्टर्बअशी पाटी मिरवणारं दार पाहूनच कुठल्याकुठं पळालं होतं. आणि मग  गप्पा संपता संपेनात. या वेळेलाही कुहूचं लाँचिंग अगदी जवळ येऊन ठेपलं होतं. मधल्या काळातलं आजारपण, ‘कुहूचं बरंचसं काम यातून त्यांना आमच्याशी बोलायला कितपत वेळ मिळेल, याची शंकाच होती. पण तरी कविताताईंनी आवर्जून वेळ दिला. गेल्या वेळेसारखी  गप्पांची पुनरावृत्ती झाली, हे पुन्हा सांगायला नकोच. निघताना मात्र आम्हांला एक अमूल्य संधी मिळाली - कविताताईंनी काढलेली सगळी पेंटिंग्ज पाहण्याची. सुदैवाने त्याच दिवशी फोटो काढून घेण्यासाठी सगळी पेंटिंग्ज बाहेर आली होती. काही कुंचल्यातून उतरलेली, काही नाईफने रंगवलेली तर काही नुसत्या बोटांनी रंगवलेली! खजिनाच होता तो. आधी गप्पांतून त्यांचा सळसळाणारा उत्साह दिसला होता आणि प्रत्यक्ष कामातून त्यांचे झपाटलेपण! कविताताई, तुमच्या पुढच्या प्रकल्पांना शतश: शुभेच्छा!
कविताताईंनी ही मुलाखत तर दिलीच वर रसिक वाचकांच्या काही मोजक्या प्रश्नांना उत्तरेही देईन असे सांगितले आहे. तेव्हा तुमचे प्रश्न admin@pustakavishwa.com येथे पाठवायला विसरू नका. कृपया आपले प्रश्न २५ नोव्हेंबरपूर्वी द्यावेत. त्यानंतर ते पुस्तकविश्वकडून संकलित होऊन कविता महाजन यांच्याकडे पाठवले जातील.

अनुक्रमणिका

अनुभव

कवितासंग्रहाचे परिचय

लेखकांचे परिचय

मुलाखत

पुस्तक परिचय

प्रतिक्रियां

छान ...

ब्र वाचली. आतां भिन्न केव्हां हातीं पडते पाहतों. हिजड्यांविषयीं वाचतांना मेघना पेठेंच्या कथेंतला एक प्रसंग आठवला. नायिका प्रियकराची वाट पाहात मुंबईतल्या फोर्ट विभागातल्या एका रेस्तराँपाशीं उभी असते. पाऊस पडत असतो. अचानक एक कावळा तिच्या केसांवर शिटतो. तिच्या बाजूला पाऊस चुकवायला उभा असलेला एक हिजडा आपुलकीनें तिचे केंस स्वच्छ करतो.

शंकर वैद्य सरोजिनी वैद्यांचे उल्लेख अनेक आठवणी जाग्या करून गेले.

असो. मुलाखत म्हणा वा अन्य कांहीं. जें म्हणाल तें आ व ड लें.

सुधीर कांदळकर

कविता महाजन ह्या माझ्या अतिशय

कविता महाजन ह्या माझ्या अतिशय आवडत्या लेखिका आहेत.
त्यान्ची ब्र आणि भिन्न हि दोन्ही पुस्तके माझ्या सन्ग्रही आहेत.
त्यान्ची एवढी दीर्घ मुलाखत वाचून खूप छान वाटले.
त्त्यान्चे नवीन लेखन वाचायला खूप उत्सुक आहे.

वा! फारच सुरेख! गप्पा

वा! फारच सुरेख!
गप्पा चांगल्या रंगलेल्या दिसतात Smile
प्रश्न आहेत ते पाठवेनच!

-ऋ
----------------------
"चला, मी माझा एकमेव जुनाट कोट घालून एक नवं पुस्तक घेऊन येतो"

चांगल्या

चांगल्या गप्पा केल्या आहेत!

प्रतिसाद द्या

प्रतिक्रिया प्रकाशित करण्यासाठी येण्याची नोंद करा अथवा सदस्य व्हा.