• '

विविधांगी लेखन करणारे र. धों. कर्वे

प्रभाकर नानावटी
मंगळवार, 31 January, 2012 - 10:48
 

मुखपृष्ठ

पुस्तक जोडलेले नाही

 
 

पुस्तक

पुस्तक जोडलेले नाही

 

माझे जीवनविषयक तत्वज्ञान याबद्दल रं.धों. कर्वे एके ठिकाणी असे लिहितात:
स्वर्ग, नरक, ईश्वर, आत्मा, वगैरे मी मानित नाही; तेव्हा ऐहिक सुखालाच मी किंमत देतो. पण हे सुख कशात मिळते?
पैशाने अनेक इष्ट वस्तू मिळतात, अडचणी दूर होतात; परंतु तेवढ्यानेच मनुष्य सुखी होत नाही. सुखाचे एकमेव साधन म्हणजे पूर्ण मन:शांती. याकरिता स्वत:च्या मतानेच स्वत:ची किंमत कमी होईल अशा गोष्टी करू नयेत, ती वाढेल अशा कराव्या. मग लोकमताची पर्वा (शक्य तोवर) करू नये. पश्चात्ताप होईल असे करू नये. पण तसा प्रसंग आलाच तर अपरिहार्य गतगोष्टीचा शोकही करत बसू नये.

वरील परिच्छेद वाचत असताना रधों ही व्यक्ती 20व्या शतकाच्या पूर्वार्धातील त्या धगधगीच्या काळात कशी काय तग धरू शकली याचे आश्चर्य वाटल्या वाचून रहाणार नाही. कारण एवढ्या स्पष्ट शब्दात तत्वज्ञानाची मांडणी करून त्या प्रमाणे वर्तन करणारे आजही सापडतील की नाही याबद्दल शंका आहे. आजच्या उदार वातावरणाच्या तुलनेत त्या काळची परिस्थिती अतिशय बिकट होती. एकीकडे कर्मठपणा व परंपरेच्या विळख्यात असलेल्यांचा तीव्र विरोध व दुसरीकडे ब्रिटिशांची मनमानी व जुलमी सत्ता या कात्रीत सापडलेले रधों स्वत:च्या तत्वापासून तसूभरही सरकले नाही व कुठलीही तडजोड स्वीकारली नाही. आयुष्यभर टक्कर देत, निंदा नालस्ती सहन करत, सर्व प्रकारचे कष्ट, उपासमार, समाजद्वेश सहन करत एकांगी शिलेदाराप्रमाणे त्या काळातील समाजाला सामोरे गेले. समाजाच्या हितासाठी जे काही करावेसे वाटले त्याचा श्री गणेशा केला व कार्य करत राहिले. या सर्व गोष्टींचा प्रत्यय आपण डॉ. अनंत देशमुख यानी संपादित केलेल्या रधों असंग्रहित र.धों. कर्वे, हे पुस्तक वाचताना येतो.

रधों म्हणजे कुटुंब नियोजन आणि कुटुंब नियोजन म्हणजे फक्त रधों या मिथकाला छेद देणार्‍या अनेक गोष्टी रधोंच्या आयुष्यात घडल्या याची कल्पना बहुतेकांना नसेल. 'समाजस्वास्थ्यकार' म्हणून शिक्का बसलेल्या रधोंचे बहुआयामी व्यक्तिमत्व व त्यांची बहुश्रुतता अत्यंत वाखाणण्यासारखी होती. र.धों. कर्वे केवळ समाजस्वास्थ्य या त्यांच्या मासिकासाठीच लिहिणारे लेखक नव्हते. त्याकाळच्या बहुतेक संपादकांनी त्यांचा दुस्वास केला असला तरी काही संपादक त्यांच्यातील समाजक्रांतीकारकाचे गुण हेरून लेख लिहिण्यास पाचारण करत होते. आणि रधोंसुद्धा कुठलाही मुलाहिजा न ठेवता त्यांना जे काही सांगायचे आहे ते बिनदिक्कतपणे सांगत होते. हंस, किर्लोस्कर, चित्रा, ध्रृव, अलका, यशवंत, स्त्री व नंतरच्या मनोहर मध्येही त्यांचे लेख येत होते. संततीनियमन विषयक लेखनाबरोबरच व्यक्तिचित्रे, कायदा, भूतयोनी, नाटक, प्रगतीचे तत्वज्ञान, हिंदूधर्म इत्यादीविषयीसुद्धा ते आपली मतं मांडत होते. संततीनियमनाबद्दलच्या लेखनातील विषयातसुद्धा तोचतोचपणा न आणता या विषयाचे चारी बाजूने विचार करणारे लेख ते लिहित होते. या लेखांच्या शीर्षकावर नजर टाकली तरी - अमर्याद संतती, विवाहासंबंधी आधुनिक कल्पना, स्त्री -पुरुषातील लैंगिक भावनातील भेद, एक बायको का पुरत नाही?, लैंगिक नवमतवाद म्हणजे काय?, प्रेम ही चीज काय आहे?, वेश्या आणि विवाह इ.इ. - आपल्याला त्यांच्या अभ्यासूवृत्तीची कल्पना येईल.

रधोंनी आपल्या वडिलाबद्दल (धोंडो केशव कर्वे - 'अण्णा'बद्दल ) अत्यंत प्रांजळपणाने लेख लिहिलेला आहे. मोठ्या माणसांची मुलं म्हटल्यावर कसे दडपण येते, वडिलाच्या स्वार्थत्यागामुळे मुलांचे कसे नुकसान होते, इत्यादींचे वर्णन करत असतानाच अण्णांच्या वैचारिक जडणघडणीतील लवचिकपणाबद्दलही रधों मनापासून दाद देतात. अण्णांचे हिशेबी वर्तन, अपकाराची फेड उपकाराने करण्याची वृत्ती, कितीही नुकसान होत असले तरी कुणालाही न दुखवण्याचा स्वभाव इत्यादी गोष्टीबद्दलचे वर्णन मुळातूनच वाचायला हवे. रधोंच्या संपर्कात आलेले जे नेल्सन फ्रेझर या प्रिन्सिपालविषयीसुद्धा काही संस्मरणीय प्रसंगांचा उल्लेख करत रधोंनी आदरयुक्तपणे लिहिलेले आहे. रधोंच्या दृष्टीने मामा वरेरकर हेच त्याकाळातील उत्कृष्ट नाटककार ठरतात.

पुस्तकाच्या मलपृष्ठावर उल्लेख केल्याप्रमाणे रधोंचे हे असंग्रहित लेख विविधांगी आहेत. त्यांच्या मुलाखतीच्या लेखातून त्यांची जीवनाविषयीची भूमिका, त्यांचे तत्वज्ञान, त्यांच्या दृष्टीने त्यांच्यांत असलेले गुणदोष, स्पष्ट होतात. इतर काही लेखामधून त्यांचे साहित्य, संगीत, पेटीच्या साथीला असलेला विरोध, नाटक, भाषा, चित्रपट, इत्यादीविषयावरील अभ्यासपूर्वक केलेल्या त्यांच्या मतांचा प्रत्यय येतो.

एक वाचनीय पुस्तक!

असंग्रहित र.धों. कर्वे,
अनंत देशमुख,
पद्मगंधा प्रकाशन, (2010),
पृ.सं: 304 किं: 250 रु

उत्तम परिचय काका. रधों एक

उत्तम परिचय काका.
रधों एक द्रष्टेच होते. त्याकाळात त्यांनी केलेले काम खूपच महान आहे.
नुकताच त्यांचा समग्र संचही प्रकाशित झाला आहे.

+१ असेच म्हणतो

रधों मी दुर्दैवाने वाचलेले नाहीत. पण लवकरच रधोंची पुस्तके वाचेन. द्रष्ट्या लेखकांचे पुस्तक म्हणजे एक बौद्धिक मेजवानीच असते Smile

प्रभाकरजी,

एकदम छान परिचय. मागे तुम्ही दिलेला परिचय वाचून वनवास घेतले आता रधों घ्यावे म्हणतोय... Smile

मी एक पुस्तकवेडा
http://pustakveda.blogspot.com/

धन्यवाद

धन्यवाद काका. नेहमीप्रमाणेच उत्तम ओळख. रंधोंचे आत्मचरित्र उपलब्ध आहे का ?

र.धों. कर्वे यांचे आत्मचरित्र (?)

माझ्या माहितीप्रमाणे रधोंनी आत्मचरित्र लिहिले नसावे.
परंतु ' रधों:समग्र संचा'तील 'समाजस्वास्थ्य'कार या पुस्तकात त्यांच्याविषयी इतरानी लिहिलेले लेख आहेत.