'बोलती पुस्तके' हा मराठीतला पहिला वाहिला free Audio Books प्रकल्प. याबद्दल अधिक जाणुन घ्या इथे.
विज्ञान व तंत्रज्ञानाच्या अद्भुत जगात!
मुखपृष्ठ
पुस्तक जोडलेले नाही
पुस्तक
पुस्तक जोडलेले नाही
![]() |
गेल्या दोन -तीनशे वर्षांचा आढावा घेतल्यास इतर कुठल्याही क्षेत्रापेक्षा विज्ञान व तंत्रज्ञानाने घेतलेली गरुडझेप थक्क करणारी आहे. माणसाचे जीवन सुसह्य करण्यात, त्याला दीर्घजीवी करण्यात, आयुरारोग्य देण्यात, कल्पनेच्या पलीकडील सोई सुविधांची सवय लावण्यात सर्जनशील वैज्ञानिक, तंत्रज्ञ व उद्योजक यांचा फार मोठा वाटा आहे. गरजेपोटी शोध की शोधामुळे गरज हे एक न सुटणारे कोडे ठरत आहे. कोणी कशावर संशोधन करावे किंवा कशावर संशोधन करता येईल या प्रश्नाचे उत्तर ' कशावरही' असे म्हणता येईल. त्यादृष्टीने विचार करू लागल्यास गेले दोनशे वर्षात संशोधकाने निवडलेले किंवा योगोयोगाने वा अपघातातून सापडलेले विषय - उपविषय - खरे तर विश्वात दिसणारी व न दिसणारी प्रत्येक गोष्ट - संशोधनालायक असते हे सिद्ध होते. अशाच अफलातून घेतलेल्या संशोधक विषयाबद्दल व त्यांचा शोध घेत घेत मानवी जीवनाला उच्च पातळीवर नेलेल्या शोधकाबद्दलचा आढावा घेणारे 'शोध आणि शोधक' हे पुस्तक प्रा. डॉ. चंद्रकांत सहस्रबुद्धे या लेखकाचे आहे. यातील बहुतेक लेख दै. सकाळच्या 'दिशा' पुरवणीसाठी 1998 साली लिहिले होते. त्याच लेखात आणखी भर घालून हे पुस्तक अलिकडेच प्रकाशित करण्यात आलेले आहे.
आर्किमिडीस, गॅलिलिओ, न्यूटन, आइन्स्टाइन ही चिरपरिचित नावं जगाचा चेहरा मोहरा बदलू शकणार्या त्यांच्या संशोधनामुळे बहुतेक सुशिक्षितांच्या तोंडी आहे. न्यूटन व गुरुत्वाकर्षण, आइन्स्टाइन व सापेक्षता सिद्धांत, अलेक्झांडर ग्राहम बेल व टेलिफोन, एडिसन व विजेचा बल्ब अशी काही नाव ( व त्यांचे शोध) आपल्या मनात घर करून बसलेले असतात. परंतु या मोठ्या नावाजलेल्या संशोधकाबरोबरच काही शोध व त्यांचे शोधक असे आहेत की त्यांच्यासंबंधीची माहिती प्रयत्नपूर्वक शोधावी लागते, गोळा करावी लागते. असाच एक उत्तम प्रयत्न लेखकानी केला असून विज्ञानविषयी कुतूहल असणार्या प्रत्येकानी संग्रही ठेवायलाच हवे असे हे पुस्तक आहे.
आपण आपल्या दैनंदिन व्यवहारात अनेक गोष्टी वापरत असतो; रेझर व रेझर ब्लेड, स्टेपलर, बॉल पेन, मायक्रोवेव्ह ओव्हन, झेरॉक्स मशीन, कॅमेरा, वेल्क्रो, सेल फोन, टीव्ही, व्हिडीओ गेम्स, नायलॉनचे कपडे, व्हॅसलीन, टेफ्लॉनची भांडी इ.इ. परंतु ही उत्पादन आकाशातून पडल्या किंवा कुठून तरी अवतरल्या व आपण वापरायला सुरुवात केली असे नाही. या प्रत्येकासाठी कुणीतरी कष्ट घेतले, खस्ता खाल्या, नाउमेद न होता वर्षानुवर्षे प्रयत्न करत राहिले, उद्योजकांचे उंबरठे झिजवले व त्या त्या काळच्या समाजाला त्याची गरज पटवून दिली व शेवटी त्या गोष्टी समाजाच्या पचनी पडल्या. वैज्ञानिक जगतात अशा शोधकांचा फार मोठा बोलबाला नसला तरी त्यांचे संशोधन कार्य, त्यांची सर्जनशीलता, नाविन्याची हौस, याला आपण मनापासून दाद द्यायला हवी. लेखकानी यातील काही शोधांचा व शोधकांचा धावता आढावा घेतला असून या उत्पादनामागील संशोधनाची कथाही तितकीच मनोरंजक व प्रेरणादायी ठरणारी आहे.
फोटोग्राफीला एके काळी कला असे म्हटले जात होते. खरा कलाकारच निसर्गातील एखादा अनमोल क्षण 'कैद' करून जगाला थक्क करत होता. परंतु त्यासाठी छायाचित्रकार जिवाचे रान करत असत. तास न तास त्या 'क्षणा'ची प्रतीक्षा करत असत. उत्कृष्ट फोटो म्हणून निवड झालेल्या फोटोमागे 500 - 600 मी लांबीची फिल्म रोल expose केल्याचा इतिहास आहे. आज तंत्रज्ञानाने सारे सोपे, सारे जादूचे करून टाकले आहे. डिजिटल कॅमेरे व मोबाइलमधले कॅमेरे यात फिल्मची, फिल्म धुवायची भानगड नाही. सगळे डिजिटल! परंतु एकेकाळी हा एक फार किचकट व खर्चिक प्रकार होता, हे सांगूनही पटणार नाही. फोटो प्रिंट्स, निगेटिव्ह, पॉजिटिव्ह, डार्क रूम, हे शब्द लोप पावत आहेत. मोबाइलवर क्लिक् करून भरमसाठ फोटो काढायचे. कॉम्प्यूटरवरून पेनड्राइव्ह वा सीडीत कॉपी करायचे की झाले! ते फोटो न बघता अडगळीत ठेवल्यासारखे ठेऊन टाकायचे. चार पाचशे फोटो बघायला येथे कुणालाही वेळ नाही. केव्हाही बघू, आपल्याजवळ आहेत याच मानसिकतेमुळे बहुतेक वेळा त्या बघितल्या जात नाहीत. मुबलकतेचे दुष्परिणाम! 150 वर्षापूर्वी 10-15 किलो वजनाचा कॅमेरा, 4-5 किले वजनाचा ट्रायपॉड, फोटो डेव्हलप करण्यासाठी घातक रसायनांची हाताळणी, रसायनाने लेपलेल्या जाड (व महाग) काचा इत्यादी गोष्टी फोटोग्राफरला सांभाळाव्या लागत होत्या. जाड काचाऐवजी फिल्म रोलची कल्पना जॉर्ज ईस्टमन या एका कारकुनाची! चोवीस वर्षीय ईस्टमनला एकदा सुट्टी घेऊन निसर्गाचे फोटो काढायचे होते. परंतु फोटो काढण्यासाठी ही अडगळ संभाळावी लागते हे ऐकून तो हबकला. मग त्याच्या डोक्यात विचारचक्र सुरु झाले. फिल्म रोलची कल्पना व त्यासाठी त्यानी घेतलेले कष्ट, त्याचा आटापिटा इत्यादींचे वर्णन मूळ पुस्तकातूनच वाचायला हवे!
आपल्या हॉलमधल्या टीव्हीच्या संशोधनाचा इतिहासही खडतर होता. यासाठी अनेक उद्यमशील व सर्जनशील तंत्रज्ञांचा योगदान आहे. डॉ. पॉल निप्को, चार्लस फ्रान्सिस जॅकिन्स, कॅबेल स्विंटन, ब्रॉन फिलो फार्न्सवर्थ, डेव्हिड सर्नोक, ब्लादिमिर डबोर्किन, बोरिस रोजिंग, जॉन लॉगी बेर्ड, इत्यादींच्या अथक परिश्रमातून आपल्या हॉलमध्ये तो आला आहे. टीव्हीचा हा प्रवास 70-80 वर्षाचा असून आज आपण LCD, LED, 3D, HD टीव्हीपर्यंत पोचलो आहोत.
टीव्ही आणि कॅमेराप्रमाणे इतर उत्पादनांची गोष्टही तितकीच मजेदार आहे. एडिसनने शोधलेला बल्ब, पर्सी स्पोन्सरचा मायक्रो ओव्हन, चेस्टर कार्लसनचा झेरॉक्स, जॉर्ज मेट्रेलचा वेल्क्रो, चार्लस टाऊन्सचा लेसर, रॉय प्लॅकेटचे टेफ्लान कोटिंगचे तंत्र, क्रिस्तोफर कॅथम शोल्सचा टाइपरायटर, विली दि ग्रीन बोथॅमने कंटाळा घालविण्यासाठी शोधलेले व्हिडिओ गेम्स, रॉबर्ट्स चीजब्रॉचा व्हॅसलीन.... इत्यादींच्या बद्दल वाचताना आपण एका वेगळ्या जगात प्रवेश करत असतो व त्यात हरवून जातो. त्यामुळे त्यातील अद्भुततेला मनापासून दाद द्याविशी वाटू लागते.
लेखकानी केवळ व्यवहारोपयोगी, घरगुती उपयुक्त तंत्रज्ञानाच्या बद्दलच लिहिले नसून विज्ञान - तंत्रज्ञान क्षेत्रातील इतर काही dedicated शोधकांचाही थोडक्यात परिचय करून दिला आहे. मेरी लीकी या महिला शास्त्रज्ञाने आफ्रिकेच्या जंगलात राहून केलेले उत्खनन, जेन गुडॉलचा चिंपाझी कुटुंबाबरोबरचा सहवास व संशोधन, मायकेल डर्टेझॉस यानी घातलेला माहिती तंत्रज्ञानाचा पाया, पां. वा. सुखात्मे यांचे संख्याशास्त्रातील योगदान, जॉर्ज स्मूट याच्या डोक्यातील विश्वोत्पत्तीच्या संबंधातील big bangची अफलातली कल्पना, फ्रेड हॉईल यांचा स्थिर स्थिती सिद्धांत, लिनस पाउलिंग यांचे रसायन शास्त्र व जागतिक शांतीसाठीचे प्रयत्न, लिंडा शील ने पुरातन माया संस्कृतीला जगासमोर आणण्यासाठी केलेला आटापिटा, हबल, पॅम डिरॅक, गाझानिगा, मोहलमन, wwwचा टिम ली अशा अनेक शास्त्रज्ञांचा आपल्याला परिचय होतो. व आपण त्यानंतर संगणकावर गूगल करून त्याबद्दलची अधिक माहिती गोळा करण्याच्या प्रयत्नाला लागतो.
लेखकानी एके ठिकाणी उल्लेख केल्याप्रमाणे रात्रीच्या वेळी बर्याचदा अंधारात एखादा काजवा चमकताना दिसतो. काजवा दिसत नाही तरी चमक डोळ्यात भरते. डोक्यात येणार्या कल्पनांचे तसेच असते. त्या कधी चमकतील त्याचा नेम नसतो. तो क्षण दिसत नाही. पण कल्पना जाणवते. कल्पनेच्या काजव्याला प्रकाश पाहायला आपला मन:चक्षू सतत सक्षम असायला हवा. कल्पनेचा काजवा कधी चमकेल हे कोणी सांगावे! ही चमक पाहून जे हुरळून जाऊन त्याचा पाठपुरावा करतो, तो जगात काही तरी मिळवतोच.
अशा जगात काही मिळवू शकलेल्या व आपल्यालाही त्याच वाटेने जावे यासाठी उत्तेजन देणार्या या शोधकांच्या कथा नक्कीच विचार करायला लावतील!
शोध आणि शोधक
प्रा. डॉ. चंद्रकांत सहस्रबुद्धे
हर्मिस प्रकाशन, पुणे, (2011)
मूल्य - 150 रु पृ. सं. 158
सहमत
>>अशा जगात काही मिळवू शकलेल्या व आपल्यालाही त्याच वाटेने जावे यासाठी उत्तेजन देणार्या या शोधकांच्या कथा नक्कीच विचार करायला लावतील!
सहमत आहे. पुस्तकपरिचय आवडला. धन्यवाद.
शुन्य ते असंख्य...
शून्यातून सुरू होऊन असंख्यापर्यंत झालेला हा प्रवास वाचला पाहिजे.
ह्या लेखातील आवडलेला परिच्छेद....
...लेखकानी एके ठिकाणी उल्लेख केल्याप्रमाणे रात्रीच्या वेळी बर्याचदा अंधारात एखादा काजवा चमकताना दिसतो. काजवा दिसत नाही तरी चमक डोळ्यात भरते. डोक्यात येणार्या कल्पनांचे तसेच असते. त्या कधी चमकतील त्याचा नेम नसतो. तो क्षण दिसत नाही. पण कल्पना जाणवते. कल्पनेच्या काजव्याला प्रकाश पाहायला आपला मन:चक्षू सतत सक्षम असायला हवा. कल्पनेचा काजवा कधी चमकेल हे कोणी सांगावे! ही चमक पाहून जे हुरळून जाऊन त्याचा पाठपुरावा करतो, तो जगात काही तरी मिळवतोच....






सुंदर परिचय
प्रभाकरजी,
प्रकाशनाचे वर्ष दिले नसते तर माझा गोंधळच झाला असता
कारण माझ्या शालेय जीवनात मी 'शोध आणि शोधक' याच नावाचे एक पुस्तक वाचले होते ते हेच अशी माझी समजून झाली होती
पण छान आहे परिचय, संग्रहात असावे असेच हे पुस्तक दिसते आहे. पुण्यात पुढच्या वेळी येईन त्यावेळी हे पुस्तक आवर्जून पाहीन. (आणि शक्यतो घेईनच )
मी एक पुस्तकवेडा
http://pustakveda.blogspot.com/