||दिवाळी २०१०||

वाग्भट संहिता - एक विवेचन
मदतनीस

आयुर्वेद! एक प्राचीन वैद्यकशास्त्र!!

वस्तुतः बहुतांश लोकांचा असा समज असावा की आयुर्वेद नावाचा एक ग्रंथ आहे व त्यामधे आयुर्वेदोक्त ज्ञान सामावले आहे. परंतु प्रत्यक्षात प्राचीन काळापासून अर्वाचीन काळापर्यंत अनेक ग्रंथांचा या शास्त्रात समावेश केला आहे.

आयुर्वेदशास्त्राचे जाणकार प्रामुख्याने बृहत्रयी व लघुत्रयी या सहा ग्रंथांना आधारभूत ग्रंथ म्हणून मान्यता देतात, शिवाय इतरही ग्रंथांतील ज्ञानाचा यशावश्यक मर्यादेपर्यंत स्वीकार करतात.

वाग्भट संहिता ही बृहत्रयींपैकी कालखंडदृष्ट्या ख्रिस्ती शकाच्या तिसर्‍या शतकाच्या पूर्वीची किंवा सहाव्या शतकानंतरची असावी. या संहितेचा निर्मितीकाळ अचूकपणे सांगता येत नाही. प्रस्तुत ग्रंथाचा कर्ता वाग्भट हा सिंधू देशाचा रहिवासी होता. त्याच्या आजोबांचे नावही वाग्भट असेच होते; म्हणजे वृद्धवाग्भट ज्यांनी 'अष्टांगसंग्रह' नावाचा ग्रंथ लिहिला व नातू वाग्भट म्हणजे लघुवाग्भटाने 'अष्टांगहृदय' नावाचा ग्रंथ लिहिला.

व्यवहारात अष्टांगहृदय हा ग्रंथ वाग्भट संहिता म्हणून प्रसिद्ध आहे. तत्कालीन ग्रंथांची रचना, सहा स्थानांमधे म्हणजे विभागांमध्ये केलेली आहे. सूत्रस्थान, शारीरस्थान, निदानस्थान, चिकित्सास्थान, कल्पस्थान व उत्तरस्थान. सूत्रस्थानात संपूर्ण ग्रंथात वर्णिलेला विषय संक्षिप्त सूत्ररुपात मांडला आहे. आयुर्वेदशास्त्राची मूलतत्वे, सिद्धांत यांचे वर्णन आहे. शारीरस्थानात संपूर्ण शरीररचना, गर्भोत्पत्ती, गर्भपात, गर्भविकृती, प्रसूतिकालीन संकटे व त्यावरील उपाय अशा सगळ्याचा समावेश आहे.

निदानस्थानात अनेक रोगांची लक्षणे, त्यांचे निदान कसे करावे याचे वर्णन आढळते. चिकित्सास्थानात औषधोपचारांविषयी माहिती आहे. कल्पस्थानात औषधनिर्मितीची क्रिया तसेच पंचकर्म उपचार यांची सविस्तर माहिती आढळते.

शेवटच्या उत्तरस्थानात भूतबाधा, उन्माद, अपस्मार अशा मानसरोगांविषयी चर्चा आहे. तसेच कान, नाक, घसा, डोके यांच्या रोगांचे वर्णन आहे. विषतंत्राचे सविस्तर ज्ञान, वेगवेगळी सर्वविषे, विषारी वनस्पती आणि   कीटकांदीचे वर्णनही यात आहे.

वाग्भट संहितेचे वैशिष्ट्य म्हणजे गेय व छंदपूर्ण रचना. पूर्वीच्या काळी, ज्यावेळी सर्व ज्ञान मुखोद्गत करून एका पिढीकडून पुढील पिढीला हस्तांतरित व्हायचे, अशा काळात गेय रचनांना विशेष महत्त्व होते.

आजही दक्षिण भारतात, घरोघरी वापरल्या जाणार्‍या औषधोपचार पद्धतींत वाग्भटोक्त उपचार प्रामुख्याने आढळतात.

वाग्भट संहितेचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे त्यातील शारीरप्रकृती व मानसप्रकृती विचार. व्यवहारात समोर असणार्‍या व्यक्तीच्या स्वभावापासून शारीर विशेषांपर्यंत अचूक वर्णन या प्रकृतिविचारांत आहे. पूर्वीच्या काळी बालरोगविज्ञान अत्यंत प्रगत होते, याचा दाखला वाग्भट संहिता देते. लहान बाळाच्या लक्षणांवरून त्याला कोणत्या रोगाची बाधा असावी, याचे रोचक वर्णन इथे आहे.

तत्कालीन उपचारपद्धतीत औषधांसह मणी, मंत्र, जारण, जप, तप आदींचाही समावेश असे. या ग्रंथाच्या शेवटी त्याची सिद्धता वर्णन करतांना म्हटले आहे की,

"इदमागमसिध्द्त्वात्प्रत्यक्ष फलदर्शनात|
मन्त्रवत्स्म्प्रयोक्तव्यं न मीमांस्यं कथंचन|| "

म्हणजे वरीलल वैद्यशास्त्र वेदांपासून प्राप्त झालेले असून त्याचे फळ प्रत्यक्ष दृष्टीपुढे असल्यामुळे याचा मंत्राप्रमाणे वापर करा. याविषयी कधीही, कोणत्याही प्रकारची शंका घेउ नये.

अनेक विषयांचे एवढे अगाध व अचूक ज्ञान सूत्रबद्ध केलेले पाहता थक्क व्हायला होते. म्हणूनच वाटते, की हे सारे अपौरुषेय, अनादिअनंत असावे.

-
वैद्य. विनीता मुळे

अनुक्रमणिका

अनुभव

कवितासंग्रहाचे परिचय

लेखकांचे परिचय

मुलाखत

पुस्तक परिचय

प्रतिक्रियां

छान माहिती विनिता, धन्यवाद.

छान माहिती विनिता, धन्यवाद.

प्रतिसाद द्या

प्रतिक्रिया प्रकाशित करण्यासाठी येण्याची नोंद करा अथवा सदस्य व्हा.