'बोलती पुस्तके' हा मराठीतला पहिला वाहिला free Audio Books प्रकल्प. याबद्दल अधिक जाणुन घ्या इथे.
माणूसकी न विसरलेली भौतिकशास्त्रज्ञ - लिझ माईट्नर
मुखपृष्ठ
|
वीणा गवाणकरांमुळे जॉर्ज वॉशिंग्टन कार्व्हर या शेतकरी-संशोधकाची ओळख खूपच लहानपणी झाली. पुस्तकांच्या दुकानात वीणा गवाणकरांचं नाव पाहून एक पुस्तक उचललं आणि भौतिकशास्त्र शिकूनही या महान स्त्रीचं साधं नावही आधी माहित नव्हतं याबद्दल सखेद आश्चर्य वाटलं. या पुस्तकाची आणि माणूसकी कधीही न विसरलेल्या एका महान वैज्ञानिकाची छोटी ओळख; लिझ माईट्नर, तेरा वेळा नोबेल पुरस्कारासाठी नामांकित झालेली एक भौतिकशास्त्रज्ञ, पण नोबेल पारितोषिकपात्र वैज्ञानिकांची निवड करणारेच खुजे पडले असावे.
भौतिकशास्त्रालाच सर्वस्व अर्पून अणूकेंद्रकांवर काम करणारी लिझ, ऑस्ट्रीयात जन्मलेली ज्यू होती. बाराव्या वर्षानंतर इतर सर्व मुलींप्रमाणेच तिच्याही नशीबात घरीच बसणं होतं. घरी बसून भरतकाम शिकताना तिला त्याचीही आवड लागली. तेव्हा आजीने सांगितलं, "शनिवारी शिवणकाम करणं वाईट!" "आपण करून तर पाहू या काय होतं आहे ते!", असा विचार करून एक टाका घालायचा आणि वर पहायचं, पुढचा टाका घालायचा असं करत संपूर्ण शनिवार भरतकाम करूनही विघ्नरहित गेला. या गोष्टीला आता जवळजवळ शंभर वर्ष झाली असतील, पण आजही गणेश चतुर्थीला चंद्र पहायला नाही या आणि अशा अनेक श्रद्धांवर विश्वास ठेवणारे लोक आजूबाजूला पाहून खेद होतो. आठ वर्ष अशीच घरात काढल्यावर अचानक आशेचा किरण दिसला. पहिल्या महायुद्धानंतर ऑस्ट्रीयन सरकारने मुलींना महाविद्यालयीन शिक्षण खुले केले. लिझच्या मोठ्या बहिणीने महाविद्यालयीन शिक्षणासाठी अत्यावश्यक असलेली 'मॅच्युरा' ही स्पर्धापरीक्षा प्रथम क्रमांकाने ओलांडली आणि पुढच्या वर्षी लिझनेही अथक प्रयत्नांनी महाविद्यालयामधे प्रवेश मिळवला. सुरूवातीला समाजसेवेसाठी डॉक्टर बनण्याचा विचार सोडून स्वतःची आवड म्हणून लिझ भौतिकशास्त्र शिकू लागली.
व्हीएनाच्या विश्वविद्यालयामधे तिला खुद्द लुडविग बोल्ट्झमन ("बोल्ट्झमन स्थिरांक"वाला) शिकवायला होता आणि त्याच्याबरोबरच काम करून लिझने पीएच.डी.ची पदवी मिळवली. व्हिएनामधे तिला मनाजोगते काम मिळेना म्हणून ती बर्लिनमधे आली. तिच्या वडीलांनीच तेव्हा तिला पैशांच्या रूपाने भरीव प्रोत्साहन दिले (तिच्या वयाच्या ३५ वर्षांपर्यंत ती आईवडीलांकडून पैसे घेत होती). मॅक्स प्लँक हा जगविख्यात भौतिकशास्त्रज्ञ तेव्हा (तेव्हाच्या) कैसर विल्यम संस्थेमधे कार्यरत होता. त्याच्या दर आठवड्याला असणार्या व्याख्यानांना उपस्थित रहाण्याची स्त्रियांना अनुमती नव्हती. पण लिझच्या बौद्धिक क्षमतेपुढे नमून प्लँकने त्याचा निर्णय बदलला. तोपर्यंत लिझसोबत काम करण्याची इच्छा ऑटो हान या रेडीओकेमिस्टने व्यक्त केली होती. ऑटोची मदतनीस म्हणून आणि पुढे ऑटोची सहकारी म्हणून लिझ काम करू लागली. ऑटो आणि लिझने बीटा-प्रारणे, अणूकेंद्रके या विषयांवर अनेक पेपर्स लिहीले. अनेक संशोधनांमधे लिझचा सहभाग ऑटोपेक्षा जास्त असूनही त्यांच्या संशोधन पेपरांमधे लिझ स्वतःचं नाव ऑटोच्या नंतरच लिहायची*.
लिझ अनेक वर्ष बिनपगारी काम करत होती. घरून मिळणारी तुटपुंजी मदत, मंदीमुळे झालेली प्रचंड महागाई यामुळे फक्त काळी कॉफी आणि पाव यांवर ती दिवसदिवस रहात होती. वयाच्या ३५व्या वर्षी तिला प्रागमधून नोकरीची पृच्छा झाल्यावर कैझर विल्यम संस्थेतच तिला १००० मार्क्स एवढे वेतन आणि ऑटो हानच्या समकक्ष पद देण्यात आले. पण ऑटोला तिच्या चौपट पगार होता.
पुढे पहिल्या महायुद्धकाळात माणुसकीपोटी लिझ युद्धक्षेत्रात परिचारीकेचे काम करत होती. तिथल्या डॉक्टरांनीच जखमांमुळे युद्धक्षेत्रातून माघार घेतल्यावर लिझही परत आली. पुढे कैझर विल्यम संस्थेतच तिला तिच्या कामासाठी स्वतंत्र विभाग दिला गेला. युद्धानंतर तिने 'ऑजे परिणामा'चे शास्त्रीय विवेचन दिले. ऑटोबरोबर केलेल्या कामातून प्रोटोअॅक्टीनियमचा स्थिर आयसोटोप तिने शोधला. जड अणूकेंद्रकांवर अल्फा कणांचा मारा करण्यापेक्षा धीम्या न्यूट्रॉन्सचा मारा केला तर त्यातून जड मूलद्रव्य तयार होतील यावर तिचा विश्वास होता. चार वर्ष या प्रयोगावर काम केल्यानंतर यात चूक आहे हे तिच्या लक्षात आले. ज्या संशोधनासाठी तिची सगळ्यात जास्त ख्याती होती त्याच कामावर बोळा फिरताना दिसत होतं, तरीही तिने मेहेनतीने ती "जड" मूलद्रव्य काय आहेत याचा शोध घेतला. अणूविखंडनाची प्रक्रिया शोधली गेली ही अशी! युरेनियम-२३५ वर धीमे न्यूट्रॉन्स आदळले की त्यातून बेरियम आणि क्रिप्टॉन तयार होतात ही गोष्ट तिच्या लक्षात आली. आपला सख्खा भाचा रॉबर्ट फ्रीश याच्याबरोबर तिने हे "जगप्रसिद्ध" संशोधन प्रसिद्ध केलं. शांतताकाळात हा शोध मिळती तर आज मॅक्स प्लँक, नील्स बोहर या लोकांबरोबरच कदाचित लिझचंही नाव भौतिकशास्त्राच्या पुस्तकांतून दिसतं.
मधल्या काळात जर्मनीत नाझींचा प्रभाव वाढत होता. जर्मनीतून निसटण्याची आलेली संधी लिझने नाकारली. अजूनही गोष्टी सुधरतील अशी वेडी आशा, पन्नाशी उलटल्यावर नव्या जागी जाण्याबद्दल असलेली भीती इ गोष्टींचा परिणाम म्हणूनही असेल पण जर्मनी न सोडण्याच्या निर्णयाबद्दल तिला पुढे अनेकदा पश्चात्ताप झाला. या काळात जगप्रसिद्ध डॅनिश शास्त्रज्ञ नील्स बोहरनेही तिला कोपनहेगनला येण्याबद्दल सुचवलं. तिचा भाचा आणि कोलॅबोरेटर रॉबर्ट फ्रिशही तेव्हा तिथेच होता. शेवटी डर्क कोस्टर या डच शास्त्रज्ञाने लिझला बर्लिनमधून पळवून नेलं आणि नेदरलंड्समार्गे ती स्वीडनच्या राजधानीत स्टॉकहोमला पोहोचली. जवळ फक्त १० जर्मन मार्क आणि डोक्यात असलेली बौद्धीक संपदा एवढीच काय तिची मिळकत होती. या वेळीस मात्र ऑटोने आपल्या बोटातली हिर्याची अंगठी लिझकडे दिली होती. स्टॉकहोममधे मान सीगमानच्या संस्थेतही लिझला संशोधनाचं स्वातंत्र्य मिळालं नाहीच; पण तरीही तिथूनच ती ऑटो हान आणि त्यांचा सहाय्यक फ्रिट्झ स्ट्रासमन यांना पत्रांतून मार्गदर्शन करत होती. रॉबर्ट फ्रिशच्या जोडीने तिने अणूविखंडनाचा सिद्धांत प्रसिद्ध केला आणि तिच्याच मार्गदर्शनावरून हान आणि स्ट्रासमन जोडीने युरेनियमवर न्यूट्रॉन्सच्या मार्यातून क्रिप्टॉन आणि बेरियम तयार होतात हे प्रयोगांनिशी सिद्ध केले.
याच काळात सुप्रसिद्ध मॅनहटन प्रोजेक्ट सुरू होतं. तिथे काम करण्यासाठी लिझलाही रितसर आमंत्रण होतं. पण "संहारक अस्त्र निर्माण करण्यासाठी मी मदत करणार नाही", असं सांगून तिने नकार दिला. जपानमधे अण्वस्त्र पडल्यानंतर संपूर्ण मिडीयाने तिला "बाँबची ज्यू जननी" म्हणून डोक्यावर घेतलं. प्रसिद्धीची हाव नसलेल्या लिझला तिच्यासंदर्भात 'बदला' वगैरे गोष्टी ऐकून प्रचंड त्रास झाला; अनेक वर्षांपूर्वी ती कॅथलिक झाली होती हे तिचं बोलणं वार्यावरच विरलं. याच संशोधनाबद्दल ऑटो हानला युद्धसमाप्तीनंतर नोबेल पारितोषिक देण्यात आले. आणि या संपूर्ण प्रयोगाची नेती लिझ?
युद्धानंतर ऑटोने आपले स्थान जपण्यासाठी लिझचा उल्लेख टाळला, लिझचं कर्तृत्व जिथे जिथे शक्य असेल तिथे नाकारलं. मदतनीस स्ट्रासमनला त्याने किमान पारितोषिकातले १०% देऊ केले (हाच पैसा स्ट्रासमन पति-पत्नीने "भीक नको" अशा भावनेने नाकरला!) पण लिझ मात्र सदैव दुर्लक्षित राहिली. फ्रिट्झ स्ट्रासमनच्या म्हणण्यानुसार लिझ जन्माने ज्यू असूनही पुरूष असती तर ऑटो हानला तिचं श्रेय नाकारणं शक्यच झालं नसतं. तरीही नोबेल वितरणाच्या समारंभात ऑटो आणि त्याची पत्नी एडीथ यांच्या मैत्रीखातर ती तिथे उपस्थित राहिली!
लिझने तिचं आत्मचरित्र लिहिलं नाही; तिने मागे ठेवलीत ते तिने बनवलेली उपकरणं, त्यांचे आराखडे आणि प्रचंड प्रमाणात शास्त्रीय संशोधनकार्य आणि पत्रव्यवहार! तिच्या आयुष्यावर आधारित The beginning of the end नावाचा चित्रपट लिझने परवानगी नाकारल्यामुळे सुरूवातीलाच बासनात गुंडाळला गेला. आयुष्यभर आणि आयुष्याच्या शेवटासही आर्थिक हलाखी, पैशांची चणचण असतानाही सत्याचा अपलाप करणार्या स्क्रिप्टला तिने अजिबात होकार दिला नाही.
भौतिकशास्त्राला संपूर्णपणे वाहून घेतलेली ही संशोधक वयाच्या नव्वदाव्या वर्षी तिचा भाचा, रॉबर्ट फ्रिश याच्या केंब्रिजमधल्या घरी निर्वतली. हॅंपशरमधल्या एका चर्चमधे तिच्या भावाच्या शेजारी तिला पुरलं. लाडक्या मावशीच्या कबरीच्या दगडावर रॉबर्टने खोदवून घेतलं: "Lise Meitner: a physicist who never lost her humanity."
*ज्या व्यक्तीने काम जास्त केलं असतं तिचं नाव संशोधनात आधी लावलं जातं, या हिशोबात पेपर्स "माईट्नर आणि हान" असे असायला हवे, जे "हान आणि माईट्नर" आहेत.
पुस्तकाचं नाव: लिझ माईट्नर
लेखिका: वीणा गवाणकर
प्रकाशक: राजहंस प्रकाशन
परिक्षण क्लास
परिक्षण क्लास आहे!!
इथे परिक्षण टाक अशी तिथे प्रतिक्रीया देणारच होतो.. पण बघितलं तर इथे आलंच आहे.
एकूणच काय स्त्री भौतिकशास्त्रज्ञा हुशारच हं! 
-ऋ
----------------------
"चला, मी माझा एकमेव जुनाट कोट घालून एक नवं पुस्तक घेऊन येतो"
अदिती पुस्तक नक्कीच
अदिती पुस्तक नक्कीच वाचणार...
लीझ ह्यांची ओळख उत्तम करुन दिलीस..
ह्या आधी कुठे तरी असे अर्धवट वाचले होते... आता पूस्तक वाचावेच लागेल.
निखिल देशपांडे
व्वा! मस्तच. मादाम मेरी
व्वा! मस्तच. मादाम मेरी क्युरींवर एक पुस्तक वाचलं होतं. त्याची आठवण झाली. अर्थात त्यांना नोबेल पारितोषिक मिळाले पण दोघींची संशोधन कार्यातली समर्पणवृत्ती सारखीच म्हाणावी लागेल. बाकी नोबेल मिळणं, न मिळणं हा नशीबाचा भाग!
खूप सुंदर ओळख
मागे एकदा कधीतरी लोकसत्ते मध्ये लिझ बद्द्ल लेख होता. बहुधा निरंजन घाटेंनी लिहिलेला. तेव्हा लिझच्या कार्याची ओळख झाली होती. पण तिच्यावर मराठीत इतकं छान पुस्तक असेल असं वाटलं नव्हतं.
तू मस्तच ओळख करून दिलीयेस. तिला सलाम करण्यासाठी तरी हे पुस्तक वाचायलाच हवं!
धन्यु अदिती 
पुस्तक मस्त आहे
ही ओळख वाचूनच पुस्तक वाचलं होतं.. अर्थातच आवडलं. फक्त धागा खाली गेला होता म्हणून कळवलं नाही. आता अनायसे वर आला आहे तर कळवून घेतो
-ऋ
----------------------
"चला, मी माझा एकमेव जुनाट कोट घालून एक नवं पुस्तक घेऊन येतो"






उत्तम !
वा! सुंदर पुस्तक परिचय लिहिला आहे.
पुस्तक केव्हातरी वाचलं होतं.विसरलं गेलं होतं. आज तू साक्षात उभं केलंस !
मस्त!
माया