• '

भारतीय समाजाचा लेखाजोखा!

प्रभाकर नानावटी
मंगळवार, 3 January, 2012 - 10:59
 

मुखपृष्ठ

पुस्तक जोडलेले नाही

 
 

पुस्तक

पुस्तक जोडलेले नाही

 

'साधना' साप्ताहिक, 'अंतर्नाद', 'अनुभव' या नियतकालिकात आलेल्या विनय हर्डीकर यांच्या विठ्ठलाची आंगी या पुस्तकावरील परीक्षणवजा परिचय वाचत असताना मूळ पुस्तक वाचून काढावे असे वाटू लागले. मुळातच या लेखकाच्या राजकीय बांधिलकीचा विचार करताना पुस्तक वाचावे की नाही या विचारातच होतो. परंतु पुस्तक वाचून झाल्यानंतर हा लेखक तटस्थपणे विचार करू शकतो हे लक्षात आले. पुस्तक वाचत असताना लेखकाच्या विचाराची दिशा कळायला लागली. काहींच्यात हात लावीन तिथे सोनं अशी धमक असते व काही मात्र हात लावतील त्याची राख रांगोळी असा प्रकार असतो. पहिल्या प्रकारातील काही मोजक्यांच्यामध्ये विनय हर्डीकरांचे नाव सुचवावेसे वाटते.

पुस्तकातील लेखापैकी कविताएक लेखक घडत जातो हे दोन लेख सोडल्यास इतर प्रत्येक लेखावर काही ना काही टीका - टिप्पणी करणे शक्य आहे. पहिला लेख लोकशाहीतून प्रजाप्रभुत्वाकडे हा 1975च्या आणिबाणीच्या संदर्भात असून त्यावेळच्या घडामोडींचे पुनर्दर्शन करून देणारा आहे. इंदिरा गांधींची हुकुमशाही, त्यातून जन्माला आलेला जनता पक्ष, या राजकीय पक्षानी केलेली घोर निराशा, इंदिरा गांधीचे पुनरागमन, इत्यादी तपशील या लेखात आहेत. हर्डीकर हे हाडाचे पत्रकार असल्यामुळे यांनी त्याकाळी सगळीकडे हिंडून, फिरून भारतीय लोकशाही कुठल्या दिशेने चालली आहे याचा नेमका अंदाज घेतला व त्यावरून हा लेख लिहिला गेला. जातीचे राजकारण, तोडा - फोडा ही रणनीती, सुशिक्षितांची उदासीनता, दहशत पसरविणारी अरेरावी, धादांत खोटे बोलत राहणे, खऱ्या - खोट्या दंतकथा पसरविणे, कार्यकर्त्यांची लाचारी, नेत्यांची लोकविलक्षण (खोटी) प्रतिमा उभी करणे इत्यादीमुळे या देशात ना लोकशाही ना प्रजाप्रभुत्व अशी एक वेगळीच व्यवस्था जन्माला आली आहे. अशा ओबड धोबड लोकशाहीपेक्षा सरंजामी पद्धत बरी असे वाटण्याइतपत उबग आणणारी ही निकृष्ट व्यवस्था आहे. याच लेखामध्ये जयप्रकाश नारायण यांच्या नावाचा उपयोग करून सत्ता लोलुपता कशी शिगेला पोचली याचे वर्णन आहे.

जनता पक्ष - म्हणजे पूर्वीचा जनसंघ व समाजवादी पक्ष यांची मोट - एक विशिष्ट तत्व प्रणाली घेऊन जन्माला आली होती. स्वार्थत्यागपूर्वक जनसामान्यांसाठी काम करणं, आयुष्यभर काही तत्वांचा पाठपुरावा करून चारित्र्याचा आदर्श सामान्यजनांच्या समोर ठेवणं, आपल काम करताना राजकीय सत्ता हाताशी राहते की नाही याचा विचार न करणं, ही ती समान सूत्र होती. परंतु याच जनसंघात भाजपा मध्ये बदलून सत्ता हातात आल्यानंतर या सूत्रातील कुठलीही निशाणी शिल्लक नव्हती.

संपूर्ण लेख वाचून झाल्यानंतर एका प्रकारची हुरहुर तशीच राहते. हा लेख 1979मध्ये लिहिलेला होता. आहे तसाच तो पुस्तकात छापल्यामुळे लेखकांचे अनेक आडाखे चुकल्याचे लक्षात येते. लेखकाच्या मर्यादाही लक्षात येऊ लागतात. निदान पुस्तकात लेख समावेश करताना तरी लेखकानी आपल्या मतांचे मूल्यमापन करून टिप्पणी जोडायला हवी होती. जॉर्ज फर्नांडीसच्या बाबतीत लेखकाला टोकाची सहानुभूती होती हे पटकन जाणवते. एवढ्या वर्षानंतर लेखकाची मतं बदलली आहेत की नाही हे कळायला मार्ग नाही.

एका बातमीच्या पायी हा एक शोधपत्रिकेचा उत्कृष्ट नमूना ठरू शकेल. चेहरे बोलतात, डोळे बोलतात हा लेख युवा पिढीसाठी असून त्यांच्या मनस्थितीचा अंदाज लेखक घेतात. वक्तशीरपणा, प्रामाणिकपणा, गुणवत्तेचा उत्कृष्टतेचा (efficiency) आग्रह धरला की कधी कधी अत्यंत जवळचे लोक, वर्षानुवर्षाचे मित्र, घरातली माणसं दुखावली जातात. मनाला त्रास होतो. म्हणून या गोष्टींचा आग्रह धरणेच सोडून दिले तर कसे चालेल? हा प्रश्न युवकांना उद्देशून असून याचे उत्तर त्यांनाच द्यायचे आहे.

आमच्या देशाची स्थिती हा लेख भाजपाच्या इतिहासकालीन परंपरेच्या दुराग्रहावरील टीकात्मक असा लेख आहे. हिंदू हिंदू म्हणून ऊर बडवण्यापेक्षा या देशाची स्थिती कशामुळे सुधारेल याचा विचार करणे अगत्याचे आहे, असे लेखकांना वाटते. आपली असहिष्णुता किती बेगडी आहे हेसुद्धा लेखकांनी दाखवून दिले आहे. टिळकांच्या दुहेरी राजकारणामुळे या देशाचे भरपूर नुकसान झाले आहे, हे नमूद करताना एकीकडे मुस्लिमधार्जिण्या जिनांचे वकीलपत्र घ्यायचे व दुसरीकडे मुस्लिमांना डिवचण्यासाठी सण, उत्सव यांना प्रोत्साहन द्यायचे यावर हर्डीकर यांनी टीका केली आहे.

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे 75 वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने लिहिलेला लेख मुळातूनच वाचायला हवा. एवढेच नव्हे तर संघाच्या चुका आणखी कुठल्याही संघटनेने करू नये असे वाटत असल्यास संघटनेतील कार्यकर्त्यांना स्वतंत्रपणे विचार करण्याची सवय लावणे गरजेचे आहे, यावर लेखक भर देवू इच्छितात. संघटना केवळ सांस्कृतिक, केवळ सामाजिक वा केवळ एकमेव मुद्यासाठी लढणारी संघटना असे कधीच असू शकत नाही. माणसांशी जेव्हा संबंध येतो तेव्हा आपोआपच राजकारण तेथे येतेच. लेखकानीसुद्धा गांधीहत्येचा गांधीवध म्हणून उल्लेख केल्यामुळे संघाचा वचक किती खोलपर्यंत आहे हे लक्षात येईल. गांधीजींचा खून करणारा संघाचा स्वयंसेवक नव्हता, त्यामुळे संघाला दोष देवू नये असे तर लेखकांना वाटत नाही ना? परंतु संघाची विचारधारा व हिंदूमहासभेची उद्दिष्टे यात एकवाक्यता होती याचा विसर लेखकाला पडला आहे की काय असे वाटू लागते. या सर्व गोष्टींची परिणती नरेंद्र मोदीने मुद्दामहून घडवून आणलेल्या हत्याकांडात झाली असे पश्चात बुद्धीने नक्कीच म्हणता येईल.

उपहास सरस्वतीचा, उपेक्षा लक्ष्मीची, उठाठेव शक्तीची असे शीर्षक असलेल्या लेखामध्ये भाजपाची सरस्वतीची उपेक्षा हे ठीक वाटते. परंतु भाजपा सत्तेवर आल्यानंतर लक्ष्मीची उपेक्षा केली होती असे वाटत नाही. त्याच काळात संघप्रेरित भाजपाच्या मंत्र्यांचा भ्रष्टाचार व आर्थिक घोळ शिगेला पोचला होता. मुळातच वैचारिकतेचे खच्चीकरण हेच संघाचे ब्रीदवाक्य आहे.

अचानक संपलेला महोत्सव हा प्रयोग परिवाराच्या श्री अ दाभोळकरावरील मृत्युलेख आहे. लेख वाचत असताना लेखकाने फारच भावनाप्रधान होऊन हा लेख लिहिला असावा असे वाटू लागते. हर्डीकरांकडून अशी अपेक्षा नव्हती. परिवार प्रयोगाची संकल्पना आयुर्वेद उपचारासारखी आहे असे म्हणण्यास भरपूर वाव आहे.व्यक्तीविशिष्टतेवर त्याचा भर जास्त असतो. विज्ञानाचा गाभा आहे असे वाटत असले तरी universally adopt न करता येण्यासारखी ती संकल्पना आहे.

फारसं काही कळत नव्हतं हा लेख भारतीय समाजाच्या काही मूलभूत समस्यावर बोट ठेवणारा लेख आहे. लेखकाच्या मते व्यवहारात दैववादी असलेला हा भारतीय आळशीच राहील, प्रयत्न करणे सोडून देईल. ज्या देशांनी धर्मगुरूंची सत्ता झुगारून, ईश्वरी न्याय-अन्यायाच्या कल्पना बाजूला सारून मानवीजगाचे नियंत्रण मानवच करतील असा ठाम विश्वास बाळगून पल्ला गाठला तेच देश विकसित व आधुनिक झालेले आहेत. स्वदेशी तुण तुणं वाजवत राहणं म्हणजे एका प्रकारचे प्रतिभा दारिद्र्यच म्हणायला हवे.

सुमारांची सद्दी हा लेख लोकानुनयावर भर देणार्‍या आजकालच्या नेत्यावरचा आहे. संस्था - संघटना इत्यादींचे गणित सांभाळणार्‍यांनी वाचायलाच हवा असा हा लेख आहे. विचार, ज्ञान यांचा वणवा आता आपल्याला जाणवायला लागला आहे. काऱण सुमारांचीच सर्व (मोक्याच्या) ठिकाणी वर्णी लागलेली आहे. साधेपणा व अभावग्रस्त दारिद्र्य यातील भेद पुसटशी झालेले आहेत. गांधींचा भर आतल्या आवाजाचा, साने गुरुजींचा कळवळ्या जातीचा व संघाच्या गुरूजींचा आज्ञांकित प्रश्नहीन समर्पणावरचा. संघाचा आग्रह - सांगू तिकडे, सांगू त्यावेळी, जा म्हटले की विना तक्रार जायचे. का हा प्रश्न विचारायचे नाही. प्रश्न विचारणे बावळटपणाचे लक्षण. संघ परंपरेला नवा विचार, नवीन दृष्टी, नव्या समाजाच आधुनिक प्रारूप नकोच होते. त्यांच्या मांडणीत सत्य, अर्धसत्य, असत्य, सांगोवांगी यांची सरमिसळ झालेली असते. आपल्या सोईसाठी ते ऐतिहासिक पुरावे विकृत करतात. कधी कधी अनैतिहासिक भूमिका घेतात. निष्कर्ष आधी ठरवतात व नंतर पुरावे उभे करतात. भावनेला आव्हान करून निष्कर्ष माथी मारतात.

लेखकाच्या मते सुमारांची सद्दी म्हणण्यासाठी वैचारिक बैठक नसणे हे एकमेव कारण पुरेसे आहे. राजकारणी आणि सुशिक्षित पदवीधर या दोन्ही वर्गानी अभ्यास व विचार पूर्णपणे सोडून दिलेले आहे. नोकर्‍यांच्या संख्येत प्रचंड प्रमाणात वाढ झाल्यामुळे राजकारण वर्ज्य मानून सुशिक्षित वर्ग नोकर्‍यांच्या मागे लागला. अभ्यास, ज्ञानसाधना, चिंतन, संशोधन, हे ध्यासविषय म्हणून राहिले नाहीत. अशा गोष्टींनासुद्धा नोकरीचे लेबल चिकटले. राजकारण्यांना तर तत्वज्ञान, अभ्यास, विचार करण्यापेक्षा सत्ता हातात ठेवणं व पिढ्यान पिढ्या ते टिकवणं हेच सोईच होतं. व ते कसे करावे याचे तंत्रही त्यानी आत्मसात केले आहे. राजकारण व अर्थकारण एकत्र करून व्यापक समाजकारण करण्यापेक्षा सत्ता हातात ठेवणं यालाच चलाखी (street smartness) म्हणू लागले. सर्व अधिकार पदावर नालायकांची नेमणूक करून आपले वर्चस्व गाजवत राहिले. सुशिक्षितांकडे काही करून दाखवण्याची धमक नाही, पराक्रम नाही, दर्जा टिकवण्याची आस नाही, जागतिक स्तरावर पोचण्याची मनीषा नाही. एकाही ज्वलंत प्रश्नाचे प्रभावी उत्तर शोधून काढता येत नाही. नोकरीतील स्थिरता हेच मूल्य असे त्यांना वाटत आहे. त्यासाठी कुठल्याही थराला जाण्याची त्यांचा तयारी आहे. स्वत:चे उपद्रवमूल्य वाढवून पदं संभाळली जात आहेत. राजकारण्यांचे, वरिष्ठांचे लांगूलचालन नित्याची बाब ठरत आहे. खराखुरा अभ्यास करणारा मागे पडू लागला. तो निरुपद्रवी राहिला. अभ्यास मागे पडू लागला. ज्ञानमार्गीयांची सद्दी संपली. मुळातच फक्त एक टक्का लोक विचार करतात, नऊ टक्के आपण विचार करू शकतो या भ्रमेत असतात आणि उरलेले नव्वद टक्के एक वेळ जीव देतील पण विचार करणार नाहीत. यांना फक्त आयुष्यभर मनोरंजक उचापती लागतात. मनोरंजनासाठी हे लोक वाटेल तेवढे पैसे खर्च करतील पण पैसे देऊन विचारात पडणं, परिस्थिती वाईट आहे हे ऐकणं, वाचन करणं म्हणजे या वर्गाला विकतच श्राद्ध वाटतं. धकाधकीच्या जीवघेण्या आर्थिक स्पर्धेच्या तणावाखाली टिकून राहण्यासाठी आणि आर्थिक फायदे आपल्या हातातून निसटणार नाहीत ना या भीतीशी या वर्गाचा आंतरिक झगडा चालू असतो. ही भीती लपविण्यासाठी सर्व काही ठीकठाक, आबादी आबाद याच गुंगीमध्ये राहणे ते पसंत करतील. याच वृत्तीच्या ते आता संपूर्ण आहारी गेलेले आहेत.

हा एक फार सुंदर लेख आहे. प्रत्येक पुरागामी संघटनांनी याचा विचार केला पाहिजे. आत्म परीक्षण केले पाहिजे. अभ्यास, विचार, तर्क, चर्चा, वाद-प्रतिवाद यांना प्राधान्यक्रम दिल्याशिवाय संघटना तग धरू शकणार नाही. आजकालच्या कार्यकर्त्यांची वैचारिक कुवत पाहता यांना फार लांबचा पल्ला गाठायचाच नाही हे लक्षात येईल. काही तरी थातुर मातुर काम करून वेळ मारून नेणे व छोट्या पडद्यावर चमकत राहणे एवढेच त्यांचे उद्दिष्ट असते. पुरोगामी नियतकालिकांतील प्रचारकी थाटाचे नैमित्तिक व प्रासंगिक लेख वाचताना कार्यकर्ता व वाचकांना वैचारिक कुवत आहे की नाही इतपत शंका येते.

पूर्णताकी खोज मेंजग बदल घालूनी घाव हे दोन लेख, लेखकाच्या ऐन तारुण्यातील आचार, विचार व कृतीवर बेतलेले आहेत. 60-70 च्या दशकात दीन दयाळ उपाध्याय व राम मनोहर लोहिया यांचे सर्व तरुण-तरुणींना आकर्षण होते. बाबा आमटे देवतासमान वाटत होते. हर्डीकरांचा हा उमेदवारीचा काळ होता. साधनेचे यदुनाथ थत्ते व माणूसचे श्री ग माजगांवकर यांनी लेखकाला प्रोत्साहन दिले. परंतु ऐन तारुण्यातील काही वर्षे संघाच्या सेवेत गेलेले होते. त्यातील बंधनाचा उबग आला होता. त्यामुळे या संपादकांच्या उत्तेजनामधून हर्डीकर घडत गेले. ज्ञानप्रबोधिनीमधील शिक्षकी पेशा स्वीकारण्यापूर्वी हर्डीकरांना स्वत:बद्दल,स्वत:च्या कर्तृत्वाबद्दल भरपूर आत्मविश्वास होता. परंतु संघाला अगदी जवळून पाहिल्यानंतर व त्यांच्या राजकारणाची ओळख पटल्यानंतर संघाविषयीचा भ्रमाचा भोपळा फुटला. निवडणुकाच्या राजकारणातील छक्के पंजे हळू हळू कळू लागले. अप्पा पेंडसे व बाबा आमटे यांच्या संघटनांचाही हर्डीकरींनी जवळून परिचय करून घेतला. या संघटनांनीसुद्धा त्यांची निराशा केली.

धकाधकीच्या सामाजिक संघर्षातून अंग काढून घेऊन काही आदर्श (अमूर्त!) ध्येय युवकासमोर ठेवण्यासाठी लेखक धडपडत असताना ही कसरत अनेक वेळा त्यांच्या अंगलटी यायची. तथाकथित सामाजिक संघटना/ संस्था स्वत:च्या कार्यकर्त्यांना गुंतवून ठेवण्यासाठी वर्षभराचे पंचांगच (कॅलेंडर!) तयार करतात. नंतर नंतर त्या कार्यक्रमांच कर्मकांड होत, हे त्यांच्या लक्षात येऊ लागल. राजकारण टाळण्यासाठी काढलेल्या संस्थेतच (घाणेरडं!) राजकारण सुरू होत. इंदिरा गांधींची आणिबाणी याच वेळी लादली गेली. हर्डीकर इंडियन एक्सप्रेसमध्ये गेले. त्याकाळातील अनेक गोष्टींची नोंद या लेखात आहे. या सर्व उपद्व्यापानंतर हर्डीकर शरद जोशींच्या शेतकरी संघटनेत सामील झाले. शरद जोशींनी हर्डीकरावरती चक्क जादू केली. परंतु शरद जोशीनी नंतर नंतर ज्या प्रकारे कोलांटी उड्या मारल्या ते हर्डीकरांच्या लक्षात कसे आले नाही याचे राहून राहून आश्चर्य वाटू लागते.

पुस्तक वाचून संपल्यानंतर एका प्रकारचा अस्वस्थपणा जाणवू लागतो. कदाचित हा अस्वस्थपणाच लेखकाच्या प्रतिभेची पावती असे म्हणावे लागेल.

एक उत्कृष्ट पुस्तक!

विठ्ठलाची आंगी
विनय हर्डीकर
देशमुख प्रकाशन, पुणे (2008)
पृ. सं. 300 किंमत - 300 रु

आंगी

विठ्ठलाची आंगी असे नाव का बरे दिले असावे ? आंगी म्हणजे काय ?

बाकी पुस्तकपरिचय नेहमीप्रमाणेच उत्तम, आवडला.