• '

ब्र' एक मुलुखावेगळी कादंबरी

प्रभाकर नानावटी
सोमवार, 22 November, 2010 - 10:54
 

मुखपृष्ठ

 
 

पुस्तक

ब्र
 

कविता महाजन यांची ' ब्र' कादंबरी वाचताना मनामध्ये अनेक गोष्टी घर करून बसतात. संपूर्ण कादंबरीभर आदिवासी पाड्यात घडणारे व त्यांच्या जीवनाचा वेध घेणारे अनेक प्रसंग असल्यामुळे ही एक मुलुखावेगळी कादंबरी आहे याची जाणीव होते. पुस्तक वाचून संपवल्यानंतर एका अत्यंत वेगळया अनुभवातून आपण गेलो होतो हे लक्षात येते. मुळात ही कादंबरी प्रफुल्ला या मध्यमवर्गीय, शहरी साच्यातील एका मनस्वी स्त्रीची कहाणी आहे की, अंशत: लेखिकेचे आत्मकथन आहे की आजकालच्या सामाजिक कार्याविषयीच्या गुणदोषावर भाष्य करण्यासाठी वापरलेले तंत्र आहे हे शेवटपर्यंत कळत नाही.

कादंबरी म्हणून बघण्याचे ठरवल्यास ही एक अफलातली कादंबरी आहे याबद्दल शंका नाही. चाकोरीच्या बाहेर जाऊन कादंबरीचा विषय व आशय निवडणे हे नेहमीच त्रासदायक असते. व त्या विषयाला योग्य न्याय देणे हे त्याहूनही अवघड ठरू शकते. परंतु लेखिकेला ही भट्टी चांगल्यापैकी जमलेली आहे. कादंबरीतील प्रत्येक पात्राविषयी वाचकाला काही ठाम भूमिका घेण्यास भाग पाडते. प्रत्येक प्रसंगाचे विश्लेषण करण्यास उद्युक्त करते. 'फुलाबाई', तिचा नवरा, तिचा मुलगा, तिची बहीण, सुमेध यासारख्या व्यक्तिरेखा जगात असू शकतात का असा प्रश्न विचारावासा वाटतो. परंतु सत्य हे कल्पनेपेक्षा भयानक असू शकते हेच खरे असल्यास हा समाज कसा व कधी बदलणार याची काळजी वाटू लागते.

कदाचित या पुस्तकात चितरलेली कथा लेखिकेच्या खडतर जीवनातील अनुभवावर बेतलेली असल्यास असले भोग कुणाच्याही वाटेला येऊ नयेत असे म्हणावे लागेल. एखाद्या थरारक चित्रपटातील प्रसंगमालिकेप्रमाणे घटनेमागून घटना घडत जातात व असेच का व कसे याचा विचार करण्यासाठीसुध्दा उसंत मिळत नाही. पुढे काय घडणार, प्रफुल्लाची गाडी रुळावर कधी येणार, तिचे भोग कधी संपणार यांची उत्कंठा वाटू लागते. व पुस्तक वाचून हातावेगळे केंव्हा होते हेच कळत नाही. परंतु पुस्तक वाचताना लेखिकेने मांडलेला हा कल्पनेतला खेळ आहे असे न वाटता तिच्या स्वत:च्या अनुभवांचेच कथन आहे असे वाटू लागते. याप्रकारे वाचकांना संमोहित करण्यास लेखिका यशस्वी झाली आहे.

पुस्तकाचे कथानक निमित्त मात्र असून आपल्या देशातील व विशेषकरून महाराष्ट्रातील सामाजिक संघटनांचा लेखाजोखा वाचकासमोर ठेवण्याचा उद्देश असल्यास, व हे सर्व खरे असल्यास, या समाजाची पुढील वाटचाल कशी असेल याविषयी चिंता वाटू लागते. कशावर कितपत विश्वास ठेवावा हेच कळेनासे होते. या क्षेत्रात तरी असे काही घडू नये असे मनापासून वाटू लागते. परंतु लेखिकेने केलेली टीका वा भाष्य रास्त आहे असेच म्हणण्याची परिस्थिती आता आहे. अशा सामाजिक संघटनांचे बरबटलेले हात पाहून यानंतर कुणी विवेकी माणूस सामाजिक कार्याच्या फंदात पडायचे की नाही याचा हजार वेळा विचार करेल.

एकंदरीत या कादंबरीने आपले डोळे उघडले. शेवटच्या काही घटनांचा अपवाद वगळल्यास लेखिकेने कथानकाचा वेग फार छान ठेवला आहे. शेवटी शेवटी मात्र एकामागून एक घटना अत्यल्प काळात घडत गेल्यामुळे कादंबरीला गालबोट लागल्यासारखे वाटते. कदाचित शेवट धक्कादायक करण्याच्या प्रयत्नामुळे तसे झाले असावे.

पूर्वप्रसिद्धी: उपक्रम

मस्त ओळख

मागे दिगम्भांनी पुस्तककोड्यात ह्यातील वेचा दिला होता. तेव्हाच पुस्तक मिळवून वाचले होते. आणि नंतर विकतच घेतले आहे.
पुस्तक अफलातून आहे यात शंका नाही. या पुस्तकाच्या लेखिका कविता महाजन यांची मकने घेतलेली दिवाळी अंकातील मुलाखतही वाचनीय आहे

-ऋ
----------------------
"चला, मी माझा एकमेव जुनाट कोट घालून एक नवं पुस्तक घेऊन येतो"

पुन्हा एकदा सुंदर ओळख

पुवि वर झालेल्या चर्चेमुळेच 'ब्र' घेतली होती आणि अलिकडेच वाचली. अफलातून आहे कादंबरी. संवेदनशील विषयावर असूनही एवढ्या परिणामकारकपणे लिहिणे ही देखील एक कलाच आहे.

प्रभाकर तुमच्या दृष्टीकोनातून ह्या कादंबरीची पुन्हा एकदा ओळख झाली Smile

धन्यवाद

मी एक पुस्तकवेडा
http://pustakveda.blogspot.com/

छान परिचय!!

दर सोमवारी तुमच्या पुस्तक परिचयाची आम्ही वाट बघत असतो. आज जरा उशिर झाला त्यामुले वाटलं कि नेम चुकतो कि काय!!Smile
ब्र बद्दल बरच ऐकलं आहे!! आता वाचायलाच हवी!! Smile

उत्तम परिचय!

'ब्र' वाचली तेव्हाच आवडली. फक्त थोडी लहान करता आली असती तर आणखी जास्त इफेक्टीव्ह वाटली असती, असं वाटलं.

अगदी असंच. 'ब्र' आणि

अगदी असंच. 'ब्र' आणि 'भिन्न'बद्दलही.
काही निमित्तानं एका मैत्रिणीला 'भिन्न' मोठ्यानं वाचून दाखवत होते. तेव्हा माझ्या हे लक्षात आलं आणि नकळत मी 'एडिटिंग' करायला सुरुवात केली! तिला माझी ही कापाकापी अज्याबात जाणवत नाही म्हटल्यावर मी चक्रावून ती दोन्ही पुस्तकं परत एकदा वाचली.
तेव्हा जाणवलं - एनजीओज आणि वेश्या + एड्स यांचं विश्व मराठी वाचकाला बरंच नवीन आहे. माहिती मिळते, आपण गुंगतो. पण म्हणून तो लिहिलेला तपशील गोष्टीसाठी आवश्यक असतोच, असं अजिबात नाही.

अवांतरः हेच 'नातिचरामि'लाही लागू होतं का, असा विचार करत असताना माझा गोंधळ उडाला. आशयाच्या दृष्टीनं त्यातला प्रत्येक भाग काहीएक म्हणत असतो. मग ती कादंबरी इतकी विस्कळीत का वाटते? ( कुणी आहे का हे प्रश्न पडलेलं किंवा उत्तरं / चर्चा करायची खुमखुमी असलेलं?! Wink )

- मेघना भुस्कुटे

ब्र

श्री. नानावटी,

परीक्षणाबद्दल आभार.
खरेतर ब्र लिहून पुष्कळ वर्षे झाली. सारे तपशिलात आठवत नाहीये.
मेघनाच्या प्रश्नावरून काही शेअर करावे आणि चर्चेसाठी आपल्या सगळ्यांच्या समोर ठेवावेसे वाटतेय.
ते असे आहे :
"लेखक जसा एखादे पुस्तक लिहितो, त्याचप्रमाणे वाचकही वाचता-वाचता ते पुस्तक पुन्हा मनातल्या मनात लिहीत असतो, असे मला वाटते."
म्हणजे मेघनाप्रमाणेच मीही पूर्वी कोणतेही पुस्तक वाचताना 'असे असते तर / असे नसते तर / हे हवे होते / ते नको होते इत्यादी' मनाशी रचत वाचायची. पुढे ती सवय मी जाणीवपूर्वक मोडली आणि वाचत असलेल्या पुस्तकाचा निखळ आनंद मला घेता येऊ लागला.
मी गद्य लिहिण्यास सुरुवात केली, त्यानंतर 'लिहिण्याची रीत' प्राथमिक स्वरूपात ध्यानात येत गेली आणि त्यामुळे माझ्या वाचनात हा बदल घडला. मुळात कुणीही काहीही लिहिते तेव्हा त्याने काय सांगायचे, कसे - किती सांगायचे, कधी सांगायचे आणि कोणत्या शब्दांत सांगायचे याबाबत स्वतःशी अनेकवेळा संपादन केलेले असतेच. ( मग ते आपण लिहीत असलेले एखादे व्यक्तिगत पत्र असो वा खासगी डायरी असो!) जेव्हा मजकूर 'छापायचा' असे ठरते तेव्हा त्यात इतर 'संपादक' - काही व्यावसायिक आणि काही आपल्या परिवारातले - ते नजरेखालून घालतात. प्रकाशन ही एक मोठी प्रक्रिया असते, ज्यात संपादक असतातच. ( निदान प्रस्थापित प्रकाशकांकडे तरी ). या संपादनानंतर लेखकाचा निर्णय हा अंतिम मानला जातो. मी स्वतः अशी पुस्तकांच्या - मासिकांच्या संपादनाची कामे गेली अनेक वर्षे करत आलेली आहे; तेव्हा 'चुकीची माहिती'देखील लेखकाचा निर्णय म्हणून जशीच्या तशी ठेवावी लागते हे अनुभवले आहे. कारण 'लेखकाचा विचार' महत्त्वाचा मानला जातो. ( लेखक असे लिहिण्या- न लिहिण्याचे निर्णय का घेतो, हा स्वतंत्र चर्चेचा विषय आहे. 'भिन्न'मध्ये मी जे पाहिले / अनुभवले / जाणले त्याच्या केवळ दहा टक्केच लिहिले आहे. )
मी सावकाश लिहिते, लिहिल्यानंतर काही महिने ते प्रकाशित करत नाही, संपादन करून घेते ( कवितांचेही ! ) आणि मग प्रकाशनासाठी देते; हे अनेक समकालिन लेखकांना पटत / आवडत नाही. पण संपादन ही पायरी वगळून उडी मारणे मला व्यक्तिश: आवडत नाही.
प्रत्येक संपादकाचा सल्ला वेगळा असतो. प्रत्येक वाचकाची प्रतिक्रिया वेगळी असते. ( जे स्वयंसेवी संस्थांचे जग अनुभवलेले वाचक आहेत, त्यांना 'हिने पुन्हा आपल्याला माहीत असलेलेच का लिहिले? असे वाटले आहे. ) मेघनाच्या मैत्रिणीने जर असेच तिला वाचून दाखवले तर तिने 'वगळलेला' भाग निराळा असेल हे नक्की. आणि यातच पुस्तक वाचण्याची गंमत असते.
जे जितके जसे लिहिले गेले आहे, ती 'लेखकाची निवड' असते हे मला समजले आणि मी हातातले लाल पेन (प्रत्यक्षातले व मनातलेही ) बाजूला फेकून पुस्तक वाचायला शिकले. असे मुद्दे बाजूला ठेवले की पुस्तकाची नीट समीक्षा करता येते, हेही त्यानंतरच माझ्या ध्यानात आले.

आवर्जून दखल घेऊन लिहिलेल्या

आवर्जून दखल घेऊन लिहिलेल्या उत्तराबद्दल आधी आभार मानते.
'लेखकाची निवड' हा मुद्दा पटला. मला लाल पेन फेकून वाचायला शिकले पाहिजे!

- मेघना भुस्कुटे

सविस्तर प्रतिसादाबद्दल धन्यवाद.

यावर तुम्ही काहीतरी भाष्य करालच असं वाटलं होतं, पण दोन-तीन दिवस उत्तर न आल्याने तुम्ही व्यग्र असाल असं वाटून गप्प बसले होते.
'ब्र' वाचली तेव्हा बर्‍याचशा गोष्टी माझ्यासाठी नव्या होत्या, तरीही ती आणखी थोडी लहान असती तर बरं झालं असतं हे तेव्हाही मत होतंच. पण आपल्या गप्पांमधून तिची निर्मितीप्रक्रिया जाणून घेतल्यानंतर पुनर्वाचन करताना कदाचित मला तसं वाटणार नाही. हेच 'भिन्न'च्या बाबतीतही म्हणता येईल. विषय माहित होता, पण पुस्तक वाचायचा योग आला नव्हता. मात्र त्याबाबतीत इतकं ऐकल्यामुळे आणि लेखकाचा दृष्टीकोन माहित असल्याने पुस्तक त्या रोखानंच वाचलं गेलं. संपादनाची गरज आहे असे मलातरी नाही जाणवलं. दोन्ही पुस्तकांच्या जाणवलेलं आणि आवडलेलं साम्य म्हणजे पुस्तकं संपताना सकारात्मक छाप सोडून जातात.

आता हे ही खरं, की प्रत्येकाला प्रत्येकच लेखकाचा दृष्टीकोन कळेलच असे नाही. तेव्हा त्या अनुषंगाने आणि परावा कट्ट्याला झालेल्या चर्चेच्या अनुषंगानेही,

जे जितके जसे लिहिले गेले आहे, ती 'लेखकाची निवड' असते हे मला समजले आणि मी हातातले लाल पेन (प्रत्यक्षातले व मनातलेही ) बाजूला फेकून पुस्तक वाचायला शिकले. असे मुद्दे बाजूला ठेवले की पुस्तकाची नीट समीक्षा करता येते, हेही त्यानंतरच माझ्या ध्यानात आले.

हे मला स्वतःला अंगी बाणवण्याची गरज आहे असे वाटतंय.