||दिवाळी २०१०||

बौद्धांचे आणि जैनांचे संस्कृत साहित्यातले योगदान - एक आढावा
अवलिया

संस्कृत. पुरातन कालापासून भारत देशातली एक प्रमुख भाषा. ह्या भाषेचे जितके समर्थक आहेत तितकेच तिचे कट्टर विरोधकदेखील आहेत. संस्कृत हीच भारताची राष्ट्रभाषा हवी या अभिनिवेशाने भांडणारे आहेत तितकेच संस्कृतच्या सर्व खुणा नष्ट केल्या जाव्यात अशी मागणी करणारेसुद्धा आहेत. मात्र या दोन्ही टोकाच्या भूमिका घेणार्‍यांमधे एक गोष्ट मात्र समान आहे आणि ती म्हणजे या भाषेचे असलेले अज्ञान. दोघांनाही संस्कृतबद्दल फार थोडे माहीत असते आणि जे माहीत असते ते बर्‍याच वेळेला तथ्यांशी संपूर्ण फारकत घेतलेले असते.

संस्कृत म्हटले की बर्‍याचशा लोकांच्या डोळ्यांसमोर रामरक्षा, अथर्वशीर्ष, दोन-चार स्तोत्रे पटकन येतात. याशिवाय कधी काळी लग्नात, श्राद्धात, पूजेच्या वेळी ऐकलेले भिक्षुकांच्या तोंडातले मंत्र आणि काहीतरी अगम्य भाषेत असलेले वेद - ज्यांच्यापासून सर्व ज्ञान उत्पन्न झाले अशी पूर्वापार असलेली समजूत. बास! अगदी कट्टर संस्कृतप्रेमी यापलीकडे काही जाणत नाही. थोडीफार स्मृती चांगली असेल आणि दहावीला स्कोअरिंगला संस्कृत घेतले असेल तर रामः रामौ वगैरे पटकन म्हणू शकतो आणि समोरच्याला चूक काढता येणार नाही हा विश्वास असल्याने दोन चार सुभाषिते पुटपुटतो. संपला संस्कृतचा संबंध! पण संस्कृत राष्ट्रभाषा हवी का, या प्रश्नाला उत्तर इतक्या जोरात 'हो' म्हणून देणार की ५० काय १०० डेसिबलची मर्यादा कधीच ओलांडली जावी.

संस्कृतमधे प्रत्येक विषयावर अक्षरशः हजारांनी ग्रंथ आहेत. अगदी कामशास्त्रापासून अध्यात्मापर्यंत, धर्मापासून जादुटोण्यापर्यंत, शिल्प, ज्योतिष, आयुर्वेद...गणती संपणारच नाही. थोडेफार ह्यासंबंधी अनेक जण जाणत असतात. पण एक गोष्ट बरेच लोकांना माहीत नसते की संस्कृत ही परंपरेने वैदिक धर्मीयांची भाषा मानली गेली असली तरी अनेक बौद्ध तसेच जैन अनुयायांनी संस्कृतमध्ये विपुल लेखन केले आहे. महावीराने आणि बुद्धाने त्यांचा उपदेश लोकांना समजेल अशा बोली भाषेत करावा, या हेतुने संस्कृतव्यतिरिक्त अन्य भाषा निवडल्या. त्यामुळे त्यांच्या मताचा प्रसार झाला हे खरे, परंतु साधारणतः इसवी सनाच्या पहिल्या शतकानंतर पुन्हा संस्कृतमधे लेखन सुरु झाले. अर्थात या सर्व प्रवासात वैदिक अनुयायांनी संस्कृतची कास सोडलेली नव्हतीच.

बौद्धांचा महायान पंथ इसवी सनाच्या सुरूवातीपासून जोर धरु लागला आणि त्या पंथाच्या अनुयायांनी संस्कृतमधे रचना करणे श्रेयस्कर मानले. त्याला गाथा भाषा किंवा मध्य संस्कृत असे संबोधले गेले असून अनेक ठिकाणी याचे शिलालेख नमुने मिळाले आहेत. बौद्ध साहित्यामध्ये 'महावस्तु' नामक ग्रंथाचे मोठे महत्त्व आहे. पुराणाप्रमाणे असलेला हा ग्रंथ गौतम बुद्धाच्या चरित्रविषयक माहितीचे संकलन अशा स्वरुपात असून अनेक जण याचे लेखक असल्याचे मानले जाते. मुळचा हीनयानांनी लिहायला घेतलेला हा ग्रंथ अधून मधून महायानांचे विचारसुद्धा सांगतो.

बौद्ध साहित्यातील पुढचा महत्त्वाचा ग्रंथ ललितविस्तर. यालाच दुसरे नाव वैपुल्यसूत्र असे असून यामधे हीनयानी सर्वास्तिवादी पंथाला मान्य असलेले बुद्धचरित्र आहे. या ग्रंथालासुद्धा अनेक लेखकांनी हातभार लावलेला असून यातच बुद्धाच्या अनेक दंतकथांना स्थान मिळाले आहे. हा पहिल्या शतकात लिहिला गेला असावा.

यानंतर महत्त्वाचे नाव म्हणजे दुसर्‍या शतकातला अश्वघोष. याचा उल्लेख केल्याशिवाय बौद्ध साहित्याची यादी पूर्ण होणारच नाही. बुद्धचरित्र, सौंदरनन्द ही महाकाव्ये, गण्डिस्तोत्रगाथा नामक लघुकाव्य, सूत्रालंकार हा जातक कथांचा संग्रह, शारिपुत्र प्रकरण हे नाटक, वज्रसूची हा वर्णव्यवस्थेविरुद्धचा वादग्रंथ, महायानश्रद्धोत्पादसूत्र हा तत्त्वज्ञान ग्रंथ एवढी विपुल साहित्यसंपदा निर्माण करणारा हा अयोध्येचा रहिवासी होता. मूळ वैदिक धर्मीय असलेल्या अश्वघोषाने पुढे धर्म बदलला आणि कनिष्काच्या पदरी गान्धारास गेला. हा जरी बौद्ध झाला असला तरी त्याच्या साहित्यावर वैदिक संस्कृतीची पूर्ण छाप आहे. वैदिक ग्रंथांमधले अनेक संदर्भ त्याच्या ग्रंथात मिळतात. अश्वघोष आणि कालिदास यांच्यात अनेक ठिकाणी साम्य दिसते असे तज्ञांचे मत आहे. भारतीय परंपरेनुसार कालिदास इसवीपूर्व पहिल्या शतकात होऊन गेला तर काही पाश्चिमात्य त्याला इसवी सनाच्या चौथ्या वा पाचव्या शतकातला मानतात.

अश्वघोषानंतर अनेक बौद्ध पंडित झाले. केवळ धर्मच नव्हे तर जीवनाच्या इतर अंगाचासुद्धा साकल्याने विचार करुन त्यावर ग्रंथ लिहिण्यामधे त्यांनी वैदिक अनुयायांइतकीच सरस कामगिरी केली. आयुर्वेदातली अग्रणी नावे नागार्जुन, वागभट इत्यादी बौद्धच होते. साधारणतः पाचव्या शतकापर्यंत बौद्ध साहित्यात भर पडत होती. सद्धर्म पुण्डरिक, करण्ड्व्युह इत्यादी तत्त्वज्ञानाचे ग्रंथ याच काळात झाले. आर्यसुराच्या जातकमालेचा उल्लेख करणे अतिशय आवश्यक आहे कारण हा अतिलोकप्रिय ग्रंथ असून पाचव्या शतकाच्या सुरूवातीला याचा चिनी अनुवाद तयार झाला होता. अजिंठामधील लेण्यात जातकमालेच्या प्रसंगावर भित्तिचित्रे आहेत.

या बौद्ध साहित्यिकांच्या त्रोटक परिचयानंतर आपण जैनांच्या साहित्याकडे दृष्टिक्षेप टाकल्यास साधारणतः आठव्या शतकापासून आधी श्वेतांबर आणि नंतर दिगंबर जैनांनी संस्कृतमधे ग्रंथलेखन चालू केले. जैनांचे साहित्य महाराष्ट्री प्राकृत, संस्कृत आणि अपभ्रंश या तीनही भाषांत विपुल आहे. महाकाव्ये, नाटके, स्तोत्रे यांचे लेखन तर आहेच शिवाय अद्भुत कथा, लोकसाहित्य यांचे प्रचंड भांडार आपल्याला पहायला मिळते. वैदिक धर्मातील अनेक कथा, काव्ये जैनांनी आपल्या धर्माचा रंग देऊन लिहिली आहेत. रामायण, महाभारत जैनांनी त्यांच्या पद्धतीने सांगितले आहे. महावीराच्या तोंडून निघालेली आणि परंपरेने प्राप्त झालेली रामकथा पद्मपुराण नावाने समोर येते. रामाला यात पद्म असे नाव दिले आहे.

जिनसेनाने लिहिलेले हरिवंशपुराण आठव्या शतकातले असून कृष्ण-बळरामाच्या कथा महावीराचा शिष्य गौतम याने सांगितल्या असे त्याचे स्वरुप आहे. त्यात प्रथम जिन ऋषभ याच्याशी संबंध जोडला आहे. यातच कौरव-पांडव कथासुद्धा असून त्यानुसार कौरव आणि कर्ण हे जैन बनल्याचे दाखवले आहे. पांडवांनी निर्वाणाचा मार्ग स्वीकारल्याचे दाखवून अहिंसेचे प्रतिपादन केले आहे. १२व्या शतकातले पांडवचरित, १६व्या शतकातले जैन महाभारत हे याचा पठडीतले आहेत.

जैनांनी लिहिलेल्या साहित्यात सर्वात जास्त चर्चिलेला विषय म्हणजे श्रेष्ठ पुरुषांची चरित्रे. चोवीस तीर्थंकर, १२ चक्रवर्ती वगैरे ६३ पुरुष. जैन त्यांना पुराणे असे म्हणतात. त्रिषष्टि महापुराण, आदिपुराण, उत्तर पुराण इत्यादी नावाजलेले ग्रंथ आहेत. त्यांतही ऋषभ, शान्तिनाथ, अरिष्टनेमि(नेमिनाथ), पार्श्व आणि महावीर यांच्या चरित्राला कथारुपात सांगण्याचा प्रघात आहे.

अनेक चरित्रग्रंथांतील माहिती ही केवळ तत्त्वज्ञानाच्या समर्थनासाठी सांगितलेली असल्याने ऐतिहासिक भाग कमी आणि कल्पनाविलास अधिक अशीच परिस्थिती असते. याबाबतीत जैन, बौद्ध आणि वैदिक एकाच स्तरावर आहेत. त्यातही जैन उत्तम कथा लिहिण्यात कुशल आहेत. मात्र जैनांनी नाटके अतिशय थोडी लिहिलेली आहेत. स्त्रोत्रे वगैरे लघुकाव्ये प्रचंड प्रमाणात लिहिलेली आहेत.

संस्कृत साहित्याचा अभ्यास करायचा तर एक मानवी जन्म पुरेसा नाही असे म्हटले जाते. हजारो वर्षांच्या परंपरेने प्राप्त झालेले हे साहित्य आहे. लेखनकला नसताना जे काही निर्माण झाले त्यातले आपल्यापर्यंत केवळ वेद, ब्राह्मणे, उपनिषदे यांचा काही भागच आला आहे. लेखनकला अस्तित्वात आल्यानंतरसुद्धा जे काही निर्माण झालं त्यातलं आपल्यापर्यंत सर्वच आलं असं नाही. अजूनही कित्येक पोथ्या, ग्रंथ उजेडाची वाट पाहत कुठल्या कुठल्या माळ्यांवर पडून आहेत तर कित्येक नष्ट झाल्या आहेत.

अशा अपरिमित साहित्यातील एका भागाचा त्रोटक परिचय आपण करुन घेतला. मनुष्य स्थळकालाच्या मर्यादेत वावरतो. त्यात अजून एक भर समजुतीची. ती पार करणे सर्वात अवघड. माझ्या मर्यादा अधिक उघड न करता इथेच थांबतो.

दिवाळीच्या सर्वांना शुभेच्छा !

अधिक माहितीसाठी -

१) अ हिस्टरी ऑफ एन्शंट संस्कृत लिटरेचर - मॅक्स मुल्लर
२) अ हिस्ट्री ऑफ संस्कृत लिटरेचर - मॅक्डोनेल
३) संस्कृत साहित्य की रुपरेखा - उपाध्याय

अनुक्रमणिका

अनुभव

कवितासंग्रहाचे परिचय

लेखकांचे परिचय

मुलाखत

पुस्तक परिचय

प्रतिक्रियां

चांगला लेख ...

आवडला.

सुधीर कांदळकर

माहितीपूर्ण, सुरेख लेख.

माहितीपूर्ण, सुरेख लेख. धन्यवाद.

प्रतिसाद द्या

प्रतिक्रिया प्रकाशित करण्यासाठी येण्याची नोंद करा अथवा सदस्य व्हा.