• '

बोजेवारांच्या बोरूतली अफलातून शाई..

दिनेश गुणे
बुधवार, २१ July, २०१० - ०१:०१
 

मुखपृष्ठ

 

लोकसत्तामधल्या तंबी दुराईला जितके लोक ओळख्तात, तेव्हढे तिथेच वरिष्ट सहसंपादक असलेल्या श्रीकांत बोजेवारना ओळखत नसतील. 'दोन फुल एक हाफ'मध्ये तंबीनं नेमाड्यांची 'घेतली’ आणि मला सहज बोजेवारची आठवण झाली. 'लोकसत्ता’च्या हपिसात कोपर्‍यातल्या एका क्युबिकलमधे बसून हा माणूस शाईपेनानं कागदावर अक्षरं खरडतो, तेव्हा कुणा तरी 'भल्या'ची 'उतरवत’ असतो, हे मला माहीत आहे... त्याच्यातल्याच या तंबीनं मराठी वर्तमानपत्रसृष्टीच्या एका पानाला अशी काही रंगत मिळवून दिली, की प्रत्येक रविवारची मराठी माणसाची सकाळ खळखळून ‘वाचनीय’ होत राहिली...
मराठी वृत्तपत्रात विनोदी लेखन भरपूर होत आले. बाळासाहेब ठाकर्‍यांच्या भाषेत, 'अतिरेकी' (म्हणजे बहुधा, विनोदाचा अतिरेक करणार्‍या) शिरीष कणेकरांनी असंख्य रविवारी वर्तमानपत्रांच्या पुरवण्यांमध्ये टाकलेल्या ‘पाट्या’ सुद्धा मनमुराद आनंद देऊन गेल्या, पण लेखनाच्या मोकळेपणाच्या मर्यादांचं भान बोजेवारंनी पुरेपूर राखलं, म्हणून त्यांच्या तंबीनं केलेली 'धुलाई'देखील भल्याभल्यांनी ‘एन्जॊय’ केली. बोजेवारांच्यातला पत्रकार हा मुळातला लेखक आहे. पत्रकाराचं, वर्तमानपत्रातलं लेखन हे ‘शाश्वत साहित्य’ असते की नाही, यावर अजून साहित्यविश्वात संभ्रम माजलेलाच आहे. (त्यामुळे, आणखी कितीही साहित्य संमेलनांना एक परिसंवादाचा ‘हुकमी’ विषय शाश्वतपणे हाती आहे...) पण बोजेवारांच्या तंबीनं उकळवलेल्या `दोन फुल-एक हाफ’नं याचं सडेतोड उत्तर केव्हाच देऊन टाकलंय. पत्रकारितेतील अनुभव आणि लौकिक जीवनातील बारकावे टिपण्याची नेमकी ‘नजर’ यांमुळे बोजेवार फक्त आठवड्याच्या ‘खेचकामा’पुरते लिहून स्वस्थ बसलेले नाहीत. आत्मह्त्याग्रस्त शेतकरी ही महाराष्ट्राची एक गंभीर समस्याही त्यांनी एक पटकथेतून पडद्यावर आणलीय. मराठी माणूस हा त्यांच्या खास चिंतनाचा विषय. प्रत्येक मराठी माणसातली बारकावे ते ‘तिहाईता’च्या (तंबीदुराईच्या) नजरेनं धुंडाळत असतात. म्हणूनच, एक खास शैलीदार कादंबरीही बोजेवारच्या बोरूतून पाझरलीय... ती म्हणजे, 'पावणेदोन पायांचा माणूस.'
मराठीत ग्रामीण कादंब-या फार नाहीयेत. आहेत, त्यांतल्या अनेकींनी, ग्रामीण वास्तवातला विनोद, स्वार्थ, उपेक्षा अशा मोजकेपणाचं (बहुधा तेचतेच) चित्रण केलंय. कदाचित त्यामुळे ग्रामीण कादंबरीचं कव्हर आणि लेखकाचं नाव सोडलं, तर आतला मसाला तोच मिळणार, अशी समजूत रूढ होत गेली, आणि ग्रामीण जीवनाप्रमाणेच, ग्रामीण कादंबरीही नव्या मराठी साहित्यसृष्टीत उपेक्षित होत गेली...तिचा वाचकही रोडावत गेला. अशा संकटसमयी एखाद्या संकटसमयी, बाहेर जाण्याचा मार्ग असतो. मातीचा धुरळ्यातून लालपिवळ्या डब्यातून प्रवास करणा-याला तो बरोब्बर माहीत असतो. म्हणून बोजेवारच्या कादंबरीनं शहरातला ग्रामीण टच टिपला. त्यांची कादंबरी खेड्यात सुरू होते, आणि मुंबईत, थेट मंट्रालयात येऊन पोहोचते. खेड्यातल्या गरीबीत जगणाया प्रत्येकाचंच, मुंबईला ‘चाकरमानी’ व्हायचं स्वप्नं असतं. बोजेवारांचा फाटका नायकही, गाव सोडण्याच्या घाईनं धांदवलेला असतो. कारण, धनाची आवड. त्यांच्या नायकाचं गावही, ‘धनावडे’ इथला पंधरा-सोळा वर्षांचा लंगड्या पीतांबर हा एका पायानं तोकडा मुलगा, बोजेवारांच्या कादंबरीचा नायक. आपल्या तोकड्या पायांच गंड असला, तरी त्यावर मात करून जगाच्या पाठीवर स्वार व्हायच्या ईर्ष्येनं पछाडलेला. `लंगड्या' दुष्ट नाही, पण, आपलं व्यंग आपल्या अस्तित्वाआड येणार नाही, यासाठी तो धडपडतो.येऊ नये, त्यासाठी कटकारस्थानंही करतो! शाळेच्या मुख्याध्यापकाचं संगीताच्या बाईंशी असलेलं ‘लफडं’ हाताशी मिळताच मुख्याध्यापकाला ब्लॆकमेल करून दहावी पास होऊन गावाला आश्चर्याचा धक्का देणाया लंगड्याच्या करामती तेथून सुरू होतात, आणि त्याला जगण्याची दिशा सापडते. आपल्याल ह्याच दिशेनं ‘पुढे’ जायचंय, याची त्याला जाणेव होते, आणि लंगड्या पितांबर, एका कादंबरीचा ‘नायक’ होतो...
विनाअनुदानित शाळेला अनुदान मिळावून देण्याच्या कामगिरीत लाखांचं ‘कमिशन’ लंगड्याच्या खिशात पडतं, मग लंगड्या मागं वळून पाहात नाही. राजकारणातल्या कारनाम्याचं इंगित लंगड्या आत्मसात करतो, आणि निवडणुकीत आमदाराच्या विरोधात त्याच्याच चुलतभावाला उभं करून निवडूनही आणतो. या लंगड्याला आपल्यातल्या करामतखोराविषयी कमालीचा विश्वास आहे. कुणालाही कळणार नाही, अशी करामत करून त्याला नव्या आमदाराला मंत्रीपदही मिळवून देतो. राजकारणी आणि जनता यांच्यातला एक वजनदार दलाल म्हणून लंगड्या कानोकानी होतो.
...बोजेवारांनी लंगड्याच्या प्रवासाकडे पत्रकाराच्या तटस्थपणानं बघितलंय. राजकारणातल्या ‘व्यवहारां’चा जनतेला अनाकलनीय असा पर्दाफाश लंगड्या पितांबराच्या माध्यमातून करताना विकाऊपणा आणि नैतिक अध:पतन या दोन्ही बाजूंचं ढंगदार चित्र बोजेवार या कादंबरीतून उभं करतात. लंगड्याच्या बरोबरीनं बोजेवारांनी मांजरालाही या कादंबरीत उपनायकाचा `रोल’ दिलाय. या कादंबरीतली मांजरं माणसाच्या बरोबरीनं पानापानावर वावरतात. मानवी पात्रांशी त्यांचं नातं असलं, तरी त्यांचं एक स्वतंत्र जग आहे. बोजेवारांनी ते जग जवळून पाहिल्यासारखं मस्त रंगवलंय. टपोरी भाषेत बोलणारी ही मांजरं नायकाला ’आडवी’ जातात, रोज रात्री मिटिंगा घेवून स्ट्रॆटेजी ठरवतात. आणि एकजण तर नायकासोबत मुंबैला येऊन टॆक्सीतुन फिरतो. इतर पात्रांनाही, पानावरची त्यांचीत्यांची जागा बोजेवारांनी (दाखवून) दिली आहे. बेवडा गेंगाणे मास्तर, दारू पिऊन पत्र्याच्या छपरावर चढून बरळणारे लंगड्याचे वडील, अजाबराव, आई चांगुणा, पाकिटबाज पत्रकार बबन ढगे, चॆनेलवरची चवचाल प्राची अशी अनेक पात्रे कादंबरीची रंगत वाढवतात.. पत्रकाराच्या गुणांसकट ओतलेला मसाला आणि, ग्रामीण इरसालपणानं शहरावर केलेली कुरघोडी, यासाठी ही कादंबरी वाचायला हरकत नाही.
बोजेवार `चित्ररंगा'त लिहितात तेव्हा, चित्रपटाला स्टार देऊन दर्जा ठरवतात. या कादंबरीचा दर्जा ठरवण्यासाठी किती स्टार द्यायचे, हे वाचकांनी ठरवायचंय.

पावणेदोन पायांचा माणूस
प्रकाशक- देशमुख आणि कं.
पाने १३७ किं. १५०/ रू.

सुखद धक्का!

दिनेशकाका,
थँक्स म्हणालात म्हणून पुप लिहिण्याच्या केलेल्या शिक्षेची अंमलबजावणी इतक्या लगेच होईल असे वाटले नव्हते. आता काही ना काही कारणांनी शिक्षा देत रहावे लागेल तुम्हाला असे दिसतेय. Wink पुप छानच झाला आहे.

<दिनेश>पत्रकाराच्या गुणांसकट ओतलेला मसाला आणि, ग्रामीण इरसालपणानं शहरावर केलेली कुरघोडी, यासाठी ही कादंबरी वाचायला हरकत नाही.< /दिनेश>

ग्रामीण इरसालपणाची शहरावर कुरघोडी करायला पुस्तक वाचावेच लागणार पण पत्रकाराने लिहिलेय म्हणता आणि 'पत्रकाराच्या गुणांसकट ओतलेला मसाला'ही आहे म्हणता नक्की कसे लेखन वाचायला मिळेल याची कल्पना येत नाहीये. त्यामुळे हे पुस्तक आधी वाचणार आणि मग खरेदी करायचे की नाही ते ठरवणार. १३७ पाने म्हणजे उभ्या उभ्यादेखील वाचता येईल असे वाटतेय. बघुया वाचल्यावर किती 'मिरच्या' देते ही वेदश्री या पुस्तकाला ते! Smile

बाय द वे, पुपला नाव देताना पुस्तकाच्या लेखकाचे का नाव दिलेय ते काही कळले नाही बा.

एक्सलंट

लव्ह्ड अलॉट...
बोजेवरांचा मी फॅन आहेच ..
आणि गुणे सर...
परिचय लिहावा तर असा .
सलाम सलाम सलाम

उत्तम

उत्तम परिचय. हा परिचयच पुन्हा वाचण्याजोगा आहे. पुस्तक तर वाचेनच.

उत्तम

उत्तम परिक्षण गुणेजी.. कालच ह्या पुस्तकाबद्दल पुण्यात ऐकले आणि आज परिक्षण वाचले.. आता नक्की पुस्तक वाचेन..

परिचय आवडला.. पुस्तक नक्की

परिचय आवडला..
पुस्तक नक्की वाचेन

हेच म्हणतो

हेच म्हणतो. परिचय आवडला.

मस्त

लोकसत्तामधल्या तंबी दुराईला जितके लोक ओळख्तात, तेव्हढे तिथेच वरिष्ट सहसंपादक असलेल्या श्रीकांत बोजेवारना ओळखत नसतील

+१
मला तर बॉ तंबीच आवडतो Tongue Wink एकेकाची लै खेचतो.. मजा येते..

असो. पुस्तक परिचय एकदम मस्त.. आता पुस्तक ग्रंथालयात शोधतो

मस्त पुस्तक परिचय. हे पुस्तक

मस्त पुस्तक परिचय. हे पुस्तक नक्की घेणार, तुम्हाला धन्यवाद.

वा!

सुरेख पुस्तकपरिचय