'बोलती पुस्तके' हा मराठीतला पहिला वाहिला free Audio Books प्रकल्प. याबद्दल अधिक जाणुन घ्या इथे.
बालपणीचा तो आनंद...
मुखपृष्ठ
|
प्रकाश नारायण संत यांच्या 'वनवास' या पुस्तकाबद्दल काही लिहिण्याअगोदर या पुस्तकाच्या मलपृष्ठावरील मजकूर आहे तसा देण्याचा मोह आवरत नाही.
1964 साली, सत्यकथेत 'वनवास' नावाची, प्रकाश नारायण संत याची एक कथा छापून आली होती. त्यातला शाळकरी वयाचा 'लंपन' वर्षानुवर्ष मनात घर करून बसला होता. पौगंडावस्थेतल्या मुलांचं जग त्या कथेतून एखाद्या सुंदर चित्रपटासारखं डोळ्यापुढून सरकून गेलं होतं. ज्या भाषेत ह्या लंप्यानं आपली ही शाळकरी वयातली कथा सांगितली होती ती बेळगावकडची मराठी होती. मराठीला कानडी चाल लावलेली. त्या चालीवरचं मराठी बोलणं अतिशय लोभस - अतिशय आर्जवी. एखाद्या गाण्यासारखं मनात रुंजी घालणारं. सत्यकथेत तीस वर्षापूर्वी प्रसिद्ध झालेली ही कथा आजही तितकीच टवटवीत राहिली आहे. ज्या उत्सुकतेनं आणि आनंदानं मी ती त्या काळी वाचली तितक्याच उत्सुकतेनं आणि आनंदानं, प्रकाशने तीस वर्षाच्या मौनानंतर लिहिलेल्या आणि ह्या संग्रहात आलेल्या लंपनच्या कथा वाचल्या. पौगंडदशेतल्या छोट्या छोट्या अनुभवांचा मार्मिक तपशिलानं जिवंत केलेल्या ह्या कथा आहेत. बाळगोपाळांच्या चिमुकल्या दुनियेचं प्रकाशने घडवलेलं हे दर्शन अपूर्व आहे.
पौगंड दशा ओलांडताना यौवनाच्या सुगंधी झुळुका अंगावरून जाताना अस्वस्थ करून टाकणारा हा कालखंड. लंप्या म्हणतो तसं 'सुमीची आठवण आली की पोटात काही तरी गडबड होते आहे' असं वाटायला लावणारी ही अवस्था. कोणी तरी ह्या वयाच्या अवस्थेला emotional sea- sickness म्हटलं आहे. ह्या अवस्थेचं इतक्या सहजतेनं दर्शन घडवणारं लेखन माझ्या तरी वाचनात यापूर्वी आलेलं नाही. लंप्याची ही कथा त्या वयाचा मॅडनेस अंगात मुरवून लिहावे लागते. त्या लेखनात प्रकाश यशस्वी झाला आहे.
लंप्याच्या भाषेत सांगायच म्हणजे, 'एकदा नाही, दोनदा नाही तर अठ्ठावीसशे तीस वेळा जरी ह्या कथा ' मॅड सारख्या वाचल्या' तरी त्या ताज्याच वाटतील. एक निराळ्याच शैलीचा आणि वाचकाशी चट्कन संवाद साधून त्यालाही लंप्याच्या वयाचा करून टाकणारा कथासंग्रह मराठीत येतो आहे ह्या आनंदात मी आहे.
प्रकाशला धन्यवाद आणि अभिनंदन.
पुलंची ही शिफारस वाचताना पुस्तकाच्या आशयाची नक्कीच कल्पना येऊ शकेल. या पुस्तकाची पहिली आवृत्ती जून 1994मध्ये व आता त्याची दहावी आवृत्ती प्रकाशित झाली आहे.
प्रत्येकाचे बालपण अगदी रम्य, मजेत... गेलेले नसले तरी बहुतेकांना त्या वयात जे काही घडत असते ते रम्यच वाटत असते. कदाचित अज्ञानातील सुख असे म्हणता येईल. परंतु 'वनवास' वाचत असताना - ते लेखकाचे वा लेखकाच्या कल्पनेतले असले तरी - आपण हरवून जातो. गंमत म्हणजे या पुस्तकाचा हीरो लंपन नसून त्याच्या भोवतालीचे वातावरण, त्याला भेटलेली माणसं व घडलेले प्रसंगच खरेखुरे हीरो वाटतात. पुस्तकातील सर्व प्रसंग या शाळकरी मुलाभोवती विणलेले असले तरी त्याला सुपरमॅन, बॅटमॅन सारखे larger than life असे व्यक्तिमत्व लेखकाने बहाल केले नाही. त्याला अफाट व्यक्तिमत्व नाही. आपल्यासारखा, चारचौघातला तो असून प्रसंग खुलवून सांगत गेल्यामुळे त्या आपल्याच आयुष्यात घडल्यासारख्या वाटू लागतात. खर्या अर्थाने त्याचे ते गाव, वस्ती, स्टेशन, रस्ते, विहीर, तळं, झाड पुन्हा जिवंत होतात. व या मॅड लंप्याला आपण कुठे तरी पाहिलो होतो की काय अशी दाट शंका मनात उत्पन्न होते. किंवा आपणच लंप्या होतो.
आई - वडिलांनी आजोबा - आजीला सोबत म्हणून लंप्याला शिकण्यासाठी त्याच्याकडे पाठवून देतात. पहिल्या पहिल्यांदा रडकुंडीला आलेला लंप्या पुढे पुढे नवीन वातावरणात रुळतो. शाळा व बालपण enjoy करू लागतो. हा लंप्या आपल्याला कित्येक ठिकाणी हिंडवून आणतो. कित्येकांची ओळख करून देतो. त्याच्या आजोबा - आजीबरोबरच्या प्रेमात आपल्याला वाटेकरी करून घेतो. कणबर्गी गंग्या, वंटमुरीकर देसाईंचा बोका, सुमी, पान कुटणारे सुमीचे आजोबा, कविता शिकविणारे गावडे मास्तर, लंप्याची बहीण मनी, लहान बाळ बिट्ट्या, घरगडी बाबूराव, 'लक्ष्मी' झाड, तिथलं तळं, गुंडीमठ रोड, क्रिकेट टीमचा कॅप्टन 'एशी' , साउथ इंडियन तुंगभद्रा, तुंगभद्रेवर लाइन मारणारा केबी, 'हंपायर' जंब्या कटकोळ, त्याचे पैलवान आजोबा, नानावाडी, लंप्याचा गामा पैलवान खेकडा, ड्रिलचे मास्तर हत्तंगडी, त्याच्या शाळेची सहल, लंप्याच तापात बरळणं असे कितीतरी सजीव व निर्जीव असूनही सजीव वाटणार्या गोष्टी, प्रसंग, व्यक्ती, आपल्याला येथे भेटतात. आपल्याशी गप्पा गोष्टी करतात. ही सर्व हुच्च, मॅड मंडळी जीव लावतात. चुंबन म्हणजे काय, घायाळ होणे म्हणजे काय या प्रश्नांचा तडा लावण्यास लंप्याने केलेल्या प्रयत्नाचे वर्णन वाचताना आपणही न कळत त्याच्या विश्वात शिरतो. व त्यातून बाहेर पडणे जड वाटू लागते.
'वनवास' मधील गोष्टी वाचत असताना मनाला सुखद अशी हुरहुर वाटू लागते व ते बालपण पुन्हा का येत नाही असे विचार करत पुस्तक वाचून संपवून टाकतो.
वनवास
प्रकाश नारायण संत,
मौज प्रकाशन गृह, (2009),
पृ. सं: 182, किं: 140 रु
मॅड!
अगदी मॅड करून टाकते हे पुस्तक. विशेष म्हणजे या पुस्तकाचे मुखपृष्ठही एकदम साजेसे वाटते. पुढील शारदा संगीत, पंखा व झुंबरही मस्तच आहेत. मला यातील 'वनवास' व 'पंखा' तुलनेने थोडी जास्त आवडतात.
मिहिर
सुंदर परिचय
हे पुस्तक वाचलेले नाहिये 
पण नेहमीप्रमाणेच सुरेख परिचय आहे. आणि त्यावर कडी म्हणजे एवढ्या उस्फूर्त प्रतिक्रिया पाहून मन या पुस्तकाकडे धाव घेतंय
लवकरच घेईन हे पुस्तक. 
मी एक पुस्तकवेडा
http://pustakveda.blogspot.com/
एवढी
एवढी पुस्तके घेता आणि हे घेतले नाही? पळा पळा!! लवकर खरेदी करा आणि वाचा बघू लवकर! तुमची लिस्ट बदला.
मिहिर
घेतो रे मित्रा
हे पुस्तक नक्कीच घेणार आहे. थोडी सबुर. हा आठवडा गडबड आहे. पुढच्या आठवड्यात नक्की घेईन हे पुस्तक मित्रा.
मी एक पुस्तकवेडा
http://pustakveda.blogspot.com/
अप्रतिम पुस्तक.
मी rishikesh आणि मिहीर यांच्या प्रतिक्रियांशी सहमत आहे.






'मॅडसारख'
वनवास, लंप्या त्याचे ते 'मॅडसारखं' वागणे, त्याचे गाव सारेच अद्भुत हुरहुर लावणारे आहे. अजूनही निर्विष, निर्भेळ आनंद देणारी पुस्तके म्हटली की या पुस्तकाचे नाव आठवल्याशिवाय रहावत नाही
लंप्याची पुढील झुंबर, पंखा वगैरेही तितकीच वाचनीय आहेत
-ऋ
----------------------
"चला, मी माझा एकमेव जुनाट कोट घालून एक नवं पुस्तक घेऊन येतो"