• '

बबर्‍या आणि दोस्त

टण्या
रवीवार, 14 August, 2011 - 19:26

बर्ट्रांड रसेल वुइथ देशी फिलॉसॉफी
लेखकः बब्रुवान रुद्रकंठावार
प्रकाशकः जनशक्ती बुक्स अँड पब्लिशर्स प्रा. लि.
जनशक्ती वाचक चळवळ, औरंगाबाद.
प्रकाशनः १६ डिसें. २००७

अनेक वर्षांनी एखादे पुस्तक वाचून इतका मनमुराद हसलो. पद्मगंधा, यक्ष इत्यादी मासिके व लोकसत्ता, तरुण भारत, सामना ह्या दैनिकातले आधी प्रसिद्ध झालेले हे स्फुट लेख आहेत. सर्व लेख हे तीन ते सहा-सात पाने ह्या मर्यादेत आहेत. बब्रुवाहन व त्याचा दोस्त (दोस्ताचे नाव कुठेही येत नाही. तो दोस्तच) ह्यांचे विविध प्रासंगिक विषयांवरील संवाद, चर्चा, तार्कीक विरेचन आणि शेवटी ताजा कलम मध्ये बब्रुची विशेष टिप्पणी असे लेखांचे स्वरुप आहे. बब्रुवान हा पत्रकार आहे तर दोस्त झेडपीतला पॉलिटिशियन.
बब्रुवानांनी ह्यात मराठवाडी भाषा वापरली आहे पण त्यात आजच्या काळाला अनुसरून इंग्रजी शब्दांची भरमार रेलचेल आहे. तसेच मुद्रीत भाषा ही बोलीभाषेच्या ठसक्यांसहीत लिहिली आहे. त्यामुळे वाचताना आपण आपोआपच त्या सर्व खुबींनी वाचू लागतो. उदा:
म्या मंग जोर्‍यांदा हास्लो. म्हन्लं, 'दोस्ता, तुझी उपमा द्देन्याची स्टाईल जबरा हाये, पन तुझं मॅथेमॅटिक्स कुठं तरी हुकून र्‍हायलय. काय तरी गफलत व्हवून र्‍हायलीय.' माझ्या अनयक्स्पेक्टेड स्टेटमेंटनं दोस्ताच्या त्वोंडावर यकदम शंभर पॉईंटाचा क्वश्चनमार्क हुभा र्‍हायला.
हेच वाक्य जर प्रमाणभाषेत लिहिलं तर त्यातली मजाच जाईल. भाषेच्या प्रयोगाच्या दृष्टीने हे लेख एक उत्तम नमुना आहेत.
पण ह्यातली खरी खुबी आहे ती बब्रुच्या आणि त्याच्या दोस्ताच्या फिलॉसॉफीत. आंधार सेक्युलर आन् डिव्होटेड ह्या लेखात आंधाराच्या धर्मनिरपेक्षतावादी वैशिष्ट्याला हात घालत ते धर्मनिरपेक्षतावाद व त्याच्या तथाकथीत समर्थांकाची हलकेच चिमटे काढतात. इंग्रामवाडी डॉट कॉममध्ये आपल्या डोक्यातलं सर्फिंग दाखवत दोस्त बब्रुला इंटरनेटवरचा सगळा चावटपणा/गॉसिप कसे आपल्या आतच दडलेलं आहे ते दाखवतो तर बर्ट्रांड रसेल वुइथ देशी फिलॉसॉफी ह्या लेखात दोस्त बब्रुच्या जातवाल्यांची म्हणजे पत्रकारांची मस्त खेचतो.
ह्या सगळ्या लेखात बब्रुवान कुठेही उच्चासनावर बसून शहाणपणा शिकवत नाहीत, फुकाची क्लिष्ट रुपके वापरत नाहीत की उगीच भावनांना हात घालत शेवट करत नाहीत. विविध तात्कालीन घटनांची ते विनोदी अंगाने वासलात लावत जातात इतकेच. हे विनोदाचे अंग आहे मात्र अगदी सणसणीत! काही काही ठिकाणी एखादा फालतू विनोद वा कोटी येते किंवा उगीच एखादे नैतिक विधान येते आणि आपल्याला दाताखाली खडा आल्यासारखे वाटते. पण बब्रुवान जीभेने पटकन खडा बाजूल सारत पुढे असे काही 'ष्टेटमेंट' टाकतात की त्या कोटीवर बदाबदा पाणी ओतले जाते. किंवा बब्रुने अशी कोटी केलीच वा नैतिक विधान केले तर दोस्त सरळ 'लक्ष न देता पुढे जातो'.

एक खटकलेली बाब म्हणजे कुठल्याही लेखाच्या शेवटी वा अनुक्रमणिकेत त्या लेखाच्या पुर्वप्रसिद्धीची तारीख/प्रकाशन हे नमूद केलेले नाही.

ह्या पुस्तकातल्या त्याच नावाच्या लेखाची सुरुवात इथे नमुन्यास देतो आणि थांबतो. नमुना मुद्दामून देत आहे की वाचून तुम्हाला पुस्तक घेण्याची/वाचण्याची इच्छा होवो:

त्या दिवशी दोस्त जादाच फ्रस्ट्रेट झाला व्हता. म्या भेटताच मला म्हन्ला, 'बबर्‍या, लायब्ररीमंदी चालतोस का? लई दिस झाले.'
म्या जरा पॉज घितला. मंग म्हन्लं, 'आजच्याला नगं राव, स्सालं सकाळच्याला डोस्कं धरतं, हँगओव्हर झालं की मंग सारा दिस फुकटछाप जातो. उद्दाच्याला कामंबी लई हायेत. तब्येतबी पैल्यावानी साथ देत न्हाई.'
त्यो म्हन्ला, 'यवडा कामून भाव खावून र्‍हायलास? जादा टाईम न्हाई बसायचं. रॉयल स्टॅगच्या दोनेक स्टोर्‍या वाचू, जादा न्हाई. तुला 'हॉट' वाचायचं नसंन तं तू कोल्डमंदी वाच. ऑस्ट्रेलियाचा फोस्टर बराय म्हने, टाईमपास.'
म्या म्हन्लं, 'दोस्ता, आज लई फॉरेन ऑथर्सचे नाव घिवून र्‍हायलास? सांप्रतला देशी ऑथर्स आठवत न्हाई का कोनी दमदार?'
तसं त्यो म्हन्ला, 'बबर्‍या स्टेटस्चा क्वश्चनै. आता पैले दिस र्‍हायले न्हाईत. आन् देशी ऑथर्स कवाकवा लय इमोशनल लेव्हलला नेतेत, आपन त्येंच्यात यवडं इन्वॉल्व्ह व्हतो की मंग आपन आपले र्‍हात न्हाई. इंडियाच्या डेव्हलपमेंटसाठी आपलं कायबी डिव्होशन न्हाई आसं अन्नेसेसरी आपल्याला वाटू लागतं आन् आपल्या डोळ्याला आपसूक पानी येतं. त्येच्यापेक्षा आपले फॉरेन ऑथर्स कवाबी बरे आस्तेत. त्येंच्या स्टोर्‍याबी लाईट आसतेत आन् जादा इमोशनल व्हन्याचा टाईमबी येत न्हाई.'

त.टी.: पुस्तकविश्ववरील सदस्या व प्रसिद्ध लेखिका कविता महाजन ह्यांनी पुस्तक ओळखा कोड्यात एकदा हा वरचाच उतारा दिला होता. तो बहुतेक कोणीच नाही ओळखू शकले. उत्तर फोडताना त्यांनी पुस्तकाची संक्षिप्त ओळख करून दिली होती. त्याने उत्सुकता चाळवली गेल्याने हे पुस्तक घेतले. तेव्हा कविताताईंचे विशेष धन्यवाद.

झ्याक....

टण्या,
हा पुस्तक-परिचय वाचताना मलादेखील कविता महाजनांचीच आठवण झाली.
अलिकडे अशी भाषा वाचायला आवडू लागल्याने हे पुस्तक वाचायला आवडेल. उर्मिला पवारांचे `आयदान', माधव कोंडविलकरांचे `मुक्काम पोस्ट देवाचे गोठणे' ही पुस्तके त्यातील भाषेमुळे माझी आवडती झाली आहेत. ती वाचल्यानंतर माझ्या मनात ह्या गावरान भाषा इतक्या ठसल्या की मीदेखील घरात तशी बोलू लागले. अर्थात मला मजा वाटली तरी घरचे वैतागले आणि मी गप्प!
माझ्या कामवाल्या सख्यांच्या, भाजी मार्केटातील, आगगाडीतील भाजीवाल्या-कोळीणी ह्यांच्या गप्पा ऐकायलाही त्यामुळे मजा वाटते.
`टण्याभाऊ,हित्तं ह्या बुकाचा प्रचय क्रून दिऊन तुमी लई झ्याक काम केलयंसा....'

बब्रुवाहन

बब्रुवाहन ? बब्रुवान ना ?
लहान असतांना देवगिरी तरुण भारतात दर रविवारी अक्षरमध्ये हे लेख असायचे. फार कळायचे नाही पण वाचायला मजा यायची, देवगिरी तरुण भारत बंद झाला आणि या खुमासदार लेखांना मुकलो.

बब्रुवान रुद्रकंठवार हे टोपण नाव आहे का ? असल्यास कुणाचे ?

बब्रुवान

आनंदयात्री, धन्यवाद.. बब्रुवान बरोबर आहे.. बदल केलाय..

आंद्या.. बहुदा टोपण नावच

आंद्या..
बहुदा टोपण नावच ते..
तरुण भारत मधले सदर चबडब किंवा पुन्यांदा चबडब असे काहिसे होते..

निखिल देशपांडे

चबडब

चबडब नाही चबढब. पुन्यांदा चबढब म्हणजे चबढबचा सिक्वल होता.

वाचावं लागेल. टण्याकडून नेहमी

वाचावं लागेल. टण्याकडून नेहमी निराळी आणि शाश्वत (म्हंजे पुन्हा पुन्हा वाचली जाणारी) पुस्तकं मिळतात.

- मेघना भुस्कुटे

+१

वाचावं लागेल. टण्याकडून नेहमी निराळी आणि शाश्वत (म्हंजे पुन्हा पुन्हा वाचली जाणारी) पुस्तकं मिळतात.

असेच म्हणतो, 'वाचलेच पाहिजे'च्या यादीत भर घातली आहे ह्या पुस्तकाची.

आलं का? वाचतोच आता!

गेलं वर्षभर आमच्या एका व्यंगचित्रकार मित्राकडून या पुस्तकाचं आणि त्यातील भाषेचं गुणगाण ऐकतो आहे.
या पुस्तकासाठी त्यांनी (अनिल डांगे- लोकमतचे सध्याचे व्यंगचित्रकार) व्यंगचित्रं काढलीत.
औरंगाबादचे एक पत्रकार धनंजय चिंचोलीकर यांनी हे पुस्तक लिहीलं आहे आणि तेच बब्रुवाहन रुद्रकंठावार आहेत असं ऐकून आहे.

असे का

>>औरंगाबादचे एक पत्रकार धनंजय चिंचोलीकर यांनी हे पुस्तक लिहीलं आहे आणि तेच बब्रुवाहन रुद्रकंठावार आहेत असं ऐकून आहे

असेय का !! धनंजय चिंचोलीकरांचे 'न घेतलेल्या मुलाखती पण असेच आधी वर्तमानपत्रात प्रसिद्ध झालेल्या लेखांचे पुन:प्रकाशन आहे का ?

हो

न घेतलेल्या मुलाखतीबद्दलही नुसते ऐकून आहे... मी कधी त्या वाचल्या नाहीत..
चिंचोलीकरांनी पत्रकारितेचे क्षेत्र सोडले व सध्या ते फक्त लिखाण करतात वगैरे वगैरे नुसतं ऐकून हैराण आहे या असामी बद्दल...
पुस्तक् वाचल्यानंतर भेट घेईन Smile
त्यांच्या या टोपण नावाने लिहिण्याच्या ष्टाईलमुळे "बेरक्या" म्हणजे हेच धनंजय चिंचोलीकर अशीही चर्चा होती इथे... पण ते "बेरक्या" नाहीत हे त्यांच्या जवळच्या अनेक दोस्तांनी छातीठोकपणे सांगितले आहे...

धनंजय चिंचोलीकर यांना फेसबुक

धनंजय चिंचोलीकर यांना फेसबुक वर मेसेज टाकुन या धाग्याची लिंक दिली आहे..

निखिल देशपांडे

येस्स!

मला पण तेच वाटलं होतं पण टाईप करण्याच्या ओघात राहून गेलं.
शिवाय हपिसात चे.पु. नच्छो!

धन्यवाद

धन्यवाद निखिल.
यशवंत, तुम्ही धनंजयांना ओळखत असाल तर त्यांना सदस्यत्व घेण्याची नक्की विनंती करा, पुस्तकविश्वतर्फे तशी विनंती मी वेगळी करेनच पण तुम्ही केली तर अजुन उत्तम Smile

ओक्के!

आमच्या दोस्ताकडून लंबर घेतो त्यांचा रातच्याला
आणि सकाळी बोल्तो.

'पुन्यांदा चबढब' ताबडतोब

'पुन्यांदा चबढब' ताबडतोब लायब्रीतून आणण्यात आले आहे! आभार. Smile

- मेघना भुस्कुटे

वाचायलाच हवे

मागे कविता महाजनांनी परीचय करून दिला तेव्हाच ठरवले होते की वाचायलाच हवे..
आता तर वाचेनच!
बाकी कालच लायब्ररीत (खर्‍या बरं का Wink ) 'न घेतलेल्या मुलाखती' पुस्तक बघितले .. हा धागा आधी वाचला तसता तर घेऊन आलो असतो. Sad आता पुढल्या खेपेपर्यंत ते पुस्तक तिकुन असले म्हणजे मिळवले

-ऋ
----------------------
"चला, मी माझा एकमेव जुनाट कोट घालून एक नवं पुस्तक घेऊन येतो"

वाचायलाच हवे

मागे कविता महाजनांनी परीचय करून दिला तेव्हाच ठरवले होते की वाचायलाच हवे..
आता तर वाचेनच!
बाकी कालच लायब्ररीत (खर्‍या बरं का Wink ) 'न घेतलेल्या मुलाखती' पुस्तक बघितले .. हा धागा आधी वाचला तसता तर घेऊन आलो असतो. Sad आता पुढल्या खेपेपर्यंत ते पुस्तक तिकुन असले म्हणजे मिळवले

-ऋ
----------------------
"चला, मी माझा एकमेव जुनाट कोट घालून एक नवं पुस्तक घेऊन येतो"

अनेकविध कारणांसाठी रसल हा

अनेकविध कारणांसाठी रसल हा माझा आवडत्या लेखकांपैकी एक आहे. देशी अवतारातला रसल वाचलाच पाहिजे.
टण्या, या धाग्याबद्दल धन्यवाद.

या पुस्तकाची किंमत आणि पृष्ठसंख्या कळेल का? सध्या परदेशात असल्यामुळे पुस्तक कोणाकडून मागवायचं असेल तर वजनाचा प्रश्न येतो म्हणून विचारलं.