फुलांची आर्जवे' हा कवितासंग्रह वाचला. नवोदित कवयित्री 'प्राजक्ता' हिच्या काव्यप्रतिभेला निश्चितच शब्दशक्तीचे सामर्थ्य लाभले आहे. शब्दांची जवळीक सहजपणे सांभाळत तिची कविता मोहकपणे साकारली आहे. मनाची निरागसता, निसर्गाशी एकरूप होण्याची किमया, प्रेमभावनेची तृप्तता यामुळे कवितेला अनेक आयाम मिळाले आहेत.
'मन' या विषयावरील कविता वाचताना मनाची विविधरूपे वाचकांच्या मनाचा ठाव घेतात. भुलव्याला फसणारं, मुसमुसणारं मन कधी टिपूर चांदणं होऊन जातं. प्रकाशाची अपेक्षा करताना वणव्यामुळे होणारी राख पदरात येते. कधी आशेचा हिंदोळा, तर कधी दु:खाचा उमाळा असे झोके घेत राहणारं मन आपलंच असतं. सांजवेळी काहूरलेल्या मनाची अनुभूती वाचकाला आपलीच वाटते. एकाकी चाफ्याच्या रूपाने मनाची खंत व्यक्त होते. त्यामधूनच शिवचरणी समर्पित होण्याची उदात्त भावना व्यक्त होते आणि सांजवेळी काहूरलेल्या मनाला रात्रीची गूढता हुरहुर लावून जाते आणि पांडुरंगाच्या निर्मळ रूपाने ध्येयाची पूर्ती करण्यासाठी प्रयत्नांची कास धरावी असे प्राजु मनापासून सांगते.
निसर्गातील अनेक रूपे कवयित्रीला रेखाविशी वाटतात. निसर्गवर्णने भावगंधाने सजलेली असल्याने त्यांची रूपे अधिकच मोहक झाली आहेत. स्वप्नवत वाटणारा प्रभातकाल, हृदयात शिरशिरी शिंपून जाणारा पाऊस, ऋतू बदलताना झाडांत होणारे बदल हे अनुभव सांगताना कवयित्रीच्या संवेदनशील मनाची स्पंदने जाणवतात. विविध रूपांनी येणारी सांज असो, हिरव्या ऋतुमुळे चराचरात होणारा बदल असो, अगर तप्त उन्हाने भेगाळलेली धरणी असो; प्राजक्ताने या निसर्गरूपांना आपल्या कल्पनांचा सहजसुंदर साज चढविला आहे. अमावस्येच्या काळोखाचे चित्र रेखाटताना त्यातील लयबद्ध शब्दरचना थक्क करणारी आहे.
कृष्णबावरी, कृष्णमयी, कृष्णस्वामिनी या कवितांमधून राधा आणि मीरा यांच्या उत्कट प्रेमाची दाद कवयित्रीने घेतली आहे. त्याचबरोबर प्रियकर आणि प्रेयसी यांच्या मनातील हळव्या प्रेमभावना तितक्याच हळुवार शब्दांतून व्यक्त केल्या आहेत. पावसाच्या ओल्या गंधात भेटलेल्या प्रेयसीला 'सखे, नको गं जाऊस' अशी विनवणी करणारा, तिच्या प्रेमात नाहणारा, तिला स्वप्नांत पाहणारा भावुक प्रियकर आहे; तशी प्रेयसी 'मीपण' संपवून प्रियकराच्या मनात स्थान घेणारी आहे.
-
मंगला बापट
अनुक्रमणिका
अनुभव
- ग्रंथालयात भटकंती - जाँ-पॉल सार्त्र
- वैज्ञानिक व पुस्तकांचे जग!
- 'साभार परती'चा शिक्का
- बौद्धांचे आणि जैनांचे संस्कृत साहित्यातले योगदान - एक आढावा
- सांगावेसे वाटले म्हणून.....
- डाऊन द मेमरी लेन
- कृतज्ञ!
- पुनर्वाचनाय च

प्रतिक्रियां
अतिशय सुंदर रसग्रहण ...
आवडलें. पण प्रकाशकाचें नांव,पत्ता, दूरध्वनी क्र. तसेंच पृष्ठसंख्या व किंमत या गोष्टी देखील आल्या तर पुस्तक विकत घेणें सोपें पडतें. पुढील खेपेस या गोष्टी द्याव्यात ही नम्र विनंति.
सुधीर कांदळकर