'बोलती पुस्तके' हा मराठीतला पहिला वाहिला free Audio Books प्रकल्प. याबद्दल अधिक जाणुन घ्या इथे.
पुस्तक परिचय : ... आणि पानिपत (कादंबरी) - एक सखोल चिंतन...
मुखपृष्ठ
|
पुस्तकाचे नाव : ... आणि पानिपत (कादंबरी)
लेखक : संजय सोनवणी
प्रकाशक: प्राजक्त प्रकाशन, पुणे
किंमत: ४०० रुपये
पृष्ठसंख्या : ४७२
लेखकाचा ब्लॉग : http://sanjaysonawani.blogspot.com/
पानिपताचे युद्ध आणि त्याची कारण मीमांसा यावर कित्येक कादंबर्या आणि संशोधनपर ग्रंथ उपलब्ध आहेत.
अलिकडेच मी संजय सोनवणी यांची " ... आणि पानिपत " ही कादंबरी वाचली. संजय सोनवणी हे संशोधन करुन पुराव्याच्या आधारे लेखन करण्यासाठी प्रसिद्ध आहेत.
सदाशिवराव भाऊंचा तोतया , जनकोजी शिंदेचा तोतया याकडे ऐतिहासिक ग्रंथांनी जरी काणाडोळा केला तरी त्यांची स्फोटकता या कादंबरीत जाणवते.
सन १६८० ते १७६१ एका दलित कुटुंबियाच्या चार अख्ख्या पिढ्यांच्या नजरेतून बघितला गेलेला हा थरारक इतिहास काल्पनिक वाटतच नाही एवढा जळजळीत वास्तव वाटतो.
भालचंद्र नेमाडे यांची 'कोसला', किरण नगरकर यांची 'सात सक्कं त्रेचाळीस' या कादंबर्या प्रकाशित झाल्या त्या काळात त्यांनी प्रचंड खळबळ उडविली होती. "...आणि पानिपत" ही देखील अशीच खळबळजनक कादंबरी आहे. "...आणि पानिपत " चे लेखक संजय सोनवणी हे वादग्रस्त विधाने करणारे लेखक म्हणून ओळखले जात असले तरी स्वतः संशोधन करुन पुराव्यासकट विचार वाचकांपुढे ठेवतात. आता कादंबरीकडे वळूयात.
पुस्तकाच्या मुखपृष्ठावर असलेल्या "...आणि पानिपत" या नावापासूनच खरी सुरुवात होते. वाचकाच्या मनात सुरुवातीची तीन टिंबे "..." ( खरं तर अश्रूंचे थेंब) घर करुन बसतात. आणि कादंबरी वाचून खाली ठेवल्यावर तर "...आणि पानिपत" असे आपसूकच वाचकाच्या मनात उमटते. मला वाटते हेच "...आणि पानिपत" या कादंबरीचे यश आहे.
कादंबरी सुरु होते ती सिदनाक महार या पात्रापासून. तत्कालीन महार समाज कसा रहात होता व तत्कालीन बोलीभाषा वापरल्यामुळे थोडी शिवराळ भाषा वाटत असली तरी त्यामुळे कादंबरीला एक जिवंतपणा येतो. सुरुवातीची काही पाने वाचताना वाचकाला वाटते की सिदनाक महार हे मुख्य पात्र असणार. पण जसजसे कथानक पुढे सरकत जाते तसतसे सिदनाकचा पिता आणि भिमनाक महाराचा मुलगा रायनाक हे पात्र कादंबरीचा प्राण व्यापून टाकते. सद्सद्विवेकबुद्धी , सत्य-असत्य, योग्य-अयोग्य, पात्र-अपात्र अशी कित्येक मानसिक आंदोलने लेखकाने या कादंबरीतून समर्थपणे उभी केली आहेत. आजचा समाज प्रगत आहे आणि लायकी हाच निकष लावून समाजात कोणत्याही जाती-धर्माच्या व्यक्तीला स्वतःचे स्थान निर्माण करता येते. पण पेशवाईच्या काळात,
महारांना सकाळ आणि संध्याकाळ पुणे शहरात पाऊल टाकायची परवानगी नव्हती. का तर त्यांची सावली अंगावर पडते. आणि त्यामुळे विटाळ होतो. या असल्या खुळचट समजुतीपायी एका महाराने प्राण गमावले (हा सत्य प्रसंग आहे व याचे ऐतिहासिक दाखले देखील आहेत)
तसेच विकत घेऊन बाई ठेवण्याच्याही प्रथा होत्या.
भाऊंचा तोतया नव्हताच असे मानण्यापेक्षा ते खरे भाऊ असू शकतील काय? ही शक्यताही पडताळून तर बघितलीच पाहिजे. कारण पानिपताच्या युद्धात भाऊंचे प्रत्यक्ष प्रेत कोणीही पाहिल्याचा पुरावा नाहीये.
सिदनाक महाराच्या पात्रापासून कादंबरीची सुरुवात झाल्यावर कादंबरीच्या मध्यानंतर पुन्हा त्याचे आगमन होते, या काळात लेखकाने रायनाक महाराच्या वैचारीक प्रगल्भतेवर प्रकाश टाकला आहे. एक स्त्री केवळ निराधार झाल्यामुळे तिचा मोह नाकारण्याएवढा संयम दाखवणारा रायनाक पाहिला की गदगदून येते. त्याउलट रायनाकचा मुलगा सिदनाक लग्नानंतर त्याची बायको पोटुशी होते व बाळंतपणासाठी माहेरी जाते. तेवढ्यात सिदनाकच्या खास मित्राची बायको त्याला एकांतात घरात गाठते, त्यावेळचा त्यांचा रांगडा प्रणय वाचकाला उत्तेजित करता करता स्त्रीचा मोह नाकारणार्या रायनाकला अगदी उत्तुंग करुन टाकते. त्यावेळी रायनाकचे मोठेपण वाचकाला जाणवते.
पुढे सिदनाकची पुण्यात एका ब्राह्मणाच्या अंगावर सावली पडल्यामुळे हत्या होते आणि त्याचा मुलगा भिमनाक (हे पणजोबांचेच नाव ठेवलेले असते) पोरका होतो. त्यावेळी रायनाकच्या मनात त्याच्या भावाची येळनाकची विचारसरणी पटू लागते.
भिमनाक महाराला २ मुले असतात. एक रायनाक आणि दुसरा येळनाक. येळनाक संताजी-धनाजी जोडगोळीपैकी संताजी घोरपडेंच्या तैनातीत असतो आणि प्रचंड शौर्यही गाजवतो. पण रायगडाजवळच्या एका लढाईत एक मुसलमान सरदार अशरफीखान येळनाकच्या शौर्यावर भाळतो व त्याला जिवंत कैद करवतो. आणि त्याला मुसलमान होण्याचे निमंत्रण देतो व त्याचा योग्य तो सन्मान करतो. हसन अली या नावाने येळनाकचे नामकरण होते. हा कादंबरीतील अतिशय महत्त्वाचा भाग आहे. यावरुन आपल्याला लक्षात येते की भारतात मुसलमान हे मूठभर आक्रमक असूनही त्यांची संख्या अमाप कशी वाढली? लेखकाने या प्रश्नाचा अप्रत्यक्षरित्या वेध घेतल्याचे जाणवते.
कादंबरी संपायला येते त्याबरोबर रायनाक , भिमनाक ही पात्रे गौण होऊ लागतात आणि येळनाक (हसन अली) या पात्रावर प्रकाशझोत जातो. पण नंतर पुढे दिल्लीचे राजकारण आणि पानिपत युद्धाचा वेध घेणे हा प्रमुख हेतू या कादंबरीमागे असल्याने तो ही विरळ होत जातो. पण तो शेवटपर्यंत असतो.
युद्धासाठी जाणार्या लव्याजम्यात भिमनाक त्याची नवी नवरी बाळी बरोबर जातो, त्यात त्याचा खास मित्र पेशव्यांच्या सैन्यात असतो. तो वारंवार भिमनाकला भेटायला येत असतो त्यातच बाळी त्याच्यावर भाळते व पुढे त्यांचे जमते देखील. त्यावेळीही वाचकाला सिदनाकचा रांगडा प्रणय पुन्हा एकदा दिसणार असे वाटते. पण लेखकाने याचे भान ठेवल्याचे जाणवते. ज्या गोष्टीला जेवढे महत्त्व द्यायचे तेवढेच महत्त्व संजय सोनवणी यांनी दिले आहे. शेवटी शेवटी कादंबरी विस्तारीत जाते तशी ती थोडी विस्कळीत वाटू लागते. पण पानिपताच्या युद्धातील प्रश्नांचा आढावा घ्यायचा असल्यामुळे तेवढे वाचक समजू शकतो.
कादंबरी वाचण्यास सुरुवात करण्यापूर्वी वाचकाच्या मनात पूर्वी वाचलेला पानिपताचा भव्य दिव्य इतिहास उभा राहतो. विश्वास पाटील यांनी 'पानिपत' ही कादंबरी लिहून 'तत्कालिन उपलब्ध साधनांच्या आधाराने पानिपत' युद्धाचा इतिहास एका थरारक स्वरुपात वाचकांच्या समोर ठेवला. पण या कादंबरीत जे प्रश्न हाताळले गेले नाहित ते हाताळण्याचे धाडस संजय सोनवणी यांनी दाखवले आहे. आणि मला वाटते की इथेच "...आणि पानिपत" चे वेगळे पण सुरु होते.
पानिपताचा इतिहास म्हटले की मराठ्यांचा पराक्रम आणि पेशव्यांचे कर्तृत्त्व यापलिकडे काही वाचल्याचे आपल्याला आठवते का बघा. सर्वसामान्यांच्या आयुष्यात पानिपताच्या युद्धाने केवढे मोठे वादळ निर्माण केले याचे एक परखड अवलोकन "...आणि पानिपत" च्या माध्यमातून लेखकाने केले आहे. अर्थात या कादंबरीत पृष्ठसंख्येच्या मर्यादेमुळे असेल कदाचित पण लेखकाने पानिपताच्या युद्धाच्या अनुषंगाने सगळ्याच अंगाला स्पर्श केला आहे असे नाही म्हणता येणार. पण जे लिहिले आहे त्याला तोड नाही.
"...आणि पानिपत " ही कादंबरी अनेक वेगळ्या पैलूंवर प्रकाश टाकते आणि क्रांतिकारक विचार देखील देते. कोणत्याही वेगळ्या विचारांचे स्वागतच व्हायला हवे. वाचकांनी ते करावे एवढीच विनंती. जात पात बाजूला ठेवून एका सर्वसामान्य गरीब रयतेच्या दृष्टीकोनातून या कादंबरीचे वाचन वाचकाने केले तर "...आणि पानिपत" या कादंबरीला तुम्ही न्याय देऊ शकाल. एका जातिविशेष अभिमानातून अथवा पूर्वग्रह ठेवून हे पुस्तक वाचले तर तो "...आणि पानिपत" या कादंबरीवर अन्याय ठरेल. खरे तर तो विचारस्वातंत्र्यावरील अन्याय ठरेल. मला वाटते की त्यांच्या मतांशी भिन्नता असणार्या संशोधकांनी वा लेखकांनी त्यांनी उभे केलेल्या प्रश्नांना हॅ... काहीतरीच असे उडवून लावण्यापेक्षा लेखनाच्या माध्यमाद्वारेच उत्तरे दिली पाहिजेत. अशा बौद्धिक आणि पुराव्यांसकट मांडल्या जाणार्या मतांमुळे इतिहासातील देवत्व दिलेल्या व्यक्ती खरोखर तशाच होत्या किंवा नाही यामागील सत्य उलगडण्यास सर्वांनाच मदत होईल.
तर सर्वसामान्य आणि सर्व बुद्धीवंत अशा सर्व वर्गातील वाचकांनी अवश्य वाचावी अशीच ही कादंबरी आहे. वाचकाची अजिबात निराशा होणार नाही हे खात्रीने म्हणू शकतो.
"...आणि पानिपत" वाचा आणि कशी वाटली ते अवश्य कळवा. 
काळात गल्लत नाहीये
वल्ली मित्रा,
तुझा प्रतिसाद अपेक्षित होताच
संजय सोनवणी हे फेसबुकावर आणि त्यांच्या ब्लॉगवर पण सक्रिय आहेत.
जे मुद्दे पटले नसतील त्यावर ते चर्चा करण्यास आणि त्यातून निघालेले सत्य स्वीकारण्यास कायम तयार असतात.
मी स्वतः हा अनुभव घेतला आहे.
स्वतःची पार्श्वभूमि ते देखील लपवत नाहीत. जे सत्य आहे ते स्वतः सांगतात. थोडा डॅशिंग आहे माणूस एवढेच 
येळनाकचा मुलगा पण असतो. पण काळात काही घोळ नाहिये. (काही घोळ चुकून झाला असेल तर तो माझ्या नजरचुकीने झाला असण्याची शक्यता आहे. कारण पुस्तक वाचल्यानंतर जवळपास दीड महिन्याने लिहिलेला हा परिचय आहे. ) आणि कादंबरीचाही मुळात 'काळ' हा मुख्य हेतू नाहिये. ही कादंबरी असल्यामुळे लेखकाने विचार वाटण्यावरच जास्त भर दिला आहे.
सिदनाकने स्त्री ला नाही नाकारले ( ते त्याच्या वडिलांनी, रायनाकने)
अर्थात ही कादंबरी काल्पनिक आहे. पण त्यात रेखलेले अनुभव वास्तव वाटतील असेच आहेत.
महाराच्या हत्येबद्दलचा प्रसंग खरा आहे. त्याचे ऐतिहासिक दस्तावेजही आहेत. मलाही ते पटले नव्हते म्हणून मी स्वतः लेखकाला विचारले होते. त्यावेळी त्यांनी स्पष्ट करुन सांगितले.
पेशवाईच्या काळात कर्मकांडांचे स्तोम होतेच. ती त्या काळाची गरज होती की नव्हती हा भाग वेगळा. आज अशा घटनांकडे आपण तिरस्कारानेच पाहू. त्या काळात सर्वसामान्य रयतेचे जगणे कसे होते आणि पानिपताच्या युद्धामुळे किती हाल झाले त्याकडे लोकांचे लक्ष वेधून त्याची जाणीव आजच्या पिढीला करुन देणे असा लेखकाचा हेतू आहे.
आणि बाकी ही कादंबरी असल्यामुळे कथानक काल्पनिकच आहे.
होय लेखकाने कादंबरीच्या शेवटी संदर्भग्रंथ दिलेले आहेत
मित्रा तू जे ठरवले आहेस तद्वतच, वाचून मगच स्वतःचे मत तयार कर असेच पुन्हा सांगेन 
मी एक पुस्तकवेडा
http://pustakveda.blogspot.com/
उत्तम
उत्तम.
परिचय छान झाला आहे. सोनवणींना पुविवर आमंत्रित करता आले तर बघ रे दोस्ता.
इथे कदाचित वाचकांचे शंका समाधान होईल.
खरे सांगायचे तर त्यांच्या ब्लॉगवरुन किंवा फेसबुकपोस्ट वरुन ते ब्राह्मण मराठा राजकारणार फार सक्रिय असावेत असे वाटायला लागले होते, त्यामुळे त्यांचे एतिहासिक संदर्भ असलेले पुस्तकं वाचणं सोडले होते. त्यांची आधीची क्लिओपात्रा वैगेरे पुस्तकं वाचली आहेत.
नक्की प्रयत्न करतो
ब्राह्मण मराठा राजकारणावर संजय सोनवणींनी सक्रियतेने लिहिलेले आहे हे खरंय. पण मी जे त्यांच्याशी बोललो त्यावरुन ते केवळ तत्कालीन ब्राह्मण आणि मराठा समाजाबद्दलच बोलतात. जिथे ब्राह्मणांच्या चांगल्या गोष्टी आहेत त्याचे त्यांनी समर्थनच केले आहे. त्यामुळे ते एक ज्ञातिविशेषाबद्दल आकस बाळगणारे नसून तत्वाने बोलणारे वा लिहिणारे आहेत. उदा: ब्राम्हण हे पुढे असण्याचे कारण केवळ शिक्षण हे आहे याचाही ते पाठपुरावा करतात. लायकी हाच निकष सर्वत्र असावा एवढेच त्यांचे म्हणणे आहे. मी त्यांच्याशी आत्तापर्यंत जेवढा वेळा बोललो आहे किमान त्यावरुन तरी मला असे जाणवले.
पण त्यांचे एकूण वैचारिक लेखन पाहिले तर ते त्या तुलनेने कमीच म्हणावे लागेल. आता कुठे सुरुवात झाली आहे असे म्हणता येईल.
संजय सोनवणींनी लेखनास सुरुवात केली ती रहस्यकथा लेखनाने. त्यांच्या रहस्यकथा मी कॉलेजमध्ये शिकत असताना वाचलेल्या आहेत. गुडबाय प्राईम मिनिस्टर, वॉर टाईम, रक्त हिटलरचे, इ... छान होत्या त्या. क्लिओपात्रा ही ऐतिहासिक कादंबरी बरीच गाजली. त्याची अलिकडेच ६वी आवृत्तीदेखील प्रसिद्ध झाली आहे. तसेच इंग्रजी आवृत्तीही प्रसिद्ध झालीय.
वयाबरोबर आणि अनुभवाबरोबर लेखकाची प्रगल्भता वाढत जाते तसे त्याचे लेखनक्षेत्रही विस्तारत जाते तद्वतच त्यांनी अलिकडेच वैचारिक लेखन आणि ऐतिहासिक संशोधनावर भर दिला आहे. बोलून बघतो त्यांच्याशी. ते येथे आले तर आनंदच आहे. 
मी एक पुस्तकवेडा
http://pustakveda.blogspot.com/
कादंबर्या
सोनवणींच्या सुरुवातीच्या कादंबर्या राजकीय थरारावर होत्या.
मृत्युरेखा, विश्वनाथ,अंतिम युद्ध, गुड्बाय प्राइममिनिस्टर, वॉरटाइम या वाचलेल्याही होत्या. अनिल गुजर आणि सोनवणींच्या कादंबर्या बर्याचश्या सारख्या वाटायच्या. बहुतेक तदोघांचीही शैली जेम्स हॅडली चेसशी मिळतीजुळती असायची. अखंड थरार, वेगवान कथानक वगैरे.
नंतर त्यांनी ऐतिहासिक कादंबर्याही लिहिल्या होत्या जसे कुशाण, यशोवर्मन, कल्की, अश्वत्थामा वगैरे.
पण कादंबरी प्रांतातून हा लेखक ब्राह्मण मराठा राजकारणाकडे वळला आणि मग वादग्रस्त विधाने, लेख, पुस्तके वगैरे चालू झाली.
असो. येथे जर संजय सोनवणी आले तर चांगलेच होईल. लेखकाशी प्रत्यक्ष संवाद साधून होणार्या शंकाचे निरसन कधीही उत्तमच. त्यांच्याशी चर्चा करायला नक्कीच आवडेल.
नक्कीच मित्रा
संजय सोनवणींशी बोललो आहे. त्यांची मते विस्ताराने मांडण्यासाठी ते लवकरच येथे येतील.
स्वतः लेखक च्या कलाकृतीबद्दल जेवढ्या अधिकाराने सांगू शकतो तेवढे दुसरे कोणी सांगू शकत नाही. 
मी एक पुस्तकवेडा
http://pustakveda.blogspot.com/
चष्मा न लावता वाचन....
एका दलित कुटुंबियाच्या चार अख्ख्या पिढ्यांच्या नजरेतून बघितला गेलेला......
एका सर्वसामान्य गरीब रयतेच्या दृष्टीकोनातून या कादंबरीचे वाचन वाचकाने केले तर ......
सागर,
अत्यंत महत्त्वाचे असेच तू सुचवले आहेस. कारण `पानिपत' सारख्या बहुचर्चित विषयावर नवे लेखन वाचताना पूर्वग्रह बाजूला ठेवून वाचणे अवघड होऊ शकते. मनातील आधीच तयार झालेल्या कल्पनांशी पडताळणी करत वाचन होण्याचा संभव असतो.
छान परिचय!!!!
+१ सहमत आहे
बरोबर आहे चित्रा तुझे.
मनात आकस असला की दृष्टीकोन संकुचित होतो.
कोर्या मनाने पुस्तक वाचले तरच आपण त्या पुस्तकाला न्याय देऊ शकतो.
मी एक पुस्तकवेडा
http://pustakveda.blogspot.com/
मित्रहो, नमस्कार. मला येथे
मित्रहो, नमस्कार.
मला येथे निमंत्रित केल्याबद्दल मी माझे मित्र श्री सागर भंडारे यांचे प्रथम आभार मानतो. मी एवढा वादग्रस्त आहे आणि माझ्याबद्दल एवढे समज-गैरसमज आहेत हे पाहून मलाच गम्मत वाटली हे मात्र खरे. पहिली बाब म्हनजे मी ब्राह्मण-मराठा वादात नव्हतो आणि नाही, पण अनेक ब्राह्मण (जे मला ओळखत नाहीत) मला ब्राह्मण द्वेष्टा समजतात तर मराठे मला मराठा द्वेष्टा आणि ब्राह्मणांचा दलाल समजतात, दलित चलवळीतील मोठा वर्ग मला बहुजनद्वेष्टा म्हणुन सरसकट लेबल लावुन मोकळा झाला आहे हे वेगळेच. हे कदाचित आपणास माहित नसेल. मी हे सारे पाहता वादग्रस्त आहे असे वाटणे अत्यंत स्वाभाविक आहे. यामागे एक पार्श्वभुमी आहे ती श्री ह. मो. मराठे यांच्या "ब्राह्मणांना अजून किती झोडपणार?" या पुस्तिकेला मी उत्तर स्वरुप दिलेल्या "ब्राह्मण का झोडपले जातात?" या पुस्तिकेची. खरे तर या पुस्तिकेमुळे पुर्वी कसलाही परिचय नसलेले ह.मो. माझे प्रिय मित्र बनले, एवढे कि एकाच व्यासपीठावरुन आम्ही काही भाषनेही दिली. पण ब्राह्मण समाजाला मात्र ही पुस्तिका ब्राह्मणद्वेषाचे प्रतीक वाटली. खरे तर क्वचितच ही पुस्तिका पुर्णपणे कोणी वाचली असेल. हमोंच्या मतांचे पुराव्यानिशी खंडण करत आणि सरसकट सर्वच ब्राह्मणांचा द्वेष करणा-यांचा निषेध करत विद्वेषरहित समाजाची आवश्यकता पटवणारी ही पुस्तिका. जुने जेही काही झाले ते उगाळत न बसता हातात हात घालुन सर्वच समाजांनी प्रगतीशील होण्याची अपेक्षा यात आहे. असो. आपला समाज एकुणातच जातीय आहे आणि त्याला कसलीही चिकित्सा सहसा मान्य नसते...अन्य जातीयाने केलेली तर नाहीच नाही.
पुरुषोत्तम खेडेकर यांची संघटना व त्यांची विखारी विचारधारा याबद्दल मी खुप लिहिले आहे. ते प्रतिष्ठित मासिकांत प्रसिद्धही झालेले आहेत. एवढेच नव्हे तर त्यांच्याविरुद्ध जो गुन्हा अलिकडेच दाखल झाला त्यामागील तक्रारदारांपैकी मी एक होतो. त्याची फळे मला रोज शिवी-गाळीच्या रुपात मिळतच असतात. ते महत्वाचे नाही. मी कधीही कोनत्याही चळवळीत/संघटनेत/पक्षात नव्हतो. कोनत्या साहित्यिक कंपुतही मी सामील झालेलो नाही. कोणत्याही पुरस्कार/मानसन्मानाची अपेक्षा मी कधी ठेवलेली नाही. कदाचित त्यामुळेच मला तटस्थपने, निर्भयपणे मते मांडता आलेली आहेत. ही मते मांडतांना "जात" हा परिप्रेक्ष असु शकत नाही. माझे लेखन-विचार हे पटोत अथवा ना पटोत पण ते स्वतंत्र असते. माझा इतिहासाकडे, धर्मेतिहासाकडे पाहण्याचा द्रुष्टीकोन असा असल्याने इतरांना सापडु न शकलेली वा सापडुनही मांडावी न वाटलेली सत्ये मी समोर ठेवू शकलो आहे. माझी मते अशामुळे अनेकदा परंपरागत समजुतींना धक्का देतात आणि मी वादग्रस्त वाटु लागतो. पण ते खरे नाही.
येथे चर्चेह्त काही मुद्दे आलेले आहेत तेवढ्यापुरतेच मी हे लेखन मर्यादित ठेवतो. मी रहस्यकथा कधीही लिहिलेल्या नाहीत. मी राजकीय व गुन्हेगारी थरारकादंब-या लिहिल्या आहेत आणि अर्थातच असे काही झाले कि पाश्चात्य लेखकांचे अनुकरण/नक्कल तर नाही ना हा प्रश्न उभा राहतो. येथे एवढेच सांगतो कि म्रुत्युरेखाचा इंग्रजी अनुवाद जगभर गेला, एकुण ३ आव्रुत्त्या झाल्यात आणि जगभरच्या महत्वाच्या विद्यापीठांच्या ग्रंथालयांतही त्या उपलब्ध आहेत. (वर्ल्ड क्यटलोग पाहुन घ्या.) अशा रितीने माझ्या ९ कादंब-या इंग्रजीत गेल्यात आणि मराठी थरारकादंबरीकाराच्या द्रुष्टीने हे महत्वाचे आहे. माझे लेखन कोणत्याही दर्जाचे असो, पण ते स्वतंत्र आहे.त्याचा मला अभिमान आहे.
येथे Haary Potter चा विषय माझ्या एका मित्राने छेडला आहे, त्याबद्दलही लिहिणे आवश्यक आहे. पुष्प प्रकाशन लि. ही मराठीतीलच नव्हे तर भारतातील पहिली पब्लिक लिमिटेड कंपनी मी १९९२ साली स्थापन केली होती. २५ ते ५० रुपयांत उत्तम मराठी साहित्य वाचकांना मिळावे हा हेतु होता व तशी आम्ही ४८ पुस्तके प्रकाशितही केली. १९९६ पर्यंत मी या संस्थेचा कारभार पहात होतो व माझा भाऊ विनोद मला मदत करत असे. त्यानंतर मी गडचिरोली येथे लोह भुकटी बनवण्याचा मोठा कारखाना काढला आणि पुष्पची धुरा भावाकडे सोपवली आणि माझा संबंध एक लेखक एवढाच या संस्थेशी राहिला. स्वस्त पुस्तक योजना बंद पडली. Harry Potter चा अनुवाद विकास शुक्ल यांनी स्वता:च परस्पर केलेला होता. (त्यांची प्रस्तावनाच पुरेशी बोलकी होती.) हा अनुवाद प्रकाशित करायचा प्रस्ताव विनोदने माझ्याशी चर्चिला होता, कारण त्याला स्वत:ला इंग्रजी मुळीच येत नाही. त्यानुसार मी मुळ प्रकाशकांशी मेलवरुन संपर्क साधला होता आणि वाटाघाटी सावकाश पण अनुमतीच्या दिशेने चालल्या होत्या. पण प्रत्यक्ष करार होण्याची वाट पाहण्याचा संयम सुटला आणि पुस्तक प्रकाशितही झाले.. त्याची परिणती copy right act चा भंग झाल्याच्या गुन्ह्यात झाली. माझे बंधु, दुसरे संचालक व अनुवादकांना अटकही झाली. मी कंपनीचा संस्थापक अध्यक्ष असल्याने अर्थात माझ्यावरही गुन्हा दाखल झाला. पुढे मी लेखिका जे के रोलिंग यांच्याशी संपर्क साधला, वस्तुस्थिती विषद केली आणि त्यंच्याच सांगण्यावरून प्रकाशकातर्फे गुन्हा मागेही घेण्यात आला. पण मी दोन्ही संचालकांचा (विनोदसह) राजीनामा घेतला आणि सारा स्टोक ९०% कमिशनने व्होलसेलमद्धे विकून टाकला आणि प्रकाशन संस्थाच बंद करून टाकली. यात काय नुकसान झाले, मनस्ताप झाला आणि एक अत्यंत वेगाने वाढणारी संस्था बंद करण्याचे दु:ख कसे सहावे लागले ते येथे महत्वाचे नाही. चुक झाली होती हे खरे होते आणि त्याची फळे भोगलीच पाहिजे होती आणि ती तशी भोगलीही आहेत.
असो. आज आपणा सर्वांशी या निमित्ताने परिचय झाला याचा आनंद मोठा आहे. कधीही कोणतेही प्रश्न असतील तर स्वागत आहे.
धन्यवाद,
आपला,
संजय सोनवणी.
मनापासून धन्यवाद
संजय सर,
माझ्या विनंतीला मान देऊन आपण येथे आलात याबद्द्ल मनापासून आभारी आहे.
आपल्या वरील लेखनामुळे आपल्याबद्दलचे ऐकीव समज-गैरसमज दूर होतील याची खात्री आहे. 
"...आणि पानिपत" च्या अनुषंगानेही आपली भूमिका जर आपण येथे मांडू शकलात तर खूप आनंद होईल.
मी एक पुस्तकवेडा
http://pustakveda.blogspot.com/
स्वागत
संजयजी, सर्वप्रथम पुस्तकविश्ववर आपले मनापासून स्वागत. लेखकाची प्रत्य़क्ष संवाद साधण्याचा आनंद आणि भाग्य निराळेच असते.
आपली कारणमीमांसा वाचली व पटलीदेखील. जातीयतेबद्दल (मुख्यतः पुरातत्वाबद्दल उदा. विठ्ठल हा कोण होता) आपली काही मते पटत नाहीत हे देखील तितकेच खरे. अर्थात त्याला पुराव्यांचे अधिष्ठान असेल तर आणि तुमच्या म्हणण्याप्रमाणे ते तुमच्याकडे आहेच तर माझी मते बदलायला मी तयार आहेच.
पुष्प प्रकाशनासंबंधी तुमचे म्हणणे खरेच आहे. ती आमची आवडीची प्रकाशन संस्था होतीच. पुष्प तर्फे प्रकाशित बरीचशी पुस्तके वाचली होती आणि आवडली देखील होती. संस्था बंद झाल्याचे माहीत नव्हते. पण तुम्ही धडाक्याने दुसरी प्रकाशन संस्थाही उभाराल याचा विश्वास आहे.
वरील माझ्या एका प्रतिसादात म्हटल्याप्रमाणे तुमच्या मृत्युरेखा, प्राइममिनिस्टर, रक्त हिटलरचे इ. अनेक कादंबर्या वाचल्या देखील होत्या आणि आवडल्यादेखील होत्या. नंतरच्या ऐतिहासिक कादंबर्या तितक्याशा आवडल्या नाहित मुख्य म्हणजे ऐतिहासिक पात्रांविषयीचा पगडा/पूर्वग्रह कदाचित माझ्या मनावर असेल म्हणूनही त्यातले विचार फारसे पटले नाहीत.
तुमचा थरार कादंबर्यावरून एकदम ऐतिहासिक कादंबर्यांकडे जाणारा प्रवास वाचायला नक्कीच आवडेल. आणि त्यावरही ऐतिहासिक कादंबर्यांकडून संशोधक वृत्तीच्या लेखनाकडे उदा: विठ्ठ्ल कोण होता, ब्राह्मण का झोडपले जातात इ. लेखनाकडे तुम्ही कसे वळलात आणि थरार कादंबर्या लिहीणे का सोडून दिले हे पण जाणून घ्यायला नक्कीच आवडेल.
सध्या इतकेच लिहीतो. चर्चेत भाग घेत राहीनच.
माझ्या या आणि वरच्याही काही प्रतिसादात अधिक उणे काही लिहीले गेले असल्यास मी दिलगीर आहे.
आपण पुस्तकविश्ववर सतत येत राहावे आणि आम्हास लेखकाच्या सहवासाचा लाभ मिळत राहावा हीच इच्छा.
+१ असेच म्हणतो
थरार कादंबर्या लिहीणे का सोडून दिले हे पण जाणून घ्यायला नक्कीच आवडेल.
यामागील भूमिका मलाही जाणून घ्यायला आवडेल संजय सर.
कारण तुमच्या थरार कादंबर्यांचा मी पण मोठा चाहता आहे...
मी एक पुस्तकवेडा
http://pustakveda.blogspot.com/
प्रिय सागर, धन्यवाद. इतिहास
प्रिय सागर, धन्यवाद.
इतिहास हा सहसा थोरामोठ्यांचा लिहिला जातो. सामान्यांना इतिहासात सहसा स्थान नसते, असले तरी ते क्षुल्लक असते. मीही अनेक ऐतिहासिक कादंब-या लिहिलेल्या होत्याच. पण नेहमी प्रश्न पडे कि त्या-त्या काळातील जनसामान्यांचे काय? त्यांच्या अस्तित्वाखेरीज या राजा-महाराजांचे आस्तित्व निरर्थकचे नाही काय? संस्क्रुती घडवणारे, विकसीत करणारे, तिला श्रमाने/कौशल्याने व सेवांनी जगवणारे समाजघटक आपल्या रक्षणासाठी कररुपी मोबदला देवुन राजे-महाराजे घडवतात. पण त्यांची ही महत्ता मान्य न करता उलट सत्ता नेहमीच (अपवाद वगळता) त्यांचे शोषण करण्यातच धन्यता मानत असतात. युद्धे होतात....पराक्रमांच्या शर्थी होतात...त्यांवर काव्ये-महाकाव्येही लिहिली जातात, पण सामान्य सैनिक, ज्यांच्या एकुणातील पराक्रमाचाही विजयांत वाटा असतो, तेही दुर्लक्षित राहतात. खरे तर इतिहास कोणीही महापुरुष एकाकी घडवू शकत नाही तर त्यामागे रयतेचेही अधिष्ठाण असते. पराजय झाले वा परचक्रे आली तर सर्वाधिक विनाश या प्रजेचाच होतो. सामाजिक नीतिमत्ता, सांस्क्रुतिक विचारप्रवाह यावर आघात होतात, मानवी परस्परसंबंधांना पराकोटीचे हादरे बसतात आणि हाच समाज पुन्हा नवी मुल्ये घेत उभे राहण्याचा प्रयत्न करत नव्याने पुनर्निर्माण घडवण्याच्या यथाशक्ति प्रयत्नांना लागतो. जीवनाशी पुन्हा नाळ जुळवण्याचा प्रयत्न करतो. या अविरत संघर्षानेच आपला खरा इतिहास आणि मानसिकतेची घडण केलेली आहे.
हा आणि असेच असंख्य पदर असणारे विचार १९९८ पासुन डोक्यात घोळत होते. त्यात पानिपतचे रुपक सहज सुचले आणि या कादंबरीची संकल्पना सुचली. खरे तर ही कादंबरी एकार्थाने रुपक आहे. जेंव्हा कोणताही समाज एकुणातच व्यामोहांत सापडत एवढा दिग्भ्रमित होत जातो कि कसलेही शहाणपण त्याला ताळ्यावर आणु शकत नाही....त्याची वाटचाल आत्मघातकी विनाशाकडे सुरू होते आणि कोणत्यातरी एका बिंदुवर सर्वनाश ओढवला जातो. पानिपतावर मराठे व मोगलांचा जो सर्वनाश झाला तो एकाएकी नव्हता तर त्यामागे तत्पुर्वीचे क्रमश: होत गेलेले राजकीय व सांस्क्रुतीक अधंपतन हे कारण होते असे मला वाटले आणि इतिहास अभ्यासता या बाबी ठळक होत गेल्या. या सर्व राजकीय, सामाजिक, सांस्क्रुतिक परिवर्तनातुन जाणा-या सर्वसामान्यांचे काय झाले हा खरा प्रश्न होता. या साठी या कादंबरीचे नायक मी महार कुटुंबातले घेतले, कारण हा सर्वात तळागाळातील घटक. त्याच्यावर प्रत्येक स्थित्यंतराचे होणारे परिणाम, मग ते चांगले असोत कि वाईट, हे त्याच्याच द्रुष्टीकोनातुन दाखवणे हे आव्हान होते. एकतर महार हा गावगाड्यातील अस्प्रुष्य मानला गेला असला, त्याला पराकोटीचा छळला गेला असला तरी त्याच्याशिवाय गावगाडा चालू शकत नव्हता, त्यामुळे त्याचे व अन्य समाजघटकांतील आंतर-संबंध, त्यांतील ताण-तणाव, प्रेम-द्वेष आणि बदलत्या राजकीय, धार्मिक आणि आर्थिक स्थित्यांचा सामान्यांवर होणा-या परिणामांचा आलेख चितारतांना आपोआप एक व्यापक पट मिळत गेला.
मी या कादंबरीच्या कथानकाबद्दल लिहित नाही. एकच सांगतो कि यात अनेक प्रसंग काल्पनिक असले तरी पार्श्वभुमीवर गडद साकळुन राहिलेला इतिहास खरा आहे. महारांच्या जीवनात घडलेल्या असंख्य घटनाही ख-या आहेत...फक्त त्या इतिहासात विस्कळीत आणि अनेकांच्या संदर्भात वेगवेगळ्या वेळी घडलेल्या आहेत एवढेच. माझे नायक महार असल्याने त्यांचे जीवन, संस्क्रुती आणि विचारपद्धती स्वता:त रुजवल्याखेरीज ही कादंबरी लिहिणे हा अन्यायच झाला असता. एवढेच सांगतो, ही कादंबरी लिहितांनाच्या काळात मी महार झालो होतो. या सर्व स्थित्यंतरात त्यांची जी ससेहोलपट झाली ती कोणाही सह्रुदयाला पाझर फोडणारी आहे...हा सारा मानवी समुदायाचा पानिपतच्या सर्वविनाशक युद्धाकडे होणारा प्रवास...तो अटळ सर्वनाश आणि त्यातुनही जीवंत राहिलेले मानवतेचे महनीय मुल्य मी यात अभिव्यक्त केले आहे.
ही भुमिका लिहित असतांनाच वल्ली व सागर यांचे प्रश्न आले आहेत त्यामुळे येथेच त्यावरही लिहितो. वल्ली, ऐतिहासिक संशोधन जेंव्हा प्रथम सामोरे येते तेंव्हा ते लगेच स्वीकारले जाईल याची अपेक्षा नसते कारण जुन्या समजुती/श्रद्धांना धक्का पोहोचलेला असतो व तो पटकन पचनी पडत नाही. हे आजवरच्या सर्वच संशोधनांबद्दल झाले आहे. विट्ठलाबद्दलचे संशोधन नक्किच पुराव्यांसहित आहे...आणि खरे तर डा. रा. चिं. ढेरे यांनी जेथवर संशोधन आणुन ठेवले होते ते मी आणखी नवीन संदर्भांच्या/पुराव्यांच्या प्रकाशात थोडे पुढे नेले आहे एवढेच. डा. ढेरेंनी २५-३० वर्षांपुर्वी त्यांचे संशोधन मांडले होते तेंव्हा तर वादळ उठले होते. माझा थरार कादंब-या ते ऐतिहासिक/तत्वद्न्यानात्मक कादंब-यांचा आणि पुढे संशोधनात्मक लेखनाचा प्रवास झाला आहे हे खरे आहे. त्यामागे विशेष असे काही कारण नाही. त्या त्या वेळी ज्या विषयांनी माझ्यावर बाजी मारली ते लिहिले गेले. थरार कादंबरी लेखन अलिकडेच केले "असूरवेद", फक्त ती सांस्क्रुतिक थरार कादंबरी होती एवढेच. यावर नंतर सविस्तर लिहिन. खरे तर थरार लिहिण्यातला थरार वेगळाच असतो.
क्या बात है
वाह, क्या बात है !! प्रतिसाद आणि भुमिका दोन्ही आवडल्या.
संजय सर, आपण इथे आल्याबद्दल शतशः धन्यवाद. आपला सहभाग पुस्तकविश्वसाठी अमूल्य आहे.
भूमिका कळाली
संजय सर,
तुमच्या या सविस्तर विचारांमुळे "...आणि पानिपत" ची भूमिका जास्त प्रकर्षाने कळाली.
तुमच्या ब्लॉगवर आधी मी पुढील दोन दुव्यांवर
१. ...आणि पानिपत
२. पानिपत शोकांतिकेची दुसरी बाजू...
"...आणि पानिपत" ची पूर्वपीठिका व भूमिका वाचली होतीच. पण आज तुमची ही कादंबरी लेखनामागची भूमिका सखोल कळाली.
मनापासून धन्यवाद
मी एक पुस्तकवेडा
http://pustakveda.blogspot.com/
थोडेसे विषयांतर
संजय सर, हा प्रतिसाद देताना मी मूळ धाग्यापासून थोडेसे विषयांतर करत आहे.
'श्रीविठ्ठ्ल कोण होता' या लेखामध्ये तुम्ही पौंड्रपूर म्हणजेच आजचे पंढरपूर अशी भूमिका मांडली आहे. शिवाय पौंड्रक वासुदेव हा दुर्योधनाच्या बाजूने लढला असेही लिहीले आहे जो महान शिवभक्त होता, शिवाय जरासंधाचा मित्र होता.
पण इथेही स्थळाची काहितरी गल्लत होते आहे. महाभारतकालीन नकाशाप्रमाणे पौंड्र देश हा भारताच्या पूर्वेला होता. अंग, वंग, पौंड्र, किरात असाच या राष्ट्रांचा उल्लेख महाभारतात होतो. आजचा जो बिहार, बंगाल या दरम्यान कुठेतरी पौंड्र देश होता. या नकाशावर अधिक माहिती मिळू शकेल.
मग पंढरपूर हे पौंड्रपूर कसे काय? का त्याकाळी दक्षिणेतही पौंड्रपूर नावाचे अजून एक शहर होते का?
तसेच सातवाहनयुगाच्या काळात पंढरपूर हे एक बौद्धांचे प्रमुख स्थान होते (तेर-तगर, अॅडम याप्रमाणे) असेही ऐकले होते. शंकराचार्यांच्या उदयानंतर त्याचे महत्व हळूहळू लयाला जाउन ते नंतर हिंदूंचे एक प्रमुख स्थळ बनले.
तसेच तुम्ही असेही लिहिले आहे "दिवंगत महापुरुषांच्या मूर्ती/प्रतिमा बनवण्याची प्रथा औंड्र सातवाहनांनीही पाळली असे दिसते." तर सातवाहन जरी त्यांना आंध्रभृत्य असे म्हणत ते मूळचे आंध्रातील नव्हेत. एक प्रमुख पुरावा म्हणजे सातवाहनांचे सर्व शिलालेख(आंध्र प्रदेशातीलही ) हे सर्व ब्राह्मी प्राकृतात आहेत. त्यातला एकही अपवादात्मकरित्यापण तेलगू (द्राविडी भाषांमध्ये) नाही. सातवाहनांचे राज्य महाराष्ट्र व आंध्रात होते हे खरे तसेच गौतमीपुत्रानंतर तसेच पुळूवामीनंतर महाराष्ट्राचे राज्य लयाला जाउन ते पूर्णपणे आंध्रामध्ये स्थायिक झाले हेही खरे. पण ते औंड्र मात्र नव्हेत.
अर्थात माझे ज्ञान या संदर्भात अतिशय तोकडे आहे.
उत्तम चर्चा
उत्तम चर्चा चालु आहे. मुळ पुस्तक वाचलेले नसल्याने अधिक मते देता येणार नाहीत.
तुर्तास श्री. संजय सोनावणी यांचे स्वागत करतो. तुमच्याकडून तुम्हाला आवडलेल्या (स्वतःच्या + इतरांच्या )पुस्तकांबद्दल पुस्तकविश्ववर वेळोवेळी वाचायला आवडेल हे वेगळे सांगायला नकोच 
पुस्तकविश्व हे लेखक-वाचकांच्या थेट संभाषणाचे माध्यम होते आहे हे बघुन आनंद वाटतोच
-ऋ
----------------------
"चला, मी माझा एकमेव जुनाट कोट घालून एक नवं पुस्तक घेऊन येतो"
संपूर्ण सहमत!
ऋषिकेश,
पुस्तकविश्व हे लेखक-वाचकांच्या थेट संभाषणाचे माध्यम होते आहे हे बघुन आनंद वाटतोच...
संपूर्ण सहमत!!!!!!!!
श्री विट्ठल
वल्ली, आपले म्हणणे बरोबर आहे. लेखात स्थलाअभावी सर्व माहिती देता आलेली नाही पण "विट्ठलाचा नवा शोध" या माझ्या पुस्तकात सर्व मुद्दे घेतलेले आहेत. पौंड्रांची सत्ता बंगालमद्धेही होती, ( आता पुर्व बंगाल). येथे त्यांची राजधानी पुंड्रपुर नावानेच होती. अलीकडेच महास्थानगढ येथे या नगराचे अवशेष सापडलेले आहेत. चीनी प्रवासी ह्यु एन त्संग याने या नगराला भेट दिली होती तेंव्हा तेथे बोउद्ध धर्म सुप्रतिष्ठित झालेला होता. शेकडो विहार तेह्थे होते असे त्याने नोंदवून ठेवले आहे. भारतयुद्धानंतर काही पोउंड्र दक्षिणेकडे सरकले. ऐतरेय ब्राह्मणानुसार पौड्रांच्या व औंड्रांच्या दक्षिणेत सत्ता होत्याच. सोबत मुतीब, शबरादिही होते. अंग, वंग, कलिंग, औंड्र पौंड्र हे बळीचे पुत्र होते असे महाभारतात नोंदलेले आहे. त्यांच्या मुळाविषयी वेगवेगळी माहिती असली तरी या नावाचे प्रदेश आस्तित्वात होते व आहेत. उदा ओडीसा व आंध्र हे प्रदेश औंड्र लोकांनी वसवले. पौंड्र जनसमुह बंगालमद्धे असला तरी काही शाखा दक्षीणेत आल्या आहेत. पंढरपुर हे जसे पुंड्रपुरवरुन झाले आहे तसेच तिरुवारुर व चिदंबरम या दक्षिणेतील प्रसिद्ध शिवस्थानांची पुरातन नावे/पर्याय नामे पुंड्रपुर अशीच आहेत. जैन रामायणानुसार सीतेने पुंड्रपुरच्या राजाकडे आश्रय घेतला होता. हे पाहता पौंड्र समाज दक्षिणेकडेही पसरला होता हे दिसते. बुद्ध धर्म्,आच्या प्रभावकालात पऔंड्रांनीही बोउद्ध धर्म स्वीकारला असल्याने महास्थानगढ येथे असंख्य विहारांचे अवशेष मिळाले आहेत. या कालात महाराष्ट्रातील पौंड्रांनीही तो धर्म स्वीकारल्याने विट्ठलाला बुद्धअरुपी मानले गेले असने स्वाभाविक आहे. जनाबाईचा अभंगात "होवुनिया क्रुष्ण कंस वधियेला...आता बुद्ध झाला माझा सखा..." असे नोंदलेले आहेच.
सातवाहन हे औंड्र वंशीय. ओडीसा व आंध्रात त्यांच्या सत्ता होत्या. पुराणांत त्यांना "आंध्रजातीय" असेच म्हटलेले आहे व नंतरच्या अंकित सामंतांना "आंध्रभ्रुत्य" असे उल्लेखलेले आहे. अगदी सुरुवातीला सातवाहनांची सत्ता विदर्भात होती व नंतर त्यांनी जुन्नर व नंतर प्रतिश्ठान येथे राजधान्या बनवलेल्या दिसतात. सातवाहन कालीन नाणी विदर्भात भरपुर मिळालेली आहेत. नागणिका ही अत्यंत महत्वाचे स्थान मिळालेली राणी ही विदर्भातीलच होती. विदर्भ-आंध्र नजिक आहेत. त्यामुळे तिकडीलच काही औंड्र महाराष्ट्रात जुन्या काळापासुन स्थायिक झाले असने सहज शक्य आहे.
दिवंगत व्यक्तिंच्या प्रतिमा बनवण्याची पद्धत रामाच्या वंशातही होती. प्रतिमाग्रुहात दशरथाची प्रतिमा पाहुनच रामाला त्याचे निधन झाल्याचे समजते असे रामायण सांगते. हीच प्रथा पुढे वीरगळ, स्म्रुतीशीलादि रुपांनी पुढे चालु राहिली असावी.
जिज्ञासा
संजय सर, ऐतिहासिक संशोधन करताना तुम्ही कुठली साधने वापरता?
वर तुमच्या लिखाणात उत्खनने आणि काही पुराणांचा उल्लेख आहे. पुराणे ही इतिहासाचा पुरावा म्हणून शक्यतो वापरली जात नाहीत कारण एकतर ती बरीच अतिशयोक्त असतात आणि शक्यतो ती राजस्तुतीसाठी रचलेली असतात, तसेच काही पुराणांमध्ये एकाच घटनेविषयी वेगवेगळे लिखाण असते. जसे जैन रामायण, वाल्मिकी रामायण. सबब पुराणे ही विश्वासार्ह मानली जात नाहीत तरी काही वेळा त्यांचा आधार घ्यायला लागतो हे मान्य.
उत्खनन हे एक मह्त्वाचे साधन आहेच, उत्खननांमुळे तत्कालीन परीस्थितीबद्दल बरीच सत्य माहिती मिळू शकते. जसे महाराष्ट्रातील काही उत्खननांमध्ये रोमन वस्तू सापडल्या आहेत. तसेच काही लेण्यांमध्ये स्फिन्क्स, ग्रिफीन च्या प्रतिमा कोरलेल्या दिसतात, डेंटिल्स ही आढळून येतात हे म्हणजे प्राचीन काळच्या ग्रीक, रोमन लोकांबरोबरच्या व्यापाराचे पुरावेच.
शिलालेख व नाणी सुद्धा पुरावे म्हणून वापरली जातात. शिलालेखांमध्ये तर त्याकाळच्या स्थितीचा पटच सामोरा येतो जसे नाणेघाटातील शिलालेख सातवाहनांच्या कुलाची, त्यांनी केलेल्या यज्ञयागांची माहिती देतात, तर पांडवलेण्यातील शिलालेख हे सातवाहन क्षत्रप संघर्षाची माहिती देतात तसेच त्याकाळच्या काही बौद्ध संघांचीही माहिती देतात.
वसिष्ठिपुत्र पुळुवामीचे जहाजाची प्रतिमा असलेले नाणे त्याकाळची माहिती देते तर क्षत्रपांच्या नाणीवर पाडलेली सातवाहनांची मुद्रा (डबल इम्प्रेशन) त्यांचे क्षत्रपांवरील वर्चस्व दाखवून देते. तसेच नाण्याण्वरून त्यांच्या सत्तेच्या काळाची, वंशावळीची पण माहिती मिळत जाते.
वर तुम्ही म्हटले आहे की प्रतिमाग्रुहात दशरथाची प्रतिमा पाहुनच रामाला त्याचे निधन झाल्याचे समजते असे रामायण सांगते पण वाल्मिकी रामायणात चित्रकूटावर झालेल्या भरतभेटीत रामाला दशरथाच्या निधनाबद्दल समजते असे आहे. त्यात दशरथाच्या प्रतिमेचा कुठेही उल्लेख नाही.
उत्तम चर्चा सुरु आहे
वाचकांसाठी तर ही मेजवानीच आहे की माहिती नसलेल्या गोष्टींचा शोध कसा घेतला जातो.
पुरावे म्हणून कोणती साधने वापरली जातात.
उपलब्ध साधनांच्या आधारे खरा इतिहास कसा शोधून काढतात?
खूपच क्रिएटिव्ह चर्चा सुरु आहे. त्याबद्दल संजय सर आणि वल्ली मित्रा दोघांनाही मनापासून धन्यवाद.
अजून माहिती करुन घ्यायला आवडेल. 
मी एक पुस्तकवेडा
http://pustakveda.blogspot.com/
संशोधनाच्या खालील पाय-या
संशोधनाच्या खालील पाय-या सांगता येतीलः
१. विशिष्ट विषयावरील सध्या उपलब्ध असलेले सर्व संशोधन पाहणे, त्यातील विसंवाद, त्रुटी, आकलने तपासने.
२. बव्हंशी संशोधक हे कोनत्यातरी अभिनिवेशाखाली असतात. तो समजावुन घेवुनच त्याची निरिक्षणे, निष्कर्ष विचारात घेणे. एकाच पुराव्याचे विविध संशोधक वेगवेगळे अर्थ लावत असतात. याची अनेक उदाहरणे आहेत.
३. त्या संशोधनांच्या प्रकाशनानंतर नवीन कोणते पुरावे उजेडात आले आहेत याची माहिती घेणे.
४. त्या विषयाशी निगडीत संदर्भस्त्रोत तपासणे. (अनेकदा संशोधकही आपल्याला उपयुक्त तेवढाच संदर्भ-तुकडा उचलतात. प्रत्यक्षात पाहिल्यास काही वेगळेच हाती लागते.)
५. पुराणे ही संदर्भासाठी काही प्रमाणात नक्कीच उपयुक्त ठरतात. पण पुराकथांच्घा अर्थ कसा लावायचा याचे एक शास्त्र आहे. कथेभोवतीची चमत्कारांची, अप्रासंगिक वा भरकटणारी विधाने दुर सारत सरळसोट कथा घेणे, तशाच स्वरुपाच्या पण वेगळ्या पद्धतीने मांडणी करणा-या कथाही विचारात घेत साम्ये आणि भेद यांची नोंद घेत अधिकाधिक साम्ये असनारी कथा विचारात घेणे...(त्यातही अर्थात अधिक पुरातन कोनती याचाही विचार करावा लागतो.) आणि मगच त्याचा ऐतिहासिक अन्वयार्थ लावणे. (उदा.रामाच्या प्रतिमाग्रुहाची कथा हीच प्रामाणिक मानली जाते, चित्रकुटावरील भरतभेट नव्हे. वाल्मिकी रामायणाच्या अनेक आव्रुत्त्या आहेत.) आणि त्याचा संशोधनात उपयोग करणे.
नाणी, शिलालेख, ताम्रपट, उत्हननांत सापडलेल्या वस्तु-वास्तु ही साधने महत्वाची आहेतच. तत्कालीन जीवन, धार्मिक कल्पना, आर्थिक स्थिती, राज्यव्यवस्था, राजे इ. ची काही प्रमाणात माहिती मिलते व ती उपलब्ध अन्य पुराव्यांची ठाम पुष्टी करण्यात मदत करतात. उदा. सातवाहन घराण्यातील पुराणांनी न नोंदवलेले अनेक राजे नाण्यांमुळे आज आपणास माहित आहेत. त्यांच्या कारकीर्दिचा काळही नक्कि करण्यात मदत झालेली आहेच.
इतिहाससंशओधन हे एका प्रकारे रहस्यशोधनासारखेच असते. त्यात कुशल अन्वेषकाची बुद्धी असली तर मजा काही औरच. आणि भारतीय इतिहासात तर त्यांची रेलचेल आहे. आणि जिज्ञासेखेरीज संशोधन शक्यच नाही, मग ते भौतिक शास्त्रातील असो कि अन्य कोणत्या. "अथातो ब्रम्हजिज्ञासा" म्हटले आहेच...ब्रह्माची जिज्ञासा जोवर नही तोवर त्याचा शोध तरी कसा सुरू होणार?
मस्त
अतिशय सुंदर चर्चा.
ज्ञानात मोलाची भर पडते आहे. त्याचबरोबर संजय सोनवणी ह्या नावाभोवती असलेले गूढ वलय हळूहळू उकलत आहे.
संजय सोनवणी ह्यांचे स्वागत 
नमस्कार
नमस्कार मंडळी ~~
मी नेटवर्ल्डमध्ये अगदी नवखा आहे [मुलानेच ओळख करून दिली]. पण एक वाचनवेडा असल्याने तसेच इंग्रजी व मराठी टंकलेखनाचेही चांगलेच प्रॅक्टीस असल्याने वैचारिक देवाणघेवाण आणि आवडीच्या विषयांवर समविचारी लोकांशी संवाद साधावा म्हणून एका मराठी संस्थळाचा रितसर सदस्य झालो [त्यापूर्वी एक-दोन महिने कित्येक ठिकाणी फक्त वाचनमात्र दिवस काढले, त्याचा फायदाही असा झाला की कोणत्या संस्थळावर कुठल्याप्रकारे चर्चचा गाडा मार्गस्थ होतो याचा लेखाजोखा घेता आला].
अगदी पहिल्याच दिवशी त्या संस्थळावर इथले एक पुस्तकवेडे सदस्य श्री.सागर यांच्या "पुस्तक परिचय : ....आणि पानिपत, ले.संजय सोनवणी" या लेखाशी भेट झाली आणि मला आनंद झाला. त्या निमित्ताने मग मी तिथे त्यांच्या लेखाच्या अनुषंगाने प्रतिसाद दिला, त्याला त्यानी तिथेच सविस्तर उत्तर दिलेच शिवाय माझी वाचनाची आवड ओळखून मला व्यक्तिगत निरोपातून "पुस्तकविश्व" चे सदस्यत्व घेण्याची सूचनाही केली, जी मी तात्काळ स्वीकारली आहे. श्री.सागर यानी ह्याच [इथल्या] धाग्यावर आलेल्या प्रतिक्रियाही - ज्यामध्ये खुद्द लेखकांनीही भाग घेतला असल्याचे दिसते - वाचण्यास सांगितले आहे. जे मी जरूर करीन.
दरम्यान ज्या प्रतिसादावरून आमची मैत्री जुळली तो इथे मुद्दाम देत आहे, कारण शेवटी तो श्री.सोनवणी यांच्या लेखनभूमिकेविषयीच आहे.
धन्यवाद
अशोक पाटील
==========================================
पुस्तक परिक्षणाचा एक आदर्श नमुना म्हणून सागर यांच्या लेखाकडे मी पाहिले आहे. हे अशासाठी म्हणत आहे की वाचकाला अंती हे पुस्तक मिळवून वाचावे असे मत मनी निर्माण करण्यास ते यशस्वी झाले आहेत हे नि:संशय. वस्तुतः मी कादंबरीलेखक श्री.संजय सोनवणी यांचे विविध विषयावरील लेखन अन्यत्र वाचले आहेत शिवाय आता नेटशी मैत्री झाल्यावर थेट त्यांच्या ब्लॉगला भेट देवून जे अप्रकाशित लेख आहेत तेही वाचण्याची संधी मिळाली. त्यामुळे झाले असे की, त्यांच्या लेखनातील काही प्रसंगी येणारी 'उग्र' भाषा मला पचनी पडली नाही, तसेच काही विषयही.
ते एक सृजनशील लेखक आहेत हे तर त्यांची ग्रंथसंपदा सांगतेच, लिहिण्याची धाटणी प्रवाही असते, पण काहीवेळी अट्टाहासीही वाटते. लेखकाने दोन तडकलेली मने सांधण्याचा प्रयत्न करणे, ही सर्वप्रकारच्या समाजस्वास्थ्यासाठी आवश्यक प्रमाण मानले जाते. आपल्या प्रतिभेने वादंगच निर्माण करण्याचा एखादयाचा हेतू असेल तर तसे करणार्याला आपण रोखू शकत नाही. श्री.संजय सोनवणी यांच्या व्यासंगाचा विचार करता ते अशी काही कलाकृती निर्माण करू शकतात की ज्यामुळे लोक जुन्या कबरी कशासाठी खोदत बसायचे आणि किती वेळ, याचा साकल्याने विचार करू शकतील.
श्री.सागर परिक्षणात त्यांचे असे मत व्यक्त करतात, "अशा बौद्धिक आणि पुराव्यांसकट मांडल्या जाणार्या मतांमुळे इतिहासातील देवत्व दिलेल्या व्यक्ती खरोखर तशाच होत्या किंवा नाही यामागील सत्य उलगडण्यास सर्वांनाच मदत होईल."
~ मान्य. पण आज त्याची गरज आहे का, सागर ? काही काही गोष्टी त्या त्या काळात सर्वसंमतीने होत असतील तर त्याचा 'रीलेव्हन्स' आजच्या घडीला लावून काय आपण मिळविणार ? थोरल्या बाजीरावांच्या पराक्रमाबद्दल चर्चा करून त्याचे गुणगान गाताना कुणीतरी मध्येच येऊन त्यानी मस्तानीसमवेत व्यतीत केलेल्या रात्रीबद्दल सांगा असे म्हटले म्हणून बाजीरावाचे मराठी साम्राज्यातील योगदान कमी प्रतीचे ठरेल का ? रमाबाई माधवरावांच्या मृत्युनंतर सती गेल्या. त्याचे दैवत्व कितीही केले तरी ही गोष्ट आजच्या काळात कुणालाही रूचणार नाही पण त्या काळातील आचारविचार, रितीरिवाज या दृष्टीने पाहिले तर रमाबाईना त्यापासून कुणी प्रवृत्त केले नाही म्हणून आज दूषणे देण्यात अर्थ नसतो.
कालच्या डोहातील पाणी किती खराब होते याबद्दल बौद्धिक पुरावे जरूर मांडावेत लेखकाने, पण त्यामुळे आजचा शांत डोह ढवळला जाणार नाही याची किमान दक्षता घेणे तर्काला धरूनच होईल.
अशोक पाटील
प्रिय श्री अशोकजी पाटील, आपली
प्रिय श्री अशोकजी पाटील,
आपली मते वाचली. आपण मने सांधण्याबाबतच्या लेखनाबद्दल लिहिले आहे. साहित्य-संशोधन हे सोद्देश्य असावे कि निरुद्देश्य हा एक जुना चर्चेचा विषय आहे, त्यावर मी येथे लिहित नाही. वाचनाबाबतही तसेच म्हणता येईल. प्रत्येक वाचकाच्या आवडी-निवडी वेगळ्या असतात तसेच त्याचे आपापले स्वतःचे ठोकताळेही असतात. त्याला छेद देणारे आणि न देणारे लेखन, जरी ते एकाच लेखकाचे असले तरी, वेगळ्या पद्धतीने मुल्यांकित होते आणि त्यात वावगे काहीच नाही. कादंबरी, कविता, वैचारिक लेख, प्रतिवादात्मक लेख आणि संशोशधनात्मक लेख यातील भाषा विषयपरत्वे बदलत जानार हे उघड आहे. मधी म्रुदुल-सौम्य तर कधी परखड-उग्र ती होत जाते. ज्या मतांशी वाद असतो, विरोध असतो त्याच्या तीव्रतेनुसार ती भाषा बदलत जाते. "सर्व ब्राह्मण कापून-जाळुन टाका..." अशा खेडेकरांसारख्या व्यक्तिच्या मतांशी विरोध करायचा असतो तेंव्हा सौम्यतेची अपेक्षा कशी बाळगता येईल? किंवा कोणी रुढीबाह्य, अज्ञानमुलक धर्मोक्त बाबी आजही उपयुक्त आहेत तर त्याचा विरोध करतांना भाषा आपले रूप बदलेल हे नक्कीच. मग ती कोणाचीही असो.
"जुन्या कबरी का खोदायच्या?" हा प्रश्न मला व अनेक संशोधकांना नेहमी विचारला जातो. येथे प्रश्न मुळात जुन्या कबरी खोदने हा नसून जे सांगितले जाते, ज्यावर आपण विश्वास ठेवावा असा आग्रह आहे असे दिसते तेंव्हा त्यामागे नेमके काय आहे हे शोधत तो इतिहास नवीन पुराव्यांच्या, द्रुष्टीकोनाच्या परिप्रेक्षात पाहने आणि मांडणे याला जुन्या कबरी खोदणे म्हनत नसून इतिहासाचे पुनरावलोकन म्हनतात. त्यात सापदलेल्या बाबी मांडने म्हनजे वादासाठी वाद निर्माण करने असे नसून जर ते चुकिचे आहे असे वातले तर त्यावर चर्चा करुन वा अधिक व्यापक संशोधन मांडुन त्याचे खंडन करणे महत्वाचे आहे. किंबहुना हीच खरी संशोधकीय प्रक्रिया आहे.
ंई आपल्या मताशी पुर्ण सहमत आहे कि बाजीराव-मस्तानी वा रमाबाईंच्या सतीत्वाकडे तत्कालीन काळाच्या चौकटीतच पहावे. अगदी खरे आहे. मी अशा त्या-त्या काळाच्या चौकटीतील बाबींवर कधीही हल्ले चढवलेले नाहीत. पण त्या बाबी आजही स्वीकारार्ह आणि न्याय्य आणि उदात्त आहेत असे कोणी म्हणत असेल तर त्यावर हल्ले चढवणे वावगे नाही.
जुन्या कबरी उकरण्याचे काही फायदे होतात का? तर होतात. वाघ्या कुत्र्याचा पुतळा अनैतिहासिक असून तो आम्ही ६ जुन रोजी तोदणार अशी घोषणा संभाजी ब्रिगेडने केली होती हे आपल्या स्मरणात असेल. त्यामुळे वाघ्याला पोलिस पहा-यात ठेवले गेले होते. दै. लोकमतमद्धे माझा वाघ्याच्या ऐतिहासिक अस्तित्वाचा पुराव्यासह लेख प्रसिद्ध झाल्यानंतर ब्रिगेडला आपले आंदोलन मागे घ्यावे लागले. ते नंतर कै. राम गणेश गडकरींचा पुतळाही तोडणार होते...पण त्यावरही मी लेख लिहिला...त्यांना तोही कार्यक्रम रद्द करावा लागला. प्रथमच ब्रिगेडला माघार घ्यावी लागली. अन्यथा आज वाघ्याही अद्रुष्य झाला असता. अशा दहशतवादी लोकांचा विरोध पुराव्यानिशीच करावा लागतो आणि तेथे नाईलाजाने भाषाही उग्र होते हे खरेच आहे.
आणि यामुळे आजचा डोह शांत झाला कि अधिक उग्र खळबळता झाला यावर आपणच विचार करावा. खेडेकरांवर गुन्हा दाखल केल्याने, त्यांच्या फ्यसिस्ट लेखनाविरोधात सतत लेख लिहिल्याने आज महाराष्ट्र एक वेगळी शांती उपभोगतो आहे. अन्यथा तो जातीयवाद, विद्वेष कोनत्या थराला जावून पोहोचत होता हे आपणा सर्वांना माहितच आहे.
घरात बसून लिहिणे आणि समाजस्पंदने टिपत, वैरभावाची परिनती प्रत्यक्ष हिंसेत न घडु देण्यासाठी प्रसंगी वैरे घेत प्रत्यक्ष क्रुती करत लिहिणे यात फरक आहे. मला वाटते यात मराठी लेखक पुर्णतया मागे आहेत. डा. आनंद यादवांना जेंव्हा वारक-यांनी दबाव आणत नुसती कादंबरी मागे घ्यायला भाग पाडले नाही तर साहित्य सम्मेलनाच्या अध्यक्षपदाचा राजिनामाही द्यायला लावला. या तालिबानी, लेखन स्वतंत्र्याच्या विरोधात जाना-या घटनेचा जाहीर निषेध करणारा मी पहिला आणि एकमेव माणुस होतो आणि मला त्याचा अभिमान आहे. आजही असंख्य सामाजिक प्रश्नांवरच्या लेखकांच्या जाहीर भुमिका मला दाखवून द्या...मी आभारी राहील. अगदी लोकपाल विषयी कोनत्या साहित्यिकाने आपले जाहीर मत मांडले आहे बरे? झोपडपट्टीतल्या लोकांना काय साहित्य कळते असा उर्मट प्रश्न विचारणा-या लेखिकेचा जाहीर निषेध करणाराही मीच प्रथम आणि एकमेव लेखक होतो. सर्वांना गोड वाटेल असे लिहिणे हा लेखणीचा अवमान आहे. सर्वच लेखन सर्वांना प्रिय असू शकत नाही आणि ते नसावेही. जातीय चष्म्यातुन साहितय-संशोधनांकडे कसे पाहिले जाते याचा अनुभव जवळपास सर्वच साहित्यिक घेतात. त्यामुळेच कि काय सामाजिक, धार्मिक, सांस्क्रुतिक, राजकीय विषयांबाबत सहसा साहित्यिक कोणतीही प्रकट जाहीर भुमिका घेत नाहीत. अत्रे, फडके, मा.का. देशपांडे, पु.ल. देशप्॑आंडे, दुर्गा भागवत, खांडेकर, ढसाळ, सुर्वे ई. दिग्गजांचा काळ निघुन गेला आहे. त्यांच्यामद्धे व्यवस्थेला जाहीर आव्हान देण्याची हिम्मत होती. आणि त्या हिम्मतीला बळ देणारा समाजही होता.
आज काय...?
लेखाचे दुवे
वाघ्या कुत्र्याचा पुतळा अनैतिहासिक असून तो आम्ही ६ जुन रोजी तोदणार अशी घोषणा संभाजी ब्रिगेडने केली होती हे आपल्या स्मरणात असेल. त्यामुळे वाघ्याला पोलिस पहा-यात ठेवले गेले होते. दै. लोकमतमद्धे माझा वाघ्याच्या ऐतिहासिक अस्तित्वाचा पुराव्यासह लेख प्रसिद्ध झाल्यानंतर ब्रिगेडला आपले आंदोलन मागे घ्यावे लागले. ते नंतर कै. राम गणेश गडकरींचा पुतळाही तोडणार होते...पण त्यावरही मी लेख लिहिला...त्यांना तोही कार्यक्रम रद्द करावा लागला.
अरेच्या हे कधी झाले? या फसलेल्या आंदोलनांना फारशी प्रसिद्धी मिळालेली दिसत नाही.
असो, हे दोन्ही लेख वाचायला आवडतील. कोणाकडे दुवे आहेत का?
-ऋ
----------------------
"चला, मी माझा एकमेव जुनाट कोट घालून एक नवं पुस्तक घेऊन येतो"
एक दुवा
एक दुवा तर संजय सरांच्या ब्लॉगवरच आहे.
http://sanjaysonawani.blogspot.com/search/label/In%20News
दुसरा दुवा मिळेल काय?
व्यक्तिशः मला वाघ्याचे स्मारक हे अनैतिहासिकच वाटते हे येथे नमूद करू इच्छितो. (आधारः गोनिदांच्या दुर्गभ्रमणगाथेत या पुतळ्याविषयीचे थोडेसे स्पष्टीकरण आहे) अर्थात मला इतिहासाचे विद्रूपीकरण करणार्या ब्रिगेडी चळवळींचा पूर्णपणे तिरस्कार आहे.
"हे दोन्ही लेख वाचायला
"हे दोन्ही लेख वाचायला आवडतील. कोणाकडे दुवे आहेत का?"
~ यातील 'वाघ्या' संदर्भात ऐतिहासिक पुरावा [पुरावे] दाखविलेला श्री.संजय सोनवणी यांचा लेख माझ्या वाचनात आला होता. मला वाटते मे २०११ च्या शेवटच्या आठवड्यात किंवा जूनच्या पहिल्या आठवड्यात लोकमतच्या कोल्हापूर आवृत्तीत तो प्रसिद्ध झाला होता. अर्थात राज्यभर या पेपरची साखळी असल्याने पुण्यासह सर्वच ठिकाणी प्रसिद्धीस आला असणार. या क्षणी त्यातील प्रत्येक शब्द मला आठवणे शक्य नाही; पण श्री.सोनवणी यानी महाराजांच्या दक्षिण विजयाचा उल्लेख करताना कर्नाटकातील गदग येथील घडामोडीचा आढावा घेतला असून त्यात राणी सावित्रीबाई हिने राजांच्या गौरवार्थ जी काही शिल्पे तयार करवून घेतली तीमध्ये 'वाघ्या' कुत्रा महाराजांच्या मिरवणुकीसमवेत - घोड्याच्या बरोबरीने - चालला आहे असे दाखले शिल्पाच्या चित्रासह प्रसिद्ध झाले होते.
पुराण असो वा इतिहास, त्यातील ज्येष्ठ व्यक्तिरेखांना शब्दरूपाने सामोरे आणताना त्यांचे चरित्रकार जे काही स्वातंत्र्य घेतात त्यामध्ये 'दंतकथा'ना स्थान दिले जातेच जाते. मग रामकृष्णाच्या कथा तर दूरच पण अगदी ज्ञानेश्वरानी रेड्याच्या तोंडातून वेद वदविल्याचा प्रसंग असो वा तुकारामानी सदेह वैकुंठास प्रयाण केले असो, इतकेच काय गोरा कुंभाराच्या दोन्ही थोट्या हातांच्या जागी विठ्ठलासमोर भजने म्हटल्याक्षणीच पालवी फुटावी तसे नवीन हात पैदा झाले इ. इ. कथांना 'भाकड' म्हणण्यापेक्षा त्या ज्या परिस्थितीत तसेच कुणासमोर निर्माण झाल्या हे पाहणे समासस्वास्थ्याच्या दृष्टीने महत्वाचे ठरते. आपले प्रवचन रसाळ रोमहर्षक तसेच देवळात जमलेल्या भक्तगणांच्या भावनेला स्पर्श करणारे असावे असा त्या त्या काळातील पंडितांना वाटत असल्यास आणि त्यासाठी त्यानी काही दंतकथांचा सहारा घेतला तर त्यानी तसे ते केलेले आजच्या मीटरमध्ये बसवून त्याची महती तपासणे अतार्किक होईल.
"वाघ्या"ने महाराजांची रिकामी आलेली पालखी पाहिली आणि मग वेगाने तो चितेकडे धावला आणि त्याने उडी घेतली......हा प्रकार याच बाजातला. 'इमानदार' पणाचे एखादे उदाहरण (जसे "माणसापेक्षा मेंढरं बरी.." म्हटले जाते त्यानुसार) श्रोत्यांसमोर ठेवताना वाघ्याची कथा त्यासाठी सांगितली म्हणजेच दुसर्या अर्थाने ती 'दंतकथा' झाली. आता या दंतकथेला जे मानतील ते मानोत, पण जे मानत नाहीत त्यानी 'वाघ्या' अस्तित्वातच नव्हता असे म्हणणे आततायीपणाचे होईल.
श्री.संजय सोनवणी यानी अत्यंत अभ्यासपूर्ण असे संशोधन करून वाघ्यासंदर्भातील पुरावे लोकमत मधून [तसेच आत्ताच श्री.वल्ली यानी दिलेल्या लिंकवरून] प्रसिद्ध केले आहेतच, त्याबद्दल ते निश्चितच अभिनंदनास पात्र आहेत.
गडकर्यांनी तो प्रसंग (किंवा वाघ्याचे उदाहरण) 'राजसंन्यास' मध्ये घेतला म्हणजे इतिहासात नसलेली घटना लिहिली म्हणून त्यांच्या विरोधात आज लिखाण करणे हे केवळ गडकरी यांच्यावरच नव्हे तर सर्व साहित्यप्रेमी लोकांच्या विचार करण्याच्या पातळीवर अन्याय करण्यासारखे आहे.
धन्यवाद
धन्यवाद.. दुवादानाबद्दल दुवा देतो 
-ऋ
----------------------
"चला, मी माझा एकमेव जुनाट कोट घालून एक नवं पुस्तक घेऊन येतो"
धन्यवाद सागर.. तुझ्या मुळे एक
धन्यवाद सागर..
तुझ्या मुळे एक चांगली चर्चा वाचायला मिळाली
निखिल देशपांडे
मित्रहो, धन्यवाद, खरोखर उत्तम
मित्रहो, धन्यवाद, खरोखर उत्तम चर्चा सुरु आहे. आपणा सर्व उदार-सह्रदयी मित्रांना धन्यवाद. खालील लिंक ही राम गणेश गडकरींच्या नाटकाबाबत आहे. प्रवीण गायकवाड यांनी हा ब्लोग वाचल्यानंतर मला फोन केला होता आणि प्रदिर्घ चर्चा केली होती. रायगडावर वाघ्या आला तो "दारुड्या, विक्रुत, रंडीबाज..." अशा गडकरींमुळे असा त्यांचा आक्षेप होता. त्यामुळे गडकरींचा (संभाजी उद्यान पुणे) पुतळाही आम्ही उध्वस्त करणार अशी त्यांची घोषणा होती, पण मी त्यांना गडकरी हे नाटककार असून त्यांनी राजसंन्यासमद्धे एक खलपात्र निर्माण केले आहे व त्याची भाषा जशी असायला हवी तशीच ठेवली आहे असे समजावून सांगितले. एवढेच नव्हे तर त्या पात्राने रामदासांचीही बदनामी केली आहे असे स्पष्ट केले. त्यांनी मुळ (अपुर्ण असले तरी) नाटक मुळात वाचलेलेच नव्हते. हवे तेवढे सोईस्कर घायचे आणि अडचणीतले सोडुन द्यायचे हा खाक्या होता...पण तो त्यांनी चर्चेअंती शेवटी सोडुन दिला.
क्रुपया खालील लिंक पहावी.
http://sanjaysonawani.blogspot.com/2011/06/blog-post_03.html
लेखक (संशोधक नव्हे) उपलब्ध माहिती आणि व्यक्तिगत संकल्पना यांचा उपयोग आपापल्या कलाक्रुतींमद्धे करत असतो. रणजीत देसाई यांच्या प्रसिद्ध श्रीमान योगीमद्धे शिवाजी महाराजांनी कर्नातक स्वारीदरम्यान काही मशीदी तोडल्या असा उल्लेख आहे. तो अनैतिहसिक आहे म्हणुन कोणी देसाईंना दोष देत नाही. आपापले नायक्/खलनायक चितारतांना कादंबरीकार आपल्य प्रतिभेचे आविष्करण करत असतो. चरित्रनायकाला उदात (आपल्या समजुतींनुसार) करण्याचा प्रयत्न करत असतो. अर्थात हे स्वातंत्र्य इतिहासकार्/संशोधकांना नसते.
कादंबरी म्हनजे लेखकाचा व्यक्तिगत इतिहास्/समाज्/संस्क्रुतीचिषयीच्या आकलनाचा उद्गार असतो तर इतिहास संशोधन हा जातीय्/धार्मिक्/प्रादेशिक्/राष्ट्रीय/वैश्वीक आकलनातुन क्रमशः विकसीत होत जाणा-या आकलनाचा/अभिव्यक्तीचा आणि पुराव्यांनी स्पष्ट करता येवू शकणारा उद्गार असतो. अर्थात वैस्विक परिप्रेक्षातील आकलन आणि तदनुसार होणारी मांडणी अत्यल्प असली तरी तीच अंतता: अधिक स्वीकारणीय असते.
"आता विश्वात्मके देवे..."
सुरेख चर्चा सुरु आहे
संजय सर,
आपल्याला धन्यवाद द्यावेत तितके कमीच आहेत. अतिशय सुरेख चर्चा सुरु आहे आणि प्रत्येक प्रतिसादागणिक आमच्या ज्ञानात भर पडतच चालली आहे.
अशीच सकारात्मक चर्चा येथे चालू रहावी व जास्तीत जास्त वाचकांनी यात भाग घ्यावा अशीही विनंती आहे, जेणेकरुन संजय सोनवणी एका लेखकाच्या भूमिकेतून अधिक प्रकाश टाकू शकतील 
मी एक पुस्तकवेडा
http://pustakveda.blogspot.com/






सुरेख
एकदम सुरेख परीक्षण लिहिले आहेस रे मित्रा.
संजय सोनवणींची पुस्तके आधी वाचलेली होतीच पण ती तितकीशी आवडलेली नव्हतीच. लेखक सातत्याने वादग्रस्त विधाने करत असतो हे माहितच आहे. नुकताच त्यांचा हा लेखही वाचला होताच. त्यातील बरेच मुद्दे पटले नव्हते.
लेखकावर हॅरी पॉटर संबंधी पुस्तकाचे अनुवाद करताना कॉपीराईट प्रकरणी कारवाईपण झाली होती म्हणे.
प्रस्तुत पुस्तकासंबंधी भरपूर वाचलेलेपण होते. कथानकात काळाशी केलेली गल्लत जाणवते आहे खरी. उदा. येळनाक संताजी-धनाजी जोडगोळीपैकी संताजी घोरपडेंच्या तैनातीत असतो पण पुढे पानिपताच्या वेळी पण त्याचे अस्तित्व आहे. संताजी धनाजी राजाराम महारांजाच्या पदरी होते म्हणजे साधारण इ.स. १६८९ ते १७०० पर्यंतचा काळ या लढाईत व समजा पुढे ताराबाईंबरोबर येळनाक जर शौर्य गाजवतोय तर पानिपताच्या सुमारास तर जख्ख म्हातारा असणार (इ.स. १७६१)
शिवाय एका ब्राह्मणाच्या अंगावर सावली पडल्यामुळे सिदनाकाची हत्या होते हे तितकेसे पटत नाही. त्याकाळी जातीविरोध तीव्र जरी असला तरी त्याचे पर्यवसान हत्येत होणे हे अशक्य वाटते.
सिदनाकाचे स्त्रीला नाकाराणे हे तर लेखकाचे निव्वळ कल्पनास्वातंत्र्य दिसते.
सोनवणींनी शेवटी काही संदर्भ दिले आहेत का?
अर्थातच सागरने लिहिल्यप्रमाणे लेखकाविषयी (त्याच्या मतांविषयी) पूर्वग्रह आहेतच. पण ते बाजूला ठेउन हे पुस्तक नक्कीच वाचेन. त्यानंतरच यावर मत देता येईल असे वाटते.