आपल्या एका पुस्तकाच्या प्रस्तावनेत पुलंनी वर्डस्वर्थच्या ’यारो रिव्हिजिटेड’ या कवितेचा उल्लेख केला आहे. बर्याचदा पुनर्भेटीत एखादी जागा, एखादी व्यक्ती पहिल्या भेटीत दिसली, जाणवली त्यापेक्षा वेगळीच भासते. ह्याला जसा त्या व्यक्तीतला वा जागेतला फरक कारणीभूत असू शकतो, तसाच आपल्या नजरेतला आणि आपल्या व्यक्तिमत्वातलाही. असा हा फरक असणं स्वाभाविकच आहे, हे एकदा मान्य केलं की बर्याचदा पदरी पडणारी निराशा टळू शकते. काही काळाने, या फरकाकडे अलिप्तपणे पाहिलं तर त्यातून काही गोष्टी हाताशी लागू शकतात.
वाचनाच्या प्रवासातही असंच होत असावं. काही पुस्तकं पुन्हा वाचल्यानंतर, कधी पहिल्या वाचनात निसटून गेलेलं काही खुणावतं; तर कधी हेच पुस्तक आपल्याला काही वर्षांपूर्वी इतकं का आवडलं होतं, असा प्रश्न पडतो. वरच्या परिच्छेदात म्हटल्याप्रमाणे याला "अब न वो मैं हूं, न तू है, न वो माझी है 'फराज’" याहून वेगळं उत्तर नसलं तरी एक चाळा म्हणून त्यामागची कारणांचा शोध घेण्याची उत्सुकता काही शमत नाही.
. . .
शाळेत असताना कधीतरी ’कोसला’बद्दल ऐकलं होतं. मात्र ’कोसला’शी पहिली ओळख दहावीच्या शालेय पाठ्यपुस्तकातल्या ’बुद्धदर्शन’ नावाच्या धड्यातून झाली. पुढचे-मागचे संदर्भ त्यात नसल्याने तो धडा तितकासा आवडला नाही. त्यानंतर लगेचच एक-दोन वर्षांत 'कोसला' वाचायला घेतलं खरं, पण वाचताना प्रचंड कंटाळा आला. सलग न वाचता, बराच वेळ लावत, रडतखडत ते पुस्तक संपवल्याचं आठवतं. त्यानंतर खूप वर्षांनी पुन्हा ’कोसला’ हाती घेतलं आणि या खेपेला मात्र वाचून झाल्यावर नेमाड्यांच्याच भाषेत सांगायचं तर 'हे थोर आहे' अशी प्रतिक्रिया उमटली.
गंमत म्हणजे, कोसलात ज्या वयोगटातल्या दिवसांचं वर्णन येतं; त्याच वयाचा असताना न आवडलेली ’कोसला’ काही वर्षांनी मात्र थोडी ओळखीची वाटू लागली होती. हे बहुधा नैसर्गिक असावं. कोसला, शाळा, टू किल अ मॉकिंगबर्ड, लंपनची चारही पुस्तकं, जे. एम. कट्झींचं ’बॉयहूड’ यासारखी Bildungsroman प्रकारात (वयात येतानाच्या वयातल्या (!) अनुभवांचे चित्रण करणार्या कादंबर्या) मोडणारी पुस्तकं आवडायला कदाचित हुरहुर लावणार्या स्मृतिरंजनाची मदत होत असावी. अर्थात हा त्यातला एक फार छोटा भाग झाला, पण त्या त्या लेखकाच्या प्रतिभेबरोबरच आपणही असेच कधी काळी उदाहरणार्थ तंतोतंत मॅडसारखा थोर विचार करायचो, ह्या भावनेचा - अगदी छोटा का होईना - ही पुस्तकं आवडण्यात भाग असावा. पुढे एका लेखासाठी ’कॅचर इन द राय’ आणि कोसला पुन्हा लागोपाठ वाचून काढल्या. या खेपेला, नेमाड्यांनी कॅचरवरून प्रेरणा घेतली हे उघडउघड दिसत होतं, मात्र त्याचबरोबर त्यांच्या स्वतंत्र प्रतिभेची उदाहरणंदेखील ठळकपणे समोर आली. उदाहरणच द्यायचं झालं, तर आधीच्या वाचनात लक्षात राहिलेल्या दोन वाक्यांतला -- 'तिच्याबरोबर तिचं इवलंसं गर्भाशय गेलं...तिनं एक मोठ्ठीच खानेसुमारीची ओळ वाचवली' आणि 'पूर्वजांच्याच नशिबी नपुंसकगिरी नव्हती. म्हणून हे फेरे - मर्द बापांपायी' -- परस्परसंबंध लक्षात आला आणि शेवटच्या त्या दैनंदिनीतल्या (आणि एकंदरीतच कादंबरीतल्या) भाषिक प्रयोगांबद्दलचा आदर वाढला.
असले शोध - निदान स्वत:च्या मर्यादित आवाक्यात असलं काही आपल्याला सापडलं, तर ज्यामुळे नवीन काही शोध लागल्यासारखा आनंद होतो - ’कोसला’सारख्या अनवट पुस्तकातच लागतात, असं नाही. बा. भ. बोरकरांच्या कवितांचंच उदाहरण घ्या. शाळेत कधीतरी त्यांची ’इंद्रनील चंद्रकांत सांध्यसुंदरी ही’ कविता होती. व्याकरणाच्या पुस्तकातल्या ’गडद निळे गडद निळे जलद भरूनि आले’मधल्या चार ओळी बहुतेक अनुप्रासाचं उदाहरण म्हणून होत्या. त्यांच्या सार्याच कवितांतली नादमयता अगदी पहिल्या वाचनातच जाणवते. मात्र पुन्हा सहज कवितासंग्रह चाळताना म्हणा वा एखादी कविता आठवताना म्हणा, अवचित त्यांच्यात लपलेली इतर वैशिष्ट्यं खुणावू लागतात. मग कधी तो ’मीन चमकुनि उसळे, जलवलयी रव मिसळे, नवथर रसरंग गहन करिती नयन ओले’ सारख्या तत्सम, तद्भव शब्दांची रेलचेल असणार्या कवितेत अचानक ’ढोर’सारखा आलेला अस्सल मर्हाठी शब्द (धूसर हो क्षितिज त्वरित, ढोर पथी अचल चकित, तृण विसरूनी जवळील ते खिळवी गगनी डोळे) असतो - जणू एखाद्या दैवी प्रतिभेच्या गायकाने रागातला वर्ज्य स्वर लावून मैफल निराळ्याच उंचीवर न्यावी - तसा साक्षात्कारी. तर कधी त्यांच्या कवितांमध्ये दिसणारी ’ळ’ची रेलचेल जाणवते (पहा - कुठे आवळीवरी कावळा मावळतीचा शकुन सांगे, पूर्वेला राऊळ इंद्राचे कोरीव संगमरवरी रंगे; असे नानागुणी निळे किती सांगू त्यांचे लळे, ज्यांच्यामुळे नित्य नवे गडे तुझे माझे डोळे; जिथे विपत्ती जाळी उजळी, निसर्गलीला निळी काजळी, कथुनि कायसे काळीज निखळी, एकाची सगळी वसती; सांगावे तू दुःख आगळे माझ्यासाठी गिळले कैसे, आणि आंधळ्या भलेपणी मी तुला केधवा छळिले कैसे.). बोरकरांच्या कवितेत अधूनमधून येणार्या ’गं’ बद्दल - त्यांच्या स्फूर्तिदेवतेबद्दल, कवितेच्या सशरीर नियतीबद्दल सुनीताबाईंनी काही वर्षांपूर्वी लिहिलेला एक अप्रतिम लेख असाच त्यांच्या कवितेतले नवीन पैलू उलगडून दाखवणारा.
. . .
इंग्रजी पुस्तकांचं पुनर्वाचन तितकंसं होत नाही; पण अलीकडेच एका लेखाच्या निमित्ताने ’हार्पर ली’चं ’टू किल अ मॉकिंगबर्ड’ हे पुस्तक पुन्हा वाचलं आणि पहिल्या वाचनात सुटून गेलेले अनेक संदर्भ जाणवले. दरम्यानच्या काळात १९३०च्या दशकातली जागतिक मंदी, तत्कालीन राष्ट्राध्यक्ष रूझवेल्ट यांची धडाडीची धोरणं, रेड इंडियन जमातींशी झालेली युद्धं, ’द ग्रेट मायग्रेशन’ या नावाने परिचित असणारं कृष्णवर्णीय नागरिकांचं मोठ्या संख्येने दक्षिणेतल्या राज्यांतून उत्तरेकडे झालेलं स्थलांतर आणि परिणामी त्यांनाही समान हक्क मिळाले पाहिजेत, या चळवळीला मिळालेली दिशा - ह्याबद्दल थोडं वाचन झालं होतं. या माहितीचा पुनर्वाचनात संदर्भ समजण्यात फायदा झालाच; पण पुन्हा वाचताना लेखनातल्या काही तांत्रिक गोष्टीही जाणवल्या - एका लहान मुलीचं निरागस निवेदन आणि सभोवतलाच्या विसंगतीवर मार्मिक भाष्य करणारा एका प्रौढ स्त्रीचा दृष्टिकोन यांची बेमालूम घातलेली सांगड; दक्षिणेतल्या राज्यांतली ती विशिष्ट बोलीभाषा; मॉकिंगबर्ड या प्रतीकाचा पहिल्या वाचनात जाणवतो त्याहून अधिकवेळा केलेला सूक्ष्म उपयोग, पुढल्या घटनांची वा कृतींची पूर्वसूचना देणारे संवाद आणि इतक्या वर्षांनी आजच्या परिस्थितीतही निराळ्या अर्थाने लागू पडणारे प्रसंग.
लेखनातल्या काही तांत्रिक बाजूंचा, कथानकाच्या वा वर्णनाच्या रचनेमागच्या काहीएक विचाराचा उल्लेख वरील परिच्छेदात आला आहे. लेखनात वापरलेले तंत्र वाचकाला जाणवू न देण्याच्या लेखकाच्या कौशल्यामुळे असेल किंवा वाचकाच्या पुस्तक संपवण्याच्या घाईमुळे असेल; पहिल्या वाचनात या गोष्टींकडे थोडं दुर्लक्षच होतं. मात्र कोणी जाणत्या समीक्षकाने नजरेला आणून दिल्यावर किंवा अवचित, स्वत:च ते पुस्तक पुन्हा वाचत असताना कधी कधी या गोष्टी जाणवतात. उदाहरणार्थ ’व्यक्ती आणि वल्ली’मध्ये मुख्य व्यक्तिरेखेच्या अगदी विरूद्ध स्वभाव, जगणं असणारी, मात्र काहीशी दुय्यम व्यक्ती रेखाटून कॉन्ट्रास्ट तंत्राचा केलेला वापर असो किंवा टॉलस्टॉयने ’अॅना कॅरेनिना’ या त्याच्या मते, त्याने लिहिलेल्या पहिल्या कादंबरीत (’वॉर अॅंड पीस’ ही सर्वश्रेष्ठ कादंबर्यांपैकी एक मानली जाणारी कादंबरी ही मुळात कादंबरीच नव्हे, असं त्याचं मत होतं) केलेली प्रकरणांची रचना आणि ’स्ट्रीम ऑफ कॉन्शसनेस’ या तंत्राचा केलेला वापर असो - आपली पहिली बुडी किती उथळ होती, याची बोचरी जाणीव करून देणार्या या गोष्टी.
. . .
अर्थात या आपल्यासारख्या सामान्य, हौशी वाचकांच्या अंगभूत मर्यादा आहेत. त्यांचं विश्लेषण एका ठिकाणी व्लादिमीर नाबोकोव्हने फार सुरेख केलं आहे. ’लोलिता’ ह्या गाजलेल्या कादंबरीचा नाबोकोव्ह हा लेखक. तो तितकाच समर्थ समीक्षकही होता. त्याच्या ’लेक्चर्स ऑन लिटरेचर’ ह्या पुस्तकात पुनर्वाचनाबद्दल आणि एकूणच वाचन या क्रियेच्या मर्यादांबद्दल तो म्हणतो - "मी वाचक हा शब्द थोड्या सैलपणे वापरला आहे. खरं तर, कुणीही पुस्तक निव्वळ वाचू शकत नाही. त्याचं केवळ पुनर्वाचनच शक्य असतं. एक उत्तम वाचक, पट्टीचा वाचक, एक सक्रिय आणि सृजनशील वाचक हा पुनर्वाचकच असतो. यामागचं कारण सांगतो. जेव्हा आपण एखादं पुस्तक पहिल्यांदा वाचतो - तेव्हा ओळन् ओळ, पानन् पान, डावीकडून उजवीकडे आणि एकामागून एक असं कष्टपूर्वक वाचण्याची जी क्लिष्ट क्रिया असते; जिच्यामार्फत आपण पुस्तक कशाबद्दल आहे, हे काळाच्या आणि अवकाशाच्या संदर्भात समजून घेण्याचा प्रयत्न करतो - तीच क्रिया आपल्या आणि पुस्तकाचा आस्वाद घेण्याच्या आड येते. (चित्रकलेच्या उदाहरणाने हे अधिक स्पष्ट होईल.) जेव्हा आपण एखादं चित्र पाहतो - तेव्हा पुस्तकाप्रमाणेच, चित्रातही खोली आणि विकासाचे टप्पे असले तरी - ते पाहण्यासाठी आपल्याला वेगळं काही करावं लागत नाही. चित्र जेव्हा आपण प्रथम पाहतो, तेव्हा वेळेचा प्रश्नच त्यात उद्भवत नाही. पुस्तक प्रथम वाचताना मात्र त्याचा परिचय करून घेण्यासाठी आपल्याकडे वेळ असावा लागतो. आपले डोळे जेव्हा चित्र पाहतात, तेव्हा आधी संपूर्ण चित्र दिसतं आणि हळूहळू मग आपण त्यातल्या बारीकसारीक तपशीलांवर लक्ष केंद्रित करू लागतो. वाचनासाठी असं इंद्रिय नाही की ज्याच्या मदतीने पुस्तकाचं संपूर्ण स्वरूप एका दृष्टिक्षेपात आपल्या लक्षात यावं. परंतु दुसर्या, तिसर्या किंवा चौथ्या वाचनानंतरच आपण, एखाद्या चित्राप्रमाणे पुस्तकाकडे पाहू शकतो."
नाबोकोव्हचं हे विश्लेषण बरंचसं पटणारं आहे; पण याला सरसकट वाचनाची मर्यादा म्हणायला जीभ चाचरते. ’गंतव्य स्थानापेक्षा कधी कधी प्रवासच अधिक सुंदर असतो’, हे घासून गुळगुळीत झालेलं वाक्य. पण संपूर्ण पुस्तकाचं स्वरूप समजून घेण्याच्या प्रवासातल्या प्रयत्नांचा ’गोडी अपूर्णतेची’सारखा आनंद, हाच आपल्या वाचनाच्या आवडीचा पाया असतो. ’ज्ञानेश्वरी’सारखं एखादं शिखर कित्येक शतकं अनेकांना खुणावत राहतं, पण ते पादाक्रांत केल्याचा दावा कुणालाच करता यायचा नाही. थोड्याफार फरकाने तीच गत अजरामर साहित्यकृतींत गणना होणार्या पुस्तकांची. एकूणच ’या हृदयीचे त्या हृदयीं’चे ध्येय गाठताना होणारी दमछाक ज्ञानेश्वरीतल्या नवव्या अध्यायातल्या एका ओवीत फार सुरेखपणे व्यक्त झाली आहे -
जें जाल जळीं पांगिलें । तेथ चंद्रबिंब दिसे आंतुडलें ।
परि थडिये काढूनि झाडिलें । तेव्हां बिंब कें सांघे ॥
पाण्यात दिसणारे चंद्रबिंब जाळं फेकल्यावर, क्षणभर त्यात अडकल्याचा भास होतो खरा; पण बाहेर ओढून पाहिल्यावर ते हाती काही लागत नाही; असा हा दृष्टांत जसा लेखकाच्या अभिव्यक्तीच्या मर्यादा स्पष्ट करतो, तसाच वाचकाच्या जाणीवांचाही. मात्र अंतिम ध्येय कधीच हाती लागणार नाही, हे ठाऊक असूनही पुन्हा पुन्हा केले जाणारे हे प्रयत्न वाचकाच्या फाटक्या झोळीत कधी कधी अनपेक्षित दान टाकून जातात, हे नक्की.
अनुक्रमणिका
अनुभव
- ग्रंथालयात भटकंती - जाँ-पॉल सार्त्र
- वैज्ञानिक व पुस्तकांचे जग!
- 'साभार परती'चा शिक्का
- बौद्धांचे आणि जैनांचे संस्कृत साहित्यातले योगदान - एक आढावा
- सांगावेसे वाटले म्हणून.....
- डाऊन द मेमरी लेन
- कृतज्ञ!
- पुनर्वाचनाय च

प्रतिक्रियां
निव्वळ अप्रतिम. घाईघाईत
निव्वळ अप्रतिम.
घाईघाईत वाचला, निवांतपणे वाचला, घुटक्याघुटक्यात वाचला...
धन्यवाद.
- मेघना भुस्कुटे
फारच सुरेख
दिवाळीच्या धावपळीत एकदा लेख वाचला होता. आता लेखाचं पुनर्वाचन करताना लेख नुसता आवडलाच नाही तर पटला.. फारच सुरेख
-ऋ
----------------------
"चला, मी माझा एकमेव जुनाट कोट घालून एक नवं पुस्तक घेऊन येतो"
छान ...
लेख आवडलाच. मुक्तसुनीत यांच्या शेवटचा परिच्छेदाशीं सहमत. पण पुनर्वाचनाच्या मताबाबत मात्र मीं असहमत आहे. प्रत्येक वाचकाची वाचनाची शैली त्याच्या स्वभावानुसार वेगळी असते. माझें म्हणाल तर एकादें सौंदर्यस्थळ किंवा वाचन मीं प्रथम भेटीत सौंदर्यखुणांचा आवाद घेत सावकाश ठायलयींत मजा अनुभवत कथेतील एखाद्या पात्राच्या नजरेंतूनच पाहातो वा वाचतो. वय लिंग इ. च्या मर्यादा पार मागें पडतात. उदा. टु किल अ मॉकिंग बर्डमध्यें मी ती छोटी मुलगी होतों, चानी वाचतांना छोटा मुलगा होतों. लंपन वाचतांना लंपनच होतों. प्रसंगी शब्दकोष घेऊन वा गूगलवरून अर्थ पाहात. दुसर्या भेटीत ती मजा येत नाहीं. पुनर्वाचनांत नवीन अर्थ जाणवतो पण सौंदर्याचें नवें दर्शन होईल असें नक्की सांगतां येत नाहीं. अनपेक्षिताच्या धक्क्याचा थरार कांहीं वेगळाच असतो. तो पुन्हां जाणवत नाहीं. बोरकरांच्या, केशवसुतांच्या, आरती प्रभू, कुसुमाग्रजांच्या कवितांसारखे वा कांहीं सार्वकालिक श्रेष्ठ तसेंच सदाहरित गद्याचे अपवाद सोडले तर.
असो लेख वाचतांना मजा आलीच आणि विचार करायला आणि मांडायला एवढा प्रवृत्त झालों हें या लेखाचें मोठेंच यश आहे.
जातां जातां - टु किल अ मॉकिंग बर्ड मधले मेकाँब प्रांतातले कांहीं वेगळे संदर्भ कार्व्हर मध्यें वाचतांना वेगळीच गंमत आली.
सुधीर कांदळकर
सुधीर कांदळकर
सैर
अगदी माझ्याच मनातले लिहिल्यासारखं आलंय हे सारं. वाचतानाही अनेक पुस्तके आणि ती वाचतानाचे अनुभव डोळ्यांसमोरून सरकत गेले. एक सैर झाली छान.
माझिया जातीचे...
नंदन, _/\_
प्रतिसाद
लेख आवडला. लेखन-वाचन आणि एकंदर "रिटन वर्ड" च्या संदर्भातल्या निर्मिती आणि आस्वाद प्रक्रियेच्या अनेकानेक लेयर्स मधला एक अत्यंत रोचक तुकडा म्हणजे पुनर्वाचन. (दुसरा असाच फार फार रोचक पैलू म्हणजे "श्रुतयोजन" ) गंमत पाहा. पुस्तकविश्व वर अन्यत्र वाचलेल्या शांताबाई शेळक्यांवरच्या लेखांवरून , शांताबाईंच्याच "पुनरागमनाय च" या प्रसिद्ध संस्कृत वचनावरचे विवेचन हा लेख वाचताना आठवले. आहे की नाही हेही एक प्रकारचे "पुनर्वाचन" ?
जीए कुलकर्णीनी एका पत्रात पुनर्वाचनाबद्दल आपल्या चिंतनगर्भ शैलीत कुणालासे लिहिल्याचे स्मरते. भूतकाळातील पुस्तकांना पुनर्भेट देण्याला त्यांनी "पूर्वायुष्यातल्या प्रेयसीला भेटण्यासारखे" असे म्हण्टले आहे. (इथेही नंदनने उधृत केलेला फराझ आलाच ! पाहिलेत ? सायक्लिक रेफरन्स एरर ! श्रुतयोजन गंडले की हो !
) आणि वर पुन्हा जीए म्हणतात : "डिकन्सवर जेव्हा खर्याखुर्या प्रेयसीला भेटायची वेळ अचानक आली तेव्हा तो तिथून चक्क पळून गेला !"
नंदनने नेहमीप्रमाणे घनदाट अरण्यातल्या एका प्रदेशाचे दर्शन घडवावे तसे , निर्मिती आणि आस्वाद प्रक्रियेच्या "ऊर्ध्वमूलमधःशाखम्" अवस्थेतल्या अश्वत्थवृक्षाच्या पारंब्यामधल्या काही सोडवून दाखवल्या आहेत. त्याला माझा सलाम.