होर्हे लुईस बोर्हेस (१८९९-१९८६) या आर्जेन्टीन लेखकाने आधुनिक दक्षिण अमेरिकन स्पॅनिश ललितलेखनाचा चेहरामोहराच बदलून टाकला. असे म्हणायचे नाही, की अन्य लेखक बोर्हेसच्या शैलीमध्ये लिहू लागले - नव्हे, हुबेहूब त्याच्यासारखा त्याचा शागीर्द असा कोणीच नाही. मात्र अद्भुत भासणार्या कथावस्तूमधून वास्तवाच्या मुळाशी जाण्याची त्याची पद्धत होती, त्यातून मॅजिक रियलिझम (अद्भुत वास्तववाद) उपजला, असे म्हणावे लागेल.
तसे बोर्हेसचे लेखन पठडीच्या बाहेरचे आहे, बहुसंख्यप्रिय म्हणण्यापेक्षा त्याच्या अल्पसंख्य भक्तांना ते लेखन अतिशय प्रिय आहे. त्याचा मूळचा पिंड कवीचा. परंतु तारुण्यानंतर त्याने कविता प्रसिद्ध केल्या नाहीत, तर "आख्यायिका/कल्पिते" हा वेगळाच लेखनप्रकार हाताळला. या लघुकथाही नाहीत आणि लघुनिबंधही नाहीत. थेट तथ्यवर्णन किंवा भावनाप्रकटन नाही, म्हणजे हे निबंधही नाहीत. यात कथेसारखी कल्पित पात्रे आणि कल्पित प्रसंग असतात. मात्र कुठल्यातरी अद्भुत कथानकामध्ये आपल्याला गुंतवून बोर्हेस 'खरे काय आणि खोटे काय', या आपल्या गृहीतकांना हादरवून सोडतो. अशा अनेक आख्यायिका बोर्हेसने मासिकां-नियतकालिकांमधून प्रकाशित केल्या. आख्यायिकांचे अनेक छोटे-छोटे संग्रह त्याच्या जीवनकाळात प्रसिद्ध झाले. त्याच्या जीवनकाळातच ऍंथनी बॉनर याने इंग्रजीमध्ये भाषांतरित केलेल्या निवडक आख्यायिकांचा संग्रह "फिक्सियोनेस" सुप्रसिद्ध आहे. (दुवा http://www.amazon.com/Ficciones-English-Translation-Jorge-Borges/dp/0802...).
प्रस्तुत स्पॅनिश संग्रह बोर्हेसच्या मरणोत्तर संकलित झालेला आहे, आणि त्याच्या प्रातिनिधिक आख्यायिका निवडलेल्या आहेत. यातील बर्याच आख्यायिका इंग्रजी 'फिक्सियोनेस'मध्ये आहेत, पण अनेक वेगळ्या आख्यायिकासुद्धा निवडलेल्या आहेत. आख्यायिकांची लांबी कमी-अधिक आहे. या छोटेखानी पुस्तकातील काही एका पानापेक्षा लहान तर काही वीसेक पाने लांबीच्या आहेत. बोर्हेसच्या विचारप्रवर्तक कल्पनाशक्तीची ओळख म्हणून एका लघुतम आख्यायिकेचे मराठी भाषांतर येथे देतो आहे. (हा परिच्छेद कुठल्याशा पुस्तकातले उद्धरण आहे, असे सांगणारी तळटीपही काल्पनिकच आहे!) :
- - -
विज्ञानातील काटेकोरपणाबद्दल
... त्या साम्राज्यात नकाशे बनवण्याची कला इतक्या परिपूर्णतेस पोचली होती, की केवळ एका प्रांताच्या नकाशाने एक शहर अवघे व्यापलेले होते, आणि साम्राज्याच्या नकाशाने एक प्रांत अवघा व्यापलेला होता. कालांतराने या बेसुमार नकाशांनीही समाधान होईनासे झाले. आणि नकाशे-तज्ञांच्या विद्यापीठाने साम्राज्याच्याच आकारमानाचा साम्राज्याचा नकाशा घडवला : तो नकाशा साम्राज्याशी खडान् खडा, बिंदूवर बिंदू जुळलेला होता. पुढल्या पिढ्यांना नकाशांच्या अभ्यासाचे इतके व्यसन नव्हते, ते या फोफावलेल्या नकाशाला निरुपयोगी समजले. आणि काहीशा अनादरानेच म्हणा ना, त्यांनी नकाशाला निर्दय उन्हा-थंडीच्या सुपुर्त केले. पश्चिमेकडच्या वाळवंटांत नकाशाचे फाटके अवशेष जनावरांना आणि भिकाऱ्यांना आश्रय देत अजून शिल्लक आहेत. पूर्ण देशभरात नकाशा-शास्त्राचे काहीही बाकी राहिलेले नाही.
- सुआरेस मिरांदा, "शहाण्या मनुष्यांच्या सफरी" चौथा खंड, प्रकरण ४५वे, लेरिदा, १६५८
- - -
विज्ञानात दोन विरोधी कल आहेत, एकीकडे तपशील छाटून सारभूत तितके तत्त्व शोधायची आस असते; तर दुसरीकडे जास्तीतजास्त तपशिलांसह वैज्ञानिक वर्णन परिपूर्ण करायची महत्त्वाकांक्षा असते. असा आशय दृष्टांतातून खुलवताना अगदी मितभाषी रीतीने बोर्हेसने साम्राज्याचा इतिहासच सांगितल्याचा आभास करून दिला आहे. आणि बोध मोकळा करून सांगितला नाही, हे विशेष. म्हणजे कवितेसारखा यातून रसिक वाटल्यास वेगळा बोधही घेऊ शकेल.
अशाच प्रकारे तत्त्वज्ञानातले वेगवेगळे चक्रावणारे विचार बोर्हेसने आख्यायिकांमध्ये बसवलेले आहेत. कुठल्याही लेखकाने लिहिलेल्या शब्दांतला अर्थ रसिक जसाच्या तसा घेत नाही, तर संदर्भ जाणून त्याच शब्दांना वेगळा अर्थ देतो, हा बोर्हेसचा रससिद्धांत घेऊया. तो पटवण्यासाठी त्याची आख्यायिका अशी आहे : सेर्वांतेसच्या मध्ययुगीन स्पॅनिश "डॉन क्विक्झॉट" कादंबरीतला काही भाग असा आहे, की त्यातील वाक्यन् वाक्य एका आधुनिक फ्रेंच लेखकाने लिहिलेले आहे. तोच तो परिच्छेद मध्ययुगीन स्पॅनिश लेखकाच्या लेखणीतून वेगळा अर्थ धारण करतो, तर आधुनिक फ्रेंच लेखकाचा संदर्भ असला, तर वेगळा अर्थ धारण करतो, असे बोर्हेस अत्यंत गमतीदाररीत्या दाखवून देतो.
आणखी एक कल्पना अशी : इतिहासाबद्दल आजच्या पिढीचे स्मरण बदलले तर इतिहासच बदलतो का? स्मरण आणि भूतकाळातले तथ्य यांच्यातला दुवा काय? ही कल्पना सांगण्यासाठी त्याने एका पळपुट्या सैनिकाची आख्यायिका कल्पलेली आहे. त्याच्या मरणकाळी पश्चात्तापाने वेडा होऊन तो स्वतःला युद्धातला वीर मानू लागतो. इतकेच नव्हे, दूरवर विखुरलेल्या त्या युद्धातल्या उरल्यासुरल्या वृद्ध सैनिकांची अशी धारणा होते, की हा सैनिक युद्धात वीरगती पावला! (या कथेचे मराठी भाषांतर येथे बघता येईल : http://www.misalpav.com/node/330)
नार्रासियोनेस संग्रहाच्या सुरुवातीला विस्तृत प्रस्तावना आहे. बोर्हेसच्या तरुण वयात, युरोपातल्या वेगवेगळ्या देशांत रहावे लागल्यामुळे त्याच्यावर झालेले संस्कार, त्याच्या लेखनातले कालखंड वगैरे प्रस्तावनेत चांगल्या रीतीने समजावून सांगितले आहेत. आख्यायिकांमध्ये सुविद्य 'जगाच्या नागरिका'लाच ठाऊक असतील असे काही तपशील आहेत, तसेच अर्जेंटीनामधील काही प्रांतीय आडवळणी तपशीलही आहेत. ते तळटीपांत थोडक्यात पण चांगल्या प्रकारे समजावलेले आहेत. विसाव्या शतकातल्या या प्रभावी लेखकाची ओळख या संग्रहातून होईल. ज्यांना स्पॅनिशमध्ये गती नाही पण इंग्रजीवर प्रभुत्व आहे, त्यांना "फिक्सियोनेस" (चित्र :
)
हा उत्तम भाषांतर-संग्रह ओळख घडण्यासाठी उपयोगी पडेल.
अनुक्रमणिका
अनुभव
- ग्रंथालयात भटकंती - जाँ-पॉल सार्त्र
- वैज्ञानिक व पुस्तकांचे जग!
- 'साभार परती'चा शिक्का
- बौद्धांचे आणि जैनांचे संस्कृत साहित्यातले योगदान - एक आढावा
- सांगावेसे वाटले म्हणून.....
- डाऊन द मेमरी लेन
- कृतज्ञ!
- पुनर्वाचनाय च

प्रतिक्रियां
magic realism
मॅजिक रिआलिझमचा उद्गाता मी इतकी वर्षे मार्क्वेझलाच समजत होतो.. अर्थात मार्क्वेझची त्यातली प्रगती केवळ थक्क करुन सोडणारी आहे.. पण हे वरचे काही उतारे वाचल्यावर बोर्हेसची प्रतिभा काय उंचीची आहे हे लगेच लक्षात येते.. must haveमध्ये गेले हे पुस्तक
आनंद
बोर्हेसचा परिचय पाहून आनंद झाला. तुम्ही त्याच्या एका कथेचं भाषांतर केलेलं आहे हे ही त्या निमित्तानं कळलं. धन्यवाद!
- चिंतातुर जंतू :S
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" || ५ ||