'बोलती पुस्तके' हा मराठीतला पहिला वाहिला free Audio Books प्रकल्प. याबद्दल अधिक जाणुन घ्या इथे.
नवीन काय वाचताय?
कुठल्याच एका अशा पुस्तकाचं परीक्षण / परिचय करून देण्यासाठी हा धागा नाही.
वाचनाचा किडा असलेले लोक सतत वाचतच असतात. त्यांतली सगळीच पुस्तकं त्यांना अतोनात आवडतात वा नावडतात असं नाही. काही पुस्तकांतून माहिती मिळते, काहींनी हलकंफुलकं मनोरंजन होतं, काही संग्रहात ठेवलीच पाहिजेत अशी खुणगाठ मनाशी बांधली जाते, काही चक्क ढापावीशी वाटतात.
तुम्ही 'अलीकडे' वाचलेल्या पुस्तकाबद्दल सर्वसाधारण माहिती (लेखक, प्रकाशक, किंमत, उपलब्धता इत्यादी) आणि त्याबद्दलचं तुमचं मत इथे लिहावं, अशी कल्पना आहे. (पुस्तक 'अलीकडचंच' म्हणजे नवीनच असलं पाहिजे असं काही नाही.) अर्थातच हा काही नियम वगैरे नव्हे. या धाग्यावर अलीकडची पुस्तकं एकत्रित सापडतील, आपल्या नजरेतून सुटली असतील तर मिळवून वाचता येतील इतकंच.
मी सुरुवात करते:
कर के देखो
संपा.: सदा डुम्बरे
समकालीन प्रकाशन
किंमत आठवत नाही.
जागतिकीकरणाच्या रेट्यात जगात मोठे बदल आणि तेही वेगानं होताहेत. या बदलांचे काही अनिष्ट परिणामही आहेत. आपल्यातले काही लोक या बदलांच्या नावानं बोटं मोडत न बसता पुढे सरसावून काही सकारात्मक कृती करताना दिसतात. उदाहरणार्थ गडचिरोलीत सामाजिक आरोग्यासंबंधी काम करणारे अभय बंग किंवा शेतकर्यांच्या प्रश्नांबद्दल सातत्यानं आणि अभ्यासपूर्ण लिहिणारे कळकळीचे पत्रकार पी. साईनाथ. अशा काही कृतिशील व्यक्तिमत्त्वांनी 'साप्ताहिक सकाळ'च्या वर्धापनदिनी केलेल्या भाषणांचा हा संग्रह आहे.
यांतली बरीचशी भाषणं अनुवादित आहेत. पण तरी त्यांत कुठे अनुवादाचा कृत्रिमपणा जाणवत नाही.
आजूबाजूच्या परिस्थितीच्या भीषणतेबद्दल आपल्याला अचूक माहिती पुरवणं आणि त्याच वेळी 'आपणही यात काही बदल घडवून आणू शकतो' असा आशावाद पुरवणं - ही या भाषणांची खासियत.
नीलची शाळा- समरहिल
लेखकः ए. एस. नील.
अनुवादकः आठवत नाही. दोघींपैकी एक बहुधा सुजाता देशमुख आहेत. पण चूकभूल देणे घेणे
(बहुतेक) राजहंस प्रकाशन
मुलांवर कुठल्याही प्रकारचा दबाव न आणता, त्यांना कठोर वेळापत्रकात न बांधता शिक्षणाचा काहीसा व्यवहाराच्या चौकटीबाहेरचा प्रयोग करणारी शाळा 'नीलची शाळा'मधे आहे.
इंग्लंडमधल्या नील नावाच्या बालमानसोपचारतज्ज्ञानं काढलेली ही शाळा. या शाळेतली मुलं तासाला बसायचं की नाही, कुठल्या, किती वेळा हे सगळं स्वतःच ठरवतात. त्यांना शिव्या द्यायला बंदी नाही. तशीच शाळेच्या काचा फोडायलाही. पण या शाळेचे नियम कोणतेही बाह्य पदाधिकारी ठरवत नाहीत. शाळेतल्या लहानात लहान विद्यार्थ्यापासून ते शाळेचा चालक-मालक असलेल्या नीलपर्यंत सगळ्यांना मतदानाचा (सारख्याच वेटेजचा!) अधिकार देणारी सभा शाळेत नियमितपणे भरवली जाते, लोकशाही पद्धतीप्रमाणे मतदान करून नियम ठरवले जातात आणि हीच सभा नियमभंगाबद्दल काय कारवाई करावी तेही ठरवते.
परीकथेतलं वाटावं इतकं हे अद्भुत आहे. मात्र त्याच्या मुळाशी असलेली नीलची अफाट सहनशीलता, प्रत्येक मूल चांगलंच असतं हा त्याचा ठाम विश्वास, आपल्या चुका कबूल करण्याची त्याची तयारी हे सारंही आहे.
पुस्तकाचा अनुवाद अगदी 'पाडस'इतका उच्च नाही, तरी खटकणाराही नाही.






कालच "समिधा" वाचलं .. वेगळे
कालच "समिधा" वाचलं .. वेगळे परिक्षण टाकतो
-ऋ
----------------------
"चला, मी माझा एकमेव जुनाट कोट घालून एक नवं पुस्तक घेऊन येतो"
शिवाजी: द हिंदु किंग इन
शिवाजी: द हिंदु किंग इन इस्लामिक इंडीया वाचतोय.
-Nile
कशाला
कशाला वेळ वाया घालवतोस?
केवळ त्या वाक्याच्या संदर्भात नव्हे. एकूणच आकलनाच्या संदर्भात.
(वाच! ही प्रतिक्रिया शब्दशः घेणार नाहीस याची खात्री आहे).
अहो उलट एका वाक्यावरुन मत
अहो उलट एका वाक्यावरुन मत बनवण्यापेक्षा पुर्ण वाचलेले काय वाईट? इथे सहजी मिळाले म्हणुन आणले. सुरुवातीची काही पाने वाचुन (नविन काही नसल्याने असेल) खास काही वाटले नाही. १२३ पानेच आहेत फार नाही.
-Nile
ओ
ओ मालक, कंसात लिहिलंय ते वाचा की राव... पहिली स्वाभाविक प्रतिक्रिया का वेळ वाया घालवायचा ही आहे. पण पुस्तक वाचलं पाहिजे. त्याशिवाय त्याविषयी बोलता येणार नाही ही जाणीव असल्यानं कंस टाकलाय की...
गुर्जी वाचलं हो. पण तरी
गुर्जी वाचलं हो. पण तरी सुद्धा आमची भुमिका सांगुन टाकली.
(नुसती सहमत दर्शवली असती पण मग ती कंसाला का बाहेरच्याला असा गोंधळ नको म्हणुन दोन ओळी पण लिहल्या, दुसरे काही नाही. )
-Nile
अरेच्या
तुला हे पुस्तक कुठे आणि कसं मिळालं?
-ऋ
----------------------
"चला, मी माझा एकमेव जुनाट कोट घालून एक नवं पुस्तक घेऊन येतो"
थाउजंड स्प्लेंडिड सन्स
थाउजंड स्प्लेंडिड सन्स वाचायला घेतलय. सुरुवात तर भारी आहे.
जे वाचले त्यात एका लहान मुलीचे भावविश्व चितारले आहे. तिला बापाची ओढ, बाप इराणमधला थिएटर मालक श्रीमंत माणुस, मुलीची आई त्याची नोकर, अनैतिक संबधातुन झालेली मुलगी म्हणुन लांब ठेवलेली.
पुढे वाचुन होईल तसे परिक्षण टाकेनच.
एका स्त्रीच्या आयुष्यातले तीन
एका स्त्रीच्या आयुष्यातले तीन टप्पे म्हणून हे पुस्तक नीत भागांत मांडलेय.. गेल्या वर्षी कॉलेज सुरू झाले तेव्हा मी खास येता जाता बसमध्ये वाचायला म्हणून हे पुस्तक हातात घेतलं.. पहिला भाग जरा जास्तच करूण आहे.. लैलाचं बाबांची वाट पाहाणं आणि त्यांनी अनौरस म्हणून तिला झिडकारणं मनाला लागतं.. अशातच आई एक सांगते नि बाबा दुसरंच.. तेव्हा जशी त्या छोटीची द्विधा मनस्थिती होते, तशीच माझीही झाली होती.. कळतच नव्हतं की खरं काय असेल.. पण लवकरच तेही कळून चुकतं.. पुढे पुढे असे प्रसंग येतात की लहानपणीच्या यातना काहीच नव्हत्या असे वाटत जातं...
पुस्तकाचा शेवट मी अजून वाचू शकले नाहीय.. तू पुस्तक पूर्ण कर, आपण दोघे मिळून याचा परिचय पुविवर लिहू रे..
जाता जाता: नॉट विदाउट माय डॉटर, एस्केप फ्रॉम तालिबान, द ब्रेडविनर, द स्प्लेंडीड थाऊजंड सन्स ही आणि असली पुस्तके वाचून भारतातल्या मुली/स्त्रिया खूप चांगले आयुष्य जगतात असे वाटतं!!!!
नॉट विदाउट माय डॉटर
'नॉट विदाउट माय डॉटर' वाचले आहे. ते तितकेसे करूण वाटले नाही. अर्थात ते प्रभावी होतेच, त्यात वाद नाही.
आता लैलाची गोष्ट वाचायची. आपण नक्की लिहुयात.
उपलाणी
'उपलाणी' वाचतोय.
भीमराव चव्हाण यांचा पहिला ग्रंथ 'वडारसमाजः इतिहास आणि संस्कृती' आणि 'उपलाणी' हे त्यांचे दुसरे पुस्तक. जवळ-जवळ दोनशे पानांच्या या ग्रंथात भटक्या जाती-जमातींच्या ऐतिहासिक, सामाजिक सांस्कृतिक बाबींवर उहापोह केलेला आहे. वासुदेव, बेलदार,वंजारी,वैदु अशा एकूण सतरा जातींची माहिती या पुस्तकात वाचायला मिळते.
काही जातींबद्दल वाचून झाले आहे. पूर्ण वाचून झाले की इथे पुस्तक परिचय करुन देईन म्हणतो.
-दिलीप बिरुटे
अरे वा
अरे वा !!
किती गोष्टींबद्दल माहिती करुन घेण्याची इच्छा असते पण कामाच्या ओघात त्या गोष्टी मागे पडतात, ही पण अशीच एक गोष्ट.
सर नक्की येउ हा परिचय. वाचायची अत्यंत उत्सुकता आहे.
मी काय वाचतेय याची एक लांबलचक
मी काय वाचतेय याची एक लांबलचक यादीच होईल.. खा खा झाल्यासारखी पाने खात सुटलेय..
गेल्या आठ-दहा दिवसांतच कणेकरांचं गोतावळा, झाडाझडती, व्यासपर्व, दुनियादारी वाचून झाले.. बाकी शून्यची शेवटची वीसभर पाने उरली आहेत..
अजून रारंगढांग, कुण्या एकाची भ्रमण्गाथा, एका तेलियाने, ऐसपैस गप्पा-दुर्गाबाईंशी वाट पाहात आहेत..
बाकी शून्यची
>>बाकी शून्यची
बाकी शून्य आम्हास तद्दन भुक्कड पुस्तक वाटले होते .. याबद्दल नक्की उहापोह व्हावा.
+१
बाकी शुन्यचा नक्की उहापोह व्हावा असेच म्हणतो.
आम्ही त्याच्या समर्थानार्थ खंडीभर लेखन करु असे सांगतो.
- ( बाकी शुन्य प्रेमी ) छोटा डॉन
बाकी शुन्यचा नक्की उहापोह
बाकी शुन्यचा नक्की उहापोह व्हावा असेच म्हणतो.
बाकी शुन्य वाचुन हाती लागला एक मोठा शुन्य...
डॉनराव तुमच्या खास आग्रहास्तव या पुस्तकाच्यावर एक लेख आम्ही लवकरच टाकु
निखिल देशपांडे
बाकी शुन्य वाचुन हाती लागला
बाकी शुन्य वाचुन हाती लागला एक मोठा शुन्य...
सौ टके की बात!!! शून्याचा भोपळा फोडण्यासाठी आमचा तुम्हाला कीबोर्डफुल्ल पाठिंबा!!!
डॉनराव तुमच्या खास आग्रहास्तव या पुस्तकाच्यावर एक लेख आम्ही लवकरच टाकु
मंडळी, वाचलंत का???? आले आणखी एक वायदेआझम!!!!
वाट पहातो आहे ...
>>डॉनराव तुमच्या खास आग्रहास्तव या पुस्तकाच्यावर एक लेख आम्ही लवकरच टाकु
नक्की टाका साहेब, वाट पहातो आहे.
'बाकी शुन्य' ह्या प्रकरणात भल्याभल्यांनी आमच्यासमोर नांगी टाकली.
'बाकी शुन्य' ह्या प्रकरणात भलेभले आम्हाला 'शरणचिठ्ठी' देऊन गेले.
'बाकी शुन्य' च्या वादविवादाच्या नादात अनेकांनी आपले मानसिक स्वास्थ्य गमावले, आम्ही अजुन इथेच आहोत.
'बाकी शुन्य' च्या चिंध्या करण्याच्या नादात अनेक जणांना 'सन्यास' घ्यावा लागुन त्यांच्या हातात केवळ 'बाकी शुन्य' राहिले ...
सबब, आपण नक्की लिहावे.
आम्ही वाट बघत आहोत व उत्तर द्यायला तयार आहोत.
धागा
वाद घालण्यासाठी का होईना धागाधागा अखंड विणूया म्हणत चला. जरा या सायटीला बरे दिवस येतील. तुमच्या या वादाकडं नजर लावून बसलोय (हे अगदी शिंकाळ्याकडं नजर लावून बसलेला बोका या चालीवर वाचलंत तरी हरकत नाही).
+१
मोडकांशी सहमत आहे.
पुस्तकांवरुन भांडने व्हावीत, वाद-विवाद व्हावेत, भल्या-बुर्यांची चिरफाड व्हावी हाच तर उद्देश आहे 'पुस्तकविश्व'चा.
वाट पहातो आहे परिक्षणाची.
आंधळी
अगदी आसपासच्या जगात नकारात्मक गोष्टींचे पेव फुटलेले असताना काहीतरी सकारात्मक, मनाला उभारी देईल, जिद्द देईल असे वाचण्याकडे माझा कायमच कल असतो. त्यातच डोळे हरवले तर जग कसे जाणवते, किती आणि कशी चिडचिड होते या सर्वातून मी स्वतः गेलेली असल्याने त्यासंदर्भाने काही वाचायला मिळाले तर मला हवेच असते. या सर्वातूनच सद्ध्या 'आंधळी' वाचायला घेतले आहे. शांता शेळकेंनी केलेला हा १६१ पानांचा अनुवाद इतका सहजसोपा आणि कसलाही अभिनिवेश न घेता लिहिलेला आहे की जन्मतःच आंधळी, बहिरी आणि म्हणून मुकी असलेली हेलन केलर आणि मुख्यत्वे तिची या सर्वावर मात करण्याची जिगरबाज जिद्द अगदी स्पष्टपणे डोळ्यात आणि तनमनातही भरते. 'हेलन केलर' हे नावच स्वतःत इतके काही बोलून जाते की त्याबद्दल मी वेगळ्याने असे काय लिहिणार? इतकेच म्हणते की हे पुस्तक वाचल्यापासून जीवन जगण्यात येणार्या संकटांशी दोन हात करण्याची जिद्द दुप्पट झालीये माझी!
आज मीनाप्रभुंचं
आज मीनाप्रभुंचं "मेक्सिकोपर्व" (एकदाचं) लायब्ररीतून मिळवलं.. सूरू केलंय .. प्रवासवर्णन असल्याने चवीचवीनं आरामात वाचेन! मला मीना प्रभुंची प्रवासवर्णन आवडतात आणि त्याही पेक्षा मला भावते ती या वयात एकट्या बाईने जिथे कोणीही ग्रूपनेही जायला घाबरतील अश्या पृथ्वीवरच्या भागात केवळ पर्यटनासाठी भटकणं! मीनाताईंना सलाम!
पुस्तकाबद्दल वाचून झालं की इथे टाकतोच!
-ऋ
----------------------
"चला, मी माझा एकमेव जुनाट कोट घालून एक नवं पुस्तक घेऊन येतो"
सध्या बरेच काही वाचतो आहे...
सध्या बरेच काही वाचतो आहे... गेल्या आठवयात रारंगढांग परत एकदा वाचुन काढले... सात आठ वर्षांनी परत वाचताना एक वेगळाच अनुभव देउन गेले. या बद्दल स्वतंत्र काहीतरी खरडेनच
त्यानंतर वाचले ते बाकी शुन्य त्याबाबत न बोललेलेच बरे
मधे एका तेलियाने वाचले.... तेला आणि पस्चिम आशियातील राजकारणा बद्दल बरेच काहि या पुस्तकातुन कळतेच...
सध्या गोतावळा वाचतो आहे... दुसर्या धाग्यावर चालु असनार्या वादातच माझे मत मांडतो
निखिल देशपांडे
दी लॉस्ट सिंबॉल ...
सध्या जवळ मराठीत नवे असे काही वाचण्यासारखे नसल्याने डॅन ब्राऊनचे "दी लॉस्ट सिंबॉल" हे पुस्तक वाचायला घेतले आहे, खरे तर हे ह्य पुस्तकाचे दुसर्यांदा वाचन, आधी एकदम शांतपणे आणि सखोल वाचले होते.
आता मात्र संपुर्ण पुस्तक न वाचता त्यातला काही निवडक भाग आणि उतारे वाचत आहे.
इतिहासातली गुढ चिन्हे, ती चिन्हे वागवणार्या संस्कॄती, इतिहासातल्या गुढ 'संस्था आणि समुदाय', अंतिम सत्य, धर्म आणि विज्ञान आदी बाबींची उपलब्ध असणार्या पुराव्यात सरमिसळ करुन त्यांची एकदम खरी वाटावी असी कल्पित कथा रचण्यात डॅन ब्राऊनचा हातखंड आहे ...
पुस्तक लै भारी नाही पण जरुर वाचावेसे वाटले.
नॉअॅटिक सायन्स, मेसनरी, अमेरिकेचा इतिहास आणि त्यातल्या गुढ घटना, बायबलची स्टोरी आदी घटनांवर ब्राऊनने त्याचे फेमस पात्र 'प्रो. लँग्डन" ह्याच्या मुखातुन खरे तर कल्पित पण खरे तर पटावे असे भाष्य केले आहे. काही वर्णने आणि संदर्भ निश्चितच रोचक आहे.
विज्ञानाच्या काही नव्या नव्या संकल्पना, हॅकिंग वगैरे बाबींवरही ब्राऊन भाष्य करतो.
असो, ह्या पुस्तकाचा वेगळा असा परिचय टाकेन.
पण तुम्हाला 'हे पुस्तक वाचा' असे सुचवु वाटल्याने हा प्रतिसाद ...
- छोटा डॉन
फाळणी ते फाळणी
प्रतिभा रानडेंचे हे पुस्तक वाचतोय...लक्ष्मी मित्तलच्या आर्सेलर लफड्यावर लिहिलेले 'द कोल्ड स्टील' नुकतेच संपवले...जबरदस्त वेगवान आणि भन्नाट पुस्तक आहे...
द कोल्ड स्टिल वाचायला
द कोल्ड स्टिल वाचायला आवडेल..
थोडक्यात ओळख करुन द्याल का???
निखिल देशपांडे
+१
थे कोल्ड स्टील बद्दल कालच एक जण बोलला.. थोडक्यात परिचय येऊच दे हा आग्रह!
-ऋ
----------------------
"चला, मी माझा एकमेव जुनाट कोट घालून एक नवं पुस्तक घेऊन येतो"
@निखील आणि ऋषीकेश...
जागतिकीकरणाच्या नावाखाली विकसनशील देशांना आपण फाट्यावर मारू शकतो अशी भावना असलेल्या विकसित देशांना जेव्हा मित्तल भेटतो, तेव्हा त्यांचे खरे रंग दिसतात. मग वर्णद्वेष उफाळून येतो. हा कोण मित्तल, आमची आर्सेलर विकत घेण्याची भाषा करतो. भारत सरकारही मग मित्तलच्या पाठीशी उभे राहते. लक्ष्मी मित्तल हाहा म्हणता, आर्सेलर आपल्या ताब्यात घेतो. सगळ्यांच्या नाकावर टिच्चून! या संपूर्ण घडामोडीत पडद्यामागे जे काही राजकारण रंगले त्याचा उहापोह 'कोल्ड स्टील'मध्ये आहे. अत्यंत वेगवान आणि खिळवून ठेवणारे पुस्तक आहे. एका बैठकीत संपवले..(लक्ष्मी मित्तल यांचा एकेरी उल्लेख का केलाय याचे स्पष्टीकरण देखील अनुवाद्काराने दिले आहे.) जास्त लिहित नाही, वाचूनच पहा!
धन्यवाद अविनाश जी... अधिक
धन्यवाद अविनाश जी...
अधिक सविस्तर वाचायला आवडले असते
निखिल देशपांडे
धन्यवाद
का हो हात आखडता घेतलात..
असो आता मिळवून वाचतोच.. तुमच्या ह्या परिचयाने पुस्तक मिळवलेच पाहिजे असे वाटून गेले.
असाच एखाद्या पुस्तकावर दिर्घ परिचयही येऊद्यात
-ऋ
----------------------
"चला, मी माझा एकमेव जुनाट कोट घालून एक नवं पुस्तक घेऊन येतो"
अरे! इकडे बरीच हालचाल झालेली
अरे! इकडे बरीच हालचाल झालेली दिसते!
ही मी नुकतीच वाचलेली आणखी काही पुस्तकं:
लाल फुलांचे झाड (कथासंग्रह) - भारत सासणे -
अप्रतिम. काव्यात्म भाषा, गूढ-रम्य वातावरण आणि अदृश्य नियती. सासणे दी ग्रेट.
अशी वेळ (कथासंग्रह) - सानिया
ठीकठाक. मला फार नाही आवडल्या कथा. काही तर 'भाय, ये तो शुरू होतेही खतम हो गयेला हय'टाईप होत्या.
एक अरबी कहाणी - 'अरेबियन नाईट्स'चा अनुवाद -
अरबी -> इंग्रजी (रिचर्ड बर्टन) -> मराठी (गौरी देशपांडे). अक्षरशः सुरस आणि चमत्कारिक! त्यातनं मुस्लिम समाजजीवनाचे जे तपशील मिळतात ते वाचून, आणि त्यावरची बर्टनची खास टिप्पणी वाचून, थक्क व्हायला होतं. मी अजून पहिल्याच खंडात आहे. एकूण १२ / १३ आहेत...
श्री. ना. पेंडसे - माणूस आणि लेखक
पेंडशांनी आपलाच एक मित्र आपल्याबद्दल लिहितो आहे अशी कल्पना करून लिहिलं आहे. वेगळाच प्रकार. विंदांशी असलेली शिरूभाऊंची मैत्री, त्यांचं खाजगी कष्टप्रद आयुष्य आणि त्यांच्या कादंबर्यांत पडलेले त्याचे पडसाद, क्षुद्र साहित्यविश्वातल्या पोटदुख्या, कुठेकुठे खुद्द शिरूभाऊंचा घसरलेला पाय... असं सगळं येतं. श्री. ना. आवडत असतील, तर मस्ट.
गंगा - लेखक विसरले. अनुवाद - प्रकाश अकोलकर
गंगेचं भारतीय संस्कृतीतलं, भारतीयांच्या मनातलं स्थान, तिच्याबद्दलच्या पुराकथा, तिच्या पाण्याचे विशिष्ट गुणधर्म, त्यावर होणारी धरणं, प्रदूषण.... या सगळ्याचा एका शोधमोहिमेतून घेतलेला आढावा. भाषांतर चांगलं आहे. पण मूळ पुस्तकच खूप अघळपघळ आहे, ते अजून गोळीबंद असतं, तर बरं झालं असतं.
- मेघना भुस्कुटे
अशी वेळ मीही वाचलेय.. मलाही
अशी वेळ मीही वाचलेय.. मलाही नाही आवडलं. मला एकूणातच सानियांचे लेखन आवडलं नव्हतं.. त्यामुळे आवडलं नसावं असं वाटलं होतं.. पण आता मात्र खात्री पटली, दोष माझ्यात नाही.. पुस्तकातच होता...
हिहिहि! मला तिच्या कादंबर्या
हिहिहि!
मला तिच्या कादंबर्या विशेष आवडतात. स्थलांतर, अवकाश, आवर्तन.
- मेघना भुस्कुटे
मी तिचे फक्त कथासंग्रह
मी तिचे फक्त कथासंग्रह वाचलेयत.. वरची एकही कादंबरी नाही वाचली.. आता वाचेन...
सानिया
लेखिका-सानियाप्रेमिंची माफी मागूनः
सानिया या लेखिकेचे लिखाण माझ्या सगळ्यात नावडतीचे.. म्हणजे तिने कथा का बरं लिहावी? काहि नसतंच त्या कथेत.. ती आली तीने आराम केला ती बाहेर आली आणि तिने कॉफी घेतली अशी काहितरी कथा.. आता याला कथा का म्हणावं?
एखादं पुस्तक असं असेल म्हणून अजून एक वाचलं होतं.. नंतर मात्र हे नाव दिसलं की कोसो दूर पळतो.
-ऋ
----------------------
"चला, मी माझा एकमेव जुनाट कोट घालून एक नवं पुस्तक घेऊन येतो"
जीएंचे 'एक अरबी कहाणी'
आज मी जीएंचे 'एक अरबी कहाणी' पुस्तक पाहिले पाथफाईंडरला. मेघनाने सांगितले त्या गौरी देशपांडेंच्या अनुवादाचा आणि जीएंच्या या पुस्तकाचा काही संबंध असेलसे वाटत तरी नाही. काय माहिती.. पुढच्यावेळी जीएंचे हे पुस्तक चाळून बघावे लागेल तिथेच बसून.
एक अरबी कहाणी
एक अरबी कहाणी आणि गौरीच्या कुठल्या पुस्तकाचा संबंध नसावा.. गौरीने रिचर्ड बर्टन लिखीत अरेबिअन नाइट्सच्या बर्याच भागांचे भाषांतर केले आहे.. पण 'एक अरबी कहाणी' बर्टनच्या अरेबिअन नाइट्समधली नाही.. जॉर्ज मेरेडिथ नावाच्या लेखकाने लिहिलेल्या 'The Shaving of Shagpat' ह्या इंग्रजी पुस्तकाचा जीएंनी केलेला अनुवाद आहे.. हे पुस्तक देखील अरेबिअन नाइट्स सारख्याच शैलीत आहे.. भन्नाट आहे हे भाषांतर पण..
जीएंबद्दल कधी लिहितोयस?
ग्रेट! टण्या, जीएंचे बरेच (की सगळेच?) लेखन वाचलेले दिसतेयस की तू तर! कधी लिहितोयस जीएंबद्दल? मला उत्सुकता आहे खूपच.
एक अरबी कहाणी
एक अरबी कहाणी आणि गौरीच्या कुठल्या पुस्तकाचा संबंध नसावा.. गौरीने रिचर्ड बर्टन लिखीत अरेबिअन नाइट्सच्या बर्याच भागांचे भाषांतर केले आहे.. पण 'एक अरबी कहाणी' बर्टनच्या अरेबिअन नाइट्समधली नाही.. जॉर्ज मेरेडिथ नावाच्या लेखकाने लिहिलेल्या 'The Shaving of Shagpat' ह्या इंग्रजी पुस्तकाचा जीएंनी केलेला अनुवाद आहे.. हे पुस्तक देखील अरेबिअन नाइट्स सारख्याच शैलीत आहे.. भन्नाट आहे हे भाषांतर पण..
मी रविन थत्तेंचं "मी हिंदू
मी रविन थत्तेंचं "मी हिंदू झालो" वाचतेय.. ३_१४ बैंची शिफारस होती.. उद्यापर्यंत लिहीन त्यावर इथे.. एकतरी ओवी अनुभवावी हे पुस्तक वाचून पटतंय..
बाईमाणूस
'माणूस नावाचे जगणे' मला थोडं बोजड, बोर वाटलं. एवढं काही आवडलं नाही. किंवा 'मी हिंदू झालो' मुळे अपेक्षा फारच वाढल्या होत्या.
मी सध्या वेळ असताना करूणा गोखलेंचं 'बाईमाणूस' वाचते आहे. करूणा गोखलेंनी 'Conquest of Happiness' या रसलच्या पुस्तकाचं 'सुखी माणसाचा सदरा' हे अतिशय उत्तम अनुवादीत पुस्तक लिहीलं आहे. एकच धडा वाचला आहे 'बाईमाणूस'चा, खूपसं आवडलं नाही आहे, पण अगदीच टाकाऊ अजिबात वाटलं नाही. पूर्ण झालं की परिक्षण टाकतेच.
आडवं होऊन 'नाझी भस्मासुराचा उदयास्त' वाचते; 'एका तेलियाने'ची सवय सोडवायला हे हातात घेतलं आणि याचं व्यसन लागलं. युध्यस्य कथा: रम्य: काही खोटं नाही.
कर्वालो
श्रावणने सजेस्ट केले म्हणून (त्याने आजवर सजेस्ट केलेली सगळी पुस्तके मला आवडलीत) उमा कुलकर्णींनी अनुवादित केलेले पुचंतेंचे कर्वालो वाचायला घेतले आज. कॅबमधून हापिसात यायला सुमारे दिड-पावणेदोन तास लागतात, त्यात एरवी रेडीओ ऐकणे पसंत करणारी मी, आज पेनकिलरने जबरदस्त गुंगी येतेय त्यात गाणे ऐकले तर अंगाईगीताचा इफेक्ट येऊन झोपच लागायची.. या भीतीने कर्वालो वाचुया ठरवले. वाचायला घेतले आणि आता हापिसात पोहोचेतो एकतृतीयंशच (हो ना! गुंगीमुळे मला एकच वाक्य तीनतीनदा वाचावे लागत होते नीट अर्थ समजण्यासाठी..
) वाचून झालेय. मस्स्त पुस्तक आहे.. हापिसातले काम करायचेय म्हणूनही खाली ठेवायला अगदी जीवावर आले आहे. अर्थात पर्याय नाही.. खाली ठेवण्याशिवाय. संध्याकाळी जाताना वाचन पूर्ण करायचा बेत आहे. श्रावण याचा पुस्तकपरीचय लिहिणार आहे (बहुतेक याच जन्मात!) त्यामुळे मला चिंता नाही!! (आळशीपणाचा मक्ता आम्हीही घेऊ शकतो म्हटलं!!!)
राधा दमोदर प्रतिष्ठान
राधा दमोदर प्रतिष्ठान प्रकाशित , स्वामी वरदानंद भारती संपादित मनुस्मृती आणि त्याचा मराठी भावार्थ वाचतो आहे.
त्याआधी त्यांनी स्वतःच लिहीलेली १०० पानी प्रस्तावना आत्ता वाचून झाली आहे. आता पुढे.
- पेशवे
पेशवे ?
पेशवे ? मनुस्मृती झाली का वाचुन ?
परिचय कधी येणार ?
सध्या डच बालसाहित्य वाचतेय
सध्या डच बालसाहित्य वाचतेय !!
इंग्रजी पुस्तकांचा इथे दुष्काळ आहे आणि मराठी.....
असो. तुम्हा सगळ्यांचा हेवा करते थोडे दिवस !
माया
केन फॉलेटचं आय ऑफ द नीडल
केन फॉलेटचं आय ऑफ द नीडल वाचतोय. दुसर्या महायुद्धातील हेरगिरीवर आधारीत कथानक आहे. रंजक वाटतंय. नुकतंच, ज्ञानपीठप्राप्त इंदिरा गोस्वामींचं अर्धीमुर्धी कहाणी हे मराठी अनुवादीत आत्मचरित्र वाचलं, बाईंच्या बोल्ड जगण्याविषयीची माहिती यातून मिळते. तरीही तितके आवडले नाही. बरेचसे लपवल्यासारखे वाटले. सायरन इन बगदाद हे यास्मिन खाद्रांचे पु्स्तक वाचले. युद्धग्रस्त इराकींवर अमेरिकी अत्याचारातून आत्मघाती अतिरेकी बनण्याचा प्रवास यात मांडलाय. पुस्तक अर्थातच अस्वस्थ करणारं.
(हा प्रतिसाद पाहून "पुन्हा
(हा प्रतिसाद पाहून "पुन्हा एकदा का हा धागा उघडला?" असं झालं!)
'सायरन इन बगदाद' वाचावसं वाटत आहे.
माझं 'बाईमाणूस'वरचं वरचं विधान मागे घेत आहे. अर्धं पुस्तक वाचून होता होता आवडतंय.
सुधामूर्तींचं डॉलरबहु
मीना प्रभुंचं मेक्सिकोपर्व नंतर सुधामूर्तींचं डॉलरबहु संपवलं.. चांगलं वाटलं.. सहज मिळालं तर वाचावं असं
बाकी मेक्सिकोपर्व मात्र फारच छान आहे. जरूर मिळवून वाचावं असं
याशिवाय बसमधे काल कलिका नावाचे वि.स.खांडेकरांचे रूपककथांचे छोटेखानी पुस्तक वाचले. काहि कथा अप्रतिम असल्या तरी एकूणात पुस्तक (बर्याचशा कथा) ठिक ठाक आहे (आणि खांडेकरही ते प्रस्तावनेत मान्य करतातच म्हणा!)
-ऋ
----------------------
"चला, मी माझा एकमेव जुनाट कोट घालून एक नवं पुस्तक घेऊन येतो"
मला 'डॉलरबहू' अजिबात आवडलं
मला 'डॉलरबहू' अजिबात आवडलं नाही. गरीब = देशी = सद्बुणी = सुसंस्कृत अशा छापील समजातून लिहिलेलं आणि शुद्ध बेतीव वाटलं.
मी सुधा मूर्तींचं वाचलेलं ते पहिलं आणि बहुधा शेवटचंच पुस्तक. माझी अपेक्षा करण्याची जागाच चुकली बहुतेक.
- मेघना भुस्कुटे
असा विचार मनातही नको.
मी त्या॑ची बहुता॑श पुस्तके वाचलेली आहेत.
सवच पुस्तके छान असतात.तु॑म्ही त्या॑ची
खालील पुस्तके वाचा.तु॑म्ही ती वाचाल अशी आशा व्यक्त करतो.
१. गोस्टी माणसा॑च्या
२. पुण्यभुमी भारत
३. बकुळा
४. वाईज अ॓न्ड आदर वाईज
५. आस्तित्व