• '

दर्जेदार चित्रपटांच्या रसिकांसाठी......

प्रभाकर नानावटी
गुरुवार, 10 November, 2011 - 11:12
 

मुखपृष्ठ

पुस्तक जोडलेले नाही

 
 

पुस्तक

पुस्तक जोडलेले नाही

 

चित्रपटाची एक वेगळी भाषा असते. त्या भाषेचे व्याकरण समजून घेऊन चित्रपट जगतात प्रवेश केल्यास दर्जेदार चित्रपटांच्या आस्वादात भर पडते. दिग्दर्शक, कलाकार, संगीतकार, कथालेखक, छायाचित्रकार व इतर तंत्रज्ञ इत्यादींनी घेतलेले परिश्रम, प्रत्येकाची प्रतिभा, तंत्रज्ञान हाताळण्याचे कौशल्य, त्या सर्वांचे सांघिक प्रयत्न या गोष्टी समजून घेत चित्रपटाचे रसग्रहण करत असल्यास कलेचा आनंद मिळू शकतो. आपल्या देशात सर्वाधिक आणि विविध भाषांमधील चित्रपट बनतात, ते चित्रपट कसे पाहायचे याचे प्राथमिक ज्ञान असल्यास आपण अभिरुचीसंपन्न प्रेक्षक होऊ शकतो. चित्रपट रसग्रहण हे एक शास्त्र आहे आणि त्यात या सर्व गोष्टींचा खरोखरच बारकाईने विचार केला जातो. हे रसग्रहण कसं केलं जावं हेही शिकावं लागतं.

आपल्यातील बहुतेक प्रेक्षक केवळ मनोरंजन वा टाइमपास, वा घडीभरची करमणूक (वा 'त्या' गोष्टी पाहण्यास मिळतात म्हणून) हा उद्देश ठेऊनच थिएटरमध्ये पाय ठेवतात. त्यांमुळे चांगले चित्रपट कोणते व सुमार चित्रपट कोणते हेच आपल्या प्रेक्षकांना कळत नाही. बरेचदा असं होतं की पडद्यावर दाखवत असलेल्या छोट्या छोट्या प्रसंगांमधे विसंगती असते पण चित्रपट आवडल्याने ती नजरेआड केली जाते. नाहीतर फिल्ममधे हे चालणारच असं गृहित धरलं जातं. काहीवेळा उलट होतं. चित्रपट आवडलेलाच नसला किंवा पडला की त्यात खरोखरच काही अप्रतिम दिग्दर्शकाची, कलादिग्दर्शकाची, इतर तंत्रज्ञांची मेहनत असते ती लक्षात न घेतली गेल्याने वाया जाते. कला-सौंदर्य आणि इतर बाबतीत बारकाईने विचार केलेल्या सर्व संबंधितांना त्यांचे ड्यूज मिळायलाच हवेत. सामान्य प्रेक्षकांना ते पटकन उमगत नसतील तर चित्रपटाच्या शास्त्रोक्त रसग्रहणातून ते त्यांच्यापर्यंत पोचवायला हवेत. चांगले प्रेक्षक घडवण्याचं काम काही मोजक्या शहरातील फिल्म सोसायट्या गेली ५० वर्षं करत आहेत. या फिल्म सोसायट्यांमुळे अनेक दजेर्दार चित्रपट सर्वसामान्य चित्रपटप्रेमींपर्यंत पोहोचले, हे मान्य करायला हवे.

चित्रपट हा एक कलाप्रकार आहे व त्याकडे गांभीर्याने बघायला हवे असे समजणारे मात्र चित्रपटाविषयी खोलात जाऊन अभ्यास करतील; फिल्म सोसायटीचे सदस्य होतील; शहरातील चित्रपट महोत्सवात भाग घेतील; समीक्षा वाचतील, शक्य झाल्यास चित्रपट रसग्रहण शिबिरातील कोर्स पूर्ण करतील. परंतु यासाठी जिद्द हवी, वेळ हवा व कलेविषयी तळमळ हवी. याच तळमळीपायी व चित्रपट वेडापायी चित्रपट समीक्षालेखक विजय पाडळकर यांनी फिल्म अप्रिसिएशन कोर्स पूर्ण केले. व त्या कोर्सच्या काळात आलेल्या अनुभवाची कहाणी म्हणजेच "सिनेमाचे दिवस पुन्हा" हे त्यांचे पुस्तक!

पुस्तकाचे लेखक, विजय पाडळकर यांनी पुणे येथे फिल्म अप्रिसिएशन कोर्सच्या 4-5 आठवड्याच्या कालखंडात लिहिलेल्या डायरीचा वृत्तांत या पुस्तकातून आपल्याला वाचायला मिळेल. नांदेडसारख्या आडशहरी आयुष्य घालवलेल्या लेखकांना ही एक आयतीच चांगली संधी चालून आली होती व त्या संधीचे त्यांनी सोने केले. कोर्सच्या काळात त्यांनी लिहिलेल्या रोजनिशीतील दिवसाच्या आढाव्याचे संकलन केलेल्या या पुस्तकामधून आपल्यासारख्या चित्रपट रसिकांच्या काही उत्कृष्ट चित्रपटांच्या आठवणी ताज्या केल्या व त्याचबरोबर कोर्सच्या काळातील वातावरण उभे करून आपल्याला भूतकाळात घेऊन गेले.

लहानपणापासून चित्रपटांच्या अनावर ओढीने जेवढे चित्रपट पाहता येतील तेवढे लेखकानी पाहिले. चित्रपटाविषयी ऐकले, वाचले आणि लिहिले. एक चित्रपट समीक्षालेखक म्हणून चित्रपटांचा शोध घेतला. चित्रपट बेतलेल्या कादंबर्‍या वाचल्या. लेख लिहिले, पुस्तकं लिहिली. चित्रपटकलाविषयक व्यापक अनुभव घेण्यासाठी प्रयत्न करत राहिले. यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न करत असताना चित्रपट रसग्रहण शिबिरात सहभागी होण्याची संधी मिळाली व त्यांनी हा कोर्स पूर्ण केला. कोर्स काळात चित्रपटविश्वात वावरत असल्यामुळे चित्रपटाव्यतिरिक्त दुसरे काही त्यांना सुचत नव्हते. पाडळकर यांनी या दैनंदिनीतून त्यांचे चित्रपटकलाविषयीचे प्रगल्भ प्रेम आणि सखोल आकलन व्यक्त केलेले आहे. आपल्यापैकी ज्यांनी या कोर्सचा वा कोर्सकाळात दाखवलेल्या चित्रपटांचा अनुभव घेतला आहे त्यांना लेखक पुन:प्रत्ययाचा आनंद देतात; आणि जे अनभिज्ञ आहेत त्यांना दर्जेदार चित्रपट बघण्यास उद्युक्त करतात.

या पुस्तकासाठी लिहिलेल्या प्रास्ताविकातून आपले चित्रपट प्रेम कसे विकसित होत गेले याविषयी लेखक लिहितात. त्यांच्या मते 1950-70 चा काळ हा हिंदी चित्रपटांचा सुवर्ण काळ होता. याच काळातील बहुतेक चित्रपट त्यांनी पाहिल्य़ामुळे त्यांना चित्रपटांची गोडी लागली. नंतरच्या काळात दे दणादण व हाणामारीच्या चित्रपटांची लाट आल्यामुळे लेखकांना जागतिक अभिजात साहित्याच्या वाचनाची आवड निर्माण झाली. देशोदेशीच्या श्रेष्ठ लेखकांची ओळख झाली. यातील बहुतेक लेखकांच्या कृतींचे चित्रपटात रूपांतरित झालेले असल्यामुळे चित्रपट व साहित्यकृती यांचे तुलनात्मक समीक्षा करणारे लेखन ते करू लागले व त्या लेखांना वाचकांचे उत्तेजन मिळू लागले व लेखकांचे लेख व पुस्तकं प्रसिद्ध होऊ लागले.

त्यांच्या रोजनिशीच्या नोंदीमधून काही उत्कृष्ट चित्रपटांची तोंडओळख ते वाचकांना करून देतात. त्यात प्रामुख्याने अमोल पालेकर यांचा कैरी, मृणाल सेन यांचा भुवनशोम, सत्यजित राय यांचा पथेर पांचाली, अरण्येर दिन रात्री, गोपी ग्याने भागा बाने, सद्गती, अकिरा कुरोसावा यांचा देर्सू उझाला, राशोमान, थ्रोन ऑफ ब्लड, चार्ली चाप्लिन यांचा द ग्रेट डिक्टेटर, ग्रिफिथ यांचा द बर्थ ऑफ अ नेशन, आइझन्स्टाइनचा बॅटलशिप पोटेमकिन, इव्हान द टेरिबल, रॉबर्ट वाइन यांचा द कॅबिनेट ऑफ कॅलिगुरी, डी सिक्का यांचा बायसिकल थीव्हज, रेनेचा हिरोशिमा मॉन आमोर, गोडार्डचा ब्रेथलेस, मिझोगुची यांचा उगेत्सु, मोनोगटारी, स्टॅनिस्लाव्ह स्ट्रँड यांचा माय ब्रदर इज अ सुपर ब्रदर, रुत्विक घटक यांचा सुवर्णरेखा, फेलिनीचा एट अँड हाफ, ऑर्सन वेल्सचा सिटिझन केन, गुरुदत्तचा साहिब, बीबी और गुलाम, केतन मेहताचा मिर्च मसाला, रेनाँ यांचा व्हॅनिशिंग कार्पोरल, ओझू यांचा अँन अँटम आफ्टरनून, इंगमार बर्गमन यांचा समर विथ मोनिका, वाइल्ड स्ट्रॉबेरीज, शेखर कपूरचा बँडिट क्वीन, मणी कौलचा उसकी रोटी, शैलेंद्रचा तीसरी कसम, लुइस ब्युन्युएल यांचा नाझरिन या अत्यंत गाजलेल्या चित्रपटाविषयी मार्मिक टीका टिप्पणी आहे. या चित्रपटाविषयी वाचताना पुन: एकदा चित्रपट पाहिल्याचा आनंद मिळतो.

कोर्सच्या या काळात अनेक लघुपट लेखकांना पाहण्यास मिळाले. बिग सिटी ब्ल्यूज, गॉड्स ऑफ सिनेमा, रेन, रीबॉकच्या जाहिरातीची फिल्म, ट्रिप टु द मून, द ग्रेट ट्रेन रॉबरी, मिरर ऑफ हॉलंड, हॅपी अँनिव्हर्सरी, लाइफ इज फॉर लिव्हिंग, कुस्करलेल्या कळ्या, डेथ ऑफ ए पेझंट, द अदर साइड या लघुपटाबद्दल त्यानी विस्ताराने लिहिले आहे.

चित्रपटविषयक व्याख्यान देणार्‍यामध्ये भास्कर चंदावरकर यांचे चित्रपटसंगीतावरील व्याख्यान, हरिहरन यांनी घेतलेला हिंदी चित्रपट श्रृष्टीचा आढावा व पी के नायर यांचा चित्रपटांचा इतिहास याबद्दल विशेष उल्लेख लेखक करतात. लेखकाच्या मते चित्रपट निर्मितीचे प्रमुख अंग समजलेले छायाचित्रण, ऑडिओग्राफी, ध्वनीमुद्रण, इत्यादी विषयी माहिती देताना चित्रपटातील दृश्यमालिका दाखवत असल्यामुळे हे तांत्रिक अंग स्पष्ट होत जातात.

चित्रपट हे प्रभावी माध्यम आहे. त्याच वेळी प्रेक्षकांना 'सिनेमाशिक्षित' म्हणजे चित्रपटाची भाषा समजून देण्याचं अवघड काम करणं हेही आवश्यक आहे. परंतु घराच्या हॉलमध्ये केबल टीव्ही आल्यापासून व कुठल्याना कुठल्यातरी चॅनेलवरील चित्रपट बघत 24 तास घालवण्याची सोय झाल्यामुळे चित्रपटाची भाषा म्हणजे काय, उत्तम चित्रपटाचे निकष कोणते, निकृष्ट दर्जेचे चित्रपट कोणते इत्यादी प्रश्नांना उत्तर शोधणे दुरापास्त ठरत आहे. चित्रपट म्हणजे घडीभरची करमणूक नसून तो एक कलाप्रकार आहे, त्यात दिग्दर्शकाचा प्रतिभाविष्कार आहे, आपल्याला सर्वस्वी वेगळ्या जगात घेऊन जाण्याइतकी ताकत त्यात आहे, आपल्या संवेदऩा तीक्ष्ण करण्याइतकी ताकत चित्रपटात आहे, हे आपण विसरत आहोत. म्हणूनच अशा प्रकारची पुस्तकं वाचण्याची अत्यंत गरज आहे.

सिनेमाचे दिवस - पुन्हा
विजय पाडळकर,
मौज प्रकाशन गृह, मुंबई, (2006)
किं : 150 रु; पृ. सं 142