'बोलती पुस्तके' हा मराठीतला पहिला वाहिला free Audio Books प्रकल्प. याबद्दल अधिक जाणुन घ्या इथे.
तुमची अत्यंत आवडती कोणती अनुवादित पुस्तके संग्रहात आहेत ? (देशी सोडून)
विदेशी पुस्तकांचे देशी अनुवाद अनेक वेळा आपल्याला मोहात पाडतात. त्या अफाट कथानकाच्या वेगाने आपण भारावून जातो. तर तुम्हाला एखादे पुस्तक आवडते आणि ते खूप खूप आवडते. आज ना उद्या कधीतरी ते पुस्तक तुम्ही विकत घेता व संग्रहात ठेवता. तर अशी तुमची अत्यंत आवडती अशी कोणती विदेशी अनुवादित पुस्तके संग्रहात आहेत ते सांगावे यासाठी हा उपक्रम. (देशी अनुवाद नाही)
कोणती पुस्तके अधिक वाचकांच्या संग्रहात आहेत हे माहिती झाल्यावर मोजकी पुस्तके वाचणार्या वाचकांना अथवा ज्यांना त्या पुस्तकांबद्दल माहिती नाहिये अशा सर्वांना जास्तीत जास्त चांगल्या पुस्तकांची ओळख व्हावी हा उद्देश / हेतू या चर्चे मागे आहे. तुमच्याकडे असलेल्या आवृत्तीचा उल्लेख केलात तर वाचकांना प्रसिद्ध पुस्तकांची माहिती अनायासेच होईल.
माझ्या संग्रहातील यादी देत आहे:
१. दा विंची कोड - डॅन ब्राऊन - अनु: अजित ठाकुर
२. एंजल्स अॅन्ड डेमन्स - डॅन ब्राऊन - अनु: बाळ भागवत
३. डिसेप्शन पॉईंट - डॅन ब्राऊन - अनु: अशोक पाध्ये
४. द सेवन्थ सिक्रेट - आयर्विंग वॅलेस - अनु: विजय देवधर
५. द सेकंड लेडी - आयर्विंग वॅलेस - अनु: रविंद्र गुर्जर
६. पॅपिलॉन - हेन्री शॅरियर - अनु: रविंद्र गुर्जर
७. अवलक्षणी बेत (मूळ लेखक जेम्स हॅडली चेस यांच्या कम इझी गो इझी चा अनुवाद) अनिल गुजर
८. ब्लडलाईन - सिडने शेल्डन - अनु: विजय देवधर
९. तोत्तोचान - तेत्सुको कुरुयानागी - अनु: चेतना सरदेसाई गोसावी
१०.गॉडफादर - मारियो पुझो - अनु: रविंद्र गुर्जर
अजून काही:
११. द अल्केमिस्ट - पाऊलो कोएलो - अनु: नितीन कोतापल्ले
१२. साऊथ बाय जावा हेड - अॅलिस्टर मॅक्लीन - अनु: अशोक पाध्ये
१३. डेझर्टर - गंथर बान्हमान - अनु: विजय देवधर
१४. काळाचा छोटासा इतिहास - स्टीफन हॉकिंग - अनु: वि. शं. ठकार
धन्यवाद,
सागर





अनुवादीत ही
१. एंजल्स अॅन्ड डेमन्स - डॅन ब्राऊन - अनु: बाळ भागवत
२. डिसेप्शन पॉईंट - डॅन ब्राऊन - अनु: अशोक पाध्ये
३. गॉडफादर - मारियो पुझो - अनु: रविंद्र गुर्जर
४. इफ टुमारो कम्स - सिडने शेल्डन - अनु: विजय देवधर
५. क्रायसिस - रॉबिन कुक - डॉ. प्रमोद जोगळेकर
६. मार्कर - रॉबिन कुक - अनिल काळे
७. फॉल्स इंप्रेशन - जेफ्री आर्चर - सुधाकर लवाटे
८. सन्स ऑफ फॉर्च्युन - जेफ्री आर्चर - अजित ठाकूर
९. नॉट अ पेनी मोअर, नॉट अ पेनी लेस - जेफ्री आर्चर - अंजनी नरवणे
१०. वन शॉट - ली चाइल्ड - बाळ भागवत
११. द अॅटर्नी - स्टीव्ह मार्टिनी - अजित ठाकूर
१२. द सिमीऑन चेंबर - स्टीव्ह मार्टिनी - जयवंत चुनेकर
१३. द स्टेट ऑफ फिअर - मायकेल क्रायटन - डॉ. प्रमोद जोगळेकर
१४. द रनअवे ज्युरी - जॉन ग्रिशम - अनिल काळे
१५. संपूर्ण शेरलोक होम्स - सर आर्थर कॉनन डॉइल - गजानन जहागिरदार
१६. मनिचेंजर्स - आर्थर हेली - अशोक पाध्ये
माझ्या संग्रहातील काही......
संग्रह
माझ्या संग्रहात सध्या एकही अनुवादित पुस्तक नाही मात्र माझी आवडती खालीलप्रमाणे.
पॅपिलॉन, गॉडफादर, कॉन टिकी - रवींद्र गुर्जर (तिसरे बहुधा औट ऑफ प्रिंट आहे.)
पाडस - राम पटवर्धन
--
Behind every great man there is a woman... rolling her eyes. ~ Jim Carrey
अनुदिनी : http://rbk137.blogspot.com/
सागर, तुझा धागा पाहून आणि इथे
सागर, तुझा धागा पाहून आणि इथे धदाधड याद्या पडलेल्या पाहून अगदीच न्यूनगंड आला होता. मी सहसा अनुवादित पुस्तके आणत नाही, आणि इथे याद्यांमधील काही मूळ पुस्तके वाचलेली आहेत, पण आरागॉर्न ह्यांचे पोस्ट पाहून ल़क्षात आले की माझ्याकडेही एक अनुवादित पुस्तक आहे.
तेह्वा ही माझी पण यादी 
पाडस - राम पटवर्धन
होय चांगलेच आठवते आहे
पाडस तुझ्या आणि माझ्या बॅगेत एकाच वेळी आले होते
मी एक पुस्तकवेडा
http://pustakveda.blogspot.com/
काळाची गरज...!!
सागर....
तुम्ही आणि वल्ली एक नंबरी वाचक असल्याने अनुवादित पुस्तकांचे वाचन आणि त्यायोगे त्यांचा संग्रह तुमच्याकडे असणे क्रमप्राप्त आहे. पण माझ्याकडे फक्त एकच अनुवादित पुस्तक आहे आणि तेही वाढदिवसानिमित्य एका मित्राने दिले म्हणून....आर.के.लक्ष्मण यांचे "लक्ष्मणरेषा" - श्री.अशोक जैन यानी अनुवादित केलेले.
तुमच्या, श्री.वल्ली आणि सौ.जोशी यांच्या यादीतील बरीचशी पुस्तके मी वाचली आहेत, पण ती मूळ स्वरूपातील. सबब त्यांचे अनुवाद पाहण्याचा प्रसंगही आला नाही, किंवा त्याची आवश्यकताही भासली नाही. पण अनुवाद संस्कृतीने कोणते मोठे कार्य केले असेल ते हे की, अनुवादकांनी फार मोठा वाचकवर्ग आपल्याकडे खेचला आहे हे मान्य केलेच पाहिजे. आज 'मेहता' 'लोकप्रिय' गटातील साहित्याचे अनुवाद झपाट्याने बाजारात आणीत आहेत आणि त्यांची विक्री-व्यवस्थापन-कला फाईव्ह स्टार धर्तीची असल्याने ते अनुवाद हातोहाती खपतही आहेत, हे सुचिन्ह आहे या व्यवसायातील. पण याच अनुषंगाने ते ज्यावेळी Don Quixote, Pilgrim's Progress, Tom Jones, Clarissa, Tristam Shandy, David Copperfield, Wuthering Heights, Jane Eyre, The Scarlet Letter, Huckleberry Fin, Ulysses, Brave New World आदी जागतिक दर्जाच्या साहित्यांचे अनुवाद (आणि तेही संक्षिप्त स्वरूपात न आणता) आपल्या भाषेत आणतील तर ती मराठी वाचकांची अशी 'क्लासिक' साहित्यिक भूख प्रज्वलित करण्याची नांदी ठरेल असा माझा विश्वास आहे. पण हे होणार नाही, हेही मला माहीत आहे.....कारण? पैसा.....त्यांचा व्यावहारिक दृष्टीकोण.
असो...धाग्याच्या निमित्ताने हे विचारही इथे मांडायला मिळाले हे साहित्याच्या दृष्टीने सुचिन्हच !
इन्द्रा
सहमत आहे
अभिजात इंग्रजी साहित्य मराठीत फारसे आढळात येत नाही. आणि पुस्तक वाचण्यातल्या क्लिष्टटेमुळे मूळ इंग्रजी पुस्तकांना आम्ही अभावानेच हात घालतो. उदा. शेरलॉक होम्स वगैरे. शिवाय अनुवादित वाचतो तिही 'लोकप्रिय' प्रकारातील थोडक्यात फिक्शन. आता मेहतांनी तर अनुवादित फॅक्टरीच सुरु केल्याने पुस्तकांचा दर्जा (छपाईचा) जरी उत्कृष्ट असला तरी पुस्तकांचा दर्जा (वाचनीयतेचा/कंटेंन्टचा) मात्र जबरदस्त खालावला आहे. तेव्हा अगदी मेहतांची अगदी मोजकी अनुवादित पुस्तके सोडून इतर पुस्तकांकडे सध्या तरी दुर्लक्षच केले आहे.
इंद्रराज, चिंजं, आरागॉर्नयांच्या प्रतिसादातून बर्याच उत्तमोत्तम इंग्रजी लेखकांविषयी, पुस्तकांविषयी माहिती सतत समजतच असते. आता वाट बघतोय की ती पुस्तके मराठीत यायची. पण येतील असेही वाटत नाही. कारण हे शिवधनुष्य कोण उचलणार?
शिवधनुष्याची कथा....!!
"....कारण हे शिवधनुष्य कोण उचलणार?...."
वल्ली....मला नेमके हेच म्हणायचे आहे, तरीही वेगळ्या शब्दात. जी.ए.कुलकर्णी यांच्यासारख्या दिग्गज लेखकाने रिक्टरच्या काही कादंबर्या मराठीत अनुवाद केल्या हे तुम्हाला एक वाचक म्हणून ज्ञात आहेच. पण जीए याना फक्त रिक्टरच प्रिय होता काय? त्यांच्या इंग्लिश वाचनाची यादी पाहिली तर मन थक्क होऊन जाते. स्वप्नातही आम्ही कधी जी नावे ऐकू पाहू शकणार नाहीत असल्या लेखकांची कुठल्याकुठल्या जंगलातून, साता समुद्रापलिकडून ते पुस्तके मिळवित आणि त्यांच्यावर ते आपल्या पत्रातून अन्य मित्रांना लिहित हे पाहून त्यांच्याविषयी आदर दुणावतो. तर अशा जीएनी अन्य 'आऊट ऑफ वे' लेखकांच्या कलाकृती मराठीत आणाव्यात असे म्हटले होतेच. पण मराठी शारदेच्या प्रांतात त्यांच्यासारख्या हिमालयाएवढे स्थान असलेल्या लेखकाचा तो विचार प्रत्यक्षात यावा असा कोणताही प्रयत्न इथला प्रकाशक करू शकला नाही तर मग कितीही सुंदर अनुवाद करण्याची क्षमता असलेली एखादी अनोळखी व्यक्ती जरी पुढे आली तर त्याचे तसे पुस्तक प्रकाशित करण्यासाठीचे प्रयत्न वाळूतच जाणार.....कारण मराठी प्रेम कितीही उफाळून येत असले तरी या प्रकाशक जमातीला सरस्वतीपेक्षा लक्ष्मीच्या पाऊलांचे जास्त आकर्षण असते.
"मानसशास्त्र" विषयाचा लेक्चरर असलेल्या माझ्या एका मित्राने सिग्मंड फ्राईडच्या The Interpretation of Dreams या पुस्तकाची अक्षरशः पारायणे केली होती, वेडाच होता तो या पुस्तकाचा, आणि त्याने माझ्या व आणखीन एका मित्राच्या साहाय्याने त्यातील पहिली २५ पाने अनुवादित केली. अनुवादाचे क्लिष्ट काम त्याने रात्रभर त्याच्या कॉलेजच्या ग्रंथालयात अगदी मुक्काम करून पूर्ण केले होते...आम्ही दोघांनी कॉम्प्युटरवर त्याची प्रेस कॉपी करून दिली. या २५ पानांचे त्याने झेरॉक्सचे ५ सेट केले आणि पुढे महिनाभर दहा विविध प्रकाशकाकडे अक्षरशः दीनवाणे हेलपाटे मारले. त्याना फ्राईडच्या पुस्तकाचे महत्व पटवून दिले...पण यातील एकानेही काडीचीही उत्सुकता दाखविली नाही. "खर्चापोटी २५,००० रुपये द्या....आम्ही तुम्हाला प्रती देतो....त्या तुम्हीच खपवा...." असा रोखठोक व्यवहाराचा सल्ला दोघांनी दिला. एकाने तरी 'कोण हे फाईड?' असेही हेटाळणीच्या स्वरात विचारून मित्राची बोळवण केली. 'अहो कसले सायकॉलॉजीचे पुस्तक आणताय, गल्फवर काहीतरी लिहा, सध्या चलती आहे तिकडच्या प्रांतावर लिहिणार्याची...!" असा चौथ्याचा टोला. या दहामध्ये तो जाणीवपूर्व़क मेह्ताकडे गेला नाही...उत्तर अपेक्षित होतेच....तिथे फक्त 'लोकप्रिय' लेबलखाली येणाराच मसाला खपत असतो.
अशी शोचनीय अवस्था आहे आमच्या अनुवाद जगताची....त्यामुळे 'जागतिक पातळीवर अभिजात' गणल्या गेलेल्या कलाकृती वाचायच्या असतील तर त्यासाठी इंग्लिशशिवाय अन्य पर्याय नाही, हेच सत्य परत समोर येते.
इन्द्रा
खरे आहे
+१ असेच म्हणतो
....कारण हे शिवधनुष्य कोण उचलणार?....
खरे आहे पण वस्तुस्थिती नाकारुन नाही ना चालत
परिस्थिती बदलण्याची अपेक्षा करायची एवढेच आपल्या हातात आहे.
अलिकडेच तुम्ही म्हणता तसे मेहता, श्रीराम बुक एजन्सी, मॅजेस्टीक, राजहंस, असे अनेक नामवंत प्रकाशक चांगले अनुवाद आणत आहेत.
कधीतरी चित्र बदलेल अशी आशा करायची की हे शिवधनुष्य उचलले जाईल
मी एक पुस्तकवेडा
http://pustakveda.blogspot.com/
प्रकाशन
इन्द्रा,
१. तुम्ही सांगितलेले पुस्तक अजूनही प्रकाशित झाले नसेल, तर ते माझ्याकडे पाठवण्याची व्यवस्था करावी.
माझा पत्ता - कार्यालयीन फोन :
१०१, ए / १३, नायगारा, भारतीय स्टेट बँकेसमोर, एव्हरशाईन सिटी, वसई ( पूर्व ) जि. ठाणे. ४०१२०५.
फोन : ०२५०-२४६२८०८ ( सकाळी १० ते १२ व दुपारी ४ ते ६ )
२. अशी इतर अजून काही चांगली पुस्तके अप्रकाशित असल्याची माहिती असल्यास कळवावे. म्हणजे ती प्रकाशित होण्याबाबत मी प्रयत्न करू शकेन. काही प्रकाशकांसाठी गेली १३-१४ वर्षे मी सल्लागार-संपादक म्हणून काम करते. त्यामुळे हे म्हणू शकते आहे. अपवादात्मक परिस्थितीत आपण स्वतःही पुस्तक प्रकाशित करण्याचा विचार करू शकतो. माझी 'कुहू' ही कादंबरी नुकतीच मी स्वतः प्रकाशित केली आहे. नवा प्रयोग होता आणि खर्च मोठा ( सुमारे २७ लाख रु. खर्च झाला.) त्यामुळे प्रकाशक साशंक होते. हे पुस्तक मराठीसह इंग्रजीतही प्रकाशित केले आहे. आणि त्याची बालआवृत्तीही आहे.
३. केवळ इंग्रजीतून नव्हे तर इतर भाषांमधूनही चांगले साहित्य मराठीत येण्याची गरज आहे. त्याचप्रमाणे मराठीतील उत्तम साहित्य इंग्रजीसह इतर भाषांमध्ये ( उदा : फ्रेंच, जर्मन, स्पॅनिश ) अनुवादित होणे गरजेचे आहे. त्याखेरीज आपल्याकडील लेखकांचे न्यूनगंड कमी होणार नाहीत.
कॉपिराईट
'भारतीय लेखिका' या शीर्षकांतर्गत मी ४० पुस्तकांची मालिका मराठीत आणते आहे. त्यातील ३ गेल्यावर्षी प्रकाशित झाली. मानसी ( मल्याळम), अम्बई ( तमीळ), वैदेही (कन्नड) यांच्या निवडक कथा. अजून १२ पुस्तके येत्या ऑगस्ट-सप्टेंबरमध्ये प्रकाशित होतील. त्यांच्या प्रस्तावना लिहिण्याचे काम मी सध्या करते आहे. मनोविकास प्रकाशनातर्फे ही पुस्तके येताहेत.
आता ही देशातीलच पुस्तके असूनही त्यांचे कॉपिराईट इत्यादी कामे किचकट आहेत. त्यात कितीतरी वेळ जातो. कारण केवळ लेखकाचीच नव्हे, तर प्रकाशकांचीही परवानगी घ्यावी लागते. आणि अनुवादाच्या ( किंवा माध्यमांतराच्या ) रॉयल्टीत प्रकाशकही हिस्सा मागतात. ( रक्कम कितीही किरकोळ असली तरी! ) स्वत:चे लेखन / संशोधन बाजूला ठेवून हे उद्योग केवळ आपली खाज म्हणून करायचे, इतकाच त्याचा अर्थ होतो. प्रत्येक पुस्तकामागचा अनुभव लिहायला गेले तर तेच एक मोठे पुस्तक होईल.
माझी स्वतःची पुस्तके इतर भाषांमध्ये जाणे हे तर निव्वळ मनःस्ताप देणारे ठरले. म्हणजे आपल्या प्रकाशकांची परवानगी आपणच मिळवून द्यायची आणि आपल्याच लेखनासाठी त्यांनी परवानगी द्यावी म्हणून मिनतवार्या करायच्या. 'भिन्न'च्या हिंदी, इंग्रजी व फ्रेंच अनुवादाचे प्रस्ताव गेली तीन-चार वर्षे माझ्याकडे असल्या आचरट कारणांनी केवळ पडीक आहेत. त्यापेक्षा पुढील कामांकडे वळलेले बरे असे वाटते. चित्रपटाचा अनुभव तर भयानकच होता.
परदेशी पुस्तकांबाबत कॉपिराईट आणि रॉयल्टीची रक्कम हे मोठे प्रश्न असतात. त्यामुळे समकालिन साहित्य मराठीत आणणे तर अधिकच अवघड होऊन बसते. या बाबत इथले कुणी मदत करणार असेल, तर पुढील जबाबदार्या घेण्याची माझी तयारी आहे.
निव्वळ कुरकुर न करता जमेल-झेपेल तितके काम करूयात, हे योग्य.
भारतीय लेखिका
ही तिनही पुस्तके मी गेल्या काही महिन्यात विकत घेतली. भारतात नसल्याने माझ्या हाती पडली नाहीत पण वडिलांनी ती वाचली व अभिप्राय आला की उत्कृष्ट आहेत. नॅशनल बूक ट्रस्टच्या कृपेने विविध भारतीय भाषांतील लघुकथा मराठीत वाचायला मिळाल्या होत्या.
पण आता तुमच्या प्रयत्नांमुळे - विशेषकरून स्त्री लेखिकांचे लेखन - इतके विपुल भारतीय साहित्य वाचायला मिळते आहे हे ग्रेटच! धन्यवाद.
चांगले अनुवाद
मूळ पुस्तकाचा दर्जाही उत्तम आणि अनुवादही उत्तम असं मिश्रण माझ्या मते मराठीत तर विरळाच. अनेकदा मूळ पुस्तकातली गोष्ट आपल्याला हवी तशी सांगितली की लोक त्याला चांगला अनुवाद म्हणतात. त्यामुळे 'मेहता प्रकाशन'छाप अनुवाद सहसा हातात धरवत नाहीत.
मोठेमोठे लेखकही या सापळ्यातून सुटत नाहीत. पु.लंच्या 'एका कोळियाने'नं हेमिंग्वेच्या मूळ पुस्तकाच्या कशा चिंधड्या केल्या हे जाणून घ्यायचं असेल तर विलास सारंग यांच्या 'अक्षरांचा श्रम केला' या पुस्तकातला त्यावरचा लेख वाचायची शिफारस करेन.
'मूळ पुस्तकाचा दर्जाही उत्तम आणि अनुवादही उत्तम' असं पटकन आठवणारं उदाहरण म्हणजे 'किंग लिअर'चा विंदांनी केलेला अनुवाद. जर मूळ नाटकाशी परिचय असेल तर प्रतिभावान अनुवाद म्हणजे काय ते कळतं आणि मग या तोडीचं मराठीत दुसरं काय आहे हे सुचेनासंच होतं.
इतर अनुवादांमध्ये थोडा विचार करता आठवणारं एक नाव म्हणजे सॅम्युएल बेकेटच्या 'वेटिंग फॉर गोदो'चा माधुरी पुरंदरे यांनी केलेला अनुवाद. हा अनुवाद म्हणून चांगला जमलेला आहे कारण मूळ फ्रेंच नाटकाचा गवसायला कठीण असा गाभा त्यात उतरलेला आहे.
विंदांनी केलेलं तृणपर्णे (वॉल्ट व्हिटमनचं 'लीव्ह्ज ऑफ ग्रास) आणि डॉ. फाउस्ट (गथ) वाचलेले नाहीत. तेंडुलकरांनी काचेची खेळणी (टेनेसी विलिअम्सचं ग्लास मेनाजरी) आणि वासनाचक्र (स्ट्रीटकार नेम्ड डिझायर?) असे दोन अनुवाद केले आहेत. तेही वाचायचे आहेत.
अवांतर: लिअर आणि गोदो - दोन्ही नाटकांचे मराठीतले प्रयोगही चांगले झाले होते. लिअरचा प्रयोग 'प्रत्यय' या कोल्हापूरच्या संस्थेनं केला होता. दिग्दर्शन व प्रमुख भूमिका डॉ. शरद भुताडिया यांची होती. 'गोदो' पुण्याच्या अतुल पेठे यांनी बसवलं होतं. नसीरुद्दीन शाह, बेंजामिन गिलानी आणि टॉम आल्टर यांनी इंग्रजीत केलेल्या 'गोदो'वर तो प्रयोग बराचसा आधारित होता.
- चिंतातुर जंतू :S
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" || ५ ||
'वेटिंग फॉर गोदो'चा अजून एक अनुवाद
'वेटिंग फॉर गोदो'चा अजून एक अनुवाद अशोक शहाणे यांनी केला आहे. तुलना करता तो माधुरी पुरंदरे यांच्या अनुवादाहून अधिक सरस उतरलेला आहे, हे जाणवते. त्याचे प्रयोग 'नाट्यसंपदा'तर्फे अनंत पणशीकर यांनी केले. टॉम अल्टर या अभिनेत्याने या निमित्ताने पहिल्यांदाच मराठी नाटकात काम केले.
दोन संहिता
माझ्या माहितीनुसार शहाण्यांचा अनुवाद इंग्रजी संहितेवरून आहे (चू,भू.द्या.घ्या.) माधुरी पुरंदरे यांचा अनुवाद फ्रेंच संहितेवरून आहे. अनेकांना हे माहीत नसते की बेकेटने 'गोदो' आधी फ्रेंचमध्ये लिहिले. नंतर तो स्वतःच त्याचे इंग्रजी भाषांतर करू लागला, पण ते करता करता त्याने संहितेत काही बदल केले. त्यामुळे फ्रेंच व इंग्रजी या दोन संहितांमध्येच अनेक (आणि महत्त्वाचे) फरक आहेत. त्यांची तुलना करताना हे लक्षात घ्यायला हवे.
संदर्भः विकीपीडिआ
- चिंतातुर जंतू :S
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" || ५ ||
आश्चर्याचा धक्का.....
सागर,
तुमची यादी बघून मलादेखील सुरसुरी आली. आणि म्हणून मीही माझा संग्रह नव्याने बघितला आणि चाट्च पडले. माझ्याकडे ह्या वर्गातील एवढी पुस्तके पाहून मला आश्चर्याचा धक्का बसला. तुमचे विशेष आभार! ह्यातील काही पुस्तके अजून वाचायची बाकी आहेत हेही ह्यामुळे लक्षात आलं..........
चिं.जं.,
मूळ पुस्तके मी वाचलेली नाहीत. पण अलिकडे वाचलेल्या खालील काही पुस्तकांचा अनुवाद मला आवडला. ते इतके अस्सल आहे की जणू ती मूळ मराठी पुस्तकेच वाटावीत.
१.द रीडर: बर्नार्ड श्लिंक - अनु. अंबिका सरकार
२.द बॉय इन द स्ट्राइप्ड पायजमाज: जॉन बायेन - अनु. मुक्ता देशपांडे
आणि
३.डॅडी लॉन्ग लेग्ज: जीन वेबस्टर - अनु. सरोज देशपांडे.
वरील यादीतील अजूनही काही पुस्तके वाचायची बाकी आहेत. त्यामुळे त्याविषयी आत्ता काही सांगणे कठीण!
मला वाटतं ही आवड-निवडही व्यक्तीसापेक्ष असणार. कारण तुम्ही ज्या किंग लिअर च्या अनुवादाविषयी लिहिलं आहे तो अनुवाद माझ्यापेक्षा सर्वच बाबतीत सिनिअर असलेल्या माझ्या एका साहित्यिक मैत्रीणीला फारसा रुचलेला नाही.
बाकीच्या अनुवादित पुस्तकांविषयी तुम्ही दिलेली माहिती उपयुक्त आहे. तीदेखील `वाचायची आहेत' च्या यादीत समाविष्ट करायला हवीत.
मी हा धागा काढण्याचे प्रयोजनच ते होते
चित्रा,
तुम्हाला बसलेला धक्का मलाही बसलेला होता. आवडत्या पुस्तकांच्या यादीत जवळपास निम्म्याने विदेशी अनुवाद यायला लागल्यावर माझ्याकडचा सगळा ग्रंथसंभार उचकटला आणि तोच आश्चर्याचा धक्का बसला हो तुम्हाला बसला होता. म्हणूनच हा धागा काढायचा विचार तेव्हा आला आणि लगेच धागा काढला.
शिवाय या धाग्याच्या निमित्ताने नवनवीन पुस्तके अनुवादीत पुस्तके आवडणार्या वाचकांना माहिती होतील हाही हेतू होताच.
तुमची यादी पाहून मला मी अडाणि असल्याचा भास झाला
तुमच्या यादीतील १२ आणि १७ क्र. सोडले तर एकही मी अजून वाचले नाही.
डायरी ऑफ अॅन फ्रॅन्क आणि पॅपिलॉन एवढेच परिचीत जाणवले.
तुमची यादी टिपून घेतली आहे. यादीबद्दल धन्यवाद
अनिमल फार्म इंग्रजी आहे माझ्याकडे पण मराठी दिसले नाही कधी.
मी एक पुस्तकवेडा
http://pustakveda.blogspot.com/
अनुवाद
'हवी तशी' मुळे थोडा गोंधळ होतो आहे. म्हणजे गोष्ट आवडली तर असे धरले तर गोष्ट आवडण्याचे किंवा न आवडण्याचे इतर निकषही असू शकतात.
अनुवाद चांगला आहे किंवा नाही हे तपासण्यासाठी एकाहून अधिक कसोट्या असाव्यात असे वाटते. वैयक्तिक निकष सांगायचा झाला तर जो अनुवाद वाटत नाही किंवा ज्याला स्वतंत्रपणे वाचतानाही अडचण येत नाही तो चांगला अनुवाद म्हणायला हरकत नसावी.
मी सहसा अनुवाद वाचत नाही कारण आधीच लेखक आणि वाचक यांच्यातील संवादांना मर्यादा असतात. त्यात अनुवादक ही तिसरी व्यक्ती मध्ये आली की नाही म्हटले तरी तिच्या सहभागामुळे मूळ कलाकृती बदलणार. ही किती बदलली किंवा नाही हे ठरवणे कठीण आणि व्यक्तीसापेक्ष आहे असे वाटते.
मूळ भाषा येत असेल तर किमान आपण मूळ पुस्तक बघून अनुवाद चांगला/वाईट हे ठरवू शकतो. पण मूळ भाषा अपरिचित असेल तर आपण पूर्णपणे अनुवादकाच्या दयेवर अवलंबून असतो (अॅट द मर्सी ऑफ या अर्थाने). मुराकामी वाचताना प्रत्येक वेळी मूळ जपानीमध्ये याचा अनुभव कसा असेल हे मनात येते. तरी मुराकामीला इंग्रजी भाषा चांगली अवगत आहे आणि तो स्वतः अनुवादांकडे जातीने लक्ष देतो ही त्यातल्यात्यात चांगली गोष्ट. पण मध्ये विंड अप बर्ड क्रॉनिकलच्या अनुवादात केवळ संपादकांच्या मर्जीखातर कापाकापी केली असे वाचल्यावर वैताग आला.
--
Behind every great man there is a woman... rolling her eyes. ~ Jim Carrey
अनुदिनी : http://rbk137.blogspot.com/
अनुवाद
अनुवाद ही एक भाषासाहित्य समृद्ध करणारी क्रिया आहे. नेदरलँड, हंगेरी, स्वीडन, अगदी स्लोव्हेनिया सारख्या बारक्या बारक्या देशात स्थानिक भाषांतून जगभरचे साहित्य अनुवादीत केलेले आढळते. अर्थात हे करणे व्यावसायिकदृष्ट्या ह्या देशातल्या लोकांना परवडते कारण पुस्तक विकत घेणारे बरेच ग्राहक व मातृभाषेत वाचणारे बरेच वाचक. तेव्हा जेव्हा कधी मराठीत ही परिस्थिती उद्भवेल तेव्हा मराठीतही प्रचंड पुस्तके अनुवादित होतील. दहा वर्षापुर्वीच्या तुलनेत आज मराठीत कित्येक पटींनी पुस्तके अनुवादित होत आहेत असे दिसते ह्याचे कारणही हे व्यावसायिकच आहे.
सहा महिन्यामागे मी डिस्ग्रेस, क्राइम अँड पनिशमेंट ह्या दोन पुस्तकांची मराठी भाषांतरे बघितली. पद्मगंधा प्रकाशनाचे 'शब्द' हे सार्त्रेच्या लेमो चे भाषांतर उपलब्ध आहे.
ऑरवेलच्या १९८४ चे मराठी भाषांतर उपलब्ध आहे. मी ते बर्याच वर्षांपुर्वी वाचले होते आणि खूप आवडले होते. पुढे इंग्रजी वाचन अंगवळणी पडल्यावर १९८४ ची पारायणे झाली. पण तो मराठी अनुवाद मनात घर करून राहिला. कुणी केला होता मुळीच आठवत नाही. पण समर्थपणे केला होता हे नक्की. मुळात भाषेची आणि विचारांची असलेली सांगड, शब्दांची संख्या कमी करणे, विशेषणांना एकसुरी करणे व ह्याचा समाजावरचा परिणाम अश्या मुलभूत प्रश्नांना हात घालणार्या ह्या कादंबरीचा अनुवाद करणे खरेच अवघड काम आहे. डबलप्लस सारख्या शब्दांना मराठीत आणणे व मुख्य म्हणजे ह्या कादंबरीच्या शेवटी असलेली दोन परिशिष्टे देखील भाषांतरीत केली होती. ही दोन परिशिष्टे कादंबरी लिखाणामागे काय विचार आणि परिश्रम घेतले जातात ह्याचे अत्त्युत्कृष्ट उदाहरण आहे.
उमा कुलकर्णींनी कन्नड साहित्याची केलेली भाषांतरे - तंतू, डोंगराएव्हडा (हे कुलकर्णींचेच ना? की चोम्मन्डुड्डीचे भाषांतर अजुन कुणी केले आहे?) वगैरे देखील कसदार आहेत. शिकार नामक यशवंत चित्ताल ह्यांच्या कादंबरीचे केशव महागावकरांनी केलेले भाषांतरदेखील वाचनीय.
श्री.ज.जोशींनी (की भाषांतर करणारे श्रीपाद जोशी?) केलेली मंटोच्या कथांची भाषांतरे (ओम पडदी गिडगिडदी, अँक्स दी बेंघ्याना दी, मंग दी दाल ऑफ टोबा टेकसिंग), श्रीलाल शुक्लचे राग दरबारी वगैरे देखील कसदार आहेत.
नुकतेच 'दीवार मे एक खिडकी थी' ह्याचेही मराठी भाषांतर दिसले.
माळगावकरांच्या A bend in the Ganges चे तसेच Himalayan blunders ह्या ब्रि. जॉन पी दळवींच्या भारत-चीन युद्धावरच्या अमूल्य ठेव्याचे मराठी भाषांतर वाचनीय आहेत.
अनुवाद-सूची
'डोंगराएवढा'चा अनुवाद उमा कुलकर्णी यांचाच. त्याखेरीज त्यांनी सुमारे ४० कन्नड पुस्तके मराठीत आणली आहेत. अर्थात ती पुस्तके वाचकप्रिय पुस्तके आहेत. काही 'हटके' असलेली पुस्तकेही त्यांनी आता मराठीत आणावीत म्हणून आमच्या चर्चा सुरू आहेत.
. विरुपाक्ष कुलकर्णी यांनी काही मराठी पुस्तके कन्नडमध्ये अनुवादित केली आहेत.
काही वेगळ्या आणि चांगल्या पुस्तकांचे अनुवाद चंद्रकांत पाटील, भास्कर भोळे यांनी मराठीत केले आहेत.
श्रीपाद जोशी, चंद्रकांत भोंजाळ, विलास गिते ही मंडळी पुष्कळ अनुवाद पाडतात; पण ते वाचवत नाहीत. त्यांनीही ते पहिल्या कच्च्या ड्राफ्टनंतर पुन्हा वाचलेले नसते. ( मुळात अनेक ड्राफ्ट करण्याची आवश्यकताच अशा अनुवादकांना वाटत नाही.) मेहता तर प्रती पान पन्नास रु. देऊन लोकप्रिय पुस्तकांचे अनुवाद पाडून घेतात.
नागपूरच्या डॉ. वीणा ( क्षमस्व. आडनाव विसरले. ) यांनी मराठीत अनुवादित आणि मराठीतून अनुवादित अशा पुस्तकांची सूची तयार केली आहे. त्यांचे पीएच्.डी. त्याच विषयावरील आहे. बडोद्याचे डॉ. गणेश देवी यांनी अशा सूचीचा ( भारतीय पातळीवर ) प्रकल्प सुरू केला होता. गेली काही वर्षे त्यांच्याशी संपर्क तुटल्याने त्याचे काम आता नेमके कुठवर आले आहे याची कल्पना नाही. देवींनी तेजगढला आणि हिमाचल प्रदेशात दोन मोठे वेगळे प्रकल्प सुरू केल्यानंतर कदाचित हे काम बाजूला पडले असावे असे वाटतेय.
मोजकी
माझ्याकडे मोजकी अनुवादीत पुस्तके आहेत
-- तोत्तोचान
-- चीपर बाय द डझन
-- साखरेचं बाळ
-- पाडस
-- अॅन फ्रँकची डायरी
-- गॉडफादर
याशिवाय संग्रही नसलेली पण आवडलेले अनुवाद
सत्तर दिवस
पॅपिलॉन
नॉट विदाऊट माय डॉटर
संपूर्ण शेरलॉक होम्स
देनिसच्या गोष्टी
अवांतर अघाता ख्रिस्तींच्या पुस्तकांची भाषांतरे कोणी केली आहेत का?
-ऋ
----------------------
"चला, मी माझा एकमेव जुनाट कोट घालून एक नवं पुस्तक घेऊन येतो"
अगाथा ख्रिस्ती
जवळजवळ सर्वच अगाथा ख्रिस्तीच्या पुस्तकांचा अनुवाद पद्मगंधा प्रकाशनातर्फे आणला जात आहे. अनुवाद करताहेत ते सुप्रसिद्ध अभिनेते प्रा. मधुकर तोडरमल.
याआधीही अगाथा ख्रिस्तीच्या पुस्तकांचे काही फुटकळ अनुवादही प्रसिद्ध झालेले होतेच.
सगळा संचच उपलब्ध आहे रे ऋ
अघाता ख्रिस्तींच्या पुस्तकांची भाषांतरे कोणी केली आहेत का?
हे काय विचारणे झाले? अरे ऋ अगाथाबाईंची जवळपास २० पुस्तके उपलब्ध आहेत.
अगाथाबाईंचे २ संपूर्ण संच विक्रिस आहेत उपलब्ध. सगळा संचच विकत घ्यावा लागतो एवढेच काय ती अडचण आहे. एबीसी मध्ये जा रसिकवाल्यांकडे आहे तो संच.
मी एक पुस्तकवेडा
http://pustakveda.blogspot.com/
हवी तशी
माझी वाक्यरचना थोडी चुकली. मला भाषांतरकाराला 'हवी तशी' असं म्हणायचं होतं. मूळ भाषेतल्या शब्दांना अनेक वेगवेगळे अर्थ असतात; अनेक समानार्थी शब्दांपैकी लेखकानं विशिष्ट शब्द काही हेतूनं निवडलेले असतात. त्यांमागे सामाजिक/राजकीय/सांस्कृतिक संदर्भ असू शकतात. मूळ साहित्यकृतीतल्या भाषेला एक लहेजा असू शकतो. शब्दांच्या/वाक्यांच्या रचनेतून/योजनेतून मूळ साहित्यकृतीला काही प्रवाहीपण किंवा वजन येतं. वापरलेल्या शब्दांना ध्वनी असतो; त्यांतून वाक्यांना एक प्रकारची गेयता/कोरडेपणा वगैरे येऊ शकतात. अशा अनेक गोष्टींतून मूळ लेखकाला काय परिणाम अभिप्रेत आहे, हे लक्षात न घेताच नुसती एक गोष्ट सांगितली जाते. 'साधारण अर्थ कळल्याशी मतलब' असं म्हणता म्हणता मूळ साहित्यकृतीचा आत्माच हरवून जातो. मराठीत असे अनुवाद पुष्कळ आहेत.
साधं उदाहरण - 'अ ब्रिफ हिस्टरी ऑफ टाईम' हे शीर्षक प्रौढ आणि भारदस्त आहे; त्यात कुठेही खेळकरपणा किंवा गंमत नाही. 'ब्रिफ'च्या जागी भाषांतरकार जेव्हा 'छोटासा' असा शब्द वापरतो तेव्हा त्यात मूळ शीर्षकात नसणारा भाव येतो. भाषांतर म्हणून हे खटकतं.
- चिंतातुर जंतू :S
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" || ५ ||
कॉन्राड रिश्टरची द सी ऑफ
कॉन्राड रिश्टरची द सी ऑफ ग्रास - अनुवादित शांता शेळके
अनुवादित पुस्तकाचं
नाव सांगशील का??
तेच नाव.
तेच नाव.
अनुवादित पुस्तकांचे पुनर्मुद्रण
दुर्गा भागवतांनी काही वेगळी पुस्तके मराठीत आणली आहेत. उदा. थोरोची पुस्तकं.
.) त्याची प्रस्तावना अत्यंत महत्त्वाची आहे. आपल्याला न पटलेल्या विचारांचे पुस्तक केवळ त्या विषयावर एकही महत्त्वाचे, चांगले पुस्तक मराठीत नाही म्हणून अनुवाद करणे, हे विलक्षणच. प्रस्तावनेत आपले मुद्दे मांडले आहेत. आक्षेप नोंदवलेले आहेत. संदर्भांच्या चुका दाखवून दिल्या आहेत. हे अभ्यासविषयाचे प्रेम असल्याखेरीज होणे शक्य नाही. समीक्षेच्या ( सुमारे ४५० पाने ) किचकट पुस्तकाचा सरस अनुवाद करणे हे थक्क करणारे काम आहे.
भा. रा. भागवतांनी अॅलीस इन द वंडरलँड सारखी बरीच पुस्तके मराठीत आणली.
तथापि अशा अनेक अनुवादित पुस्तकांचे पुनर्मुद्रण मराठीत झालेले दिसत नाही.
अनुवादाखेरीज रूपांतरित, भाषांतरीत पुस्तकेही अनेक आहेत.
कवितांचा अनुवाद हा अजून एक वेगळा विषय आहे.
नाटकाच्या अनुवादाचे निकषही वेगळे ठेवावे लागतात.
म. सु. पाटील यांनी डॉ. गणेश देवी यांचे 'आफ्टर अॅम्नेशिया' हे देशीवादावरील पुस्तक मराठीत आणले. ( स्मृतिभ्रंशानंतर; पद्मगंधा प्रकाशन. या पुस्तकाचा अनुवाद तपासण्याचे आणि मुद्रितशोधनाचे काम मी हुरूपाने केले होते.
चांगला धागा
सागर,
तुम्ही चांगला धागा इथे मांडलात. त्या निमित्ताने पुष्कळ गोष्टी आठवाताहेत. काही नोंदवल्या. पण इतके आहे की सगळे सांगत बसणे शक्य नाही.
थोडे उदास वाटले, अडचणींचा जाच वाटला की अशी मोठी उदाहरणे आठवणे फार उपयुक्त ठरते. बाहेरून एक तात्पुरती उर्जा त्यातून आपल्याला आपल्या कामांसाठी मिळते. या धाग्याचा आज मला असा व्यक्तिगत उपयोग नक्कीच झालाय.
त्यासाठी आभार.
- कविता
खूप छान वाटले कविताजी
इतक्या दिवसांनंतर तुमचे एवढे लेखन पाहून मला खरेच खूप आनंद झाला कविताजी.
आम्हा पुस्तकवेड्यांमुळे तुमच्यासारख्या नामवंत आणि समाजमूल्ये जपणार्या लेखिकेला काही मिळू शकले तर ती आमच्यासाठी भाग्याचीच गोष्ट असेन. कारण त्यातून आम्हा पुस्तकवेड्यांना पुन्हा तुमची अजून एक अत्भुत कलाकृती वाचावयास मिळेन
तुमचे या धाग्यावरचे सर्व लेखन वाचले. तुमचे अनुभव सुन्न करणारेच आहेत. मराठी साहित्यविश्वात व्यावसायिकता आहे ती फक्त जास्तीत जास्त पैसा मिळवण्याची. आजकाल वैद्यकीय व्यवसायात जे झाले आहे तसेच चित्र साहित्य क्षेत्रात निर्माण होऊ पाहते आहे. एक सामाजिक जबाबदारी देखील आपल्या खांद्यावर असते याचा विसर पडला की मग फक्त बाजार उरतो. एखादा लेखक / लेखिका तळमळीने साहित्य क्षेत्राच्या संवर्धनासाठी प्रयत्न करत असताना केवळ व्यवहार डोळ्यांसमोर ठेवून अडेलतट्टूपणा कोणाही व्यावसायिकाने करु नये अशी मनापासूनची तळमळ आहे. पुढील पिढ्या तुम्ही किती कमाई केली यापेक्षा तुम्ही किती नाव कमावले हे जास्त लक्षात ठेवतात. साहित्य हे सामाजिक विचारांना दिशा देणारे एक प्रचंड प्रभावी माध्यम आहे. या शक्तीला सिमित कोणी करण्याचा प्रयत्न करु नये असे मनापासून वाटते.
कविताजी यावर तुमचे अजून विचार वाचावयास आवडतील. (अर्थात तुम्हाला त्यातून त्रास होणार नसेन तरच. कारण आवडत्या लेखिकेला आपल्यामुळे त्रास व्हावा असे कोणा चाहत्या वाचकास वाटेन?
)
मी एक पुस्तकवेडा
http://pustakveda.blogspot.com/
याहून अधोगती काय असेल?
सागर,
कमाई करणे ( आर्थिक वा नाव कमावणे ) किंवा सामाजिक विचारांना दिशा देणे... या गोष्टी अनुषंगिक असतात.
लेखनातून काही सामाजिक बदल घडतील, हा माझा भ्रम नाही.
मी प्रत्यक्ष फिल्डवर असते तेव्हा मी 'लेखक' आहे हे कुणाला माहीतही नसते व त्याच्याशी काही देणेघेणेही नसते.
आल्या दिवसात काही ना काही चांगले काम करण्याचा ( मग ते वाचन-लेखन-चित्रं असे काही असो किंवा सामाजिक कार्य असो किंवा घरकाम ) प्रयत्न करणे आणि दिवस सत्कारणी लावणे... इतकेच माझे ध्येय सीमित आहे. बाकी महत्त्वाकांक्षा नाहीत.
प्रकाशकांना व्यवहार पाळावे लागतातच, त्यात वाईट काही नाही. पण खरे "व्यावहारिक" लोक व्यवसायवृद्धी करताना जितक्या घटकांचा विचार करतात, तो विचार अजून आपल्याकडील प्रकाशकांना करणे जमत नाही.
अजब प्रकाशन सारखे लोक ( हे मेहताच ) ७० ते ८० टक्के कमिशन देऊन बाजाराची वाट लावतात. अत्यंत सुमार पुस्तके त्यामुळे अनेक वाचनालयांमधून आढळतात. पुण्यातील पुस्तकांच्या असे प्रचंड कमिशन देणार्या विशिष्ट दुकानांना 'रांडबाजार' असे संबोधले जाते... याहून अधोगती काय असेल?
अर्थात याला अनेक घटक जबाबदार आहेत. लोकसत्तामधील एका लेखात मी त्याबाबत लिहिले होते. जमल्यास वाचावा. त्याची लिंक अशी आहे : http://bhinn.blogspot.com/2010_02_01_archive.html
धन्यवाद
हे अ़क्षरशः हादरवणारे पण कटू सत्य आहे. या प्रकाशकांनी पुस्तकांचा अगदी बाजार केला आहे आणि याची परिणती पुस्तकांच्या दर्जावर उमटलेली आढळते. मेहतांची पुस्तके, मुख्यत्वे अनुवाद तर वाचणे जवळपास बंदच केले आहे आता.
धन्यवाद कविताजी
सविस्तर तुमचे विचार व्यक्त केल्याबद्दल मनापासून धन्यवाद.
आल्या दिवसात काही ना काही चांगले काम करण्याचा प्रयत्न करणे आणि दिवस सत्कारणी लावणे..
असा निर्भेळ दृष्टीकोन ठेवून काम करणारे खूप कमी लोक समाजात आहेत. माझा मुद्दा हाच होता की साहित्यसेवा अथवा कोणतीही सेवा करताना त्याचे समाजमनावर जे खोलवर परिणाम होत असतात याचे भान व्यापार करणार्या प्रकाशकांनी ठेवणे फार फार गरजेचे आहे. नाहीतर फॅक्टरी उघडल्याप्रमाणे पुस्तकांचा भडीमार आणि बरोबर सारखी जाहिरातबाजी करुन निकृष्ट दर्जाचे साहित्य दर्जेदार म्हणून वाचकांच्या माथी मारणार्या मनोवृत्तीला आळा तेव्हाच बसू शकेन जेव्हा आपण काय करतो आहोत याचे भान त्यांना येईन.
माझा येथील चांगला मित्र वल्ली म्हणतो तसे मीदेखील आजकाल मेहतांची पुस्तके बघणेही सोडून दिले आहे इतके अजीर्ण झाले आहे.
तुम्ही म्हणता तसे संपूर्ण व्यावसायिकता आपल्या मराठी प्रकाशकांत उतरलेली नाहिये हेच खरे. व्यवहाराचे मूळ उद्दिष्टच नफा कमावणे हे आहे त्यामुळे जे पैसे कमावतात त्यात खरेच गैर काहीही नाही. पण ज्या लेखकाच्या कलाकृतीवर मुबलक कमाई जे प्रकाशक करतात त्यांनी तो मोबदला लेखकाकडेदेखील तितक्याच जबाबदारीने पोहोचवला पाहिजे तरच काहीतरी फरक पडू शकेन. कित्येक हाडाचे लेखक असतात त्यांना या लांड्यालबाड्या करता येत नाहीत त्याचा प्रकाशक गैरफायदा घेतातच. आणि असे लेखक अंधारातच राहतात. आजच माझा एक मित्र फोनवरील चर्चेत सांगत होता की त्याने गेल्या २ आठवड्यात १० पुस्तके वाचली, इतकी दर्जेदार पुस्तके होती की केवळ मार्केटिंग , वितरण व्यवस्थित नसल्यामुळे खपली नाहीत. माझ्या या मित्राकडे ही पुस्तके केवळ खपत नव्हती म्हणून कोणीतरी दिलेली होती.
बाकी ७० ते ८० टक्के कमिशन देऊन बाजाराची वाट लावतात आणि प्रचंड कमिशन देणार्या विशिष्ट दुकानांना 'रांडबाजार' असे संबोधले जाते.
या तुमच्या विधानाशी अक्षरशः सहमत आहे. यापेक्षा दुसरा योग्य शब्द अशांना असूच शकत नाही.
तुमच्या ब्लॉगवरील लेख वाचतो आहे. वाचून त्यावर मत व्यक्त करेनच.
तूर्तास इतके पुरे.
कविताजी तुम्हाला अनेक दिवसांनी पुस्तकविश्व वर पाहून खूप खूप आनंद झाला
मागच्या वेळी फिल्ड वर्क वर तुम्ही जाणार आहात असे मला सांगितले होते.
तुमच्या त्या ही अनुभवांबद्दल ऐकायला आवडेल
मी एक पुस्तकवेडा
http://pustakveda.blogspot.com/
टाइमलाइन - मूळ लेखक मायकेल
टाइमलाइन - मूळ लेखक मायकेल क्रिश्टन - अनुवादक आठवत नाही
सत्तर दिवस / अलाइव्ह - मूळ लेख पीअर्स पॉल रीड - अनुवाद रविंद्र गुर्जर आणि ..... (आठ्वत नाही)
सिडनी शेल्डनची सगळी पण खासकरुन ब्लडलाइन आणि डूम्स डे कॉन्स्पिरसी.
द काउंट ऑफ मॉण्टे क्रिस्टो - मूळ लेखक अलेक्झांडर ड्युमा - अनुवाद - द ज परांजपे (संग्रही नाही)
डॅन ब्राउनची सगळी
रूट्स - मूळ लेखक अलॅक्स हॅली (संग्रही नाही)
पॅपिलोन आणि बँको
शेरलोक होम्स - पंढरीनाथ सावंत
एक वैर्याची रात्र - जी ए - मूळ लेखक आठवत नाही.
बाकी सिमिऑन चँबर अजिबात आवडले नाही.
वैर्याची एक रात्र
ह्या पुस्तकाची मूळ लेखिका आहे: ओल्गा लेंज्येल. पुस्तकाचे नाव: I survived Hitler's ovens
टाईमलाईन
टाईमलाईन हे इथे पुस्तकविश्ववर पण यादीत आहे
अनुवादक आहेत प्रमोद जोगळेकर
मी एक पुस्तकवेडा
http://pustakveda.blogspot.com/