मराठी माणूस आणि सह्याद्री यांचं अतूट नातं आहे. शेकडो वर्षे ह्या भागातला माणूस सह्याद्रीच्या कुशीत वाढला आहे. इतर पर्वतरांगांप्रमाणे इथे नद्यांचे उगम आहेत, दुर्गम कडे आहेत, विविध पक्षी आहेत, प्राणी आहेत, दुर्मीळ वृक्ष आहेत. मात्र ह्या पर्वतरांगेचं वैशिष्ट्य असं की ही पर्वतरांग नांदती आहे. ह्या पर्वतरांगेत लोक राहतात. त्यावर किल्ले आहेत, बुरूज आहेत, मंदिरे आहेत, दर्गे आहेत, पाणवठे आहेत. ही केवळ पर्वतरांग नसून एका संस्कृतीचं केंद्र आहे. ह्या पर्वतरांगेचं महत्त्व केवळ भौगोलिक नसून तिला ऐतिहासिक, सामाजिक महत्त्वही आहे. याच बरोबर शिवरायांच्या गड-किल्ल्यांमुळे व राजांच्या जनमानसातील स्थानामुळे ह्या पर्वतरांगेला राजकीय महत्त्वही आहे. त्यामुळेच इथले पर्वतारोहण हे केवळ 'ट्रेकिंग' न राहता ती 'यात्रा' होते.
अशा वेळी ह्या पर्वतरांगांमधील भटकंती हा एक रोचक खेळ आहे. अनेकांना सह्याद्रीत भटकण्याची नुसती आवड नसून व्यसन आहे. जेव्हा एखादी नवखी व्यक्ती सह्याद्रीत भटकंती करू इच्छिते, तेव्हा सुरूवातीला मोठ्या शहरांजवळच्या सिंहगड, लोहगड वगैरेंनी सुरवात होते. पुढे पुढे ह्या भटकंतीची सवय लागल्यावर नवनवी ठिकाणे शोधणे हे आव्हान होऊ लागते. अशा वेळी 'डोंगरयात्रा' हे आनंद पाळंदे यांचे पुस्तक उपयुक्त ठरते. याआधी हरीश कापडिया यांचे 'ट्रेक द सह्याद्री' हे पुस्तक अनेकांचे दैवत होते. मात्र ते इंग्रजीत असल्याने त्याचा वाचकवर्ग सीमित होता. शिवाय सह्याद्रीतील भटकंती केवळ पर्वतारोहण नसून तिथे भेटणारी माणसे; ग्रामस्थांच्या सवयी-रिवाज; भेटणारे पक्षी, प्राणी, कीटक; दिसणारी फुले, झाडे वगैरेंची माहिती एकत्र देणे हे 'डोंगरयात्रा'चे वैशिष्ट्य ठरावे.
ट्रेकिंग हा क्रीडाप्रकार काय आहे? तो कोणी करावा?, आदी मूलभूत प्रश्नांपासून हे पुस्तक सुरू होते. ट्रेक करतेवेळी कपडे कसे असावेत, ट्रेकिंगची सॅक कशी भरावी, कोणती साधने, कोणती औषधे जवळ असावीत वगैरे माहिती वाचकाला सोप्या भाषेत आणि आवश्यक तिथे सचित्र दिली आहे. ट्रेकिंग हा आनंददायी क्रीडाप्रकार असला तरीही त्यावेळी घेण्याची खबरदारी पुस्तकात दिली आहेच, पण मुख्य म्हणजे ती देताना विस्तारभयाने उगाच काटछाट केलेली नाही. ज्यांना रस आहे त्यांच्यासाठी विविध गाठी (नॉटस), आकडे, प्रस्तरारोहण वगैरेची माहिती पुस्तकात आहे.
ह्या प्राथमिक परंतु आवश्यक माहितीनंतर पुस्तक डोंगरयात्रांकडे वळते. इथे गड, किल्ले यांची माहिती एकापाठोपाठ एक न देता २-३ दिवसांच्या जवळच्या डोंगरांचा समुच्चय करून एक डोंगरयात्रा बनवली आहे. या पुस्तकाचे अजून एक ठळक वैशिष्ट्य असे की सगळ्या यात्रांसाठी दिलेले नकाशे! हे नकाशे अतिशय उपयोगी आहेत. यात दिशांचे भान तर येतेच पण जवळपासचे डोंगर कुठले आहेत याचाही अंदाज बांधता येतो. याचबरोबर जवळपासची गावे, वाड्या, मंदिरे, रस्ते, रेल्वेमार्ग इथे व्यवस्थित दिले असल्याने ट्रेकची आखणी करणे खूप सोपे होते.
नकाशांबरोबरच डोंगरयात्रांचे विस्ताराने वर्णनही केले आहे. गडांवर जायची वाट, मध्ये लागणार्या ठळक खुणा, मध्ये पाण्याची सोय होण्याची संभाव्य ठिकाणे, माथ्यावरून दिसणार्या गोष्टी, बघायची स्थळे, राहण्याची सोय, सरपणाची उपलब्धता इत्यादी एखाद्या डोंगरयात्रेच्या सगळ्या महत्त्वाच्या अंगांची माहिती पुस्तक प्रत्येक डोंगरयात्रेसाठी देते. शिवाय पुस्तकाची व्याप्ती फक्त शिवाजी महाराजांचे गड, किल्ले इतकीच राहत नाही. सह्याद्रीमधील अनेक डोंगर, लेण्या वगैरे यात आहेत. शिवाय केवळ महाराष्ट्रापुरते सीमित न राहता गुजरात, गोवा आणि काही कर्नाटकातील डोंगरांचाही यात समावेश आहे.
याचबरोबर मला ह्या पुस्तकातील अजून एक गोष्ट भावते, ती म्हणजे निसर्गाची काळजी घेण्याबद्दल दिलेले संदेश. 'गडावर पाऊलखुणा सोडून काहीही ठेवू नका आणि आठवणी सोडून गडावरून काही नेऊ नका', असा सुंदर संदेश हे पुस्तक आपल्या मलपृष्टावरही देतं. शिवाय केवळ इथेच न थांबता सह्याद्रीतील विविध वृक्ष, प्राणी, पक्षी यांची थोडक्यात परंतु उपयुक्त माहिती पुस्तकात आहे, ज्यामुळे आपली यात्रा केवळा आनंददायीच नव्हे तर डोळसही होते.
डोंगरयात्रा करू इच्छिणार्या, करण्यास सुरूवात केलेल्या आणि अशा यात्रांमध्ये वर्षानुवर्षे रममाण असणार्या अशा सार्या यात्रेकरूंचे 'डोंगरयात्रा' हे गीता-बायबल-कुराण ठरावे. प्रत्येकाने आपल्या संग्रही बाळगावेच असे हे पुस्तक तुम्ही दिवाळीत खरेदी कराल आणि येत्या थंडीत डोंगरयात्रांत रंग भराल, अशी अपेक्षा बाळगतो आणि सगळ्यांना दिवाळीच्या भरपूर शुभेच्छा देतो.
अनुक्रमणिका
अनुभव
- ग्रंथालयात भटकंती - जाँ-पॉल सार्त्र
- वैज्ञानिक व पुस्तकांचे जग!
- 'साभार परती'चा शिक्का
- बौद्धांचे आणि जैनांचे संस्कृत साहित्यातले योगदान - एक आढावा
- सांगावेसे वाटले म्हणून.....
- डाऊन द मेमरी लेन
- कृतज्ञ!
- पुनर्वाचनाय च

प्रतिक्रियां
ऋषिकेश, तुलाही दिवाळीच्या
ऋषिकेश, तुलाही दिवाळीच्या अनेकानेक शुभेच्छा
पुस्तक परिचय आवडला.