||दिवाळी २०१०||

डॅन ब्राऊन : स्वप्न आणि कॉन्स्पिरसीजचा सौदागर !!!
छोटा डॉन

"Science and religion are not at odds. Science is simply too young to understand the god."
"Faith - Acceptance of which we imagine to be true, that which we cannot prove."
"Everything is possible. The impossible just takes longer."
"To live in the world without becoming aware of the meaning of the world is like wandering about in a great library without touching the books."
"The only difference between you and God is that you have forgotten you are divine"
"Telling someone about what a symbol means is like telling someone how music should make them feel."

अशी आणि ह्यासारखी अनेक थरारक, रोचक किंवा चमत्कारिक वाक्ये आणि संवाद आपल्या कादंबर्‍यांत चपखलपणे पेरुन अल्पावधीतच लोकप्रियतेचा उच्चांक गाठणार्‍या, एका कल्पक आणि तरुण किंवा विज्ञाननिष्ठांच्या अभिरुचीची नस अचूकपणे पकडून अनेक उत्तमोत्तम कादंबर देणार्‍या डॅन ब्राऊनचा इथे थोडक्यात परिचय करुन देण्याचा माझा उद्देश आहे. "Everyone loves a conspiracy" हे सत्य ओळखून धर्म, विज्ञान, तंत्रज्ञान, इतिहास, कला, इतिहासात जगलेल्या संस्कृती, राजकीय परिस्थिती, संशोधन आणि गुप्तचर संघटना ह्यांची बेमालूम सरमिसळ असणार्‍या डॅनच्या कादंबर्‍या सध्या तरुणाई आणि चोखंदळ वाचकांच्या गळ्यातल्या ताईत आहेत. ह्याच्या कादंबरीवर आधारित असणारे चित्रपटही करोडोंचा गल्ला गोळा करत आहेत. निर्विवादपणे डॅन ब्राऊन आजच्या घडीचा एक 'बेस्ट सेलर' लेखक आहे.

२२ जून १९६४ रोजी अमेरिकेतल्या न्यू हॅम्पशायर राज्यात एका गणिताच्या शिक्षकाच्या घरी डॅनचा जन्म झाला. घरचे वातावरण हे गणित आणि संगीतप्रधान असल्याने डॅनचे व्यक्तिमत्वही त्याच अनुषंगाने विकसित झाले. पण डॅनचा ओढा लहानपणापासूनच इतिहासातली रहस्ये, कोडी, कूटप्रश्न, चिन्ह, नकाशे आणि त्यांचा अर्थ ह्यासारख्या गोष्टींकडेच होता आणि ह्याच गोष्टी आज त्याच्या कादंबर्‍यांत भरभरुन आढळतात. अमेरिकेतल्या प्राथमिक शिक्षणानंतर त्याने स्पेनमधून इतिहास ह्या विषयात पदवी घेतली आणि इथेच त्याच्यातल्या कादंबरीकार घडत गेला. घरच्या पार्श्वभूमीमुळे प्रथम काही काळ त्याने संगीतक्षेत्रात पियानोवादक आणि काव्यरचनाकार तसेच गायक म्हणून हात-पाय मारुन पाहिले; पण १९९३च्या आसपास सिडने शेल्डनच्या जगप्रसिद्ध 'डूम्स-डे कॉन्स्पिरसी' ह्या पुस्तकाच्या वाचनानंतर त्याला एक नवी दिशा सापडली व महान विज्ञानकथालेखक डॅन ब्राऊनचा जणू पुनर्जन्मच झाला. त्यानंतर त्याने आपला पूर्ण वेळ संबंधित विषयांचा अभ्यास आणि संशोधन यात समर्पित करुन, त्याआधारे नंतर एकाहून एक सरस अशा ५ कादंबर्‍या रसिकांसमोर सादर केल्या.

१९९८ साली आलेली त्याची पहिलीच कादंबरी 'डिजिटल फोर्ट्रेस' ही अत्यंत खळबळजनक विषयावर आधारित होती. आजच्या माहिती तंत्रज्ञानाच्या जगात आपण रोजच्या आयुष्यात संवादासाठी अनेक इलेक्ट्रॉनिक उपकरणे वापरत असतो व अक्षरशः अवाढव्य असणारा हा डेटा लाखो मैल लांबीच्या ऑप्टिकल फायबर्समधून अव्याहत प्रवास करत असतो. अमेरिकेच्या 'नॅशनल सिक्युरिटी एजन्सी' ह्या संस्थेचे काम म्हणजे ह्या माहितीजालात घुसून तिथले सुरक्षा-कोड्स तोडून ह्या विदावर नजर ठेवणे व देशाच्या सुरक्षेच्या दृष्टीने संशयास्पद अशा संवाद अगर हालचालींचा माग काढून संबंधितांवर योग्य ती कारवाई करणे. ह्यासाठी ह्या संस्थेकडे अत्यंत ताकदवान अशी 'कोड ब्रेकिंग यंत्रणा' (ट्रान्सलेटर) असते. एक दिवस ह्या यंत्रणेला अशा एक कोडला सामोरे जावे लागते की तो तोडून त्यातली माहिती जाणून घेण्यास, हे ताकदवान मशीन सपशेल अपयशी ठरते व एका कधीही न संपणार्‍या कोड्सच्या वर्तुळात अडकून बसते. त्या कोडच्या माहितीची 'अत्यंत संशयास्पद' अशी वर्गवारी झालेली असते व तो कोड तोडणारी मशीनही आता त्या कोडमुळे एका चक्रात अडकून गेली असते. ह्या आणीबाणीच्या परिस्थितीतून मार्ग काढण्यासाठी ह्या कादंबरीची नायिका असलेल्या सुझान फ्लेचरला - जी एक वरिष्ठ तंत्रज्ञ असते - आमंत्रित केले जाते. तसेच ही एजन्सी आपल्या हस्तकांच्या मार्फत हा कोड डिझाईन करणार्‍या एका प्रोग्रॅमरचा पाठलाग करत असते. नंतर उच्चपदस्थांचा हस्पक्षेप, राजकारणाचे अनेक कुटील डावपेच, प्रतिस्पर्धी संघटनांचा हस्पक्षेप, धक्कादायक आणि जीवन-मरणाचा खेळ दाखवणार्‍या रक्तरंजित घटनांच्या आधारे ही कादंबरी पुढे सरकत राहते. सर्वांना डोकेदुखी ठरलेला तो कोड म्हणजे साक्षात त्या एजन्सीच्या सुरक्षायंत्रणेवर केलेला हल्ला असतो. त्या कोडमुळे सुरक्षा कमजोर होऊन त्यातला अमूल्य असा, सुरक्षित ठेवला गेलेला विदा धोकादायक व्यक्तींच्या हातात पडून अवघ्या देशावर संकट येण्याची परिस्थिती निर्माण होते. ह्यातून नायिका स्वतःला, स्वतःच्या आप्तांना, आपल्या यंत्रणेला आणि आपल्या देशाला कसे वाचवते ह्याचा प्रवास म्हणजे डिजिटल फोर्ट्रेस.

त्यानंतर सन २००० मध्ये आली ती अप्रतिम अशी 'एंजल्स अँड डेमन्स'. धर्म आणि विज्ञान व त्यांच्यातले परस्परसंबंध ह्यावर अत्यंत अधिकारवाणीने भाष्य करणारी व इतिहासातल्या अनेक सत्यघटनांची तसेच स्थळांची त्यांच्याशी संबंधित कॉन्स्पिरसीजशी मोट बांधणारी अत्यंत थरारक अशी ही 'एंजल्स अँड डेमन्स'.

सर्न (European Organization for Nuclear Research) नावाच्या जिनिव्हामधल्या संस्थेमध्ये 'हे विश्व देवाने बनवले आहे, मर्त्य मानवाला शून्यापासून नवीन काही (Creation of Something from Nothing) बनवणे शक्य नाही ', ह्या संकल्पनेला तडा देणारे अँटीमॅटर तयार करण्यात येते; ही मानवाची नवीच झेप. ज्या देवाने घडवलेल्या 'बिग बँग' प्रक्रियेतून विश्व निर्माण झाले, त्यावेळी तयार झालेल्या अँटीमॅटरचे यशस्वी उत्पादन मानव पुन्हा करतो हीच महत्त्वाची घटना. मात्र हा अँटीमॅटर अत्यंत किंमती, अत्यंत जोखमीचा व अत्यंत स्फोटक अशी त्याची ख्याती. ह्या घटनेनंतरच काही तासांमध्ये ह्या कडेकोट सुरक्षा असलेल्या प्रयोगशाळेतून बहुमूल्य आणि धोकादायक असे अँटीमॅटर, त्याच्या संरक्षक कॅनिस्टरसह चोरीस जाते. ह्याच वेळी व्हॅटिकन सिटीमध्ये सध्याच्या 'पोप'च्या निधनानंतर सर्व प्रथा पाळून पुढील धर्मसत्ता सांभाळणार्‍या एका नव्या पोपची निवड करणार्‍या 'कॉन्क्लेव्ह' ह्या कार्यक्रमाची आखणी चालू असते व ख्रिश्चन धर्मातल्या जवळपास सर्व महत्त्वाच्या व्यक्ती व्हॅटिकनमध्ये हजर असतात. अशा वेळी इतिहासात चर्चशी बंडखोर म्हणून प्रसिद्ध असलेली 'इल्युमिनाटी' नावाची शास्त्रज्ञांची संस्था पुढे येते व त्या चोरलेल्या ऍन्टीमॅटरचा व्हॅटिकनमध्ये स्फोट करुन आत्तापर्यंत धर्माने विज्ञानावर केलेल्या अन्यायाचा बदला घेण्याचे जाहीर करते.

ह्या संकटातून मार्ग काढण्यासाठी इतिहास, इल्युमिनाटी, गूढ संस्था, चिन्हे, नकाशे ह्यातला तज्ञ मानल्या जाणार्‍या प्रा. रॉबर्ट लॅंग्डन ह्यांना आमंत्रित करण्यात येते व त्यानंतर सुरू होतो एक जबरदस्त खेळ. धर्म आणि विज्ञानाच्या एकमेकांवर मात करण्याच्या खेळात रहस्यांची उकल होऊ लागते.  शौर्य आणि क्रौर्य , धर्म व धर्मातील रुढींवरील विश्वास आणि विज्ञान , धोकेबाजपणा आणि पराकोटीची स्वामिनिष्ठा, सत्तापदांचा मोह आणि निरिच्छपणे केलेली सेवा, कमालीची गुप्तता आणि त्यांची उकल ह्या सर्वांचे सुंदर मिश्रण असणारी ही एक नितांतसुंदर कादंबरी म्हणजे 'एंजल्स अँड डेमन्स'. धर्म आणि विज्ञान वेगळे नाहीत पण धर्माला समजून घ्यायला विज्ञानाला अजून बरीच मोठी मजल मारायची आहे, ह्यावर भाष्य करणारी ही कादंबरी एका भव्यदिव्य मंचावर घडणारे एक महाकाव्य पाहिल्याचा आनंद देते.

त्यानंतर २००१ मध्ये प्रसिद्ध झालेली त्याची तिसरी कादंबरी 'डिसेप्शन पॉइंट' सरकार आणि सरकारी संशोधनसंस्थांकडून सामान्य माणसाच्या डोळ्यात सर्रास केली जाणारी धूळफेक, ह्यावर भाष्य करते. मानवाला नेहमीच वाटत असणारे परजीवसृष्टी किंवा एलियन्सचे आकर्षण हा मध्यवर्ती विषय ठरवून ही कादंबरी रचली गेलेली आहे.

जगात नावाजलेली 'नासा' ही संस्था, अमेरिकन सरकार, परकीय उपग्रह आणि इतर गोष्टींवर हेरगिरी करणारी संघटना 'एन. आर. ओ.' ह्यांच्या अत्यंत विश्वासघातकी दाव्यांचा व त्यांची सारवासारव करण्यासाठी रचलेल्या एका नाट्याचा परामर्ष घेणारी ही कादंबरी.
नासाला आर्क्टिक बर्फाळ प्रदेशात एक अशनी (मीडिओराईट वा परकीय जीवसृष्टीवरील जीवाश्म असलेला एक दगडाचा मोठा तुकडा) सापडतो व त्यानंतर अत्यंत धक्कादायक घटना घडू लागतात. ह्या प्रकल्पावर काम करणारे एकेक वैज्ञानिक घातकी हल्ल्यांना बळी पडू लागतात. एन.आर.ओ. संस्थेला ह्या घटनेवर लक्ष ठेवण्याची जबाबदारी मिळते व त्यानंतर पुन्हा रक्तरंजित हल्ले, डावपेच वगैरे घडू लागतात. ह्या घटनांचे पडसाद देशात चालू असलेल्या अध्यक्षीय निवडणुकीत पडतात व अख्ख्या देशाचे लक्ष ह्याकडे लागते. एन. आर. ओ. ह्या संस्थेमार्फत आलेली नायिका 'रेचल सॅक्स्टन' ह्यातून कसा मार्ग काढते व देशासमोर सत्य कसे आणते, ह्याचा प्रवास म्हणजे हे डिसेप्शन पॉइंट!

त्यानंतर आलेली त्याची जगप्रसिद्ध कादंबरी म्हणजे 'दा विंची कोड'. ह्या कादंबरीने व त्यावर निघालेल्या चित्रपटाने लोकप्रियतेचा उच्चांक गाठला व आजही ही कादंबरी रसिकांच्या मनावर राज्य करते आहे. जगातली एक लोकप्रिय कॉन्स्पिरसी असलेली 'होली ग्रेल : येशू ख्रिस्ताचा वंशवेल (येशूची बहुचर्चित आणि विवादास्पद पत्नी मेरी मॅग्डलीन आणि तिचा वंश)' ह्यांचा शोध, ह्या संकल्पनेवर आधारित असलेली ही कादंबरी अनेक सत्यघटना आणि व्यक्तींच्या आधारे पुढे सरकत राहते व त्या रहस्याचा शोध घेण्याचा प्रयत्न करते. ह्या कादंबरीचा नायक आहे तो जुनी संस्कृती, चिन्हे, नकाशे ह्यांच्यातला तज्ञ असलेला प्रा. रॉबर्ट लँग्डन.  होली ग्रेलचा नकाशा असलले क्रिप्टेक्स (संकेताक्षराने सुरक्षित केलेली बंद नळकांडी ), 'प्रायरी ऑफ सायन' ही येशुच्या वंशाची रक्षण करणारी गूढ आणि गुप्त संघटना, 'ओपस डेई' नावाची व्हॅटिकन चर्चशी एकनिष्ठ असलेली संघटना, व्हॅटिकनचे उच्चपदस्थ, नाईट्स टेम्पलर ही ख्रिश्चन इतिहासातील एक शक्तिशाली संघटना, 'रोझ लाईन' नावाची एक गूढ संरचना आणि प्रायरीशी संबंधित असल्याचा दावा असणार्‍या लिओनार्डो दी विंची, न्यूटन, पोप अलेक्झांडर अशा अनेक इतिहासातल्या नावाजलेल्या नावांशी संबंधित आणि त्यांनी रचलेल्या शिल्पांवरुन होली ग्रेलचा मार्ग शोधण्याचा प्रवास म्हणजे हे , दा विंची कोड! डॅन ब्राऊनच्या लेखणीतून आलेले हे सर्वोत्तम लिखाण.
वाचताना रसिकाला हरवून टाकण्याचे आणि हलवून सोडण्याचे सामर्थ्य असलेली ही एक थरारक कादंबरी - दा विंची कोड !

'दा विंची कोड'च्या अपूर्व यशानंतर डॅनने रसिकांना २००९साली 'दी लॉस्ट सिंबॉल' नावाची एक अजून उत्तम आणि ताकदवान भेट दिली. काहीशी किचकट तसेच समजायला कठीण असणारी ही कादंबरी 'नोऍटिक सायन्स' नावाच्या नव्या विषयावर भाष्य करते. आपण करत असलेले ध्यान, योग्य प्रार्थना आणि इतर धार्मिक प्रक्रियांतून निर्माण होणार्‍या ऊर्जेचा अभ्यास असा दणदणीत विषय असलेले नोऍटिक सायन्स आजच्या युगात सर्वांच्याच आकर्षणाचे स्थान बनलेले आहे. डॅनने हाच विषय जरा सोप्या पद्धतीने मांडण्याचा प्रयत्न केला आहे. इथे तो मदत घेतो ती इतिहासातल्या सर्वात गूढ आणि ताकदवान असलेल्या ख्रिश्चॅनिटीतल्या 'फ्री मेसनरी' ह्या संस्थेची. तिच्याच अनुषंगाने संपूर्ण कथा रचली आहे. डॅनचा नेहमीचा आवडता नायक प्रा. रॉबर्ट लँग्डन ह्या वेळेसही प्रमुख भूमिकेत आहे.

ही कथा घडते अमेरिकेतल्या वॉशिंग्टन डीसीमध्ये आणि तिचा आधार आहे ती 'फ्री मेसनरी'ने डीसीमध्ये रचलेली अनेक शिल्पे व त्यांच्यातून तयार होणारा 'एक ताकदवान आणि अंतिम सत्य' असलेल्या खजिन्याचा शोध. ह्यात पुन्हा धक्कादायकरीत्या 'सी. आय. ए.'च्या रुपाने सरकारी हस्तक्षेप होऊन कथा अधिकच गूढ होत जाते व ह्यातले रहस्य हे देशाच्या सुरक्षेच्या दृष्टीने महत्त्वाचे असल्याने सर्वच संस्था ह्याच्या मागे हात धुवून लागतात. फ्री मेसनरी हे रहस्य सुरक्षित ठेवण्यासाठी सर्व पातळीवरुन प्रयत्न करतच असते व त्यातून सुरु होतो तो एका अनिश्चिततेचा हादरवून सोडणारा खेळ.

ह्या पुस्तकाचे बलस्थान म्हणजे अनेक धक्कादायक संकल्पनांचा उदय आणि त्यावर भाष्य. घटना आपल्या रोजच्या जीवनातल्याच पण त्याची दुसरी बाजू अशीही असू शकते, हे वाचकांसमोर येण्याची बाब काही औरच. जरुर वाचावी अशी जी  'दी लॉस्ट सिंबॉल' - अंतिम सत्याचा शोध!

डॅन ब्राऊनच्या लिखाणाचे बलस्थान म्हणजे त्याचे लिखाण नेहमी हे रोजच्या आयुष्यातल्या किंवा इतिहासातल्या नावाजलेल्या घटना, पात्रे, व्यक्ती, संस्था, शिल्पे ह्यांच्या आधारेच गुंफलेले असते. अनेक ऐकीव घटनांचा आणि रहस्यांचा ह्यात अत्यंत प्रभावी वापर केलेला असतो. ह्या कादंबर्‍यांचे नायक हे आपापल्या क्षेत्रातले अत्यंत प्रभावी आणि हुशार असे अधिकारी लोक असतात. प्रत्येक घटनेमागे अनेक कंगोरे असल्याने त्यात अनेकविध संस्थांचा व सरकारी पातळीवरचा हस्तक्षेप होतो. वाचकांना भावणारी गोष्ट म्हणजे ह्यात उलगडा होत असलेल्या नेहमीच्या शिल्पांचा किंवा घटनांचा दुसरा अर्थ समजतो. उदाहरणच सांगायचे म्हटले, तर 'दा विंची कोड'मध्ये डॅन विंचीच्या 'दी लास्ट सपर' ह्या चित्राचा अशा खुबीने वापर करतो की आपल्याला तोंडात बोट घालण्याशिवाय दुसरा पर्याय नसतो.

सामान्य माणसाला जे अशक्य, अप्राप्य, अवघड, अतर्क्य असे आहे तेच सर्व डॅन सोप्या भाषेत व नेहमीच्या उपलब्ध घटना, वस्तू अगर व्यक्तींचा संदर्भ घेऊन सोपे करुन सांगतो. सोबत 'Everyone loves a conspiracy' हे सत्य ओळखणारा डॅन नेहमीच ह्याचा खुबीने वापर करतो व रसिकांच्या मनावर राज्य करतो.

असा आहे हा आमचा स्वप्न आणि कॉन्स्पिरसीजचा सौदागर, डॅन ब्राऊन!

अनुक्रमणिका

अनुभव

कवितासंग्रहाचे परिचय

लेखकांचे परिचय

मुलाखत

पुस्तक परिचय

प्रतिक्रियां

डॅन ब्राऊन : स्वप्न आणि कॉन्स्पिरसीजचा सौदागर !!!

डॅन ब्राऊन : स्वप्न आणि कॉन्स्पिरसीजचा सौदागर !!! खरयं अगदी. त्यांनी लिहिलेली सर्व पुस्तके वाचली आहेत. अतिशय अफलातून आणि शेवटपर्यंत खिळवून ठेवणारी अशी ही पुस्तके व लिखाण हे त्यांचे कौशल्यच आहे.

अतिशय मस्त ओळख. Smile

सुरेख परिचय..

'दा विन्सी कोड' वाचले आहे. आता डॅन ब्राऊनच्या इतर कादंबर्‍या वाचण्याची उत्सुकता लागून राहिली आहे.
धन्यवाद,चोता दोन.

सुरेख ....

डिसेप्शन पॉईंट आणि लॉस्ट सिंबल अजून वाचायच्याहेत. आतां त्या औत्सुक्याला नव्यानें चालना मिळाली. धन्यवाद.

धर्म, विज्ञान, तंत्रज्ञान, इतिहास, कला, इतिहासात जगलेल्या संस्कृती, राजकीय परिस्थिती, संशोधन आणि गुप्तचर संघटना ह्यांची बेमालूम सरमिसळ

हें अगदीं पटलें. एंजल्स अँड डेमन्स मध्यें तर व्हॅटिकनचा नकाशा आणि नकाशांत किल्ल्यातील भुयार पण दाखवलें आहे.

सुधीर कांदळकर

सुधीर कांदळकर

प्रतिसाद द्या

प्रतिक्रिया प्रकाशित करण्यासाठी येण्याची नोंद करा अथवा सदस्य व्हा.