• '

ज्वाला आणि फुले : एक जळजळीत काव्यसंग्रह

सागर
मंगळवार, 8 November, 2011 - 14:21
 

मुखपृष्ठ

 
 

पुस्तक

 

मित्रांनो,

३ दिवसांपूर्वीची गोष्ट आहे. माझ्या एका मित्राला मी बंगळूरात भेटलो होतो. आम्ही दोघे पुस्तकवेडे तेव्हा आमच्या दोघांच्या चर्चेत पुस्तकांचा विषय नसता तर नवलच होते.

माझा हा मित्र प्रचंड काव्यप्रेमी. त्याने विचारले तू बाबा आमटेंचे ज्वाला आणि फुले वाचले असशीलच. मी म्हणालो - नाही Sad
त्यावर त्याला आश्चर्याचा धक्का बसलाच. कारण माझे पुस्तकप्रेम आणि कविताप्रेम दोन्ही त्याला माहिती होते. तेव्हा त्याने त्या कवितासंग्रहातील एक कविता (जी त्याला मुखोद्गत होती) ती म्हणून दाखवली. त्यातील सोप्या आणि हृदयाला स्पर्श करणार्‍या अकृत्रिम शब्दांतून जो भाव प्रकट होत होता ते पाहून मलाच आश्चर्य वाटले. एवढी सुंदर कविता असलेला काव्यसंग्रह किती सुंदर असेल?

तो पुढच्या वेळी बंगळूरात येईल तेव्हा हे पुस्तक माझ्यासाठी घेऊन येणार आहे.
आमची चर्चा संपली. तो त्याच्या मार्गाने गेला मी घरी आलो तरीसुद्धा मला राहवले नाही.
गेले २ दिवस मायाजालावर हे पुस्तक वा त्यातील कविता शोधण्याचा प्रयत्न केला. त्यातून ३ कविता सापडल्या. पण त्यातील एका कवितेने मला एवढे हादरवून सोडले की अशा दर्ज्याच्या कविता असलेला हा अत्भुत कवितासंग्रह प्रत्येक कविताप्रेमीकडे असावा - किमान या अप्रतिम कवितासंग्रहाची माहिती व्हावी - या हेतूने हे लेखन करतो आहे.

तर बाबा आमटे यांची "ज्वाला आणि फुले" संग्रहातील पुढील कविताच बोलकी आहे तेव्हा माझे शब्द इथे आवरते घेतो व कविता देतो.

======================
कवितेचे नाव : श्रम - सरितेच्या तीरावर
======================
वाल्मिकीच्या करुणेच्या काठाने वाटचाल करीत
निर्वेदाचे टोक गाठले.
कालिदासाने गिरिशिखरांवर वाकलेली शृंगार - मेघांची दाटी पाहिली
भूपालांच्या विजयवाहिनीसह युद्धघोष करीत
वीररसांच्या भाटांचे बेभान तांडेही निघाले
भाबड्या भक्तीचे पानमळेही अमाप फुलले
पण श्रम - सरितेच्या तीरावर आपल्या गीतांचे कलश भरण्यासाठी
कोणीच कसे आले नाही?
सांदीपनीच्या आश्रमात सुगंधाचे अद्भुत फुललेले ज्याने पाहिले
त्याला स्वेद - रसाची पुसट जाण असल्याची नोंद मात्र आहे.

निळ्या नदीच्या किनार्‍यावरील वाळूच्या अफाट सपाटीवर
पाषाणांचे उत्तुंग त्रिकोन उभारता उभारता
लक्षावधी छात्या रक्तबंबाळ झाल्या
मरणासाठी बादशाही बिळे बांधता बांधता
असंख्य जीवनांचा अंत झाला
ज्यांनी चिरे मस्तकावर वाहिले
ते चिर्‍यांच्या फटीफटीतून निःशब्द चिनले गेले
पण मृत्यूच्या वस्तीतही आपल्या वासनांची लक्तरे वाहून नेणारे
त्या बिळात अजून कायम आहेत!

चौदा प्रेमांचा चोथा करणार्‍या समआटाचे तकलूपी अश्रू
ज्यांनी पत्^थरांतून चिरंतन केले
त्यांच्या आटलेल्या रक्ताची दखल
दरबारी भाटांनी घेतल्याचे ऐकिवात नाही!
बिगारीत बांधलेले मनोरे छातीवर जे घेऊन कोसळले
त्यांचे मृत्यू लेख अजून इतिहासाने वाचलेले नाहीत!
कलेचे वस्त्र बिनदिक्कत फेडणार्‍या
आणि प्रतिभेच्या हाटात रसांचा घाऊक सौदा करणार्‍या
भूपालांचा आणि सुलतानांचा काळ संपला!
आणि जिची वाट पाहिली जात होती ती पहाट
आज उंबरठ्यावर आहे
श्रमपालांच्या युगांतील स्वेद - रसांच्या साधनेसाठी
प्रज्ञेच्या पुत्रांनी आता सज्ज व्हावे!

संथ नाजुक पावलासह हिंदकळणारे
रसांचे टंच घट उत्तररात्रीच वाहून झाले
आता हवी आहे
मस्तकावर पाट्या वाहणार्‍या स्वेदगंधेcया डगमगत्या चालीची
धुळीत लिहिलेली कविता
स्वेद - रसाने न्हालेल्या ओलेतीचे
माथा झुकवणारे चित्र आणि मन उंचावाणारे शिल्प आता हवे आहे
भूमिकन्यांचे वार्‍याचा वेग पिऊन धावणारे गाणे
त्याला शब्द देणारा कालिदास आता हवा आहे

भुईचे हिरवे हास्य फुलविण्यासाठी
नांगराच्या फाळांनी तिला कुरवाळणारा
स्वर्गातल्या अश्रूंची कोसळणारी झड
भरलेल्या डोळ्यांनी पाहणारा
असे संपन्^न जीवन बेहोषपणे जगणारा तो हलधर
त्याच्या मस्तीची स्तोत्रे गाणारे वाल्मिकी आता हवे आहेत!
आणि तो नौकेवरून आशेचे जाळे फेकणारे कोळी
समुद्राचे उसासे त्याला अजाणताच जाणवतात
त्या ओळखीला तारांची थरथर देणारे तानसेन आता हवे आहेत

भूमीच्या गर्भातून काळे सोने वर काढणारे श्रम - पुत्र
त्यांच्या सर्वांगावर काळीच झळाळी उधळलेली
भूगर्भातल्या गर्मीने भाजलेले
आणि ओझे वाहून मोडण्याच्या सीमेपर्यंत वाकलेले
त्यांच्या कण्यांचे मणके
त्यांना ताठ करण्यासाठी प्रतिभेच्या पुत्रांनी आता सज्ज व्हावे
षोडशींच्या शरीरावरील रेशमी वस्त्रांची सळ्सळणारी वळणे पाहून
आता फक्त चांदण्यांचा चावटपणा त्यांना आठवू नये
अथवा उकळत्या पाण्यात शिजणार्‍या
कोषातील किड्यांची प्रेते आठवून
केवळ त्यांची अहिंसा व्याकूळ होऊ नये
तर आसामच्या अरण्यातील ते अर्धनग्न मजूर आठवून
त्यांच्या रक्तात उकळीही उठावी!
आणि मुलास अफू पाजून कोश गोळा करण्यास निघणार्‍या
मजुरणींचे आटलेले डोळे आठवून
त्या ज्वालारंगी वस्त्रांनी त्यांचेही डोळे जळावे
काश्मिरी कलाबतूंचे गालिचे पाहून
काश्मिरी माणसाच्या देहावरील
ठिगळांची कलाकुसरही त्यांना आठवावी
आणि मग त्यांच्यासाठी गालिच्याची ती मखमल कातेरी व्हावी!

खपणार्‍यांच्या तपोभूमीवर
श्रम - रसाचे सुगंधी गुत्ते
झिंगलेल्यांनी आता गजबजून जावेत
त्याची चटक लागली तर
जगणे हरवून बसलेली कलेवरेही तेथे गर्दी करतील
प्रज्ञेच्या पुत्रांनी तेथे स्वप्नांना अर्थ शब्द द्यावेत
श्रमाचे पुत्र त्या शब्दांना अर्थ देतील
स्वेद - रसाच्या मद्यशालेत त्या स्वप्नांना आकार येईल
स्वेद - रसाची ही मद्यशाला अल्पावधीत आटून जाईल
अथवा खपणार्‍यांच्या तपोभूमीवर
स्वप्नेच बंदिस्त होतील
म्हणून असे बिचकू नका
कारण, जीवनाचे मेघ नेहमीच तुडुंब असतात
आणि प्रज्ञा - पुत्रांच्या स्वप्नांनी बंदिस्तपणा स्वीकारल्याचा
इतिहास नाही!

[ज्वाला आणि फुले या काव्यसंग्रहातून]
=========================

कोठे मिळत असेल तर हा काव्यसंग्रह मी विकत घेणारच आहे. तुम्ही?

सुरेख परिचय

अतिशय उत्तम कविता दिली आहेस मित्रा.
ज्वाला आणि फुले नाव बरेच ऐकले होते. कविता बिलकुल वाचत नसल्यामुळे पुस्तक घेईन का नाही ते सांगता येत नाही. पण तू दिलेली कविता फारच आवडली.

केवळ एक काव्यपुष्प

वल्ली मित्रा,

हे केवळ एक काव्यपुष्प आहे. सगळा संग्रह अशाच भरदार काव्यांनी भरलेला आहे.

कविताप्रेमींना हा काव्यसंग्रह एक पर्वणीच आहे हे नक्की.

दुर्दैवाने हा काव्यसंग्रह उपलब्ध नाहिये. पुनर्मुद्रण झाले तर अवश्य घेणार आहे.

बाकी 'ज्वाला आणि फुले' वाचलेल्या पुस्तकविश्वच्या सदस्यांचे अनुभव वाचायला आवडतील.
पुढे त्या अनुषंगाने याच धाग्यावर या काव्यसंग्रहातील इतर कविता वाचायला मिळाव्यात ही अपेक्षा

मी एक पुस्तकवेडा
http://pustakveda.blogspot.com/

बापरे!

बापरे.. आशय गहिरा वगैरे असला तरी मला शब्दबंबाळ वाटली कविता..
असो. संग्रह वाचुन सांग कश्या वाटल्या कविता ते!

-ऋ
----------------------
"चला, मी माझा एकमेव जुनाट कोट घालून एक नवं पुस्तक घेऊन येतो"

मी असे मत नाही देऊ शकणार ऋ

वाचून झाल्यावर नक्की मत देईन Smile

वाचण्याआधीच एखाद्या कवितासंग्रहाला शब्दबंबाळ ठरवणे अन्यायकारक वाटते मला Wink

मी एक पुस्तकवेडा
http://pustakveda.blogspot.com/