||दिवाळी २०१०||

जोगिया
विकास

महाराष्ट्रात गजानन दिगंबर माडगूळकर नावाचे एक बहुढंगी व्यक्तिमत्व होऊन गेले यालादेखील आता तीसहून अधिक वर्षे झाली आणि तरीदेखील त्यांची गाणी त्यांच्या पश्चात जन्माला आलेल्या पिढ्यांनादेखील आवडतच राहिली आहेत. गदिमांचे कवी म्हणून नाव अर्थातच जास्त लक्षात असते, ते गीतरामायणामुळे आणि सुधीर फडक्यांचे संगीत, आवाज तसेच बहुतांशी वेळेस आशा भोसल्यांचा आवाज यांनी श्रवणीय झालेल्या अनेक चित्रपटगीतांमुळे. मात्र गदिमांच्या स्वरबद्ध नसलेल्या पण अर्थपूर्ण कवितांचे जोगिया आणि पूरिया हेदेखील असे काव्यसंग्रह आहेत की ज्यांतील कविता वाचताना कधी समाजातील वास्तवता, कधी इतिहास, कधी मानवी मन तर कधी निव्वळ त्या मनातील भावनांचे दर्शन घडते; नुसते घडत नाही तर आपल्याही नकळत आपल्याला विचार करायला लावते. अनेक वर्षांपूर्वी वाचलेल्या काव्यसंग्रहातील अनेक कविता आजही आठवतात. काय गंमत आहे; व्रतस्थ काव्यनिर्मिती समजत गदिमांनी त्या संग्रहाला जे नाव दिले, त्याच नावाने असलेली जोगिया ही पहिलीच कविता एका समाजातील उपेक्षित आयुष्य वाटेला आलेल्या एका वेश्येच्या जीवनावरची आहे.

’कोन्यात झोपली सतार सरला रंग, पसरली पैंजणे सैल टाकुनी अंग’ इथपासून त्या शयनगृहाचे वर्णन करत करत माडगूळकर अचानक तिच्या अंत़:करणात जातात. तिच्यावर भाळलेल्या एका नवख्या तरूणाचे ’बोलला हळू तो दबकत नवख्यावाणी, मम प्रीती आहे जडली तुजवर राणी’ हे बोल ती समजूच शकत नाही. जिथे सगळाच बाजार मांडला आहे, तेथे त्या कुंपणाच्या बाहेर विचार करू न शकणारीला केवळ ’दाम वाढवा थोडा’ इतकेच म्हणावेसे वाटले. अर्थात याचा व्हायचा तोच परिणाम झाला. तो प्रेमात पडलेला युवक निघून जातो आणि राहते ती फक्त हुरहुरीने भरलेली कायमची दु:खद आठवण. कधी कधी दु:खद आठवणी काढल्यानेही कुठेतरी मन मोकळे होते तसेच ’ही तिथी पाळिते व्रतस्थ राहुनि अंगे, वर्षात एकदा असा जोगिया रंगे’ असे म्हणत वास्तवास मानते.

माडगूळकर स्वतः नास्तिकतेत बसणारे नसावेत, पण त्या काळाच्या मानाने पुरोगामी विचार नक्की करत असावेत. म्हणूनच आपण देव कुणाला मानतो आणि कशाचे पूजास्थान करतो, याचा विचार करत असतानाच की काय, त्यांच्या डोक्यात ’पूजास्थान’ नावाची कविता तयार झाली असावी. ’त्या बकाल शहरी सकाळ कसली सांगू’ असे म्हणत सरपटत जाणार्‍या गोमेचे विशेषण वापरत, ते हळूहळू जाणार्‍या ट्रामेचे वर्णन डोळ्यापुढे उभे करतात. पण त्या ट्रामेखाली कुठले तरी जनावर येते म्हणून ती थांबते; पण अशा ठिकाणी जिथे वास्तविक सभ्यतेला बाहेर डोकावून बघता येत नाही. पण अशाच वेळेस मनात खोलवर दडवून ठेवलेली वखवखलेली वृत्ती हळूच बाहेर येते. सकाळच्या प्रहरी, बाजूला असलेल्या लालबत्तीच्या वसाहतीत काल रात्री काय काय झाले असेल याचा विचार असली मने करू लागतात आणि त्यांत हे कविमन पण असतेच. मात्र त्याच वेळेस याच कवीस दिसते काय तर ’सुस्नात एकली तरूण त्यातली पोर, नेसली पांढरे लाल कपाळी कोर, ये हळदीकुंकू घेऊनिया तबकात, खिडकीस पूजुनी तिने जोडिले हात’. अर्थातच मग अचानक धार्मिकता जागृत होऊन वाटते खरे, की हा काय प्रकार आहे? हा तर धर्मविधींचा अपमानच आहे! पण मग परत शांत विचार करताना लक्षात येते की ’दे अन्न तयाची करितो मानव पूजा’ आणि मग म्हणूनच असे वाटते की ’हे असेच का हो जन्मे पूजास्थान?’

व्यसन हे कायम बाहेरचेच असावे लागत नाही तर ते अगदी घरात आप्तेष्टांबरोबर अथवा मित्रांबरोबर खेळताना रमीच्या डावातून पण दिसते. ’लाल सत्तीच्या जोकरवाचून, डाव रमीचा रमे संप्रती, हाव सुटेना आस हटेना, मार्कांचे अन पर्वत हाती!’ या ओळी बरेच काही सांगून जातात! पण या काव्यसंग्रहात जसे, असे अनुभव अथवा निरीक्षणे आहेत; तशीच स्वातंत्र्यसंग्रामातील आठवणींवरपण सुंदर कविता आहेत. लाला लजपतराय यांना हद्दपार केले गेल्याचे समजल्यावर लोकमान्य टिळकांच्या त्राग्याचे वर्णन करणारी असंतोष ही कविता आणि त्यातल्या ’उमटला मुखातून स्वगतची प्रश्न ज्वलंत, नांदतो कसा मग मिंटो अजून जिवंत’ अशा प्रश्नानंतर लगेच ’मग पुन्हा स्तब्धता तशीच काही काळ, बसवला विवेके काळ-स्थळाचा मेळ, मुखी शब्द उमटले अस्फुटतसे चुटपुटते, या दुर्बल देशी कसे अपेक्षू भलते?’, अशा भेदक काव्यपंक्ती ऐकताना जणू काही आपण त्या प्रसंगाचे साक्षीदार आहोत, असे वाटते. तीच कहाणी क्रांतिवीर नाना पाटील यांच्या पत्रीसरकारच्या काळात, ते ब्रिटिशांना चुकवत असताना एका म्हातारीने स्वत:च्या झोपडीत जागा देऊन स्वतःच्या नवोढा मुलीबरोबर त्यांना पांघरूणात झोपायला लावले आणि पोलीस झडती घ्यायला आले तर ’दादा, माझे लेक-जावई’ असे सांगितल्याची गोष्ट सांगणारी ’आसरा’ ही कविता. त्यातल्याच ’बेचाळीसच्या रणमर्दांना असा लाभला दिव्य आसरा, लोकशक्तीच्या सामर्थ्यावर चिरंजीव हो मग सातारा’ या ओळीतून जनमानस कसे होते, याची एक वेगळीच कल्पना येते. मात्र त्याचबरोबर आजची किडलेली परिस्थिती पाहून, याच स्वातंत्र्यसैनिकांच्या आत्म्यांना होणारा क्लेश ’अफूची फुले’ ह्या कवितेत वाचताना त्रासच होतो.

जीवनातील सर्वसामान्य प्रसंग; मानवी मन आणि असमान्य मानवी वृत्ती; वर दिसणार्‍या आणि आत लपलेल्या भावनांचे आविष्कार असे एक ना अनेक प्रसंग जोगियात रंगवताना गदिमांमधील असामान्य कवी दिसतो. कुठलेही पान उघडावे आणि वाचायला लागावे, असे हे पुस्तक आहे. जोगियाच्या सुरूवातीस माडगूळकर म्हणतात, "जीवनव्यवसाय म्हणून लेखणीशी अनेकदा बेइमानी करायचा प्रसंग मजवर आला-येतो आहे. ह्या संग्राहातील कविता मात्र व्रतस्थपणे केलेली काव्यनिर्मिती आहे. या संग्रहाला ’जोगिया’ हे नाव म्हणूनच द्यावेसे वाटले.".असे वाटते की या एका ओळीतच ह्या काव्यसंग्रहाची यथार्थ ओळख होते.

अनुक्रमणिका

अनुभव

कवितासंग्रहाचे परिचय

लेखकांचे परिचय

मुलाखत

पुस्तक परिचय

प्रतिक्रियां

सुंदर ...

आवडलें. पण प्रकाशकाचें नांव,पत्ता, दूरध्वनी क्र. तसेंच पृष्ठसंख्या व किंमत या गोष्टी देखील आल्या तर पुस्तक विकत घेणें सोपें पडतें. पुढील खेपेस या गोष्टी द्याव्यात ही नम्र विनंति.

दोन स्मृती जाग्या झाल्या. चाळिसेक वर्षांपूर्वीं आम्हीं रोज संध्याकाळीं शिवाजी पार्कमध्यें कट्ट्यावर बसत असूं. तेव्हां गदिमा जवळजवळ रोज शिवाजी पार्कच्या आंतल्या रस्त्यावरून चालतांना दिसत. जरी कधीं आम्हीं ओळख करून घ्यायला गेलों नसलों तरी ते समोरून दिसावेत म्हणून त्यांच्या विरुद्ध दिशेनें आम्हीं चालत असूं.

दीडदोन वर्षांपूर्वीं आंधळें भुयार म्हणून कश्मीरच्या पार्श्वभूमीवरची एक अनुवादित कादंबरी वाचली. या कादंबरीचा नायक एका वेश्येच्या प्रेमाखातर आयुष्य उधळून देतो. तेव्हां वाटून गेलें कीं जोगियाच्या नायिकेला असा नायक भेटायला हवा होता.

धन्यवाद.

सुधीर कांदळकर

प्रकाशकाचें नांव,पत्ता,

प्रकाशकाचें नांव,पत्ता, दूरध्वनी क्र. तसेंच पृष्ठसंख्या व किंमत या गोष्टी देखील आल्या तर पुस्तक विकत घेणें सोपें पडतें. पुढील खेपेस या गोष्टी द्याव्यात ही नम्र विनंति.

या पुस्तकाबद्दलची ही माहिती इथे मिळेल

निखिल देशपांडे

प्रतिसाद द्या

प्रतिक्रिया प्रकाशित करण्यासाठी येण्याची नोंद करा अथवा सदस्य व्हा.