• '

जग बदलू शकलेले पुस्तक ...7: वेल्थ ऑफ नेशन्स

प्रभाकर नानावटी
सोमवार, 9 August, 2010 - 11:03
 

मुखपृष्ठ

पुस्तक जोडलेले नाही

 
 

पुस्तक

पुस्तक जोडलेले नाही

 

जग बदलू शकलेले पुस्तक ...7

वेल्थ ऑफ नेशन्स -1776

ऍडम स्मिथ (1723-1790)

ऍन इन्क्वायरी इंटु दी नेचर ऐँड कॉजेस ऑफ दी वेल्थ ऑफ नेशन्स एवढे लांबलचक शीर्षक असलेले हे पुस्तक ऍडम स्मिथ या अर्थशास्त्रज्ञाने लिहिलेले आहे. सामान्यपणे हे पुस्तक वेल्थ ऑफ नेशन्स या छोटया शीर्षकानेच ओळखले जाते. अमेरिकन क्रांतीच्या वर्षी प्रकाशित झालेल्या या पुस्तकाला क्रांतीपेक्षाही जास्त प्रसिध्दी मिळाली. जगातील बहुतेक राष्ट्रामधील आर्थिक गतिशीलता या स्कॉटिश अर्थशास्त्रज्ञाने लिहिलेल्या वेल्थ ऑफ नेशन्स या पुस्तकामुळेच आलेली आहे. ऍलन ग्रीनस्पॅनसारखे आताचे अनेक अर्थतज्ञ आजही ऍडम स्मिथच्या बिनतोड मांडणीची कौतुक करतात.

वयाच्या 28व्या वर्षी ग्लॅस्गो विद्यापीठात तर्कशास्त्र व नैतिक तत्त्वज्ञानाचा प्राध्यापक म्हणून रुजू झाल्यानंतर ऍडम स्मिथनी अर्थशास्त्राचा अभ्यास चालू केला. आर्थिक व्यवहारांना शास्त्रीय चौकटीत बसवता येते हे प्रथमच जगाला कळले. तोपर्यंत राजकीय अर्थव्यवहाराला शास्त्र म्हणून मान्यता नव्हती. तार्किकरित्या विश्लेषण करून जागतिक आर्थिक घडामोडीमधील सूत्रबध्दता शोधून व्यक्ती, समाज व राष्ट्र यांच्यातील परस्पर संबंध, त्यांचे नैतिक व्यवहार, इतर क्षेत्रांवर त्याचे होणारे परिणाम इत्यादी सर्व गोष्टींचा विचार करून एक स्थूल कल्पना त्यानी मांडली. माणूस हा केवळ अन्न, वस्त्र, निवारा यासाठी जगणारा प्राणी नसून नैतिक व सामाजिक जवाबदारींची जाण असणारा एक स्वतंत्र सजीव आहे, यावर त्याचा भर होता. म्हणूनच विज्ञानाने माणसाचा विचार करताना त्याच्या जैविक व मानसिक जडणघडणीबरोबरच मानवी स्थिती-गती, भोवतालची परिस्थिती, त्याचे सामाजिक व्यवहार, इत्यादींचा पण सहानुभूतिपूर्वक विचार करावा असा त्याचा आग्रह होता.

त्याकाळी या पुस्तकाचे जगभर अभूतपूर्व स्वागत झाले. औद्योगिक क्रांतीला जे अधिष्ठान हवे होते तेच ऍडम स्मिथने या पुस्तकामधून दिले. ब्रिटनची विस्कटलेली आर्थिक घडी नीट बसवण्यात या पुस्तकाचा फार मोठा वाटा होता. फ्रान्सच्या राज्यक्रांतीची बीजं या पुस्तकात सापडतील. या पुस्तकाच्या अभ्यासकाने नंतरच्या शतकातील जागतिकीकरण व उदारीकरण यांची मुहुर्तमेढ रोवली. रोनाल्ड रीगन, मार्गारेट थॅचर या विसाव्या शतकाच्या उत्तरार्धातील राज्यकर्ते आपल्या आर्थिक मनमानीसाठी ऍडम स्मिथची साक्ष काढत होते.

या पुस्तकातील मांडणीवर टीका करण्यासाठी भरपूर वाव आहे. ऍडम स्मिथने तळागाळातील गोरगरीबांचा कधी काळी विचार केला होता का? सामान्य लोकांविषयी कळवळा दाखवण्याचे आग्रही प्रतिपादन त्याच्या पुस्तकात सापडते का? काहींच्या वैयक्तिक स्वार्थामधूनच परोपकारी प्रवृत्ती वाढते या धारणेवरच त्याच्या सिध्दांताचा डोलारा उभा आहे व या धारणेला नंतरच्या अनेकांनी आव्हान दिले आहे. परंतु स्मिथच्या मते, प्रत्येकाला स्वतंत्रपणे जगण्याची मुभा दिल्यास, त्याच्या जीवन व्यवहारात कुठलीही बंधनं नसल्यास त्याचे जीवन समृध्द होते व राष्ट्राच्या संपत्तीत आपोआपच भर पडत जाते व त्यातच सर्वांचे कल्याण आहे. आता पर्यंतच्या वेगवेगळया आर्थिकव्यवहारांचा अभ्यास केल्यास भांडवली व्यवस्था हीच सर्वात श्रेष्ठ व्यवस्था असून या व्यवस्थेत सुधारणेला भरपूर वाव आहे, यावर त्याचा दृढ विश्वास होता.

या पुस्तकामुळे त्या काळच्या समाजात बदलाचे वारे वाहू लागले. नशिबाला कोसत जगणार्‍या सामान्य माणसाला आपणही काही करू शकतो, आपली स्थिती बदलू शकतो, प्रयत्न केल्यास जीवनाचा स्तर बदलणे शक्य आहे, या विचारामुळे समाजात नव चैतन्य प्राप्त झाले. बापाचा धंदा मुलाने, मुलाचा धंदा त्याच्या मुलाने असे पिढयान पिढया चालत आलेल्या उद्योग व्यवसायाच्या साखळीत या पुस्तकातील संदेशामुळे खंड पडू लागला. याच कालखंडात तंत्रज्ञानात भर पडू लागल्यामुळे ऍडम स्मिथच्या विधांनाना पुष्टी मिळाली. मिळालेली संधी व स्वत:तील कौशल्यांच्या जोरावर आपणही कुठल्या कुठे पोचू शकतो, हा आत्मविश्वास वाढू लागला. ऍडम स्मिथच्या मार्गदर्शी तत्त्वामुळे जग बदलता येते, परिस्थिती बदलता येते यावर सर्व जगाचा विश्वास बसू लागला.

प्रत्येकात स्वयंविकासाची आंतरिक ओढ असते. हीच दृष्टी विसाव्या शतकात विकसित झाली, हे लक्षात येईल. स्वयंविकासाचा दहशतवाद, वसाहतवाद, निर्वंशीकरण, खच्चीकरण इत्यादीशी संबंध जोडता येत नाही. तरीसुध्दा स्मिथची जीवनदृष्टी बाजारीकरणाकडे वाटचाल करणारी होती. चांभार, लोहार, कुंभार, सुतार इत्यादी बलुतेदार इतरांचे भले करण्यासाठी व्यवसाय करत नसून त्यांच्यामधील स्वयंहिताचा स्वार्थच त्यांना प्रेरणा देत असते. आपण त्यांच्यामधील माणुसकी शोधत बसण्याऐवजी त्याच्या स्वयंहिताला साद घालायला हवे. आपल्या गरजांच्यापेक्षा त्यांच्या फायद्याच्या गोष्टी करायला हव्यात. हा त्याचा सांगण्याचा मूळ हेतू होता. कदाचित यामधून खाजगीकरणाची इमारत चढली असेल. परंतु खाजगीकरणाने घातलेल्या गोंधळाकडे पाहिल्यानंतर सामान्य माणसाचे हाल बघवत नाहीत, हेही तितकेच खरे. परंतु स्मिथच्या दृष्टीपथामध्ये सामान्य माणसाला, गरीबाला, दुर्बलाला, स्थान होते तरी कुठे?

स्मिथची घणाघाती टीका ब्रिटिशांनी अनेक शतके पोसलेल्या व्यापारी भांडवलवादावर होती. या सिध्दांतानुसार व्यापारवाढीतूनच संपत्ती निर्माण होते व त्यातून देशाचा फायदा होतो. अशा व्यापारवाढीला उत्तेजन देण्यासाठी, संरक्षण देण्यासाठी, सवलती, अनुकूल कायदे-कानून असावेत यावर ब्रिटिशांचा कटाक्ष होता. स्मिथच्या मते अशी बंदिस्त व संरक्षित व्यवस्था बिनकामाची असते. ईस्ट इंडिया कंपनी अशाच व्यापार व्यवस्थेचे अपत्य होते. भांडवली व्यवस्थेला अशा प्रकारची संरक्षित भूमिका धोकादायक ठरू शकेल. राष्ट्राची संपत्ती सोन्या-नाण्यातून किंवा नफा-नुकसानीतून न मोजता त्या राष्ट्रातील लोकांच्या राहणीमानावरून, त्यांच्या जीवनशैलीवरुन मोजावे, यावर स्मिथचा कटाक्ष होता. ही व्यापारी व्यवस्था विक्रेत्याचा लाभ व ग्राहकाचे नुकसान यावर भर देते. परंतु निखळ भांडवली व्यवस्थेत विक्रेता व ग्राहक या दोघांनाही आर्थिक व्यवहारामधून संपूर्ण समाधान मिळू शकते. वस्तु योग्य भावात मिळाल्याचा आनंद ग्राहकाला व वस्तू विकून नफा कमावल्याचे समाधान विक्रेत्याला व उत्पादकाला. स्मिथची ही मांडणी भुरळ पाडणारी होती. याच तत्त्वाचे विकृत परिणाम रेनॉल्ड रीगन व मार्गारेट थॅचर यांच्या राजकीय कारकिर्दीत बघावयास मिळाले.

तरीसुध्दा वेल्थ ऑफ नेशन्स या पुस्तकाचा मोठेपणा नाकारण्यात अर्थ नाही. औद्योगिक क्रांती, तंत्रज्ञानातील झेप याच कालखंडात घडत होत्या. हीच नेमकी वेळ साधल्यामुळे या पुस्तकाचा फार गवगवा झाला. त्या काळातील अभ्यासू नेत्यांनी हे पुस्तक वाचून आपली ध्येयधोरणं राबवली. त्यामुळे युरोपियन समाजाला अत्यंत वेगळे वळण लागले. युरोपातील आर्थिक विकासाने उच्चांक गाठला. फ्रेंच राज्यक्रांतीतील अध्वर्यूंनासुध्दा हेच पुस्तक मार्गदर्शी ठरले. अमेरिकेतील भांडवलशाहीला या पुस्तकामुळे तात्त्विक आधिष्ठान मिळाले. वैयक्तिक सुखाच्या मागे लागलेला हा समाज त्यासाठी कुठल्याही थराला जाण्याच्या तयारीत होता. शोषणाला धरबंद राहिला नाही. शेतकर्‍यांच्या शेतीमालांना योग्य भाव व संरक्षण देणारे कॉर्न कायदे कालबाहृ ठरले.

स्मिथने मांडलेल्या अनेक तत्त्वांपैकी भांडवलशाहीचे उदात्तीकरण एवढेच तत्त्व सोईस्करपणे अनेक राष्ट्रांनी उचलून धरली. स्मिथने शिक्षणाच्या खाजगीकरणाला विरोध दर्शविला होता, हे विसरले. कुठल्याही प्रकारचे आक्रमण, बंधन, बळजबरी, यांना त्याचा विरोध होता. सामान्यावरील कराचे ओझे कमी करावे, असा त्याचा आग्रह होता. प्रशासनात न्याय वागणुकीची तो अपेक्षा करत होता. नैसर्गिकरित्या आर्थिक वाढ व्हावी, यावर त्याचा भर होता. पिळवणूक, जुलमी व जबरदस्ती करणार्‍या प्रशासनाला त्याचा सक्त विरोध होता. परंतु युरोपीय भांडवलदारांनी या पुस्तकाचा आधार घेऊन भरपूर धुमाकूळ घातला, हे आपण विसरू शकत नाही.

स्मिथच्या मते खाजगीकरण व बाजारीकरण यांच्यात सुसूत्रता आणण्यासाठी अदृष्य हात सतत कार्य करत असते. त्यामुळे वेगळया नियंत्रकाची गरज नाही. परंतु वरचेवर ठिकठिकाणी आर्थिक अरिष्ट कोसळताना हा अदृष्य हात कुठे गायब होतो याचे स्पष्टीकरण ऍडम स्मिथ किंवा त्याचे समर्थक देवू शकले नाहीत. एकीकडे मार्क्सचे समाजवादी आर्थिक तत्त्वज्ञान व दुसरीकडे स्मिथचे भांडवलशाही आर्थिक तत्त्वज्ञान याच संभ्रमातून जगाचा प्रवास चालला आहे. तरीसुध्दा वेल्थ ऑफ नेशन्समधील तत्त्वज्ञानाचे आकर्षण संपलेले दिसत नाही.

सुंदर ओळख.

धन्यवाद प्रभाकर.

हे पुस्तक आधी वाचले नव्हते. पण आता वाचेन. गूगल वर शोधल्यावर पीडीएफ सापडली आहे याची. नक्की वाचेन
http://www2.hn.psu.edu/faculty/jmanis/adam-smith/Wealth-Nations.pdf या दुव्यावरुन हे पुस्तक पीडीएफ स्वरुपात उतरवून घेता येईल.

अवांतर : हे सुंदर पुस्तक मराठीत अजुनही कोणी अनुवादीत का नाही केलेले?
केले असल्यास कृपया सांगावे. 'अर्थात' हा अच्युत गोडबोले यांनी लिहिलेला ग्रंथ म्हणजे याचा अनुवाद आहे काय? गूगलले पण जास्त माहिती नाही मिळाली. कोणाला माहिती असल्यास कृपया सांगावे.
अनुवाद झाला असेन तर ठीक आहे नाहितर इंग्रजी पीडीएफ वर भागवावे लागेल Smile

मी एक पुस्तकवेडा
http://pustakveda.blogspot.com/

पुस्तक पीडीएफ स्वरुपात

पुस्तक पीडीएफ स्वरुपात दिल्याबद्दल धन्यवाद

हे पुस्तक वाचायला साधारण किती दिवस लागतील .
अनुवादित पुस्तक मिळाल्यावर शेअर करा कुणीतरी .

अजुन एक चांगला परिचय असे

अजुन एक चांगला परिचय असे म्हणावेच लागेल.
सागर पुस्तकाचा दुवा दिल्या बद्दल धन्यवाद
बाकी लवकरच वाचायचा प्रयत्न करतोच.

निखिल देशपांडे

मेंदुचा भुगा करणारे पुस्तक

जग बदलू शकलेले पुस्तक आहे रे निखिल
जरा जपून.. ५०० पानांचा ठोकळा एक वेळ मुद्रीत स्वरुपात वाचता येईल. पण पीडीएफ कॉम्प्युटरच्या स्क्रीनला डोळे लावून वाचली तर कठीणच आहे एकंदरीत.

मी सध्या रोज ४-५ पाने प्रिंट करुन घरी घेऊन जातो आहे. जमेल तसे समजून घ्यायचा प्रयत्न करतो आहे.
या मार्गाने कधी वाचून होईल माझे पुस्तक देव जाणे?.. सध्या तरी 'पूर्वांचल' वाचायला घेतले असल्यामुळे झपाटलो आहे. मेंदुचा भुगा करणारे हे पुस्तक पूर्वांचल नंतर वाचेन Smile

मी एक पुस्तकवेडा
http://pustakveda.blogspot.com/

छान परिचय

परिचय नेहमीप्रमाणे मस्त!
यावेळी सागरने दिलेल्या पीडीएफ्ची भर आहे पण मलाही प्रिंट काढूनच वाचावे लागेल..

-ऋ
----------------------
"चला, मी माझा एकमेव जुनाट कोट घालून एक नवं पुस्तक घेऊन येतो"

वाचनाची मजा

खरे आहे ऋषिकेश,

कागदावरचे वाचण्यात जी मजा आहे ती डीजीटल वाचनात नाही Smile

मी एक पुस्तकवेडा
http://pustakveda.blogspot.com/

अर्थात "वेल्थ ओफ नेशन्स" चे

अर्थात "वेल्थ ओफ नेशन्स" चे भाषांतर नाही आहे. गोडबोल्यांनी अर्थात मध्ये अर्थशास्त्राच्य निरनराळ्या थिअरीज वर भाष्य केले आहे. अर्थशास्त्रज्ञ आणि अर्थशास्त्राच्या वेगवेगळ्या थेअरीज (आणि त्यांचा इतिहास) त्यांनी सोप्य भाषेत सांगितल्या आहेत एवढेच. पुस्तकात १-२ चुका आहेत पण त्या खपुन जातात. खुपच छान आहे एरवी अर्थात देखील वाचायला.

माझ्या माहिती नुसार तरी अजुन "वेल्थ ओफ नेशन्स" चे भाषांतर कोणी मराठीत केलेले नाही आहे.

'अर्थात' बद्दल धन्यवाद

खुलाशाबद्दल आणि 'अर्थात' च्या फीडबॅक बद्दलही धन्यवाद मृत्युंजया Smile

आता वाचेन 'अर्थात'. स्टॉकमधली पुस्तके संपली की Wink

मी एक पुस्तकवेडा
http://pustakveda.blogspot.com/